गॅबिनहूड्स

Submitted by फेरफटका on 19 January, 2021 - 23:35

'अरे ओ सांभा, यह रामगढ वाले, अपने बच्चोंको कौनसी चक्की का पीसा आटा खिलाते हैं रे?' - शोले मधे गब्बर सांभा ला विचारतो. ऑस्ट्रेलियन थिंक टँकने शोले बघितला नसेल, पण भारतीय संघाविषयी त्यांना हाच प्रश्न पडला असावा. लहानपणी ती एक जड बुडाची बाहुली पाहिली होती. तिला कितीही खाली पाडा, ती परत वर यायची. जितक्या वेगानं खाली पाडाल तितक्याच वेगानं उसळी मारून वर यायची. ऑस्ट्रेलियन संघाला भारतीय संघ त्या उसळून वर येणार्या बाहुलीसारखा वाटला असावा. किंबहूना जितक्या वेळा ऑस्ट्रेलियाने 'बळेचि केला खाली जरि पोत' तितक्या वेळा ही भारतीय संघाच्या अस्मितेची ज्वाळा उफाळून वर आली.

कालच्या गॅबावरच्या विजयाचं वर्णन करतान शब्द अपूरे पडतायत. अचाट, अफाट, अविश्वसनीय, अवर्णनीय पराक्रम गाजवला भारतीय टीम मधल्या ह्या 'गॅबिनहूड्स'' ने. पहिल्या टेस्टमधे खेळलेले फक्त तीन खेळाडू कालच्या संघात होते. रूढार्थानं बघायला गेलं तर हा भारत-ब संघ होता. पाच बॉलर्स ना मिळून जेमतेम चार टेस्ट्स चा अनुभव होता. तिघंजण तर पंचविशीच्या आतले होते. आणी काही खेळाडू परत भारताकडून टेस्ट कधी खेळतील ते सांगता येणार नाही अशा कॅटेगरीतले होते. पण ह्या खेळाडूंनी हा विजयाचा महामेरू आपल्या खांद्यावर तोलला आणी मानानं मिरवला. ही संपूर्ण सिरीज भारताला नवनवीन हीरो मिळत गेले. मला कारगिल च्या युद्धात शहीद झालेल्या कॅ. पांडे चं ते वाक्य आठवत होतं. 'Some goals are so worthy, that it's glorious even to fail'. खूप मोठं स्वप्न उरी बाळगून मैदानात उतरलेले हे भारतीय खेळाडू प्रत्येक आव्हानांचा सामना करत, संकटाला नजर भिडवत टिच्चून उभे राहिले. स्वयंवरात अचूक लक्ष्यभेद करून द्रौपदीला वरून मानानं आणी अभिमानानं परत येणार्या अर्जुनाच्या साहसानं, चिकाटीनं आणी एकाग्रतेनं भारतीय संघानं विजयश्री खेचून आणली.

ही मॅच सुरू झाली ती सिडने ला भारतानं अचाट resilience ने अनिर्णीत राखलेल्या मॅचच्या पार्श्वभूमीवर. त्या सिडनेच्या मॅचमध्ये सुद्धा 'गॅबा ला बघून घेऊ' वगैरे वल्गना चालूच होत्या. ३१ वर्षात ऑस्ट्रेलिया गॅबा वर मॅच हारली नाही, तिथली विकेट बॉलिंगला अनुकूल आहे, ऑस्ट्रेलियाचा बॉलिंग अ‍ॅटॅक वर्ल्ड-क्लास आहे आणी भारताकडून आता उरलेसुरले बुमराह आणी अश्विन पण जायबंदी होऊन बाहेर गेले आहेत अशा सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय पाठीराखे सुद्धा मॅच ड्रॉ झाली तरी ट्रॉफी राखली जाईल इतपतच अपेक्षा बाळगून वरूणदेवाची प्रार्थना करत होते. भारतीय संघाच्या योजना मात्र वेगळ्याच होत्या. पाच बॉलर्स खेळवताना बॅटींग कमकुवत होऊ नये म्हणून कुलदीप यादव सारख्या अनुभवी स्पिनर च्या जागी २१ वर्षाच्या टी-२० स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध झालेल्या (आता असं कुणी म्हणणार नाही!) वॉशिन्ग्टन सुंदर ची संघात वर्णी लागली आणी भारतीय संघाच्या सकरात्मक मानसिकतेचा पहिला प्रत्यय आला.

पहिल्या इनिंग ला भारताच्या बॉलर्सनी ऑस्ट्रेलिया ला ३६९ मधे रोखलं. भारताची अवस्था ६ बाद १८६ आणी खाली सगळे कोरे काकरीत बॉलर्स. इथूनच ह्या जादूई पटकथालेखनाचा क्लायमॅक्स लिहायला सुरूवात झाली.. पदार्पणाच्या टेस्ट मधे फक्त १० बॉल्स टाकून जायबंदी झालेला शार्दूल ठाकूर आणी नवोदित वॉशिन्ग्टन सुंदर ह्यांनी १२३ रन्स ची पार्टनरशिप केली. दोघंही कुठल्याही अँगलने टेल-एण्डर न वाटता प्रॉपर बॅट्समेन वाटत होते. लाजवाब पार्टनरशिप!! २०१६ मध्ये बांग्लादेशात अंडर-१९ वर्ल्डकप च्या वेळी भारताच्या प्रशिक्षक असलेल्या राहूल द्रविडने वॉशिन्ग्टन सुंदर विषयी बोलताना 'watch out for this kid's batting skills' म्हटलं होतं. हीरे की परख जोहरी को ही होती हैं म्हणतात ते उगीच नाही. ऑस्ट्रेलियाला जेमतेम ३३ धावांची आघाडी मिळाली. नाममात्र आघाडी, पावसाची शक्यता आणी मॅच जिंकण्याचं प्रेशर ह्या गोष्टी आता ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक होत्या. चौथ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलिया कधी डाव घोषित करणार, भारताला किती ओव्हर्स आणी रन्स चं लक्ष्य ठेवणार ह्याविषयी चर्चा रंगली असताना, सिराज (५), ठाकूर (४) आणी सुंदर (१) ह्या तिघांनी ऑस्ट्रेलियाचा चक्क ऑल-आऊट केला!!

महंमद सिराज ऑस्ट्रेलियात राखीव खेळाडू म्हणून आला. बुमराह, शामी आणी यादव संघात असताना त्याला टेस्ट मॅच खेळायला मिळण्याची शक्यता फारच कमी होती. त्याच सुमारास भारतात त्याच्या वडिलांचं निधन झालं. तो परतायच्या तयारीत असताना विराट कोहलीनं त्याला सल्ला दिला कि ऑस्ट्रेलियात राहून जर त्याला भारताकडून टेस्ट मॅच खेळायची संधी मिळाली तर त्याच्या वडिलांचं स्वप्न तो पूर्ण करू शकेल. मेलबर्न ला मॅच सुरू व्हायच्या आधी राष्ट्रगीताला उभं असताना सिराज च्या डोळ्यातून अखंड अश्रू वहात होते. त्या स्वप्नवत प्रवासाची अखेर गॅबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचे पाच बळी घेऊन झाली. ह्यापेक्षा सुंदर आणी नाट्यमय कथा सलीम-जावेद सुद्धा लिहू शकले नसते.

काल दिवस सुरू होताना पाचव्या दिवशीचं खराब होत जाणारं पीच, ३२७ धावांचं लक्ष्य, कमिन्स, हेझलवूड, स्टार्क आणी लॉयन असा बॉलिंग अ‍ॅटॅक ह्या सगळ्या आव्हानांसमोर भारत ही मॅच कशी वाचवू शकेल ह्याची चर्चा रंगली होती. त्यातून ऑस्ट्रेलियन हवामानानं सुद्धा आयत्या वेळी गूगली टाकत त्या तिसर्या सेशन मधे पडणार्या पावसाला बहूदा 'खरा पैसा' देऊन त्याची बोळवण केली. पण शुभमन गिल आणी पुजाराने प्रतिकार करायला सुरूवात केली. शुभमन गिल मागच्या मॅचमधे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत मोठ्या इनिंग चा संकल्प सोडल्यासारखा खेळत होता. पुजाराविषयी काय बोलणार!!! केवळ महान!! अभेद्य प्रतापगड बघताना आपल्याला त्या गडाची तटबंदी, गडावरचं बांधकाम, तळं, भवानीमातेचं मंदिर वगैरे मोहक वाटतं. पण त्या गडाच्या अजेयपणामागे उन-वारा-पाऊस खात उभा असलेल्या भोरप्या डोंगराचा कधी कधी विसर पडतो, तसंच गिल - पंत च्या मोहक तटबंदीनं नटलेल्या ह्या भारतीय संघाचा अभेद्य डोंगर चेतेश्वर पुजारा आहे. ११ वेळा ते प्रचंड वेगानं उसळणारे चेंडू त्याने अंगावर झेलले पण एकदाही स्वतःची एकाग्रता भंग होऊ दिली नाही. त्या केप ऑफ गूड होप च्या वादळी समुद्रात उसळणार्या लाटांना तोंड देत उभ्या असलेल्या रॉक ऑफ जिब्राल्टरचं च भारतीय संघातलं प्रतिक आहे पुजारा! नैनं छिन्दन्ति शस्त्राणि...

गिल आणी रहाणे आऊट झाल्यावर पंत मैदानात उतरल्यावर क्षणभर वाटलं की हे तर सिडनेचे च डावपेच. पण अजिंक्य रहाणे हा सुलतानढवा करणारा सैनिक नसून शांतपणे रिस्क मॅनेज करत पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करत शेअर बाजारात नफा कमावणारा इन्व्हेस्टर आहे. त्याने मयंक आगरवाल सारख्या ओपनर ला मागे ठेवून पुढच्या नवीन बॉलला तोंड देण्याची पण तयारी करून ठेवली. पुजारा, मयंक आऊट झाले, पंत-सुंदर जोडी जमली, शेवटचा एक तास उरला, लक्ष्य आवाक्यात होतं पण तरी मॅच वाचवायची पण होती. ऑस्ट्रेलियन टीम, टीव्ही कॉमेंटेटर्स आणी आमच्यासारखे पामर प्रेक्षक अजूनही संभ्रमात होते की भारत मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळतोय. आता शेवटच्या ८ ओव्हर्स राहिल्या आणी कमिन्स ने एक जोरदार बाऊन्सर सुंदर च्या अंगावर टाकला. झर्र्कन एका पायावर गिरकी घेत सुंदर ने तो पूल केला आणी बॉल प्रेक्षकांत जाऊन पडला. काय जिगर आहे ह्या मुलांची!!! जागतिक रँकिंग मधे अग्रस्थानी असलेल्या पॅट कमिन्स च्या प्रतिताशी १४० कि.मि. च्या वेगानं आलेल्या बॉलवर
आपल्या पदार्पणाच्या सामन्यात इतका कडकडीत पूल!! व्वा!! मजा आली! आणी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या पायाखालची जमिन हादरली. शिवाजी महाराज सूरतेत घुसले आहेत हे कळल्यावर इनायतखान असाच दचकला असावा. भारत तर चक्क विजयाकडे चाललाय!! टीव्हीवर मॅच बघताना सुद्धा हृदयाची धडधड वाढली होती.

पण इतक्या रंगलेल्या सिरीज चा शेवट इतका सरळसोट असणं शक्यच नव्हतं. सुंदर एक अनावश्यक फटका मारताना बाद झाला आणी ठाकूर च्या बॅट ची कड घेऊन उडालेला चेंडू लॉयन च्या हातात स्थिरावला. पंतकडे त्या ओव्हर चे दोन बॉल्स होते. नंतर कमिन्स ची ओव्हर आणी समोर ११ ए, बी आणी सी क्रमांकावर बॅटींग करू शकतील असे तीन टेल-एण्डर्स. २००८ च्या त्या सिडनेच्या मॅच ची आठवण झाली ज्यात मायकल क्लार्क ने असंच दिवस संपता संपता एका ओव्हरमधे भारताचे तीन तळाचे फलंदाज बाद करून मॅच ऑस्ट्रेलियाकरता जिकली होती. हेझलवूड चा टप्पा जरासा चुकला आणी शिकार्याच्या सावधतेनं पंत ने तो बॉल लाँग-ऑफ बाऊंड्राकडे ड्राईव्ह केला, बॉल अलगद बाऊंड्रालाईन वरून पलिकडे पोहोचला आणी ह्या सिरीज चा कळसाध्याय लिहीला गेला.

१०० वा कसोटी सामना खेळत असलेला लॉयन हताश होऊन मैदानात बसलाय आणी त्याच्या फिरवलेल्या तोंडासमोरून टीव्ही स्क्रीन्स वर भारताचा तिरंगा झळकतोय हा ह्या सिरीज चं सगळं सार सांगणारा तो क्षण माझ्या आठवणीत कायमचा कोरला गेलाय. ब्रिस्बेन च्या त्या मैदानात विजयी भारतीय संघाची व्हिक्टरी लॅप, ती लॅप चालू असताना सगळ्या खेळाडूंचं एकमेकांमधलं सौहार्दपूर्ण वागणं आणी एकमेकांशी केलेली मस्ती - हे सगळंच अविस्मरणीय होतं. सुसंकृत विजय कसा असतो ते भारतीय कप्तानान आणी संघानं दाखवलं. १०० व्या कसोटी सामन्याची आठवण म्हणून नॅथन लॉयन ला सगळ्या खेळाडूंच्या सह्या असलेला जर्सी भेट दिल्यावर अजिंक्य रहाणे ने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी उंचावली आणी तितक्याच सहजतेनं ती ट्रॉफी नटराजन च्या हातात देत, डावीकडे मागच्या रांगेत जाऊन तो उभा राहिला.

एका रात्रीत गोष्टी घडत नाहीत. ह्या विजयामागे अनेक पिढ्यांची तपश्चर्या आहे. सगळे खेळाडू, भले ते प्रतिस्पर्धी संघातले गोरे खेळाडू का असेना, समान आहेत हा मंत्र भारतीय संघाला दिलेला आणी पहिला परदेशी सामना जिंकून देणारा पतौडी, पहिल्यांदाच दोन परदेशी सिरीज जिंकून देणारा वाडेकर, 'अरे' ला 'का रे' करायला शिकवणारा आणी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानात टेस्ट्स जिंकून देणारा गांगुली, वेस्ट इंडीज आणी इंग्लंड च्या सिरीज पाठोपाठ जिंकून वाडेकर च्या विक्रमाशी बरोबरी करणारा सुसंस्कृत द्रविड, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पर्थला भारताला सन्माननीय विजय मिळवून देणारा लढवय्या अनिल कुंबळे, द. अफ्रिका आणी इंग्लंडमधे टेस्ट्स जिंकून देणारा धोनी, आणी २०१८ मधे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारणारा विराट कोहली ह्या सगळ्या कॅप्टन्स, त्यांच्या टीम्स आणी त्यातून घडत गेलेल्या भारतीय क्रिकेट संस्कृतीचा हा विजय आहे. भारतीय क्रिकेट चा एक नवीन अध्याय लिहीला जातोय आणी तो याची देहि, याची डोळा बघायला मिळतोय हे आमच्यासारख्या क्रिकेटरसिकांचं सुदैव. भारतीय संघाला, भारतीय क्रिकेटला यशाची अशी अनेक शिखरं पादाक्रांत करण्यासाठी भरघोस शुभेच्छा!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर आणी एकदम आखीव रेखीव लिहीलेय. अभिमान वाटतोय आमच्या जिगरबाज खेळाडुंचा. देव त्यांना असेच यश देवो आणी पाय जमिनीवर राहोत.

फेफ, एकदम झकास लिहलयं! Happy
ह्या मालिकेत प्रत्येकाचा सहभाग तितकाच मौल्यवान होता. अगदी पहिल्या कसोटीतील सर्वबाद ३६ हे दिखिल हा विजय साकारायला कारणीभूत ठरला असे म्हणावे लागेल.
कालच्या डावात गिल, रहाणे, सुंदर, पंत ह्यांनी हल्ला चढवताना खेचलेले षटकार तर भारीच होतेच पण पंतचे स्कूप आणि स्वीप ऑसीजना जास्त झोंबले असावे.

आता इंग्रजांना पाणी पाजायचे. ह्यातील २-३ जण नाहीत पहिल्य २ सामन्यांसाठी आणि असलेल्यातील किती नवोदितांना संधी मिळेल हे ही पहावे लागेल. अर्थात प्रस्थापितांना देखिल करून दाखवावे लागेल अन्यथा नवोदितांचे दडपण आहेच मानेवर..

ऑस्ट्रेलियन टीम, टीव्ही कॉमेंटेटर्स आणी आमच्यासारखे पामर प्रेक्षक अजूनही संभ्रमात होते की भारत मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळतोय.
>>>>>>>
बिलकुल नाही हं, पंत जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत आपण सामना अनिर्णित राखायला जाऊ हा विचार माझ्या मनाला शिवतही नव्हता. अगदी ते ८ ओवर ५० हवे असतानाही कुठेतरी तो टारगेट करणारच हे डोक्यात पक्के होते. भले त्याला टीम मेनेजमेंटने आता जिंकायचे राहू दे अनिर्णितच राखू असे सांगितले तरी तो ऐकला नसता आणि म्हणूनच त्याला तसे कोणी सांगितलेही नसते Happy

लेख बाकी मस्तच !
कालपासून जिथे जिथे जे जे मिळतेय ते ते सारे पुन्हा पुन्हा वाचून काढतोय, क्षणचित्रे पुन्हा पुन्हा बघतोय, हा विजय, यातून मिळालेला आनंद किंबहुना मिळत राहणारा आनंद आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. अजूनही शब्दच नाहीत व्यक्त व्हायला, काल तर गांगुलीसारखे शर्ट फिरवत घराच्या बाल्कनीत नाचावेसे वाटत होते Happy

*हया विजयामागे अनेक पिढ्यांची तपश्चर्या आहे. * - +1. शिवाय, जिंकण्याची सुतराम शक्यता नसूनही, ' Tests against India should be of three days' अशी सतत कुतसित टिपणी इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील माध्यमं करत असूनही, पिढयान पिढ्या क्रिकेटवर व क्रिकेटरसवर अखंड प्रेम करणारे अगणित रसिक व क्रिकेटसाठी आयुष्याची बाजी लावणारे खेळाडू या देशात घडतच होते, या पुण्याईचं पाठबळही निश्चित होतंच.

एकदम झकास लिहिलयं
अधून मधून तटबंदी, प्रतापगड, सुरतेवर स्वारी वगैरे शब्द पेरलेल्या वाक्यांमुळे बहारदार झाले आहे हे लिखाण !
लिहीत रहा.

शोएब Akthar ने म्हटल्याप्रमाणे या विजयाचे बरेचसे श्रेय हे राहुल द्राविडने 19 वर्षाखालील संघासाठी घेतलेले कष्ट आणि तयार केलेली वृत्ती याना दिली पाहिजे

"अगदी पहिल्या कसोटीतील सर्वबाद ३६ हे दिखिल हा विजय साकारायला कारणीभूत ठरला असे म्हणावे लागेल." - नक्कीच! त्या झटक्यानंतर टीम जास्त त्वेशानं खेळली असं वाटतं.

"पंत जोपर्यंत बाद होत नाही तोपर्यंत आपण सामना अनिर्णित राखायला जाऊ हा विचार माझ्या मनाला शिवतही नव्हता." - पंत असेपर्यंत अपेक्षा नक्कीच होत्या... खूप जास्त होत्या. पण मला वाटतं की भारतीय संघानं आपले मनसुबे खुबीनं गुलदस्त्यात ठेवले आणी ऑस्ट्रेलियाला गाफील ठेवलं. तिसर्या सेशन च्या सुरूवातीला ३ मेडन ओव्हर्स खेळून काढणं, पंत ने संयमी बॅटींग करणं आणी हे सगळं करताना टारगेट आवाक्यात ठेवणं हा सगळा स्ट्रॅटेजी चा भाग असावा असं वाटलं.

"पिढयान पिढ्या क्रिकेटवर व क्रिकेटरसवर अखंड प्रेम करणारे अगणित रसिक व क्रिकेटसाठी आयुष्याची बाजी लावणारे खेळाडू या देशात घडतच होते" - अगदी बरोबर भाऊ!!

"राहुल द्राविडने 19 वर्षाखालील संघासाठी घेतलेले कष्ट आणि तयार केलेली वृत्ती याना दिली पाहिजे" - त्या अंडर-१९ आणी ए टूर्स मुळे भारतातलं डोमेस्टीक क्रिकेट आणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट ह्यातलं अंतर कमी व्हायला खूपच मदत झालीये.

मस्त आहे हा लेखही फेफ! एकदम चपखल वर्णन.

खुन्नसवाला खेळ करताना वरकरणी ब्रॅशनेस दाखवायची गरज नसते हे "द्रविड स्कूल ऑफ खुन्नस" मधून शिकल्यासारखे पब्लिक आहे हे. जबरी मॅच आणि सिरीज! बर्‍याच दिवसांनी/वर्षांनी इतक्या पॅशनने मॅच बघितली.

एका रात्रीत गोष्टी घडत नाहीत. ह्या विजयामागे अनेक पिढ्यांची तपश्चर्या आहे. >> हा शेवट आवडला. ह्या विजयानंतर ह्या गोष्टीचा विसर पडलाय बर्‍याच जणांना हे जाणवतेय. अप्रत्यक्ष पणे हातभार लावलेले बरेच जण आहेत ह्यात. फे.फ. वर कोचेस उल्लेख पण अ‍ॅड करायला हवा होता असे जाणवले.

फेफ दोन्ही लेख आज नीट वाचले!
मागेही क्रिकेटच्या धाग्यावर लिहले होते तसे तुझा हा लेख वाचताना पण राहूनराहून बाबासाहेब पुरंदरेंच्या शैलीची आठवण येत होती.
खुपच छान झालाय हाही लेख Happy
सुसंस्कृत विजय.... अगदी अगदी! Happy

स्वरूप, धन्यवाद!! बाबासाहेब पुरंदरे फार फार मोठी व्यक्ती. इतकी मोठी उपमा देण्यामागे तुझं क्रिकेटवरचं प्रेमच आहे इतकंच मानतो. धन्यवाद!!!