स्वप्न!

Submitted by पराग र. लोणकर on 26 April, 2021 - 04:58

स्वप्न!

रात्रीचं जेवण आटोपलं आणि सगळी आवराआवर करून पुष्पा खोलीत आली. मी तिला म्हणालो,

``हे बघ पुष्पा, आता आपल्याला निर्णय घ्यायलाच हवा. पाच-सहा वर्षं झाली प्रतीकला मुंबईला जाऊन. आताश्या फारसं बोलणंही नसतं आपलं. आता आपण हा वाडा विकावा हेच बरं. वाडा विकूया. बँक लोन फेडूया आणि सरळ एखाद्या flat मध्ये राहायला जाऊया. आता आपल्याला flat विकत घेणं परवडणार नाहीच आहे. त्यामुळे पुढची काही वर्षं भाड्यानंच राहू. नंतर पाहू एखादा वृद्धाश्रम. कारण प्रतिक आता पुण्यात परत येईल असंही मला फारसं वाटत नाहीये...``

पुष्पानं माझ्या या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हाच मी तिचा होकार समजलो आणि उद्याच याबाबतची हालचाल करायची असं ठरवून मी बिछान्यावर आडवा झालो. लगेच झोप लागेल अशी अपेक्षा नव्हतीच. माझं मन भूतकाळात गेलं.

मी मधुकर जोशी. एका खाजगी संस्थेत गेली अनेक वर्षे काम करतोय. पोटा-पाण्यापुरते कमावतोय. आवश्यक साऱ्या गरजा भागवल्या जाताहेत. मोठी स्वप्न पाहायचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे आहे त्यात मी संतुष्ट आहे, नेहमीच असतो. पुण्यात अगदी मध्य वस्तीत आमचा वडिलोपार्जित वाडा आहे. तसा फार मोठा नाही, पण मध्यवस्तीत असल्याने आजूबाजूच्या वाड्यांबरोबर एखादा बिल्डर मोठे commercial cum residential complex उभे करण्यासाठी सहज विकत घेईल असा. रक्कमही बऱ्यापैकी मिळेल याची खात्री. योगायोगाने वडलांच्या वेळी वाड्यात जे तीन भाडेकरू होते, त्यातील, त्या पिढीतील आता कुणी हयात नाही. त्यातील दोघांची मुले जागेवर कोणताही हक्क वगैरे न दाखवता परदेशात स्थायिक झालेली आणि एका भाडेकरू कुटुंबात संतती नसल्याने तीही जागा त्या दोघांच्या जाण्याने मोकळी झालेली. माझ्या वडिलांस मी एकुलता एक. त्यामुळे एकूणच दैव कृपेने या वाड्याचा मी एकमेव मालक होतो. मला पाहिजे तेव्हा मी तो विना अडचण विकू शकणार होतो. मीच वाडा विकण्याचा निर्णय लांबवत होतो. माझ्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी हा वाडा विकून येणारी रक्कम मला आधार असणार होती.

मला एकच मुलगा. प्रतिक त्याचे नाव. प्रतिक एक वेगळेच रसायन होता. माझ्या अगदी उलट. त्याची खूप मोठमोठी स्वप्नं होती. त्याला अभिनय, दिग्दर्शनाची आवड होती. त्यामुळे पुण्यात प्रथम बाल रंगभूमीवर आणि नंतर काही काळ हौशी रंगभूमीवर तो काम करत होता. अर्थात उत्पन्न फार नव्हते. खरं तर अनेकदा पदरचा खर्चच करावा लागत होता. मी मला जमेल तशी त्याला आर्थिक मदत करत होतो. माझेही उत्पन्न फार नसले, तरी वाड्याचा भविष्यात आधार असल्याने मी त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्यास बिनधास्त पाठींबा देत होतो. शेवटी माझी अशी स्वप्ने काही नव्हती. त्यामुळे जर प्रतिक या क्षेत्रात फारसं काही करू शकला नाही तर वाडा विकून माझ्यासकट त्यालाही निदान दोन वेळच्या खाण्याची भ्रांत कधी पडणार नाही इतका पैसा माझ्याजवळ उभा राहणार होता.

साधारण पाच-एक वर्षांपूर्वी प्रतिकनं मुंबईला जायची इच्छा व्यक्त केली. मी त्याही वेळी त्याला पाठींबा दिला. पण एवढंच म्हटलं, ``प्रतिक, आपण सामान्य घरातील सामान्य माणसं. पण तुझी स्वप्नं फार मोठी आहेत. पण ती तितकीच अवघडही आहेत. तुमचे क्षेत्र फारच अनिश्चित आहे. पण मी तुला मागे खेचणार नाही. तू प्रयत्न कर. पण जर त्यात अयशस्वी झालास तर कुठलाही विचार न करता, काहीही लाज, शरम, खंत, अपमान वगैरे वाटून न घेता परत ये. आपण हा वाडा विकू, तुला एखादी लहानशी नोकरी बघू आणि आयुष्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता आपले आयुष्य समाधानाने जगू. प्रयत्न करणे महत्वाचे. त्यात यश येणे, न येणे त्या परमेश्वराच्या हाती. त्यामुळे अपयशी ठरलास तर स्वत:ला किंचितही दोष न देता, frustrate न होता परत ये. तसं आश्वासन मला देत असशील तर मी देतो तुला मुंबईला जायची परवानगी.``

प्रतीकनं माझं म्हणणं मान्य केलं आणि तो मुंबईला गेला. पुढील साधारण वर्षभर आमचा फोनवर नियमित संपर्क होता. तो मुंबईला त्याच्या क्षेत्रात नवीन होता. त्यामुळे struggling करायला लागणार याची कल्पना होतीच. त्यामुळे फोनवर आम्ही फक्त एकमेकांची खुशाली विचारात होतो. त्याच्या कामाबद्दल मी त्याला अजिबात विचारत नव्हतो. मला प्रत्येक वेळी काय उत्तर द्यावे याचा ताण मला त्याला द्यायचा नव्हता. मी त्याला दर महा काही रक्कम पुण्याहून पाठवत होतो. हळूहळू त्याच्या प्रयत्नात तो अधिकाधिक व्यस्त होत असल्याचं जाणवलं. कारण त्याचे फोन येणे कमी कमी होत गेले. मुंबईला गेल्यानंतरच्या दोन-एक वर्षात त्याच्या पुण्याला काही अगदी दोन-तीन दिवसांसाठी फेऱ्याही झाल्या. एकूण फारसं काही चांगलं, आशादायी घडत नाही हे मात्र लक्षात येत होतं.

साधारण अडीच-तीन वर्षांपूर्वी मात्र त्यानं पुण्याला येऊन एक प्रस्ताव मांडला. त्याला दिग्दर्शनातील एका कोर्ससाठी परदेशात जायचं होतं. एक वर्षाचा हा कोर्स होता. सगळं मिळून यासाठी येणारा खर्च एक कोटीच्या घरात होता. आता मात्र मी हादरलो. एवढी रक्कम उभी करण्यासाठी वाड्याबाबतीत काहीतरी करणे हाच एक उपाय होता. पण सध्या तरी वाडा विकणे माझ्या मनाला पटत नव्हते. आमच्यात खूप चर्चा झाली आणि प्रतीकने या कोर्सचे महत्व माझ्या मनावर बिंबवून या वाड्यावर बँकेकडून कर्ज घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. प्रतीकच्याच एक मित्राचे- संतोषचे वडील एका बँकेत मोठ्या पदावर होते. त्यांच्या मदतीने हा व्यवहार सोपा झाला.

या गोष्टीस आता तीन वर्ष होऊन गेलीत. प्रतीकचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण होऊन तो पुन्हा मुंबईत आला आणि त्याचे मुंबईमधील struggle पुन्हा चालू झाले. आताश्या आम्हाला त्याच्याकडून फारसे काही कळत नव्हते. त्याच्या पुण्यातील फेऱ्याही बंद झाल्या होत्या. क्वचित फोनवर बोलणे व्हायचे, ज्यामुळे आम्हाला तो आहे, आणि त्याला आम्ही आहोत, इतपतच माहिती मिळत होती. आम्हीही त्याला ताण नको म्हणून त्याच्या कामाही फारशी विचारणा करत नव्हतो. माझ्यासाठी मुलाचा जीव जास्त महत्वाचा होता.

इतक्या मोठ्या कर्जाचे हप्ते मी मला जमेल तसे भरत असलो, तरी फार जास्त रक्कम मला भरणे शक्यच नव्हते. व्याजावर व्याज चढत होते. आणि त्यामुळेच मला आता वाड्याबाबतचा निर्णय घेणे अगदी आवश्यक झाले होते आणि मी आज पुष्पाच्याही ते कानावर घातले होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मी संतोषला फोन करून, मी आता वाडा विकायचं ठरवत असल्याचं, आणि तसं त्याच्या वडिलांच्या कानावर घालायला सांगितलं. मला आता पहिल्यांदा वाड्यासाठी ग्राहक बघायचा होता. त्यानंतर बँकेत असलेले वाड्याचे पेपर्स वगैरेचे- तो विकण्याचे दृष्टीने- काम करणेही आवश्यक होते.

आणि याच दिवसात एके दिवशी सकाळी सकाळी अचानक प्रतीकचा फोन आला. त्याचा सूर फारसा उत्साही नव्हता. पुण्याला येत असल्याचे त्याने कळवले. एकूणच त्याचा आवाज पाहता, त्याचे स्वप्न भंग पावल्याचा मला अंदाज आला. बहुदा तो प्रयत्न करून आता थकला असावा. मी त्याला ``डोके शांत ठेव आणि जास्त विचार न करता पुण्याला निघून ये,`` असे आश्वस्त केले.

संध्याकाळी वाड्याच्या दाराशी रिक्षा थांबल्याचा आवाज आला. मी आणि पुष्पा तसे धावतच दाराशी पोहोचलो. रिक्षातून प्रतिक उतरत होता. त्याचा कपड्यांचा एकूण अवतार पाहता मुंबईत त्याचं फारसं काही भलं झाल्याचं जाणवत नव्हतं. सामानही फारसं नव्हतं. खांद्याला एक शबनम अडकवलेली होती, तो पूर्वी अडकवायचा तशी! फक्त थोडासा जाड झाल्यासारखा वाटत होता. सतत बाहेरच्या fast food खाण्यामुळे तसं झालेलं असावं. निदान तब्येत खालावली नव्हती याचंच आम्हाला दोघांनाही समाधान वाटलं.

आम्ही त्याला घरात घेऊन आलो. थोडासा अबोलच वाटला. अर्थात स्वप्न पूर्ण झाली नाहीत, की माणूस निराश होणारच. त्याला आता आधार देणं मला महत्वाचं वाटलं. त्यामुळे पुढील काही तास आम्ही दोघं सतत त्याच्या जवळच वावरत होतो.

रात्री जेवणं आटोपली आणि आम्ही झोपायला गेलो. आज आम्ही प्रतीकला आमच्याच खोलीत झोपायला सांगितलं. तो तसा गप्प गप्पच होता. आणि याचीच आम्हाला, विशेषत: मला काळजी वाटत होती.

दुसरा दिवस उजाडला. सकाळी अकराचे सुमारास दाराची बेल वाजली तसे मी प्रतिककडे पाहिले. तो दार उघडायला उठेल असे वाटले, पण तो उठला नाही. मी उठलो. दार उघडले. दाराशी एक माणूस होता. माझ्या नावाने त्याने एक पाकीट आणलं होतं. मी ते पाकीट घेतलं. आत आलो. बेल वाजल्यानं पुष्पाही आतून बाहेर आली होती. मी ते पाकीट घेऊन hallमधील सोफ्यावर बसलो. पलीकडच्या सोफ्यावर बसलेला प्रतिक आता उठून माझ्या बाजूला येऊन बसला. मला थोडंसं आश्चर्यच वाटलं.

मी पाकीट उघडलं. आत काही पेपर्स होते. बँकेकडून आलेले. मी ते वाचणार, इतक्यात प्रतिक म्हणाला,

``बाबा, ही माझ्याकडून तुम्हाला भेट! आपले वाड्याचे कर्ज फिटल्याचे सांगणारे हे कागद आहेत!``

काहीच न समजून मी प्रतिकच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आजचा प्रतिक एकदम वेगळाच होता. कालच्या प्रतिकपेक्षा एकदम वेगळा!

``म्हणजे?``

``बाबा, मी कर्ज फेडले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत खूप काही घडलं आहे बाबा. मी तुमचा विश्वास बसणार नाही इतका व्यस्त झालो होतो. दिवस-रात्र किती कष्ट केले ते सांगताही येणार नाही. तुम्हाला दोघांना सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून काहीच बोललो नव्हतो याबद्दल. हे सारं तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झालंय बाबा. आई, मी कोर्स पूर्ण करून मुंबईत आल्यावर डायरेक्ट केलेल्या एका short फिल्मला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या क्षेत्रात मी इतकी वर्षे घेतलेला अनुभव आणि त्यानंतर केलेल्या कोर्समध्ये मिळालेल्या शिक्षणाने खूप फायदा झाला, मला अनेक short फिल्म्सचे प्रोजेक्ट्स मिळाले. सुरुवातीला assistant director म्हणून आणि आता स्वतंत्रपणेही. मी मुद्दाम गेला काही काळ याबाबत फारसं काही बोलत नव्हतो. मला तुम्हाला जबरदस्त सरप्राईज द्यायचं होतं. अर्थात तुमची ख्याली खुशाली संतोषच्या माध्यमातून मी नियमित घेत होतो. त्याच्याकडूनच तुम्ही वाडा विकणार असल्याचं कळलं आणि मग मात्र मला तातडीनं यावं लागलं. बँकेची कामं मी मुंबईहूनच कोओर्डीनेट केली. तसंही तीन-चार महिन्यात मी येणारच होतो. ते आत्ताच यावं लागलं...``

``अरे पण कालचा तुझा अवतार...``

``तो सगळा अभिनय होता बाबा. हे बँकेचे पत्र तुमच्या हातात पडेपर्यंत मला करावा लागलेला...``

मी आणि पुष्पा काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, आमच्या दोघांच्याही आणि प्रतीकच्याही... प्रतीकनं जिद्दीनं, चिकाटीनं आणि अतोनात श्रम करून त्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं. माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या मुलानं असामान्य असं काम केलं होतं...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान... अश्या चांगले शेवट असलेल्या गोष्टी आवडतात.

ह्या सध्याच्या काळात असल्याच गोष्टींची गरज आहे. अजून उत्साह वाढवतात. तुमची लेखनही चांगले आहे. धन्यवाद.

साधारण पाच महिन्यांपूर्वीच्या काही महिन्यांत मी काही कथा मायबोलीवर सादर केल्या होत्या. गेल्या पाच महिन्यांत काहीच कागदावर उतरत नव्हते. इतक्या खंडानंतर उतरलेली कथा टाकताना वाचकांना किमान बरी तरी वाटावी अशी इच्छा होती. आपण सर्वांच्या प्रतिसादाबद्दल सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद!

इतक्या खंडानंतर उतरलेली कथा टाकताना वाचकांना किमान बरी तरी वाटावी अशी इच्छा होती.> बरी??? मस्त कथा!
पराग, लिहित रहा . छान लिहिता. पुढच्या कथे च्या प्रतीक्षेत Happy

मस्त कथा.
अश्या चांगले शेवट असलेल्या गोष्टी आवडतात. +100