आयुष्यातील खरे सुख

Submitted by ShabdVarsha on 29 March, 2021 - 07:12
मैत्री

आयुष्यातील खरे सुख

     लेखन : शब्दवर्षा

कथा आहे चार मित्रांच्या जीवनातील! आयुष्य जगत असताना कित्येकवेळा आपण ते खर्‍या अर्थाने जगणे विसरून जातो. वेळ निघून जाते; मग वाटते, हे तेव्हा केले असते तर बरे झाले असते. तसेच, या वयात बहुतेक जणांना सवय असते तुलना करण्याची आपल्यापेक्षा इतरांना कमी लेखण्याची. ही कथा अशीच आहे. सततची तुलना आणि नको त्या अपेक्षा जीवनातील आनंद कसा हिरावून घेतात व कुणालाही कमी लेखण्याचा आपल्यास कोणताच अधिकार नसतो. हेच सांगण्याचा या कथेतून प्रयत्न केला आहे.
  ही कथा आहे एकाच वर्गात शिकणार्‍या पदवीच्या चार  मुलांची. विराट,मिहीर,अभी,सुशांत त्यातले विराट,अभी सुशांत हे तीन खूप छान मित्र आणि चौथा मिहीर नावाचा मित्र. याचं कारण असं त्यांच फारस जमायचं नाही.तिघा मित्रांचा आयुष्याला बघण्याचा दृष्टीकोन अगदी वेगळा होता. आणि याउलट मिहीर होता.त्याच्यासाठी वर्गात टॉप करणं खूप महत्वाचं म्हणून तो सतत अभ्यासात गुंतलेला असे. अस समजा! की, बाहेरील जगात काय चाललय या सर्वाशी त्याचा कुठलाच एकमात्र संबंध नाही.आणि बाकी तिघे हुशार नव्हते, किंवा अभ्यास करत नव्हते असे मुळीचं नव्हते. ते सर्वच गोष्टी साठी वेळ काढायचे मग ती त्यांची मैत्री असो किंवा त्यांची आवड असो. जीवनाला बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन जरा वेगळाच होता.आयुष्य हे एकदाच भेटते मग ते हवं तसंच जगायला हवं.आनंद आणि खरा आनंद यात ही तफावत आहे ! आयुष्यात खरा आनंद भेटला की जगायची मजाचं काही वेगळी असते.असे सुशांतचे मत! त्यालाच सहमत असे विराट आणि अभी होते.
          मिहीर ने अभियांत्रिकी पदवीत सलग चार वर्ष पहिला येण्याचा मान मिळवला होता.याचाच कुठेतरी त्याला गर्व झाल्यासारखा वाटत होता. त्याला वाटत होते, आपल्याला कुठे ही सहजपणे चांगल्या प्रकारची नोकरी भेटूनचं जाईल.परंतू, असे सहज घडले नाही. त्याला नोकरी भेटत होती परंतू त्याला हवी तशी नाही. कुठे पगार कमी तर कुठे नकार ही त्याला पचवावा लागला.पदवी नंतरचे कित्येक दिवस तर त्याचे हवी तशी नोकरी शोधण्यातचं गेले.शेवटी कंटाळून त्याने एका कंपनीला होकार दिला. इथे ही पगार पाहिजे तसा नव्हता पण नंतर वाढेलच या आशेने त्याने तिथे नोकरी करण्याचे ठरविले. आता नोकरी करत असून त्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झाले होते. त्याच्या आशेनुसार त्याच्या पगारात देखील वाढ झाली होती.
               गेल्या या एक वर्षात मिहीर कोणाच्याच संर्पकात नव्हता. कॉलेजमधल्या बाकी मुलांशी तो तर कधी जास्त बोलतचं नव्हता. पण, सुशांत,विराट व अभी यांना तो आपले मित्र मानायचा. आज त्यांची त्याला काहीच माहिती नव्हती. कुठे आहे? काय करतात ? काहीच माहीत नव्हते. घरापासून दूर राहून नोकरी करणे, प्रमोशन साठी सतत धडपड करणे, आणि मेसचं जेवण हे सर्व सहन करूनही पाहिजे तशी पोजिशन न भेटणे आतल्या आत मिहीरला कमकुवत करत होते. या सर्व गोष्टींचा त्याच्या मनाबरोबर शरीरावर देखील परिणाम होत होता. सततचं बैठे काम, रागात जास्त खाणं यामुळे त्याचं वजनही वाढत होतं. यांमुळे त्याची चिडचिड होत असे याचा परिणाम कामावर होत होता.त्याला समजत नव्हते आता काय करावे कोणाला सांगावे असे. एकेदिवशी रूम वर येत असतांना त्याला विराट भेटतो. खूप दिवसांनी विराटला बघून आज मिहीरला त्याच्याशी बोलण्याची इच्छा झाली परंतू विराट घाईत होता त्याने मिहीरला कसा आहेस? काय करतो? अशी थोडी फार विचारपूस केली व निघाला.मिहीर ने तो जात असतांना स्वत:हून त्याचा मोबाईल नंबर मागितला.
             रविवारचा दिवस होता. मिहीर रूममध्ये सकाळचे अकरा वाजले तरी झोपलाच होता. त्याला उठावे असे वाटतचं नव्हते. रोजच्या एकट्या जीवनाचा आता त्याला कंटाळा आला होता. त्याला कळत नव्हते काय करावे, घरी सांगावे तर आई उगाच जीवाला घोर लावून बसेल.बाकी हक्काचे असे कोणीच नव्हते. जिथे, तो आपल्या व्यथा मांडू शकेल. झोपेतून उठल्यावर नाश्ता वैगेरे सर्व झाल्यावर मोबाईल बघतांना मिहीरला विराटची आठवण झाली त्याने लगेच त्याला फोन केला. फोनवर बोलत असतांना त्याला अभी, सुशांत आणि विराट हे तिघे आजही एकत्र आहेत आपण आहोत त्याच शहरात असे कळले. अभी व सुशांतचे आईबाबा देखील त्यांना भेटायला आले आहेत व विराट तर आई जवळच राहतो. विराटच्या बाबा लहानपणीच त्याला सोडून गेले होते. विराटने आज मिहीरला सायंकाळी भेटण्यास सांगितले.
हॉटेलची पत्ता त्याला सांगून फोन ठेवला.
    मिहीरच्या रोजच्या प्लॅनमध्ये आज कुठेतरी वेगळा बदल झाला. विराटशी बोलून त्याला खूप बर वाटलं थोडं मन रितं झाल्यासारखं वाटत होतं. सायंकाळी मिहीर ठरलेल्या वेळेत त्या हॉटेलमध्ये पोहचला. तिथे अगोदरच एका टेबलवर विराट, सुशांत आणि अभी बसलेले होते. विराटच्या हातात कसलं तरी पुस्तक होतं आणि बहुतेक त्यावरचं त्यांची चर्चा चालेली होती. मिहीर तिथे जाताच अभी व सुशांत त्याच्याकडे बघतच असतात. एकदम फिट असलेला मिहीर आज गोलगप्या सारखा झाला होता. त्याला बघून सर्वानाचं आनंद झाला. गप्पा चालू असतांनाच मिहीरने विराटला विचारले, "कसले पुस्तक आहे ते?" विराट क्षणभर थांबाला व सुशांतकडे पाहत म्हणाला. "हे पुस्तक आहे, 'The Great Marathi Writer Sushant Deshamukha' " आता, मिहीरने सुशांतकडे बघीतले "काय तुझं पुस्तक? तु कधी पासून लेखक झालास?" "हे भाऊचं तिसर पुस्तक आहे", अभी म्हणाला. "वाह!!बाकी अजून काय करतोस तू?" "लेखन करतो व त्याचबरोबर खाजगी क्लासेस घेतो." "अर्थात! आवड व निवड दोन्हीही जोपासतो", मध्येच अभी बोलला, "मी डान्स क्लास घेतो व जीम ट्रेनर आहे." "वो !!! म्हणूनच इतके फीट आहात तुम्ही." "पण तु?", मध्येच अभीने विचारले. त्याचा तो प्रश्न तिथेच थांबवत विराट म्हणाला "अरे!! सोड ना ते सर्व .मला सांग काय खाणार. तुला वाटेल ते सांग आपलचं हाँटेल आहे." "म्हणजे?"  मिहीरने विचारले. "अरे हे हाँटेल आपल्या विराटचं." ते आलीशान हाँटेल विराटचं आहे ऐकल्यावर तर मिहीरला धक्काच बसला. तितक्यात, "विराट सर! आज गायन ऐकायला भेटेेल की नाही." असे एका पंधरा ते सोहळा वर्षाच्या मुलांने विचारले. "हो नक्कीच!" ...इतके म्हणून, विराटने आपला गिटार घेवून गायनास सुरूवात केली हे सर्व बघून मिहीरला वाटलं आपण चूक केली इथे येऊन. यांच हेच कौतूक बघायला यांनी मला इथे बोलवलं. मी वेडा आलो लगेच. मिहीरने कसा तरी थोडा फार नाश्ता केला व तिथून काढता पाय घेतला.सर्वांना भेटल्यानंतर मिहीरला जास्तच त्रास होवू लागला. कुठेतरी त्याला वाटू लागले. आपले ते मित्र खूप आनंदी आहे. आज ते आरामात जगतात आणि आपण फक्त एका भाड्याच्या बैलाप्रमाने जीवन व्यतीत करतोय. या सर्व विचारात त्याची प्रकृती ठासाळली व त्याला हॉस्पीटलमध्ये भरती केले. ही बातमी विराटलाही कळाली. त्याच सायंकाळी ते तिघे मिहीरला भेटण्यासाठी आले. डॉक्टरांशी बोलत असतांना सुशांतला कळले, मिहीरला कसला तरी तणाव आहे म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे. मिहीरला भेटून ते आपआपल्या घरी पोहचले. सुशांतला मात्र, अस्वस्थ वाटत होते. मिहीरला इतके कसले टेन्शन आले असावे की, त्याची आज अशी अवस्था झाली आहे. हे कळायलाचं हवं यातून त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे.असेच दोन तीन दिवस जातात. मिहीर आता बरा आहे समजताच सुशांत त्याच्या रूमवर त्याला भेटायला गेला. कसा आहेस वैगेरे अशी विचारपूस झाल्यावर काही वेळ दोघेही शांत बसले. मग सुशांतनेच विचारले, "मिहीर तुला एक विचारू?" मिहीर ने होकारार्थी मान हलवली.
"तुला कसलं टेन्शन आहे?" "काय टेन्शन कोण बोलं तुला असं काहीही नाही, तु बोलतोय ते चुकीचं आहे. "असं, मी बोलतो ते चुकीचं आहे की तु बोलतो ते. हे बघ मिहीर मी त्या दिवशी डाँक्टरांना भेटलो तर तेव्हा मला समजलं तुझी ही अवस्था सततचा विचार करून झालीये. यातून, त्यांनी तुला लवकरात लवकर बाहेर काढण्यास सांगितले. बर चल एक मित्र म्हणून नको सांगू मी एक लेखक आहे व तुझी कथा लिहीतोय असं समजून तर सांग." मिहीर क्षणभर थांबला, एक मोठा श्वास घेतला व बोलू लागला. "मला काही कळत नाही बघ, काय चालू आहे आयुष्यात. खूप मोठी स्वप्नं बघितली होती परंतू, आज ती पूर्ण होण्यास कुठे कमी पडतो ते समजत नाही. नको त्या नोकरीस चिटकून बसलो आहे. फक्त कारचे व फ्लॅटचे हफ्ते भरावे लागतात म्हणून. आयुष्यात आईवडील सोडले तर, हक्काचे असे कुणीचं नाही. हे सर्व त्यांना ही सांगू शकत नाही. कारण आई उगाच जीवाला घोर लावत बसेल. कंटाळा आला आता मला सर्व गोष्टींचा. आता वाटते हे असेचं होणार होते तर कॉलेजमध्ये का रात्र दिवस अभ्यास केला तुमच्यासारखी मज्जा का नाही केली. माझ्याचं आयुष्यात हे सर्व का?" हे सर्व बोलतांना मिहीरच्या डोळ्यात पाणी आलं होतं आता मिहीर शांत झाला. थोडा वेळ सुशांत पण शांत बसला. मिहीरला पाणी दिले.
      आता सुशांतने बोलण्यास सुरूवात केली. "हे बघ मिहीर मी जे बोलणार आहे आता, यातल्या काही गोष्टी तुला पटणार नाही. कदाचित, तुला मी सांगण्याचा रागही येईल. परंतू, मी जे आता सांगणार आहे तेच खरं आहे. सर्व प्रथम तु मला सांग तुला नोकरीला लागून फार तर एक वर्ष झालं असणार बरोबर . मग तु कार आणि फ्लॅट हे दोन्ही का घेतले ? याची तुला खरंच गरज होती का? तुझं लग्न वैगेरे झालं असते तर गोष्ट वेगळी होती. मला नाही वाटत सध्या तुला गरज होती. आज तुला एकटेपणा जाणवतो आहे, कारण तु कॉलेजला असल्यापासून सर्वांपासून दूर दूर राहत गेला. तु सतत तुलना करत गेला. तु फक्त पहिला यावं यासाठी अभ्यास केला कारण तुला प्रिय होती ती त्यानंतर होणारी स्तुती, कौतुक. तू प्रत्येक गोष्टी पासून स्वत:ला दूर ठेवलं फक्त यासाठी की अभ्यास व्हावा. पण तू पुढच्या आयुष्याचा विचार कधीच केला नाही. आजचाही विचार केला नाही, हवं तस जगला नाही. आज तुला त्याचाच त्रास होत आहे. कदाचित तुझ्या कंपनीत असे ही लोक असतील जी तुझ्या पेक्षा कमी शिकलेली असतील व आज एका चांगल्या पोजिशन वर असतील. तु त्यांच्याशी स्वत:ची तुलना करत असशील. तुला मी चांगला ओळखतो. तुला मिहीर, एखाद्या विषयात दुसर्‍याला एक मार्कस जरी जास्त पडला तरी तुला वाईट वाटायचं. हे अस वागून तु फक्त स्वत:ला त्रास करून घेत आलास. तुलना असली तरी ती स्वत:शीच हवी. तुझा मीपणा आजही तुला सोडाण्याचं नाव घेत नाही. किंबहुना, तुच त्याला चिटकून बसलेला आहेस. तुझा गर्व आज नक्कीच कमी झाला आहे परंतू, तुझा मीपणा आजही जीवंत आहे तो सोड. जरा इतर पुस्तके वाच तेही शक्य नसेल तर लोकांना वाचायला शिक. कोणतीही पदवी ही नोकरी भेटण्यापुर्ती मर्यादीत असते. खरी दुनियादारी ही अनुभवातून लोकांकडुन वाचनातून शिकायला मिळते. 
तुला आठवते का मिहीर? एकदा, तू एक गणिताचं समीकरण सोडवत होता. ते तुला सुटत नव्हते. तेच  समीकरण विराटने काही क्षणात तुला सोडवून दिले होते. त्यावेळेस तु बोलला होता, हुशार आहेस पण तु अभ्यास करत नाहीस. नको त्या गोष्टीत वेळ वाया घालवत आहे. तुला माहीतीये विराट साठी कॉलेजमध्ये पहिलं येणं काहीच अवघड नव्हतं. कारण, त्याची गणितावरची पकड कमालीची आहे. परंतू, त्याला वेळेचे बंधन होते दिवसभर आपल्या सोबत कॉलेज करून कॉलेजनंतरच्या वेळेत तो एका हॉटेलमध्ये काम करायचा. तुला इतके माहीतच असेल, त्यांचे बाबा तो लहान असतांनाच गेले होते. आणि त्याची घरची परस्थितीही इतकी चांगली नव्हती. म्हणून त्याला ते करणे भाग होते. बाकी अभीला ही मेडीकला जायचे होते. हे ही तुला माहीत नसणार. त्याला ही काही कारणांनी बारावीला मार्कस कमी पडले नंतर डोनेशन न झेपणारे होते. म्हणून त्याला अभियांत्रिकी क्षेत्रात कुठलाच रस नव्हता. आणि उरलो मी! माझं आधी पासून ठरलेलं होतं एक लेखक बनायचं ते नाहीच शक्य झालं तर गावी जाऊन शेती करायची. त्यात मला कुठलाच कमीपणा नव्हता. याउलट तुझं आहे तु स्वत:ला ओळखलंच नाही बस! चांगले मार्कस तुमच्याकडे आहे म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी भेटलचं असे नाही. मार्कस फक्त एखाद्या चांगल्या कॉलेजला प्रवेश घेण्यास कामी येतात. नंतर, त्यांना कुणीच विचारत नाही. मी असं म्हणत नाही की, तु चुकीचे केले. परंतू, तु एकच गोष्ट धरून बसला. तु कॉलेज जीवन जगायचं विसरला. तु दोन्ही गोष्टी सहज करू शकत होता. परंतू, नाही तु कधीच आमच्यात जास्त राहीला नाही.कारण तुला आम्ही नको तिथे वेळ वाया घालतो अस वाटायचं. खरं म्हणजे! तु नंतर मला कुणाचीच गरज नाही असं वागू लागला. थोडक्यात मीपणा तुझ्यात वाढत गेला. तु कधी ही स्वत:ला जाणून घेतले नाही. स्वत:ची आवड छंद जोपासले नाही. हेच कारण आहे आज तुला आयुष्य कंटाळवाणे वाटत आहे.
     कंपनीत जास्तीचं काम करून तुझ्या मनावर तर परिणाम झाला. त्याचबरोबर तो शरीरावर देखील झाला. याच सर्व गोष्टीचा तुला आज त्रास होत आहे. तुझं वजन तुला कमी करायचं आहे पण त्यासाठी लागणार वेळ तुझ्याकडे नाही. मग सांग जिथे स्वत: साठी वेळ नाही अशा दिखाव्याचा काय फायदा? जाच्याकडे पैसा कार बंगला असला म्हणजे ती व्यक्ती सुखी असे मुळीच नाही. हा केवळ दिखावा तु तेच करत आहे. तु कार घेतली खरचं तुला तिची गरज होती का? तुझं ऑफिसही येथून फार काही दूर नाही. त्याचे हप्ते भरतांना आज हातात काहीच उरत नाही म्हणून तुझी चिडचिड होते. जिथे आपल्याला आनंद नाही ज्या गोष्टीत खरे सुख नाही.अशा दिखाव्याचा काय फायदा? जीवनात एक तर चांगले मित्र असावे. नाहीतर, मग मन रमेल असा एखादा चांगला छंद हवा म्हणजे, एकांत व एकाकी पण हावी होत नाही. आज मी लेखक आहे याचं श्रेय मी आज कुठेतरी माझ्या दोन्ही मित्रांना म्हणजे अभी आणि विराटला देतो. कारण मी पहिले पुस्तक लिहीले ते आमच्या मैत्रीवरच तेच पुस्तक इतरांना जास्त आवडले. त्या मागची माझी मेहनत तर होती. परंतू, विचार कर जर ते माझ्या आयुष्यात नसते तर... मी मैत्रीवर इतकं लिखाण कदाचीत केलं नसतं. विराटचही तसच आहे त्या हॉटेलमध्ये काम करण्याचाच त्याला खूप फायदा झाला म्हणूनच आज त्याचे इतके मोठे हॉटेल आहे. त्याच्या हॉटेलचे विशेष म्हणजे, तो स्वत:तिथे गातो. काही लोक मुली खास त्याचं गायन ऐकण्यासाठी हॉटेलमध्ये हजरी लावतात व तो ते श्रेय आम्हाला देतो कारण कल्पना आमची होती. आणि अभीने काही दिवस नोकरी केली व नंतर कंटाळवाणे वाटले म्हणून व स्वत:फीट राहावे म्हणून जीम सुरू केली. यात मी व विराटने त्याला हातभार लावला. तुला तर माहीतच असेल, फिटनेसच्या बाबतीत तो जरा जास्तच जागृत आहे. म्हणजे समस्या आमच्या जीवनात होत्या आणि आहे. परंतू, गरज असते तुम्ही त्यावर कशी मात करता त्याची. आज कशीही परिस्थिती असो आम्ही सोबत आहोत. हे सुध्दा आमच्यासाठी जगायला पुरेसे आहे. तुझी समस्या खूप छोटी आहे तु तिला मोठी बनवत आहे. हे सर्व बोलून सुशांत थांबतो. चल, खूपच झालं काही चुकलं असेल तर मला माफ कर. येतो मी." असं म्हणून तो जाण्यास निघतो. "सुशांत थांब तुझं पुस्तक भेटेल का मला?" "हो नक्कीच!! हे घे माझे तिसरे पुस्तक. आशा आहे तुला नक्की आवडेल"
सुशांत घरी जाऊन बराच वेळ झाला होता. परंतू, तो मागे मिहीरसाठी अनेक प्रश्नचिन्ह सोडून गेला होता. मिहीरनेही त्यावर शांत विचार केला त्यालाही कुठेतरी सुशांतचं बोलणं पटत होतं आणि त्याला प्रचंड असा स्वत:वर रागही येत होता. ज्या मुलांना आपण टाईमपास करणारी समजत होतो. मुळात ती मुलं खर्‍या अर्थाने कॉलेज जीवन जगली व आजही माझ्यापेक्षा चांगलं आनंदी जीवन जगत आहे. मी जर त्या वेळेस त्यांच्या पासून दूर राहीलो नसतो. तर आज कदाचीत परीस्थिती वेगळी असती. ज्या मुलांना आपण नावं ठेवली आज वाईट परिस्थितीत तीच कामं आली. त्याला आता स्वत:च्या विचारांची लाज वाटू लागली. तो या सर्व विचारतचं झोपी गेला. सकाळी उठून आज तो सर्व आटपून ते पुस्तक वाचण्यास बसला ज्याच नाव होतं 'जीवनातील खरे सुख'. ते पुस्तक बराच वेळ तो वाचत बसला थोडे पुस्तक वाचून त्याला समजले हे पुस्तक थोडे फार सुशांत ने त्यांच्याच तिघांच्या जीवनाशी निगडीत लिहीले आहे. त्यातून त्याला अजून एक गोष्ट समजते. विराटला एक गायक व अभीला एक चांगला डॉक्टर व्हायचं होतं. परंतू, आजही ते जिथे आहे त्यात आनंदी आहे. कारण, एक स्वप्न पूर्ण नाही झाले म्हणजे सर्वच संपते असे नाही. ती अपूर्ण स्वप्नचं तर जगण्याची खरी मजा देतात. आज ते तिघेही त्यांच्या व्यवसायाबरोबर त्यांचे छंद ही जोपासत होते. सुशांत तर चांगला लेखक आहे हे या पुस्तकांवरूनच समजते. परंतू विराटही त्याच्या हॉटेलमध्ये गाऊन स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देत होता. तसेच, अभी डान्स क्लास घेवून लोकांच्या वजनाबरोबर त्याचं टेन्शन देखील कमी करत होता.
     दोन ते तीन दिवस डॉक्टरांनी मिहीरला आराम करण्यास सांगितले होते. मिहीरने तेच केले. या दोन-तीन दिवसात त्याने सुशांतचं संपूर्ण पुस्तक वाचून काढले. त्याचा परिणाम त्याच्यावर झाला होता. ते पुस्तक कुठेतरी खोल विचार करण्यास भाग पाडणारे होते. बर्‍याच गोष्ठी मिहीरला त्या पुस्तकाने शिकवल्या. आज सकाळी लवकरच मिहीर सुशांतला भेटायला गेला. सकाळी मिहीरला आपल्याकडे आलेला बघून सुशांतला आनंद तर झाला.पण त्याच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसत होतं. ते मिहीरने ओळखले, "अरे ! बस सहज आलो, तुला कुठे जायचे तर नाही ना?", मिहीरने विचारले . "नाही अजून वेळ आहे." बस ना तू सुशांत म्हणाला. "मी तुझं हे पुस्तक देण्यास आलो व तुझी बाकी दोन पुस्तके मला हवी आहे भेटतील ना ?" "अरे विचारतो काय त्यात, नक्कीच भेटतील!!" "आणि हो मी कार विकत आहे." मिहीरने सागितले. "असं अचानक?"
"हो! मी ठरवलंय आता ज्या गोष्टी डोक्याला रिकामा व्याप करता त्या नकोच आहे आयुष्यात.तस ही तु म्हणत होता तेच खरं त्या कारचा वापर मी किती कमी करतो. फक्त दिखावा तर आहे तो." "तुला राग आला का माझ्या त्या दिवसाच्या बोलण्याचा?" "अरे! सुशांत मुळीच नाही. खरं सांगू? त्यासाठी वाटेल तितके आभार मानले ना मी ते कमीच आहे. तुझ्या या पुस्तकाने व त्या दिवसाच्या बोलण्यानेच आज मी हा निर्णय घेत आहे. आणि तो योग्य आहे." अशाच थोड्या गप्पा करून मिहीर सुशांतची बाकी दोन पुस्तके घेऊन जाण्यास निघाला. जातावेळी त्याने सुशांतला घट्ट अशी मिठ्ठी मारली व येतो मित्रा म्हणून निरोप घेतला. सुशांतच्याही डोळ्यात नकळत पाणी आलं. त्याला वाटले नव्हते जो बदल मिहीरमध्ये हवा होता तो इतक्या लवकर बघायला भेटेल.
       मिहीरने कार विकली काही दिवसातच ती कंपनी सोडली. व दुसरीकडे नोकरी शोधली. त्याने अभीची जीम जॉइन केली व डान्स क्लासही. मिहीरची दुसरी नोकरी भलेही त्याच्या अगोदरच्या नोकरीपेक्षा कमी पैशांची होती. परंतू, इथे त्याला कामही कमी होते याचमुळे त्याला उरलेल्या वेळेत फिरायला जाणं लोकांना समजणं शक्य झालं. तो आता नियमित विराटच्या हॉटेलमध्ये जात असतं. मिहीर आता त्यांचा चांगला मित्र झाला होता. चौघे रोज हॉटेलमध्ये भेटायचे एकमेकांच्या सुखदु:खाबरोबर बर्‍याच गोष्टींची देवाणघेवाण व्हायची. काहीच दिवसांतच मिहीरमध्ये खूप असा बदल झाला होता. जे झालं त्याचं पश्चात्ताप करणं सोडून तो आहे तो प्रत्येक क्षण भरभरून जगत होता. आणि पुढेही जगणार होता......

तात्पर्य:
         जीवनात  दुसर्‍याशी तुलना करणे समाधान आनंद हिरावून घेते. कधीच कुणाला कमी समजण्याची चूक करू नये. नको वाटणार्‍या समाधान पळवून लावणार्‍या गोष्टीस  दीर्घकाळ चिटकून बसू नये!

Group content visibility: 
Use group defaults