हेल्दी नवरत्न सँलेड

Submitted by शिवानीश्री on 28 April, 2021 - 13:07
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

( हेल्दी नवरत्न-सँलड )

- ✍️ ©सौ. शिवानी श्री.वकील©

वजन वाढीची समस्या बहुदा प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात भेडसावत असते, त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्याचा सामना करत असतो, पण कधी कमी डाएट घेण्याच्या नादात शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन-व्हिटँमिन- मिनरलस् योग्य प्रमाणात पुरवले जात नाहीत, कधी कधी कमी (कँलरीज) तेल तुप खाण्यासाठी पदार्थांची चवही हवी तशी नसते. अशावेळी डाएट करणे अवघड वाटू लागते आणि रसरशीत पदार्थ समोर दिसले तर मात्र डाएट पाळणे अवघड जाते.

एखादया दिवशी असे खाणे चालू शकते पण रोज काय खावे हा प्रश्नही छळत असतो. कधी वजनवाढ तर कधी आहाराचे पथ्य, तर सध्या रोगराई रोखण्यासाठी, ईम्युनीटी वाढवण्यासाठी, अशा एक ना अनेक कारणांसाठी आहाराचे तंत्र सांभाळून ठेवणे गरजेचे असते, अगदीच चवीचे न खाण्यापेक्षा या चटपटीत सँलेड रेसिपी आपण दिवसातून एकावेळी आपल्या सोयीनुसार ((सकाळी /संध्याकाळी) जेवणाला पर्याय म्हणून वापरु शकतो, त्यासाठी किती प्रमाण घ्यावे ते आपण आपल्या आवडीने ठरवू शकतो. आपण काही सँलेड रेसिपी बघु. प्रमाण (एका व्यक्तीसाठी) - त्या आधी काही टिप्स बघु -

- सोयाबीन नगेटस् / भाज्या शिजवताना पाण्यात
किंचीत मिठ घालून शिजवावे.
- नाँन वेज खाणार्यांनी सँलेड च्या जोडीला
एखाददुसरे उकडलेले अंडे घेतले तरी चालेल.
- उन्हाळ्यात भरपुर ताक घेऊ शकता.
- पालक /मेथी पाने अगदीच आवडत नसल्यास
सेलरीची घेऊ शकता.
- कांदा,मुळा देखिल आवडी प्रमाणे घालु शकता
- मशरुमही वापरुन पहा. बिट कधी कच्चे तर
कधी शिजवून वापरु शकता.
- आवडत असल्यास वरून थोडेसे आँलीव्ह
आँईल घालावे.
- एखादेवेळी आवडत असल्यास चवीसाठी ३-४
पास्ता मँकरोनीचे तुकडे शिजवून त्यात अँड
करु शकता.
- रोज दोन-तिन तुळस/पुदीना/कोथींबिर पाने अँड
करु शकता
- रोजसाठी प्रमाणाचा एक मोठा बाऊल तोच
ठेवावा.
- शक्यतो दोन्ही आहाराची रोज सारखी वेळ
ठेवावी.
-डाळिंबाचे दाणे, थोडे कच्चे मोडाचे धान्य, एखादे
वेळी घेऊ शकता.
- ज्या दिवशी कडधान्य घेणार असाल, त्याच्या
आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवले तर
दुसर्‍या दिवशीव्यवस्थित मऊ शिजते. (चवळी,
छोले ई.)

क्रमवार पाककृती: 

प्रकार १)

एका बाऊलमधे एक वाटी शिजवुन पाणी काढलेले सोयाबीन नगेटस्, (आवडीप्रमाणे पाव अथवा अर्धा तुकडा प्रत्येकी ) काकडी, गाजर, बिट बारीक बारीक चौकोनी चिरुन, थोडे मटाराचे दाणे, दोन-चार पालक, मेथी, कोथिंबिरीची पाने बारीक चिरलेली सर्व बाऊलमधेच एकत्र करणे, पास्ताचे ४ तुकडे शिजवून चवीसाठी सर्व एकत्र करून खाण्याआधी त्यावर चाटमसाला भुरभुरून घेणे.

प्रकार २)
फ्लाँवरचे मध्यम तुकडे पाण्यात किंचीत शिजवून निथळवून, एका बाऊलमधे थोडे काकडी, गाजर, टोमॅटो बारीक बारीक चौकोनी चिरून, पाव वाटी स्वीट कॉर्न व मटारदाणे शिजवून, खाण्याच्या आधी चाट मसाला भुरभुरून घेणे.

प्रकार ३)

एका बाऊलमधे एक मोठी वाटी चवळी मोकळी शिजवलेली, बारीक चिरलेली काकडी, गाजर, बिट, टोमँटो, पालकाची चार-पाचपाने चिरुन, मटारदाणे, एक वाटी शिजवलेल्या फरसबीचे छोटे तुकडे. वेळेवर चाट मसाला भुरभुरून घेणे

प्रकार ४)

१ मोठी वाटी छोले शिजवून, १ छोटा बटाटा शिजवून बारीक चौकोनी तुकडे करुन, काकडी, टोमॅटो बारीक बारीक चिरून, शिजवलेले बिट बारीक तुकडे करुन, थोडे मटार शिजवलेले. खाण्याआधी चाटमसाला भुरभुरून घेणे.

याप्रमाणेच कधी शिजवलेल्या भाज्या, तर कधी शिजवलेले मुग, हरबरे, मटकी / सोयाबीन नगेटस् / मक्याचेदाणे/ भुईमुगदाणे वगैरे वापरुन आलटून पालटून आठवड्याचे सात दिवस रेसिपी करु शकतो. थोडी कल्पकता वापरली तर बरेच वेगळे वेगळे प्रकार करता येतील, साधारण पणे आपल्या घरात उपलब्ध असणारे जिन्नस वापरून आपण पुष्कळ नविन सँलेड रेसिपी बनवू शकतो. कधीतरी वेगळे वेगळे आवडणारे फ्रूटस् ही चिरुन घेता येतील.

आपल्याला नवरत्न सँलेड कसे वाटले ते जरुर सांगा.

- ✍️ ©सौ. शिवानी श्री.वकील©

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Use group defaults