"लोक"down

Submitted by गणक on 15 April, 2021 - 12:27

"लोक"down

मंत्री संत्री बिजनेसवाले कुणाला फरक नाय
पण जे "लोक"झाले त्यांनी करायचं काय...
कुणी कुणी चमचमीत अन्न रोज पोटभर खाय
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

पडली बंद रोजनदारी नाही हाताला काम
मरण यातना उपवासाने कधी मिळेल हो दाम
पोट आहे हातावर ज्यांचे त्यांचा सवाल हाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

हायवेवरती गर्दी कसली मजुरांची ही लाट
शहर आता ते पडले मागे धरली गावाची वाट
कधी आपल्या घरी पोहचू चालून थकले पाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

शेती माल तो पडून आहे मार्केट सगळी बंद
बळीराजा ओघळतो अश्रू शासन झाले अंध
घरी बसून चर्चा अन् गप्पा बिस्किटे सोबती चाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

पक्षांवरती आजार आहे अफवा उठवली होती
कोंबडीला किंमतच नाही महाग बकऱ्याची बोटी
वासराचेही पोट भरेना अर्धी उपाशी गाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

देवानेही रंग बदलला "खाकी"आणि "पांढरा"
"निळे"रुप रस्त्यावर फिरते तोच शिव शंकरा
कर्तव्यावर ठाम उभा तो दुखती त्याचे पाय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

मंत्री संत्री बिजनेसवाले कुणाला फरक नाय
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...
पण जे "लोक"down झाले त्यांनी करायचं काय...

Group content visibility: 
Use group defaults