सिझेरिअन प्रसूती : जन्मकथा व दंतकथा

Submitted by कुमार१ on 13 April, 2021 - 04:12

गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष कापून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते. याचा लाभ अनेक स्त्रिया घेत असून त्यामुळे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतात.

या महत्त्वाच्या आणि मूलभूत शल्यक्रियेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. त्याला ‘सिझेरिअन’ हे नाव कसे पडले हा तर कुतूहलाचा आणि काथ्याकुटाचा विषय आहे. अनेक आख्यायिका या नावाभोवती गुंफलेल्या आहेत. रोमन सम्राट ज्युलियस सिझरचा आणि या शल्यक्रियेच्या नावाचा नक्की संबंध काय आहे, यावर वाद झडत राहतात. खुद्द इतिहासकारांमध्येही त्याबद्दल प्रवाद आहेत. त्या वादात न शिरता संबंधित उगमकथांचा निखळ आनंद वाचकांनी घ्यावा हा या लेखाचा हेतू आहे. त्याचबरोबर सुमारे सहाशे वर्षांच्या आधुनिक इतिहासात वैद्यक प्रगतीनुसार ही शल्यक्रिया अगदी रांगडेपणापासून पुढे कशी शास्त्रशुद्ध व सुलभ होत गेली याचाही आढावा घेतो.

या संदर्भातील पौराणिक कथा आपण सोडून देऊ आणि थेट आधुनिक इतिहासात येऊ. यशस्वी सिझेरिअनचा पहिला पुरावा इसवीसन १५०० मधील आहे. पण तो जाणून घेण्यापूर्वी त्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती पाहू. ही परिस्थिती बरीच विचित्र होती आणि तेव्हाचे कायदेकानूही तसेच होते. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने बाळंतीण दीर्घकाळ अडून राही आणि मरणपंथाला लागे. बऱ्याचदा तिचा मृत्यूसुद्धा होई. तेव्हाच्या दंडकानुसार गर्भवतीच्या अशा अखेरच्या किंवा मृतावस्थेत कसेही करून तिचे पोट फाडले जाई आणि जिवंत मूल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाई. यात कधी यश तर कधी अपयश पदरी येई. मूल जगले तर ते समाजाला (लोकसंख्यावाढीसाठी) हवेच ही तेव्हाची प्राथमिकता होती. आईचाही जीव वाचला पाहिजे हा दृष्टिकोन नव्हता. जर का या झटापटीत स्त्री व मूल हे दोन्ही मृत झाले तर त्यांचे स्वतंत्रपणे दफन करायचे ही धार्मिक रीत होती. त्यासाठी का होईना ही पोट फाडण्याची क्रिया आवश्यक मानली जाई.

इसवीसन १५०० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेली अशा प्रकारची शल्यक्रिया हा या विषयातील पहिला लिखित पुरावा मानला जातो (यावरही एकमत नाही). ही घटना घडली होती जेकब नुफर या डुक्करपालक माणसाच्या घरी. या गृहस्थाच्या व्यवसायाचा एक भाग डुक्कर माद्यांची बीजांडे व गर्भाशय काढून टाकणे (sow gelder) हा होता. त्यामुळे मादीच्या प्रजनन इंद्रियांबद्दल त्याला प्राथमिक ज्ञान होते. तर एकदा या जेकबची बायको गरोदरपण संपून बाळंतपणाच्या अवस्थेत येऊन ठेपली. बिचारी कळांवर कळा देत होती पण प्रत्यक्षात प्रसूती काही होत नव्हती. तेरा सुईणींच्या मदतीने काही दिवस यावर शर्थीचे प्रयत्न चालू होते ! पण पदरी अपयशच. अखेर तिची वेदनामय अवस्था न पाहवून जेकबने स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून तिचे पोट फाडण्याची परवानगी मिळवली. अडलेल्या बाळंतिणीस मोकळी करण्यासाठी आता तो स्वतः हे धाडसी पाउल घरीच उचलणार होता. मग त्याने बायकोला सरळ घरातील ओट्यावर ठेवले आणि त्याच्या जवळील आयुधे वापरून शल्यक्रिया केली. त्याच्या हाताला यश आले आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. याच माउलीने पुढील आयुष्यात पाच अपत्यांना नैसर्गिकपणे जन्म दिला. ते सिझेरिअन बाळ देखील तब्बल ७७ वर्षे जगले ! जेकबच्या या घटनेत रुग्णास ‘बेहोष’ केले होते की नाही याचा मात्र उल्लेख केलेला नाही.

CS history.jpg

आता आपण सिझेरिअन या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे जाऊ. सर्वप्रथम ज्यूलियस सीझरबद्दल. काही शब्दकोशांसह अन्य संदर्भांनी असे म्हटले आहे, की हा सम्राट जगात सर्वप्रथम या प्रकारे मातेचे पोट फाडले जाऊन जन्मला म्हणून त्याच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे. परंतु हे ऐतिहासिक परिस्थितीशी विसंगत असल्याने पुढे अमान्य केले गेले. वर उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन समाजात ही शल्यक्रिया, जेव्हा गर्भवती मृत्युपंथाला लागली असेल तेव्हाच केली जाई आणि त्यात बहुतांशवेळा तिचा मृत्यू होई. वास्तवात सिझरची आई Aurelia त्याच्या जन्मानंतर दीर्घकाळ जिवंत होती.

मग सिझेरिअन शब्द आला तरी कुठून ?
तर त्याचे उत्तर लॅटिन भाषेत मिळते. Caedare या शब्दाचा अर्थच कापणे/ छेद घेणे हा आहे. याप्रकारे जी मुले मृत मातेचे गर्भाशय फाडून बाहेर काढली जात त्यांना caesones असे नाव पडले. ज्यूलियसचा संबंध यानंतरच्या काळात येतो. तो सम्राट असताना त्याने या संदर्भात असा फतवा काढला, की बाळंत होताना ज्या स्त्रिया मृतवत होतील त्यांची पोटे फाडून आतले मूल बाहेर काढावे. म्हणून ही शस्त्रक्रिया ठरली ‘सिझेरिअन’ (कायदा).
एक पर्यायी आख्यायिका अशीही आहे:
सम्राट ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या बऱ्याच पूर्वी ज्युलिअस सीझर याच नावाचा एक माणूस त्याच्या वंशात जन्मला होता. तो ‘अशा’ पद्धतीने जन्मल्याने त्याच्या आडनावापुढे सीझर हे बिरूद लागले. पुढे त्याच्या वंशातील सर्वांनी ते कायम ठेवले.

सध्या सिझेरिअन या वलयांकित शब्दाचा सामान्य व्यवहारात ‘सीझर’ असा सुटसुटीत उल्लेख केला जातो. तर भारतातील निमशहरी भागांत त्याचा ‘सिझरिंग’ असा मजेशीर अपभ्रंश रूढ झाला आहे.

जेकब या वराहपालकाने केलेली शस्त्रक्रिया आई व बाळ या दोघांसाठी यशस्वी होणे हा या संदर्भातील पथदर्शक टप्पा ठरला. दरम्यान मानवी शरीराचा चिकित्सक अभ्यास एकीकडे होत होता. इ.स. १५४३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शरीररचना ग्रंथात स्त्रीच्या गर्भाशय आणि संबंधित जननमार्गांचे व्यवस्थित वर्णन केले गेले. पुढे १६००मध्ये सिझेरिअन न करताही अडलेले बाळ मोकळे करण्याचा एक नवा प्रयोग चेंबरलेन यांनी केला. त्यात त्यांनी शास्त्रीय ‘फोर्सेप्स’ योनिमार्गात लावून तिथूनच प्रसूती करण्यात यश मिळवले. एव्हाना प्रसूतीशास्त्रातील महत्त्वाच्या अशा क्रियांचे शोध पुरुषांनीच लावले असल्यामुळे या क्षेत्रावर एक प्रकारे पुरुषी वर्चस्व निर्माण झाले. हा प्रांत आता निव्वळ सुईणींचा राहिला नाही. आतापर्यंत केलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियाना ऑपरेशन असे म्हटले जाई. १५९८ मध्ये एका वैज्ञानिकाने प्रसूतीशास्त्राचे पुस्तक लिहिले आणि त्यात त्याने प्रथमच सिझेरिअन सेक्शन हा शब्दप्रयोग वापरला आणि पुढे तो कायमचा रूढ झाला.

पुढे अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध या दीर्घ कालखंडात मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सिझेरिअन शल्यक्रिया पुरुषच करीत होते. तेव्हा स्त्रियांना रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण मिळत नसे. परंतु १८१५ ते ते २१ या दरम्यान कधीतरी एका ब्रिटिश स्त्रीने ही शल्यक्रिया केली आणि ती इंग्लंडमधील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया मानली जाते. या शल्यक्रियांदरम्यान संबंधित स्त्रीला बेहोष कसे करीत याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत. १८७९ मध्ये युगांडात केलेल्या एका सिझरच्या वेळी त्या स्त्रीला केळांपासून केलेली वाईन ढोसायला दिली होती. या शल्यक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी करण्यासाठी cautery या तंत्राचा वापर केला गेला. कापलेल्या गर्भाशयाला न शिवता तसेच ठेवले गेले. पोटावरील छेद लोखंडी सुया वापरून शिवला गेला आणि शेवटी मलमपट्टी म्हणून जडीबुटीची पेस्ट वापरली गेली. या घटनेचा कित्ता गिरवत पुढच्या अशा क्रिया अधिक सफाईने होऊ लागल्या. स्त्रीला बेहोष करण्यासाठी विविध वनस्पतींचे अर्क वापरले जाऊ लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप-अमेरिकेत खास स्त्रियांच्या समस्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभी राहिली. १८४६ मध्ये रुग्णाला संपूर्ण भूल देण्यासाठी ‘इथर’चा वापर केला गेला. ही एक एक क्रांतिकारी घटना होती. लवकरच त्याचा वापर शल्यक्रियामध्ये वाढू लागला. पण गमतीची गोष्ट म्हणजे सिझेरियनसाठी मात्र स्त्रिया त्याचा स्वीकार करेनात ! यासाठी एक अंधश्रद्धा कारणीभूत होती. इव्हच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून स्त्रीने अपत्यास जन्म देताना असह्य वेदना सोसल्याच पाहिजेत ही समजूत रूढ होती. याचे निराकरण करणे आवश्यक होते. अखेरीस खुद्द व्हिक्टोरिया राणीने १८५३ व ५७ मध्ये आपल्या दोन अपत्यांना जन्म देताना भूल म्हणून क्लोरोफॉर्मचा स्वीकार केला. त्याचे अपेक्षित पडसाद समाजात उमटले आणि मग भूलशास्त्राचा सिझेरिअनसाठी नियमित वापर सुरू झाला.

एव्हाना शस्त्रक्रिया सुधारली होती आणि भूलीचा वापरही सुरू झाला होता पण तरीही अशा अनेक बायका शल्यक्रियेनंतर जंतुसंसर्गाने मरत. पॅरीस मध्ये १७८७ – १८७६ या कालखंडात सिझेरिअन झालेली एकही स्त्री जगली नव्हती ! या क्रियांमध्ये तेव्हा मूल काढल्यानंतर प्रत्यक्ष गर्भाशय काही शिवले जात नव्हते. गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावून पुढे तो छेद आपोआप बुजेल अशी त्यामागे (गैर)समजूत होती. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कित्येक स्त्रिया रक्तस्त्रावाने मरण पावत.

आता यावर तोडगा म्हणून एका डॉक्टरने सिझेरिअन झाल्यानंतर गर्भाशय पण काढून टाकावे हा मार्ग अवलंबला होता. परंतु हा काही या परिस्थितीवर तोडगा नव्हता. १८८२ मध्ये M. Saumlnger यांनी सिझेरिअन नंतर गर्भाशय शिवलेच पाहिजे हा आग्रह धरला. सुरुवातीस तसे करताना टाके घालण्यासाठी त्यांनी चांदीच्या पातळ तारा वापरल्या. या शल्यक्रियेच्या इतिहासातील हा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला. एव्हाना या शल्यक्रिया यशस्वी होत असल्या तरी त्या नंतरचा जंतुसंसर्ग ही मोठी समस्या होती. पुढे 1940 मध्ये त्या उपचारांसाठी आधुनिक प्रतिजैविके उपलब्ध झाली आणि हा प्रश्न सोडवला गेला. दरम्यान भूलशास्त्रातील संशोधनानेही वेग घेतला होता. आतापर्यंत या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण शरीराला भूल दिली जाई, जी अनावश्यक होती. भूलशास्त्रातील एका विशिष्ट तंत्रानुसार शरीराचा फक्त कमरेखालील भाग बधीर केला जाऊ शकतो. आता या नव्या तंत्राचा सर्रास वापर होऊ लागला. त्यामुळे शल्यक्रियेदरम्यान रुग्ण जागी राहू शकते. तसेच बाळ बाहेर काढल्यानंतर तिचा त्याच्याशी संपर्कही लवकर प्रस्थापित करता येतो. आता गर्भाशय शिवण्याची प्रक्रिया आधुनिक शास्त्रशुद्ध धागे वापरून केली जाते.

असा आहे हा या क्रांतिकारी शल्यक्रियेचा इतिहास. सहाशे वर्षांपूर्वी जेव्हा सिझेरिअनचा उगम झाला तेव्हा ती शस्त्रक्रिया बरीच रांगडी होती. त्या अर्धवट प्रयत्नातून बहुतांश वेळा माता व बालक दोघेही मृत्युमुखी पडत. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नांनंतर या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि आज ती एक सुलभ शल्यक्रिया झालेली आहे. तिच्या सुयोग्य वापरामुळे बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आणि मजेत असे आनंदी चित्र आपल्यापुढे आहे.

लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. चालू काळातील सिझेरिअन, त्याची वैद्यकीय चिकित्सा व संदर्भदुवे, विदा आणि रुक्ष आकडेवारी, आर्थिक पैलू इत्यादी मुद्दे जाणीवपूर्वक टाळत आहे. प्रसूती शाखेशी माझाही फारसा संपर्क नाही. त्या अनुषंगाने चर्चा जाऊ न देता इतिहासाचे निव्वळ स्मरणरंजन म्हणून या धाग्याकडे पाहावे ही विनंती. म्हणूनच हा लेख ‘आरोग्यम धनसंपदा’मध्ये घेतलेला नाही.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
................
चित्र जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामु,
धन्यवद.

मुलगा २६ आठवड्यात जन्मला
. >>> मग तर खास अभिनंदन - तुमचे व डॉ चे ही !

वर लेखकाने स्पष्ट केल्याप्रमाणे सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. कृपया इतर विषयावरच्या प्रतिक्रिया टाळा.

माझ्या आईचे वडील डॉकटर होते . ते प्रसूतीतज्ञ् नव्हते . साधे डॉकटर होते पण गुहागर सारख्या ठिकाणी ते त्याकाळी एकमेव डॉक्टर होते . अशा परिस्थितीत बायकांची बाळंतपण करण्यासाठी त्यांनाच बोलावलं जाई . आई सांगायची तिच्या लहानपणी रात्री अपरात्री कधीही बोलावंण यायचं म्हणजे घरचा पुरुषच डॉक्टरांना घेऊन जायला यायचा . त्या काळात काढ्या ( साप - विंचू पासून संरक्षण ) आणि कंदिलाच्या उजेडात बरीच पायपीट करून ते डोंगर वगैरे पार करून सुद्धा जात असत आणि बाळंतपण करून मगच सकाळी घरी येत. रात्री अपरात्री बरेचदा जावं लागायचं . ते प्रसूती तज्ज्ञ नव्हते . साधे डॉकटर होते पण त्या वेळी सुद्धा त्यांनी गावातली सगळी बाळंतपण सुखरूप केली . मुलं अडलं तर त्यांचा हात पातळ आणि मऊ होता त्यामुळे योनीमार्गात हात घालून मुलाच डोकं व्यवस्थित फिरवून घेत .आणि योनिमार्गाशी फिक्स करत असत . सगळ्या नॉर्मल डिलिव्हरी असायच्या . आणि खेड्यातल्या बायका शेवटपर्यंत दळण - कांडपाची आणि घरातली सगळॆ काम करत असल्याने पटकन मोकळ्या पण होत असतील. ते नेहमी म्हणायचे माझा हात खूप लकी आहे . सगळी बाळंतपण सुखरूप आणि एकमेव डॉकटर या कारणामुळे गावात खूपच मान होता . आम्ही मे महिन्यात आजोळी जायचो तेव्हा सकाळी नऊ वाजल्यापासून पेशंट ची लाईन लागायची . घराच्या ओटीतच त्यांचा दवाखाना होता .

सुजा
तुमच्या आजोबांना वंदन !
लहान गावांत त्याकाळी अशा डॉ नी केलेले काम केवळ थोर .

एक महिला, दोन गर्भाशयं अन् दोन गर्भ; अलाबामातील दुर्मीळ गर्भधारणेची चर्चा का होतेय?
https://www.loksatta.com/explained/alabama-women-having-two-uteruses-and...

बातमी अनेक देशी विदेशी माध्यमांत आलेली आहे.

या निमित्ताने एका स्त्रीतील दोन गर्भाशयांबद्दल शास्त्रीय माहिती :
1. दोन गर्भाशये असण्याचे प्रमाण अंदाजे ३००० स्त्रियांमध्ये १ असे आहे.
2. दोन्ही गर्भाशयांमध्ये एका वेळेस गरोदर होण्याचे प्रमाण मात्र खूप कमी आहे (काही लाखांमध्ये एक).

3. सन 2010 पर्यंत जगात अशा 100 गरोदर घटना नोंदल्या गेल्या आहेत.
4. दोन्ही गर्भाशयातील बाळांची प्रसूती भिन्न वेळेला होऊ शकते; काही दिवस किंवा काही आठवड्यांचे देखील अंतर पडते.

5. अशा सुमारे 82 टक्के घटनांमध्ये सिझेरियन करावे लागलेले आहे.

{दोन्ही गर्भाशयातील बाळांची प्रसूती भिन्न वेळेला होऊ शकते; काही दिवस किंवा काही आठवड्यांचे देखील अंतर पडते.}
चित्रपटासाठी कथाबीज. Lol
---+--

हे अवांतर आहे.मी सध्या मास्तरा़ंची सावली हे कृष्णाबाई सुर्वे यांचं आत्मचरित्र वाचतो आहे. त्यांनी लिहिलंय की त्यांना गर्भ राहिल्यावरही पाळी येत असे. आणि हे चारही मुलांच्या वेळी.

..... की त्यांना गर्भ राहिल्यावरही पाळी येत असे. आणि हे चारही मुलांच्या वेळी....
>>> त्यांचे कथन म्हणून रोचक आहे
पण ..
माझ्या आतापर्यंतच्या वाचनानुसार त्याला पाळी म्हणत नाहीत; तो निव्वळ योनीद्वारा होणारा "रक्तस्त्राव" असतो (आणि त्याची विविध कारणे आहेत
तरीपण कुठे काही वेगळा अपवादात्मक (?) संदर्भ मिळतोय का ते शोधतो.

' मासिक पाळी " म्हणण्यासाठी ovulation होणे आवश्यक आहे हा त्यातला महत्त्वाचा शास्त्रीय मुद्दा.

रशियाच्या रोमानाव्ह घराण्या चा इतिहास वाचत आहे. अगदी पाळी सुरू झालेल्या वयात १५ १६ १७ मुलींची ठरवून किंवा प्रेमात पडून लग्ने होत.
झारला पसंती साठी मुली ऑफिशिअली दाखवल्या जात. काविआर - शांपेन प्रॉग्राम घडवून आणले जात. त्यात मुलीला पुश करणारे तिचे महत्वा कांक्षी नातेवाईक. झार राजे पण मॅचुअर झाले की धडाधड प्रेमात पडत. एक तरुणी, एक दोन मिस्ट्रेसी असे नॉर्मल , बाकी राजवाड्यातील भानगडी मजबूत. इथे लिहायचे कारण ह्या सर्व स्त्रिया अधून मधून प्रेगनंसी, मिसकॅरेज, चाइल्ड बर्थ, व त्यात आजारपणे, मृत्यु ह्याला सामोर्‍या जात. तेव्हा मेडिसिन शास्त्र फार प्रगत नव्हते फारतर फोर्सेप्स डिलिव्हरी. तेव्हा सिझेरिअन ची सोय असती तर किती बरे झाले असते. असे वाटले.
राजे फारच अ‍ॅक्षन ओरिएंटेड असल्याने ११ १२ गर्भार पणे कॉमन. त्यातला एखादा राज्याला वारस दिला की जनम सफल हो जाए. पति युद्धावर
गेल्यास रोमांटिक पत्रे लिहिणे. राण्या सुद्धा मजबूत अफेअर करत त्यामुळे वारस नक्की कोणता आहे हा प्रश्न असे. पण राजा राण्यांना कोण विचारणार.
उगी च माहिती म्हणून लिहिले स्त्रियांचे जीवन ह्याच सायकल मध्ये कुठेतरी असे. वेळ मिळाला की नटणे मुरडणे, राजाचे लक्ष वेधुन घेणे.
आपल्या मुलाला पुढे करणे .. डिफरंट लाइफ. राजे राण्या एकमेकांवर प्रेमही फार प्याशनेटली करत . कौतूक आहे. वाचूनच अवघड वाट्ते.

राजे म्हणजे सत्तेचे सर्वात वरचे टोक.
त्यांची मर्जी महत्वाची.
त्यांच्या मनाविरुद्ध एक पण गोष्ट एका पण व्यक्ती नी केली अगदी राणी,आई, मुलगा असला तरी आणि राजाला आवडली नाही तर तर त्या व्यक्ती ला मृत्यू दंड फिक्स.
कोणी ही त्या व्यक्ती ला मृत्यू दांडपासून वाचवू शकत नाही.
त्या मुळे राजाशी गद्दारी पट्टराणी पण करण्याची हिम्मत करू शकत नसे.
मत,इच्छा ह्याला काही किंमत राजासमोर नसायची

एक महिला, दोन गर्भाशयं अन् दोन गर्भ; अलाबामातील दुर्मीळ गर्भधारणेची....
(Submitted by कुमार१ on 17 November, 2023 - 21:01)
..
अखेर या बाई प्रसूत झाल्या असून त्यांना दोन मुली झाल्या आहेत !
दोन मुलींच्या जन्मातील अंतर दहा तास आहे. पण त्या दरम्यान दिवस बदलल्याने दोघींचा वाढदिवस वेगळ्या दिवशी Happy

https://www.ndtv.com/world-news/us-woman-kelsey-hatcher-born-with-rare-d...

माझा स्वतः चा जन्म सिझरियन प्रसुतीने झाला आहे. त्यामुळे मी तर या शोधाची आजन्म ऋणी आहे. या शोधविषयी आणि त्यामागे कारणीभूत असलेल्या अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती व शक्तिंविषयी खूप खूप कृतज्ञता __/\__

दोन मुलींच्या जन्मातील अंतर दहा तास आहे. ..... त्या बाईच्या सहन शक्तीचे नवल वाटते.सहन करण्यापलीकडे दुसरा पर्यायही नसतो.

Pages