राजकारण्यांना 'काय बोलायचं आता' हा मूर्ख प्रश्न कधीही सतावत नाही.. ते लोक अनंत काळापर्यंत ऐसपैस बोलत राहू शकतात..!
पण मिडीयावाल्यांचे मात्र फारच हाल होतात ..!
कारण दिवसभराचा मुबलक वेळ आ वासून उभा असतो.. आणि दळत रहायचं म्हटलं तर हाताशी पुरेसा कंटेंटही नसतो..
मग काय करणार..! वाक्यांची लांबी वाढवण्याचा एकमेव उद्देश डोळ्यांसमोर ठेवून, वाक्यामध्ये बिनकामाचे शब्द
घालून घालून, नेमून दिलेली वेळ मारून न्यावी लागते बिचाऱ्यांना..!
उदाहरणार्थ त्यांची आवडती बिनकामाची शब्दरचना :
१.नक्कीच, २. ह्या ठिकाणी, ३. त्या ठिकाणी,
४. कुठे ना कुठेतरी, ५. शक्यता नाकारता येत नाही,
६. हे पाहणं आपल्या सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे
७. हे पाहणं आपल्या सर्वांसाठीच महत्वाचं ठरणार आहे
८. सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे
९. जो आहे तो, जे आहे ते, जी आहे ती..
१०. येणाऱ्या काळामध्ये, ११. निश्चितच
आणि त्यांचे काही वाक्यात उपयोग :
नक्कीच .. ह्या प्रकरणाला आता नेमकं काय वळण लागणार आहे, ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे... ह्या प्रकरणाची
कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे.. आणि
त्यामुळेच कोर्टात आज काय नक्की होणार आहे हे पाहणं
निश्चितच सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.. कुठेही जाऊ नका.. आम्ही लगेचच परत येतोय.. पहात रहा..
नमस्कार..आपण बघताय हे वेळकाढू चॅनेल, आणि मी आहे उमेश किंचाळे, तर आपण बघताय या घडीची सर्वात मोठी बातमी, कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश आलेला आहे, आपण
बघताय आत्ताच्या तासातली सर्वात मोठी बातमी, कोर्टाचा
महत्वपूर्ण आदेश जो आहे, तो आलेला आहे, आपण जाऊया आपले प्रतिनिधी रमेश ताटकळे न्यायालयात उपस्थित आहेत... काय सांगशील रमेश?
उमेश, हा जो कोर्टाचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे, तो ह्या ठिकाणी आलेला आहे... आणि कुठे ना कुठेतरी हा
सरकारसाठी धक्का मानला जात आहे..
नक्कीच रमेश, कोर्टाचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा ह्या
ठिकाणी आलेला आहे... आणि तू म्हणतोयस ते नक्कीच बरोबर आहे की कुठे ना कुठेतरी हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे, आणखी काय सांगशील रमेश?
नक्कीच उमेश, आता ह्या प्रकरणावर सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे, हे पाहणंसुद्धा येणाऱ्या काळामध्ये
सर्वांसाठी निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे...
नक्कीच गंधार.. ह्या सगळ्या घडामोडींवर आपली बारीक नजर राहणारच आहे कारण हे सगळं पाहणं कुठे ना कुठे तरी आपल्या सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे..
धन्यवाद अश्मी, आता प्रशासन ह्यावर नेमकी काय भूमिका
घेणार आहे, काय कारवाई करणार आहे, हे ही पाहणं नक्कीच कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांसाठीच महत्वाचं ठरणार आहे...
आत्ता ह्या ठिकाणी पक्षाची महत्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून
राहिलं आहे.. आज सकाळपासूनच ह्या निवासस्थानी हलचल जी आहे, ती सुरू झालेली आहे.. आपण बघताय की मंत्री अमुक यांची गाडी जी आहे, ती आता चाललेली आहे...
बैठकीसाठी पक्षाचे सगळे वरिष्ठ नेतेही ह्या ठिकाणी हळूहळू दाखल होत आहेत.. आणि कुठे ना कुठेतरी ह्या प्रकरणात नाराजीचा सूर जो आहे, तो लावला जातो आहे अशी आपल्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे..
नक्कीच अश्मी.. ह्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय
होण्याची शक्यता ही, कुठे ना कुठे नाकारता येत नाही...
आम्ही वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट्स घेतच राहू..
तू दिलेल्या महत्वपूर्ण माहितीसाठी धन्यवाद..
राजकारणी :
(विरोधी पक्षातल्या नेत्यांना बाईट देताना चेहरा हसरा ठेवणं निषिद्ध असतं.. बद्धकोष्ठता किंवा सकाळी पोट नीट साफ न होणं, वगैरे जुनाट रोगांची तंतोतंत लक्षणं चेहऱ्यावर ठेवून वावरावं लागतं)
उदाहरणार्थ,
नाही.. नाही.... हे बघा ss महाराष्ट्रातली सगळी जनता बघत आहे.. आम्हाला त्या ठिकाणी रोज उठून सांगायचं की
राजकारण करू नका म्हणून आणि स्वतः मात्र नको त्या
गोष्टीत राजकारण करत बसायचं, हे काही बरोबर नाही... आणि ह्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी स्वतःचं अपयश
झाकण्यासाठी सरकारचा हा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी
चाललेला आहे, आणि हे सगळं लोकांच्या आता लक्षात
यायला लागलं आहे.. हे सगळे त्या ठिकाणी फेल झालेले आहेत.. कुणाचा कुणाला मेळ नाही, अशी परिस्थिती कुठे ना कुठेतरी आज आपल्यावर आलेली आहे..
अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे... आणि निश्चितच ह्या
सरकारच्या बेजबाबदार आणि ढिसाळ नियोजनामुळे त्या
ठिकाणी जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे..
आणि त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही त्या
ठिकाणी करत आहोत...
(सत्ताधारी नेत्यांना बोलताना बहुतेक वेळा गुंडगुळी
शब्दरचना योजावी लागते की ज्यामुळे कुणालाच ठाम
स्वरूपाचं असं काही समजू नये)
उदाहरणार्थ,
निश्चितच, हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.. आणि आम्ही सगळेच ह्याबद्दल अतिशय सकारात्मक आहोत. त्यामुळे सर्व घटकांशी बोलून सर्व बाबींचा सारासार विचार करून
लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊ आणि हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये मार्गी लावू, हे मी तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो...
हे बघाss.. विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे की बाबांनो ही काही राजकारण करण्याची वेळ नाहीये... आम्ही सगळेच त्या ठिकाणी दिवसरात्र झटत आहोत.. आणि ह्या ठिकाणी सर्वांनी मिळून ह्या संकटाचा मुकाबला करण्याची वेळ आज आपल्या सर्वांच्यावरच त्या ठिकाणी आलेली आहे... आणि ह्या प्रकरणाबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की एक
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा आजच आमचा
निर्णय झालेला आहे...
माझं सचिवांशी आत्ताच बोलणं झालेलं आहे...
आणि ह्याच्यामध्ये चौकशी अंती जे कोणी दोषी
आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई
करण्याच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत...
ह्याच्यासंबंधानं तुम्ही आम्ही सर्वांनीच कुठेतरी सारासार
विचार करण्याची वेळ आज आलेली आहे.. त्यामुळे
सगळ्यांनीच आता राजकारण बंद केलं पाहिजे... आणि कृपा करून ह्याचं राजकारण करू नका बरं का..
नाही ना करणार मग राजकारण..?
प्लीजss नका ना हो करू राजकारण..!!
आपण सगळेजण ग्गोड ग्गोड गोज्जुली गोज्जुली शोनुली
शोनुली बाळं आहोत की नाही?? मग? नाही हं करायचं
राजकारण यापुढं..!!
super comedy !
super comedy !
प्रिंट मिडियावाले पण कमी
प्रिंट मिडियावाले पण कमी नाहीत.
ह्या कवितेने होईल तुमची सकाळ साजरी
ह्या क्रिकेटरला राग का आला?
ह्याने त्याला दिले जोरदार प्रतुत्तर
ह्या जुन्या फोटोतील नटीला ओळखू शकाल?
हेमंतची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे
Video: स्वीटूच्या हातची पुरण पोळी की आईने बनवलेला पराठा? काय निवडणार शाल्व जाणून घ्या
असे अनेक वाचून मला चिं वि जोशी यांच्या कथेची आठवण झाली.
सुई अग्र माती नकार.
सध्या पत्रकारिता म्हणजे कुणी काय twit केले ते लिहायचे आणि मग ते twitद्यायचे.
छान लेख आहे. जाता जाता साधारण
छान लेख आहे. जाता जाता साधारण ह्याच विषयावरच्या माझ्या चवैतुहि लेखाची इथे जाहिरात करतो.
यात "माहिती समोर आली आहे" हे
यात "माहिती समोर आली आहे" हे पण घ्या..
उद. आज सकाळी कोहलीला संडासला त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे तो आजची मॅच खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
छान निरिक्षण..
छान निरिक्षण..
आज इथे या ठिकाणी
छान आहे! असंच अमुक तमुक करू
छान आहे! असंच अमुक तमुक करू 'शकणे' हे पण मीडियावाल्यांचं आवडतं क्रियापद आहे.
'थेट वार्तांकन बघूया उमेशसोबत. उमेश काय सांगशील, काय परिस्थिती आहे तिकडे?'
'नक्कीच गंधार, आपण इकडे बघू शकतो की भयानक भूकंप झालेला आहे. ह्या समोरच्या घराच्या काचा फुटलेल्या तुम्ही बघू शकता.'
इंग्रजी 'कॅन सी' चं ते सरळ भाषांतर आहे. मराठीत 'शकणे' म्हणजे ती क्रिया करण्याच्या सामर्थ्याबद्दल वापरला जातो.
@ प्रभुदेसाई चिर्कुट शंतनु ..
@ प्रभुदेसाई चिर्कुट शंतनु .. +११
मन्या धन्यवाद
@ हरचंद,
इंग्रजी 'कॅन सी' चं ते सरळ भाषांतर आहे. मराठीत 'शकणे' म्हणजे ती क्रिया करण्याच्या सामर्थ्याबद्दल वापरला जातो.. >> +११
त्यांनी शब्दांचा,भाषेचा एवढा अभ्यास केला असता तर मग अजून काय पाहिजे होतं..!
प्रत्येक घटनेच्या संदर्भात तेच तेच शब्द वापरत राहतात हे लोक.. त्यामुळे त्या शब्दांना काही अर्थच उरत नाही.. आपण रोज काय बोलतोय हे पुन्हा एकदा ऐकून बघतात की नाही कुणास ठाऊक... खरं तर मराठीमध्ये एवढा समृद्ध शब्दसंग्रह आहे, पण त्यावर प्रभुत्व आणायचं तर रोज थोडं फार तरी सकस वाचन करावं लागेल.. तेवढा वेळ यांच्याकडे नसणार... बसतात मग त्याच त्याच लेंड्या टाकत..
"Can I come in?"
"Can I come in?"
" Yes , you can , but you may not ."
भारी लेख.
भारी लेख.
खूप 'जबरा' लिहिलंय
खूप 'जबरा' लिहिलंय
ही एक अजून मज्जा असते
आधीची बातमी चालू असते तेव्हा खाली सतत दाखवत रहायचं.
5.29pm-पहा स्पेशल रिपोर्ट
कोरोना ची तिसरी ,चौथी लाट येणार?
10 जाहीराती दाखवून झाल्या की मग निवेदक येणार,स्वतः ची ओळख आणि
मग पुन्हा तेच वाक्य रिपीट करणार आणि म्हणणार पाहूया ****चा स्पेशल रिपोर्ट
भारतात तिसरी,चौथी लाट येणार?
असं मोठया अक्षरात लिहिलेलं आणि त्याहून मोठी music, आणि त्याहून मोठ्या आवाजात ते वाचून दाखवणारा निवेदक
(इथं निळं/लाल कोरोना विषाणू ची चित्रे बॅकग्राऊंड ला)
शास्त्रज्ञांनी दिला इशारा?
(इथं पुन्हा लाऊड music, आवाज तोच वरच्या पट्टीतला आणि
पाठीमागे लॅब मधले शास्त्रज्ञांचे चित्र)
जे जगातील अनेक देशात घडलं ते भारतात ही होणार?
(पुन्हा जोरजोराने ते वाचायचे, भयंकर music सोबत आणि
चित्रात अँबूलन्स, स्टेचर वगैरे वाट्टेल ते)
काय आपण तयार आहोत का?
(पुन्हा सगळं तेच,तेच,तेच)
असे किमान 4-5 वेळा झालं की
मग ह्यांचा स्पेशल रिपोर्ट सुरू होतो
आत्ता भारत दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, अमुक एवढे रोज सापडत आहेत,अमूक एवढे मृत्यू होत आहेत.
ही दुसरी लाट असल्याचं म्हटलं जातं असतानाच काही शास्त्रज्ञ, डॉक्टरांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे
तुम्हाला माहित आहेच की पूर्ण जग आज ह्याचा सामना करतय
काही देशात तिसऱ्या, चौथ्या लाटेने हाहाकार माजवलेला आपण पहिलाच आहे
तर आता अनेक जाणकार भारतात ही तिसऱ्या, चौथ्या लाटे बद्दल इशारा देत आहेत
भारताची सध्याच्या परिस्थिती पाहता जर भविष्यात अश्या लाटा आल्या तर काय होईल, आरोग्य व्यवस्थेवर किती ताण येईल ह्याची सर्व थरातून चिंता व्यक्त केली जात आहे
ही भीती खरी होईल का हे येणारा काळच सांगेल
तूर्तास आपण सर्वांनी मिळून ह्या संकटाचा मुकाबला करणे आणि कोरोना विषयक मार्गदर्शकाचा अवलंब करणे हे महत्वाचे आहे
(सम्पला एकदाचा स्पेशल रिपोर्ट)
हे कुठेतरी हाताबाहेर गेलेलं
हे कुठेतरी हाताबाहेर गेलेलं प्रकरण आहे असे मी या ठिकाणी या प्रतिसादाच्या माध्यमातून सांगू इच्छितो.
बाकी “भूमिका” राहिली. ती पण “अशी” नसते, “अश्याप्रकारची भूमिका” असते आणि ती “घ्यावी” लागते
कुण्या दीडदमडीच्या गावगन्ना नेत्यांबद्दल “ते काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले” असते ते एक.
आता मी हे सर्व बघण्या-ऐकण्यापेक्षा गटार स्वच्छ करण्याचे व्हिडियो बघतो, at least I get to see something clean at the end !