अमेरिकन गाठोडं!--१

Submitted by सुरेशकुलकर्णी on 23 January, 2021 - 22:00

शेवटी तो दिवस उजाडलाच. मुंबईहून रात्री अकरा वीसची फ्लाईट होती, म्हणून दुपारी बारालाच गाडी सांगितली होती. बारा वाजून गेले गाडीचा पत्ता नाही! फोन केला, तर तो फोन उचलेना! नेहमी मी 'विक्रांत' टूर कडे गाडी बुक करतो. आजवर असे कधीच झाले नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. काय झाले असेल? गाडीचा प्रॉब्लेम? ड्रॉयव्हरचा? का मालकाचा? तगमग सुरु झाली. ऑस्टिनची फ्लाईट मिस झाली तर? अहमदनगर ते मुंबई किमान सहा तास. स्वयंपाकाचा राडा नको म्हणून वाटेत जेवण्याचे ठरवले होते. त्यासाठी तास दीड तास लागणारच होता. शिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास, एअरपोर्टवर तीन तास वेळेआधी पोहचावे लागणार होते. प्लस मुंबई ट्राफिक आणि पावसाळा, गृहीत धरून टॅक्सीला बाराची वेळ दिली होती.

साडेबाराला मी पायात बूट अडकवून त्या टूर्सच्या ऑफिसकडे निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर, गाडी येताना दिसली.
"का? उशीर का केलात?" मी जरा घुश्यातच ड्रॉयव्हरला विचारले.
"डिझला लाईन व्हती!"

पूर्वी शिंप्याकडे गेले कि तो 'काजबटनऱ्हायल्यात.' हे ज्या हक्काने सांगत असे, तसे हल्ली हे ड्रॉयव्हर सांगत असतात! असो.

साधारण दोनच्या सुमारास भुकेची जाणीव झाली. 'एखादे बरे हॉटेल असेल तर बघ, जेवून घेऊ.' मी आमच्या वाहन चालकास सांगितले. 'मातोश्री' नामक हॉटेलात आम्ही घुसलो. 'पिठलं भाकरी आणि गुलाब जामून!' मेनूची थाळी मिळाली. असला मेनू पहिल्यांदाच खाण्यात आला. झुणका भाकरी अपेक्षेपेक्षा ज्यास्त चविष्ट होती. इतकी कि गुलाबजामून साईडला पडले! पण साल कोण काय कॉम्बिनेशन करेल नाही सांगता येत. उद्या चिकनकरी बरोबर बुंदीचा लाडू पण देतील! नेम नाही.

'छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा' गाठले तेव्हा आठ वाजून गेले होते. एका गोष्टीची मला नेहमीच गंमत वाटते, विमानतळाला हवाईआड्डा का म्हणतात? 'अड्डा ' म्हणला की, अंगात आडव्या काळ्या पट्ट्याचे टी शर्ट घातलेले, तोंडात सिगारेट धरून धूर सोडणारे चार-सहा गुंड एखाद्या गोदामात पत्ते खेळात बसल्याचे, दृश्य माझ्या नजरेसमोरयेते! तेव्हा 'अड्डा' गुंडाचा हि संकल्पना काही डोक्यातून जात नाही.

छत्रपती महाराजांचे नाव असल्याने मी मनातल्या मनात, हर हर महादेव! म्हणत, बॅगा साठी ट्रॉली हुडकत लागलो.
"आहो!" मागून बायकोने आवाज दिला.
"काय?"
"माझा, गुडघा दुखतोय!" बायको लंगडत चालत म्हणाली. हे हीच नेहमीचंच! चार दिवसाखाली दवाखान्याची वारी झाली होती. या माउलीने डॉक्टरांनी दिलेल्या सहा गोळ्या पैकी फक्त एकच घेतली होती.
"अग, सगळ्या गोळ्या का नाही घेतल्यास?"
"एका गोळीत दुखायचं थांबल्या सारखं वाटलं!" आता सांगा? या अश्या वाटण्याला काही मतलब असतो का?
तेव्हड्यात रामभक्त हनुमानासारखा व्हील चेयरवाला प्रगटला.
"सर्व्हिस? पण पेड आहे, सर."
"असू दे, या बाईंना बसवा."
"कोणती फ्लाईट आहे, सर?"
"युनाइटेडची."
"सॉरी सर, मी एअरइंडियाचा आहे! युनैटेडची चेयर त्या समोरच्या गेट जवळ आहे!"
आली का पंचाईत? तिथपर्यंत हि चालणार कशी?
"आता रे काय करू?" मी आगतिकपणे त्यालाच विचारले.
कोणास ठाऊक त्या व्हील चेयरवाल्या माणसाला काय वाटले, त्याने हिला व्हील चेयरवर बसवले, आमचे सारे, म्हणजे एक लहान, एक भलीमोठी बॅग दोन हातात वागवण्याच्या बॅगा मॅनेज करून, आम्हास त्या युनाटेडच्या कोपऱ्यावर, युनैटेडच्या चेयरवाल्याच्या स्वाधीन केले. काही टीप द्यावी ह्या विचारात असताना तो निघून गेला होता. थँक्स म्हणायचे पण राहून गेले होते!

हा नवा व्हील चेयरवाला पोरगेलासाच होता. लाल चंद्रकोर असलेला, टिकला त्याने कपाळाला लावलेला होता. का कोण जाणे त्याच्या सोबत आम्हास एकदम सुरक्षित वाटले. ईमाग्रेशन, बॅगेज कार्गो, सेक्युरिटी चेकिंग ते थेट आमच्या विमानाच्या दारापर्यंत त्याची सोबत होती. या खेपेस मात्र टीप आणि थँक्स आवर्जून दिले.
बायकोने मात्र त्या नंतर ऑस्टिन पर्यंत 'खुर्ची' सोडली नाही! एक्केवीस तासाच्या प्रवास.
केदारने (मोठा मुलगा) आम्हास पहिला बेंगलोर - पुणे हा विमान प्रवास घडवला होता. आज मंदार (लहान मुलगा) अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय प्रवास घडवत होता!
०००
सगळे सोपस्कार संपवून आम्ही दोघे फ्लाईट टर्मिनलवर बसलो. अजून विमानाला तासभर होता. बोर्डिंग सुरु झाले नव्हते. काय करावे या विचारात होतो. बायकोने तो प्रश्न सोडवला.
"अहो, आता रात्रीचे दहा वाजून गेलेत."
"मग?"
"विमानात रात्रीचच खायला देतील का नाही कोणास ठाऊक?"
"मग?"
"चिवडा खायचा का? मी आणलाय! कालच करून घेतला होता." मी दचकलो. इतक्या चेकिंग मध्ये हिच्या चिवड्याचा प्लॅस्टिकच्या पुरचुंडीला कशी काय परवानगी मिळाली? हिची मात्र एक खास सवय आहे. प्रवास म्हटलं कि घरचा चुरमुऱ्याचा चिवडा बरोबर असतोच. भले तो प्रवास दोन घटकांचा असो कि दोन दिवसाचा. एखाद्या वेळेस पर्समध्ये पावडरचा डबा नसेल, पण चिवड्याची पुरचुंडी असतेच. मागे एकदा, आम्ही राष्ट्रीय विमानतळावर बेंगलोरला,हिच्या आग्रहा खातर, 'दशम्या' खाल्या होत्या! तेव्हा आश्चर्याने पहाणाऱ्या भारतीय नजरा होत्या. आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर चिवडा? हि म्हणजे,----- जाऊ द्या.
"नको, बर दिसायचं नाही!"
"आई, त्याला काय होतंय? आडवं-आडवं बसून खाऊ, कोण बघतंय?" परभणीचे रेल्वे स्टेशन आणि हे आंतरराष्ट्रीय विमानतळ यात काही फरक असतो, हे तिच्या गावी नव्हते!
मी हळूच आसपास नजर टाकली. कोट घातलेला एक परदेशी रांजण आमच्याचकडे पहातच होता!
"नको!"
"मग, मला भूक लाग्लीयय! काय करू?"
"चल, काही मिळतंय का पाहू." मी उठत म्हणालो.
माझ्या मागे ती होतीच. किंचित लंगडत होती, पण चालू शकत होती!

वाळवंटात अचानक हिरवळ दिसावी, तसे चॉकलेट, केक, कॉफीच्या दुकानात उडपी आउटलेट दिसले. आमची पावले तिकडे आपसुख वळली. नेहमी प्रमाणे मी, सगळा मेनू काळजीपूर्वक वाचला आणि एक इडली आणि एक दोसा मागवला! मला हॉटेलमध्ये ऑर्डर देता येत नाही, हा माझा ड्राबॅक आहे. कधी बाहेर जेवायला गेलोत तर, सगळे मेनू कार्ड वाचून, शेवटी 'पालक पनीर+ जिरा राईस+दालफ्राय+रोटी, हीच ऑर्डर असते आमची! फार तर सुरवातीला स्टार्टर म्हणून टोम्याटो सूप नाहीतर मसाला पापड! बस झालं.

आमची ऑर्डर सर्व्ह झाली. रंगा रूपानं इडली सारखाच तो पदार्थ होता, त्याची चव आणि आमच्या खाण्याची चिकाटी, दोन्ही कमीच पडले! इतकी चिकणी इडली पहिल्यांदाच पहात होतो, जणू 'डव्ह'च्या साबणाची छोटी वाडी! इडलीचे पीठ बहुदा मैद्याचे असावे, असा माझा कयास आहे! त्या मानाने डोसा 'सुपर' होता. तल्लम! टिशू पेपर मध्ये उकडलेले बटाट्याचा फोडी, घातल्या सारख्या लागला. आम्हा दोघांना बीपी आणि पित्ताचा त्रास असल्याचे त्या दुकानदारास कसे समजले? माहित नाही, पण त्याने आमच्या काळजीपोटी, दोस्याच्या भाजीत तिखट,मीठ,तेल अजिबात घातले नव्हते! मी बिल दिले आणि तो बिलाचा कागद डस्ट बिन मध्ये फेकून दिला. दोस्याची चव जिभेवर रेंगाळत असल्याने, दोसा डस्ट बिनमध्ये फेकून, बिलाचा कागद खाल्ला असता, तर बरे झाले असते, असा क्रूर विचार मनात येऊन गेला. बिल फेकून दिले हे मात्र योग्य होते, कारण बायकोच्या हाती पडले असते तर? 'मेल्या, पांचट इडलीचे अडीचशे कशे घेतोस?' म्हणून दुकानदाराला खडसावले असते. ती पूणे असो, बेंगलोर असो, कि अमेरिका, आपला 'परभणी'बाणा सोडत नाही!

बोर्डिंग सुरु झाली होती. आम्ही युनैटेडच्या 'बिग मेटल बर्ड'च्या पोटात घुसलो. या 'मेटल बर्ड'ने आम्हाला पस्तीस -चाळीस हजार फूट उंचीवर नेले होते! आणि त्या उंचीवर काही ठिकाणी उणे बावन्न डिग्री तापमान होते!
(क्रमशः)
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे गाठोडे. .. अजून येऊ देत. .
बरेच अनुभव match होतात. .. 250 ची इडली बघून मी vendiman चे मशीन शोधून फळांचा रस पिले होते 30 रूपये मधे Happy ममव म्हणा हवे तर Wink

भारीच लिहिताय !!!

ममव म्हणा हवे तर Wink
नवीन Submitted by धनवन्ती
>>> ममव म्हणजे ???

छान सुरुवात. पुढचे भाग वाचते.
झुणका भाकरीचं वर्णन वाचून नारायणगावच्या 'जीवन'मध्ये रणरणत्या उन्हाळ्यात भर दुपारी खाल्लेली झणझणीत झुणका भाकर आणि ठेचा आठवला! ती झुणका भाकर चविष्ट होतीच, पण ठेचा त्याहून भारी होता!

आसा., ममव- मराठी मध्यमवर्गीय Happy

चिवड्या बद्दल सहमत.
माझी आईही प्रवासात नेहमी चिवडा बाळगते.
स्वतः बनवलेला..
लिखाण छान..

छान आहे.

प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची लिंक दिलीत तर वाचकांच्या दृष्टीनं सोईचं पडतं. तसंच लेखाच्या शेवटी पुढच्या भागाची लिंक द्या कृपया. म्हणजे आपसूकच एक सलग मालिका तयार होते.

मस्त आहे/
मामीच्या सूचनेला अनुमोदन.