अमेरिकन गाठुडं !--७

Submitted by सुरेशकुलकर्णी on 21 February, 2021 - 07:24

माझा मित्र, सुधीर, परक्या ठिकाणी गेला कि सवड असेल तर आवर्जून तेथल्या लोकल मार्केटमध्ये एक चक्कर मारतो, मग ते भारतातले एखादे खेडे असो, कि परदेशातला शहर! मी एकदा त्याला कारण विचारले.
"अरे, नगरला आल्यावर लोक किल्ला, नाहीतर चांदबिबीचा महाल पहायला जातात अन तू आधी बाजारात जाऊ म्हणतोय?"
"तेच काय, कि बाजारात चक्कर मारली कि, स्थानिक लोकांची, त्यांच्या आवडीनिवडींची, राहणीमानाची, अशी खूप माहिती मिळते! "
मला त्याचा हा फंडा आवडला. मी बाजार पालथे घालायचो पण हा दृष्टिकोन माझ्या आकलनात आला नव्हता. याचा फायदा मला अमेरिकेत झाला. ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली.

पैकी वॉलमार्ट आणि कोस्टको हे मॉल भव्य. वॉलमार्ट तर जगातलं प्रथम क्रमांकावरील रिटेलर आणि कॉस्टको नंबर दोन वर! कॉस्टको हे होलसेल मल्टिनॅशनल चैन! यांचे टाचण्या पिना पासून पेट्रोल पम्पा पर्यंत प्रॉडक्ट आहेत. कॉस्टकोत किमती मला तरी कमी वाटल्या, पण लोटस मध्ये घेतले तर. व्हरायटी वॉलमार्टच्या मानाने कमीच होती. वॉलमार्टमधे माती, खत, शेती औजारे, ते फुलांच्या रोपांची नर्सरीचे सेक्शन पण पाहण्यात आले!

येथील बहुतेक मॉल ग्राउंड फ्लोवर असतात. आपल्या पेक्ष्या जमीन मुबलक आहे म्हणून असेल. एका मोठ्या गोडाऊन मध्ये हे मॉल असतात. असेच आम्ही एका संध्याकाळी शॉपिंग साठी गेलो होतो. मुलगा म्हणाला तुम्ही दोघे येथेच थांबा, मी बायको आणि मुलींना घरी सोडून येतो, मग तुम्हाला न्यायला येतो. त्याच्या गाडीच्या आसन क्षमते मुळे, असं आम्ही बरेचदा करायचो. मी आणि बायको मॉल मधेच असलेल्या एका खाद्य पेयाच्या टेबलावर बसलो. मधेच मॉल मधले दिवे जरा मंद झाल्या सारखे झाले आणि पुन्हा पहिल्या सारखे झाले. आम्ही लक्ष दिले नाही. परभणीच्या गप्पा निघाल्या.
"मी म्हणते, हे काय असं वागणं शोभेल नाही!"
"कधी?" हिच्या बोलण्यात कोणता संदर्भ असतो, हे मला आजवर, म्हणजे लग्नानंतर सदतीस वर्ष, अंदाज लावता आलेला नाही.
"अहो, पळा दुकान बंद होतंय!"
"अग, आत्ता फक्त साडेसातच्या वाजलेत. इतक्यात कस बंद करतील?" मी म्हणालो, पण खरेच शेवटचे शटर खाली येत होते!
आम्ही लगबगीने शटर पर्यंत पोहंचलो. त्या सेक्युरिटीवाल्याने बाहेर सोडले, पण त्याच्या नजरेत बरेच काही होते. मग नन्तर कळाले कि येथे मॉल बंद करताना दिवे मंद करून आतील ग्राहकांना बंद होत असल्याची सूचना देतात. येथे सकाळी साधारण नऊ ला चालू होऊन रात्री सातला बाजारपेठ बंद होते. रविवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहाला बंद, म्हणजे रोजच्या पेक्षा दोन तास कमीच!
या कॉस्टकोमध्ये एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले. येथे पिण्याच्या पाण्याचा बाटल्या (आपल्या कडील अर्धा लिटर/एक लिटरच्या ) दोन दोन डझनाच्या पॅक मध्ये मिळतात.मी मुलाला म्हणालो, पाण्या पेक्ष्या बाटल्याचेच पैसे ज्यास्त. पण त्याने सांगितले ते एकूण आश्चर्य वाटले. रिकामी बाटली रिसायकल साठी दिली कि बाटलीचे पैसे परत मिळतात. येथे प्लास्टिक बंदी ऐवजी रसायकलवर भर आहे. प्लास्टिक बॉटल्स, कागदाच्या बॅगा आणि जूस कॅन्स रिसायकल होतात. अश्या रिसायकल बीन्स जागो जागी आढळल्या. दुसरी येथे (म्हणजे सर्वत्र )कस्टमर सर्व्हिस अप्रतिम आहे. मुलाने एकदा आठवड्या पूर्वी आणलेले दोन डझन अंडी मॉल मध्ये परत केली, आणि त्या कॉउंटरवरल्या पोरीने सुहास्य वदने परत घेतली! मला आमच्या नगरच्या नारळाचा किस्सा डोळ्यापुढे तरळून गेला. काहि कारणाने मी नारळ परत करायला किराणा दुकानी गेलो.
"हा नको. दुसरा नारळ द्या."
स्वातंत्र्य पूर्व जन्मास आलेल्या मालकाने माझ्याकडे पुणेरी नजरेने पहिले.(हि नजर एकदम खरता असते. यात नजरेत असंख्य भाव असतात!)
"तुम्ही घेताना परत, एकदा विकलेला माल?" तशी पाटी दुकानात नाही याची खात्री करून मी म्हणालो.
"हा! घेतो कि! पण आमच्या दुकानाचा माल असलतरच!"
"मग, ठीक मी कालच तर नेला होता हा नारळ!"
"गल्ल्यावर कोण होत?"
"तुम्हीच तर बेस्ट नारळ म्हणून दिलात!"
"बघू!"
त्याने तो नारळ सगळीकडून पहिला. खालून -वरून-लांब धरून -जवळ धरून, (फक्त आत उघडून पहायची निसर्गाने सोय केली नव्हती म्हणून! नसता याने तेही सोडले नसते!) निरीक्षण, परीक्षण संपवून निर्णय झाला.
"ह्या आमचेवाला नग नाय!"
आणि माझ्या हाती नारळ दिला!
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील रिटर्न पॉलिसीचा किस्सा मला थक्क करून गेला.

ऑस्टिन एका पुस्तकाच्या दुकानात मला मुलगा मुद्दाम घेऊन घेला.(बापाची आवड लक्षात ठेवून मुद्दाम घेऊन येणाऱ्या मुलाचा मला आभिमान वाटतो!) या दुकानाची एक खासियत होती. येथील प्रत्येक पुस्तक अर्ध्या किमतीत मिळते! दुकानाचे नावच हाफ प्राईज बुक होते! काहीही घ्यायचे नाही, फक्त पाहून यायचे हे ठरवून गेलो होतो, तरी काही ड्रॉईंग वरली पुस्तके घेतलीच.(आठवड्यने त्यातील निम्मी परत करून टाकली!)
'बेस्ट बाय' हे इलेकट्रोनिकसच्या वस्तू खरेदी करणाऱ्यांची पंढरी! मी पामर खरेदी कसली करतो, वारी करून कळसाला हात जोडणारा नाविन्याचा भक्त. या दुकानात अफाट वस्तू आहेत. फोटो फ्रेमच्या जाडीचे भव्य टीव्ही पहिले. बंगलोरच्या मॉल मध्ये फॉर के चा टीव्ही पाहून तोंडात बोट घातले होते. येथे समोर एट के चा सेट होता. डिस्पलेचे वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत! ऑडिओ सिस्टीमचे तर अनंत सेट. एक ऑडिओ गॉगल होता. तो घातला कि म्युजिक ऐकू यायचे. हे म्हणजे देवापुढे निरंजन लावले कि कानात आरती ऐकू येण्या सारखे होते. कॅमेऱ्याच्या सेक्शन मध्ये फिरताना ड्रोन पहिला. हातातल्या रिमोट मध्ये मोबाईल सारखा मॉनिटर होता. कुठलाही एरियल फोटो काढता येतो. हिमालयाचे मला खूप आकर्षण आहे. कधी काळी जमाले तर यातून मला तो पहाता येईल हा विचार त्या वेळेस मनात येऊन गेला. मोबाईल्स, लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्ट वॉचेस! विचारू नका. स्मार्ट वॉच मध्ये डायलचे डिझाईन बदलण्याची सोय आहे.रोज नवे घड्याळ!

कळस म्हणजे टीव्ही सेट पेक्षाही महागडे मोबाईस पहिले! सगळ्यात एक गोष्ट मात्र नजरेआड कडून चालणार नाही, आणि ती म्हणजे मोबाईल कोणताही घ्या अगदी अँपलचा त्याचे कव्हर मात्र मेड -इन -चायना! इलेकट्रोनिकसच्या आक्सेसरीज मध्ये जबर दादागिरी आहे! उगाच भारताला यात कुठे जागा मिळेल का हा विचार मनात येऊन गेला. असे म्हणतात कि जगातली एक हि अशी वस्तू नाही, जी चीन मध्ये तयार होत नाही!
या दुकानात वर्चस्व होते ते सोनी आणि सॅमसंग या ब्रँडचे!
(क्रमशः)
सु र कुलकर्णी .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. रिटर्न पोलिसी वरून आठवले. पहिले पहिले अमेरिकेत गेल्यावर काही रिटर्न करताना लाचार चेहरा करून, मनात धाकधूक वाटत जायचे. कारण आम्ही पुण्याचे होतो ना, तो अनुभव गाठीशी होता. पण हळू हळू सवय झाली. खरंच अमेरिकेत कस्टमर सर्विस, मार्केटिंग ला तोड नाही.

पण ह्या रिटर्न पोलिसी चा बरेच लोक गैरफ़ायदाही घेतात. वस्तू वापरून झाली की परत करायची. मग तिची कंडिशन काहीही असो. एकदा एका ग्रुप वर एकीला इन्फन्ट child कार सीट घायची होती. ही बर्यापॆकी महाग असते व काही दिवसांनी उपयोग संपतो. तेव्हा तिला हाच सल्ला देणारे कमी नव्हते. कॉस्टकोतून घे, वापर व नंतर रिटर्न कर. यामुळेच आता हळूहळू काही स्टोर वाल्यांनी रिटर्न साठी ३० डे लिमिट केले आहे.

>>>>मेड -इन -चायना>>> करेक्ट सगळं मेड इन चायना असतं आजकाल.
>>> कपड्यामध्येही मेड इन व्हिएतनाम आणि बांगलादेश वाढत आहेत.

करेक्ट कपड्यांमध्ये व्हिएतनाम, बांगलादेश व अगदी क्वचित पाकीस्तान दिसते. विएतनाम व बांगलादेशच्या कपड्यांची मग शिलाईपासून ते कापडापर्यंत छान असते क्वालिटी.
भारतीय शिलाई नाही आवडली. कुचकामी वाटली.