ईटगीर ...भाग ४

Submitted by सुर्या--- on 14 May, 2021 - 05:25

ईटगीर ...भाग ४

मागील भाग पाहण्यासाठी ...
ईटगीर ---भाग १ https://www.maayboli.com/node/78838
ईटगीर ---भाग २ https://www.maayboli.com/node/78854
ईटगीर ---भाग ३ https://www.maayboli.com/node/78911

अमल आणि अलक चे कॉलेज चालू झालेले असते. आनंदी, हसतमुख, मनमिळावू आणि हुशार व्यक्तिमत्वाचे हे दोघे कॉलेज मध्ये सुद्धा सर्वांचेच आवडते असतात. एक दिवस अमल आणि अलक त्यांच्या मित्रांबरोबर अबा पर्वतावर पिकनिक साठी जातात. खूप अंतर चालून झाल्यावर काही मित्र थकून एका खडकावर विसाव्यासाठी बसतात. काही जण अजून मागेच असतात. अमल आणि अलक हळूहळू पुढे चालू लागतात. पुढे घनदाट अरण्य लागते. मित्र येईपर्यंत थांबावे म्हणून ते मागे वळून पाहतात तोच हवेच्या झुळुकीबरोबर मंदमंद हळुवार खुळखुळ्यांचा आवाज दोघांच्याही कानावर पडू लागतो. आजूबाजूला कोणीतरी आहे याची चाहूल लागताच अमल आणि अलक हळुवारपणे पुढे चालू लागतात. मित्र तसे नजरेच्या टप्प्यात आलेले असतात. आवाजाच्या दिशेने जाताजाता अमल आणि अलक जंगलामध्ये एका वडाच्या झाडाखाली येऊन थांबतात. समोर एक वृद्ध साधू डोळे बंद करून समाधिस्त बसलेले असतात. एवढ्या घनदाट अरण्यात साधूंना पाहून अमल आणि अलक ला थोडा धीर येतो. विनम्रपणे साधूंना प्रणाम करून ते पुढे चालू लागतात, तोच मागून आवाज येतो," स्वप्नांचे विधान अस्पष्ट होऊ देऊ नका, पेटारे शोधा, मार्ग सोपा होईल". अमल आणि अलक मागे वळून पाहतात. समाधिस्त साधू स्मित हास्य करत त्यांना आशीर्वाद देत होते. अमल आणि अलक पुढे चालू लागतात. जंगलातील मंदिरामध्ये पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेतात तोवर त्यांचे मित्रसुद्धा तिथे पोहोचतात.
अमल आणि अलक त्यांच्या मित्रांना त्या साधूंबद्दल विचारतात. मित्र नकारार्थी मान हलवत आम्हाला कोणीही दिसले नाहीत असे सांगतात.
घरी आल्यावर अमल आणि अलक अबोलीला घडलेला वृत्तांत सांगतात. अबोलीच्याही लक्षात काही येत नसते. अबोली भूषण ला त्याबद्दल विचारते. भूषण अबा पर्वताचे नाव ऐकून लगेच सांगतो, तिथे देवभू बाबांचे वास्तव्य आहे. कदाचित त्यांनीच दर्शन दिले असावेत.
अमल अलक थकल्यामुळे जेवून लवकर झोपी जातात. अमल ला पुन्हा स्वप्न पडते. त्याच्या घराच्या मागील भागात बुजवलेल्या टाकीमध्ये खोदकाम करताना अबोली ला एक पेटारे सापडते. देवभू बाबांचे शब्द आठवतात आणि तो खडबडत जागा होतो. अलक ला हि तो झोपेतून उठवतो. त्या पूर्ण वर्णनासहित त्याला पडलेल्या स्वप्नाची कथा तो अलकला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच अबोली ला सर्व दृष्टान्त सांगितल्यावर घराच्या मागील टाकीजवळ ते खोदकाम चालू करतात. संध्याकाळ होईतोवर मातीचा मोठा ढिगारा उपसून होतो. परंतु तरीही त्यात काहीच सापडत नाही. शेवटी थकून अबोली काम अर्धवट थांबवायला सांगते. अमल आणि अलक यांना खात्री असते कि यात काहीतरी सापडणारच. ते शोध घेत राहतात. रात्र झाल्यावर नाइलाजाने काम थांबवून ते झोपी जातात. अबोली झोपेतून उठून अस्वस्थपणे खोदकाम करत असलेल्या जागी जाते. अंधुक उजेडात वरून पाहताना खड्ड्यामध्ये काळोख पसरलेला दिसत होता. मातीच्या ढिगाऱ्याकडे पाहताना तिची नजर मातीमध्ये दबलेल्या अवस्थेत एक वस्तू खड्ड्याच्या बाजूने झुकलेली परंतु मंध्यंतरी लटकून राहिलेली अस्पष्ट च दिसते. पहाट होताच अबोली अमल आणि अलक ची वाट न पाहता टेबलवर उभे राहून ती वस्तू काढते. पेटाऱ्यावरील धूळ माती झटकून ती तिच्या खोलीमध्ये जाते. जुन्या गंजलेल्या टाळ्याला दगडाचा फटका बसताच पेटारे उघडते. यातूनही गंजलेल्या अवस्थेत पेटाऱ्यात प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळलेली एक डायरी सापडते. कोणाची डायरी? कशाबद्दल असेल? असे विचार तिच्या मनात येतच होते. पाने वरचे वर फिरवून पाहताना ती आनंदाने फुलून जाते. अविनाशची हस्तलिखित आणखी एक डायरी....
डायरीत काय असेल? अशी लपवून का ठेवली असेल डायरी? विचारांचा कांगावा सुरु होतो. आणि तो रहस्य उलगडण्यासाठी ति पहिले पान उघडते.
"स्वप्न-विधान" असे शीर्षक देऊन अनेक चित्र विचित्र रांगोळ्या त्यावर काढल्या होत्या. मोरपीस ठेऊन ते पान सुशोभित केले होते. पुढील पानावर लिखाणाची सुरुवात केली होती.

अबोलीच्या मनात विचारचक्र सुरु झाले. दूरच दूर डोंगरांच्या रांगा , चारही बाजूंनी घनदाट अरण्याने वेढलेला तरीही शहराशी रस्त्याने जोडलेला. बाराही महिने खळाळून वाहणारी नदी. डोंगरांच्या कुशीत छोटे छोटे पाण्याचे साठे, काही नैसर्गिक काही कुत्रिम तलाव, यांमुळे माळरानांवर देखील कायमच हिरवाई, रंगीबिरंगी फुले,स्वच्छ हवा, सर्व सोयिनीं सधन असे ईटगीर गाव. येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन. ईटगीर च्या वातावरणात जो कुणी आला तो कायमचाच इथला झाला. येथील लोकांचा स्वभाव हि तितकाच प्रेमळ, मनमिळावू. अश्या या सुंदर गावाची रचना देखील तितकीच सुंदर होती. कोणत्याही आपत्ती मध्ये दळणवळणावर परिणाम होणार नाही यासाठी पर्यायी रस्ते होते. शाळा होत्या, दवाखाने होते. सुखी समृद्धी म्हणता येईल असे हे छोटे खाणी गाव. घनदाट अरण्याच्या सीमा हजारो किलोमीटर पर्यंत पसरलेल्या. त्यामुळे रहस्यांनी भरलेले जंगल. अनेक प्रकारच्या आख्यायिकांनीं नावाजलेलं ईटगीर हे गावं . या गावाचं आणि इथल्या वातावरणच देखणं रूप डोळ्यात साठवाव तितकं कमी, शब्दांत लिहावं तेवढं थोडं. आणि याच देखण्या भूमीत दडले होते अनेक गुपित.
यापैकीच एक गुपित होत "सत्यविधान". "सत्यविधान" हे त्याच रहस्यमयी अरण्यातील एक ठिकाण. नाव सर्वोन्मुख असले तरीही ते ठिकाण मात्र सर्वांपासून अपरिचित. गावातील सर्वांना या नावाचे ठिकाण अस्तित्वात आहे याची कल्पना होती परंतु त्याचा ठाव मात्र कुणालाही नव्हता. तिथे जायचं कस? दिसत कस? याबद्दल कुणालाही माहिती नव्हती. परंतु जो कुणी या ठिकाणावर जाऊन येत असे, त्याला पुढे घडणाऱ्या घटना स्वप्नात दिसतात अशी आख्यायिकाच होती. अत्यंत दुर्मिळ अश्या या घटना पिढ्यानपिढ्या ऐकीव असायच्या. ते कस घडत? का घडत? कुणासोबत घडत? कोण घडवत? सर्व काही रहस्यच होत.
आणि कोणत्यातरी समयी तो चमत्कार अविनाश च्या बाबतीत झाला होता. परंतु वास्तवापासून दूर असलेला अविनाश या चमत्काराचा फायदा घेऊ शकला नाही, असच अबोलीला वाटू लागलं होत.
अबोली वाचू लागते.
मी आज वेगळ्याच दुनियेची सैर केली. झालं असं , जंगलात फिरताना वाट हरवली. मोरांच्या थव्यांना पाहताना, रंगीबिरंगी, सुगंधी फुलांच्या झुडुपातून फिरताना कुठपर्यंत पोहोचलोय काहीच समजत नव्हते. बाहेर पडण्याचा रस्ता शोधताना करवंदाची झुडपे दिसली. टपोरे करवंद पाहून तोडण्याचं मोह आवरला नाही. बरोबर आणण्यासाठी करवंद तोडत असताना पानांच्या सळसळ आवाजाबरोबर हाताला काहीतरी टोचले. करवंदाचे काटे असतील व कुठला सर्प काही कळायच्या आधीच मी तेथून घाबरून पळ काढला. हाताला दंश अथवा काटे टोचल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नव्हत्या. बऱ्याच प्रयत्नानंतर रस्ता सापडला. त्या दिवशी रात्री झोपताना तापाने अंग फणफणले. गाढ झोपेत असतानाच त्याला एक स्वप्न पडले. कॉलेज मधली ईमारत, वाचनालयातील टेबल खुर्च्या, वाचनालयात बसलेले काही वाचक आणि त्याच शांत वातावरणात एका सुंदर मुलीची हातातून बॅग सटल्यामुळे धडामधूम आवाजात झालेली एन्ट्री. सर्व वाचक तिच्याकडे पाहत होते. आणि ती गोंधळलेल्या अवस्थेत सर्व पेपर्स, पुस्तके सावरून अविनाशच्या टेबल समोर येऊन बसते. काहीश्या घाबरलेल्या , गोंधळलेल्या अवस्थेत असताना अविनाश तिला पाणी समोर करतो.
वाचता वाचता अबोलीच्या डोळ्यांत पाणी तरळते, गळा आकंठून येतो. हुंदके देत ती वाचत राहते. डोळे पुसत, सुस्कारे घेत ती वाचनात मग्न होऊन जाते.
आयुष्यात घडलेल्या अनेक घटना डोळ्यांसमोरून पुढे सरकू लागतात. त्या दोघांचे प्रेम, लग्न, ईटगीर च्या बाहेरच घर. सर्वच गोष्टींचा उल्लेख त्यात होता. मनातल्या मनात ती पुटपुटत होती, सर्व काही समजलेलं असतानाही मला कधी जाणवू दिल नाही.
वाचता वाचता शेवटच्या पानावर येते.
कामानिमित्त शहरात गेलेला अविनाश घरी येताना एका वळणावर झाडाखाली थांबतो. वादळ आणि पावसाची सुरुवात झाल्यावर तो आजूबाजूला निवाऱ्याची जागा शोधत असतो. तोच झाडांची पडझड आणि वादळी वाऱ्याच्या माऱ्यामुळे अवघड झालेल्या वाटेतून धावताना तोल जाऊन अविनाश खाली कोसळतो आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. २२ वर्षांनंतर पुन्हा त्याच वळणावर भेट होते. या शब्दानंतर पुढे लिखाण संपलेलं असत.
अबोली वाचून अवाक होते. अविनाश पाण्यात वाहून गेला होता तर मग गाडीचा अपघात, तो मृतदेह कुणाचा असेल? जळालेल्या अवस्थेत तो मृतदेह गावकऱ्यांना सापडलेला होता. अविनाशच्या गाडीजवळ असल्याने तो अविनाशचाच मृतदेह असल्याचा आणि अविनाशच्या कुठेही थांगपत्ता नसल्याने अविनाशचाच त्या विजेमुळे मृत्यू झाल्याचा सर्वांचा समज होता.
अबोली पुरती गोंधळलेली असते. तिला अविनाशच्या कविता आठवते...

रक्ताळलेल्या मातीवरती, हिरवे गालिचे होऊन पाहीन...
धरणी चे ते ऋण फेडण्या, पाऊस होऊन पुन्हा येईन....
मी पुन्हा येईन ... मी पुन्हा येईन...

तिला अमल ने सांगितलेलं स्वप्न आठवत. त्या स्वप्नात जे वळण सांगितलं होत त्याचाच उल्लेख अविनाशच्या डायरीत होता आणि अपघाताचे ठिकाणही तेच असावे अशी तिची खात्री होते. भूषण कडून अपघाताच्या ठिकाणाची अचूक माहिती घेऊन अमल आणि अलक त्या ठिकाणावर पोहोचतात. तिकडे अविनाश पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या झाडाच्या आधाराने अनेक मैल पुढे गेल्यावर काही लोक त्याला पाण्यातून बाहेर काढतात. घटनेचा आघात एवढा मोठा असतो कि त्यामध्ये अविनाशच्या मनावर आणि डोक्यावर परिणाम होतो. तो मौन अवस्थेत अनेक वर्षे एका आश्रमामध्ये आश्रमातील लोकांच्या देखरेखीत गुमनामी जीवन व्यतीत करत असतो. हळूहळू तब्येतीत सुधारणा होत असताना आश्रमातील लोक त्याला त्यांच्या सेवेत दाखल करून घेतात. ईटगीर मार्गे शहरात जात असताना अविनाश ला हा परिसर ओळखीचा असल्याचं आठवत. त्याच्या अपघाताची जागा त्याला आठवते आणि अविनाश सुद्धा ईटगीर च्या त्या वळणावर आश्रमातील लोकांचा निरोप घेऊन घराची वाट धरतो. ईटगीर चे वातावरण, ते नयनरम्य दृश्य, ते जंगल, तोच रस्ता, ते टूमदार गावं , दुरूनच पाहताना अविनाश ला भूतकाळाची आठवण होते. जुन्या गोष्टी आठवताना होणार आनंद त्या ठिकाणावर गेल्यावर आपल्या देहाला आणि मनाला वेगळीच विभूती देत असतो.
ईटगीर च्या ओढीने झपाझप चालणारी पावले, दुरून येणाऱ्या आकृतीकडे पाहून क्षणभर थांबतात. तीच ती ओळखीची व्यक्ती, त्याची अबोली. त्याच्या आवडीच्या हिरव्या रंगाची साडी, चालण्याची सारखीच ऐट , तो दुरूनच ओळखतो. "अबोली~~~~ अबोली" असा जोरजोराने आवाज देत तो धावत सुटतो. घुमणारा आवाज अबोली पर्यंत पोहोचतो. अमल आणि अलक हि तो आवाज ऐकत असतात. अबोली कावरीबावरी होते. इकडे तिकडे सगळीकडे ती आवाजाच्या दिशेने वेध घेत असते. चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद, डोळ्यांमध्ये सामावलेलं अमोघ प्रेम, एवढ्या वर्ष्यानंतर ती भेटीची ओढ आणि तोच तो ओळखीचा प्रेमाचा हक्काचा आवाज, अविनाश ची हाक....
ती साद देते, अविनाश ~~~ अविनाश ....
दोघेही एकमेकांच्या दृष्टिपथास पडतात. सर्वच भान विसरून ते एकमेकांच्या ओढीने धावत सुटतात... श्वास फुललेले असतात. एकमेकांच्या डोळ्यांत मनभरून हरवतात. मायेने एकमेकांच्या मिठीत ते सामावतात. अबोलीला जवळ घेत, तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत डोळे बंद करून अविनाश आणि अबोली आनंदाश्रू ओघळू लागतात.

..... समाप्त .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धन्यवाद
@mrunali.samad, @लावण्या