ईटगीर ...भाग ३

Submitted by सुर्या--- on 13 May, 2021 - 07:29

ईटगीर ...भाग ३

मागील भाग पाहण्यासाठी ...
ईटगीर ---भाग १ https://www.maayboli.com/node/78838
ईटगीर ---भाग २ https://www.maayboli.com/node/78854

अबोली वाचत असताना मल आणि अलक धावतच घरात येतात. रात्र झालेली असते, वाचण्यात दंग झालेली अबोली पाणावलेल्या डोळ्यांनी अविनाशची डायरी कपाटात ठेवते आणि दोघांनाही जवळ घेते. तिघेही जेवायला बसतात. अबोली अलक ला जाणीवपूर्वक गोड बोलून त्याच्या लिखाणाबद्दल विचारते. अलक, अमल चे नाव घेत बोलतो," आई अमल ला स्वप्नात दिसते, मी लिहितो ते" अबोली सत्यापासून अनभिज्ञ असते. मस्करी करतोय असं समजून ती विषय टाळते. काही दिवस असेच जातात. अबोली थोडं थोडं करून डायरी वाचत असते. तिच्या चेहऱ्यावर गोड आठवणींचं हसू ठळकपणे दिसत असते. मुलांच्या शाळांना सुट्टी लागते. शिक्षणाचा वाढता खर्च लक्षात घेऊन अबोली १०वी, १२वी चे CLASSES घेऊ लागते. त्यामुळे अमल आणि अलक कडे थोडं दुर्लक्ष होते. काही वर्षांत अमल आणि अलक कॉलेज ला जाऊ लागतात. अमल अलक थोडे समजदार झालेले असतात. अमल ला पडणाऱ्या स्वप्नांचे तन्तोतन्त वर्णन आणि अलक च्या लिखाणातील जादू यांपासून अबोली थोडी दूर गेलेली असते. परंतु अलक ने लिहिलेल्या वह्या त्याने सुरक्षित ठेवलेल्या असतात. त्याच्या जुन्या नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी अलक घराच्या मागिल भागातुन जाणाऱ्या छोट्या गल्लीजवळील टाकीजवळ जागा शोधण्याचा प्रयत्न करतो. जुने बांधकाम असलेली हि टाकी त्याच्या आजोबांनी (अविनाश च्या वडिलांनी) ते घर बांधताना बुजवलेली असते. वरून काँक्रेट ने बंद केलेली टाकी आतून मात्र थोडी मातीने भरलेली आणि थोडी पोकळच होती. एका बाजूने छोटे लोखंडी झाकण वर्षानुवर्षे बंद असल्याने गंज लागलेल्या अवस्थेत घट्ट बसलेले होते.
अलक अमल च्या मदतीने गुपचूप त्या टाकीमध्ये एका पेटीमध्ये लिखाण लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. झाकण उघडण्यात बराच वेळ लागल्याने घाईघाईत ती पेटी टाकीमध्ये ठेऊन अमल आणि अलक निघून जातात. संध्याकाळी अबोली घरी आल्यावर काही कामानिमित्त त्या टाकीजवळ जाते. बंद असलेल झाकण खोलल्याच्या खुणा तिला जाणवतात. काहीतरी शंकास्पद वाटल्याने दुसऱ्या दिवशी अबोली अमल आणि अलक च्या अनुपस्थितीत टाकीचे झाकण उघडते. अलकने लपवलेली पेटी तिला त्यामध्ये आढळते. अमल आणि अलक ला कोणतीही माहिती होऊ न देता त्यातील नोटबुक अबोली काढून घेते. आणि मुलांच्या अनुपस्थितीत ती वाचायला लागते.

शब्द शब्दांत गुंतले ...
द्वंद्वव होऊनि जुंपले...
थोर मोठ्यांच्या अंगणात ...
माती होऊनि साकळले ...

अमल अलकच्या शाळेतील तो प्रसंग, मुलामुलांच्या छोट्या भांडणाचे स्वरूप शिक्षक पालकांच्या शाब्दिक चकमकीत बदलले आणि शेवटी काही मोठ्या मंडळींच्या हस्तक्षेपाने ते वाद सोडवले होते.

मी मनवले, थोडे विनवले ...
विस्तवातील निखारे, फुंकर घालुनी विझवले....
आपल्याच धुंदीत शब्द मात्र, कुठे जाऊनी हरवले...

गावातील एका प्रसंगात अमल आणि अलक याच्या बद्दल गैरसमजातून निर्माण झालेले वाद अबोलीने स्वता पुढाकार घेत, विनवण्या करत शांत केले होते आणि अबोलीच्या त्या वागण्याने अमल आणि अलक रुसून बसले होते.

एक एक घटना डोळ्यासमोर उभी राहत होती. अमल आणि अलक रात्री झोपले असताना अबोली दुसऱ्या खोलीत बसून वाचत होती.

मौन शब्द सापडतील, पुन्हा तुझ्यासवे बोलतील...
आठवणींच्या अश्रूंना, माझ्याकडे वळवतील ....

अविनाशची डायरी सापडल्यानंतर हरवलेल्या आयुष्यात डोकावताना जी अवस्था अनुभवली होती तीच येथे मांडली होती.

अबोलीला खात्री झाली होती, अलकचे लिखाण योगायोग नव्हता. ते विधान होते, पुढे घडणाऱ्या घटनांचे. फक्त त्याचे अचूक अवलोकन समजने गरजेचे होते.

अनेक रात्री जागून अबोलीने अलकच्या अनेक DIARIES वाचून काढल्या. अनेक घटनांचे क्रम आणि संदर्भ जुळवले. तिच्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना लिखाणाशी तंतोतंत जुळत होत्या. एवढं असूनही, अबोली एवढे वर्ष त्यापासून अनभिज्ञ होती.

आता मात्र अबोली अलकच्या लिखाणाबद्दल खूपच सजग झाली होती. तिने हळूहळू अलकला विश्वासात घेतलं. त्याला त्याच्या लिखाणातील आणि घटनांतील परस्पर संबंध स्पष्ट करून सांगितला. अलकला अबोलीचे म्हणणे पटल्यावर त्यानेही आपल्या लिखाणातील आणि अमलच्या स्वप्नांतील परस्पर संबंध स्पष्ट केला. अबोली अमोलच्या स्वप्नांबाबत प्रथमच ऐकत होती. अमल कडून खात्रीलायक पुष्टी झाल्यावर अबोलीला आश्चर्याचा धक्का बसला. हे कसले संकेत असावेत? हा काय चमत्कार असावा? हे लोकांना कळले तर काय होईल? अनेक विचार मनात येत होते. विचार करता करता अबोली झोपी गेली. पहाट होता होता अबोलीच्या मनात अनेक घटना एकामागून एक कल्लोळ माजवू लागल्या. अश्या परिस्थितीत काय करावे काहीच सुचत नव्हते . ती अंथरुणातून उठली, पूर्ण घर साफ करून देवपूजा केली. देवासमोर नैवेध्य ठेऊन देवाकडे चांगल्या आरोग्याची आणि शांत आयुष्याची मनोकामना करून अविनाश ची डायरी वाचू लागली.
कॉलेजमधल्या सुरुवातीच्या काळातील काही कविता होत्या.

मन गुंतता गुंतते ...
कधी कल्पनी रंगते...
जीव होतो कासावीस...
जेव्हा मला तू पाहते...

अविनाश ने मला त्याने त्याच्याकडे पाहताना त्याच्या मनाची झालेली अवस्था येथे स्पष्ट केली होती. त्याच्या कविता हळूहळू पुढे जात होत्या, तसतसा दोघांमधील प्रेमसंबंध आणि घटनाक्रम डोळ्यापुढे येत होता.
हळूहळू आमच्यात बोलणे सुरु झाले, भेटीगाठी वाढल्या, एकमेकांना काहीही न सांगताच एकमेकांत दोघे हरवून गेलो.
ती रंगीत फुलांची बाग, तो नदी किनारा, ते हवेला साद घालणारे टेकडीवरील भले मोठे खडक आणि शेवटपर्यंत रोजचीच भेट होण्याचे ठिकाण म्हणजे वाचनालय.
कॉलेज ला गेल्यावर एकमेकांना पाहण्यासाठी डोळे चौफेर शोधायचे. LECTURE ला नाही दिसला तर कॉलेज कट्टा , तिथेही नसेल तर कॅन्टीन, तिथेपण नाही सापडलीच तर कॉलेज कॅम्पस मधील ते झाड आणि शेवटचा पर्याय म्हणजे वाचनालय .
जादूने मंतरलेले मनमोहक क्षण होते ते.

अबोलीसुद्धा त्या दिवसांत अविनाशमध्ये पूर्णपणे हरवली होती. तिच्या आवडीचे एक खास गाणे होते, जे ती नेहमी गुणगुणायची.
फुलले रे क्षण माझे , फुलले रे...
हसले रे क्षण माझे , हसले रे...

खरंच एकमेकांच्या ओढीने, एकमेकांच्या विचारांमध्ये सभोवतालचं जग विसरून एका वेगळ्याच जगात वावरण्याचा आभास होता तो.

मी सुद्धा अविनाश च्या भेटीसाठी किती जीव काढायची? किती बैचेन व्हायची? किती बैचेनी व्हायची त्याला पाहण्यासाठी? तीच बैचेनी अविनाशच्या मनाची होत होती हे त्याने त्याच्या डायरी मध्ये किती सुरेख भावनेत उतरवलं होत. अबोली मनातल्या मनात म्हणत होती.

बघता बघता डायरी संपत आली. शेवटच्या पानावर काही वेगळच लिहिलं होत. अबोलीला त्या कवितेचा अर्थ लागत नव्हता.

रक्ताळलेल्या मातीवरती, हिरवे गालिचे होऊन पाहीन...
धरणीचे ते ऋण फेडण्या, पाऊस होऊन पुन्हा येईन...

कातरवेळी प्रभातकाळी, हिमशिखरांच्या डोईवर ...
रवीकिरणांच्या आराशीतील, इंद्रधनुष्य हाती घेईन...

अवकाश निळे, ग्रह गोल तारे , उल्कापिंड अन धूमकेतू...
चंद्र पौर्णिमेचा मिणमिणणारा, प्रकाश होऊन पुन्हा येईन...

दाट धुक्याच्या वनराईतील, सुगंधी मोगरा फुलताना...
रंगबिरंगी पंख लावून, फुलपाखराचे रूप घेईन...

सळसळणाऱ्या वाऱ्यासंगे, दर्पसुगंधी नवलाईचा...
उंच मनोहरी पारंबीचा, झोका होऊन पुन्हा येईन...

अक्षरांच्या ओळीतील हरवलेला शब्द मी...
ओवीच्या थव्यातून काव्यमय संगीत होईन...

चैतन्याचा सूर्य मी, प्रकाश मी, उसळणाऱ्या समुद्रात मावळणारा भास्कर मी...
कडाडणार्या विजेसंगे, नवयुग होऊन पुन्हा येईन....

मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन...

कवितेचा अर्थ, वर्णन कोणत्याही घटनेशी मिळता जुळता नव्हता. मग हि कविता का केली असावी? उत्तर काही केल्या सापडत नव्हते.
आणखी काही लिखाण मिळतंय का ते पाहण्यासाठी अबोली अमल आणि अलक च्या मदतीने पूर्ण घर शोधते, पण हाती काहीच लागत नाही.
अबोलीचे दिवस तसे आनंदात जात असतात. कमी असते ती फक्त अविनाशची. अमल आणि अलक हि त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात. अबोली कधीही तिच्या मनातील सल मुलांसमोर मांडत नसते.
एक दिवस अमल झोपेत असताना घाबरून उठतो. पूर्ण घामाघूम झालेल्या अवस्थेत तो सैरभैर पळू लागतो. अबोली आणि अलक त्याला शांत करतात. अबोली अलक ला विचारते, ' काय झालं? का घाबरलास?"
अमल त्याला पडलेल्या स्वप्नाचं वर्णन करतो.
"मला स्वप्नात एक घनदाट जंगल दिसलं, त्याच्या एका वळणावर एक माणूस "आई" तुला साद (अबोली) घालत आहे. आणि तू सुद्धा आम्हाला मागे सोडून त्याच्या कडे धावत जात आहेस."
अबोली चिंतीत होते. कधी कधी काही गोष्टींचा गुंता सोडवता येत नसतो. मनात वावटळ उठते, संवेदनांचे , जाणिवांचे आणि परिस्थितीपुढे हतबल होऊन शरणागती पत्करते. ती शरणागतीच आपली विवशता असते. मनात असूनही परिस्थितीसमोर गुडघे टेकावेच लागतात. त्याची सल कायमच मनात बोचत राहते.
अमलच्या स्वप्नातील व्यक्ती अविनाश तर नसेल? एवढ्या वर्षानंतर पुन्हा त्याची भेट झाली तर?
पण कस शक्य आहे? अबोलीच एक मन ते मानायलाच तयार नव्हते. अविनाश चा मृत्यू होऊन अनेक वर्षे सरली होती. शेवटी सर्वच स्वप्ने खरी होत नसतात, हे स्वीकारून ती परिस्थितीसमोर शरणागती पत्करते.

क्रमशः ...भाग ४ ... लवकरच

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद
@प्रभुदेसाई, @लावण्या , @mrunali.samad