अमेरिकन गाठुडं!--१०

Submitted by सुरेशकुलकर्णी on 14 March, 2021 - 03:14

सगळी बांधाबांध झाली. मुलाने मला पैंटिंगचे किट, कॅमेरा, सकाळी वॉकसाठी ट्रॅक सूट, बायकोला सुनेने कपडे, अजून कायकाय घेऊन दिले होते. (बायको काय-काय घेतलं नाही सांगत!) सामना पेक्षा आमचे पाय ज्यास्त जड झाले होते. तो सकाळचा गारवा, सुंदर सुरेख वातावरण, फुलांपेक्षाही सुंदर पिवळी पडून गळालेल्या पाईन ऍपलच्या पानांचा सडा, आपली माणसं, सगळंच येथे सोडावं लागणार होत.

डिकीत सामान अन डोळ्यात पाणी घेऊन आम्ही घर सोडलं. नातींनी सोबत येण्यासाठी ठेवणीतले सूर काढले. चार दिवसात माया लागली होती. आज आजून त्यांचं रडणं कानात घुमतय!

ऑस्टिन ते न्यूयार्क अमेरिकेच्या डोमॅस्टिक फ्लाईटने निघालोत. न्यूयार्क पासून आमच्या परतीच्या प्रवासाची जवाबदारी इमिरातच्या विमानावर टाकण्यात आली होती. मुलाचे बिझनेस क्लासचे आणि आमचे इकॉनॉमीचे तिकीट होते. बोर्डिंगच्या वेळेस फाटाफूट झाली. त्याची जागा दुसऱ्या मजल्यावर होती! हा आमचा प्रवास डबल डेकरच्या विमानाने घडणार होता!! डबल डेकर बस शान सिनेमात बघितली होती! प्रवास कधीच केला नव्हता. रेल्वे पण असतात म्हणे. एकदम दोन पायऱ्या चढल्या सारखं वाटत होत.

या विमानात जागा पहिल्याच रो मध्ये होती. भरपूर लेगस्पेस होती. या विमानात सगळ्या हवाई सुंदऱ्या लाल ड्रेसमध्ये आणि डोक्याला लाल टोप्या घातलेल्या होत्या. दुबईवाल्या. आमच्या लहानपणी बायकांना टोपी घालायला बंदी होती. मी एकदा आईला विचारलं पण होत. 'बायकांनी टोपी घातली कि महागाई वाढते!' या उत्तराने तिने समाधान केले. महागाई वाढली तर अण्णांच्या पगारात घर चालणार कसे? नका घालीनात बायका टोप्या! मी तिचे बोलणे खूप सिरियसली घेतलं होतं. आणि ते खरय बरका! या बायका टोप्या घालतात म्हणूनंतर दुबई श्रीमंतांनाच परवडते! लांब कशाला भारतात सुद्धा बायका फेटे बांधतात अन टोप्या घालून ढोल बडवतात. महागाई वाढणारच कि!

त्या विमानात आमच्या शेजारच्या सीटवर एक कानडी अम्मा येऊन बसल्या. पन्नाशीच्या म्होरल्या होत्या. नाकात आणि कानात सुदर्शन चक्रासारखी आभूषणे! त्या त्यांच्या सिटीमध्ये बसल्या तेव्हा ते विमानाचं धूड सुद्धा हल्ल्याचा भास झाला. कभी शंभर एक -कभी शंभर दोन तरी वजन असावं. गरगरीत, साडी पण गोलसाडीच घातली होती! त्या सराईत प्रवासी वाटल्या. झटपट सीटवरल्या किट मधून मोजे काढून पायात घातले. इयरफोन कानात घातला. हाता जवळून तो मिनी स्क्रीन स्टॅन्ड अड्जस्ट घेतला. त्यावर एक कानडी सिनेमा पण ऑन करून टाकला! मी त्यांच्या कडे लक्ष देऊन पहात होतो! एकटी बाई, सोबत लहान लेकरू! कसा झकास प्रवास करतीयय! नाहीतर आम्ही, सोबत मुलगा लागतो प्रवासाला! शेजारच्या प्रवाश्याकडे पहाणं अवघड असत. बायकोने जबर कोपरखिळी मारली!

त्यांच्या सोबत एक जेमतेम दोन अडीच वर्षाच गुटगुटीत पोरग होत.

"बघितस? पोरग? पण त्या बाईचं---"

"किधर को जाते?" बायकोने सूत्र हाती घेतले. हि बोलायला लागली कि माझ्या पोटात धस्स होत. हिच्या हिंदीला तोड नसते! ती ते हिंदी इतकं तोडून टाकते! (तसही तोडून बोलण्यात, हीच कोणी हात धरू शकणार नाही!)

"आं?"

"हिंदी? इंग्लिश?" मी त्यात उडी घेतली.

"कन्नडा! हिंदी, इल्ला!"

पण बायको तिला सोडायला तयार नव्हती. खाणा -खुणा, हातवारे, हिंदी-मराठी-इंग्रजी यांचं गरगट करून त्या आम्माशी संवाद साधलाच! (हिचा न मला कधी कधी कॉम्प्लेक्स वाटतो. बेंगलोरला सुद्धा माझ्या पेक्षा हिच्या ओळखीज्यास्त आहेत! मला थोडं इंग्लिश आणि छान हिंदी बोलता येत. चार डोके सुद्धा मला ओळखत नाहीत. आणि हि संध्याकाळी फिरायला केव्हा येते याची किमान सात-आठ जणी तरी वाट पहात असतात! अजून काही वर्ष आम्ही बेंगलोरात राहिलो तर, हि इलेक्शनपण उभी राहील! काही नेम नाही!)

त्या अम्माची कहाणी, जी हिने मला सांगितली, ती अशी होती. या अम्मा बंगलोरच्या. हे मुलं तिचा नातू आहे. मुलीचा मुलगा. मुलगीआणि जावई न्यूयार्कमध्ये रहातात! दोघांना जॉब आहे! म्हणून हे बाळ आजी जवळ! नाताळच्या सुट्ट्या आहेत म्हणून, नातवाला मायबाप भेटी साठी आजी घेऊन आली! ते निरागस गोंडस बाळ बाटलीभर दूध पिऊन झोपी गेलं होत! मी क्षणभर त्या लेकराकडे पाहिलं. या वयात आई-बापाचा सहवास हा त्या लहानग्यांचा नैसर्गिक अधिकार होता! का हिरावला जावा? पैसा? यांच्यासाठीच ते काळजावर दगड ठेवून कमावत असतील? असे असेल तर, काय मोल वसूल करून तो पैसा येतोय? खरेच इतर काही मार्ग नसेल? मलाच गलबलून आलं. अरे, नसत प्रेम द्यायचं तर का आणलात या जगात या कोवळ्या जीवाला?

या विमानातल्या हॉस्पिटॅलिटीची एक गम्मत आहे. फ्लाईट कोणत्याही वेळेची असो, ब्रेकफास्ट-लंच -डिनर! हे याच क्रमानं येत! आमची खाणी झाली. या वेळेस टरबूज-खरबूज आनंद देऊन गेले. खाणं झालं कि बायको तोंडावर शाल घेऊन झोपी गेली! हिची हुकमी झोप सुद्धा मला खुन्नसच देते!

मी अम्माकडे पहिले. स्क्रीनवर कानडी मारामारी चालू होती. अम्मा झोपी गेलेल्या. मी त्यांचं पाहून टीव्ही स्क्रीन ऑन केला. सिनेमांचा आयकॉन टच केला. नो हालचाल! जरा जोरात प्रेस केलं. हटवादी असावं. खटखट बडवल. पाण्यातल्या म्हशीसारखं हलायला तयार नाही! सगळ्या सुंदऱ्या कुठे गेल्या कोणास ठाऊक?

तो सिनेमाचा नाद दिला सोडून!

"बिघडलं असलं! झोपा आता!" बायको पांघरणाआडून बोलली!

झोपा, म्हणाल्याने येति काय झोप? माझ्या शेजारच्या रो मध्ये एक माझ्याच वयाचा माणूस. डोक्यावरून पांघरून घेऊन गुडूप करून झोपलेला पहिला. लहानपणी माळवदावर उन्हाळयात आम्ही असच गुडूप करून झोपायचो! मी तो प्रयत्न केला. जमेना. झोप नाही लागली! दुबई येई पर्यंत जागाच राहिलो. परतीच्या प्रवासानं झोप हिरावून घेतली.

दुबईला आम्ही आम्ही रात्री केव्हातरी पोहंचलो. येथें बेंगलोर केवळ तीन तासावर! रात्री एक वाजता कनेक्टिंग फ्लाईट होती. दोन तासाचा थांबा होता. मुलाचापण अमेरिका पहिलाच प्रवास. व्हिसा लाईन लांब लचक होती. मुलगा कोठे इन्क्वायरी काउंटर दिसतंय का शोधू लागला.

एका काउंटरवर एक लालपरी बसली होती. मी तिला माझ्या हातातला बोर्डिंगपास दाखवला. एकवार तिने आम्हा दोघांकडे पहिले.

"साथ कोई है?"

"हा.पोरगा है!" अर्थात बायको.

तोवर चिरंजीव जवळ आले. तिने आमचे व्हिसा क्लिअर करून सरळ सेक्युरिटी गेट दाखवले! बूट, बेल्ट, हातातल्या आंगठ्या ट्रे मध्ये टाकून दिल्या! दहा मिनिटात बेंगलोर फ्लाईटच्या गेटवर!

कुठल्याही देशाचं एयरपोर्ट हे त्या देशाचं 'ट्रेलर' असत, अस मला वाटत. पुरी फिल्म त्या देशात फिरल्यावर दिसते! थेंबभरहि तेलाचा पत्ता नसताना, या वाळवंटंजी आर्थिक भरारी घेतली आहे, ती आचंबित करणारी आहे. असो तो निराळा विषय आहे.

मला हे एअरपोर्ट खूप आवडलं. या एरपोर्टमधे भव्यते सोबत एक वेगळे देखणेपण आहे. दुबई सवडीने अनुभवण्याचा विचार, तेथे पाय ठेवल्याबरोबर पक्का करून टाकलाय!

पहाटे चारवाजता आम्ही बंगलोरच्या विमानतळावर उतरलो. मुलाच्या ऑफिसची गाडी रिसिव्ह करायला हजर होती!

सुखरूप स्वगृही परतलो.

या प्रवास वर्णनात बरेचदा तिथल्या आणि आपल्या भारतातल्या परिस्थितीची तुलना करून गेलोय. खरे तर अशा तुलनेशिवाय आपण चांगल्या गोष्टी स्वीकारून आमलात आणण्याचा प्रयत्न करणार नाही. जगात जे-जे चांगलं आहे, सुंदर आहे तस आपल्याही देशात असावं असं वाटत.

भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, 'सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!' आपणच अभिमानाने म्हणू.

शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी 'आपला गाव बरा!' हेच सत्य असत!

(समाप्त.)

मित्रांनॊ हा माझा, प्रवास वर्णन, लिहण्याचा पहिला प्रयत्न! आपल्याला भावला असेल. आपल्या भरभरून प्रतिसादरुपी वाचनाशीर्वादाबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूच. अशाच एखाद्या लिखाणाच्या निमित्याने. तोवर Bye.

सु र कुलकर्णी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर.... तुमच्याबरोबर आम्हीपण अमेरिकेला जाण्याचा अनुभव घेतला.... इतके जवळचे वाटले लेखन....

छान एकदम शेलक्या शब्दात मांडणी व त्यासोबत विनोदाची फोडणी मस्त भट्टी जमली ....पुढच्या प्रवासाची प्रतिक्षा