सिझेरिअन प्रसूती : जन्मकथा व दंतकथा

Submitted by कुमार१ on 13 April, 2021 - 04:12

गर्भारपण, बाळंतपण आणि अपत्यजन्म हे मानवी पुनरुत्पादनातले महत्त्वाचे टप्पे. निसर्गक्रमानुसार गरोदरपणाचे विशिष्ट दिवस भरले की गर्भाशय आकुंचन पावू लागते. यालाच आपण ‘कळा’ म्हणतो. त्यांची गती वाढत वाढत अखेरीस योनिमार्गे प्रसूती होते. परंतु हे नैसर्गिक भाग्य सर्वांनाच लाभत नाही. काही ना काही कारणाने जेव्हा नैसर्गिक प्रसुतीत अडथळे येतात तेव्हा पर्यायी मार्ग वापरावे लागतात. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे सिझेरिअन सेक्शन. यात गर्भवतीचे पोट प्रत्यक्ष कापून व गर्भाशयात छेद घेऊन बाळास बाहेर काढले जाते. वैद्यकातील संशोधन व प्रगतीनुसार ही शल्यक्रिया आता सहज आणि झटपट केली जाते. याचा लाभ अनेक स्त्रिया घेत असून त्यामुळे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतात.

या महत्त्वाच्या आणि मूलभूत शल्यक्रियेचा इतिहास मोठा मनोरंजक आहे. त्याला ‘सिझेरिअन’ हे नाव कसे पडले हा तर कुतूहलाचा आणि काथ्याकुटाचा विषय आहे. अनेक आख्यायिका या नावाभोवती गुंफलेल्या आहेत. रोमन सम्राट ज्युलियस सिझरचा आणि या शल्यक्रियेच्या नावाचा नक्की संबंध काय आहे, यावर वाद झडत राहतात. खुद्द इतिहासकारांमध्येही त्याबद्दल प्रवाद आहेत. त्या वादात न शिरता संबंधित उगमकथांचा निखळ आनंद वाचकांनी घ्यावा हा या लेखाचा हेतू आहे. त्याचबरोबर सुमारे सहाशे वर्षांच्या आधुनिक इतिहासात वैद्यक प्रगतीनुसार ही शल्यक्रिया अगदी रांगडेपणापासून पुढे कशी शास्त्रशुद्ध व सुलभ होत गेली याचाही आढावा घेतो.

या संदर्भातील पौराणिक कथा आपण सोडून देऊ आणि थेट आधुनिक इतिहासात येऊ. यशस्वी सिझेरिअनचा पहिला पुरावा इसवीसन १५०० मधील आहे. पण तो जाणून घेण्यापूर्वी त्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती पाहू. ही परिस्थिती बरीच विचित्र होती आणि तेव्हाचे कायदेकानूही तसेच होते. नैसर्गिक प्रसूती न झाल्याने बाळंतीण दीर्घकाळ अडून राही आणि मरणपंथाला लागे. बऱ्याचदा तिचा मृत्यूसुद्धा होई. तेव्हाच्या दंडकानुसार गर्भवतीच्या अशा अखेरच्या किंवा मृतावस्थेत कसेही करून तिचे पोट फाडले जाई आणि जिवंत मूल मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाई. यात कधी यश तर कधी अपयश पदरी येई. मूल जगले तर ते समाजाला (लोकसंख्यावाढीसाठी) हवेच ही तेव्हाची प्राथमिकता होती. आईचाही जीव वाचला पाहिजे हा दृष्टिकोन नव्हता. जर का या झटापटीत स्त्री व मूल हे दोन्ही मृत झाले तर त्यांचे स्वतंत्रपणे दफन करायचे ही धार्मिक रीत होती. त्यासाठी का होईना ही पोट फाडण्याची क्रिया आवश्यक मानली जाई.

इसवीसन १५०० मध्ये स्वित्झर्लंडमध्ये झालेली अशा प्रकारची शल्यक्रिया हा या विषयातील पहिला लिखित पुरावा मानला जातो (यावरही एकमत नाही). ही घटना घडली होती जेकब नुफर या डुक्करपालक माणसाच्या घरी. या गृहस्थाच्या व्यवसायाचा एक भाग डुक्कर माद्यांची बीजांडे व गर्भाशय काढून टाकणे (sow gelder) हा होता. त्यामुळे मादीच्या प्रजनन इंद्रियांबद्दल त्याला प्राथमिक ज्ञान होते. तर एकदा या जेकबची बायको गरोदरपण संपून बाळंतपणाच्या अवस्थेत येऊन ठेपली. बिचारी कळांवर कळा देत होती पण प्रत्यक्षात प्रसूती काही होत नव्हती. तेरा सुईणींच्या मदतीने काही दिवस यावर शर्थीचे प्रयत्न चालू होते ! पण पदरी अपयशच. अखेर तिची वेदनामय अवस्था न पाहवून जेकबने स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली आणि त्यांच्याकडून तिचे पोट फाडण्याची परवानगी मिळवली. अडलेल्या बाळंतिणीस मोकळी करण्यासाठी आता तो स्वतः हे धाडसी पाउल घरीच उचलणार होता. मग त्याने बायकोला सरळ घरातील ओट्यावर ठेवले आणि त्याच्या जवळील आयुधे वापरून शल्यक्रिया केली. त्याच्या हाताला यश आले आणि बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले. याच माउलीने पुढील आयुष्यात पाच अपत्यांना नैसर्गिकपणे जन्म दिला. ते सिझेरिअन बाळ देखील तब्बल ७७ वर्षे जगले ! जेकबच्या या घटनेत रुग्णास ‘बेहोष’ केले होते की नाही याचा मात्र उल्लेख केलेला नाही.

CS history.jpg

आता आपण सिझेरिअन या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे जाऊ. सर्वप्रथम ज्यूलियस सीझरबद्दल. काही शब्दकोशांसह अन्य संदर्भांनी असे म्हटले आहे, की हा सम्राट जगात सर्वप्रथम या प्रकारे मातेचे पोट फाडले जाऊन जन्मला म्हणून त्याच्या स्मरणार्थ हे नाव दिले आहे. परंतु हे ऐतिहासिक परिस्थितीशी विसंगत असल्याने पुढे अमान्य केले गेले. वर उल्लेख केल्याप्रमाणे तत्कालीन समाजात ही शल्यक्रिया, जेव्हा गर्भवती मृत्युपंथाला लागली असेल तेव्हाच केली जाई आणि त्यात बहुतांशवेळा तिचा मृत्यू होई. वास्तवात सिझरची आई Aurelia त्याच्या जन्मानंतर दीर्घकाळ जिवंत होती.

मग सिझेरिअन शब्द आला तरी कुठून ?
तर त्याचे उत्तर लॅटिन भाषेत मिळते. Caedare या शब्दाचा अर्थच कापणे/ छेद घेणे हा आहे. याप्रकारे जी मुले मृत मातेचे गर्भाशय फाडून बाहेर काढली जात त्यांना caesones असे नाव पडले. ज्यूलियसचा संबंध यानंतरच्या काळात येतो. तो सम्राट असताना त्याने या संदर्भात असा फतवा काढला, की बाळंत होताना ज्या स्त्रिया मृतवत होतील त्यांची पोटे फाडून आतले मूल बाहेर काढावे. म्हणून ही शस्त्रक्रिया ठरली ‘सिझेरिअन’ (कायदा).
एक पर्यायी आख्यायिका अशीही आहे:
सम्राट ज्युलिअस सीझरच्या जन्माच्या बऱ्याच पूर्वी ज्युलिअस सीझर याच नावाचा एक माणूस त्याच्या वंशात जन्मला होता. तो ‘अशा’ पद्धतीने जन्मल्याने त्याच्या आडनावापुढे सीझर हे बिरूद लागले. पुढे त्याच्या वंशातील सर्वांनी ते कायम ठेवले.

सध्या सिझेरिअन या वलयांकित शब्दाचा सामान्य व्यवहारात ‘सीझर’ असा सुटसुटीत उल्लेख केला जातो. तर भारतातील निमशहरी भागांत त्याचा ‘सिझरिंग’ असा मजेशीर अपभ्रंश रूढ झाला आहे.

जेकब या वराहपालकाने केलेली शस्त्रक्रिया आई व बाळ या दोघांसाठी यशस्वी होणे हा या संदर्भातील पथदर्शक टप्पा ठरला. दरम्यान मानवी शरीराचा चिकित्सक अभ्यास एकीकडे होत होता. इ.स. १५४३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शरीररचना ग्रंथात स्त्रीच्या गर्भाशय आणि संबंधित जननमार्गांचे व्यवस्थित वर्णन केले गेले. पुढे १६००मध्ये सिझेरिअन न करताही अडलेले बाळ मोकळे करण्याचा एक नवा प्रयोग चेंबरलेन यांनी केला. त्यात त्यांनी शास्त्रीय ‘फोर्सेप्स’ योनिमार्गात लावून तिथूनच प्रसूती करण्यात यश मिळवले. एव्हाना प्रसूतीशास्त्रातील महत्त्वाच्या अशा क्रियांचे शोध पुरुषांनीच लावले असल्यामुळे या क्षेत्रावर एक प्रकारे पुरुषी वर्चस्व निर्माण झाले. हा प्रांत आता निव्वळ सुईणींचा राहिला नाही. आतापर्यंत केलेल्या सिझेरियन शस्त्रक्रियाना ऑपरेशन असे म्हटले जाई. १५९८ मध्ये एका वैज्ञानिकाने प्रसूतीशास्त्राचे पुस्तक लिहिले आणि त्यात त्याने प्रथमच सिझेरिअन सेक्शन हा शब्दप्रयोग वापरला आणि पुढे तो कायमचा रूढ झाला.

पुढे अठरावे शतक ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध या दीर्घ कालखंडात मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास झाला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सिझेरिअन शल्यक्रिया पुरुषच करीत होते. तेव्हा स्त्रियांना रीतसर वैद्यकीय प्रशिक्षण मिळत नसे. परंतु १८१५ ते ते २१ या दरम्यान कधीतरी एका ब्रिटिश स्त्रीने ही शल्यक्रिया केली आणि ती इंग्लंडमधील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया मानली जाते. या शल्यक्रियांदरम्यान संबंधित स्त्रीला बेहोष कसे करीत याचे फारसे उल्लेख सापडत नाहीत. १८७९ मध्ये युगांडात केलेल्या एका सिझरच्या वेळी त्या स्त्रीला केळांपासून केलेली वाईन ढोसायला दिली होती. या शल्यक्रियेदरम्यान रक्तस्त्राव कमी करण्यासाठी cautery या तंत्राचा वापर केला गेला. कापलेल्या गर्भाशयाला न शिवता तसेच ठेवले गेले. पोटावरील छेद लोखंडी सुया वापरून शिवला गेला आणि शेवटी मलमपट्टी म्हणून जडीबुटीची पेस्ट वापरली गेली. या घटनेचा कित्ता गिरवत पुढच्या अशा क्रिया अधिक सफाईने होऊ लागल्या. स्त्रीला बेहोष करण्यासाठी विविध वनस्पतींचे अर्क वापरले जाऊ लागले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोप-अमेरिकेत खास स्त्रियांच्या समस्यांसाठी स्वतंत्र रुग्णालये उभी राहिली. १८४६ मध्ये रुग्णाला संपूर्ण भूल देण्यासाठी ‘इथर’चा वापर केला गेला. ही एक एक क्रांतिकारी घटना होती. लवकरच त्याचा वापर शल्यक्रियामध्ये वाढू लागला. पण गमतीची गोष्ट म्हणजे सिझेरियनसाठी मात्र स्त्रिया त्याचा स्वीकार करेनात ! यासाठी एक अंधश्रद्धा कारणीभूत होती. इव्हच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून स्त्रीने अपत्यास जन्म देताना असह्य वेदना सोसल्याच पाहिजेत ही समजूत रूढ होती. याचे निराकरण करणे आवश्यक होते. अखेरीस खुद्द व्हिक्टोरिया राणीने १८५३ व ५७ मध्ये आपल्या दोन अपत्यांना जन्म देताना भूल म्हणून क्लोरोफॉर्मचा स्वीकार केला. त्याचे अपेक्षित पडसाद समाजात उमटले आणि मग भूलशास्त्राचा सिझेरिअनसाठी नियमित वापर सुरू झाला.

एव्हाना शस्त्रक्रिया सुधारली होती आणि भूलीचा वापरही सुरू झाला होता पण तरीही अशा अनेक बायका शल्यक्रियेनंतर जंतुसंसर्गाने मरत. पॅरीस मध्ये १७८७ – १८७६ या कालखंडात सिझेरिअन झालेली एकही स्त्री जगली नव्हती ! या क्रियांमध्ये तेव्हा मूल काढल्यानंतर प्रत्यक्ष गर्भाशय काही शिवले जात नव्हते. गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावून पुढे तो छेद आपोआप बुजेल अशी त्यामागे (गैर)समजूत होती. परंतु प्रत्यक्षात तसे होत नसल्याने कित्येक स्त्रिया रक्तस्त्रावाने मरण पावत.

आता यावर तोडगा म्हणून एका डॉक्टरने सिझेरिअन झाल्यानंतर गर्भाशय पण काढून टाकावे हा मार्ग अवलंबला होता. परंतु हा काही या परिस्थितीवर तोडगा नव्हता. १८८२ मध्ये M. Saumlnger यांनी सिझेरिअन नंतर गर्भाशय शिवलेच पाहिजे हा आग्रह धरला. सुरुवातीस तसे करताना टाके घालण्यासाठी त्यांनी चांदीच्या पातळ तारा वापरल्या. या शल्यक्रियेच्या इतिहासातील हा पुढचा महत्त्वाचा टप्पा ठरला. एव्हाना या शल्यक्रिया यशस्वी होत असल्या तरी त्या नंतरचा जंतुसंसर्ग ही मोठी समस्या होती. पुढे 1940 मध्ये त्या उपचारांसाठी आधुनिक प्रतिजैविके उपलब्ध झाली आणि हा प्रश्न सोडवला गेला. दरम्यान भूलशास्त्रातील संशोधनानेही वेग घेतला होता. आतापर्यंत या शस्त्रक्रियेसाठी संपूर्ण शरीराला भूल दिली जाई, जी अनावश्यक होती. भूलशास्त्रातील एका विशिष्ट तंत्रानुसार शरीराचा फक्त कमरेखालील भाग बधीर केला जाऊ शकतो. आता या नव्या तंत्राचा सर्रास वापर होऊ लागला. त्यामुळे शल्यक्रियेदरम्यान रुग्ण जागी राहू शकते. तसेच बाळ बाहेर काढल्यानंतर तिचा त्याच्याशी संपर्कही लवकर प्रस्थापित करता येतो. आता गर्भाशय शिवण्याची प्रक्रिया आधुनिक शास्त्रशुद्ध धागे वापरून केली जाते.

असा आहे हा या क्रांतिकारी शल्यक्रियेचा इतिहास. सहाशे वर्षांपूर्वी जेव्हा सिझेरिअनचा उगम झाला तेव्हा ती शस्त्रक्रिया बरीच रांगडी होती. त्या अर्धवट प्रयत्नातून बहुतांश वेळा माता व बालक दोघेही मृत्युमुखी पडत. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नांनंतर या तंत्रामध्ये आमूलाग्र बदल झाले आणि आज ती एक सुलभ शल्यक्रिया झालेली आहे. तिच्या सुयोग्य वापरामुळे बाळ-बाळंतीण दोघेही सुखरूप आणि मजेत असे आनंदी चित्र आपल्यापुढे आहे.

लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. चालू काळातील सिझेरिअन, त्याची वैद्यकीय चिकित्सा व संदर्भदुवे, विदा आणि रुक्ष आकडेवारी, आर्थिक पैलू इत्यादी मुद्दे जाणीवपूर्वक टाळत आहे. प्रसूती शाखेशी माझाही फारसा संपर्क नाही. त्या अनुषंगाने चर्चा जाऊ न देता इतिहासाचे निव्वळ स्मरणरंजन म्हणून या धाग्याकडे पाहावे ही विनंती. म्हणूनच हा लेख ‘आरोग्यम धनसंपदा’मध्ये घेतलेला नाही.

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
................
चित्र जालावरून साभार !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश, हो, माझे प्लॅनड सी सेक्शन होते, अगदी मुहूर्त नाही पण दिवस , पंचांग वगैरे बघून निवडला होता. इमर्जन्सी वाल्यांना ही मुभा नाही

सुरक्षिततेच्या मर्यादेत राहून किती काळ जन्मवेळ पुढे मागे करता येते? असा प्रश्न आहे.>>>> असा काही निश्चित वेळ ठरवता येणे क्वचितच जमत असावे. कारण प्रत्येतक बाळ जसे वेगळे असते तसे प्रत्येक गर्भारपण, त्यातल्या अडचणी, आईची तब्येत सगळेच वेगळे असते.

<< मानवी हस्तक्षेपामुळे आता जन्मकुंडली बदलता येणे हे सहज शक्य होते , म्हणजे पर्यायाने भविष्य बदलता येते हा मुद्दा आहे >>
मुळात जन्मकुंडली आणि भविष्य याचा काही संबंध आहे, याच्यावर विश्वास ठेवणे हाच मूर्खपणा आहे.

<< मुहूर्त नाही पण दिवस , पंचांग वगैरे बघून निवडला होता. >>
कठीण आहे. सुशिक्षित लोक असला आचरटपणा करतात, म्हणजे खरंच कमाल आहे. हे असले प्रकार बघावे लागतात त्या गायनॅक लोकांबद्दल सहानुभूती वाटतेय.

ता.क. माझा स्वतः:चा जन्म c-section ने झाला आहे. पण तो निव्वळ डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे झाला होता, मुहूर्त गाठण्यासाठी न्हवे, हे आईने सांगितलेले आठवले.

गरिबी हटाव मोहीम ही गायनॉकच्या हाती आहे तर.
मुहूर्ताप्रमाणे सगळी उज्वल भविष्याची मूले योग्य वेळी योग्य मुहूर्तावर सिझेरियन करून जन्माला घालावीत, व देशाची गरिबी दूर करावी.

उ बो, ह्यात आचरटपणा काय आहे? एखाद्या गोष्टीवर विश्वास असणे नसणे हे व्यक्तिसापेक्ष बदलते. मी तर एकेकाळी पूर्ण नास्तिक होते पण आता माझ्या मुलाचे नाव श्री गुरूंच्या नावावरून ठेवलंय, कारण तसा काही अनुभव आला आहे अन माझे म्हणाल तर माझी केस अशी होती की जिवंत असेन नसेन हेही अनिश्चित होते म्हणून डॉक्टरांनी सी सेक्शन ठरवले होते म्हणून सगळेच खूप टेन्शन मध्ये होते सो डॉक्टरांनी सांगितलेल्या आठवड्यातील एक चांगला दिवस निवडला तर काय होते?

असो, हे झाले माझे

आता तुम्ही, मानवकाका अन इतर अजून कोणी ज्यांना ह्यात चूक वाटते किंवा हसू येते , त्यांनी एकदा विचार करा की जर अश्याने एखाद्यला मानसिक शांती मिळणार असेल तर काय हरकत आहे. गरिबी हटाव काय इतरही गोष्टी महत्त्वाच्या असतात की, जसे निरोगी, कमी त्रासाचे आयुष्य लाभो.

अन हो, मी आधीच सांगितले आहे की इमर्जन्सीच्या वेळी कोणी अडून बसत नाही की मुहूर्ताशिवाय डिलिव्हरी करू नका.

या विषयावर जितके लिहाल तितके कमी, डॉक्टरांच्या धाग्यावर जास्त अवांतर किंवा वाद विवाद नको

माझी कॉमेंट:
"मानवी हस्तक्षेपामुळे आता जन्मकुंडली बदलता येणे हे सहज शक्य होते , म्हणजे पर्यायाने भविष्य बदलता येते हा मुद्दा आहे"" यावर आहे.

असो. अशा धाग्यावर हा विषय यायला नको होता.

प्रत्येक पालक आपले बाळ याच वेळी जन्माला येऊ द्यावे असा आग्रह धरणारे नसतात. पण जर डॅाक्टरने सांगितले कि नैसर्गिक प्रसुती होण्याची शक्यता नाही आणि या दिवसांत प्रसुती करावी लागेल. त्यावेळी तुम्हाला माहिती आहे कि आहे त्या दिवसांतले हे दिवस शुभ आहेत आणि हे अशुभ आहेत तर तुम्ही काय निर्णय घ्याल?
मुद्दाम अशुभ दिवस निवडून त्या दिवशी बाळाला जन्माला घालून त्याचे आयुष्यात काय होते याचे निरीक्षण करणारे पालक मी तरी नाही पाहिले. त्यामुळे प्रत्येक पालकाला आपल्या बाळास जे उत्तम तेच द्यावेसे वाटणे यात वावगे नसावे.
पण कोणत्याही परिस्थितीत बाळ याच मुहूर्तावर जन्मास यावे असा आग्रह धरणे चूकच.

अन हो, मी आधीच सांगितले आहे की इमर्जन्सीच्या वेळी कोणी अडून बसत नाही की मुहूर्ताशिवाय डिलिव्हरी करू नका.>>>>हे मात्र खर आहे. अगदी देवभोळा सश्रद्ध सुद्धा इथे तारतम्य वापरतो.अतीव श्रद्धेपोटी जीवाशी खेळ करण्याच प्रमाण अगदी अपवादात्मक असावे.

"लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. चालू काळातील सिझेरिअन,........ इत्यादी मुद्दे जाणीवपूर्वक टाळत आहे."
..... म्हणून माझीही विनंती की या मुद्द्यावर थांबावे.

वर स्वान्तसुखाय यांनी जो निरागस प्र दिला तो सर्वांनाच आनंद देऊन गेला.
असे काहीतरी रंजक येउद्या.

हे दिवस शुभ आहेत आणि हे अशुभ आहेत... >> यालाच आचरटपणा म्हणतात. किमान जे सुशिक्षित आहेत, त्यांच्याकडून तरी असली अपेक्षा नसावी.

लेखाच्या शीर्षकात स्पष्ट केल्यानुसार सिझेरिअनचा इतिहास आणि त्या शब्दाच्या रंजक उगमकथा सांगणे एवढाच या लेखाचा हेतू आहे. चालू काळातील सिझेरिअन,........ इत्यादी मुद्दे जाणीवपूर्वक टाळत आहे."
..... म्हणून माझीही विनंती की या मुद्द्यावर थांबावे.>>>>>>>लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीत जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा ही येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. सिझर हा मध्यवर्ती मुद्दा आहे.त्या्ला फक्त ऐतिहासिक स्मृतीरंजनात बंदिस्त करणे मला फारस पटत नाही. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.

Happy हा 'हम लोगों को समझ सको तो समझो दिलबर जानी' प्रकार आहे. मंगळावर यान सोडतील पण आधी ओम काढणे आणि नारळ फोडणे व्हायला हवे. मुद्दाम अशुभ दिवस निवडून पालक जन्माला घालत नाहीत हे बरोबर पण काही गोष्टी डॉक्टरवर सोडाव्यात ह्या मताची मी आहे. म्हणजे माझ्या नात्यात (किंवा मला स्वतःलाही सांगितले असते तर) कुणाला डॉक्टरने मुभा दिली की "दिवस निवडा" तर मी डॉक्टरला सोयीचा दिवस निवडेन. शुभ दिवशी चार सीझर करून दमलेल्या डॉक्टरपेक्षा सामान्य दिवशी पूर्ण शक्तीनिशी उपस्थित डॉक्टर मला हवी/हवा. शुभ दिवशी जन्मलेल्या बाळांनाही आजार होतात, पालक म्हणून व्हायची ती धावपळ होतेच आणि "अशुभ" दिवशी जन्मले तरी धडधाकट असणारी मुले आहेत. त्यांची ही आयुष्ये सुरळीत जातात कारण पालकांना माहिती ही नसते की दिवस अशुभ होता Happy . ते आपले नापास झालास, कर अभ्यास म्हणून त्यालाच बदडतात...

प्रकाश सरांचा प्रश्न मला पटला. उत्तर माहिती नसले तरी कारण ज्यांचा ज्योतिषावर विश्वास आहे ते सल्ला घेतच राहणार. चांगले व्यासंगी लोक अशा पेशंटसचा गैरफायदा न घेता थोडा 'इंटरडिसीप्लिनरी' अप्रोच ठेवत असले तर वैद्यकीय व्यवसायिकांनी योग्य ती माहिती देऊन प्रबोधन करावे हे बरे. म्हणजे त्या जातकाला/पेशंटला एकवाक्यतेने सल्ला मिळेल - डॉक्टर व ज्योतिष दोघांनी ह्याच दिवशी करा असे सांगितले.... मग काय वाटा जिलेबी नि पेढे... Happy

डॉक्टरने मुभा दिली की "दिवस निवडा" तर मी डॉक्टरला सोयीचा दिवस निवडेन. शुभ दिवशी चार सीझर करून दमलेल्या डॉक्टरपेक्षा सामान्य दिवशी पूर्ण शक्तीनिशी उपस्थित डॉक्टर मला हवी/हवा.>>> डॅाक्डर तर आधीच ते आणि दवाखाना कधी उपलब्ध आहे ते सांगतात ना. चार सीझर केल्यावर दमायला होत असेल तर डॅाक्टर स्वत:च ५वे करायला नकार देतील.

बरोबर, डॉक्टर 'all available days and times' सांगतात. त्यात माझी निवड 'least busy day for them' असेल. अर्थात ही माझी निवड झाली. इतरांनी तस्सच केलं पाहिजे असा आग्रह नाही. मी माझा दृष्टीकोन मांडला.

ObGyn डॉक्टर्सचं वेळापत्रक इतकं predictable असेल असं वाटत नाही. Planned cesarean ही त्यातल्या त्यात predictable गोष्ट असेल म्हणून मुहुर्त वगैरे चे लाड. आता गंमत म्हणजे माझ्या ताईच्या दुसर्‍या बाळाचा जन्म झाला नैसर्गिक प्रसूतीने. दोन दिवसांनी कळले की त्याच दिवशी त्याच वेळेस एकांनी planned cesarean ठेवले होते पण नेमक्या ताईला त्याच वेळी बाळंतकळा सुरू झाल्या आणि तिला आधी घ्यावे लागले! हे त्या मुलीची आई की सासू नंतर माझ्या ताईला भेटायला आली होती म्हणून कळले!

जिज्ञासा, हो, असेही होऊ शकते की प्लॅन केले आहे तयारी सुरू आहे अन इतक्यात असे इमर्जन्सी पेशंट आला मग डॉक्टर कुणाला प्राधान्य देईल हे क्लिअर आहे अन मला नाही वाटत त्यावेळी कोणी अडून बसेल की त्या पेशंटचे ह्यायचे ते होवो तुम्ही आमची डिलिव्हरी आधी करा.

तसेच चार डिलिव्हरी करून थकून पाचव्या प्लॅनड डिलिव्हरी नंतर अचानक सहावा पेशंट आला तर डॉक्टर असे सांगितल का की बाई आजचा दिवस काढ मी आधीच पाच डिलिव्हरी करून दमलोय
नाही ना, ते त्या सहाव्या डिलिव्हरी साठी सुद्धा त्यांचे बेस्ट एफफोर्ट देतील, अन तेवढा विश्वास नसेल डॉक्टरांवर तर सरळ डॉक्टर बदलावा

बापरे इथे ह ज्योति ष व मुहूर्त चर्चा?! सायन्स कुठे गेले?

मी पण सिझेरिअन मॉम. ७५ % कळा दिल्या रात्र भर मग नेक्स्ट डे साडेनौ ला ऑपरेशन . ज्यांनी पूर्ण प्रेगननसी सपोर्ट दिला ते डॉक्ट र उपलब्ध नव्हते मग दुसरेच कोणतरी आले व करून गेले उत्तम पैकी. नाव पण लक्षात नाही.
फक्त पाठीत इंजेक्षन दिले होते त्यामुळे सर्व बघता आले. रिकव्हरीत काही त्रास नाही. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्षन झाले होते तेव्हा सासूबा ई परेशान झाल्या कारण त्यांना काहीच अनुभव नाही व बाळंतपण करायची हौस दांडगी. पण औषधे घेउन पाच दिवसात घरी परत. हे हॉस्पिटल घराच्या वरच्या मजल्यावरच होते.

नंतर लक्षात आले की लेकीचा जन्म झाला तो दिवस श्रावण शुक्रवार, वरलक्ष्मी व्रत राखी पौर्णिमा असा व इतका शुभ होता. पण हे प्लॅन केलेले नव्हते.

सहा सी सेक्शन एकाच दिवशी? डॉक्टर आहे का मशीन?

सीझर वाल्यानी कुंडली बनवूच नये... चुकीचे भविष्य मिळेल... उगाच गैरसमजात राहण्यात काय फायदा... नैसर्गिक जन्माची वेळ वेगळी होती, तुम्ही बदलली.. भविष्य नाही बदलणार...

तीच गोष्ट लेबर इंड्युस करून डिलिव्हरी झालेल्या बद्धल...
व्हॅक्युम किंवा फोरसेप्स वाक्यांनी कुंडली बनवली तरी थोडे फार समजू शकतो...

माझे मत ...

डॉक्टरांनी चॉईस दिला या पाच दिवसांत करता येईल त्यातील केव्हा ते ठरवा, तेव्हा कुणी त्यातील एक दिवस कशा पद्धतीने निवडतात यावर माझं काहीच म्हणणं नाहीय, शुभ दिवस मला वाटते ७०% लोक तरी निवडतील.

पण सिझेरियन हे बाळाची कुंडली आणि भविष्य बदलण्याची संधी आहे समजणे वगैरे थोतांड प्रकार नव्हे तर काय आहे? नैसर्गिक जन्म शक्य असला तरी लोक सिझेरियनचा हट्ट धरतील. आणि कुंडली भविष्य बदलायचे म्हणजे केवळ शुभ दिवस नाही, तर हाच दिवस आणि हीच वेळ (त्यात जी काही ५ / १०/ १५ मिनीटांची मार्जिन असेल ती). डॉक्टर आम्हाला या दिवशी इतके वाजता सिझेरियन करायचे आहे. काय तुम्हाला त्या दिवशी ती वेळ नाही जमणार? बघा ना डॉक्टर प्लिज! बाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे हो!.
नाहीच जमत म्हणता.
अहो, आपण दुसरे डॉक्टर बघु ना. हो बघतो जवळचे किती प्रसूती रुग्णालय आहेत ते, विचारू या सगळ्यांना.

काय म्हणता? एवढं कोणी करत नाही शेवटी बाळाची / मातेची काळजी असतेच लोकांना. आर यू शुअर? अंधश्रद्धा, थोतांड असेच नाही पसरत का?

जे बाळ नैसर्गिकरित्या १८ एप्रिलला दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी जन्मलं असतं ते सिझेरियन करून १७ एप्रिलला सकाळी ९ वाजून २१ मिनिटांनी जन्माला आणलं आणि त्याचं भविष्यच उज्वल झालं! टाळ्या!

मानवदादा, इथे प्लॅन्ड सी-सेक्शन बद्दल विषय आहे. तुम्ही इलेक्टीव्ह चा विषय काढला. आई कुठल्याही कारणासाठी इलेक्टीव्ह सी-सेक्शनचा मार्ग स्वीकारू शकते. यात 'मला कळा द्यायची भीती वाटते' ते 'मम्मी म्हणाली तिचा बड्डे आणि बेबीचा बड्डे सेमच हवा' पर्यंत सर्व कारणे क्षम्य आहेत. मग ज्योतिषासाठी इलेक्टीव्हचा मार्ग स्वीकारला तर काय प्रॉब्लेम झाला. आईला हक्क आहे तो Happy
(ज्योतिषानुसार करू नये, डॉक्टरच्या सोयीवर सर्व सोडून द्यावे ह्या दुसर्‍या टोकाच्या मताची मी आहे. पण इलेक्टीव्ह सर्जरी आईचा हक्क आहे.)

आम्ही पण आचरट कॅटेगरी Happy
डॉ नी 'हेड डिसेंड झालेलं नाही, सी सेक करावं लागेल, या आठवड्यात तुम्हाला हवा तो दिवस सांगा त्या दिवशी करू' (माफ करा खूप इंग्लिश शब्द) म्हणून सांगितलं.मग आमच्याकडे पंडित काकाना फोन करून दिवस ठरवणे वगैरे विनोदी प्रकार झाले. याबद्दल फार ग्रेट किंवा फार वाईट असं दोन्ही आता वाटत नाही.
माझ्या हातात निर्णय असले तर मी हे प्रकार केले नसते(फारतर लोकाना सुट्ट्या घ्याव्या लागू नये म्हणून शुक्र दुपार/शनी सकाळ ची वेळ इतके केले असते)

माझ्या हातात निर्णय असले तर मी हे प्रकार केले नसते(फारतर लोकाना सुट्ट्या घ्याव्या लागू नये म्हणून शुक्र दुपार/शनी सकाळ ची वेळ इतके केले असते) >> क्या बात है! ज्योतिषी तारीख सांगणार आणि त्याच्या त्याच्या घरी सुखात असणार. ज्यांना उस्तवार करायची त्यांची सोय बघणे ह्या सारखे दुसरे सौजन्यपूर्ण काही नाही!!!

माझ्या हातात निर्णय असले तर मी हे प्रकार केले नसते(फारतर लोकाना सुट्ट्या घ्याव्या लागू नये म्हणून शुक्र दुपार/शनी सकाळ ची वेळ इतके केले असते)>>>>> हाच विज्ञानाचा लाभ

जन्मकुंडली/भविष्य बदलणे तिथेच इलेक्टिव्ह सी सेक्शनचा विषय निघाला होता.
आईला हक्क आहे (आणि इकेक्टिव्ह सी-सेक्शन ज्योतिष्यासाठी प्रत्येकवेळी आईच निवडतेय /निवडणार याची खात्री आहे खरंच? ) तसा मलाही माझे त्यावर मत मांडण्याचा हक्क आहे. मी एका ओपन फोरम मध्ये सिझेरियनची माहिती देणाऱ्या धाग्यावर जिथे विषयांतर झालेय तिथे मत मांडत आहे. Happy

चर्चा अशाच घडतात ना? नाहीतर सगळ्याच गोष्टी हक्कच आहे म्हणुन इतरांनी काही म्हणू नये तर समाजात बदल घडलेच नसते. आपले सोने रात्रभरात दुप्पट करून घेण्याचाही अधिकार आहे लोकांना.
गर्भपात करून घेण्याचाही अधिकार आहे, पण लिंग चाचणीवर बंदी आली आपल्या देशात, का आली? हक्कच होता ना तो?

तद्वतच उज्वल भविष्यासाठी ठरल्या दिवशीच नव्हे तर ठरल्या वेळेवरही सी-सेक्शन प्रकरण केवळ गर्भवतीची स्वेच्छा रहाणार नाही. जशी मुलगी नको, मुलगाच हवा हे माताच ठरवत नव्हती.

असो. या धाग्यावर, या विषयांतरावर हेमाशेपो.
गरज वाटलीच तर गप्पा / प्रकाश सरांच्या नव्या धाग्यावर लिहीन.

पण सिझेरियन हे बाळाची कुंडली आणि भविष्य बदलण्याची संधी आहे समजणे वगैरे थोतांड प्रकार नव्हे तर काय आहे? नैसर्गिक जन्म शक्य असला तरी लोक सिझेरियनचा हट्ट धरतील. आणि कुंडली भविष्य>>>>>>> सहमत!
आहेत अशा केसेस घडलेल्या.बरेचदा आईला बाजूला सारून सासरची मंडळी आपले घोडे पुढे दामटवतात.निसर्गक्रमात जास्त दखल देऊ नये,मात्र बाळ आणि बाळंतीणीचा जीव धोक्यात नसेल तरच.

मस्त लेख डॅाक.
माझे ही दोन्ही c - section. मुलगा २६ आठवड्यात जन्मला. माझ्यासाठी आणि मुलासाठी माझे Gynac व पेडी दोघे ही देवस्वरूप आहेत आणि राहतील.

Pages