"मला अजिबात जमणार नाही.आग्रह करायचा नाही.तू अत्यंत अतरंग गोष्टी करतेस."
"इतका इश्यू करायची गरज नाही. व्यवस्थित जमतं."
"माझं मन सैरभैर होतं.मला होत नाही.कृपा करून हे बदल.असं मला खपणार नाही."
"मनातून इच्छा असली की सगळं जमतं.हे सर्व एक्स्क्यूजेस आहेत.हेच मुनिंदर आणि विशाखा ने केलं असतं तर त्यांना डोक्यावर घेतलं असतंस."
हा तावातावाने वाद चालू व्हायला एकच कारण होतं.महिन्याच्या सामानात स्वस्तात सीएफएल बल्ब आणेपर्यंत दुसऱ्या खोल्यातले लाईट डिस्टर्ब करायला नको म्हणून गणपतीतला रंग फेकत फिरणारा रंगीबेरंगी बल्ब संडासात लावला होता.मुळात दिवसा ढवळ्या 'जायला' लाईट का लागतो हा आमच्या कडचा प्रेमळ संवादाचा मुद्दा आहे.
"ठीक आहे.तुझं लॉजिक अत्यंत भंपक आहे.आणि तरी मी बदलते.कारण मी समजूतदार आणि मनमिळावू आहे.बल्बबदलेस्तोवर नोबा घेऊन जात जा."
आमचा 'नोबा' म्हणजे नोबा कंपनीचा जुन्या काळचा हॉरर सिनेमातला रखवालदार हातात धरतो तश्या लूक चा सोलर कंदील.कंदील घेऊन 'जायची' परंपरा आपल्या इथे वर्षानुवर्षे जुनी आहे.पण याबाबत आमचे साहेब अत्यंत चेंज रीलकटंट माणूस आहे.
"मी नोबा घेऊन जाणार नाही.मला अश्या कामासाठी सी एफ एल चा पूर्ण प्रकाश लागतो.ते विशाखा मुनिंदर बघा काय काय युक्त्या लढवतात.आणि आमच्या कडे बघा.आहे त्या वस्तू बंद पडतात."
"हो क्का?मग विशाखा मुनिंदर च्या घरीच 'जा'.त्यांच्या संडासात नॉर्मल लाईट असेल."
काही घरात ज्योतिष्याचे मत घेऊन सगळे निर्णय घेतात.तसं आमच्या घरात एक काडी इकडची तिकडे हलवण्यापूर्वी 'विशाखा मुनिंदर ने याच्यासाठी काही आयडिया केल्या आहेत का' हे बघायला युट्युब लावलं जातं. हे दोघे 'स्मॉल बजेट बिग मेकओव्हर' नावाचा युट्यूब चॅनल आणि कोणत्या तरी वाहिनी वर याच नावाचा कार्यक्रम चालवतात.म्हणजे असं, एका उदाहरणार्थ कुटुंबात लोकांच्या घरी फुलांचे पडदे, वाघाच्या कातड्याच्या डिझाईन चा सोफा, पांढरी कोरी भिंत,लाल प्लॅस्टिक चं कपाट असं सगळं एकमेकांशी न पटणारं एका घरात नांदत असतं.मग त्यांनी बोलावल्यावर विशाखा मुनिंदर नावाचे दोन इंटिरिअर डिझायनर्स येऊन नाकं मुरडतात आणि त्यांना 20000 रुपयात एक खोली आणि 3 दिवस या दराने घराचा कायापालट करून देतात.जुन्या झालेल्या दरवाज्याचा टीपॉय, बेड चा दरवाजा, टेबल चा बेड काही म्हणजे काही विचारू नका.असे बरेच काही बदलून शेवटी सुंदर खोली करून देतात.आणि मग आपलं जुनं घर असं बदललेलं बघून 3 दिवसांनी आलेली ओरिजिनल माणसं गहिवरतात, हाताने अश्रू पुसणं खूपच मिडलक्लास असल्याने गहिवरून दोन्ही डोळ्याच्या बाजूला पंख्यासारखे हात हलवत अश्रू वाळवतात आणि आनंदाने किंचाळतात.
तसे विशाखा मुनिंदर बघायला चालू करण्या पूर्वी पासून आम्ही जुगाडवाले कुलकर्णी आहोत.फर्निचर ला जागा नसताना 2 सिलिंडरवर मोठ्या बर्थडे केक चे आयताकृती प्लाय ठेवून त्यावर चादरी पिना लावून टाचून ड्रेसिंग टेबल करणे, गाडीचे टायर्स बदलल्यावर घरी आणून त्यावर सुताराकडून गोल बनवून आणून ठेवून गॅलरीत ठेवायला टीपॉय करणे, ऑफिस मध्ये वाढदिवस केक कापल्यावर खालचा चंदेरी गोल धुवून घरी आणून त्यावर काळा कागद चिकटवून मंडला डिझाईन असे उपयोगी निरुपयोगी जुगाड सारखे केले जातात.शिवाय आमची अजून एक खोड म्हणजे कोणे एके काळी एखाद्याला आवडलेली गिफ्ट आम्ही पुढची 7-8 वर्षं सगळ्यांना देतो.बाळांचे बाथरोब एका बाळाला आवडले(म्हणजे आईबाबांना) तर आम्ही गेली अनेक वर्षं प्रत्येक बारश्यात बाळांना बाथरोब देत होतो.नंतर भारत सरकार पैसे देऊन पासपोर्ट कव्हर देत नव्हतं तोवर आम्ही सर्वाना पासपोर्ट कव्हर देत होतो.सध्या आम्ही सोलर कंदील वाले कुलकर्णी आहोत.सगळ्यांना सोलर कंदील देतोय.
आम्ही जेव्हा इथे राहायला आलो तेव्हा हौसेने डिशवॉशर च्या आकाराचं एक कपाट आणि वर ओट्याचा टॉप केला. पण नंतर त्यात डिश वॉशर न येता 3 टप्पे टाकून ज्वारी कणिक आणि इतर डबे आले.'व्हेन इन डाऊट, पूट इन रेफ्रिजरेटर' हे आमच्या घराचं महत्वाचं ब्रीदवाक्य आहे.त्यामुळे 'ज्या वस्तू ओट्यावर ठेवायच्या नाहीत त्या फ्रीजमध्ये' असं समीकरण आपोआपच झालं.फ्रीज मध्ये आईस पॅक, इंजेक्शन, फेस क्रीम, मेंदी, डोळ्याचा चष्मा असं काहीही असतं.त्यामुळे वस्तू फ्रीजमधून काढून तोंडात टाकली असं अजिबात करता येत नाही.
परवा फ्रीजमध्ये लाल चुटुक रंगाची सुंदर कुल्फी मोल्ड मध्ये होती.पटकन चव घेऊन पाहिली तर न भूतो न भविष्यती असं खारट पाणी होतं.
"अगं पोरी, हे नक्की काय ठेवलंय कुल्फी मोड मध्ये?"
"आई, तू असं कसं खाल्लं मला न विचारता?तो पाण्याची सॉलिड स्टेट किती वेळात येते बघायचा एक्सपरिमेन्ट होता टीचर ने दिलेला."
हे यांचे एक्सपरिमेन्ट कुठे तोंडावर पाडतील सांगता येत नाही.मागच्या महिन्यात एका मासिकात वाचून रिसायकल्ड हॅन्ड मेड पेपर बनवला.मुळात 'कागदाचा कागद करणे' ही क्रिया म्हणजे मूर्खांच्या लक्षणात अजून एका लक्षणाची भर घालण्या सारखी कृती होती. कागद साबणात 3 दिवस भिजवले.मग मिक्सरमधून काढले.मग तो लगदा एका लाकडावर थापून लाटला.हा पेपर वापरणाऱ्याचं देवच रक्षण करो.तर वाळल्यावर हा पुनर्जन्म झालेला पेपर निघेचना.मग छोट्या कलाकाराने तव्यावर चिकटलेला डोसा सुरीने काढावा तसा तो तुकडे करून काढला आणि कंपोस्ट मध्ये टाकला.
हां, तर मुनिंदर विशाखा कडे वळू.त्यांच्या प्रयोगाने भारावून जाऊन आमचे साहेबही स्वतःच्या घरात बरेच(त्यांच्या दृष्टीने) उपयुक्त आणि गेम चेंजर प्रयोग करत असतात.पण साहेब म्हणजे माझ्या नवऱ्याची बायको ही अत्यंत भांडकुदळ स्त्री असल्याने ती 'ओह माय गॉड' म्हणून डोळ्यात आनंदाश्रू आणून मिठी न मारता 'हे काय वेड्यासारखं?चांगली चाकं वाली ट्रॉली ओट्यावर ठेवून काय व्हॅल्यू ऍडिशन आहे?आधी सगळं पाहिल्यासारखं कर' म्हणून खेकसते.विशाखा मुनिंदर च्या प्रयोगावर पण 'इतकं पांढरं शुभ्र डेकोरेशन गॅस जवळ?फोडणीतली हळद मोहरी उडाली तर?किंवा मिक्सरमध्ये पालक बारीक करताना भिंतीवर उडाला तर?किंवा चहा गाळून त्यातला भुसा पिशवीत टाकताना शिंतोडे उडाले तर?आणि पडद्यात एल ई डी बल्ब काय?दरवेळी धुताना उस्तवारी घरातल्या बाईनेच करायची ना?' वगैरे अनिष्ट शंका काढते.एकदा विशाखा मुनिंदर च्या घरी जाऊन त्यांच्या फर्निचर ला नाकं मुरडून यायचं दुष्ट स्वप्न अजून पूर्ण झालेलं नाही.खरं तर ते खूप चांगले मेकओव्हर करतात.पण अति शहाण्या माणसाला जगातले काय पटते?
सिनेमात दाखवतात तसं डायनिंग टेबलवर पदार्थाची आगगाडी असावी, त्यातून पदार्थ घेऊन ती पुढे ढकलता यावी, किंवा नोकर ट्रॉलीमध्ये स्वच्छ नॅपकिन्स, कटलरी, पदार्थ घेऊन येतो त्याप्रमाणे आपल्याला रोज मिळावे असं मी सोडून बाकीच्या मेम्बरांना सारखं वाटत असतं.पण घरात रोज स्वयंपाक करणारी स्त्री(म्हणजे मीच की) अत्यंत कजाग असल्याने रोज भाजी पोळी वरण भात इतका स्वयंपाक झाला तरी ते ईश्वराचे आभार मानतात.ज्या भांड्यात खाणं शिजवलं तेच वाढायला टेबलावर घेणे, पोळीच्या तव्यात पोळ्या, नंतर काचऱ्या आणि नंतर मिरचीचा खर्डा करणे,भाजी घट्ट असल्यास वाटी न घेणे, कोशिंबीर संपवत असल्यास नंतर तो चमचा वरण भात खायला वापरणे वगैरे भांडी आणि पाणी बचत जुगाड आम्ही आणि आमच्या जवळपासची कुटुंबं पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.(खोटं कशाला बोलू, भांडी आणि पाणी वाचवण्या पेक्षा नंतर ढीगभर भांडी मी लावण्यात स्वतःचा जाणारा वेळ वाचवणं हा मुख्य हेतू असावा अशी दाट शंका आहे.)
दुसऱ्याने सुचवलेल्या प्रत्येक मांडणी ला 'हॅ, हे फारच गैरसोयीचं आहे' असं म्हणून कचऱ्यात काढणं मी सोडलं नाही आणि देशा परदेशातल्या इंटिरिअर चे व्हीडिओ बघून 'कसे छान राहतात ना लोक, नाहीतर आपण!!' म्हणून उसासे टाकणं साहेबांनी सोडलं नाही.(आणि इतके व्यवस्थित, टापटीप वाले व्हिडिओ बघून पण 'कपडे सरळ करून मगच धुवायला टाकणे' हे मात्र कोणीही केलेले नाही.)
मी एकदा विशाखा मुनिंदर ला पैसे देऊन ते घरातले कपडे सरळ करतायत, टेबल मॅट धुतायत, खिडक्या पुसतायत असे व्हिडिओ बनवून घेणार आहे.यु नो, युट्युब व्हिडिओ मध्ये पाहिलं की सगळं खरं वाटायला लागतं!
(समाप्त)
त्याच गरम तव्यावर दुपारची
त्याच गरम तव्यावर दुपारची उरलेली भाजी आमटीची वाटी ठेवली कि वाटीतील पदार्थ पण गरम होतो.. पुन्हा ओव्हन किंवा गॅस ची गरज नाही..>>>+१
विशाखा आणि मनिंदर हा प्रकार माहिती नव्हता. सकाळी लेख वाचल्यावर आधी जाऊन त्यांचा एक व्हिडिओ शोधून तो पाहिला. >>+१
(No subject)
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
खूपच छान आणि विनोदी लेख.
खूपच छान आणि विनोदी लेख. तुमचे लिखाण नेहमीच मस्त असते
एकदम खुसखुशीत लेख..
एकदम खुसखुशीत लेख..
घराच्या मेकओव्हरचे while you
घराच्या मेकओव्हरचे while you were out आणि एन्डीटीव्हीवरचा स्कोप फॉरिम्प्रुव्हमेंट हे शोज बघितलेत आणि दोन्ही आवडायचे.
धमाल लिहिलंय!
धमाल लिहिलंय!
रंग फेकत फिरणाऱ्या रंगीबेरंगी
रंग फेकत फिरणाऱ्या रंगीबेरंगी बल्बचा इतका भारी उपयोग.
भारी लिहलंय..खूप हसले. मला पण
भारी लिहलंय..खूप हसले. मला पण हे मुनिंदर विशाखा माहित नव्हते मी पण आता पाहिला
नेहमीसारखं खुसखुशीत.
नेहमीसारखं खुसखुशीत.
संडासात डान्स चा बल्ब लावलाय
संडासात डान्स चा बल्ब लावलाय तर बाहेर संडांस असा बोर्ड लावा
मला पण हे मुनिंदर विशाखा
मला पण हे मुनिंदर विशाखा माहित नव्हते मी पण आता पाहिला>>>>>> हो मीही.
अगदी भारी आहे,आणि बऱ्याच
अगदी भारी आहे,आणि बऱ्याच बाबतीत सेम पिंच!
मुनींदर विशाखाचा शो टाईमपास म्हणून बघू शकतो पण माझा लेक नसेल तरच. त्यांच्या असिस्टंटचे डोक्यावर पडल्यासारखे वागणे सहन न होऊन तो चॅनेल तर बदलतोच पण तुला आणि आजीला काहिही चालतं यावरून सुरु होऊन कोणते चॅनेल आणि शोज बघावे यावर लेक्चर मिळतं
ती फिलर म्हणून आहे. नाहीतर
ती फिलर म्हणून आहे. नाहीतर कार्यक्रम अगदीच डॉक्युमेंटरी झाला आसता
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
Pages