अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून

Submitted by अस्मिता. on 27 February, 2021 - 18:49

अंतरीच्या गहिऱ्या गुहेतून

उपोद्घात:  ही एक दुःखद कथा आहे. २८ फेब्रुवारी हा 'दुर्मिळ आजार दिवस' मानल्या जातो. फेसबुकच्या अचानक आलेल्या फोरवर्डने कळले व आवर्जून लिहावे वाटले.  उपचार, उपाय वा औषध उपलब्ध नसलेले आजार, जेनेटिक कंडिशन्स असलेल्या अनेक व्यक्ती या जगात आहेत. याने बऱ्याच रूग्णांच्या व त्यांच्या जोडीदारांच्या, पालकांच्या, अपत्यांच्या, केअरगिव्हर्सच्या आयुष्यात जे एकाकीपण येते त्यावर ही कथा बेतलेली आहे. या कथेला शेवट नाही. त्या दु:खाला, एकाकीपणाला व त्यामुळे येणाऱ्या दृष्टीकोनाला व्यक्त करण्याचा छोटासा प्रयत्न आहे, तरीही आव्हानात्मक परिस्थितीतही ते त्यांच्या तेजाने तळपत रहातातचं याचं कौतुकही आहे. या प्रकारचं हे माझं पहिलचं लेखन आहे.  काही जणांना नकारात्मक वाटेल पण मला वास्तवाच्या जवळ जाणारे हवे होते. उगीच सत्याकडे दुर्लक्ष करून बेगडी सकारात्मकता थोपवून लिखाण प्रामाणिक राहिले नसते. बहुतेकांसाठी काल्पनिकच !)

आम्ही : अरे वा ! या, या, दमला असालं नं बसा. काय म्हणतोयं पृष्ठभाग...
ते:  अहो , तिथे काय कमी त्रास आहेत रोज नवीन काही तरी सुरू असते.

आम्ही: तेही खरं आहे म्हणा, आम्हाला या गहिऱ्या गुहेत काही जाणवतं नाही. बरं पाच हजार पायऱ्या उतरून येताना काही त्रास.. ते एक बरं आहे तुम्ही मध्ये थांबलात... 'ग्रिफ अक्लमटायझेशन' करूनही हे अंतरात उतरणं भल्याभल्यांना सोसत नाही.

ते: परंतु तुम्ही इथे कसे आलात ...कधी आलात.
आम्ही: निदानाला झाली असतील काही वर्षं.. तेव्हा आपोआपच आलो. इथे कुणी स्वतःहून थोडीचं येतं. दुःख फक्त दुःख नसतं ते सोबत प्रचंड एकाकीपणा घेऊन येतं, रोज एकेक, कधीकधी एका दिवसात वीस-वीस पायऱ्या उतरलोयं आम्ही.  इथे कुणी येत नाही .. छान शांत असतं.

तेः बरं , तुमचं नाव ???! तुम्ही स्त्री का पुरुष हे जरा सांगाल का..
आम्ही: हो, हो सांगते त्याकरतां तर हा मुलाखतप्रपंच नैका. आम्ही स्त्री किंवा पुरुष नाही , एक अवस्था आहोत एकाकी मनाची.  तुम्हाला लक्षात रहायला सोपं जावं म्हणून एक नाव देऊ अंss सीता , 'सीता' आहे ही अवस्था. ती दिसतेयं का तुम्हाला निजलेली तिथे... ती ही एक अवस्थाच आहे तिला 'अहल्या' म्हणू.

ते:  हीच नावं का बरं निवडलीत तुम्ही ??!
आम्ही : सीता कशी अशोकवनात रामाची वाट बघायची , फक्त राम नाही तर तिला बंधनमुक्ती सुद्धा हवी होती. तसे आम्ही शुश्रूषेच्या अशोकवनात आहोत. ज्यांची करतोयं त्या 'अहल्या' कारण त्या स्थानबद्ध शीळा आहेत. दोन्ही अवस्था एकाच गोष्टीची वाट बघतायतं म्हणून त्या गोष्टीला 'राम' म्हणू. आम्ही दोघीही रामप्रतिक्षेच्या ऋणानुबंधात बांधलेल्या आहोत.

तेः तुम्ही जरा विचित्रच बोलतायं !!
आम्ही: पृष्ठभागावरील भाषा आता विसरतोयं हळूहळू, माफ करा हं !

ते: हरकत नाही. पुढे सांगा.
आम्ही: इथे अशा मनाच्या अनेक गहिऱ्या गुहा आहेत. सगळी दुर्मिळ आजारांनी गांजलेली माणसं आणि त्यांचे कुटुंबीय इथे रहातात. एकदा तुम्ही इथे आलात की वर परत जाणं जवळजवळ असंभव. वरच्या लोकांना इथलं बोलणं समजत नाही तेव्हा संवाद हळूहळू लोप पावतो. इथून कितीही ओरडलं तरी पुष्कळदा त्यांना ऐकू येत नाही , चुकूनमाकून ऐकू आले तर समजत नाही , किंचीतचं समजलं तरी झेपत नाही. मगं 'बिग हग्ज' म्हणून ते वाट दिसेल तिकडे पळत सुटतात. का रे बाबा , विचारलं तर उगाच तुम्हाला कशाला डिस्टर्ब आधीच तुम्ही किती बिझी असता ,असं कारण सांगतात. .. आणि म्हणून ते जास्त खोलात जात नाहीत. बरोबरच आहे म्हणां पुष्कळ व्याप आहेत म्हणे वर... आम्ही कित्येक वर्षापासून खाली आहोत तरी वर काय चाललयं सगळं माहितीये. कारण त्यांचे बोलणे कानावर पडते अधूनमधून.  They do great things , I've heard!  उत्तम नोकऱ्या, करियर , गुंतवणूक ...हे सगळं मुलं ,छंद, जबाबदाऱ्या छान सांभाळून , कौतुक आहे खरं.

ते: जग कुठल्या कुठे गेलयं आता , तुम्हाला सांगतो. समाजात सतत वेगवेगळे विषय चर्चेत असतात , कधी राजकारण, कधी पर्यावरण, कधी समाजकल्याण, कधी स्त्रीयांचे आर्थिक स्वातंत्र्य फार गंभीर चर्चा होतात वरं... अहो, अहो हसतायं काय??!!

आम्ही: वर्षानुवर्षे तुमची प्रिय व्यक्ती जीवनमरणाच्या दारात असली की कशाचही हसू येतं ...चुकलंच आमचं ! ज्यांना भवितव्य आहे त्यांच्यासाठी खरंच गंभीर आहे हे...  आम्हाला कशाचाचं फरक पडत नाही , एक प्रकारची बधीरता का प्रतिकारशक्ती आली आहे ..त्याने सगळा तमाशा वाटतोयं .  मुरंत गेलयं सगळं एकाकीपण... जोडीला अनिश्चितता कायमचीच... सतत ताब्यात रहावं लागतं ना या शुश्रूषाशृंखलेच्या , काळजीच्या बेड्या रूतून कधीतरी रक्तही येतं. सगळ्या भावनांचं लोणचं वाढतोयं समजा.. कधीकधी वेगवेगळे उपचार करण्यासाठी लोक येतात , आपल्या मरणाने-वेगळेपणाने लोकांच्या जगण्याला हातभार लागतो तेवढंच समाधान.

ते: तुम्ही कधी रडताना दिसत नाही पण...
आम्ही:अजून रडलो तर आसवाऐवजी रक्त येईल ही भीती वाटते म्हणून हसत रहातो किंवा मौन रहातो... 

तेः तुमच्या आयुष्यात काही गमती होतात का..
आम्ही:सगळ्या आयुष्याची गंमत झाली आहे आता नं काय... एखादवेळेस असंही झालंय भाजी करपली- उरली तर काय करावे ह्या विवंचनेत जाणारे लोकही आम्हाला 'स्विकार कसा करावा' हे शिकवायला जातात तेव्हा खूप हसतो आम्ही.. मनात हं. बहुतेक गोष्टी मनानेच करता येतात म्हणून तर तुम्हाला मनात बोलवलयं नं.
 
ते:  तुम्हाला सकारात्मकतेबद्दल कल्पना आहे का ... त्या विषयी लोक आवर्जून सांगतात..
आम्ही: त्यांना नकारात्मकता माहिती का नक्की... आजकाल कशालाही सकारात्मकता म्हणून प्रभाव पाडायची वाईट खोड लागली आहे बहुतेकांना. मागे ती दारिद्र्य रेषाच खाली आणून दरिद्री लोकांची संख्या कमी केली होती तसयं हे सगळं. एखाद्याला दोन महिन्याचं आजारपण आलं ,नोकरी गेली, घरातल्या कुरबुरी झाल्या लगेच कस लागतो यांचा.. मगं कालानुरूप थोड्याच प्रयत्नांनी परिस्थिती बदलते तर हे जगाला 'जिद्दी' विषयी बोलत सुटतात. त्यांची सकारात्मकता बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे आणि त्यानेचं इतकी असुरक्षित आहे की ती पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळते. पण आम्हाला तुमचचं खरं म्हणायची सवयं लागलीये... इथे आलो की सगळ्यांना मोठेपणा देऊन स्वतःकडे कमीपणा घ्यायची सवय घट्ट रूतून बसते.  भौतिक यशाशी निगडीत यशच खरं यश मानणारा समाज रहातो पृष्ठभागावर , अजून एकटेपणा नको म्हणून आम्ही 'हो ,हो' म्हणतो. आमचं खरं असूनही 'हे तर काहीच नाही' म्हणू लागलो तर आम्हाला विचित्र ठरवतील ही भीती आहेच.

ते:  मगं यश म्हणजे काय वाटतं तुम्हाला ??
आम्ही: 
जेव्हा तुम्हाला पक्कं माहिती असतं की तुम्ही युद्ध हरणारं आहात तरी तुम्ही लढत राहता हे यश..
   जेव्हा तुम्हाला कल्पना असते की उद्याचा दिवस आजच्या इतकाच वाईट जाणार आहे तरी तुम्ही आज शांत मनाने झोपता हे यश..
    जेव्हा कळतं तुम्हाला की तुम्हाला काहीही भवितव्यं नाही तरीही तुम्ही छोट्या छोट्या योजना आखता हे यश..
   जेव्हा तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या नजरेसमोर खंगत असताना साधासा विनोद करू शकता हे यश..
  जेव्हा बुद्धी असूनही ती बहुतांश वेळा शुश्रूषेसाठीच वापरावी लागते तरी तटस्थपणे बघत राहता हे यश...
    जेव्हा तुम्ही लहान होत जाणाऱ्या वर्तुळात नवीन आयुष्य वेचत रहाता हे यश...
    जेव्हा तुमच्यात कुवत असूनही तुम्हाला ती गोष्ट कधीही मिळणार नाही या सत्याशी तडजोड स्विकारता हे यश
    जेव्हा कुणीही तुमचे दुःख समजून घेऊ शकत नाही तेव्हाही तुम्ही इतरांना दिलासा देत असता हे यश..
    जेव्हा मूळ स्वभावाला सतत मूरड घालूनही तुम्ही तुमचा गाभा पवित्र ठेवता हे यश...
   जेव्हा तुम्ही कशातचं नसूनही सगळ्यात असल्यासारखं दाखवता हे यश....
    जेव्हा कशाचचं काही वाटत नसतानाही तुम्ही सगळ्यात रूची दाखवता हे यश...
   जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीही आनंदाचे नसूनही लोकांच्या आनंदात सहभागी होता हे यश....
    जेव्हा सकारात्मक - नकारात्मक खेळाच्या पुढे जाऊनही स्थितप्रज्ञ राहू शकता हे यश...
    जेव्हा स्वतःवर सतत अन्याय होऊनही कुणाचा मत्सर करत नाही हे यश....
   जेव्हा छोटे मोठे अगणित बलिदान देऊनही तुम्ही खचत नाही हे यश...
    जेव्हा तुम्हाला सतत अपयश मिळूनही तुम्ही निराश होत नाही हे यश...
    जेव्हा मनात ज्वालामुखी असूनही वरून आल्हाददायक भासता हे यश....
जेव्हा तुमच्या आव्हानांची कल्पना द्यायला जाता तेव्हा त्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याची जाणीव होण्याने तुम्ही मागे फिरता हे यश...
जेव्हा काकणभर परिघातच मोठं होत रहायचं ठरवता आणि होताही हे यश....
या वातावरणातही तुम्ही माणूस म्हणून घडण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करता हे यश...
जेव्हा जगासाठी अदृश्य असूनही तुम्ही समर्पित असता हे यश....
असं वर्षानुवर्षे राहूनही तुम्ही तुमचा अंतरीचा दिवा मालवू देत नाही हे यश...

ते: हे मोजणारं कसं ???
आम्ही: ती फुटपट्टी पृष्ठभागावर उपलब्धच नाही तुम्ही तरी काय करणार... म्हणून तर "इथले" लोक त्यांच्या यशाच्या चढत्याभाजणीत कुठेच नाहीत. दिसले का तुम्हाला कधी???!!!

ते: इथे बाहेर जायला दरवाजा नाही का??
आम्ही: आहेत पण बंद झालेत, इथे फक्त आत जायचाचं दरवाजा उघडतो , त्याला वैराग्य म्हणतात पृष्ठभागावर !

तेः जेव्हा तुम्हाला कशाचचं काही वाटत नाही मगं या मुलाखतीचा प्रपंच का केला? कदाचित हे त्यांना समजणारच नाही.
आम्ही: पृष्ठभागावरच्या लोकांना इथल्या अस्तित्वाची कल्पना यावी म्हणून .... फक्त कल्पना... कौतुक नको, काळजी नको, शुभेच्छा नको, सल्ले नको, आशा नको, दिलासा नको ..... कशाचीही गरज नाही... अंतरीच्या जाणीवेची जाणीव द्यायची आहे...बस्स !

ते: तुम्ही काय अंताची वाट पहातायं की काय....?
आम्ही: छे , छे .....एवढं अंतासाठी सोसलयं वाटतयं की काय तुम्हाला... वाट आता अनंताचीच!

ते: आता पुन्हा भेट??
आम्ही: कशाला??

-----------------------------

दीर्घ आजारांशी, शारीरिक-मानसिक अपंगत्वाशी , जेनेटिक कंडिशन्सशी झुंज देणाऱ्या व प्रदीर्घकाळ सेवाशुश्रूषा करणाऱ्या - काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांना समर्पित.
चित्र आंतरजालावरून साभार.
धन्यवाद !
©अस्मिता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/|\_

_/\_

उत्तम लेख . असह्य परिस्थितीशी झुंज्णार्‍या प्रत्येकाला माझा सलाम. आणि व्यक्त होत राहणे महत्वाचे. माय प्रेयर्स आर विथ यू.

Love you Asmita for this लेख.
अंतरीच्या जाणीवेची जाणीव जाणवली, अगदी खोलवर.

Take one day at a time. तुम्हाला खूप positive energy.

अस्मिता Sad
मी आहे अजूनही तुझ्यासोबत तिथेच.. आणि नाही बाहेर पडू शकणार कधीच...

लेखाती एक एक वाक्य, एक एक खोल गहिरा अनुभव................. _/|\_
"हे यश..." ने संपणाऱ्या प्रत्येक व्याख्येसाठी... _/|\_ _/|\_ _/|\_

आज दुर्धर आजार दिवस आहे माहित नव्हते.

>> एक काळ असा होता आयुष्यातला, तो आता संपलाय पण आठवणी रिलेट होतात.

+१११ माझ्यासाठी आज त्या आठवणीना उजाळा येण्याचा दिवस Sad

"अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी" जे गहिऱ्या गुहेतून गेलेत/जातात त्यांनाच कळते. पृष्ठभागावरचे इतरेजण त्या अनंत वेदनांची फक्त गाणीच गाऊ शकतात.

>>>> भिडलं आतपर्यंत. एक काळ असा होता आयुष्यातला, तो आता संपलाय पण आठवणी रिलेट होतात.<<<<
+११
आणखी एक म्हणजे , आजही असे काही वाचले की, जखम अजून तशी ओलीच आहे असे वाटते, खपली तर फक्त नावाला धरलीय.

_/\_

जेव्हा जगासाठी अदृश्य असूनही तुम्ही समर्पित असता हे यश....
असं वर्षानुवर्षे राहूनही तुम्ही तुमचा अंतरीचा दिवा मालवू देत नाही हे यश...>> अप्रतिम...!!

__/\__

खुप जबरदस्त लिहीलं आहे. देव करो आणि अशी वेळ कोणावर न येवो. पण आलीच तर हे लिखाण सोबत करत राहील. प्रत्येक आयुष्य, प्रत्येक वेदना वेगळीच असते. सहसंवेदना गमावू नये हेच ईश्वराकडे मागणे.

अस्मिता, तुम्ही किती ताकदीने शब्दांत उतरवल्यात तुमच्या भावना. काटा आला अंगावर! अधिक काही लिहायला चार शब्दही सुचेनात अशी अवस्था झाली आहे. _/\_

थरकाप उडाला वाचून.. Sad Sad

पृष्ठभागावरच्या लोकांना इथल्या अस्तित्वाची कल्पना यावी म्हणून .... फक्त कल्पना... कौतुक नको, काळजी नको, शुभेच्छा नको, सल्ले नको, आशा नको, दिलासा नको ..... कशाचीही गरज नाही... अंतरीच्या जाणीवेची जाणीव द्यायची आहे...बस्स !

___/\____

Pages