सांजभयीच्या छाया - ९

Submitted by रानभुली on 7 May, 2021 - 20:09

(मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती).
https://www.maayboli.com/node/78827

पुढचे दोन दिवस ऋतूशी भेट झाली नाही.
ना त्याचा फोन आला, ना त्याने फोन घेतला.

ते दोन दिवस अस्वस्थतेत गेले. तिस-या दिवशी मग त्याने एक पोलीस पाठवून दिला.
एक फाईल राहिली होती.
मी ती पाहिली होती.
खरं तर वाचली होती.
ती आशीची फाईल होती.

डॉ. देव यांची टिपणं आणि मतं इतकंच मी चाळून घेतलं होतं. बाकी ट्रीटमेंटशी माझं काही घेणं नव्हतं.
बरेचसे तपशील आशीच्या बोलण्यात आले त्याहून वेगळे नव्हते.

मात्र ती हट्टी, स्वकेंद्रीत आणि आक्रमक स्वभावाची असल्याचे मत नोंदवले होते.
तिच्या दृष्टीने अडचणीच्या प्रश्नांमुळे ती अपमानित झाल्यासारखे समजत होती. स्वतःच्या बाबतीत ती अत्यंत सजग होती. गोळ्या घेतल्या का या प्रश्नाचं तिच्याकडे योग्य उत्तर नसेल तर तो तिला अपमान वाटत होता. लहान असल्याने फक्त ती उलट बोलत नव्हती. पण आपला विरोध ती प्रश्नाकडे दुर्लक्ष करून दर्शवत होती.
डॉक्टरांकडे येणं तिला आवडत नसावं.
या टिपणांनी लक्ष वेधून घेतलं. कारण या गोष्टी मलाही जाणवत होत्या.
फक्त ती माझ्याबरोबर खूष होती म्हणून मला काही उलट बोलत नव्हती.
या अशा स्वभावाची माणसं ज्याच्यावर खूष असतात त्याला आपली सगळी संपत्ती दान करून टाकतील आणि जो आवडत नाही, किंवा एखाद्याबद्दल एखाद्या घटनेने मत वाईट झाले असेल तर त्याची इस्टेट सुद्धा धुडकावून लावतील.
थोडे फार अनुभव मलाही होते लोकांचे. पण ते नीट मांडता आले नसते.

झरना आंटीचा स्वभाव विरूद्ध टोकाचा होता,
त्या तशा खेळकर स्वभावाच्या. काळजी करणा-या.
आशीची काळजी घेत होत्या.

त्यांच्याबद्दल डॉक्टरांची टिपणं पाहिली.
एकत्रच फाईल होती दोन्ही नंबरांची.
डॉक्टरांना झरना आंटींचं वागणं समजत नव्हतं. त्यांनी अर्थ लावायचे प्रयत्न केले होते. पण त्याही त्याबाबत असमाधानी होत्या.
त्यात मुखर्जींशी बोलणं झालं असा उल्लेख होता.
दोघींनाही देखरेखीखाली ठेवणे गरजेचे आहे असा शेरा होता.
किंवा मग घरात काय घडते याची शास्त्रशुद्ध चौकशी / तपासणी त्यांना करवून घ्यायची होती जे कायद्याच्या दृष्टीने कठीण होते. त्यांच्या एथिक्समधेही बसणारे नव्हते.

एका गोष्टीवर डॉक्टर ठाम होत्या दोन्हीही केसेस त्यांनी आखून दिलेल्या औषध योजने नुसार सहज ठीक होणा-या होत्या. त्यात काहीही अवघड नव्हतं.
आशी गोळ्या खात नसावी हा त्यांचा संशय होता.
पण आता झरना आंटीच्या केस मुळे त्या पूर्णपणे गोंधळल्या होत्या.

---------------------------------------------------------

दारावर टकटक झाली.
एक पोरगेलासा पोलीस होता.
"साहेबांनी फाईल मागितली आहे "
"कुठली फाईल ?"
" तुम्हाला माहीत आहे म्हणाले ते "
" मला नाही माहीत "
" मॅडम , तुम्ही साहेबांशी बोलून घ्या "
" मी का बोलू ? तुझ्या साहेबांनी मला काहीही सांगितलेलं नाही "
" मॅडम प्लीज, मला बोलणी बसतील "
"त्याच्याशी मी काय करू ? तुमचा अंतर्गत मामला आहे तो "
" बघा ना मॅडम "
" तू ये आणि शोधून घे "
" मॅडम पण मला माहीत नाही ना कुठे ठेवलीय फाईल "
" मलाही नाही माहीत. साहेबाला विचार तुझ्या "
" फोन लावा ना "
" मी नाही लावणार. तुझ्या साहेबाने करायला पाहीजे फोन "

बराच वेळ आर्जवं करून हुज्जत घालूनही मी बधत नाही म्हटल्यावर त्याने घाम पुसत स्वतः फोन लावला.
त्याची दया आली. साहेबाला काम होत नाही हे सांगायची त्याला भीती वाटत असावी.
तिकडून ऋतू त्याला ओरडत असावा. कारण तो फक्त
" साहेब विचारलं ना साहेब... हो... मी बोललो...नाही म्हणतात ... नाहीत ऐकत... हो.... नाही "
इतकंच बोलत होता.
त्याने फोन माझ्याकडे देऊ केला.
मी नाही घेतला.
वैतागून तो निघून गेला.
साहेब कसा निभावत असेल असे काहीसे भाव होते त्याच्या चेह-यावर.
पंधरा मिनिटात बुलेटचा आवाज आला.
"फाईल का नाही दिलीस ?"
मग तेच संभाषण पुन्हा रिपीट झाले.
त्याने डोकं गच्च धरलं.
मग मी शांतपणे आत जाऊन फाईल आणली आणि त्याच्यासमोर धरली.
"हीच ना ?"
" मी कुणासाठी करतोय हे ?"
" मान्य आहे "
" मग हे वागणं ?"
" कुणाचं ?"
" कम ऑन सलोनी , तू असं का वागतेहेस ?"

मी खिन्न हसले.

" तुला त्या क्षणांनंतर एकदाही आठवण आली नाही माझी. सांगून जाता नाही आलं ?"
" यार , मुलींचं वागणं अवघड असतं. तू गाढ झोपलेलीस. मला उठवावंसं वाटलं नाही आणि मला लवकर जायचं होतं "
" पण मग फोन तरी ?"
" बिझी होतो. जमलं नाही "
" फाईल मागवताना तरी ?"
’ ते राहीलं. अगं मी कामात होतो म्हणून पोलिसाला पाठवलं. मला काय माहीत तू इश्यू करशील "
" इश्यू ? मी ?"

मग असेच ऑर्ग्युमेण्ट्स होत राहीले.

तो मदत करीत होता. त्याच्या विचाराने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावता येणे शक्य होते. हे सगळं ठीक. पण काहीतरी जाणवत होतं.
परवाच्या रात्रीनंतर मी सिरीयस झाले होते. पुढच्या आयुष्याबद्दल बारीक सारीक विचार करत होते.
याला त्याबद्दल काहीच फिकीर नाही ?

मी संसाराची स्वप्नं रंगवत होते . हा असा अलगद का ?
किचनचं डिपार्टमेंट तुमचं असं म्हणून बायकोला खूष करू पाहणारा पुरूष अप्पलपोटी असतो. नकळत कामाची विभागणी करून टाकतो.
आणि ती मात्र या भिंतीवर हा डबा येईल. ओट्याखाली ट्रॉली बनवू. इथे हाताला येईल अशी क्रोकरी ठेवू अशी स्वप्नं बघण्यात दंग होते.
मी खूप बारीक विचार करत होते का ?

पण जेव्हां जेव्हां घरात, शेजारी पाजारी, नातेवाईकांच्यात नवरा नावाचा प्राणी बायकोला लग्नाला कूकर किंवा किचनमधे लागणारी वस्तू भेट देताना पाहीला तेव्हां तेव्हां तिडीकच आलीय त्याची. आणि त्याने आज ही भेट दिली म्हणून चारचौघीत दाखवणा-या बायांचं तर काय करावं ?

अगं, ती वस्तू सर्वांसाठी आहे. तो बसून राहणार आहे. फक्त तुला मजुरी करताना दया म्हणून यंत्रं आणून दिलंय. कूकर घेऊन कुठे मिरवायला जाणार आहेस का ?

कि असा विचार करणे हा माझा स्वभावदोष आहे ?
की मला होणा-या जाणिवा ख-या ठरतात या विश्वासाकडे मीच जातेय सर्वांना घेऊन ?
खूपदा झटकून टाकले हे विचार.
तो आपल्याच साठी करतोय. त्याचं प्रोफेशनल लाईफ आहे.
आपण स्वार्थी विचार करतोय का ?
त्याच्या ठिकाणी आपण असतो तर ?
************************************************************

" सलोनी, तू फाईल वाचलीस हे छान केलंस "
" हं "
" मी डॉक्टरांशी सहमत आहे "
" हं. पण.."
" हो, यात एक अडचण आहे. मला सांग बघू शिमल्याला आल्यानंतर काय काय झालं ते ?"
" इथे आल्यावर ? इथली माहिती विस्कळीतच आहे "
" म्हणजे ? "
" सांगते "
-------------------------------------

मुखर्जी अंकलने शिमल्याला शिफ्ट केल्यानंतर काही दिवस सर्व प्रकार थांबले होते. कदाचित आशीला बरं वाटलं असेल.
झरना आंटी विचार करत होत्या , कि बाधीत जागा सोडल्यामुळे आता आपल्यामागचा त्या अदृश्य शक्तींचा त्रास कायमचा बंद झाला. ते घर आता कायमचं बंद ठेवायचं. दुर्गापूरला पुन्हा कधीही जायचं नाही. वेळ आलीच तर आशीला न घेताच जायचं.

काही का असेना ते कुटुंब आनंदात होतं. इथल्या वातावरणाने सगळे आनंदीत झाले होते.
अंकल इथून सगळा बिझनेस बघत होते. एखादे दिवशी कोलकाता, दिल्ली , मुंबई असे जायला लागायचे तितकेच. नाहीतरी अंकला बिझनेस फार वाढवायचा नव्हताच.

मागेच त्यांना स्ट्रेस सहन होत नसल्याने बरेच युनिट्स विकून टाकले होते. ज्या गुंतवणुकी होत्या त्यातून अमाप पैसा येत होता. आणि कमवायचे तरी कुणासाठी ?
मुलगा नव्हता. वंशाला दिवा नव्हता.
सगळं जावयालाच जाणार.

होतं ते भरपूर होतं.
पिणं इथेही चालू होतं. पण कमी झालं होतं.
सिनेमा, नाटकाच्या पार्ट्या बंद झाल्या होत्या. त्या ऐवजी इथल्या विविध क्लब्स मधे जाणे सुरू झाले होते. ओळखी होत होत्या. इंडीयन कॉफी हाऊस शेजारचे टंडन त्यांचे मित्र झाले होते.

एके दिवशी.... म्हणजे रात्री
नेहमीच्या क्रमाने आंटी झोपायला गेल्या.

आशी झोपलेली होती.
तिला त्या आज पुन्हा रागवल्या होत्या. बहुतेक रुसून झोपली असावी. न जेवता झोपली होती.

रात्री पुन्हा तोच आवाज आला. हसण्याचा.
या वेळी आवाज घुमत होता.

आंटी दचकून जाग्या झाल्या.
आवाज घुमता होता.
आंटींच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता.

इतक्यात त्यांचा फोन खणखणला.
फोन घ्यायला त्या वाकल्या.
पलिकडे कुणीच नव्हतं.

आशी झोपलेली होती. तिने फोन केला असता तर कानाला फोन लावलेला दिसला असता. फोनचा उजेड दिसला असता.
त्या फोन ठेवायला गेल्या तर पडद्याला आग लागली.

आंटी जिवाच्या आकांताने किंचाळल्या.
आणि किंचाळतच राहील्या.

***********************************************************

आंटी आता खालच्या घरात रहायला गेल्या होत्या आशीला घेऊन.

गोळ्या घेणं त्यांनी थांबवलं होतं.
आशी गोळ्या घेते कि नाही हे पाहणंही थांबवलं होतं.
आशी आता शांत होती.

इथल्या घराची रचना खूप डोकेबाज केली होती.
मागच्या पहाडीचा उपयोग एक भिंत म्हणून केला होता.
त्या भिंतीत वरच्या मजल्याची फायरप्लेस होती. बेडरूम प्रशस्त होतं. बेडरूमच्या बाहेर कठड्यापर्यंत पॅसेजची जागा सोडली होती. त्यावर उभे राहून कठड्याला टेकून खालचा संपूर्ण हॉल दिसायचा.

बेडरूम मधेच डायनिंग पण होतं. सोफा होता.
मधे गोल बेड होता. त्यावर मच्छरदाणी टांगलेली होती.
दोरी ओढली की वर जात होती.

आंटीला इथे थोडं तरी बरं वाटत होतं. पण त्या सतत भीतीच्या सावटाखाली असायच्या.
डॉक्टर खन्ना होते इथल्या हॉस्पिटलमधे.

"सतत भीती बाळगणे हा ही ताणच असतो. भीतीवर मात करा" ते सांगायचे.

झरना आंटी सावरायचा प्रयत्न करत असतानाच एके रात्री त्यांच्या अंगावर काळी बाहुली पडली.
आणि त्या ओरडत जिन्यावरून खाली धावत सुटल्या.

प्रीती आणि तिच्या नव-याने त्यांना अडवले.
सकाळी अंकल आले.
आंटीची अवस्था चांगली नव्हती. त्या भानावर नव्हत्या. सतत घाबरल्यासारख्या होत्या.
त्यांना धक्का बसला होता.

आणि मग त्यांना डॉम खन्नांनी कुलूला अ‍ॅडमिट व्हायचा सल्ला दिला.

***************************************************************

ऋतू ऐकत होता.
"फाईन. काही विस्कळीत नाही यात. आपल्याला समजलं तरी काय झालं ते"
" हं "
" आता यातले कच्चे दुवे पहायला हवेत "
" हो"
" इथे आल्यावर प्रकार बंद झाले होते. ते सुरू झाले. ते कधी ?"
" आशी न जेवता झोपल्यावर "
" चूक. आशीला ओरडल्यावर. ती रुसून न जेवता झोपल्यावर ! करेक्ट ?
डॉक्टर काय म्हणाल्या होत्या ? तिला प्रसन्न ठेवा. अंकल आंटीने मनावर घेतलं का ते ??"
" नाही समजत "
" आणि सर्वात महत्वाचं. जर हे प्रकार म्हणजे आंटी म्हणतात तसे सुपरनॅचरल आहेत तर आशीचा त्रास कशाने बंद झाला ?
जर सुपरनॅचरल नसेल तर ? मग हे प्रकार कशाने बंद झाले ? आशी गोळ्या खाऊन बरी झाली तर आंटी का या स्टेजला पोहोचल्या ?
" काहीच कळत नाही "
" आपल्याला आशीला विचारायला पाहीजे "
" मी तिला सगळं विचारलंय "
" नाही. समथिंग इज मिसिंग. एक काम कर हे माझ्यावर सोड. मी अंकलची परवानगी घेतो "
" नको. अंकलना आवडणार नाही "
" तू काळजी करू नकोस "

**********************************************************

दोन दिवसांपूर्वी आम्ही दोघे चाळीस किमी अंतरावरच्या एका निसर्गरम्य ठिकाणी गेलो होतो. गाव होतं.
गावापासून थोडंसं पुढे एक ढाब्यासारखं आधुनिक रेस्त्ररॉं कम बार होतं. बार म्हटल्यावर मी नाखूश होते. पण ऋतूने आग्रह केला.

माझा विरोध आहे हे माहीत असतानाही त्याने लिकर ऑर्डर केली. मला आवडलं नाही. मी सोबत असताना मला न विचारता लीकर ?
त्यावरून मी छेडलं होतं. तर तो म्हणाला,
" हे असंच चालणार का ?"
" म्हणजे ?"
" मला लीकर आवडते. माझ्या वैयक्तिक आवडीनिवडी पण बंद करायच्या का ?"
" अरे पण यात वैयक्तिक काय राहतं ? एक दुस-याला रिस्पेक्ट नको का द्यायला ?"
" कम ऑन , तू तुला वाटेल ते घे, मी हे घेतो. सिंपल आहे. कॉम्लिप्केटेड नकोस करू ?
" हा व्हेज नॉन व्हेजचा मामला नाही. हार्ड ड्रिंक्स आहे. याचा परिणाम होणार उद्या संसारावर. तुझ्या शरीरावर "
" माझ्या शरीरावर होईल ना ?मग माझं मी बघून घेईन "
" असं कसं म्हणू शकतोस तू ? कित्येक बेवडे अशाच बेफिकीरीने मरून जातात. त्यांच्या मुलाबाळांचा काय दोष असतो ? हा पर्सनल मामला आहे ?

असे खटके उडतच होते. हा जरा त्याच्या जिव्हारी लागला.

****************************************************************************

आशीची रूम मी त्याने सांगितल्याप्रमाने चेक केली.
बॅडमिंटन शटल कॉकचं जे सिलिंडर येतं ते पडलं होतं. ही खेळत नाही तर रिकामं सिलींडर कसं इथे ?
एक तिची लहानपणीची वही होती.
त्यात डायन / विच अशी चित्रं होती.

एक फोटो होता. त्याला विच सारखे केस काढले होते.
फोटो झरना आंटीचा होता...

ऋतूला ही गोष्ट सांगितली तेव्हां त्याचे डोळे चमकले.
मग अंकलला कन्व्हीन्स करण्यात तासभर गेला.
त्याने त्याचं आयबी चं बॅकग्राऊंड वगैरे सगळं व्यवस्थित पटवून दिलं. तिला काही होणार नाही उलट कायमची बरी होईल असं आश्वासन दिलं.

मग आशीला घेऊन आम्ही बाहेर गेलो.

बुलेट अंकलच्याच पार्किंगमधे लावली. अंकलची कार घेऊन आम्ही फिरायला गेलो.
आशी खूष होती.
अ‍ॅम्युजमेंट पार्कमधे ती मनापासून खूष झाली.

ऋतूने मग तिला विचारलं
" या आधी कधी आलेली अशी ?"
" कधीच नाही "
" अरेच्चा ! असं कसं "
" मा आणि बाबा आणत नाहीत. "
" मी घेऊन येत जाईन हं. दीदी पण असेल सोबत "
" कधी आणशील दा ?"
" कधीही सांग. बंदा हाजीर है "
" तुला बाबा आवडतो कि मा ?"

या प्रश्नावर आशी गप्प बसली.
खोदून खोदून विचारल्यावर दोघेही नाही म्हणाली.
तरी पण दोघात कोण आवडतं या प्रश्नाला मा अजिबात आवडत नाही हे उत्तर आलं.

मग ऋतूने झरना आंटीचा तिने खराब केलेला फोटो दाखवला.
" हे बघ आपली टीम आहे कि नाही आता ? मी सगळं ठीक करीन. बाबा , मा पण तुझ्याशी नीट वागतील मी सांगितलं की "
" खरंच ?"
" खरंच"
" अगं आशी ऋतू की नाही पोलिसांच्या वरचा पोलीस आहे. त्याला खूप पावर आहे "
" सीबीआय ?"
" नाही. त्याच्याही वर. आयबी "

आशी आता मोठी मुलगी झाली होती. पण तिचं वागणं अजूनही लहान मुलीसारखं असायचं. तिची समज लहान मुलीसारखी होती. कधी कधी मात्र अतिशय प्रगल्भ वागायची. माझ्यावर विश्वास होताच. ऋतूवरही बसला.

फोटो पाहून तिची चुळबूळ चालू झाली. मी अजून खोदून विचारणार होते, पण ऋतूने माझा हात दाबला.

" ती विच आहे"
" कोण ?"
" मा "
" अगं तुझी आई आहे ती "
" नाही. लहान असताना ती विच होती. तशीच हसायची "
" अगं गंमत करत होती "
" नाही. मी तिला रूममधे पाहीलं. छतावर चालताना "
" अगं मा कशी चालेल "
" बघ दीदी, तुझाही विश्वास नाही ना ? मला नाही बोलायचं आता"
मग ती नाहीच बोलली.

आता अवघड झालं होतं.
पण ऋतूने संभाषण हाती घेतलं.
" तुझ्या दीदीला काही कळत नाही. चल आपण तिकडे आईसक्रीम खाऊयात "
असं म्हणत दोघे गेले.

ती हसत होती. टाळ्या देत होती.
मी लांबूनच कौतुकाने बघत होते.
दोघे ही कौतुकाने बोलत होते. तो तिला अधून मधून शाबासकी देत होता.

मग त्याने मला खूण केली.
काम झालं होतं.
तिघेही परतीच्या मार्गाला लागलो. येताना कुणीच कुणाशी बोललं नाही.
आशी खूप आनंदात होती. तिच्या मनातलं एक ओझं उतरलं होतं बहुतेक..
खूप दिवसांपासून शेअर करायची, राहून गेलेली गोष्ट आता हलकी झाली होती.
**********************************************************************

झरना आंटीकडेही जायचं होतं.
त्या आधी आशीने काय सांगितलं हे जाणून घ्यायचं होतं.

खूप लांब न जाता स्कॅण्डल पॉईण्टला फिरत गेलो. तिथे फिरत फिरत पोस्ट ऑफीसच्या पाय-यांवर बसलो.
ऋतू सांगू लागला...

-----------

आशीचं लहानपण दोघांनीही नासवलं होतं.
सततची भांडणं. त्यातूनही झरना आंटी तिला हवं नको ते पहायच्या.
पण त्यांची पद्धत अघोरी होती.
तिने चटकन खावं म्हणून त्या जी भीती दाखवायच्या, त्या सावटाखाली कित्येक रात्री ती भिऊन राहिली होती.
तिला भीती दाखवलेली आवडत नव्हती.
तिच्यावर कुठलीही गोष्ट लादलेली अजूनही आवडत नाही हे तर मी बघतच होते.
तिचं सर्वात विश्वासाचं ठिकाण मा होतं.
तीच भीती दाखवत होती.
कॉमिक्समधे विच भयंकर होती. कार्टूनमधली विच पण भीतीदायक होती.
मा हसायची तेव्हां आशीची अवस्था वाघांच्या मधे सापडून भेदरलेल्या कोकरासारखी व्हायची.

पुढे विच ची जागा जोकरच्या खेळण्याने घेतली.
नंतर दृश्य भीती गेली.
पण असं केलं नाहीस तर हे होईल ही भीती साठत गेली.
तिला शिस्त लावताना भीतीचा वापर खूप जास्त झाला.

************************************

आशी मनाने दुरावली होती आईवडीलांना.
मा च्या वर असलेल्या विश्वासाला सुरूंग लागला होता.

डॉक्टर विचारायच्या " गोळ्या खातेस का ?’
ती मनात म्हणायची " मला काय झालंय ?"
तिच्या मनात उलट उत्तरं फेर धरून नाचायची. पण तसं बोलायचं नाही, नाही तर...
अजून एक भीती.
ती बोलली नाही. धुमसत राहिली.

मा गोळ्या देऊन भीती घालून गेली.
आशीच्या मनाने बंड केलं. नाही मी भीतीला दाद देणार.
ती खिडकीतून खालच्या कठड्यावर उतरली. त्यावर चालत राहिली. हातातल्या गोळ्या हळूच टाकून दिल्या.
मा यायच्या आत ती गुडूप झोपली.
***********************************

मा आता आवाज काढत नव्हती.
ती भिंतीवर चालत नव्हती.

पण मा ने भीती घातली होती. तिला टिट फॉर टॅट करायलाच हवं होतं.

मा झोपली.
आशीने शटल कॉकच्या मोकळ्या सिलींडरला तोंड लावून विचच्या आवाजात हसायला सुरूवात केली.
तिचा लहान मुलीचा आवाज त्या ट्रीकने ओळखता आला नाही. शिवाय तो घुमत राहीला.

झरना आंटी दचकून उठल्या.
आशी झोपली होती.
उशीच्या खालून एक हात पलिकडे निघत होता. डोक्यावर घेतलेल्य़ा उशीने तो दुसत नव्हता.
त्यातलं पैंजण आशी वाजवत होती.

आंटी घाबरल्या.
त्या पलिकडे कशाला तरी वाकल्या इतक्यात आशीने दचकून उठताना पैंजण फेकून दिले.

त्यांचे लक्ष आशीकडे असतानाच पैंजण खिडकीला आपटून खाली पडलं.
त्याच वेळी खिडकीचं एक तावदान वा-याने आपटत होतं.

झरना आंटीला कधीच काय होतंय ते समजलं नव्हतं.
नसतंही समजलं.

शिमल्याला शिफ्ट झाल्यावर आशीने अशीच काडी पेटवून पडद्यावर फेकली होती.
त्या आधी त्याच्यावर घासलेट थोडं ओतलेलं होतं.

पडद्याने पेट घेतला तेव्हां आंटीची हालत बघून तिला हसायला येत होतं.
तिला झालेल्या त्रासाचा पुरेपूर बदला ती घेत होती.
तिने धडा शिकवला होता.

***************************

"कळलं आता ?"
ऋतूने केस सॉल्व्ह झाल्याच्या थाटात विचारलं.
मी फक्त बघितलं.

कारण आंटी अजून का ब-या झाल्या नसतील या प्रश्नाने छळलं होतं.
आता आंटीला भेटायला जाणं गरजेचं झालं होतं.

अंकलला सगळं सांगायचं कि नाही यावर एकमत होत नव्हतं.
आंटीला भेटून तर येऊ मगच ठरवू यावर मात्र एकमत झालं.
कारण आशीला ट्रीटमेंटची गरज आहे कि नाही याचा निर्णय तिच्या आईवडीलांनाच घ्यायचा होता,
किंवा मग अनामिका मामी ने त्यांना पटवून सांगणे गरजेचे होते.

क्रमशः
( अंतिम भाग वाचण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती)
https://www.maayboli.com/node/78863

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान सुरुये कथा. लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे तुझी. प्रवासवर्णन तर अहाहा! मला स्वतःला रेल्वेचा प्रवास प्रचंड आवडतो.. तू इतकं छान वर्णन केलंयेस की तो प्रवास स्वतः करत्येय अशी फीलिंग आली. लिहित रहा.. आम्हाला मेजवानी. Happy

खूप मस्त लिहितीएस.
पण एक खरं आहे राभू लहानपणी मुलांना अजिबात भिती दाखवू नये.
माझ्या माहेरी, आमच्या कॉलनीत खूप जुनी झाडं आहेत. वड, पिंपळ वगैरे. मोठे आतेभाऊ/बहिणी जवळच राहायचे.आणि नेहमी घाबरावयाचे त्या वडावर,पिंपळावर भुत आहे..बिल्डींग च्या जिन्यात पण भूत आहे..मी मोठी होईपर्यंत घाबरायचे एकटी असले कि.
आणि ठरवलं कि माझ्या मुलांना भुताखेत़ाची,अंधाराची भिती अजिबात दाखवणार नाही. मुलांना भुतं म्हणजे फनी वाटतं, किडे,झुरळं,अंधार कशालाही घाबरत नाहीत.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

अनामिका आणि लावण्या - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मामी, मृणाली आणि प्रभूदेसाई - तुमच्या सहकार्याबद्दल आणि सततच्या प्रतिसादरूपी प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार. त्यामुळे पुढे लिहीण्याचा उत्साह टिकून राहिला. राहतोय. अशा प्रकारच्या कथेला वेळ लागतो. मूड, निवांतपणा अशा गोष्टी एकत्र आल्या की लिहीले जाते. तोपर्यंत कथा पूर्ण होण्याचे दडपण आहेच. या शिदोरीवर पुढचा आणि कदाचित अंतिम भाग पूर्ण करण्याचे बळ मिळाले. पुन्हा एकदा आभार.

पूर्ण झाल्यावर उणिवांबद्दल आपण सांगालच याची खात्री आहे.

मस्तच झालांय हा ही भाग..!
कथा नायिकेचे रुसवे - फुगवे आवडले मला..
आणि दोघांची लुटूपुटूची भांडणंसुद्धा..!

छान भाग...वर्णन खूप छान लिहतेस तू.सगळं चित्र डोळ्यासमोर उभे राहत... आता पुढील भागाची उत्सुकता आहे.

पण जेव्हां जेव्हां घरात, शेजारी पाजारी, नातेवाईकांच्यात नवरा नावाचा प्राणी बायकोला लग्नाला कूकर किंवा किचनमधे लागणारी वस्तू भेट देताना पाहीला तेव्हां तेव्हां तिडीकच आलीय त्याची. आणि त्याने आज ही भेट दिली म्हणून चारचौघीत दाखवणा-या बायांचं तर काय करावं ?>> अगदी अगदी सेम फिलिन्ग!
मस्त झालाय हा भाग पण!
खूप सुन्दर ओघवतं लिहितेस.