सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)

Submitted by Dr. Satilal Patil on 21 May, 2021 - 05:35
ड्रीमर अँड डूअर्स

सेंद्रिय भुत !.... माझी मुशाफिरी (भाग ६)

पुणे सिंगापूर पुणे या हिमिमेतील २०००० किलोमीटर प्रवासादरम्यान पर्यावरण आणि शेतीसंबंधीचे अनुभव.

हिमालयाला गोंजारून येणारा थंडगार वारा अंगावर घेत भुतानच्या निसर्गरम्य वातावरणात आम्ही बुलेट पळवत होतो. वाऱ्याच्या जोडीने आजूबाजूच्या शेतातील पिके पानांच्या टाळ्या वाजवत परदेशी पाहुण्यांचं स्वागत करत होते." भूक लागलीये यार, थांबूयात की जेवायला" असं म्हणत रस्त्याच्या बाजूच्या लहानश्या हॉटेलकडे बाईक दाबली. किचन मधील भूतानी अन्नाच्या घमघमाटाने पोटातील कावळ्यांना चेव सुटला होता. झो शुंगो, इमा दात्सी आणि थुपका या भूतानी पक्वान्नावर हात मारला. "अरे! कीटकनाशक फवारलेली भाजी तर नाही ना वापरली याने?" शंकेच्या रासायनिक पालीने मनात चुकचुकन्याची चूक केली. पण इथं समदं सेंद्रियच असतं, असं कळल्यावर जीव सेंद्रिय पक्वान्नाच्या भांड्यात पडला. भूतानच्या सेंद्रिय शेतीची कहाणी फारच रोचक आहे.

खरं सांगायचं तर या देशातील पारंपरिक शेती बऱ्याच अंशी सेंद्रीय बाण्याची होती. तिची तऱ्हा सेंद्रीयच होती फक्त तिला आंतरराष्ट्रीय मान्यता नव्हती. तिला गोऱ्यांनी सर्टफिकेट देऊन प्रमाणित केलं नव्हतं.

सेंद्रीय शेती हा विषय पर्यावरण संवर्धन अंतर्गत येत असल्याने तो भूतान च्या सकल राष्ट्रीय आनंद स्कीम च्या चार स्तंभांपैकी एक आहे. त्यामुळे २०१४ मध्ये भूतान च्या पंतप्रधानांनी २०२० पर्यंत जगातील पहिला सेंद्रिय देश बनायचं आहे असं जाहीर केलं आणि हे शिवधनुष्य पेलवायचं ठरवलं. मुळातच सेंद्रिय असलेल्या शेतीला अजून सेंद्रिय करायचं भूत भूतानी सरकारच्या मानगुटीवर बसलं आणि सर्व देशाने झपाटून या कामात झोकून दिल.
IMG_0285.jpg
फुटपट्टी घेऊन माप काढण्यात पटाईत पाश्चिमात्य संशोधकांनी हा प्रकल्प सुरु झाल्यावर दोन वर्षानंतर म्हणजे २०१६ साली, ६२०० भूतानी शेतकऱ्यांचा सर्वे करून एक संशोधन केलं आणि अमेरिकेतील ग्लोबल इकॉनॉमिक कॉन्फरेन्स मध्ये शोधनिबंध प्रकाशित करून त्यांनी निरीक्षणं नोंदवली की भूतानी सेंद्रिय प्रकल्पाचं काही खरं नाही. या दोन वर्षात पारंपरिक शेतीपेक्षा १९.१ % उत्पन्न कमी झालं, अन्नधान्याची आयात वाढली आणि त्यांचं स्वावलंबत्व ९.४ टक्क्यांनी कमी झालं जमिनीतील नत्राची जमिनीतील उपलद्धता २२.२ टक्क्यांनी घटली त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार १.३ % ने उणावला. या संशोधनाचा दाखल देत काहींनी भुतान वर टीकेची झोड उठवायला सुरवात केली. एकदम मोठ्या प्रमाणात सेंद्रीय वर जावं का? असा सवाल विचारला जाऊ लागला.

पण यावरून भूतान चा सेंद्रिय प्रकल्प फेल झाला असं म्हणायचं का? तर उत्तर आहे ‘नाही’! कारण गोऱ्या संशोधकांनी या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जरा आगोदरच घेऊन निकाल लावायचा प्रयत्न केला होता. पारंपरिक शेतीच सेंद्रीय रूपांतर होण्यास कमीत कमी तीन वर्ष लागतात. इथं मात्र यांनी दोन वर्षात निकालाची अपेक्षा केली होती.

परिवर्तनाच्या सुरवातीच्या वर्षात कीड रोग थोडेफार वाढणारच, रासायनिक खतांच्या सलाईनवरील मातीला सेंद्रिय कस धरायला धीर धरावा लागेलच. गाडी शिकणाऱ्या गाड्यागत सेंद्रिय शेतीतंत्र शिकायला शेतकऱ्याला थोडा वेळ लागणारच. अजून शिकाऊ ड्रायव्हरचा "L" लावून फिरणाऱ्याची फायनल परीक्षा घेऊन काय फायदा? ही शेती पर्यावरणपूरक आहे. जमीन, वातावरण, पक्षी प्राणी, माणूस ह्या सगळ्यांना ध्यानात ठेऊन करायची शेती आहे. जसा आदर्श शिक्षक शाळेतील हुशार आणि ‘ढ’ विद्यार्थ्याला जमेत धरून, ‘ढ’ ला वरती ओढून शाश्वत रीतीने त्याची शाळा करतो. तसंच जमीन, हवा, पाणी, जीवजंतू यांच्यातील कमजोर कडीला आधार देत समतोल साधावा लागतो. त्यासाठी फक्त शेतातील कमजोर विद्यार्थी अचूक शोधणं गरजेचं असत.
paro-valley-river-pano.jpeg
इथं आगोदरच सेंद्रियपूरक वातावरण होत. पाटी आगोदरच कोरी असेल तर लिहणं सोप जात. भूतानच्या सेंद्रिय प्रकल्पच SWOT विश्लेषण केल्यावर त्यातील संधी आणि बलस्थानं प्रकर्षानं समोर आली. हे SWOT विश्लेषण जरा जाणून घेऊया. कदाचित आपण सुद्धा असंच आपल्या शेतीचं SWOT करू शकू.

बलस्थानं.
१. भूतान च्या राष्ट्रीय विकास तत्वज्ञानाशी जुळणारी ही संकल्पना होती. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील दरी कमी झाली.
२. राजा बोले दल हाले या म्हणीप्रमाणे येथील राजा बोलला आणि संपुर्ण दलाने हालचाली केल्या. मायबाप सरकारचा बळकट राजकीय आणि धोरणात्मक पाठिंबा हे मोठं बलस्थान होतं.
३. देशातलं वातावरण सेंद्रिय पोषक होतं, कारण भूतानच्या पारंपरिक शेती आणि सेंद्रिय शेतीशी मिळतीजुळती होती. त्यामुळे जुनं शेतीच ज्ञान या प्रकल्पासाठी बऱ्यापैकी सुसंगत होतं.

कमजोरी:
१. जरी शेतीतंत्र जुन्यासारखं असलं तरी सेंद्रीय शेतीच्या मॉडर्न फायद्यांबाबत लोकं अनभिज्ञ होते त्यामुळे सुरवातीला लोकातील प्रोहत्सानाचा अभाव दिसूल आला.
२. लोकसंख्येच्या बाबतीत आगोदरच चिमुकला देश असल्यामुळे शेतमजुरांची कमतरता भासत होती.
३. सेंद्रिय शेतीत कीडरोग नियंत्रणासाठी आवश्यक निविष्ठांची कमतरता होती. जैविक कीटकनाशके आणि खते बनवणारे व्यवसाय देशात नव्हते.
४. सुरवातीला धोरणात्मक स्पष्टता कमी होती त्यामुळे या राष्ट्रीय प्रकल्पात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता.

संधी :
१. सेंद्रिय मालासाठी असणारी मोठी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ भूतानी शेतमालाची वाट पाहत उभी होती.
२. आगोदरच रसायनांशी परहेज ठेवणाऱ्या लोकांना एक पाऊल पुढे जाऊन निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करायची संधी मिळाली होती.
३. निसर्गाशी सुसंवाद ठेवणाऱ्या देशाने नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत उपयोग अजून जास्त डोळसपणे केला होता.
४. अन्न धान्याच्या आणि शेतीनिविष्ठांच्या परदेशी पुरवठ्यावरील भर कमी होऊन त्यासाठी आत्मनिर्भर होण्याची संधी चालून आली होती.
५. सेंद्रिय खताचे स्थानिक पुरवठादार तयार करणे शक्य होणार होतं.
६. परदेशी बियाणं आयात करून आपल्या मातीत रुजवण्यापेक्षा, स्वदेशी बियाणांचे सार्वभौमत्व तयार करणे शक्य होणार होतं.
७. स्थानिक पिकांना प्रोहत्साहन मिळणार होतं.
८. देशातल्या मातीची सुपीकता वाढवण्याची सुसंधी आली होती.
९. इतर पारंपरिक पिकांपेक्षा येथील सेंद्रिय मालाला भाव खायचा चान्स होता.
१०. स्थानिक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी तयार होऊन बेरोजगारीची समस्या कमी होतील अशी आशा होती..

धोका:
१. रसायनं वजा केल्याने सुरवातीला कीड आणि रोगांचा उपद्रव वाढणार होता. त्यासाठीची उपाययोजना समजून घेऊन तीचा अवलंब करणे गरजेचे होते.
२. देशातील सेंद्रिय खताचे आगोदरच मर्यादित असलेले आणि कमी होत जाणारे श्रोत आणि चिंतेची बाब होती.
अश्या रीतीने या पर्यावरणपूरक शेतीच्या दिंडीत सर्व भूतानी वारकरी सामील झाले होते.

"साहेब, बिनधास्त खावा, इथं अन्नात, पाण्यात केमिकल नाही सापडणार" असा विश्वास मिळाला. मग निशंक मानाने जेवण आटोपले. वरून 'हिमालय की गोद' मधून आलेलं थंडगार निर्मळ पाणी प्यालो. बाहेर आलो तर पानवाला दिसला. चुना न लावलेल्या पानांवर फक्त सुपारीचे २-३ तुकडे ठेवलेले. तोंडात पानाचा तोबरा भरत विचार केला "पान रेसिड्यू फ्री आहे का ?" त्यावर मीच मला झापलं "गुमान पान खा, मात्र त्याची पिंक टाकून हा देश प्रदूषित करू नकोस. चालता है! म्हणत पानालाही चुना न लावणाऱ्या भूतान च्या पर्यावरणाला चुना लावण्याची आगळीक करू नकोस "


या लेखमालेतील इतर भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:

लेख-१: सात देशांच्या शेत शिवाराची सैर! https://www.maayboli.com/node/78689
लेख-२: चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती! https://www.maayboli.com/node/78696
लेख-३: माझी मुशाफिरी!..... https://www.maayboli.com/node/78744
लेख-४: आनंद पिकवणारा देश !..... https://www.maayboli.com/node/78839
लेख-५.: विजिगिषु देश!..त्याची भारताशी वेस! https://www.maayboli.com/node/78934
लेख-६.: सेंद्रिय भुत !

…… लेखक हे ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे (https://drsatilalpatil.com/index.php/product/dreamers-and-doers/) लेखक आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users