दैवगती (भाग २)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2021 - 05:33

जणू कोणी आत येत असल्याची वर्दीच दिली गेली. आतमध्ये मिट्ट काळोख होता. आतून मात्र एक प्रकारचा कुबट वास आला. तीन वर्षांपासूनची गुदमरलेली हवा तोंडावर आली. मॅनेजर एकदम आत जायला धजत नव्हता. त्याला तीन वर्षांपूर्वीचं पळालेलं गिर्हाइक आठवलं. त्या दिवशी रात्री साडे तीनच्या सुमारास घामाघूम होऊन भीतीने डोळे गरगर फिरवीत , थरथर सुटलेला  कौंटरजवळ धावत आलेला तो मध्यमवयीन माणूस त्याला आठवला. त्याचं सामानही त्याने नेलं नव्हतं. अचानक सदाशिवचा आवाज येऊन तो भानावर आला. एक पाय आत टाकीत त्याने अंदाजानेच लायटाचं बटण दाबलं. मंद पिवळसर प्रकाशात  ते दोघे आत उभे राहिले. खोली चांगलीच प्रशस्त होती. खोलीच्या समोरच्या भिंतीला लागून एक बंद डबल खिडकी होती. डबल म्हणजे वरच्या भागात लोखंडी गज नव्हते पण खाली होते. अशा उरलेल्या  दोन्ही भिंतींमध्ये एकेक खिडकी होती. पडदा हा प्रकारच नव्हता. समोरच्या एका कोपऱ्यात अरुंद मोरीवजा भाग होता. दुसऱ्या कोपऱ्यात संडास असावा. खिडक्यांची लाकडी  तावदाने आणि संडासाच्या दाराच्या किंचित चिरफळ्या निघाल्या होत्या. भिंती व  खिडक्यांना कधीतरी रंगअसावेत असा भास होत होता . त्या पिवळसर प्रकाशात सदाशिवला फारसं काही दिसत नव्हतं. समोरचा पलंग पाहून, कधी मॅनेजर जातोय आणि मी पडतोय असं त्याला झालं होतं.मधेच पलंगाच्या समोरच्या भिंतीवरील बंद घड्याळ त्याला दिसलं. त्यात बंद  पडल्याने  साडेतीन वाजलेले दिसत होते. नक्की किती वर्षांपासून बंद पडलं होतं काय माहित, सदाशिवच्या मनात आलं. मग वैतागून,  आपण कशाला डोकं खायचं ? असा विचार त्याने केला. मॅनेजर नुसताच उभा होता. म्हणून त्याने त्याला खायला देण्याची आठवण दिली. त्यावर ते म्हणाला," ठीक आहे, मी खाली जातो आनी किचनमधी काय हाय पाहतो. आता नोकर आला का बिछाना लाऊन घ्या. येतो लगेचच." असं म्हणून तो भराभर पायऱ्या उतरत तो गेला. सदाशिव खोलीत फिरला. त्याला पाय धुळीच्या जाजमात पडल्यासारखा वाटला. त्यानी प्रथम उजव्या बाजूची खिडकी उघडली. वाऱ्याचा वेगवान झोत तोंडावर आला. उघडायला जोर बेतानीच  लावला. न जाणो खिडकी तुटली तर ?  ग्रामपंचायतीच्या दिव्यांनी बाहेर अंधारच जाणवू लागला. अचानक त्याला वाऱ्यावर थोड्या थोड्या वेळाने जळक्या दुधासारखा वास आला. आणि दूर कुठेतरी आग लागल्यासारखी दिसली. इतकी छोटीशी आग कुठे लागली आणि कोणी विझवत  का नाही त्याला कळेना. हो , ती शेकोटी नक्कीच नव्हती. मग काय होतं ते ? घाबरलेल्या मनाने ती चिता असल्याचं सांगितलं. तो तसा घाबरट नव्हता......पण शहारला. अंगावर किंचित काटा आल्यासारखं त्याला वाटलं.. कोणीतरी आणखीनही खोलीत आल्याचं त्याला जाणवलं. त्याने गर्कन मान वळवली. तो अंथरुण पांघरुण घेऊन येणारा नोकर होता. त्याने त्याला रामराम ठोकला. त्याच्या डोक्यावर वळकटी आणि हातात पाण्याची बाटली होती ..त्याच्या हातून ती घेऊन सदाशिवने घटाघटा पाणी प्यायलं.ते पाहून नोकर वळकटी पलंगावर ठेवीत म्हणाला, " आवो असं पानी पियाल तर संपल की. हाटीलात पानी कमी हाय. आणखी येक बाटली आनावी लागंल जनू. द्येतो आनून."  नोकर धबधब पाय वाजवीत खाली गेला. सदाशिवची नजर दूरवरच्या चितेकडे गेली. आता तिथं आग कमी अन् धूर जास्त झाला होता. मग त्याने समोरच्या भिंतीवरील खिडकी उघडली.तिचं लाकडी तावदान मात्र अर्धवट तुटून लटकू लागलं. तो घाबरला . त्याचवेळी नेमका मॅनैजर आत येत म्हणाला, " खिडक्या लय जुन्या झाल्यात. आता डावी खिडकी उघडून नका. हे घ्या.दोन भाकऱ्या , कांद्याची भाजी अन् फक्त चटनी हाय बगा. त्याच्यावरच भागवा. ".  बाजूच्या जुनाट  टेबलावर जेवण ठेवून मॅनेजर निघाला. त्याला थांबवून सदाशिव म्हणाला ," पाच-सात वर्षांपूर्वी इथं खून कसा झाला सांगाल काय ? "
       त्याच्याकडे आपादमस्तक पाहात आणि खांद्यावर हात ठेवून मॅनेजर म्हणाला, " काय आहे ना भाऊ, तुम्ही आत्ता लय थकलेलं दिसताय. इस्रांती घेवा. सकाळच्याला बोलू . " .....आपण विचारण्याची जरा घाईचं केली असं त्याला वाटलं . एक वाजत होता.
सदाशिवने दरवाज्या लावला. पलंगावर वळकटी पसरुन त्याने जवळचीच खुर्ची टेबला जवळ ओढली. डिशमधली भाकर आणि तिखट लसनीचा घांस त्याने तोंडांत घातला. अन् त्याला जबर ठसका लागला. डोळ्यात जमणारं पाणी पुसत त्याने बाटली तोंडाला लावली. नक्कीच भागीनी आठवण काढली असणार. तो प्रथमच भागीपासून दूर राहत होता. खरंतर तो आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी भागीबरोबर मजा करीत असे. तीही त्याची इच्छा मनापासून पुरवीत असे. त्याला ,तिला जवळ घेतल्यावर तिच्या चेहऱ्यावर दाटणारी निराशा आठवली. तोंडातल्या घासामधे मग्न झाल्याने म्हणा किंवा भागीच्या विचारांमधे गुंतल्या मुळे म्हणा दार वाजल्याचे त्याला ऐकू आलं नाही. तशी त्याला शंका आली ही. पण त्याला भास झाला असावा असं वाटल्याने त्याने दुर्लक्ष केले. पण आता मात्र दरवाज्यावर जरा जोरातच थापा पडू लागल्या. तोंडातला अमृतासारखा घांस पटकन गिळून तो दरवाज्या उघडण्यासाठी उठला. मग त्याला आठवलं. पाणी घेऊन नोकर आला असणार. दरवाज्या हलकेच उघडला आणि थंडगार वाऱ्याचा झोत त्याच्या अंगावर आला. बाहेर एक पोरगेलेसा तरण उभा होता. त्याच्या अंगातले कपडे थोडे मळकट आणि चुरगळलेले होते.त्याने आत यावं म्हणून सदाशिव जरा बाजूला झाला. तो तरुण आत येत म्हणाला ," माफ करा भाऊ,पण मी खालच्या माळ्यावरच्या चार नंबरच्या खोलीत राहतो. तुम्ही नवीन आलात कळलं. झोप येत नव्हती. म्हणून तुमाला भेटाया आलो. राग तर न्हाई ना आला ? "  सदाशिव म्हणाला, "न्हाई. या जेवायला. कोण्या गावचे तुमी. "असं म्हणून सदाशिवने त्याला अर्धी भाकर आणि चटणी दिली. त्याने गावाचं नाव सांगितलं नाही. तो जसजसा आत शिरला तसतसा खोलीत  दूध जळल्याचा वास हळूहळू प्रकर्षाने जाणवू लागला. जणू चिता हॉटेलच्या जवळपासच पेटली होती. आता तो  पलंगावर बसून भाकरी खाऊ लागला. सदाशिवला पाण्याची आठवण झाली. आता तर दोन बाटल्या लागतील. नोकराला सांगितलं पाहिजे. असं मनात येताच तो दरवाज्याकडे निघाला. त्याबरोबर
पाव्हणा म्हणाला, " अवो पानी मी आनतो की जाऊन. " ... सदाशिवच्या मनात याला न सांगता कसं कळलं , असं आलं. पण त्याने दरवाज्या उघडला आणि समोर नोकर बाटली घेऊन उभा दिसला. याचंही त्याला आश्चर्य वाटलं. मग त्याने नोकराला आणखी एक बाटली आणायला सांगितली. त्याबरोबर तो म्हणाला," पियाचं पानी कमी येतं, हितं. " असं म्हणून त्याला बोलायची संधी न देता तो जिन्यावरुन जाऊ पण लागला. जास्त न बोलता सदाशिवाने दरवाज्या बंद केला. पावणा म्हणाला, " भाऊ पानी मी वाईच कमी पितो. " असं म्हणून त्याने भाकरी संपवली आणि तोंड धुतलं. मग खिडकीतून बाहेर पाहात तो म्हणाला " माझं नाव म्या सांगितलंच नाय. मी म्हादू. म्हंजी महादेव. सदाशिव मंजिच म्हादेव. आपलं जमंल. " मग खिशातून त्याने सिगारेटचं पाकीट काढलं .मग म्हणाला," वडता न्हवं ?" पाकिटातली एकेक सिगारेट दोघांनी शिलगावली. दोन-तीन खोल झुरके घेतल्यानंतर त्याने परत खिशात हात घातला. आणि पत्ते काढले आणि म्हणाला, " खेळता ना , बसू की पलंगावर." असं म्हणून खाल्लेली ताटली पलंगाखाली ठेवली. त्याने पत्ते पिसता पिसता विचारलं, काय करता तुमी मुंबईला . पुन्हा सदाशिवला धक्का बसला. याला आपण मुंबईला असतो ते कसं माहित . मग त्याने तो काय करतो विचारलं.त्यावर तो म्हणाला, "मिळेल त्ये काम करतो. हितं पोरगी बघाया आल्तो." असं म्हणून तो थोडा लाजला. मग त्याने तेरा तेरा पत्ते वाटले. उरलेले बाजूला ठेवून पयलं पान फोडलं. " रमीच खेळायची म्हना की " सदाशिव म्हणाला.... " आता दोघांत दुसरं काय खेळनार न्हाई का ?"  ...  खेळ चालू झाला. काही डाव झाल्यावर ‌तो म्हणाला, " बिगर पैशाची मजा नाय राव. किती लावनार ? एक रुपया पाइंट ? "... "चालंल की. "
खेळ परत रंगू लागला. मधेच सदाशिव म्हणाला ," गाववाले सरनाची घान कुठून येती. "...." सरनाची.... ? काय राव काय बोलता"  तो पुन्हा मग्न झाला. आता सदाशिव चांगलाच जिंकू लागला.......
                     मधेच त्याने खिशातून नोटा काढून  सदाशिवच्या बाजूला उशीच्या कोपऱ्याखाली ठेवल्या. त्या पन्नासच्या चार नोटा होत्या. दोन वाजून गेले होते. मधेच त्याने सदाशिवला टाइम विचारला. तशी सदाशिव बोलला ," अडीच " . त्याबरोबर झटका बसल्यासारखा तो उठला आणि म्हणाला, " चला, भाऊ निघाया पायजेल. सकाळी गावी जायाचं हाय." सदाशिव त्याच्याशी हात मिळवीत म्हणाला, " एक दोन डाव आणखी मारले असते की . आधी आजची रात हितंच झोपला असता तर लय ग्वॉड वाटलं असतं.....". ..... '"न्हाई न्हाई आता ग्येलंच पायजेल." असं म्हणत तो उठला.  मग सदाशिव दरवाज्याकडे निघाला. मित्राला निरोप तर द्यायला पायजे .पण म्हादू सदाशिवाच्या मागे न जाता खिडकीकडे वळला आणि पलंगावरच्या हालणाऱ्या नोटा पाहून  म्हनला, " त्येवढं पैकं नीट ठ्येवा." एक हात उघडण्यासाठी दरवाज्यावर ठेवून सदाशिवने म्हादूकडे मान वळवली. .......
    अचानक वाऱ्याचा जोर वाढला. आणि म्हादू हसत हसत तरंगत तरंगत खिडकीतून पिसासारखा बाहेर गेला....... सदाशिव अवाक होऊन पाहू लागला. असलं   " अघटीत" त्याने कधीच पाहिलं नव्हतं. त्याचं तोंड तसंच उघडं राहीलं.अंगाला सुटलेल्या थरथरीने दरवाज्या जवळच तो मटकन् खाली बसला. सगळी रुम भिंती खिडक्यांसहित त्याच्या भोवती फिरु लागली. काही वेळ तो डोकं धरुन तसाच बसला. त्याला भयंकर तहान लागली. पाणी उठून घेण्याइतकं त्राणही त्याच्यात आता उरलं नव्हतं. अजूनही तो शुद्धीत असल्याचे लक्षात आल्याने त्याला आश्चर्य वाटलं. बाटलीतलं पाणी संपल्याचे त्याला आठवलं. त्याचं लक्ष बाटली कडे गेलं.पलंगाखाली ती वाऱ्याने आडवी झाली होती. पण त्याला ती अर्धी भरलेली दिसली. म्हणजे " तो " पाणी प्यायलाच नव्हता. सदाशिव उभा न राहता सरपटत पलंगाकडे सरकू लागला. तेवढ्याशा श्रमानेही त्याला घाम फुटला. कशीतरी त्याच्या हातात बाटली आली. ती तोंडाला लावणार तेवढ्यात त्याची नजर बाजूच्या डिशकडे गेली.तीत अर्धी भाकरी आ णि चटणी तशीच होती. त्याला आत्ता संबंध लागला.म्हणजे म्हादू जेवला नव्हताच मुळी. आता त्याची खात्री झाली. मॅनेजर ही खोली का देत नव्हता. त्याने घाईघाईने बाटली तोंडाला लावली. पाणी खुपच गार होतं. अजून त्याने पलंगावरच्या नोटांना हात लावलाच नव्हता. पन्नासच्या चार नोटा उशीखाली होत्या. त्याना त्याने हात लावताच ‌त्यांची माती झाली. आपल्याबरोबर खेळलं ते म्हादूचं भूत होतं तर. परत त्याला थंडी भरु लागली.आणि ताप चढत असल्यासारखं वाटलं. खाली जाऊन मॅनेजरला बोलवायला हवं. त्याचे दात थंडीने वाजू लागले. अर्धा पाऊण तास तो तडफडत राहिला. मग अचानक त्याला छातीत कळ आल्यासारखं वाटलं. छातीत उठणारी कळ हाताने दाबत त्याने आजूबाजूला पाहिलं. आता सरण खोलीतच पेटल्याचं त्याला दिसू लागलं. आणि त्या प्रकाशात त्याचे गेलेले आई-वडील त्याला बोलवित असल्याचे दिसले. त्यांच्या पलीकडे म्हादू उभा होता. तो म्हणत होता, " या तुम्ही, इकडे सगळं सोपं आणि सरळ आहे. सगळ्या गोष्टी आपोआप होतात. मनात आलेलं समदं मिळतं बगा........." आता त्याच्या छातीतल्या कळा थांबल्या होत्या. मग म्हादूचा लांऽऽऽबलचक हात त्याने धरला आणि विनासायास तोही तरंगत खिडकीबाहेर पिसाप्रमाणे उडू लागला.......
                    सकाळचे सहा वाजले होते. दिवसाचा मंद उजेड पसरला होता. बाहेर जनार्दन एका हातात चहाचा ट्रे धरुन दुसऱ्या हाताने दरवाज्या वाजवीत उभा होता........पण सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या सदाशिवाला आता काहीही ऐकू येत नव्हतं आणि येणारही नव्हतं.
(क्रमशः:)

Group content visibility: 
Use group defaults