सुएझची सुटका
(उर्फ ‘चल ले चल खटारा खिंचके’)
सुटकेच्या मोहीमा उर्फ रेस्क्यू ऑपरेशन्स मला आवडतात. मग ती गल्लीतल्या सानेवाड्याच्या छपरावर अडकलेल्या मांजरीची सुटका असेल किंवा गुहेत अडकलेल्या तेरा थाई मुलांची सुटका असेल किंवा वणव्यात अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका असेल. मांजरीची सुटका म्हणजे तासाभराची निश्चिंती. म्हणजे सुरवात होते ती - ‘केव्हांच ओरडतंय, मी फोडणी टाकल्यापासून’, ‘अरे, असं कसं अडकलं?’,‘सान्यांना उठवा कुणी’, ‘शिडी आणा रे’ ‘अशी कशी सहाच फुटी शिडी’ ‘अरे त्या गुरमीतला फोन लाव, त्याचा हात पुरेल’ ‘नको, अग्निशमनला फोन लावा’ … अग्निशमन भोंगा वाजवत येतं तर ते भेदरलेलं पिल्लू अजूनच भेदरत आणि वीस फूटावरून उडी मारतं....... मांजरच ते! चार पायावर अलगद पडतं नि गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी पळून जातं.
मात्र सर्वच मोहीमा अशा झटपट सुटत नाहीत. थाई मुलांची सुटका करायला जवळजवळ सोळा दिवस लागले. अशीच एक रखडलेली सुटका म्हणजे “एव्हर गिव्हन”. सध्या हे मालवाहू जहाज ईजिप्तमध्ये अडकले आहे (हो, अजूनही अडकले आहे पण आता वेगळ्या कारणासाठी). निसर्गाचा अतर्क्यपणा आणि माणसाचे चक्रमपणा ह्याचा उत्तम नमूना ह्या सुटका नाट्यात बघायला मिळाला. मंडळी, तुमच्यापैकी अनेकांनी ही बातमी जशी जशी घडत गेली तशी तशी वाचली असेल, तर कुणी आताच हा लेख वाचत असाल. ह्या सुटका नाट्याच्या अनुषंगाने काही प्रश्न मला पडत गेले आणि त्यांची उत्तरे शोधताना जी माहिती हाती आली त्याचे संकलन म्हणजे हा लेख.
जलवाहतूक
आता पहिला प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने सागरी मार्गाने वाहतूकीचे फायदे काय? आज विमान, रेल्वे असे अनेक पर्याय असताना सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे कारण ती इतर पर्यायांपेक्षा अतिशय स्वस्त आहे. ह्यात मनुष्यबळ तसे कमी लागते. कंटेनर उर्फ जहाजी पेट्या सामानाची ने-आण खूप सोयीची करतात. उदा: शेतकरी/व्यापारी भाज्या-फळे इ नाशवंत माल कंटेनर्स मध्ये भरून ट्रकने ते कंटेनर्स बंदरात आणू शकतात आणि क्रेन्सने जहाजात ते चढवले जातात. मुक्कामाच्या ठिकाणी कंटेनर्स परत ट्रक, मालगाडी अशा वाहनात बसून नियोजित स्थळी जातात. कंटेनर मधून चोरीची शक्यता अगदी कमी असल्याने इंश्युरन्स वगैरे खर्च ही फार नसतात. कंटेनर मध्ये तापमान नियंत्रित असल्याने अन्न असले तरी नासाडी फार होत नाही.
कंटेनर
एक कंटेनर २० फूट (किंवा ४० फूट) लांब असतो. साधारणपणे असे नऊ हजार कंटेनर्स एका जहाजात बसतात. यात जहाज कसे भरायचे याचं शास्त्र आहे म्हणजे जे कंटेनर्स लांबच्या बंदरात रिकामे केले जातात ते खाली किंवा लांबवर ठेवायचे तर जे कंटेनर्स जवळच्या बंदरात आहेत ते वर ठेवायचे. प्रत्येक कंटेनरला एक नंबर असतो. एक जहाज भरायला सहा-सात दिवस लागतात. रोटरडॅमसारख्या बंदरात संगणक संचालित क्रेन्स असल्याने ऑपरेटर ताई आपल्या ऑफीसात बसून हे काम करू शकते. काही जागी प्रत्यक्ष व्यक्तीला क्रेन चालवून करावे लागते. जहाज नीट नाही भरले तर इतर बंदरात कंटेनरची शोधाशोध करण्यात वेळ जाऊ शकतो. ह्यामुळे बंदरात “पार्कींग” ची फी, कामगारांना ओव्हरटाईम इ खर्च वाढतात. म्हणून कंटेनर भरतानाच अनुभवी कामगार ह्या कामासाठी नेमतात. बंदरातून सागरात गेलेल्या एका जहाजावर बारा ते पंचवीस लोकांचा ताफा असू शकतो.
महाकाय जहाजे
ह्या जहाजांमध्ये अनेक बदल होत आहेत,- जसे रोल्सरॉईस सेल्फड्रायव्हींग जहाजे 2025 मध्ये उपलब्ध करणार आहे. गेल्या पन्नास वर्षात जहाजे महाकाय झाली आहेत. नऊ हजार ऐवजी आता तेवीस हजार कंटेनर मावतील अशी जहाजे आहेत. हे कंटेनर्स एकावर एक रचून चालत नाही कारण त्याने वाऱ्याच्या दिशेनुसार जहाज कलंडायची भीती निर्माण होते. त्यामुळे जहाजाचा आकारही वाढला - एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला पाच मिनिटाची पायपीट करावी लागेल (4 city blocks इतके म्हणजे चारशे मीटर). अशा सुमारे १३३ महाकाय नौका आजमितीला कार्यरत आहेत पण जहाजे मोठी झाली तर कालवे व अन्य जलमार्ग/ बंदरे ह्यात फार मोठ्या सुधारणा झाल्या नाहीत कारण महाकाय जहाजे हे एकूण सागरी वाहतुकीच्या १% च आहेत.
टगबोटी
ही महाकाय जहाजे बंदरात येताना किंवा जाताना जे नियंत्रण किंवा गती हवी ती ठेवू शकत नाहीत. म्हणून त्यांचा मदतीला टग बोट नावाचा प्रकार असतो. टग्याच असतात ह्या म्हणजे ह्या बोटीचा आकार लहान असला तरी इंजिन दणकट असते.म्हणजे दोन ते चार टग बोटी मिळून एवढे महाकाय जहाज सहज वळवू शकतात. सहसा टग बोट थेट जहाजालाच खूण असलेल्या जागी जाऊन चिकटते. टग बोट इतकी शक्तिमान असते की खुणेऐवजी इथे तिथे धक्का मारला तर जहाजालाच हानी होऊ शकते. क्वचित ह्या दोन होड्यांना बांधावे लागते आणि ‘चल ले चल खटारा खिंच के’ प्रकार करावा लागतो.
सुएझ कालवा
सुएझ कालवा म्हणजे आशियातील अरबी महासामुद्र व युरोपातील मेडीटेरेनियन समुद्र यांना जोडणारा चिंचोळा मार्ग. प्राचीन काळापासून हा मार्ग वापरला जात असला तरी 1956 साली ईजिप्तचे राष्ट्रपती नासेर यांनी ह्या कालव्याचे राष्ट्रीयकरण केले व आता व्यापाऱ्यांना फी भरून हा मार्ग वापरता येतो. आपल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दुप्पट लांबीचा (195 किमी) कालवा रुंदीला मात्र दोनशे मीटर्स आसपास आहे. आपल्या महाकाय नौकेची लांबी चारशे मीटर्स बरं! खोलीच्या बाबतीत म्हणायचं तर हा कालवा बशीसारखा मध्यभागी खोल आणि कडेला कमी पाणी असणारा आहे.
ह्या कालव्यातून 15 kms ताशी ह्या गतीने एक जहाज बारा ते सोळा तासात सुएझ पार करते. दिवसभरात 70 च्या आसपास जहाजे ये-जा करतात. सत्तर आकडा लहान वाटेल पण एकूण सुमारे एक बिलियन डॉलरचा माल (तयार किंवा कच्चा) रोज इथून जातो. एकूण सागरी वाहतूकीच्या बारा टक्के ही वाहतूक आहे.
#वेळच तशी होती
नेहमीप्रमाणे एव्हरगिव्हन हे जहाज मलेशियातील तानयुंग बंदरातून रॉटरडॅम येथे जायला निघाले. २३ मार्च २०२१ ला सुएझ कालव्यात आले. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या तौफीक बंदरापासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असताना पहाटे सोसाट्याचे वारे सुटले. वाळूमुळे अनेक दृष्टीपथात (“व्हिजिबिलिटी”) अडचणी आल्या.... जहाजाबरोबर दोन टग बोटी रस्ता दाखवायला असतात त्या दिसेनाशा झाल्या. जहाजावरचे नियंत्रण गेले.... जहाज वेडेवाकडे कालव्यातून पुढे जाऊ लागले. आणि नाक आशियाकडे तर शेपूट आफ्रिकेकडे अशा विचित्र तिरकस अवस्थेत ते कालव्यात रुतले... अडकले. “रन अग्राउंड” म्हणजे पाणी सोडून जहाज जमिनीत किंवा उथळ भागात आले. आता परत ते पाण्यात नेणे अवघड!!
केवळ वाऱ्यामुळे असे झाले याबाबत अजून एकमत नाही. जहाजाचा वेग गरजेपेक्षा अधिक असावा असा एक कयास आहे. अशा घटना केवळ एका चुकीमुळे न होता अनेक चूका-त्रुटींचा शृखंलेमुळे घडतात. म्हणून अधिक तपास होईपर्यंत सांगता येत नाही असे तज्ज्ञांचे मत पडले. सध्या हा तपास चालू आहे. “असं कसं नियंत्रण गेलं?” हा प्रश्न असणाऱ्यांसाठी ही लिंक बघा आणि त्यावर खेळ (सिम्यूलेशन) खेळून बघा.
https://www.cnn.com/travel/article/steering-worlds-biggest-ships-suez-ca...
खोळंबा
सुएझ कालव्याला मध्यभागात दोन फाटे आहेत. जहाज एका मार्गावर अडकले असते तर दुसरीकडून वाहतूक सुरू ठेवता आली असती. मात्र जहाज फाट्यांच्या आधीच अडकल्याने अख्खा कालवा बंद पडला. एकीकडे ह्या मागे अमक्या- तमक्या देशाचा हात असावा असे कयास बांधले जाऊ लागले तर जहाज मालकांनी, ऑपरेटींग कंपन्या इ यांनी लगेच आपली जबाबदारी झटकण्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली. विमा कंपन्यांचे धाबे दणाणले कारण आजवर “पाच फोन फुटले” “केळ्याचे घड वाया गेले” अशा लहानमोठ्या कारणासाठी पैसे अदा करणाऱ्या कंपन्यांना अख्खा सुएझ बंद पडल्याचा भुर्दंड पडू शकला असता.
आता कालव्याच्या दोन्ही टोकाशी इतर जहाजांची गर्दी जमू लागली. सहा दिवस हा खोळंबा चालला तोवर सुमारे चारशे जहाजे जमली होती. ह्या जहाजात कारखान्यांना लागणारा कच्चा माल होता म्हणजे अनेक कारखाने जे नुकतेच कोव्हीड नंतर सुरू झाले होते ते परत बंद पडणार होते. ह्यात नाईकी, सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्याही होत्या. काही जहाजांवर कोंबड्या, मेंढ्या अशी जनावरे होती. त्यांना प्रवासाच्या ठराविक कालावधी इतकेच खाद्य व इतर सुविधा जहाजावर होत्या. सुएझचे आखात सोडून आफ्रिकेमार्गे जायचे तर प्रवासाला बारा दिवस अधिक लागणार होते. मग त्यापेक्षा इथेच थांबून मार्ग मोकळा झाला तर वाट बघू असा विचार करून जहाजे थांबली. दर दिवसाला दहा बिलियन डॉलर प्रमाणे नुकसान होऊ लागले. जहाजे ज्या बंदरात जाणार होती त्या बंदरांचे काम थंडावले.
सुटका
हे जहाज सोडवणे सोपे नव्हते कारण एक मार्ग शोधावा तर दुसरेच त्रांगडे उभे राहत होते. दुःखात सुख एवढेच होते की जहाजावरचे सगळे तेवीस भारतीय कामगार सुखरूप होते. जहाजाबरोबरच्या दोन टग बोटी सोडवायला आल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. आता पहिला मार्ग होता जहाजाभोवतीची वाळू काढायची म्हणजे पाणी तिथे शिरून जहाज पुन्हा तरंगू लागेल. मात्र तसे एक्सकेव्हेटर त्या लहान गावात फार नव्हते. एक बिचारा चिमुकला एक्सकेव्हेटर आला. ह्या मशीनचा चालक अब्दुल्ला अब्दुल-गावाद पुढचे सहा दिवस रोज रात्री फक्त तीन तास झोपला. वाळू बाजूला होत होती तरी महाकाय जहाज हलत नव्हते.
आता जपान, ईजिप्त, भारत, जर्मनी सगळीकडचे तज्ञ ह्या प्रश्नावर डोके चालवू लागले. असे ‘रन अग्राउंड’ अपघात सहसा बंदरात घडतात. कालव्यात मध्येच घडल्यावर सोडवण्यासाठी साल्व्हेज कंपन्यांना उपकरणे तिथे कशी आणायची असे प्रश्न पडले. दोन नेहमीच्या आणि अजून दोन अधिक ताकदीच्या टग बोटी आल्या पण त्या केवळ शेपटाकडचा भाग सोडवू शकल्या. अधिक झटापट शक्य नव्हती कारण अख्खे जहाज दुभंगले असते. आता दुसरे उपकरण मदतीला आले - ड्रेजर. ड्रेजर बोट म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर जणू. समुद्रातील गाळ उपसून इतर जागी टाकून मुंबईत किंवा दुबईत ‘रेक्लेमेशन’ केले आहे. ड्रेजर अशा गाळ उपसण्याचा कामासाठी लागतो. दोन दिवस ‘मशहूर’ नावाची ड्रेजर बोट अथक काम करत होती. आता एकूण सहा दिवस जहाज अडकले होते नि पौर्णिमा जवळ येऊ लागली होती. ह्या दिवशी भरती अधिक येऊन जहाज तरंगेल अशी आशा सर्वाना होती.
मात्र तसे झालं नाही तर काय करणार? हा प्रश्न मिडीया, साल्वेज कंपन्या सर्वाना होता. कारण शेवटचा पर्याय म्हणजे जहाजाचे वजन कमी करणे - मग पाणी तळाशी पटकन जाईल आणि जहाज तरंगेल. ह्याला अधिक उपकरणे जसे क्रेन्स, दुसरी कंटेनर बोट इ लागले असते. वस्तू फेकल्या असत्या तर विमा कंपन्यांनी बोंबाबोंब केली असती म्हणून तो पर्याय नव्हता. एकूणात अधिक खर्चिक आणि अधिक वैतागाचा प्रकार होता.
देवालाच काळजी असते म्हणतात ना...शेवटी भरतीमुळे जहाज तरंगले! .... कालवा मोकळा झाला!!
अंत भला
ह्या निमित्ताने काय सुधारणा हव्या हे प्रकर्षाने लक्षात आले. जहाजांचा आकार किती असावा, त्यावर कुठल्या नियंत्रण प्रणाली असाव्या ह्या बद्दल संशोधन, नियमावली असणे गरजेचे आहे. सुएझला पर्याय म्हणून इस्राएल किंवा अन्यत्र कालवे करता येतील का? किंवा सुएझ मध्येच अधिक रुंदीकरण, व्यवस्थापन करणे शक्य आहे काय? एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या निमीत्ताने शोधावी लागणार आहेत.
कालवा सुटला तरी ते जहाज अजून सुटले नाही. नंतरच्या तपासणीत जहाज पुढच्या प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे आढळले म्हणून जहाज सुएझ मार्गे कैरोजवळ आले. मात्र नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय जहाज रॉटरडॅमला जाऊ देणार नाही अशी भूमिका ईजिप्त सरकारने घेतल्यामुळे आजही जहाज ईजिप्तच्याच बंदरात आहे. ते तेवीस कामगार सुखरूप आहेत, कुठल्याही कैदेत वगैरे नाहीत पण अजून घरीही पोहोचले नाहीत. ते लवकर आपल्या कुटूंबियांना भेटोत हीच ह्या लेखाच्या निमित्ताने शुभेच्छा.
ह्या जहाजाची सध्याची स्थिती इथे दिसेल.
मंडळी, तुमच्यापैकी काही लोक माझे लेखन नियमित वाचता. त्या कुणाच्या मनात आले असेल “काय सीमंतिनी, ह्या सुटका नाट्यात नायिका नाही?” रागावू नका मंडळी! ही गमंत ऐका. मारवा एलसेल्हेदार ही ईजिप्त मधली पहिली महिला जहाज कॅप्टन आहे. तिला कॅप्टन म्हणून ईजिप्तच्या राष्ट्रपतींनी गौरवले आहे. ती एव्हरगिव्हन पासून अनेक मैल दूर ती ऐडा- ४ जहाजावर होती. पण सोशल मिडीयावर ती कप्तान असल्याने जहाज धसले असा बोलबाला झाला. शेवटी तिला ती कुठे आहे याचे पत्रक काढावे लागले. आज व्यापारी वाहतूकीत फक्त 2% महिला आहेत. आशा करू की पुन्हा असे अपघात होऊ नये म्हणून जे काही नियोजन लागते त्या नियोजनात या महिला सहभागी होतील आणि अशी घटना पुन्हा घडली तर सुटका नाट्यातही सहभागी होतील.
उपकरणांची व्हिडियो यादी:
https://www.youtube.com/watch?v=DY9VE3i-KcM
https://www.youtube.com/watch?v=2JcHMhtH6_s
https://www.youtube.com/watch?v=XDX1py_tbYE
https://www.youtube.com/watch?v=qb5pkVadvqA
https://www.youtube.com/watch?v=ZqdBf8pr2og
सन्दर्भ सूची:
https://en.wikipedia.org/wiki/Suez_Canal
https://theconversation.com/suez-canal-blockage-how-cargo-ships-like-eve....
https://www.bbc.com/news/world-middle-east-56615521
https://www.businessinsider.com/ever-given-excavator-driver-did-not-like...
सीमंतिनी, नेहमीप्रमाणे एक
सीमंतिनी, नेहमीप्रमाणे एक चांगला लेख.
छान लिहिलय. .
छान लिहिलय. .
देवालाच काळजी असते म्हणतात ना
नियोजनात या महिला सहभागी होतील आणि अशी घटना पुन्हा घडली तर सुटका नाट्यातही सहभागी होतील.... +1
छान लिहिले आहे सी !
पंचवीसाव्या धाग्याबद्दल (एक चुकून काढलेला सोडून) अभिनंदन!
छान आढावा.
छान आढावा.
खूप छान लेख, सीमंतिनी.
खूप छान लेख, सीमंतिनी.
ह्या सुटका नाट्यात नायिका नाही? >> मी विचारणारच होतो
खूपच छान लेख. केव्हढी मेहनत
खूपच छान लेख. केव्हढी मेहनत घेतलीये !
__/\__
अभ्यासपूर्ण लिखाण... बऱ्याच
अभ्यासपूर्ण लिखाण... बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या त्या स्पष्ट झाल्या...
त्या महिला कॅप्टन बद्धल खरेच माहीत नव्हते, मी समजलो खरेच ती चालवत होती हे अडकलेले जहाज... काय पटापट अफवा पसरतात सोमी वर...
सी, नेहेमीप्रमाणे छान लिहीलस
सी, नेहेमीप्रमाणे छान लिहीलस. चांगला आढावा घेतला आहेस
सीमंतिनी, लेख आवडला.
सीमंतिनी, लेख आवडला.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
'अपूर्वाई' मध्ये असा उल्लेख आहे का, की मोठ्या बोटींना कालव्यातून मार्ग दाखवायला छोट्या पायलट बोटी असतात. जणू एखाद्या परकरी पोरीने लठ्ठ आत्याबाईंना बोळकांडीतून चटकन बाहेर काढावं तसं या पायलट बोटी करतात.
मला बातम्या वाचून टग बोटी म्हणजे असा काही तरी प्रकार असेल असं वाटलं होतं. की पायलट बोटी वेगळ्या असतात?
मस्त माहिती मिळाली सिमंतिनी
मस्त माहिती मिळाली सिमंतिनी
गेम पण आवडला
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
लेख आवडला.
लेख आवडला.
मस्त लेख.
मस्त लेख.
हे सगळं डोळ्यासमोर आणणं जरा कठीण आहे.
आता मग कालवा रुंदीकरण हाती घेणार का?
सर्वांना धन्यवाद. अस्मिता,
सर्वांना धन्यवाद. अस्मिता, धन्यवाद.
हरचंद पालव >>
वावे >> ह्या घटनेत टग बोटी पायलट होत्या. पण लहान क्षमतेच्या पायलट बोटीही वापरतात.
बन्या >> तो गेम मला अजिबात जमला नाही, म्हणून आवडला नाही
अनु>> चौथी यूट्यूब लिंक बघ. सुएझ मधून जाणार्या जहाजावरून गोप्रो केलेला व्हिडीयो आहे. आवडेल कदाचित. हो, रूंदीकरण करायला हवे आहे. पण वेळखाऊपणा का करतात माहिती नाही!
छान लेख. आवडला.
छान लेख. आवडला.
छान आढावा घेतलाय.
छान आढावा घेतलाय.
नुसती बातमी ऐकली होती, काय घडलं याचा अंदाज होता या लेखात सगळी माहिती मिळाली.
खूप छान लेख लिहिलायं..!
खूप छान लेख लिहिलायं..!
छान माहिती मिळाली.
छान लेख, आवडला!
छान लेख, आवडला!
@सिमंतिनी -लोल
@सिमंतिनी -लोल
ह्युंदाई कंपनीने जगातली
ह्युंदाई कंपनीने जगातली महाकाय जहाजं विक्रमी वेळात बांधली आहेत. त्यासाठी लागणा-या क्रेन्सपासून मशिनरी त्यांनी नव्याने बनवली आहे. एव्हढी गुंतवणूक ह्युंदाई वाया जाऊ देईल का ?
कोरिया आपल्यापुढे कसा या वेडाने चीनने त्याहीपेक्षा महाकाय जहाजे बांधायला घेतली आहेत. चीनने जो संकल्प सोडला तो अर्धवट सोडला असे होत नाही. त्यामुळे महाकाय जहाजांची स्पर्धाच सुरू होईल. या जोडीला चीन बंदरं विकसित करतोय, विकत घेतोय आणि नवनव्या सागरी मार्गांसाठी छोट्या देशांना परवानग्या द्यायला भाग पाडतोय. त्यामुळे चीन महासागरी सत्ता होण्याकडे वाटचाल करतोय हे निश्चित. एका जहाजात जास्तीत जास्त माल नेण्याने निर्यात जलद होते. निर्यातीचा वेळ कमी झाल्याने आयातदार अशा कंपन्यांना पसंती देतात. चीनने अलिबाबा सारख्या कंपन्यातून व्यापारावर वर्चस्व मिळवले आहे. आता त्यांचे लक्ष वाहतुकीवर आहे.
त्यामुळे जहाजाची लांबी कमी करायला चीन मोठाच अडसर ठरू शकतो.
More Info : There are 3 types
.
छान माहिती.
छान माहिती.
गेम मजेदार आहे.
दोन तीन प्रयत्नानंतर जमला.
उद्बोधक अन व्यासंगपूर्ण...
उद्बोधक अन व्यासंगपूर्ण... गेम पण मस्त
चीन सागरी क्षेत्रात इतका पुढे
चीन सागरी क्षेत्रात इतका पुढे अाहे की ते सगळा कच्चा/ अर्धा माल घेऊनच निघतात
मालाची असेंबली सगळी जहाजावरच होते, युरोप येईपर्यंत माल तयार झालेला असतो, भयानक वेगात ते आॅड्र्स संपवतात
मालाची असेंबली सगळी जहाजावरच
मालाची असेंबली सगळी जहाजावरच होते >>> तो चीन वेगळा आहे. तिथे जाण्यासाठी प्रभुदेसाईंना भेटावे लागेल.
मस्त माहिती सी! थोडीशी फॉलो
मस्त माहिती सी! थोडीशी फॉलो करत होते ही बातमी पण इतके बारकावे माहिती नव्हते.
छान माहिती.
छान माहिती.
बातमी वाचून, जहाज कसे अडकले असेल आणि कशी सुटका केली असेल त्याची उत्सुकता होती. इथे माहिती मिळाली.
धन्यवाद.
सविस्तर छान लिहिले आहे.
सविस्तर छान लिहिले आहे.
आवडलं.
आवडलं.
Pages