घरात न आलेला नको असलेला पाहुणा अर्थात कोविड-१९ अन त्यामुळे टाकलेल्या सुटकेच्या नि:श्वासाची गोष्ट

Submitted by DJ....... on 6 April, 2021 - 08:51

नको असलेला पाहुणा आपल्या घरात येऊच नये असे जरी आपणाला वाटत असलं अन त्यासाठी तुम्ही स्वतः त्यादृष्टीने कितीही योग्य ती खबरदारी घेत असला तरी घरातील प्रत्येकजण ती खबरदारी योग्य रितीने घेत नसेल तर तुमच्या दारी तो नको असलेला पाहुणा कधीही हजर होऊ शकतो. त्यात तो पाहुणा कोवीड-१९ असेल तर मग त्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेनेच कानातून गरम वाफ निघाल्याची जाणीव होऊ शकते.

मार्चच्या शेवटच्या शुक्रवारी स्कूल टीचर असणार्‍या बहिणीला सणसणीत ताप आला अन २ दिवस येत-जात राहिला. तिला आयसोलेट करून घरातील इतरांना तिच्याकडे जायचं नाही अशी तंबी दिली अन तिच्या जेवणाच्या वेळी तिचं ताट तिच्या खोलीत पोहोच करु लागलो. फॅमिली डॉक्टरने आधी ३ दिवसांचा कोर्स देऊन सुद्धा ताप कमी-जास्त होतच होता. शेवटी डॉक्टरांनी तिची आर.टी.पी.सी.आर. करायला सांगितली तेव्हा पायाखालची वाळु सरकली. हॉस्पिटल मधे जाऊन चौकशी केली तर रविवारी टेस्ट होत नाहीत सोमवारी सकाळी ७ वाजता येऊन रांगेत उभे रहा असं सांगण्यात आलं. त्याबरहुकुम सोमवारी सकाळी साडेसहालाच घर सोडलं तेव्हा बहिणीचा ताप पूर्ण उतरला होता. हॉस्पिटल मधे पोचल्यावर बहिणीला टेस्टच्या रांगेत उभा करून मी हॉस्पिटलमधले सोपस्कर करायला आत पळालो (असा प्रकार मी डी-मार्ट मधेही करतो.. जाताना २ जणं मिळून जायचं अन दोन ट्रॉल्या घेऊन पटाटा सामान भरून एकाने बिलिंग लाईनला उभं राहिलं की वेळ वाचतो Proud ). आत गेल्यावर केस पेपर काढणे, तो बिलिंग सेक्शनला नेऊन बिल बनवणे, कॅशियरकडे रक्कम जमा करणे, ती पावती घेऊन पी.आर.ओ. सेक्शन ला नेऊन तिथं नोंद करणे अशी सगळी कामे मी सुचना वाचत वाचत अन विचारत विचारत वेळेत पुर्ण केली. पी.आर.ओ. ने थम्स अप करून आता तुम्ही रांगेत उभे रहायला समर्थ आहात असं सांगितलं अन पॉझिटीव असाल तर संध्याकाळी ५ पर्यंत फोन येईल असं सांगून "नेक्स्ट" अशी दुसर्‍या पेशंटला हाक मारली. मग मी हातातील सगळ्या पत्रावळ्या घेऊन रांगेत बहिणीकडे सुपूर्द केल्या तोवर २०-२५ जण रांगेत वाढलेले दिसले. सोशल डिस्टंसिंगचा कुठेही मागमूस दिसत नव्हता. ही गर्दी. सगळे जवळ-जवळ उभे. कुणाचे मास्क नाका-खाली तर कुणाचे मास्क फोनवर बोलण्यासाठी हनुवटीखाली गेलेले. Uhoh रांगेत नव्याने आलेले काही बिचारे आंधळ्या पाकोळीसारखे या सेक्शन कडून त्या सेक्शनकडे टकरा देत होते त्यांना मी जमेल तशी मदत केली. शेवटी अर्ध्या तासाने बहिणीचा नंबर आल्यावर तिचा स्वॅब टेस्टिंसाठी गेला अन संध्याकाळी ५ पर्यंत जीव टांगणीला लागल्याची जाणीव बोलून दाखवत आम्ही घरी परतलो. फिंगर्स क्रॉसड. संध्याकाळपर्यंत बहिणीच्या फोनची रिंग वाजली तरी माझ्या कानात कुण्ण्ण्ण्ण्ण्ण............ होऊ लागलं. पण संध्याकाळपर्यंत हॉस्पिटलचा फोन आला नाही. अगदी रात्री ९ वाजेपर्यंतही आला नाही तेव्हा टेस्ट निगेटिव्ह असणार याची खात्री पटली. (समजा येनकेनप्रकारेण फोन आलाच नाही तरी पॉझिटीव्ह रुग्णांना एस.एम.एस. तरी नक्कीच येतो अन पुढची एच.आर.टी.सी. चाचणी करण्यासाठी रिपोर्ट कलेक्ट करण्याची सुचना त्यात असते...!). नको असलेल्या पाहुण्याच्या-कोविड१९ च्या चाहुलीने उठलेलं पेल्यातलं वादळ पेल्यातच शांत होत सोमवार संपला अन होळीचे वेध लागले.

होळीला गावी जाऊनच पुरणपोळी खायची अन नुकतीच ऊसाला तोड येऊन गेल्यामुळे खोडव्याला तीन फणी देऊन खतं टाकून पहिलं पाणी पाटाने द्यायच्या हौसेपोटी वडिलांनी गावी जाण्याचा घाट घातला. भले ते स्वतः शेतीत हे सर्व काम करणार नव्हते तरी शेतात कामाला मजुर शोधण्यापासुन ते त्यांच्याकडून सर्व कामे करवून घेण्यापर्यंत देखरेख तर ठेवावीच लागणार होती. माझ्या वर्क फ्रॉम होम मुळे मला तिन्ही त्रिकाळ शेतातल्या कामात लक्ष घालणे केवळ अशक्य आहे हे मी त्यांना सांगितले तरीही त्यांनी गावी जाण्याचा निग्रह बोलुन दाखवला. "तुम्ही सोबत येणार नसाल तर मी एस.टी. ने जाईन" असं वडिलांनी सांगितल्यावर मात्र एरव्ही "वाट पाहीन पण एस.टी.नेच जाईन" या तत्त्वावर चालणार्‍या मला "नको असलेल्या पाहुण्या"च्या भितीपोटी कारने गावी जाणं भाग पडलं. इंटरनेटच्या रेंजच्या कमतरतेमुळे आता गावी राहून काम करणे शक्य नाही हे जाणवल्यावर पुन्हा घरी जाउया असं वडिलांना सांगितल्यावर त्यांनी त्यांना गावीच सोडून आम्ही आईसोबत परत घरी जावे असं फर्मावले. कोणत्याही परिस्थितीत बाहेर फिरायचं नाही, बाहेर जावं लागलं तर मास्क योग्य तर्‍हेने घालुन मगच बाहेर जायचं, कुणाच्या घरी जायचं नाही अन कुणाला घरी बोलवायचं नाही अशा सुचना देत नाईलाजाने आम्हाला परतावे लागले. बाहेर उन्हाचा कहर. त्यात धुळवडीला गावाकडचं चुलीवरचं फर्मास मटण.. अन गरम-गरम तर्रीदार रस्सा असा धुळवडीचा बेत झाल्यावर आम्ही वडिलांना गावीच सोडून गाडीत ए.सी. फुल्ल्ल ऑन करून घरी परतलो.

दुसर्‍या दिवसापासून नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ फोन करून वडील स्वतःची योग्य ती काळाजी घेतायत ना याची विचारणा करु लागलो. चुलता-चुलतीलाही वडिलांकडे लक्ष ठेवा, बाहेर फिरू देऊ नका असं सांगून त्यांच्या शेतीकामाच्या जबाबदारीत वर नवीन जबाबदारीही घातली. बुधवारी सकाळी फोन केल्यावर वडिलांचा आवाज क्षीण वाटला. कारण विचारलं तर म्हणे रविवारची पुरणपोळी अन सोमवारच्या मटणामुळं (हो. सोमवारच..! धुळवडीला तिचा मान द्यायला नको?) पित्ताची उलटी झाली म्हणुन झोपले आहेत. चुलत्यांना फोन करून विचारलं तर ते म्हणाले काल वडिलांनी भर उन्हात शेतात जाऊन पाण्याचे पाईप बसवण्याच्या कामावर देखरेख केली होती. झालं... ऊन्ह बाधलं म्हणायचं....! Uhoh

गुरुवारी वडिलांना खोकला सुरू झालेला फोन मधुनही ऐकु आला. मग मात्र आईला घेऊन पुन्हा गावी जाऊन जबरदस्तीने वडिलांना इकडे घेऊन येण्याचं ठरवलं. गुडफ्रायडेला भल्या सकाळीच आम्ही दोघे निघालो अन १० वाजता गावी पोचलो. वडिलांना चांगलाच खोकला येत आहे हे जाणवलं. "सर्दी झाली होती का?", "ताप आला होता का?", "लूज मोशन तर नाहीत ना होत?" असे प्रश्न विचारल्यावर वडिलांनी नजरनेच "तर.....मोठा डॉक्टरच लागून पडलास की...!" अशा अविर्भावात माझ्याकडे पहात मी विचारलेल्या तीनही प्रश्नांना "नाही" एवढंच बोलून आमचं संभाषण निकालात काढलं.

तिथं हात-पाय धुवून फ्रेश होतोय तोवर मला ४-५ भयंकर शिंका आल्या. जेवण करून स्थिरस्थावर होईपर्यंत उजव्या नाकपुडीतून स्वच्छ पाण्याची धार लागली आहे याची जाणीव झाली. लगोलग माझ्या मास्कने त्याची योग्य ती जागा घेतलीच. भर दुपारी पुन्हा कारने वडिलांना मागील सीटवर अन आईला शेजारी बसवून भर उन्हात आत फुल्ल ऑन ए.सी. लावून ७० किमी अंतर कापून परत घरी येण्याचा परतीचा प्रवास सुरु केला. प्रवासात मागील सीटवर बसलेले माझे वडिल सतत खोकत होतेच. ड्रायव्हिंग सीटवर बसून ड्रयव्हिंग करताना समोरच्या काचेबाहेर आग ओकणार्‍या सुर्याच्या साक्षीने आत ए.सी.च्या साथीने ठंडा-ठंडा-कूल-कूल अनुभुती घेत असताना माझा मास्क पूर्ण ओला झालेला आता मला जाणवत होतं. Uhoh घरी आल्यावर रात्री झोपण्याआधी वाफारा घेतला अन एक सिनारेस्ट टॅब घेऊन झोपलो. बाकी घसा-दुखी वगैरे काहीच त्रास जाणवत नव्हता.

सकाळी उठलो तर सिनारेस्टने आपलं काम इमाने-इतबारे केल्याची जाणीव झाली. उजव्या नाकपुडीतून वहाणारं पाणी जागच्या जागी कैद झालं होतं. शनिवारचा सुट्टीचा दिवस आळसात सुरू झाला तरी आंघोळीचा आळस करणं आमच्या घराच्या तत्त्वात बसत नसल्याने गरम पाणी बादलीत घेतलं. तरी एकदा आईला म्हणालोच - "आज आंघोळ नको करू का? उगीच सर्दी झाली तर काय घ्या...!" पण आई म्हणाली, "आंघोळ केली की फ्रेश वाटेल". म्हणुन मी आंघोळ केली खरी पण आंघोळ केल्यावर मला अचानक थंडीच वाजु लागली. एप्रिलच्या उन्हाळ्यात पारा चाळीशीकडे झेपावत असताना आपणाला कुलू-मनालीत असल्या सारखी थंडी का वाजतेय म्हणुन टेंपरेचर चेक केलं तर १०१ फॅरेनहाईट..! Uhoh थर्मामीटर बिघडलाय का म्हणून ३-४ वेळा टेंपरेचर बघितलं. फॅरेनहाईट ऐवजी अंश सेल्सियस मधे बघितलं तरी ताप फुल्ल ऑन..!!

शेवटी क्रोसीनची एक गोळी खाऊन माझ्या खोलित कुणीही यायचं नाही अशी सर्वांना तंबी देऊन चादर घेऊन झोपलो.. चादरीतही कडाक्याची थंडी वाजु लागली तशी एक ब्लंकेट घेऊन गुरफटून झोपलो. बाहेर हॉलमधे वडिल सतत खोकताना ऐकु येत होतंच. मनात नाही नाही त्या शंका यायला सुरुवात झाली. आई-वडिलांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोविशिल्ड वॅक्सीन घेतलं होतंं. आईला काही त्रास नव्हता पण वडिलांना हा त्रास सुरू झाला होता जो गावी जाऊन उन्हात फिरण्याची शिक्षा आहे हे जाणवत होतं. विचार करून करून डोक्याचा भुगा होत असतानाच मला दरदरून घाम सुटला अन एकदाचा ताप उतरला. दुपारी फक्त जेवणाचं ताट आत घेतानाच खोलीचा दरवाजा उघडला. जेवल्यानंतर असाच तासभर एकटा बसून आकाशवाणी ऐकत होतो. थोड्यावेळाने पुन्हा एकदा उन्हाळ्यातल्या हिमवादळाचा अनुभव सुरू झाला तसा परत क्रोसीनचा मारा करत संध्याकाळी फॅमिली डॉक्टरकडे जायलाच हवं या निश्चयाने मी ब्लँकेट घेऊन पुन्हा झोपलो. झोप पण इमानेइतबारे डोळ्यांच्या पापण्या जड करून तिचं काम चोख बजावत होतीच.

संध्याकाळी वडिलांना घेऊन फॅमिली डॉक्टरांकडे गेलो. गेल्या आठवड्यात बहिणीला असाच त्रास झालेला फॅमिली डॉक्टरांना माहिती होताच. वडिलांनाही भरपूर कफ झालेला दिसतोय असं सांगत त्यांनी आम्हा दोघांनाही सेफर साईड आर.टी.पी.सी.आर. करून घेण्याचा सल्ला दिला. झालं... फिरून पुन्हा भोपळे चौकात..! Uhoh

वडिल अपेक्षेप्रमाणे टेस्ट साठी का-कू करू लागले. मी अन बहिणीने ठरवलं की आधी माझी टेस्ट करू अन ती पॉझीटीव्ह आली तर वडिलांना जबरदस्तीने टेस्ट साठी नेऊ. शिवाय माझी टेस्ट पॉझीटिव्ह आली तर नवीन पॉलिसीनुसार ऑफिसकडून तत्काळ ५० हजारांची सानुग्रह मदत मिळणार होतीच. अर्धा लाख खिशात पडू पहातायत तर कशाला सोडा असा विचार करून मीही टेस्टला जायला तयार झालो. वडिल येणार नव्हतेच म्हणुन बहिणीला सोबत घेऊन सकाळी पावणेसातलाच घरातून निघालो. यावेळी माझी टेस्ट सरकारी दवाखान्यात करून तिथला अनुभव घेण्याच्या बहाण्याने गाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात घेतली. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत नावाला साजेशी - अवाढव्य विस्तार अन प्रशस्त अशी. अन तितकीच बेवारशी अवकळा आलेली दिसत होती. आधीच कमी स्टाफ अन त्यातले निम्मे काम-चुकार अशा परिस्थितीत त्यांच्याकडुन अपेक्षा ती काय ठेवणार म्हणा. कोवीड-टेस्ट साठी ओपिडीची वेळ पाहिली तर ती सकाळी १० ते १ अन संध्याकाळी ५ ते ८ असा फलक दिसल्यावर आल्या चाकी गाडी रिव्हर्स घेतली अन बहिणीची टेस्ट ज्या ठिकाणी केली होती त्याच हॉस्पिटलच्या दिशेने कूच केले. तिथं पोचलो तोवर सात वाजून गेलेले. आज कोविड टेस्टसाठी बरीच मोठी रांग दिसत होती. एका आठवड्यात टेस्टला येणार्‍यांचं प्रमाण दुप्पट झालेलं दिसत होतं. Uhoh (त्यातले बरेच लोक आंतर राज्य प्रवासासाठी आर.टी.पी.सी.आर. बंधनकारक केल्यामुळे आलेले होते हे मला तिथं उभा राहिल्यानंतर कळालं..!)

बहिणीला त्या रांगेत उभा करून मी केस पेपर काढला, मग बिलिंग केलं, मग फी भरून रिसिट घेतली, रिसिट अन केस पेपर पी.आर.ओ. च्या खिडकीत नेऊन दाखवल्यावर दिलेली माहिती बरोबर आहे का ते त्यांनी पडताळून पाहिलं अन नेमकी नावाच्या स्पेलिंग मधे चूक निघाली. ती दुरुस्त करून घेत मी माघारी रांगेत येणार तोच पी.आर.ओ. चा कर्मचारी ज्याने गेल्या आठवड्यातही बहिणीच्या टेस्टवेळी नाकाखाली मास्क ठेवत पुढच्या प्रोसेसची मला आगत्याने माहिती दिली होती त्याच कर्मचार्‍याने आजही त्याच उघड्या नाकाने पुन्हा एकदा सर्व माहिती अगदी आपलेपणाने दिली अन वर पुन्हा रिपोर्ट पॉझीटिव असेल तर संध्याकाळी ५ पर्यंत पी.आर.ओ. कडून फोन येईल आणि निगेटिव असेल तर फोन येणार नाही असं सांगुन रिपोर्ट हवा असेल तर संध्याकाळी ४ नंतर या असं सांगुन मला रांगेकडे पाठवलं.

बहिणीला गाडीत बसायला सांगून मी ८ वाजता रांगेत उभा राहिलो अन पुढील भयंकर अनुभवांच्या जंत्रीची चुणुक लगेच दिसू लागली. रांगेत कमित कमी १०० जण होते. त्यातल्या ५० जणांच्या डोक्यावर सावली होती तर ५० जणांना ८ वाजताही उन्हाच्या झळा जाणवत होत्या. हॉस्पिटलचा स्टाफ अन प्रशिक्षणार्थी देखील मागच्या दाराने टेस्ट साठी आलेले. शिवाय ८ वाजता सुरु व्हायला हवं असणारं कोविड टेस्ट युनिट ८.३० झाले तरी आमच्या रांगेतल्या एकाही पेशंटला आत घ्यायला तयार नाही असं दिसु लागलं तसं उन्हात उभं राहिलेल्यांनी आरडा-ओरड करायला सुरुवात केली. सावलीत येण्याच्या अट्टाहासापायी त्यांनी सावलीत उभ्या असणार्‍या व्यक्तीला किंवा त्याच्या शेजारी उभा राहून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवायलाही सुरुवात केली. आता या १०० जणात एकजण देखिल पॉझिटीव असेल तर तो किती जणांना प्रसाद देईल असा विचार मनात आल्यावर मी माझ्या समोरच्या अन मागच्या व्यक्तीला सांगून रांगेतून बाजुला जरा कमी वर्दळीच्या ठिकाणी थांबून पुढच्या अन मागच्या दारातून टेस्ट्साठी आत जाणार्‍यांना न्याहाळू लागलो. शेवटी रुग्णालयाचे कर्मचारी अन प्रशिक्षणार्थीच हाय प्रायॉरिटीवर असायला हवेत असं गर्दीला कुणीतरी पटवून दिलं अन त्यांची टेस्ट आधी घ्या अशा सामोपचाराने घेतलेल्या निर्णयाने अजुन अर्ध्या तासाची निश्चिंती झाल्यावर मी बसण्यासाठी योग्य ती जागा शोधू लागलो. गेल्या दोन दिवसांपासून येत असलेल्या कडक तापामुळे आधीच शरिरात थकवा जाणवत होता. उभा रहाण्याचे आजिबात त्राण शिल्लक नव्हते. परंतु ज्या हॉस्पिटलमधे रोज हजारो रुग्ण उपचारास येत आहेत अन तिथले १० अवाढव्य वॉर्ड्स कोरोना पेशंटने भरलेले आहेत अशा ठिकाणी खाली बसणे म्हणजे आ बैल मुझे मार करण्यासारखंच आहे हे लक्षात येऊन मी असाच ताटकळत उभा राहिलो.

सकाळी ९ नंतर मागच्या दाराची गर्दी संपली अन पुढील दाराने एक पेशंट आत गेला. रांग एक नंबरने उगीच हलल्यासारखी वाटली पण मी काही पुन्हा तिथं जाऊन उभा राहिलो नाही. मधेच एका वॉर्डबॉयने एका २०-२२ वर्षाच्या एका मुलाला अन मुलीला रांगेत आणुन भिंतीशेजारी कठड्यावर बसवलं अन कोविड युनिटच्या डोअर कीपरला त्या दोघांना लवकर नंबर द्या असं सांगितलं. ते ऐकुन गेले २ तास रांगेत उभा असलेल्यांनी कॅवकॅव करायला सुरुवात केली अन ती दोघंजणं घाबरून मान खाली घालून स्फुंदत बसून राहिली. एका गरोदर महिलेला मात्र सर्वांनी सहानुभुतीने लगेच "पुढे जावा.. पुढे जावा.." म्हणुन ग्रीन सिग्नल दिला जो एका ८० वर्षांच्या आजोबांना मात्र सिग्नल लाल करून त्यांना उन्हातच ताटकळत ठेवलं. अगदी कासवाच्या गतीने रांग पुढं सरकू लागली पण आता मागच्या दारी कोणीच नसल्याने पुढे सरकण्यातही सातत्य दिसत होतं. शेवटी तासाभराने सर्वांच्या मधे १-१ हाताचं अंतर आल्यावर मी रांगेत माझ्या जागेवर जाऊन उभा राहिलो. तेवढ्यात डोअरकीपरने त्या स्फुंदत बसलेल्या दोघांना टेस्ट्साठी आत बोलावलं अन ती दोघं जिथं बसली होती तिथं सॅनीटायझर फवारलं. त्या दोघांना खूपच त्रास होत होता अन ते रडतही होते त्यामुळे ते पॉझीटिव असावेत असंच कुणालाही वाटेल. ते दोघे टेस्ट युनिट मधे गेल्यावर इतर कोणालाही आत सोडलं गेलं नाही अन ते दोघे बाहेर आल्यावर पुन्हा एकदा संपुर्ण युनिट स्प्रे मारून सॅनिटाईज केलं गेलं. रांगेतले लोक अजुनच धास्तावले. रांगेत उभा राहिल्यानंतर आता जवळ-जवळ दोन तासांनी १० वाजता माझा नंबर युनिटची पहिली पायरी चढण्यापर्यंत पुढं सरकला होता. तोवर ३-४ जण अगदी पॉझीटिव वाटणारे भयंकर त्रास होत असलेले रुग्ण टेस्ट करून बाहेर आले. ते बाहेर आले की संपुर्ण युनिट पुन्हा सॅनिटाईज केलं जात होतं. एका वॉर्डबॉय ने आणलेल्या अन पॉझिटीव वाटणार्‍या भाद्दराने वाईल्ड कार्ड एंट्री मिळवत स्वॅब दिला अन बाहेर आल्या आल्या सर्वांसमोर त्याने मास्क काढुन नाक शिंकरले ते बघुन रांगेतील सर्वांचं धाबं दणाणलं. Uhoh तो भाद्दर तसाच उसउसत हॉस्पिटल मधे भेलकांडत गेला.. त्याला कदाचित ऑक्सिजन लावायचीच वेळ आलेली दिसत होती पण त्याच्याकडे रांगेत उभा इतरांच्या ऑक्सिजन पातळीस कमी करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिल्याने पुन्हा एकदा संपुर्ण परिसराचे स्प्रे मारून पावित्र्य टिकवण्यात आले.

शेवटी कसाबसा माझा नंबर मुख्य दारातून आत जाण्याइतपत पुढे सरकला तेव्हा आतमधे ८ जण झिग्झॅक नंबर वर उभे केले आहेत अन शेजारीच छोटे छोटे कंपार्टमेंट असुन मोकळी हवा येण्यासाठी खिडक्याही ठेवल्या आहेत असं दिसलं. समोर काचेच्या पलिकडे पीपीई किट घातलेली व्यक्ती काचेला असलेल्या गोलाकार छिद्रातून हात बाहेर काढून स्वॅब घेत होती. मला रजिस्ट्रेशन काउंटरवर आल्यावर तिथल्या बाईंनी नाव, गाव विचारून केसपेपरवरील माहिती बरोबर आहे का ते बघितलं अन पी.आर.ओ. कडून आलेल्या लिस्ट मधे खूण करून तो नंबर आणि केस पेपर वरील नंबर एकच आहे का हे पडताळून पहायला लावलं (जेणे करून याचा स्वॅब त्याला अन त्याचा स्वॅब याला असं व्हायला नको... थर्ड आय टेस्टिंगचा प्रकार..!) अन एक छोटी उभट डबी ज्यात कसलंतरी गुलबट द्रव्य होतं त्यावर माझ्या नावाचं स्टिकर अन पॉलिथिन बॅग देत हा ऐवज स्वॅब देताना आतल्या व्यक्तीला द्यायला सांगितला. आता माझा समोरच्या ७ व्यक्तींपैकी पहिल्या व्यक्तीला घशात अन नाकात नळ्या कोंबणार्‍या पीपीई किटवाल्याचं कौशल्य अन ते सोसवून घेणार्‍यांचा हावभाव बघण्याचा टाईमपास सुरु झाला. घशातील स्वॅबला कोणी जास्त रीअ‍ॅक्शन देत नव्हतं पण नाकातील स्वॅबला मात्र भयंकर रिअ‍ॅक्शन येत होत्या. त्या अनुभवत मी पुढुन दुसर्‍या क्रमांकापर्यंत येण्याइतकी झिग्झॅक मजल मारली.

माझ्या समोरचा मनुष्य ३०-३५ वर्षांचा होता. त्याने मास्क काढला अन घशातील स्वॅब घेण्यासाठी काचेपलिकडील पीपीई किटमधील व्यक्तीने नवीन स्टिक रॅपर मधून काढली. ती स्टिक म्हणजे आपलं कान साफ करण्याच्या दोन कॉटन मुंडीवाल्या स्टिकची एकच कॉटन मुंडी असलेली मोठी बहीण वाटत होती. त्या कॉटन मुंडीवाल्या स्टिकने माझ्या समोरील व्यक्तीच्या घशातून स्वॅब घेण्यात आला अन तो आतल्या पीपीईवाल्याने दिलेल्या उभट डबीतल्या गुलाबी द्रावणात बुचकळून कट्टकन मोडत ती स्टिक कचर्‍याच्या बादलीत टाकली. पीपीईवाल्याने सरावलेल्या हाताने पुन्हा एकदा नवीन रॅपर फाडत पुन्हा एक स्टिक काढली जी नुसतीच प्लॅस्टिकची नळी दिसत होती अन तिला मघासारखा कॉटन लावलेला नव्हता. ती बिना कॉटनची टोकदार नळी मला तलवारीच्या टोकासारखी भासू लागली अन त्या टोकदार स्टिकने नाकातला स्वॅब देण्यासाठी समोरचा माणूस खाली वाकला. एक-दोन सेंकंदासाठी मला नेमकं काय झालं ते कळलं नाही पण घाबरून समोरच्या माणसाने स्वॅब घेणार्‍या पीपीईवाल्यापुढे एकदोनदा मुंडी पुढं-मागं केलेली जाणवली तसं तिसर्‍याच सेकंदाला पीपीई किटवाल्याने वॉर्निंग देत समोरच्याला अर्ध्या सेकंदासाठी स्तब्ध केलं अन खस्स्कन स्टिक नाकात खुपसली. त्या स्टिकचं पीपीईवाल्याने काय केलं हे मला बघायची संधीही न मिळता चौथ्या सेकंदापासून पुढचा अर्धा मिनिटभर समोरचा माणुस एवढ्या जोरात शिंकू लागला की युनिटमधे एकच धावाधाव सुरू झाली. मी टण्णकन उडी मारून मघाशी बघितलेले कंपार्टमेंट अन तिथल्या उघड्या खिडकीपाशी पळालो अन बाकी ८ पैकी ५ जण तर युनिटच्या बाहेर पळून गेले. बाकिच्यांनी माझी नक्कल करत उरलेल्या कंपार्टमेंटचा कब्जा घेतला. Biggrin

प्रकरण निवळून तो शिंकारे साहेब युनिटच्या बाहेर गेल्यावर युनिटचे सॅनिटायझेशन केल्यावर माझा नंबर आला. मग मी अगदी आज्ञाधारकपणे काचेपलिकडल्या पीपीई किटवाल्यापुढे माझ्या हातातील मघाशी रजिस्ट्रेशन काउंटरवर दिलेला ऐवज सोपवला. हल्ली सर्वांसमोर मास्क खाली घेताना एवढी लाज-लज्जा-शरम वाटू शकते हा नवाच साक्षातकार मला झाला अन मी बिना मास्कचा निर्लज्जपणे तोंडाचा व्या करून काचेसमोर मान तुकवून उभा राहिलो. पहिल्या सारखेच आताही सराईतपणे काचेपलिकडील पीपीईवाल्याने नवीन रॅपर उघडून त्यातून एक मुंडी असलेली कॉटन स्टिक काढली अन माझा घशाचा स्वॅब घेतला. तो स्वॅब त्या उभट डबीतील गुलबट द्रावणात बुचकाळून स्टिक कट्टकन मोडत कचर्‍याच्या बादलीत पडली अन आता नवीन रॅपर मधून कॉटन हेड नसलेली नवी स्टिक बाहेर येत माझ्या नाकाचा वेध घेऊ लागली. पुढच्या प्रसंगाला धैर्याने नाक देत मी अर्ध्या सेकंदासाठी दोन्ही डोळ्यांची बुब्बुळे नाकावर केंद्रीत करून आत गेलेल्या स्टिकला पुर्ण सहकार्य केले. माझे धैर्य अन चिकाटी पाहून पीपीईवाल्याने देखिल या नाकपुडीची वेदना त्या नाकपुडीला कळू न देता इकडे-तिकडे कुठेही स्टिक न खरचटवता ती अलगद बाहेर काढली अन त्याच डबीत बुचकाळत तिचं बुच घट्ट झाकत ती डबी कलेक्टरकडे सुपुर्द केली. मग मी मास्क ठिकठाक लावत तिथुन जो पोबारा केला तो पुन्हा मागे वळून बघितलंच नाही. झट्कन गाडी सुरु करत ड्रायविंग करत घर गाठले. घर येईपर्यंत धाकधुक धाकधुक की काल पासून पाझरणार्‍या उजव्या नाकपुडीतून आता पुन्हा काय जाणवू लागलंय...? रक्त तर येत नसेल...? Uhoh

घरी आल्यावर हॉस्पिटलला जाताना घातलेले कपडे गरम पाण्यात टाकून लगोलग आंघोळपण केली. २-३ वेळा नाक चेक केलं तर ते रक्त नव्हते. कदाचित टोकदार वस्तू अशी पहिल्यांदाच नाकपुडीत शिरल्याने नाकपुडीला रडु आलं असेल असं वाटलं. आंघोळ आटोपून जेवण होईपर्यंत दुपारचे १ वाजले. आता पुढचे ४ तास म्हणजे ४ वर्षांइतके लांबलचक वाटू लागले. कोणत्याही क्षणी फोन वाजू शकतो या विचाराने झोपही येईना. ऑफिस वाल्यांना आधिच कल्पना दिल्याने आज माझी तशी सुट्टीच होती. एक एक पळ हाय हाय म्हणु लागले. अशात टेलीमार्केटिंगचे २ अन ऑफिसच्या माणसाचा एक असे ३ सेव्ह नसलेल्या नंबरवरून आलेल्या फोन्स मुळे धाबे दणाणल्याचा वाक्यात होणारा उपयोग वास्तवातही अनुभवायला मिळाला. शेवटी एकदाचे संध्याकाळचे ५ वाजले. हॉस्पिटलकडून कुठलाच फोन आला नाही. तरिही आपण रात्री ९ पर्यंत वाट बघू असं मनाशी ठसवत एकटाच खोलीत बसून राहिलो. रात्री नऊ नंतर थोडा जिवात जीव आला. तरिही पुढचे ५-६ दिवस आयसोलेशन पाळायचेच असा मनाशी पक्का निर्धार करत रात्रीचे जेवण माझ्या खोलितच केले.आज सकाळी हॉस्पिटल मधे जाऊन रिपोर्ट ताब्यात घेतला अन तो निगेटिव आल्याची खात्री झाल्यावर थोडं रिलॅक्स वाटलं. वडिलांनीही एम.डी. फिजिशियनचा सल्ला घेत खोकल्यासाठी औषधं घेतली अन एकाच दिवसात त्यांचा खोकलाही बराच कमी झाला.

हा अनुभव आता वाटतो तितका सुलभ नाही. अतिशय कष्टप्रद आहे. कोवीड टेस्ट्साठी रांगेत उभं रहावं लागुच नये यासाठी आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतलीच पाहिजे. माझं घर माझी जबाबदारी हे शासनानं सांगितलेलं महावाक्य टर उडवून देण्यासाठी नक्कीच नाही याची जाणीव प्रत्येकानेच ठेवायला हवी. काल कोवीड टेस्टच्या निमित्ताने तीन-साडेतीन तास रांगेत उभा राहिल्यावर ज्या प्रकारचे तळमळणारे पेशंट मी पाहिले ते बघून अशी वेळ वैर्‍यावरही येऊ नये असं वाटलं. अशा प्रकारे आपणाला किंवा घरतील सदस्यांना पुन्हा कोवीडच्या रांगेत उभं रहावं लागू नये म्हणुन आपल्या घरातील सर्वांना कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांची सतत उजळणी करुन देणे आवश्यक आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे घरातील सदस्यांच्या जिवावर बेतण्याचे, कष्टाने कमावलेल्या संपत्तीला भगदाड पडण्याचे, होत्याचे नव्हते होण्याचे अन त्यामुळे स्वतःचे अन कुटुंबाचेही जीवन अस्थीर करणारे प्रसंग येऊ शकतात हे लक्षात घेऊन पुढील काही महिने गरज असेल तरच योग्य ती सर्व खबरदारी घेत घराबाहेर पडण्याचे अन काम झाल्या-झाल्या घरी येऊन साबणाने हात-पाय-चेहरा स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बाकी घराबाहेरील मित्र-सगे-सोयरे काय आपल्या सोईने कधीही जवळ-दूर येऊ-जाऊ शकतात हे त्रिकाल सत्य नेहमी ध्यानात ठेऊन विनाकरण त्यांच्यासोबत फिरणे, त्यांच्या घरी जाणे किंवा त्यांना आपल्या घरी बोलावणे, पार्ट्या करणे, सहली काढणे पुढील काही महिन्यांसाठी पुर्ण बंद व्हायला हवं कारण त्यांच्यापैकी कोणाकडून नको असलेला पाहुणा - कोरोना आपल्या घरात आला अन त्यामुळे आपल्या घरातील माणसांच्या जिवाची काळजी लावली तर ते किती महाभयंकर ठरू शकतं याचा केवळ विचारच केलेला बरा..!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे डीजे
एकदम डोळे उघडणारा अनुभव आहे.मी मागे ऐकलं होतं की स्वॅब घ्यायला घरी येतात?आता संख्या वाढल्याने येत नसतील बहुतेक.
विश्रांती घ्या.

खो द्यायला आला होता पाहुणा पण दिला नाही.
काळजी घ्या.
मला खो मिळाला , पण शासकीय हॉस्पिटल मध्ये मला अनुभव चांगला आला Swab टेस्ट साठी गेल्यावर.

अनु, खाजगी लॅबवले घरी येतात, आम्ही घरीच सगळ्यांच्या टेस्ट केल्या, ते रविवारी पण येतात. जानेवारीत १६००/- प्रत्येकी घेतले होते

DJ .. तुम्हाला कोणाला काही झालं नाही ही गोष्ट चांगलीच आहे. पण बहीणीचा अनुभव नुकताच आला असताना तुम्ही सगळेजण वडिलांच्या हट्टापायी पुपो आणि मटण खायला गावाला गेलात? सिरीयसली? त्यानंतर पुन्हा आईला डबल फिरवलेत. थोडक्यात स्वत:हून पूर्ण फॅमिलीला रीस्क मधे टाकले हे पटणेबल नाहीये. गेलाच नसता गावाला तर पुढच्या गोष्टी कदाचित टळल्या असत्या. काळजी घ्या. एवढ्या सगळ्या संशयित पेशंट्सच्या रांगेत उभे राहून टेस्ट करणे हेही किती धोकादायक आहे‌. ज्याला नसेल त्यालाही व्हायचा Uhoh

भीतीदायक अनुभव आहे . पाहुणा वस्तीला राहिला नाही हे नशीब म्हणायचे.
शेवटचा परिच्छेद एकदम अंजन घालणारा आहे डोळ्यात

भयंकर अनुभव आहे टेस्ट करण्याचा. (गर्दी म्हणून)
खरंच, अनावश्यक प्रवास, भेटी, गर्दी, कार्यक्रम, समारंभ करूच नयेत कुणीही.

@ mi_anu - धन्स आदरमोद. आता मी पुर्ण ठणठणीत आहे. ताप येण्या-आधी जी मरगळ होती ती तापाने घालवली Bw .
@वर्णिता - हो.. खो बसला नाही ही खरंच एक मोठी उपलब्धी ठरली Bw . तुम्ही खो-खो मधे जिंकलात त्याबद्दल तुमचं मनःपुर्वक अभिनंदन..!! Biggrin
@भाग्यश्री१२३ - तुमचे सगळे प्रश्न अगदी रास्त आहेत. परंतु घरातील एका जरी सदस्याने कुणाचे ऐकायचेच नाही अन स्वतःचेच खरे करायचे ठरवले तर त्याच्यामागे सर्वांचीच फरफट होते अन आपण असह्यपणे फरफटत जातो. ही सिच्युएशन कशी हाताळायची हे मला तरी समजले नाही त्यावेळी. Uhoh
@जाई. अन तेजो - धन्यवाद Bw
@ वावे : खरंच, अनावश्यक प्रवास, भेटी, गर्दी, कार्यक्रम, समारंभ करूच नयेत कुणीही.>>+१११११

@ अनु अन VB : घरी येऊन सँपल नेणारी सेवा इथे आम्ही रहातो त्या ठिकाणी आज सँपल घेतल्यावर दोन दिवसांनी रीपोर्ट देते. त्यांचा स्वॅब घ्यायला येणारा किती जणांच्या घरी फिरून आपल्याकडे आला असेल हेही आपणाला माहिती नसते. उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब दिला तरी रिपोर्ट २ दिवसांनंतर मिळतात म्हणुन मग महाराष्ट्र शासनाने रेकमेंड केलेल्या हॉस्पिटल्/कोरोना टेस्ट युनिट मधे स्वॅब देऊन त्याच दिवशी संध्याकाळी रिपोर्ट मिळवण्यासाठी तिथं स्वॅब दिला.

एकदा बहिणीसोबत अन एकदा माझ्यासाठी एकाच हॉस्पिटलच्या रांगेत संशयीत कमी असताना अन जास्त असताना अशा दोन वेगळ्या दिवशी दोन वेगळे अनुभव आले.

DJ तुम्ही सरकारी हॉस्पिटलमधे टेस्ट साठी गेला होता का? Private Hospital मधे काय परिस्थिती असते?
जानेवारीमध्ये आम्ही गोव्याला जाऊन आल्यावर, मुंबई aiport वर आमची (मी आणि नवरा) टेस्ट झाली होती. अक्षरशः १० मिनिटात दोघांची टेस्ट झाली. म्हणजे फॉर्म भरणे, पैसे भरणे, आणि स्वॅब घेणे ही सगळी काम मोजून १० मिनीटात आटोपली. दुसर्‍या दिवशी email वर रिपोर्ट (निगेटिव्ह) आला. स्वॅब घेताना अजिबात दुखले नाही.

soha, मी सरकारी हॉस्पिटल मधे नाही केली कारण त्यांचा रिपोर्ट २ दिवसांनी मिळणार होता. मी चॅरिटेबल आणि शासनमान्यताप्राप्त हॉस्पिटल मधे स्वॅब दिला. मलाही स्वॅब घेताना फार वेदना झाल्या नाहीत. नाकात बोटभर आत स्टिकने टोचल्यावर जो करंट बसतो तेवढाच बसला. अर्थात माझ्या समोरील संशयीताने स्वॅब देताना जी चुक केली होती ती मी टाळली होती. विमानतळावरील प्रवाशांची संख्या आणि जमिनीवरील संशयीतांनी कोणत्याही हॉस्पिटलमधे ज्या संख्येत जाऊन केलेली टेस्ट यात थोडा फरक असणारच. कारण विमान कंपन्यांना पॅसेंजर ट्रॅव्हल बिझनेस हाच उद्देश ठेऊन या टेस्टसाठी जास्त वेळ जाणे परवडणारे नसेल.

आता टेस्ट करायला जाणाऱ्यांची संख्याही भरपूर वाढली आहे त्यामुळे गर्दी असणार. जानेवारीत त्या मानाने कमी गर्दी असेल.

डीजे कुमार, सर्व वाचून काढले . निगेटिव्ह आले तरीही सिंप्ट म असतील तर व्यवस्थित काळजी घ्या व लक्ष ठेवा. ओक्सि जन व ताप चेक करत राहा. कारण फॉल्स निगेटिव्ह असा पण एक प्रकार असतो. कुमार १ सर सांगतीलच.
आई बाबा कसे आहेत? सकाळी वाचले व नंतर लगेच माबो ऑफलाइन झालेली त्यामुळे दिवस भर काळ जी वाट्त होती.

वावे, तुम्ही म्हणताय तेच खरं असेल. आता-आता संख्या वाढू लागली आहे.

अमा - Bw धन्यवाद...! मला टेस्ट केल्यानंतर नंतर ताप आला नाही किंवा कसलेच सिंप्टम्स दिसले नाहीत तरी मी पुढील ६ दिवस तरी आयसोलेट राहीन. ताप येऊन गेल्यावर का कुणास ठाऊक इतकं फ्रेश वाटत आहे की बस्स..! घरी सगळे ठिक आहेत आणि त्यांचं नॉर्मल रुटीन सुरु आहे. फक्त मी खोलीतुन त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे Wink .

ताप येऊन गेल्यावर का कुणास ठाऊक इतकं फ्रेश वाटत आहे की बस्स..!>>> अरे टोटली मला पण. आणि सांगितलं तर कोणाचा विश्वास बसत नाही. चलो आराम करो.

DJ - काळजी घ्या..
शेवटचा परिच्छेद पटला.. अगदी कळकळीने लिहिलायं..

धन्यवाद रुपाली ताई Bw

ताप येऊन गेल्यावर का कुणास ठाऊक इतकं फ्रेश वाटत आहे की बस्स..!>>>अरे टोटली मला पण. आणि सांगितलं तर कोणाचा विश्वास बसत नाही.>> सेम पिंच अमा Biggrin

डिजे, पहिल्यांदा तुमचे अभिनंदन की सुखरुप राहीलात. आणी घरचे पण. बाकी उद्या लिहीन. औषधे डॉ च्या सल्ल्याने चालू ठेवा. उन्हाळ्याची काळजी घ्या.

धन्यवाद रश्मी. वैनी Bw आणि देवकी Bw

@रश्मी. वैनी - हो, मला फॅमिली डॉक्टरांनी ३ दिवसांचीच औषधं दिली होती. आता रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर त्यांनी नंतर काहीही औषधं दिलेली नाहीत. तरीपण मी माझ्या खोलीतच काम करत बसतो. उन्हाळा अतिच भासतो आहे. आज ढग आले होते.. उष्मा वाढवून गेले Uhoh

<<< घरी येऊन सँपल नेणारी सेवा इथे आम्ही रहातो त्या ठिकाणी आज सँपल घेतल्यावर दोन दिवसांनी रीपोर्ट देते. त्यांचा स्वॅब घ्यायला येणारा किती जणांच्या घरी फिरून आपल्याकडे आला असेल हेही आपणाला माहिती नसते.>>> DJ... , हो खाजगीवाले जे घरी येतात ते बऱ्याच ठिकाणी जाऊन येतात, तरीही मला ते कमी रिस्की वाटते. तसेही आपण त्यांना घरात घेण्यापूर्वी सॅनिटाईज करू शकतो अन ते गेल्यावर घर नीट स्वच्छ करू शकतो.
आमची टेस्ट ज्यांनी केली तिकडे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जितके स्वाब घेतात त्यांचा रिपोर्ट सकाळी येतो.

घरातील एका जरी सदस्याने कुणाचे ऐकायचेच नाही अन स्वतःचेच खरे करायचे ठरवले तर त्याच्यामागे सर्वांचीच फरफट होते अन आपण असह्यपणे फरफटत जातो>>> खरंच आहे‌. वडीलांना कितीक विरोध करणार शेवटी. माझा प्रतिसाद हार्श वाटला असेल तर सॉरी. काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाने हा लेख वाचून तर याचा उद्देश सफल होईल .

भाग्यश्री१२३ - नाही. मला वाईट नाही वाटलं त्या प्रतिसादाचे. उलट हा प्रश्न पडलाच पाहिजे. या क्षणी प्रवास करणे अन् सोबत हाय रिस्क मेंबर्स पण फिरवणे हे धोक्याचेच आहे. परंतु तुम्ही म्हणालात तसं वडिलांना किती वेळा आपण नकार देणार. म्हणून मला नाईलाजाने त्यांचं ऐकावं लागलं.

VB - हो. घरी swab घ्यायला आलेल्यांकडे रिस्क कमीच आहे.

डीजे .... तुमच्या खूशखुशीत लेखनशक्तीने गंभीर गोष्ट देखील वाचायला मजा आली. काळजी घ्या. धोका अद्याप टळला नाही.

@झम्पू आणि किशोर धन्यवाद Bw . हो. धोका टळलेला नाही म्हणून दुप्पट काळजी घेणे गरजेचे आहे. आपणही आणि घरच्यांनाही.

डीजे हाउ आर? माझा दहा दिवसाचा कालखंड काल संपला अजून चार दिवस आहेत. परत एकदा आर्टी पीसीआर करून तो निगेटिव्ह आल्यावरच कामावर फिजिकली जॉइन होता येइल . नो इशूज. घरून काम चालू आहे.

मिलिम्द सोमण चा १४ दिवस विलगीकरण कालखंड संपल्यावर लगेच पाच किलोमिटर दौड करून आला. इथपरेन्त ठीक आहे. पण लगेच त्याचे फोटो व्हिडीओ इन्स्टाग्राम वर का टाकायला हवेत?! अशी काय गरज भासते? प्रत्येक जण आपापल्या परीने कोप करत आहे. हेच खरे.

राखेचा धाग्यावर मी जमेल तसा अपडेट टाकला आहे.

अमा, मी ठीक आहे आता. धन्स Bw . तुम्हीही लवकर बऱ्या व्हा. पुन्हा एकदा RTPCR केल्यावर ती आता निगेटिव्ह च येणार.

सेलिब्रिटींना इन्स्ता, एफबी शिवाय कोण वाली. त्यावर तर त्यांचं पोट अवलंबून. आपलं त्यांच्या सारखं नाहीये ना.. आपलं मीटर सुरू आहे Wink

अनुभव छान कथन केला आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये जेव्हा फक्त कोव्हिड चाचणी फार कमी खाजगी लॅब्स कडे होती आणि मला ताप वगळता इतर कोव्हीडची लक्षणे वाटली होती तेव्हा मी जवळच्या एका शासकीय चाचणी केंद्रावर गेलो होतो आणि तिथली ही तोबा गर्दी पाहून धक्का बसला होता. म्हणजे आपल्याला नसेलही कोव्हिडं पण या गर्दीतून गेलो आणि चाचणी केली तर निकाल निगेटिव्ह येईल पण संसर्ग घेऊन मात्र नक्की जाईन असे वाटले.

तरी तिथे कळले की ताप असेल तरच आणि डॉक्टरने लिहून दिले असेल तरच इथे चाचणी होते.

मग मी आमच्या डोकला संपर्क केला. त्यांनी लक्षणे ऐकून (घसा खवखवणे, मध्येच नाक वाहणे, शिंका येणे, जराशीच अंगदुखी) सांगितले आयसोलेट हो आणि एक कफ सिरप व पॅरासिटामॉल घे, आणि मग तीन दिवसांनी फोन कर. मी दोन दिवसातच संपूर्ण ठीक झालो आणि चाचणीची गरज पडली नाही.

पण तिथली तोबा गर्दी, सोशल डिस्टनसींगचा धज्जा,काही लोकांचे हाल वगैरे पाहून जो धक्का बसला होता तो डोक्यातून जायला बरेच दिवस लागले.

Pages