सिझेरिअन प्रसूती : जन्मकथा व दंतकथा

Submitted by कुमार१ on 13 April, 2021 - 04:12

गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष कापून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते. याचा लाभ अनेक स्त्रिया घेत असून त्यामुळे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतात.

या महत्त्वाच्या आणि मूलभूत शल्यक्रियेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. त्याला ‘सिझेरिअन’ हे नाव कसे पडले हा तर कुतूहलाचा आणि काथ्याकुटाचा विषय आहे. अनेक आख्यायिका या नावाभोवती गुंफलेल्या आहेत. रोमन सम्राट ज्युलियस सिझरचा आणि या शल्यक्रियेच्या नावाचा नक्की संबंध काय आहे, यावर वाद झडत राहतात. खुद्द इतिहासकारांमध्येही त्याबद्दल प्रवाद आहेत. त्या वादात न शिरता संबंधित उगमकथांचा निखळ आनंद वाचकांनी घ्यावा हा या लेखाचा हेतू आहे. त्याचबरोबर सुमारे सहाशे वर्षांच्या आधुनिक इतिहासात वैद्यक प्रगतीनुसार ही शल्यक्रिया अगदी रांगडेपणापासून पुढे कशी शास्त्रशुद्ध व सुलभ होत गेली याचाही आढावा घेतो.

या संदर्भातील पौराणिक कथा आपण सोडून देऊ आणि थेट आधुनिक इतिहासात येऊ. यशस्वी सिझेरिअनचा पहिला पुरावा इसवीसन १५०० मधील आहे. पण तो जाणून घेण्यापूर्वी त्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती पाहू. ही परिस्थिती बरीच विचित्र होती आणि तेव्हाचे कायदेकानूही तसेच होते. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने बाळंतीण दीर्घकाळ अडून राही आणि मरणपंथाला लागे. बऱ्याचदा तिचा मृत्यूसुद्धा होई. तेव्हाच्या दंडकानुसार गर्भवतीच्या अशा अखेरच्या किंवा मृतावस्थेत कसेही करून तिचे पोट फाडले जाई आणि जिवंत मूल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाई. यात कधी यश तर कधी अपयश पदरी येई. मूल जगले तर ते समाजाला (लोकसंख्यावाढीसाठी) हवेच ही तेव्हाची प्राथमिकता होती. आईचाही जीव वाचला पाहिजे हा दृष्टिकोन नव्हता. जर का या झटापटीत स्त्री व मूल हे दोन्ही मृत झाले तर त्यांचे स्वतंत्रपणे दफन करायचे ही धार्मिक रीत होती. त्यासाठी का होईना ही पोट फाडण्याची क्रिया आवश्यक मानली जाई.

इसवीसन १५०० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेली अशा प्रकारची शल्यक्रिया हा या विषयातील पहिला लिखित पुरावा मानला जातो (यावरही एकमत नाही). ही घटना घडली होती जेकब नुफर या डुक्करपालक माणसाच्या घरी. या गृहस्थाच्या व्यवसायाचा एक भाग डुक्कर माद्यांची बीजांडे व गर्भाशय काढून टाकणे (sow gelder) हा होता. त्यामुळे मादीच्या प्रजनन इंद्रियांबद्दल त्याला प्राथमिक ज्ञान होते. तर एकदा या जेकबची बायको गरोदरपण संपून बाळंतपणाच्या अवस्थेत येऊन ठेपली. बिचारी कळांवर कळा देत होती पण प्रत्यक्षात प्रसूती काही होत नव्हती. तेरा सुईणींच्या मदतीने काही दिवस यावर शर्थीचे प्रयत्न चालू होते ! पण पदरी अपयशच. अखेर तिची वेदनामय अवस्था न पाहवून जेकबने स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून तिचे पोट फाडण्याची परवानगी मिळवली. अडलेल्या बाळंतिणीस मोकळी करण्यासाठी आता तो स्वतः हे धाडसी पाउल घरीच उचलणार होता. मग त्याने बायकोला सरळ घरातील ओट्यावर ठेवले आणि त्याच्या जवळील आयुधे वापरून शल्यक्रिया केली. त्याच्या हाताला यश आले आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. याच माउलीने पुढील आयुष्यात पाच अपत्यांना नैसर्गिकपणे जन्म दिला. ते सिझेरिअन बाळ देखील तब्बल ७७ वर्षे जगले ! जेकबच्या या घटनेत रुग्णास ‘बेहोष’ केले होते की नाही याचा मात्र उल्लेख केलेला नाही.

CS history.jpg

आता आपण सिझेरिअन या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे जाऊ. सर्वप्रथम ज्यूलियस सीझरबद्दल. काही शब्दकोशांसह अन्य संदर्भांनी असे म्हटले आहे, की हा सम्राट जगात सर्वप्रथम या प्रकारे मातेचे पोट फाडले जाऊन जन्मला म्हणून त्याच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे. परंतु हे ऐतिहासिक परिस्थितीशी विसंगत असल्याने पुढे अमान्य केले गेले. वर उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन समाजात ही शल्यक्रिया, जेव्हा गर्भवती मृत्युपंथाला लागली असेल तेव्हाच केली जाई आणि त्यात बहुतांशवेळा तिचा मृत्यू होई. वास्तवात सिझरची आई Aurelia त्याच्या जन्मानंतर दीर्घकाळ जिवंत होती.

मग सिझेरिअन शब्द आला तरी कुठून ?
तर त्याचे उत्तर लॅटिन भाषेत मिळते. Caedare या शब्दाचा अर्थच कापणे/ छेद घेणे हा आहे. याप्रकारे जी मुले मृत मातेचे गर्भाशय फाडून बाहेर काढली जात त्यांना caesones असे नाव पडले. ज्यूलियसचा संबंध यानंतरच्या काळात येतो. तो सम्राट असताना त्याने या संदर्भात असा फतवा काढला, की बाळंत होताना ज्या स्त्रिया मृतवत होतील त्यांची पोटे फाडून आतले मूल बाहेर काढावे. म्हणून ही शस्त्रक्रिया ठरली ‘सिझेरिअन’ (कायदा).
एक पर्यायी आख्यायिका अशीही आहे:
सम्राट ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या बऱ्याच पूर्वी ज्युलिअस सीझर याच नावाचा एक माणूस त्याच्या वंशात जन्मला होता. तो ‘अशा’ पद्धतीने जन्मल्याने त्याच्या आडनावापुढे सीझर हे बिरूद लागले. पुढे त्याच्या वंशातील सर्वांनी ते कायम ठेवले.

सध्या सिझेरिअन या वलयांकित शब्दाचा सामान्य व्यवहारात ‘सीझर’ असा सुटसुटीत उल्लेख केला जातो. तर भारतातील निमशहरी भागांत त्याचा ‘सिझरिंग’ असा मजेशीर अपभ्रंश रूढ झाला आहे.

जेकब या वराहपालकाने केलेली शस्त्रक्रिया आई व बाळ या दोघांसाठी यशस्वी होणे हा या संदर्भातील पथदर्शक टप्पा ठरला. दरम्यान मानवी शरीराचा चिकित्सक अभ्यास एकीकडे होत होता. इ.स. १५४३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शरीररचना ग्रंथात स्त्रीच्या गर्भाशय आणि संबंधित जननमार्गांचे व्यवस्थित वर्णन केले गेले. पुढे १६००मध्ये सिझेरिअन न करताही अडलेले बाळ मोकळे करण्याचा एक नवा प्रयोग चेंबरलेन यांनी केला. त्यात त्यांनी शास्त्रीय ‘फोर्सेप्स’ योनिमार्गात लावून तिथूनच प्रसूती करण्यात यश मिळवले. एव्हाना प्रसूतीशास्त्रातील महत्त्वाच्या अशा क्रियांचे शोध पुरुषांनीच लावले असल्यामुळे या क्षेत्रावर एक प्रकारे पुरुषी वर्चस्व निर्माण झाले. हा प्रांत आता निव्वळ सुईणींचा राहिला नाही. आतापर्यंत केलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियाना ऑपरेशन असे म्हटले जाई. १५९८ मध्ये एका वैज्ञानिकाने प्रसूतीशास्त्राचे पुस्तक लिहिले आणि त्यात त्याने प्रथमच सिझेरिअन सेक्शन हा शब्दप्रयोग वापरला आणि पुढे तो कायमचा रूढ झाला.

पुढे अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध या दीर्घ कालखंडात मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सिझेरिअन शल्यक्रिया पुरुषच करीत होते. तेव्हा स्त्रियांना रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण मिळत नसे. परंतु १८१५ ते ते २१ या दरम्यान कधीतरी एका ब्रिटिश स्त्रीने ही शल्यक्रिया केली आणि ती इंग्लंडमधील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया मानली जाते. या शल्यक्रियांदरम्यान संबंधित स्त्रीला बेहोष कसे करीत याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत. १८७९ मध्ये युगांडात केलेल्या एका सिझरच्या वेळी त्या स्त्रीला केळांपासून केलेली वाईन ढोसायला दिली होती. या शल्यक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी करण्यासाठी cautery या तंत्राचा वापर केला गेला. कापलेल्या गर्भाशयाला न शिवता तसेच ठेवले गेले. पोटावरील छेद लोखंडी सुया वापरून शिवला गेला आणि शेवटी मलमपट्टी म्हणून जडीबुटीची पेस्ट वापरली गेली. या घटनेचा कित्ता गिरवत पुढच्या अशा क्रिया अधिक सफाईने होऊ लागल्या. स्त्रीला बेहोष करण्यासाठी विविध वनस्पतींचे अर्क वापरले जाऊ लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप-अमेरिकेत खास स्त्रियांच्या समस्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभी राहिली. १८४६ मध्ये रुग्णाला संपूर्ण भूल देण्यासाठी ‘इथर’चा वापर केला गेला. ही एक एक क्रांतिकारी घटना होती. लवकरच त्याचा वापर शल्यक्रियामध्ये वाढू लागला. पण गमतीची गोष्ट म्हणजे सिझेरियनसाठी मात्र स्त्रिया त्याचा स्वीकार करेनात ! यासाठी एक अंधश्रद्धा कारणीभूत होती. इव्हच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून स्त्रीने अपत्यास जन्म देताना असह्य वेदना सोसल्याच पाहिजेत ही समजूत रूढ होती. याचे निराकरण करणे आवश्यक होते. अखेरीस खुद्द व्हिक्टोरिया राणीने १८५३ व ५७ मध्ये आपल्या दोन अपत्यांना जन्म देताना भूल म्हणून क्लोरोफॉर्मचा स्वीकार केला. त्याचे अपेक्षित पडसाद समाजात उमटले आणि मग भूलशास्त्राचा सिझेरिअनसाठी नियमित वापर सुरू झाला.

एव्हाना शस्त्रक्रिया सुधारली होती आणि भूलीचा वापरही सुरू झाला होता पण तरीही अशा अनेक बायका शल्यक्रियेनंतर जंतुसंसर्गाने मरत. पॅरीस मध्ये १७८७ – १८७६ या कालखंडात सिझेरिअन झालेली एकही स्त्री जगली नव्हती ! या क्रियांमध्ये तेव्हा मूल काढल्यानंतर प्रत्यक्ष गर्भाशय काही शिवले जात नव्हते. गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावून पुढे तो छेद आपोआप बुजेल अशी त्यामागे (गैर)समजूत होती. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कित्येक स्त्रिया रक्तस्त्रावाने मरण पावत.

आता यावर तोडगा म्हणून एका डॉक्टरने सिझेरिअन झाल्यानंतर गर्भाशय पण काढून टाकावे हा मार्ग अवलंबला होता. परंतु हा काही या परिस्थितीवर तोडगा नव्हता. १८८२ मध्ये M. Saumlnger यांनी सिझेरिअन नंतर गर्भाशय शिवलेच पाहिजे हा आग्रह धरला. सुरुवातीस तसे करताना टाके घालण्यासाठी त्यांनी चांदीच्या पातळ तारा वापरल्या. या शल्यक्रियेच्या इतिहासातील हा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला. एव्हाना या शल्यक्रिया यशस्वी होत असल्या तरी त्या नंतरचा जंतुसंसर्ग ही मोठी समस्या होती. पुढे 1940 मध्ये त्या उपचारांसाठी आधुनिक प्रतिजैविके उपलब्ध झाली आणि हा प्रश्न सोडवला गेला. दरम्यान भूलशास्त्रातील संशोधनानेही वेग घेतला होता. आतापर्यंत या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण शरीराला भूल दिली जाई, जी अनावश्यक होती. भूलशास्त्रातील एका विशिष्ट तंत्रानुसार शरीराचा फक्त कमरेखालील भाग बधीर केला जाऊ शकतो. आता या नव्या तंत्राचा सर्रास वापर होऊ लागला. त्यामुळे शल्यक्रियेदरम्यान रुग्ण जागी राहू शकते. तसेच बाळ बाहेर काढल्यानंतर तिचा त्याच्याशी संपर्कही लवकर प्रस्थापित करता येतो. आता गर्भाशय शिवण्याची प्रक्रिया आधुनिक शास्त्रशुद्ध धागे वापरून केली जाते.

असा आहे हा या क्रांतिकारी शल्यक्रियेचा इतिहास. सहाशे वर्षांपूर्वी जेव्हा सिझेरिअनचा उगम झाला तेव्हा ती शस्त्रक्रिया बरीच रांगडी होती. त्या अर्धवट प्रयत्नातून बहुतांश वेळा माता व बालक दोघेही मृत्युमुखी पडत. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नांनंतर या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि आज ती एक सुलभ शल्यक्रिया झालेली आहे. तिच्या सुयोग्य वापरामुळे बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आणि मजेत असे आनंदी चित्र आपल्यापुढे आहे.

लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. चालू काळातील सिझेरिअन, त्याची वैद्यकीय चिकित्सा व संदर्भदुवे, विदा आणि रुक्ष आकडेवारी, आर्थिक पैलू इत्यादी मुद्दे जाणीवपूर्वक टाळत आहे. प्रसूती शाखेशी माझाही फारसा संपर्क नाही. त्या अनुषंगाने चर्चा जाऊ न देता इतिहासाचे निव्वळ स्मरणरंजन म्हणून या धाग्याकडे पाहावे ही विनंती. म्हणूनच हा लेख ‘आरोग्यम धनसंपदा’मध्ये घेतलेला नाही.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
................
चित्र जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहिती.
(फक्त हे एक वाक्य कदाचित बदलावं का? "स्त्रीला केळांपासून केलेली वाईन ढोसण्यात आली होती." स्त्रियांनी वाइन ढोसली होती किंवा स्त्रियांना वाईन ढोसायला देण्यात आली होती असे पाहिजे वाटतं.)

छान माहिती Happy
आधुनिक प्रसूती शास्त्र, सर्जरी तज्ञ डॉक्टर , विशेषतः भूल देणारे डॉक्टर आणि सर्व संबंधित ec osystem ह्यांची मी शतशः ऋणी आहे Happy
त्यांच्या ह्या योगदानामुळे माझ्यासरख्या अनेक स्त्रिया अपत्यास सुखरूपपणे जन्म देत आहेत Happy

छान माहिती!
हा लेख वाचताना आपण २० व्या शतकात जन्मल्याबद्दल हायसे वाटले.

आधुनिक प्रसूती शास्त्र, सर्जरी तज्ञ डॉक्टर , विशेषतः भूल देणारे डॉक्टर आणि सर्व संबंधित ec osystem ह्यांची मी शतशः ऋणी आहे>>> अनुमोदन

खूप छान माहिती
माझी दोन्ही मुले सी-सेक्शन नेच झाली.

हा लेख वाचताना आपण २० व्या शतकात जन्मल्याबद्दल हायसे वाटले.>> अगदीच!
खरं तर नीट वाचवलंही गेलं नाही सुरुवातीचं वर्णन.

इंटरेस्टिंग माहिती. लेख आवडला.

सिझेरियन आता इतके कॉमन झाले आहे की इथे बऱ्याच जणींसाठी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय असु शकतो. माझं झालं आहे आणि आताच्या काळात झाल्यामुळे किंचितही त्रास न होता. लेख वाचल्यावर फारच लकी वाटतं आहे. मेडिकल सायन्सच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सगळ्या शास्त्रज्ञाच्या आम्ही ऋणी आहोत.

छान लेख..
आधुनिक प्रसूती शास्त्र, सर्जरी तज्ञ डॉक्टर , विशेषतः भूल देणारे डॉक्टर आणि सर्व संबंधित ec osystem ह्यांची मी शतशः ऋणी आहे >>पूर्ण अनुमोदन... माझीही दोन्ही मुले सी- सेक्शन नेच झाली. लेख वाचल्यावर वाटतय खरच आम्ही खूप लकी आहोत.

मस्त लेख सर!
https://www.pan3sixty.co.uk/virtual-tours/old-operating-theatre/museum-v...
https://oldoperatingtheatre.com/
हे लंडनमधील दि ओल्ड ऑपरेटींग थिएटर आणि त्याची व्हर्च्युअल टूर. Happy भाग्यवान म्हणजे कित्ती भाग्यवान ते जाणवेल.

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
व्यक्तिगत सिझरचे चांगले अनुभव वाचून आनंद वाटला.

सीमंतिनी,
खरोखर सुंदर प्रकाशचित्रे आहेत.
आवडली म्हणजे आवडलीच !!

वरील सर्व आई लोकांना पूर्ण अनुमोदन. .. आता 60 च्या वयोगटातील स्त्रीयांसाठी सुद्धा सीझर हा खूप त्रासदायक अनुभव होता. पण आता मात्र हा फारच सुरक्षीत मार्ग आहे
संशोधकांना आणि डाॅक्टरांना शतशः धन्यवाद _/\_

माझ्या जन्माच्या वेळेस सिझरीयन करणं गरजेच होत. नाहीतर वरील लिहिलंय तस परिस्थिती झाली असती. म्हणूनच मानवी जगाच्या सुखरूतेसाठी विज्ञानाला प्राधान्य देणं गरजेचं आहे.

नेहमी प्रमाणे चांगला लेख __/|\__

माझेही नुकतेच सिझर झाले आहे, त्याचा काहीही त्रास नाही पण दुर्दैवाने मला भूल चढत नव्हती म्हणून पाठीत सहा इंजेक्शने दिली, त्यामुळे पाठदुखी लागली आयुष्यभराची

माहितीपूर्ण लेख.
डॉकटर एक प्रश्न आहे. बाळाने पोटात शी केली आहे हे फक्त डोळ्याने डॉक्टरना समजू शकते का? माझ्या मुलीच्या वेळेस हे कारण देऊन सी सेक्शन केले होते. म्हणजे डिलिव्हरी साठी बायडीला ऍडमिट केले होते, लेबर इंजेक्शन पण दिले होते , मग अचानक डॉकने हे कारण दिले आणि लगेच सी सेक्शन केले.

वर VB यांच्या प्रतिसादात लिहिल्या प्रमाणे
अशा इंजेक्शन ने आयुष्य भराची पाठदुखी खरंच जडते का डॉक्टर..?

छान लेख. रोचक आहे माहिती. बिचाऱ्या पूर्वीच्या स्त्रिया, खूप कठीण आयुष्य होतं त्यांचं हे जाणवलं पुन्हा एकदा.
हा लेख वाचताना आपण २० व्या शतकात जन्मल्याबद्दल हायसे वाटले. >> अगदी अगदी.

लंपन , माझ्या मावसभावाच्या जन्माच्या वेळेस ditto असाच प्रॉब्लेम झालेला. पण डॉक्टरांनी सिझरीयन झाल्यानंतर बाळाने केलेली शी दाखवली होती.

आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या सर्वांचेच मी आभार मानतो. काही स्त्री सभासदांनी आपल्या वैयक्तिक सीझरबद्दलचे अनुभव लिहीले आहेत हे खूप चांगले झाले. एक पुरुष डॉक्टर म्हणून मी ही शल्यक्रिया फक्त लांबून पाहिलेली असते. आणि त्यात रुग्णाला होणारे प्रत्यक्ष त्रास वगैरेचा मला काहीही अनुभव नसतो. अशावेळेस आपण इथे मोकळेपणाने अंतरीचे जे काही लिहिता ते खूप महत्त्वाचे ठरते.

एक दोन जणांनी प्रसूतीशास्त्रातले काही वैद्यकीय मुद्दे उपस्थित केले आहेत.
लेखात म्हटल्याप्रमाणे माझा या शाखेचा तसा अभ्यास / प्रत्यक्ष अनुभव नाही. (म्हणून लेखात मी तशी सूचना केली होती की हा नेहमीच्या वैद्यक पठडीतील लेख नाही. Bw )

परंतु जरा वेळाने वाचून जे काही सांगण्यासारखे आहे तेवढे लिहीन.

Pages