सुएझची सुटका
(उर्फ ‘चल ले चल खटारा खिंचके’)
सुटकेच्या मोहीमा उर्फ रेस्क्यू ऑपरेशन्स मला आवडतात. मग ती गल्लीतल्या सानेवाड्याच्या छपरावर अडकलेल्या मांजरीची सुटका असेल किंवा गुहेत अडकलेल्या तेरा थाई मुलांची सुटका असेल किंवा वणव्यात अडकलेल्या गिर्यारोहकांची सुटका असेल. मांजरीची सुटका म्हणजे तासाभराची निश्चिंती. म्हणजे सुरवात होते ती - ‘केव्हांच ओरडतंय, मी फोडणी टाकल्यापासून’, ‘अरे, असं कसं अडकलं?’,‘सान्यांना उठवा कुणी’, ‘शिडी आणा रे’ ‘अशी कशी सहाच फुटी शिडी’ ‘अरे त्या गुरमीतला फोन लाव, त्याचा हात पुरेल’ ‘नको, अग्निशमनला फोन लावा’ … अग्निशमन भोंगा वाजवत येतं तर ते भेदरलेलं पिल्लू अजूनच भेदरत आणि वीस फूटावरून उडी मारतं....... मांजरच ते! चार पायावर अलगद पडतं नि गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी पळून जातं.
मात्र सर्वच मोहीमा अशा झटपट सुटत नाहीत. थाई मुलांची सुटका करायला जवळजवळ सोळा दिवस लागले. अशीच एक रखडलेली सुटका म्हणजे “एव्हर गिव्हन”. सध्या हे मालवाहू जहाज ईजिप्तमध्ये अडकले आहे (हो, अजूनही अडकले आहे पण आता वेगळ्या कारणासाठी). निसर्गाचा अतर्क्यपणा आणि माणसाचे चक्रमपणा ह्याचा उत्तम नमूना ह्या सुटका नाट्यात बघायला मिळाला. मंडळी, तुमच्यापैकी अनेकांनी ही बातमी जशी जशी घडत गेली तशी तशी वाचली असेल, तर कुणी आताच हा लेख वाचत असाल. ह्या सुटका नाट्याच्या अनुषंगाने काही प्रश्न मला पडत गेले आणि त्यांची उत्तरे शोधताना जी माहिती हाती आली त्याचे संकलन म्हणजे हा लेख.
जलवाहतूक
आता पहिला प्रश्न म्हणजे अशा पद्धतीने सागरी मार्गाने वाहतूकीचे फायदे काय? आज विमान, रेल्वे असे अनेक पर्याय असताना सागरी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे कारण ती इतर पर्यायांपेक्षा अतिशय स्वस्त आहे. ह्यात मनुष्यबळ तसे कमी लागते. कंटेनर उर्फ जहाजी पेट्या सामानाची ने-आण खूप सोयीची करतात. उदा: शेतकरी/व्यापारी भाज्या-फळे इ नाशवंत माल कंटेनर्स मध्ये भरून ट्रकने ते कंटेनर्स बंदरात आणू शकतात आणि क्रेन्सने जहाजात ते चढवले जातात. मुक्कामाच्या ठिकाणी कंटेनर्स परत ट्रक, मालगाडी अशा वाहनात बसून नियोजित स्थळी जातात. कंटेनर मधून चोरीची शक्यता अगदी कमी असल्याने इंश्युरन्स वगैरे खर्च ही फार नसतात. कंटेनर मध्ये तापमान नियंत्रित असल्याने अन्न असले तरी नासाडी फार होत नाही.
कंटेनर
एक कंटेनर २० फूट (किंवा ४० फूट) लांब असतो. साधारणपणे असे नऊ हजार कंटेनर्स एका जहाजात बसतात. यात जहाज कसे भरायचे याचं शास्त्र आहे म्हणजे जे कंटेनर्स लांबच्या बंदरात रिकामे केले जातात ते खाली किंवा लांबवर ठेवायचे तर जे कंटेनर्स जवळच्या बंदरात आहेत ते वर ठेवायचे. प्रत्येक कंटेनरला एक नंबर असतो. एक जहाज भरायला सहा-सात दिवस लागतात. रोटरडॅमसारख्या बंदरात संगणक संचालित क्रेन्स असल्याने ऑपरेटर ताई आपल्या ऑफीसात बसून हे काम करू शकते. काही जागी प्रत्यक्ष व्यक्तीला क्रेन चालवून करावे लागते. जहाज नीट नाही भरले तर इतर बंदरात कंटेनरची शोधाशोध करण्यात वेळ जाऊ शकतो. ह्यामुळे बंदरात “पार्कींग” ची फी, कामगारांना ओव्हरटाईम इ खर्च वाढतात. म्हणून कंटेनर भरतानाच अनुभवी कामगार ह्या कामासाठी नेमतात. बंदरातून सागरात गेलेल्या एका जहाजावर बारा ते पंचवीस लोकांचा ताफा असू शकतो.
महाकाय जहाजे
ह्या जहाजांमध्ये अनेक बदल होत आहेत,- जसे रोल्सरॉईस सेल्फड्रायव्हींग जहाजे 2025 मध्ये उपलब्ध करणार आहे. गेल्या पन्नास वर्षात जहाजे महाकाय झाली आहेत. नऊ हजार ऐवजी आता तेवीस हजार कंटेनर मावतील अशी जहाजे आहेत. हे कंटेनर्स एकावर एक रचून चालत नाही कारण त्याने वाऱ्याच्या दिशेनुसार जहाज कलंडायची भीती निर्माण होते. त्यामुळे जहाजाचा आकारही वाढला - एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जायला पाच मिनिटाची पायपीट करावी लागेल (4 city blocks इतके म्हणजे चारशे मीटर). अशा सुमारे १३३ महाकाय नौका आजमितीला कार्यरत आहेत पण जहाजे मोठी झाली तर कालवे व अन्य जलमार्ग/ बंदरे ह्यात फार मोठ्या सुधारणा झाल्या नाहीत कारण महाकाय जहाजे हे एकूण सागरी वाहतुकीच्या १% च आहेत.
टगबोटी
ही महाकाय जहाजे बंदरात येताना किंवा जाताना जे नियंत्रण किंवा गती हवी ती ठेवू शकत नाहीत. म्हणून त्यांचा मदतीला टग बोट नावाचा प्रकार असतो. टग्याच असतात ह्या म्हणजे ह्या बोटीचा आकार लहान असला तरी इंजिन दणकट असते.म्हणजे दोन ते चार टग बोटी मिळून एवढे महाकाय जहाज सहज वळवू शकतात. सहसा टग बोट थेट जहाजालाच खूण असलेल्या जागी जाऊन चिकटते. टग बोट इतकी शक्तिमान असते की खुणेऐवजी इथे तिथे धक्का मारला तर जहाजालाच हानी होऊ शकते. क्वचित ह्या दोन होड्यांना बांधावे लागते आणि ‘चल ले चल खटारा खिंच के’ प्रकार करावा लागतो.
सुएझ कालवा
सुएझ कालवा म्हणजे आशियातील अरबी महासामुद्र व युरोपातील मेडीटेरेनियन समुद्र यांना जोडणारा चिंचोळा मार्ग. प्राचीन काळापासून हा मार्ग वापरला जात असला तरी 1956 साली ईजिप्तचे राष्ट्रपती नासेर यांनी ह्या कालव्याचे राष्ट्रीयकरण केले व आता व्यापाऱ्यांना फी भरून हा मार्ग वापरता येतो. आपल्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दुप्पट लांबीचा (195 किमी) कालवा रुंदीला मात्र दोनशे मीटर्स आसपास आहे. आपल्या महाकाय नौकेची लांबी चारशे मीटर्स बरं! खोलीच्या बाबतीत म्हणायचं तर हा कालवा बशीसारखा मध्यभागी खोल आणि कडेला कमी पाणी असणारा आहे.
ह्या कालव्यातून 15 kms ताशी ह्या गतीने एक जहाज बारा ते सोळा तासात सुएझ पार करते. दिवसभरात 70 च्या आसपास जहाजे ये-जा करतात. सत्तर आकडा लहान वाटेल पण एकूण सुमारे एक बिलियन डॉलरचा माल (तयार किंवा कच्चा) रोज इथून जातो. एकूण सागरी वाहतूकीच्या बारा टक्के ही वाहतूक आहे.
#वेळच तशी होती
नेहमीप्रमाणे एव्हरगिव्हन हे जहाज मलेशियातील तानयुंग बंदरातून रॉटरडॅम येथे जायला निघाले. २३ मार्च २०२१ ला सुएझ कालव्यात आले. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या तौफीक बंदरापासून सुमारे चार-पाच किलोमीटर अंतरावर असताना पहाटे सोसाट्याचे वारे सुटले. वाळूमुळे अनेक दृष्टीपथात (“व्हिजिबिलिटी”) अडचणी आल्या.... जहाजाबरोबर दोन टग बोटी रस्ता दाखवायला असतात त्या दिसेनाशा झाल्या. जहाजावरचे नियंत्रण गेले.... जहाज वेडेवाकडे कालव्यातून पुढे जाऊ लागले. आणि नाक आशियाकडे तर शेपूट आफ्रिकेकडे अशा विचित्र तिरकस अवस्थेत ते कालव्यात रुतले... अडकले. “रन अग्राउंड” म्हणजे पाणी सोडून जहाज जमिनीत किंवा उथळ भागात आले. आता परत ते पाण्यात नेणे अवघड!!
केवळ वाऱ्यामुळे असे झाले याबाबत अजून एकमत नाही. जहाजाचा वेग गरजेपेक्षा अधिक असावा असा एक कयास आहे. अशा घटना केवळ एका चुकीमुळे न होता अनेक चूका-त्रुटींचा शृखंलेमुळे घडतात. म्हणून अधिक तपास होईपर्यंत सांगता येत नाही असे तज्ज्ञांचे मत पडले. सध्या हा तपास चालू आहे. “असं कसं नियंत्रण गेलं?” हा प्रश्न असणाऱ्यांसाठी ही लिंक बघा आणि त्यावर खेळ (सिम्यूलेशन) खेळून बघा.
https://www.cnn.com/travel/article/steering-worlds-biggest-ships-suez-ca...
खोळंबा
सुएझ कालव्याला मध्यभागात दोन फाटे आहेत. जहाज एका मार्गावर अडकले असते तर दुसरीकडून वाहतूक सुरू ठेवता आली असती. मात्र जहाज फाट्यांच्या आधीच अडकल्याने अख्खा कालवा बंद पडला. एकीकडे ह्या मागे अमक्या- तमक्या देशाचा हात असावा असे कयास बांधले जाऊ लागले तर जहाज मालकांनी, ऑपरेटींग कंपन्या इ यांनी लगेच आपली जबाबदारी झटकण्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली. विमा कंपन्यांचे धाबे दणाणले कारण आजवर “पाच फोन फुटले” “केळ्याचे घड वाया गेले” अशा लहानमोठ्या कारणासाठी पैसे अदा करणाऱ्या कंपन्यांना अख्खा सुएझ बंद पडल्याचा भुर्दंड पडू शकला असता.
आता कालव्याच्या दोन्ही टोकाशी इतर जहाजांची गर्दी जमू लागली. सहा दिवस हा खोळंबा चालला तोवर सुमारे चारशे जहाजे जमली होती. ह्या जहाजात कारखान्यांना लागणारा कच्चा माल होता म्हणजे अनेक कारखाने जे नुकतेच कोव्हीड नंतर सुरू झाले होते ते परत बंद पडणार होते. ह्यात नाईकी, सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्याही होत्या. काही जहाजांवर कोंबड्या, मेंढ्या अशी जनावरे होती. त्यांना प्रवासाच्या ठराविक कालावधी इतकेच खाद्य व इतर सुविधा जहाजावर होत्या. सुएझचे आखात सोडून आफ्रिकेमार्गे जायचे तर प्रवासाला बारा दिवस अधिक लागणार होते. मग त्यापेक्षा इथेच थांबून मार्ग मोकळा झाला तर वाट बघू असा विचार करून जहाजे थांबली. दर दिवसाला दहा बिलियन डॉलर प्रमाणे नुकसान होऊ लागले. जहाजे ज्या बंदरात जाणार होती त्या बंदरांचे काम थंडावले.
सुटका
हे जहाज सोडवणे सोपे नव्हते कारण एक मार्ग शोधावा तर दुसरेच त्रांगडे उभे राहत होते. दुःखात सुख एवढेच होते की जहाजावरचे सगळे तेवीस भारतीय कामगार सुखरूप होते. जहाजाबरोबरच्या दोन टग बोटी सोडवायला आल्या पण त्याचा उपयोग झाला नाही. आता पहिला मार्ग होता जहाजाभोवतीची वाळू काढायची म्हणजे पाणी तिथे शिरून जहाज पुन्हा तरंगू लागेल. मात्र तसे एक्सकेव्हेटर त्या लहान गावात फार नव्हते. एक बिचारा चिमुकला एक्सकेव्हेटर आला. ह्या मशीनचा चालक अब्दुल्ला अब्दुल-गावाद पुढचे सहा दिवस रोज रात्री फक्त तीन तास झोपला. वाळू बाजूला होत होती तरी महाकाय जहाज हलत नव्हते.
आता जपान, ईजिप्त, भारत, जर्मनी सगळीकडचे तज्ञ ह्या प्रश्नावर डोके चालवू लागले. असे ‘रन अग्राउंड’ अपघात सहसा बंदरात घडतात. कालव्यात मध्येच घडल्यावर सोडवण्यासाठी साल्व्हेज कंपन्यांना उपकरणे तिथे कशी आणायची असे प्रश्न पडले. दोन नेहमीच्या आणि अजून दोन अधिक ताकदीच्या टग बोटी आल्या पण त्या केवळ शेपटाकडचा भाग सोडवू शकल्या. अधिक झटापट शक्य नव्हती कारण अख्खे जहाज दुभंगले असते. आता दुसरे उपकरण मदतीला आले - ड्रेजर. ड्रेजर बोट म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर जणू. समुद्रातील गाळ उपसून इतर जागी टाकून मुंबईत किंवा दुबईत ‘रेक्लेमेशन’ केले आहे. ड्रेजर अशा गाळ उपसण्याचा कामासाठी लागतो. दोन दिवस ‘मशहूर’ नावाची ड्रेजर बोट अथक काम करत होती. आता एकूण सहा दिवस जहाज अडकले होते नि पौर्णिमा जवळ येऊ लागली होती. ह्या दिवशी भरती अधिक येऊन जहाज तरंगेल अशी आशा सर्वाना होती.
मात्र तसे झालं नाही तर काय करणार? हा प्रश्न मिडीया, साल्वेज कंपन्या सर्वाना होता. कारण शेवटचा पर्याय म्हणजे जहाजाचे वजन कमी करणे - मग पाणी तळाशी पटकन जाईल आणि जहाज तरंगेल. ह्याला अधिक उपकरणे जसे क्रेन्स, दुसरी कंटेनर बोट इ लागले असते. वस्तू फेकल्या असत्या तर विमा कंपन्यांनी बोंबाबोंब केली असती म्हणून तो पर्याय नव्हता. एकूणात अधिक खर्चिक आणि अधिक वैतागाचा प्रकार होता.
देवालाच काळजी असते म्हणतात ना...शेवटी भरतीमुळे जहाज तरंगले! .... कालवा मोकळा झाला!!
अंत भला
ह्या निमित्ताने काय सुधारणा हव्या हे प्रकर्षाने लक्षात आले. जहाजांचा आकार किती असावा, त्यावर कुठल्या नियंत्रण प्रणाली असाव्या ह्या बद्दल संशोधन, नियमावली असणे गरजेचे आहे. सुएझला पर्याय म्हणून इस्राएल किंवा अन्यत्र कालवे करता येतील का? किंवा सुएझ मध्येच अधिक रुंदीकरण, व्यवस्थापन करणे शक्य आहे काय? एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या निमीत्ताने शोधावी लागणार आहेत.
कालवा सुटला तरी ते जहाज अजून सुटले नाही. नंतरच्या तपासणीत जहाज पुढच्या प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे आढळले म्हणून जहाज सुएझ मार्गे कैरोजवळ आले. मात्र नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय जहाज रॉटरडॅमला जाऊ देणार नाही अशी भूमिका ईजिप्त सरकारने घेतल्यामुळे आजही जहाज ईजिप्तच्याच बंदरात आहे. ते तेवीस कामगार सुखरूप आहेत, कुठल्याही कैदेत वगैरे नाहीत पण अजून घरीही पोहोचले नाहीत. ते लवकर आपल्या कुटूंबियांना भेटोत हीच ह्या लेखाच्या निमित्ताने शुभेच्छा.
ह्या जहाजाची सध्याची स्थिती इथे दिसेल.
मंडळी, तुमच्यापैकी काही लोक माझे लेखन नियमित वाचता. त्या कुणाच्या मनात आले असेल “काय सीमंतिनी, ह्या सुटका नाट्यात नायिका नाही?” रागावू नका मंडळी! ही गमंत ऐका. मारवा एलसेल्हेदार ही ईजिप्त मधली पहिली महिला जहाज कॅप्टन आहे. तिला कॅप्टन म्हणून ईजिप्तच्या राष्ट्रपतींनी गौरवले आहे. ती एव्हरगिव्हन पासून अनेक मैल दूर ती ऐडा- ४ जहाजावर होती. पण सोशल मिडीयावर ती कप्तान असल्याने जहाज धसले असा बोलबाला झाला. शेवटी तिला ती कुठे आहे याचे पत्रक काढावे लागले. आज व्यापारी वाहतूकीत फक्त 2% महिला आहेत. आशा करू की पुन्हा असे अपघात होऊ नये म्हणून जे काही नियोजन लागते त्या नियोजनात या महिला सहभागी होतील आणि अशी घटना पुन्हा घडली तर सुटका नाट्यातही सहभागी होतील.
उपकरणांची व्हिडियो यादी:
https://www.youtube.com/watch?v=DY9VE3i-KcM
https://www.youtube.com/watch?v=2JcHMhtH6_s
https://www.youtube.com/watch?v=XDX1py_tbYE
https://www.youtube.com/watch?v=qb5pkVadvqA
https://www.youtube.com/watch?v=ZqdBf8pr2og
सन्दर्भ सूची:
https://en.wikipedia.org/wiki/Suez_Canal
https://theconversation.com/suez-canal-blockage-how-cargo-ships-like-eve....
https://www.bbc.com/news/world-middle-east-56615521
https://www.businessinsider.com/ever-given-excavator-driver-did-not-like...
सविस्तर छान लिहिले आहे. >>>>
सविस्तर छान लिहिले आहे. >>>> + ११
खूप छान माहिती. अभ्यासपूर्ण.
खूप छान माहिती. अभ्यासपूर्ण.
गेम मस्त आहे.
थोड्या प्रयत्नानंतर जमला.
नेहमीप्रमाणे छान लेख!
नेहमीप्रमाणे छान लेख!
छान माहिती धन्यवाद .
छान माहिती धन्यवाद .
*कंटेनर....जहाज कसे भरायचे याचं शास्त्र आहे म्हणजे जे कंटेनर्स लांबच्या बंदरात रिकामे केले जातात ते खाली किंवा लांबवर ठेवायचे तर जे कंटेनर्स जवळच्या.... * - कंटेनर भरणारी महाकाय क्रेन प्रचंड महाग असतेच पण संबंधित सॉफ्टवेअरही तितकंच महाग असतं. त्यामुळे, क्रेन ऑपरेटरही इंजिनिअरच असावा लागतो. जगातल्या सर्व मोठ्या बंदरांत कंटेनर भरण्याची/ उतरण्याची एकच पद्धत असल्याने, तें
सॉफ्टवेअर आत्मसात केलं तर कुठल्याही आधुनिक बंदरात
सन्मानाने तुम्हाला वावरता येतं.( स्रोत- प्रत्यक्ष हें काम केलेल्या इंजिनिअरने दिलेली माहिती )
जरा गंमत -
अहो, वाढदिवसाला मला मोठी इंपोर्टेड गिफ्ट देणार होता ना ! सुवेझच्या कालव्याच्या ट्रॅफिक जॅममधे अडकली वाटतं ती !!!
छान माहिती धन्यवाद .
*
छान माहिती, मस्त लेख...
छान माहिती, मस्त लेख...
सर्वांना धन्यवाद. भाऊ,
सर्वांना धन्यवाद. भाऊ, धन्यवाद.
अजय चव्हाण, तुम्ही चांगली माहिती लिहीली होती. काढून टाकायचा निर्णय तुमचा मान्य पण लोकांना चांगल्या माहितीचा फायदा होतो. जमल्यास द्या परत.
भाऊ
भाऊ
सीमंतिनी, पुस्तकाचं मनावर घे.
सीमंतिनी, पुस्तकाचं मनावर घे. खरं सांगतेय.
लेख सुरेखच आहे हे वेगळं सांगायला नको ना...
भाऊंचं चित्र भारीच!!!
छान माहिती,अभ्यासपूर्ण आणि
छान माहिती,अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद!
मस्त लेख! गेले काही दिवस ही
मस्त लेख! गेले काही दिवस ही बातमी वरवर वाचत होतो पण इतके डीटेल्स माहीत नव्हते.
छान लेख सिमंतिनी.
छान लेख सिमंतिनी.
साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट न्यूज़ वाल्यांनी लगेच सुएझ च्या ट्रफिक चा मुद्दा लावून चीन चा 'वन बेल्ट वन रोड ' कसा चांगला आहे असे अकलेचे तारे तोडले.
छान लेख
छान लेख
आवडला लेख
आवडला लेख
सीमंतिनी , लेख आवडला. खूप
सीमंतिनी , लेख आवडला. खूप नवीन माहिती मिळाली. मी आधी फक्त यावरचे memes पाहिले होते
लेख माहितीपूर्ण आणि रोचक
लेख माहितीपूर्ण आणि रोचक झालाय
आवडलाय
ए वाळू वाले आले, पाभे वाळू
ए वाळू वाले आले, पाभे वाळू वाले आले. रेती वाळू घ्या वाळू.
सुवेझ कालव्यातली वाळू. पलास्टर, कंट्रक्षन साठी लंबर एकची वाळू.
(आडमिनजी माझ्यावालं जहाज एखांद दोन दिवस या धाग्याच्या बाजूला राहूद्या. धंदा होयल तेवढाच वाळूचा.
कसं!!!!
छान रोचक लेख आहे, कालच
छान रोचक लेख आहे, कालच वाचलेला, पण तो गेम खेळत राहिलो आणि त्या नादात ईथे प्रतिक्रिया द्यायची राहिली
माहितीपूर्ण लेख. या संदर्भात
माहितीपूर्ण लेख. या संदर्भात मी फक्त बातम्यांचे मथळे वाचत होते पण या लेखातून बरीच माहिती मिळाली! धन्यवाद.
भाऊ
हे घडताना ट्विटर वर फॉलो
हे घडताना ट्विटर वर फॉलो केले होते. जे सी बी वाल्या माणसाचे पण एक अकाउंट ट्र्रें ड होत होते. अजूनही तो मजेशीर पोस्ट करत असतो. मीम्स वगैरे धमाल होती तीन चार दिवस. उशीरा आला हा लेख.
मस्त लेख आणि प्रतिक्रिया पण
मस्त लेख आणि प्रतिक्रिया पण छान
सगळ्यांना धन्यवाद. सियोना, सा
सगळ्यांना धन्यवाद. सियोना, सा.चा. मॉ. पो वाचलेलं/बघितलेलं नाही. बघते आता. मी जर्मनीची डीब्ल्यू जास्त बघत होते. पाषाणभेद,
मजेशीर मीम आहे! अमा, त्या जेसीबी ट्विटरची लिंक असेल तर द्या. खूप लोकं काय काय मस्त मीम्स बनवत होते..
मस्त आणि माहितीपर लेख. इतर
मस्त आणि माहितीपर लेख. इतर अनेकांप्रमाणे मीही बातम्यांमधली जुजबी माहिती आणि भन्नाट मीम्स वाचले होते फक्त, या लेखामुळे कितीतरी नवीन गोष्टी कळल्या.
मी तो गेम रोज किमान दहा बारा
मी तो गेम रोज किमान दहा बारा वेळा तरी खेळतो. आता मी खुपच प्रो झालोय त्यात. इन्जिनिअरींग विनाकारण केली असं वाटतंय मर्चंट नेव्ही करायला हवी होती.
*खूप लोकं काय काय ...*
*खूप लोकं काय काय ...* आपण तरी कां हटायचं -
गांवीं पायात साधा कांटा रूतला, तर घर डोक्यावर घेतलंत ! आणि, आतां एक तास बाजारात सल्ला देत होतात, रूतलेली बोट कशी काढायची !
..म्हणानच मी त्या कालव्यात कधीं जाणंयच नाय. आपलां कोकणच बरां!!
![]()
छान चित्र भाऊ आवडलंय
छान चित्र भाऊ
आवडलंय
छान आढावा.
छान आढावा.
भाऊ
भाऊ
किती छान व्यवस्थित माहिती
किती छान व्यवस्थित माहिती लिहिली आहे सीमंतिनी!
, भाऊच्या धक्क्याला बोट अडकली ती तुमची काय हो?
भाऊ
भाऊ
भाऊ
अहो, इंजिनीयर्स लागतच असतील मर्चंट नेव्ही मध्ये आणि जहाज तर म्हणे इजिप्शीयन ममीच्या शापाने अडकले असाही एक प्रवाद होता... आहे हो स्कोप तुम्हाला भरपूर तिथे. 
बोकलत
Pages