ईटगीर... भाग २

Submitted by सुर्या--- on 8 May, 2021 - 05:34

ईटगीर...भाग २

भाग १ वाचण्यासाठी ... https://www.maayboli.com/node/78838

एके दिवशी अमलला पुन्हा स्वप्न पडत. दुसऱ्या दिवशी अलक आपल्या वहीमध्ये पुन्हा एक मजकूर लिहितो.
सळसळ वारा... पाऊसधारा ...
कडाडले आणि आसमंत सारा ...
ओसंडून वाहील नदी किनारा ...
थबकेल पुन्हा सर्व पसारा...

नेहमीप्रमाणे अबोली दोघांचाही अभ्यास घेत असताना तिच्या लक्ष्यात आलं. अलक च्या लिखाणातील जादू तिला अविनाश च्या आठवणीत नेत होती. अबोलीने थोडक्यातच अलक ला त्याबद्दल विचारले. अलकने काही आठवण्याचा प्रयत्न केला, आणि आठवत नसल्याच्या अविर्भावात " मला नाही माहीत, असच लिहिलंय." म्हणून उत्तर दिले. अबोली अलकचे लिखाण तिच्या डायरी मध्ये लिहून जतन करू लागली.
दोन दिवसांनी रात्री पासूनच वादळी वाऱ्यासोबतच, विजांच्या कडकडाडात धो-धो पाऊस सुरु झाला. सकाळ होईपर्यंत सर्वत्र पाणीच पाणी. नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. बस, रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शाळा कॉलेजेस सर्व काही बंद झाले. अमल आणि अलक घरामध्येच खेळत होते. अबोलीला अलकचे लिखाण आठवले. मनातल्या मनात ती म्हणू लागली, अलकने लिहिल्यासारखच होतंय आज. विचार करता करता थोडी थांबलीच. तिला काहीतरी आठवले. धावतच जाऊन कपाटातून तिची डायरी काढली. अलकच्या लिखाणाच्या प्रत्येक नोंदीबरोबर एक एक घटना तिच्या डोळ्यासमोरून जाऊ लागली. डोक्यामध्ये विचारांचा झंजावात चालू झाला. हृदयाचे ठोके वाढू लागले. डोळ्यांत पाणी तरळले. हा निव्वळ योगायोग म्हणायचं कि चमत्कार.

अबोली सर्व मनात साठवून अमल आणि अलक कडे लक्ष देत होती. त्यांना चांगले शिक्षण देऊन मोठे अधिकारी बनवायचा तिचा ध्यास होता. दिवसामागून दिवस सरत होते. आई नेहमी आपल्या लिखाणावर प्रश्न करते म्हणून अलक त्याचे लिखाण वेगळ्या वहीमध्ये लिहू लागतो. अमल आणि अलक चे परस्पर संबंध खूप गोड होते. एकमेकांशिवाय राहणे त्यांना जमत नसायचे. त्यामुळे सर्वच गोष्टी ते आपापसांत खुल्या मनाने बोलत असत, दिलखुलास हसत, मनमौजी जगत होते. त्यामुळेच अमलला पडणाऱ्या स्वप्नांची आणि अलकच्या लिखाणाची अधून मधून ते दोघे आपापसात गंमतीमध्ये चर्चा करत. एकंदर दोघांनाही आता यात वेगळं अप्रूप उरल नव्हतं. आणि लहान असल्यामुळे त्याच गांभीर्य हि कळत नव्हतं. दरम्यानच्या काळात अबोलीला घराची साफ सफाई करताना अविनाश च्या लिखाणाची एक डायरी सापडते. डायरी कशी म्हणता येईल? "अनमोल गाठोडं होत ते तिच्यासाठीही". अविनाशने पाठविलेल्या कवितांबरोबरच त्याची स्वतःची डायरी सापडणे अबोलीसाठी मोठीच देणगी होती.
पहिल्या पानावर त्याचे आणि अबोलीचे नाव लिहून पुढील पानापासून लिखाणाची सुरुवात केली होती.

११ वी च्या कॉलेज मधला वाचनालयातील पहिला दिवस.....
अबोली वाचू लागली... एक एक शब्द वाचताना जणू ती ते दिवस पुन्हा पुन्हा जगू लागली. शब्दामागून शब्द डोळ्यांपुढे प्रत्येक क्षण प्रतिबिंबित करू लागले...
त्याच्या कॉलेज च्या युनिफॉर्म पासून अबोलीने घातलेली वेणी, कपाळावरील टिकली, डोळ्यांतील काजळ, येण्या जाण्याच्या वेळा, मित्र-मैत्रिणी, अभ्यासासाठी वाचनालयातील वेळा, अबोलीला पाहता यावं यासाठी बदललेला रस्ता, बोलता यावं यासाठी केलेले प्रयत्न सर्व काही मजेशीर होते. किती सुंदर, लोभस होते ते क्षण...
पुन्हा मागे वळून पाहताना ते वळण दिसत होते. त्याचा आभास होत होता.

तुझे बोलणे सये, लटकेच असते.
अल्लड हसणे तुझे, मनात बसते.
नजरेला नजर भिडल्यावर, मी हरवतो.
चोरून तुला पाहताना मनी गुलाब फुलवतो.

मनातील पहिल्या निर्मळ प्रेमाच्या भावना त्याने कवितेतून उतरवल्या होत्या.

सांजसवे तू प्राणप्रिये,
हरपून गेलो तुझ्यासवे,
बीज प्रेमाचे अंकुरले,
नांदू दे तव फुलासवे.

प्रत्येक शब्दांत, चारोळ्यांत त्याच्या प्रेमाचा ओघ ओथंबून वाहत होता. ११ वी पासून हा माझ्यावर एवढा प्रेम करत होता आणि बोलण्याचं धाडस केलं ५ वर्षांनी. अनेकदा त्याला हे अबोली बोलायची सुद्धा.

क्रमशः ...भाग ३

Group content visibility: 
Use group defaults

छान

<<<छोटा झाला हा भाग.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.>>>.>+१
केव्हा येणार पुढचा भाग ?

OK .Noted