हिमसफर सारपास-२०१९

Submitted by अजित केतकर on 10 April, 2021 - 05:30

हिमालय - लहानपणी बर्फाचे घर असा अर्थ कळल्यापासून कमालीची उत्सुकता लागलेला शब्द. हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी जाणे झाल्यामुळे ही उत्सुकता जरी काहीशी कमी झालेली होती तरी त्याच्या कुशीत शिरायची इच्छा अजून अपुरीच होती. सह्याद्रीत फिरणे होत असले तरी त्याच्यापेक्षा बलाढ्य असणाऱ्या पर्वतराजाच्या अंगाखांद्यावर खेळणे झाले नव्हते. 

यूथ हॉस्टेलची "सार-पास" आणि इतर हिमालयातल्या भटकंत्यांच्या जाहिराती पहिल्या आणि सगळ्यात सुंदर अशी ख्याती असलेल्या "सार-पास" ला जायचे नक्की केले. ओळखीतले कोणाचे यायचे जमत नसल्याने माझे एकट्याचेच बुकिंग केले. सह्याद्रीचा थोडा अनुभव असल्याने तशी अडचण काही वाटत नसली तरी ऑक्सिजनच्या कमतरतेत बर्फाचा डोंगर चढण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यादृष्टीने अनुभव गोळा करण्यासाठी काही जणांना फोन केले. मुख्य प्रश्न बुटांचा होता. ऍक्शन ट्रेकिंग ब्रँडवर माझा पूर्ण विश्वास होता पण तो दगड माती पुरताच मर्यादित. बर्फात वापरासाठी सगळेच विदेशी "क्वेचुआ" ब्रँडच्या बुटांचे गुणगान करत असल्याने मीही तेच घ्यायचा विचार करत होतो. पण माझे ७४ वर्षाचे मित्र श्री वालावलकर यांनी ते "ऍक्शन ट्रेकिंग"च्या मजबूत पायावरच अजूनही हिमालयन ट्रेक करत असल्याचे सांगून मलाही तेच वापरायचा सल्ला दिला आणि मी निश्चिंत  झालो. यांनीच सह्याद्रीतल्या भटक्यांना तिथे काठीचीही तशी आवश्यकता नाही असे सांगितले आणि माझी दुसरीही शंका आपोआपच दूर झाली. नेहमीच्या ट्रेकच्या तयारीत थंडीसाठीच्या कपड्यांची भर टाकून "सार-पास"साठी सज्ज झालो. या ट्रेकच्या निमित्ताने तयारी म्हणून तीन महिने रोज कमीतकमी ५ किमी चाल मात्र नियमित झाली.

१ मे ला चंदीगडला पोहोचलो आणि तिथून रात्री ८ ची मनाली बस पकडून पहाटे ४ वाजता भुंतर या गावात उतरलो. चंडीगडलाही भरपूर उकाडा असल्याने बर्मुडा आणि टी शर्ट मधेच प्रवास चालू होता. भुंतर येईपर्यंत बसमध्येही गर्दी असल्याने थंडी जाणवली नव्हती पण भुंतर मध्ये उतरताच कडाक्याच्या थंडीने मला लपेटले. रस्त्यावर एक दोन कुत्र्यांचा वावर सोडला तर पूर्ण शुकशुकाट आणि अंधार मोडून काढायला दूरवर रस्त्यावरचा एक मिणमिणता दिवा. जवळच्या गल्लीतल्या एका देवळाच्या पायरीवर मुटकुळं करून बसलो.  थंडी हळूहळू शरीरात शिरत होती. थोड्याच वेळात सॅक मधले सगळे थंडीचे कपडे अंगावर चढवले आणि माणिकरण च्या बसची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात कानावर चारपाच जणांचे बोलण्याचे आवाज येऊ लागले. भाषा कुडकूड होती, पण त्यातला 'कसोल' शब्द कानावर आदळला आणि मी उठलो. त्या 5-6 जणांच्या घोळक्याजवळ गेल्यावर त्यांच्या पाठीवरच्या सॅका पाहून त्यांच्या भटक्याजातीची ओळख पटली आणि मी 'यूथ हॉस्टेल, कसोल?' असा प्रश्न टाकला. "हां हां, सारपास जा रहे है। जीप आ रही है। चलोगे? बसको एक घंटा बाकी है।". या कानडी मंडळी मंडळींबरोबर साडेसहाच्या सुमारास बेसकॅम्प च्या स्टॉपला उतरलो. डाव्याबाजूला डोंगरउताराखाली पार्वती नदी खळाळत वाहत होती. नदीकाठावर यूथ हॉस्टेलचा पंचवीस तीस तंबूंचा कॅम्प दिसला आणि हायसे वाटले. उंचच उंच देवदार वृक्षांच्या मधून डोकावणारे ते हिरव्या रंगाचे कापडी तंबू कॅम्पची निशाणी दाखवत होते.
Kasol campsite_20190502_061824 (1).jpg

बाजूलाच "कसोल बेस कॅम्प" लिहिलेली कमान स्वागताला उभी होती. तीस पस्तीस पायऱ्या उतरून कॅम्पमध्ये पोहोचलो. कॅम्प लीडर, फील्ड डायरेक्टर भेटले आणि  YHAI चा अकरा दिवसांचा पाहुणा झालो. त्या कडाक्याच्या थंडीत मनसोक्तपणे गरमागरम चहा घेता घेता कालच दाखल झालेल्या SP-१ ग्रुपच्या काही जणांशी गप्पा झाल्या. ऑफिसचा तंबू उघडल्यावर नोंदणीचे सोपस्कार झाले आणि मला १६ नंबरचा तंबूत राहायला सांगण्यात आले. 
005-Our tent no 16 at Kasol Base camp.jpg

तंबूत सॅक टाकून कॅम्प मध्ये फेरफटका मारून आलो. साधारण १४' x  १२' च्या प्रत्येक तंबूत १२ जणांची सोय होती. असे ३५ तंबू या कॅम्पला होते. शिवाय YHAI च्या कार्यकर्त्यांचे वेगळे तंबू आणि एक मोठा तंबू खानपान व लेक्चर्स साठी बांधलेला होता. तंबूमध्ये मोबाईल चार्जिंंगची  सोय आणि छोटा LED दिवा होता. ही मौज फक्त बेसकॅम्प पुरतीच मर्यादित होती. नदीच्या बाजूला स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उत्तम सोय होती. भटक्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी इथे खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध होत्या.

आपापल्या ताटल्यांमध्ये भरपेट नाश्ता करतानाच इथून माणिकरण ५ किमी म्हणजे चालत तासाभराच्या अंतरावर असल्याचे कळले. आजचा आमच्या गटाचा इथे पोहोचण्याचा दिवस असल्याने वेळापत्रक असे नव्हते. फक्त कॅम्प बाहेर जाताना नोंदणीपत्र जमा करायचे आणि संध्याकाळी साडेसहा पर्यंत कॅम्पमध्ये परत यायचे हा नियम होता. नाश्त्यानंतर माणिकरणला गेलो.  मस्तपैकी गरम पाण्याच्या कुंडात आंघोळ केली आणि दर्शन घेऊन साडेबारापर्यंत परत कॅम्पवर आलो. जाता येता पार्वती नदीची सतत साथ होती. खाली नदीचा फेसाळता प्रवाह, पलीकडे अजस्त्र पर्वत आणि कानावर सतत प्रवाहाची खळखळ कुठे मरगळ येऊच देत नव्हती.

हळूहळू बाकीचे साथीदार येत होते नवीन ओळखी होत होत्या. इथे आमच्या ग्रुपमध्ये बरोबर कोण आहे हे मला आत्ता कळत होते . YHAI कडून कधीच ही माहिती आधी मिळत नाही. कोणाबरोबरही जायची तुमची तयारी असावी आणि यामुळे सर्वांना बहुभाषिक मित्र जोडण्याची संधी मिळावी हा यामागचा उद्देश. आमच्या ४८ जणांच्या SP-२ ग्रुपमध्ये मी, सुषमा आणि राजलक्ष्मी हे तिघेच मराठी होतो. बाकी सगळे कर्नाटक आणि आंध्रचे होते. विशेष गम्मत म्हणजे आम्हा तीघांचेच बूट हे 'ऍक्शन- ट्रेकिंग' चे होते बाकी सगळे श्रीमंत 'क्वेचुआ' किंवा 'वूडलँड'वाले. आम्हाला प्रत्येकाला बेस कॅम्पसाठी दोन ब्लँकेट्स वाटण्यात आली. नंतर पूर्ण ट्रेकसाठी सॅक आणि स्लीपिंग बॅगच्या आत घालायची स्वच्छ धुतलेली खोळही देण्यात आली.

पहिला दिवस आरामाचा झाल्यावर दुसऱ्या दिवसापासुन नेमलेले वेळापत्रक सुरु झाले. सकाळी ५:३० ला चहा. मग ६ ते ७ व्यायाम व धावणे झाले. मग नाश्ता करून साधारण दोन -तीन तासाचा पायलट ट्रेक-१ केला. तिसऱ्या दिवशी सकाळी पहिला ग्रुप SP -१ मुख्य ट्रेकला निघाला होता त्यांना फ्लॅग ऑफ दिला. इथे प्रत्येक ग्रुपला पुढच्या दोन ग्रुपकडून टाळ्यांच्या गजरात "फ्लॅग ऑफ" मिळत असतो. यात पायऱ्यांच्या दुतर्फा ७०-८० जण टाळ्या वाजवत उभे असतात आणि अप्पर कॅम्पला जाणाऱ्या ग्रुपसाठी घोषणा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. हा गंमतीशीर पण तितकाच हवाहवासा कार्यक्रम झाल्यानंतर नाश्ता करून ३ तासाचा पायलट ट्रेक-२ केला, पण ६-७ किलोची सॅक पाठीवर घेऊन. दुपारी मुख्य ट्रेक बद्दल माहिती देण्यात आली. एका डॉक्टरांनी अति उंचीवर काय धोके असतात आणि आपण काय काळजी घ्यायची याची माहिती दिली. सगळ्यांना अंगठ्या असतील तर काढून ठेवायची सूचनाही देण्यात आली. या लेक्चर नंतर मुख्य ट्रेकची सॅक भरण्यात बराच वेळ गेला. वजन कमी ठेवण्यासाठी सगळा प्रयत्न. सगळे कपडे प्लास्टिक च्या मोठ्या पिशवीत टाकून आपल्या पावसाळी ट्रेक सारखी सॅक भरली. या सॅक चे वजन ५ किलोंपर्यंतच हवे नाहीतर ते तेवढे होईपर्यंत सामान कमी करावे लागते. याचा उद्देश हाच की यात पाणी आणि जेवणाचा डबा आल्यावर एकूण वजन ७ किलोपर्यंतच असावे. जास्तीचे सामान आपल्या सॅक मध्ये भरून ती सामानाच्या खोलीत जमा केली. आता उद्या ब्लँकेट्स परत देऊन आपापली सॅक घेऊन निघायचे.

नेहमीप्रमाणे सकाळचे कार्यक्रम, चहा नाश्ता झाला आणि डब्यात दुपारचं जेवण भरून घेतले. आज व्यायाम नव्हता. काऊंटिंग झाले आणि शेवटच्या सूचना दिल्या गेल्या. दोन गाईड आमच्या बरोबर असणार होते त्यांची ओळख झाली. एकाच्या पुढे कोणी जायचे नाही आणि दुसऱ्याच्या मागे कोणी रेंगाळायचे नाही हे दोनच मुख्य नियम. पैकी मागाच्यावर मोठी जबाबदारी आणि संयमाची परीक्षा ..परत कॉऊंटिंग झाले आणि पायऱ्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या पुढच्या ग्रुप्स कडून टाळ्या - शुभेच्छांच्या वर्षावात झेंड्याखालून आमचा ग्रुप निघाला. उगाचच मोठ्या मोहिमेवर निघाल्यासारखे वाटत होते. पण हा अनुभव मात्र खूप छान आणि उत्साहवर्धक होता.

ट्रेकचा पहिला दिवस सगळे नव्या उत्साहात होते. बऱ्याच जणांचे सारखे फोटो काढणे चालू होते. गाईड पण काही घाई न करता शांतपणे देवदार वृक्षाच्या गर्दीतून वाट काढत होता. वरचे बर्फ वितळून येणाऱ्या गार पाण्याचे छोटे ओढे म्हणजे आमचे एनर्जी स्टॉल होते. त्यांचे पाणी पिऊन खरंच खूप ताजेतवाने वाटायचे. काही "सॅनिटीझर"वाले गडी मात्र या अनुभवापासून अलिप्तच रहात होते. असे अनेक छोटे मोठे ओढे पार करायला पण मजा येत होती. वाटेत काही झाडे पडलेली दिसत होती. इथली जमीन खूपच भुसभुशीत. त्यामुळेच कदाचित झाडे पडत असावीत.

110-On way to camp-1.jpg

दुपारी १ च्या सुमारास पाणी आणि सावली पाहून जेवणाचे डबे खाल्ले आणि साडेतीन च्या सुमारास "ग्रहण" गावात पोहोचलो. हा कॅम्प ७७०० फुटांवरचा. 
150-Camp 1- Grahan (7700 ft).jpg

गावापलीकडे असलेला मोठा झरा ओलांडून पलीकडच्या टेकडी वर आमचे तंबू होते. वाटेत गाईडने मोहक गडद लाल रंगाची बुरांश ची फुले आम्हाला दाखवली होती. या फुलांना काहीशी आंबट पण  छान चव होती. यांचेच खूप चविष्ट सरबत कॅम्पवर पोहोचताच आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून मिळाले. तंबूत सॅक टाकल्या, कॅम्प लीडर कडून स्लीपिंग बॅग ताब्यात घेतल्या आणि फेरफटका मारायला निघालो. पुढे सगळी डोंगर उतारावरची शेती होती. काहींचे शेतात काम चालू होते. थोडे उंचावर गेल्यावर दिसणारा हिरवा डोंगर अस्ताला चाललेल्या सूर्याच्या किरणात चमकत होता. डोंगरउतारावर वसलेले गाव, बाजूला खळाळता झरा आणि मधेमधे गावकऱ्यांच्या आणि गुरांच्या हालचाली हे खूपच मोहक दृश्य होते. फिरता फिरता शेवटी कॅम्पमधून शिट्ट्या ऐकायला आल्या आणि आम्ही परत फिरलो. हे चहासाठी बोलावणे होते. गरमागरम चहा झाल्यावर इथल्या काही घरात डोकावून आलो. इथं हिंदू महिन्यांचीच नांवे काहीश्या बदललेल्या रूपात प्रचलित आहेत. आपल्या भाद्रपद म्हणजे इथल्या "भादरु" महिन्यात याज्ञवल्क मुनींचा उत्सव असतो. हे लोक या मुनींनाच देव मानतात. यांचेच देऊळ या गावात आहे. पण गावाबाहेरच्या लोकांना या देवळात प्रवेश नाही. पुढची शिट्टी ऐकली आणि सूप ओरपायला परतलो. सगळ्याच कॅम्प मध्ये सूप मुबलक प्रमाणात. एकूणच लिक्विड भरपूर प्या असे सांगण्यात आले होते. कारण या वातावरणात तहान अशी लागताच नाही आणि मग डीहायड्रेशन होते. म्हणून २-३ कप सूप प्रत्येक जण हाणायचाच. गावात वीज नाही. त्यामुळे संधीप्रकाशातच जेवणे झाली आणि ८ च्या सुमारास सगळे तंबूत गेले. अलीकडेच YHAI  ने कॅम्पफायरसाठी लाकडे जाळणे बंद केल्याने काही वेळ तंबूबाहेर नुसताच गोल करून गाणी झाली पण थंडी जोरात असल्याने कॅम्प फायर शिवाय बाहेर जास्त वेळ बसणे कठीण होते . ९ वाजता बोर्न वीटा पिऊन सगळे गुडूप झाले.

दुसरा दिवस अजून १६०० फूट वर म्हणजे ९३०० फुटांवरच्या पदरी कॅम्पला जायचा. आजचा दिवस साधारण कालच्या सारखाच पण सगळ्या बाबतीत थोडा वरचढ. जंगल अधिक  दाट, ओढे मोठे. एकाठिकाणी ओढ्यावर मोठे झाड पडले होते त्याचा उपयोग करून घेत तो मोठा ओढा सगळ्यांनी ओलांडला.
जेवणाच्या ठिकाणी जरा जास्तच वेळ घालवल्याने पदरी कॅम्पला पोहोचायला जवळजवळ पाच वाजले.

250-Camp-2-Padri-(9300 ft).jpg

इथून सगळ्या बाजूला बर्फाचे डोंगर दिसत होते. विशेष म्हणजे आमच्या पुढच्या दोन्ही कॅम्पच्या जागा इथून दिसत होत्या. बऱ्यापैकी मोठे हिरवे कुरण  बघून बऱ्याच जणांमधले बालपण डोके वर काढू लागले. चहा झाल्यावर थोडा वेळ मस्तपैकी लगोरी खेळलो. थंडी जास्त असूनही खेळताना जाणवली नाही. पण नंतर सगळे गारठायला लागले. गरम सूप आणि भरपेट जेवण झाल्यावर सगळेजण तंबूत घुसले.

थोडावेळ गाण्याच्या गमतीशीर भेंड्या खेळलो. प्रत्येक जण आलेल्या अक्षरावरून आपापल्या भाषेत गाणे म्हणत होता. दहाच्या सुमारास सगळे आपापल्या स्लीपिंग बॅगमध्ये शिरले.

सकाळी नेहमीप्रमाणे कार्यक्रम झाले. आज विशेष म्हणजे  आमच्यापासून जेमतेम ५० फुटांवर आलेला झुपकेदार शेपटीवाला पिवळसर रंगाचा लांडगा पाहायला मिळाला पण काही अतिउत्साही मंडळी फोटो काढायला जवळ जायला लागल्यावर पळून गेला. जेवणाचे डबे भरून घेतले. ओहोळाचे पाणी पोटात आणि बाटल्यात भरून मंडळी निघाली. आज आमच्यापैकी  दहा जणांनी पुढच्या ट्रेकसाठी पोर्टर घेतले. कमालीची गोष्ट म्हणजे हे पोर्टरचे काम बायका करणार होत्या. एकेक जण दोन दोन सॅक पाठीवर उचलत होत्या आणि जरा कुठे थांबलो की खिशातून लोकरीचे गुंडे काढून विणकाम चालू. आजची रपेट १४ किमी ची सांगण्यात आली होती. इथे अंतरावरून फारसा अंदाज येत नसला तरीही आज दम निघणार होता हे नक्की. उभा चढ आणि बर्फावर चालायची झलक हे आजच्या रपेटीचे विशेष.

340-way to camp3-20190507_144531 (reduced).jpg

लगेच सगळ्यांच्या काठ्या बाहेर निघाल्या. काहींच्या चांगल्या ब्रँडेड, तर काहींच्या लोकल.. आणि काहींनी नुसत्याच लाकडी काठ्या आणलेल्या. पण बर्फातून चालणे या नव्या प्रकारामुळे आजचा ट्रेक दामकाढू असला तरी उत्साहात संपला आणि दुपारी ४ च्या सुमारास वरच्या कॅम्पला पोहोचलो. आज अर्ध्या रस्त्यातच एक वुडलँडचा बूट सोल सोडून धारातीर्थी पडला आणि बूटवाला चिंतेत...त्याच्यापुढे मोठाच प्रश्न होता, पण आम्हाला सह्याद्रीत मिळालेले धडे उपयोगाला आले. त्याच्याच बुटाच्या लेस ने बुटाला सोल बांधला तो कॅम्पवर पोहोचल्यावरच सोडला. मग त्याने जवळच्या गावातून दुसरे बूट मागवले. आमचे देशी ऍक्शन चे बूट विदेशी वुडलँड च्या बुटांना हसत होते..

350-Camp-3-Ming Thatch (11200 ft) (reduced).jpg

हा कॅम्प  मिंगथाच ११२०० फुटांवरचा. टप्प्या टप्प्या ने अधिकाधिक "वरचे" निसर्ग सौन्दर्य आम्ही पाहात होतो. आता हिरवे डोंगर कमी कमी होत बर्फाच्छादित डोंगरच जास्त दिसायला लागले होते. या कॅम्पचे वैशिष्ठय म्हणजे खानपान व्यवस्था एका बाजूला ५० फूट खाली आणि "डबा" टाकायची व्यवस्था तशीच दुसऱ्या बाजूला. त्यामुळे तंबूपासुन सारखे चढ उतार करून मंडळी चांगलीच पकली. आमच्या ग्रुपमधले दोन "रावगारु" मात्र आज फारच ढेपाळले आणि त्यांनी ट्रेक सोडून जायचा निर्णय घेतला. कॅम्पमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण झाले होते. पण कॅम्प लीडरने इथून आमचा उद्याचा  "नागारू" कॅम्प उंचावर स्पष्टपणे दाखवल्यावर एकदम उत्साहाचे वातावरण झाले . लहान असताना जसे आकाशात विमान बघायचो तसे अधूनमधून बरेच जण सारखे "नागारू" दर्शन घेत होते आणि उत्साह वाढवत होते. समोरच्या डोंगरामाथ्याच्या एका टोकावर आमच्या तिथल्या तंबूचे हिरवे ठिपके स्पष्ट दिसत होते. आज खूप दमल्यामुळे काही जण जेमतेम जेवले आणि झोपले. रात्रीचा बोर्नव्हिटा पण बराचसा शिल्लक राहिला होता.

वर खाली टाळण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रातर्विधीची गोळी घेतली आणि पोटात नाश्ता आणि डब्यात दुपारचे जेवण घेऊन "तिकडे वर" पोहोचायचे या उत्साहात सकाळी ९ वाजता सगळे निघाले. सगळ्यात जास्त उंचीवरच्या कॅम्प ला जायचे म्हणून आज ग्रुपचे वातावरण वेगळेच होते .

401-On way to camp-4 (reduced).jpg

एका बर्फाच्या टप्प्यावरून पुढे गेल्यावर जेवणाचा थांबा झाला. हळूहळू हिरव्या ठिबक्यांचा आकार वाढत होता आणि आमचा उत्साहपण. संध्याकाळी साधारण ४ च्या सुमारास कॅम्पला पोहोचलो. पूर्ण बर्फाने वेढलेला हा पहिलाच कॅम्प.

450-Camp-4-Nagaru (12500 fr) (reduced).jpg

थोड्या भागात जमीन शिल्लक होती पण प्रचंड निसरडी. तिथे पोहोचल्या पोहोचल्या कॅम्प लीडर ने घसरण्याचा धोका सांगूनही आमच्यापैकी १०-१२ जणांनी घसरून धारातीमातेचा प्रसाद घेतलाच. इथले संडास एका बाजूला उतारावर पण बर्फातच खोदलेले. एक भरला की त्यावर माती... चुकलो....बर्फ टाकून दुसरा खोदायचा. गरमागरम चहा झाल्यावर कॅम्प लीडरने सांगितलेल्या आसपासच्या बर्फात सगळे मस्त फिरून, खेळून आलो आणि आम्हाला उद्याच्या रपेटीची झलक मिळाली.

इथले पिण्याचे पाणी देखील वरच्या बर्फाखालून वितळून वाहणारे . त्यामुळे गरम पाणी फारच मोजके आणि जपून वापरायची सूचना. कारण केवळ गॅसची बचत हा उद्देश नव्हता तर ते सिलिंडर खालच्या गावातून इथपर्यंत पोहोचवण्याच्या कष्टांची पण बचत करायची होती. त्यामुळे फक्त पिण्यासाठीच गरम पाणी मिळणार असे सांगितले गेले. साडेसहालाच सूप आणि लगेचच जेवणाची हाक आली. जेवण झाल्यावर मला प्यायला दिलेल्या गरम पाण्याने मी माझ्या वाडग्यात हात धुतले तेव्हा मी ओरडा खाल्ला, पण त्याच पाण्याने वाडगा धुवून ते पाणी प्यायलेले पाहिल्यावर "ये बढिया किया आपने" अशी शाबासकीही मिळवली.  उद्याची सुरुवातच १००% नव्या पडलेल्या बर्फातून असल्याचे गाईडने सांगितले. बर्फ वितळायला लागायच्या आत मुख्य बर्फातल्या चढणीचा टप्पा पार करायचा असेल तर पहाटे ३ वाजताच निघा असा सल्ला बर्फातल्या गाईड ने दिला. इथून पुढे आमच्या बरोबर दोन आधीचे आणि एक नवा "स्नो एक्स्पर्ट गाईड" असणार होता.

पहाटे अडीचला शिटी वाजली आणि कॅम्पवर काहीश्या अंधारात हालचाल सुरु झाली. बाहेर आलो तर स्वच्छ चांदणे होते. आकाशात डोक्यावर आपल्या आकाशगंगेचा लांबच लांब ढगासारखा पट्टा स्पष्ट दिसत होता. फक्त पुस्तकातच हे वर्णन वाचले होते पण अशी आकाशगंगा आजवर कधीच प्रत्यक्ष पाहायला मिळाली नव्हती. चहा नाश्ता केल्यावर जेवणाचे डबे घेऊन पहाटे साडेतीनच्या सुमारास काउंटिंग झाले आणि सगळे काठ्या सरसावून सगळे निघाले. सगळ्या ग्रुपमध्ये काठीशिवाय मी एकटाच असल्याने काहीशी भीती वाटत होती. गाईडला हे सांगितल्यावर त्याच्या उत्तराने माझी भीती कुठच्या कुठे पळाली "आप तो महाराष्ट्रमे ट्रेकिंग किये हुवे है, आपको स्टिक की कुछ जरुरत नही है " .. बर्फ भुसभुशीत असेल तर पाय थोडा आत घुसतो पण पकड चांगली मिळते. खूपच उतार असेल तर पाय टाकायच्या आधी बूट घासत रोवून उताराच्या विरुद्ध दिशेने खाच करायची आणि त्या खाचेवर पाय दाबून पुढे जायचे. या सगळ्या प्रकारामुळे वेळ लागत होता. अंधारात चालायचे असल्याने आज सगळा ग्रुप एकत्र असणे आवश्यक होते. चालणाऱ्यांच्यात अंतर पडू नये म्हणून हळू चालणाऱ्यांना आज मुद्दाम सगळ्यात पुढे ठेवण्यात आले होते आणि कोणीही ओव्हरटेक करायचे नाही अशी तंबीही देण्यात आली होती. त्यामुळे ग्रुपमधल्या पंचकन्या सर्वात पुढे आणि आम्ही मागे होतो. याचा एक फायदा झाला की आम्हाला पाय ठेवायला बऱ्याचश्या तयार खाचा मिळाल्या. काही ठिकाणी उतार खूपच म्हणजे ४५ अंशापेक्षाही जास्त होता. पण सह्याद्रीतील अनुभव भीतीला लांब ठेवत होता. दम लागण्याचे प्रमाण वाढले होते, पण एकूण ग्रुप हळूहळूच पुढे सरकत असल्याने तसा त्रास जाणवला नाही. सकाळी साधारण साडेसातच्या सुमारास ट्रेकमधले आमचे सर्वोच्च ठिकाण सर पास येथे पोहोचलो. (१३२०० फूट). सगळे लहान होऊन बर्फात खेळले, गोळे फेकले, बर्फाचे पुतळे केले. काहींनी तिरंगा फडकावला ..भारत मातेच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा झाल्या. उगवत्या सूर्याच्या किरणात न्हाऊन निघत चमकणाऱ्या शिवालिक पर्वत रांगा दूरवर असूनही स्पष्ट दिसत होत्या. आमच्या नशिबाने हवामान खूपच छान होते. गाईडने देव तिब्बा,  हनुमान तिब्बा अशी अनेक शिखरे दाखवली. साधारण तासाभराने निघालो. थोड्याश्या उतारानंतरची चढण आम्हाला या ट्रेकचे सगळ्यात मोठे आकर्षण असलेल्या भल्यामोठ्या घसरगुंडीकडे पोहोचवणार होती. चालायचे अंतर कमी होते पण शेवटची चढण ४५ अंशाहून जास्तीची अर्थात भलतीच दमछाक करणारी होती. इथले बर्फाचे डोंगर खूप जवळ वाटतात..१०-१५ मिनिटात आपण पोहोचू असे वाटत असते पण प्रत्यक्षात तासभर लागतो. "अरे चालो, बादमे कुछ मेहनत नही है खाली पाव उठाके स्लाईड करणा है" असे सांगत गाईड ग्रुप हाकत होता. बाराच्या सुमारास आम्ही डोंगरावरच्या "त्या" धारेवर पोहोचलो.  ताजा बर्फ पडून या ठिकाणी डोंगरमाथ्याला अक्षरशः "धार" आलेली होती.

510-On way to SAR Pass top point (reduced).jpg

या धारेवरूनच आम्हाला "स्लाईड" च्या ठिकाणापर्यंत जायचे होते. दोन्ही बाजूला ४५ अंशाचा उतार असल्याने सगळे जीव मुठीत धरून बर्फाची धार आपल्या पावलांनी काहीशी सपाट करत चालले होते. हा तोल सांभाळत चालण्याचा अनुभव पहिल्यांदाच घेणारे चांगलेच नाराज होते. अशा रिस्कची आधी कल्पना द्यायला हवी होती, म्हणजे आम्ही आलोच नसतो असेही म्हणत होते.

slide point 20190509_120818.jpg

शेवटी एकदा स्लाईड पॉईंट पाशी पोहोचलो.. बा बा बा... कुठपर्यंत घसरायचे हो हे... उतारावरच्या उन्हात चमकणाऱ्या त्या बर्फात खालपर्यंत नजर पोहोचत नव्हती...त्या शुभ्रतेला डोळे थोडे सरावल्यावर आधी घसरून गेलेली मंडळी खाली पांढऱ्या शुभ्र बर्फात रंगीत ठिबक्यांच्या रूपात दिसायला लागली. आपल्या ठाण्याच्या मामा भाच्याच्या डोंगरमाथ्यापासून वर्तकनगर असा काहीसा या घसरगुंडीचा टप्पा दिसत होता. योग्य पद्धतीने बसवून एकेकाला गाईड "सोडत" होता. काही जण चुकीच्या पध्दतीने घसरल्याने किंवा आपला शहाणपणा दाखवल्याने आडवे तिडवे होत खाली जात होते. पण धोका असा काही नसल्याने या सगळ्यात एक मौजच होती . सगळीकडे बर्फाची गादी होती ना हळुवार झेलायला.. माझा नंबर आला . गाईड उतारावर दोन पावले खाली गुडघ्यांपर्यंत पाय बर्फात रोवून उभा होता. मला पाय सरळ ठेवून खाली बसायला सांगितले आणि पाय हवेत थोडे वर उचलून पाठीवरची सॅक बर्फात टेकेपर्यंत मागे झुकायला सांगितले. आम्हाला धरून ठेवत कसे घसरायचे याच्या सूचना देत होता. हाताचे तळवे कानावर ठेवायचे. स्पीड कमी करायला हाताची कोपरं बाहेर काढून बर्फात घासायची. तळहात चुकूनही बर्फात धरू नका बधीर होईल. अशा सूचना ऐकता ऐकता त्याचे "जाओ " हे शब्द मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत मी त्याच्या ढेंगेतून सुसाट घसरत सुटलो होतो..दोन्ही बाजूला अथांग भुसभुशीत बर्फ, त्यामध्ये आमच्या घसरण्याने झालेले वेगवेगळे ट्रॅक दिसत होते. माझा घसरण्याचा ट्रॅक ठरवणे माझ्या ताब्यात नव्हते.. आधी घसरत गेलेल्यांच्या बाजूला पडलेल्या वस्तू त्या पांढऱ्या शुभ्र चमकणाऱ्या बर्फात उठून दिसत होत्या आणि झपाट्यानं मागे जात होत्या. आजवरच्या सर्व अनुभवांमध्ये हा अनुभव कित्येक पटीने सरस होता. अगदी माउंट टिटलिस वरची घसरगुंडी पण यापुढे थोटकी होती. ४-५ सेकांदातच बाणाप्रमाणे वेग आला होता. मधेच कोपरं बाहेर काढली तर दोन्ही बाजुंना बर्फाचे उंच कारंजे उडवत होती. बऱ्याच जणांनी सेल्फी स्टिक सांभाळत हा सारा अनुभव टिपला. मी मात्र हा अनुभव फक्त अनुभवत १००% मनात साठवत होतो. हळूहळू वेग मंदावला. खालच्या मंडळींचे आवाज ऐकू येऊ लागले आणि बर्फाच्या एक उंचावट्याला थडकून मी स्थिरावलो.

पॅन्ट पूर्ण भिजली होती. घसरतांना जॅकेट मधून आत छातीपर्यंत बर्फ शिरला होता त्यामुळे जवळजवळ सगळेच कपडे ओले झाले होते..पण पाठीवर सॅक सुरक्षित होती. सुदैवाने स्वच्छ ऊन असल्यामुळे अधून मधून एकेक बाजू थोडी थोडी शेकता येत होती. बाकीची मंडळी टप्प्या टप्प्याने येत होती.. काहींनी आल्यावर कपडे बदलले. आपापल्या अनुभवांच्या गप्पा मारत परत दोनतीन छोट्या घासरगुंडयांवरून घसरत बिस्केरी कॅम्पवर दाखल झालो. (११००० फूट). इथला मुख्य वेळ उन्हाची जागा पाहून दोऱ्या बांधणे आणि कपडे वाळवणे यातच गेला.
20210410_120601.jpg

हा कॅम्प छान हिरवळीवर होता. खालच्या बाजूला टुमदार गाव तर वरच्या बाजूला बर्फशिखरे दिसत होती. सगळेच कॅम्प अगदी कॅलेंडरवर फोटोत शोभून दिसतील असे. ट्रेकमधला सर्वोच्च आनंद उपभोगल्यावर उत्साह थोडासा कमी होतो आणि परतीचे वेध लागतात तसे झाले. पण स्लाईड च्या आठवणी मन ताजेतवाने करीत होत्या.

पुढचा कॅम्प "भंदक थाच" हा YHAI ने केवळ निसर्ग सौन्दर्य दाखवायला आणि आराम करायला ठेवलेला. खरंच आधीच्या सगळ्या कॅम्प साईट पेक्षा ही कॅम्पसाईट देखणी होती.
20210410_145248.jpg

दूरवर पसरलेले हिरवळीचे मैदान एखाद्या बागेत राखलेले असावे तसे. या हिरव्या लँडस्केप मागे थोड्या उंचीवर काही घरे, त्यामागे देवदार वृक्षांनी भरलेले डोंगर, त्याच्यावर बर्फाछादित शिखरे असा पहात राहावे असा देखावा. त्यावर अधूनमधून मावळतीच्या सूर्याची किरणे पडल्यावर उजळलेली सोनेरी शिखरे तर वेडच लावायची.  दुसऱ्या बाजूला खोल दरीत उतरत जाणारे हिरवे मैदान आणि मागे देवदाराची रांगोळी. असे मोकळे हिरवे मैदान मिळाल्यावर आम्ही मनसोक्त सोनसाखळी, लगोरी खेळलो. हिरवळीवर मधेच एका ठिकाणी वीस पंचवीस फूट उंच असा काळा तुकतुकीत खडक हिरवळीची शोभा अधिकच वाढवत होता. त्यावर जाऊन फोटो सेशन झाले. पण लगेचच पाऊस आल्यामुळे सगळे तंबूत परतलो. थोडा वेळ "माफिया" हा नवीनच समजलेला खेळ खेळलो. पाऊस असल्याने आज कॅम्प लीडर ने तंबूत जेवायला देण्याची व्यवस्था केली.  मग बराच वेळ गमतीशीर "आंतरतंबू" गाण्याच्या भेंड्या खेळलो आणि झोपलो.

पुढचा दिवस ट्रेकचा शेवट.. रिमझीम पाऊस चालू होता. थंडी वाढली होती. स्लीपिंग बॅग मधून बाहेर पडावेसे वाटत नव्हते.पण फिल्ड डायरेक्टर चे शब्द आठवले "if you want to enjoy maximun, be inside the tent minimum"  आणि रेनकोट घालून तंबू बाहेर पडलो.  बाहेर पडल्यावर मात्र इथले वातावरण खूप छान वाटत होते..मग दोन तंबूमध्ये नाश्त्या चे पराठे पोहोचवले.. कारण बाकीचे कोणीही आपापल्या तंबूतून बाहेर पडायला धजावत नव्हते आणि मला तंबूत जावेसे वाटत नव्हते. तासभर एकटाच बाहेर होतो..सर्व कॅम्प परिसर निवांत फिरत...तो निसर्ग डोळ्यात भरून घेत...पुनः असे फिरणे होइपर्यंत पुरतील अशा आठवणींचे साठवण करत..

शेवटी निघायची वेळ झाली. शिट्या वाजल्या.. तंबू हालले.. मंडळी सॅक पाठीवर घेऊन बाहेर पडली

निसर्गाच्या त्या देखाव्याला नाईलाजानेच रामराम केला आणि झपाट्याने उतरत परत कसोल बेस कॅम्पला पोहोचलो. एकमेकांचे नंबर दिले गेले, फोटो पाठवायचे प्लांनिंग झाले. फोनला संजीवनी मिळाली, घरी सुखरूप असल्याचे निरोप गेले.  त्या दिवशी बेस कॅम्पमध्ये मुक्काम करायची परवानगी होती. निवांत मुक्काम झाला. संध्याकाळी नवीन आलेल्यांना अनुभवाचे चार शब्द सांगितले. इथे रोज रात्री एकेका गटाकडून करमणुकीचा कार्यक्रम सादर केला जातो. त्यानंतर ट्रेक पूर्ण केलेल्याना प्रमाणपत्र देण्यात येते आणि काहींना अनुभव सांगायला सांगितले जाते. इथल्या YHAI लीडरने मला "नागारू"ला गरम पाणी कसे वापरले हे सर्वाना सांगायला सांगितले आणि नंतर पुढच्या वर्षी कॅम्प लीडर म्हणून या असा आग्रहही केला. ट्रेक यशस्वी झाला!!

दुसऱ्या दिवशी, YHAI च्या वस्तू परत करून माझी सॅक भरली. नव्या निघालेल्या ग्रुपला टाळ्यांच्या गजरात फ्लॅग ऑफ दिला. एकूणच इथल्या या कॅम्पच्या वातावरणात अजून दोनचार दिवस राहावे असे मनापासून वाटत होते पण इलाज नव्हता. उत्तम व्यवस्थे बद्दल YHAI टीम चे आभार मानले आणि कधीही न विसरता येणाऱ्या सोनेरी आठवणींची शिदोरी घेऊन कॅम्प सोडला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान. .. मस्त वाटले कि तुम्ही असे भारी भारी ट्रेक करता. माझ्यासाठी तर असे ट्रेक एक स्वप्नच राहील. .

सुपर!!!
2000 साली केलेल्या YHAI सारपास ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या! भारतात असेपर्यंत अजून काही ट्रेक्स करायला हवे होते असे राहून राहून वाटते!

सह्याद्री मोठा भाऊ आहे>> धन्यवाद बन्या, केली सुधारणा..

जिज्ञासा, फोटो links परत टाकल्या आहेत. आता दिसावेत सगळे फोटो.

छान लिहिलेय. तिथे जाऊन आल्यासारखे वाटले. तो हिरव्या हिरवळीचा फोटो जाम आवडला. जुन्या हिंदी चित्रपटात ह्या हिरवळींवर कित्येक प्रेमळ छेडछाडी झाल्यात, प्रेमात भिजलेली गाणी हिरवळींवर लोळत गायली गेली आणि कित्येक विरहअश्रू ह्या हिरवळीवर ठिबकले..

सार पास हा युथ हॉस्टेलचा प्रचंड प्रसिद्ध ट्रेक आहे. बुकिंग ओपन होते त्या दिवशीच फुल होतो. Sad माझी खूप इच्छा आहे जायची. मे 2020 साठी सौर कुंडी ट्रेक बुक केला होता. त्याचा रीफंड पण अजून घेतला नाहीय.

खूप मस्त लेख आणि फोटोज.
२००३ ला केलेल्या अमरनाथ ट्रेकची आठवण झाली. पण तुमचा हा ट्रेक त्याहून खूप जास्त थरारक आहे असं वाटलं वाचून.