सजल जलद मोही रुप या राघवाचे

Submitted by पुरंदरे शशांक on 25 January, 2021 - 02:38

झळकत कटि शोभे पीत वस्त्रे जयास
कनक किरिट माथी उज्वले नीलभास

शर धरि कर स्कंधे सज्ज कोदंड दंडा
असुरगण गळाठे हर्ष भक्ता उदंडा

मृदुल स्मित खुणावी ना भी संसारदुःखा
कर तरि नित पाठी धीर देई प्रभूचा

सजल जलद मोही रुप या राघवाचे
निशिदिनि मनी ध्याता मूळ तुटे भवाचे

अवतरण जयाचे भाविका उद्धराया
निजजन हित वाहे देऊनी नामछाया

...............................................
ना भी ..... भिऊ नकोस
जलद ..... ढग, मेघ
.........................................
प्रभू श्रीरामांच्या कटीस झळाळणारे वस्त्र आहे. त्यांच्या मस्तकी
सुवर्ण मुगुट आहे व श्रीरामांच्या निळसर मुखाची प्रभा त्या मुगुटावर पडून तो मुगुट निळसर भासतो आहे.

प्रभूंच्या हातामध्ये बाण व खांद्यावर धनुष्य असून असुरांच्या निर्दालनासाठी ते सज्ज झालेले आहेत.
त्यामुळे असुर भयभीत झालेत व भक्तगण आनंदित झाले आहेत.

प्रभूमुखावर मृदू स्मित आहे... ते जणू भक्तांना संसारदुःखांना भिऊ नकोस, मी सतत तुझ्या पाठीशी आहेच असा दिलासा देणारे आहे.

जलयुक्त मेघाप्रमाणे ज्याची कांती आहे त्या प्रभूचा जर रात्रंदिनी मनात ध्यास धरला तर भवाचा मुळापासूनच नाश होतो.

या प्रभू रामरायाचे अवतरण भाविकांना उद्धरण्यासाठी झालेले आहे. जे त्यांचे अंतरंग भक्त आहेत त्यांनाच ते नामामृत देऊन त्यांचे हित साधतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही नेहमीच खूप सुंदर रचना करता. ही सुद्धा छान आहे. फक्त 'सजल जलद' हा शब्दप्रयोग थोडासा खटकला. जो जल-द आहे, तो स-जल असलाच पाहिजे. त्यामुळे ही वटवृक्षाच्या झाडाखाली, किंवा पिवळं पीतांबर याप्रमाणे द्विरुक्ती वाटली.

सर्वांचे मनःपूर्वक आभार....

____/\____

श्री हरचंद पालव .... सजल जलद म्हणजे पाण्याने भरलेले ढग. ढग हे पांढरेही असतात, पण इथे श्यामवर्णी ढग अपेक्षित आहेत.
अनेक धन्यवाद. Happy
__/\__

सुरेख !
राम रामेति रामेति रमेरामे मनोरमे |
सहस्रनामतत्तुल्यं रामनाम वरानने |
जय श्रीराम !!

सुंदर रचना
जलद म्हणजे जल देणारा ढग त्यामुळे मलाही सजल शब्द द्विरुक्ती दर्शकच वाटतोय.
पण पिवळा पितांबर झाला तर झाला. काव्यरचनेकरता करावे लागते. त्याचे काय इतके म्हणायचे अन् काय

हो बरोबर आहे. हे ही पटलं. बाकी रचना तर सुंदरच आहे त्यामुळे ही छोटी गोष्ट का काढावी असं नंतर वाटलं मला.

मला आवडली परंतु अन्य रचनांइतकी नाही. यावेळेस घाई झाली आहे असे मला वाटले. आय अ‍ॅम हॅपी इफ आय अ‍ॅम राँग!
.
एरवी अन्य धाग्यांवरती, जराही नकारात्मक प्रतिक्रिया असेल तर मी रादर प्रतिक्रियाच देत नाही. पण तुमचे धागे अपवाद आहेत कारण तुमच्या रचना फार भावपूर्ण असतात. अतिशय आवडतात. कमी-जास्त बोलले असेन तर क्षमा करा.