माझे डॉक्टर!---४--कर्णपिशाच्य!

Submitted by सुरेशकुलकर्णी on 18 January, 2021 - 01:49

त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. 'जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!' या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे! कानात बोळे घालून उपयोग नव्हता! म्हणजे डाव्या कानात रातकिड्यांची किरकिर तर, उजव्या कानात भिस्मिला खा यांची शहनाई! २४x ७ चालूच! नगरचे सगळे (तेव्हा, होतेच इन मिन, दोन!) ईएनटी पालथे घातले, मग डावे, म्हणजे औरंगाबादचे, उजवे, म्हणजे पुण्याचे डॉक्टर्स पालथे घातले.(आता कळतंय कोण कुणाला 'पालथं' घातलं ते!) सगळीकडे सारखीच पद्धत. आधी ऑडिओमेट्री करायची, पंधरा दिवसा खालची शिळी चालायची नाही! मग ती पाहून, डॉक्टर चार ड्रॉप्स, चारप्रकारच्या गोळ्या, प्रत्येकी दिवसातून तीनदा! 'या पंधरा दिवसांनी', फलोअपला पुन्हा ऑडिओमेट्री! मग 'हेयरिंग एड' घ्या! हा सल्ला.
मी एका हेयरिंग एडवाल्याकडे गेलोच. पुण्याचा होता. लांबून ओळख काढून गेलो. आपण ओळखीची माणसे याच साठी पहातो कि, फसगत होऊ नये. काय करू? भैयऱ्याच जगणं मोठं कठीण असत हो! (ती व्यथा नंतर कधी तरी!) त्या एडवाल्याने मोठ्या मायेने मला जवळ घेतलं. माझी पुन्हा एकदा ऑडिओमेट्री केली. इथपर्यंत माझी भावना अशीच होती कि, जसा आपण डोळ्याला चष्मा लावल्यावर चांगलं दिसत, तसेच हे हेयरिंग एड लावलं कि पूर्वीसारखं स्पष्ट ऐकू येतील.

"सर, हे जर्मन एड आहे. अगदी लेटेस्ट! लावून पहा!" त्याने माझ्या कानात प्लग घातले. चारबोट रुंदीची सेल घातलेली डबी माझ्या खिश्यात सारली. बटन दाबून ते सुरु केलं. कानात रेडे ओरडत असल्याचा भास झाला!

"अरे खूप आवाज होतोय!" मी ओरडलो.

त्याने आवाजाची तीव्रता कमी केली. मग तो आवाज कसाबसा 'कलकलाट'या, लेव्हलला आला.

"येत का ऐकू?"

"आवाज येतोय. पण, कळत काहीच नाही!"

"मला वाटलंच! तुमचा हेयरिंग लॉस खूप ऍडव्हांस झालाय! तुम्हाला डिजिटल एड लागेल!"

एक शंका तुम्हाला नक्कीच सतावत असेल कि आमचा संवाद कसा चालत असेल? थोडेसे, तो मोठ्याने बोलत असावा आणि आजून मला काहीसे ऐकू येत असावे.

त्याच्या साऊंडप्रूफ लॅबमध्ये माझ्या दोन्ही कानाच्या वेव्हलेंथ ऍडजेस्ट करून, प्रोग्रॅम्ड डिजिटल एड्स, मी घेतले. आपल्या कानात एक नैसर्गिक फिल्टर असत. नको असलेले आवाज आपोआप गळाले जातात. ती सोय या मशीन मध्ये कोठून येणार? कानाची रचना खूप क्लिष्ट आणि तितकीच कणखर पण असते. तरी माझ्या सारख्या दुर्दैवी माणसाच्या नशिबी, कधी कधी हे भोग येतात!

एका मशीनची किंमत होती तीस हजार! दोन यांची साठ हजार! (पुढे तसेच मशीन मी बेंगलोरला दहा हजारात घेतले होते!) पैशे गेले तर गेले, ऐकू यायला हवं! महिना दोन महिने बरे गेले. पावसाचे दिवस सुरु झाले. बाहेरचे वातावरण बदलले, मशीनचे सेटिंग बोंबल! पुन्हा एडवाल्या कडे गेलो.

"सर क्लायमेट बदललं ना! आपण पुन्हा सेट करू!" म्हणजे हे मशीन, हागलं मुतलं कि हटून बसणार. याला पाऊस, पाणी, ऊन, वार, धूळ या सगळ्या पासून जपून ठेवा. इतके लाड करूनही, हे बाळ वेळेवर फेल होणार! हि मात्र खात्रीची गोष्ट होती!

"अरे, एकदाच पक्के सेटिंगवाल मशीन, बघ आहे का?"

"आहे कि! कालच आलंय!"तो अत्यानंदाने म्हणाला.

"आधी किम्मत सांग बाबा!"

"फार नाही सर, फक्त दीड लाख! मीटिंगमध्ये घालून बसा. टाचणी पडलेली ऐकू येईल!"

मी हबकलो. परमेश्वराने दिलेल्या श्रावण यंत्राची, म्हणजे कानाची काय किंमत आहे हे कळले. या तिनलाखाच्या मशीनला, तरी हि, नैसर्गिक कानाची सर येणार नाहीच.

गम्मत म्हणून तुम्हाला सांगतो. हजार रुपया पासून दीड लाखाच्या कुठल्याच मशीनवर एम आर पी नव्हती! कारण सगळ्याच इंपोर्टेड होते! असो.

या कानाच्या प्रॉब्लेम सोबत अजून एक विचित्र प्रकार सुरु झाला. तो म्हणजे केव्हाही पोटात खळबळून उलटी व्हायची! आणि चकरा यायला मागायच्या! याला 'व्हर्टिगो' म्हणतात! विचित्र दहशत असते. तुम्ही सिनेमागृहात आहात, मिटिंग मध्ये आहात, हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर देऊन वाट पहात आहात, लग्नमांडवात आहेत, हा व्हर्टिगो कोठेही घाला घालू शकतो! (सात वर्ष मी या गोष्टी टाळल्या होत्या! या कटकटीला मी, माझे घरचे वैतागले होते!)

"साहेब, तुम्ही न या ऍलोपॅथीवाल्या डॉक्टरांच्या नादी लागू नका? साले, सगळे चोर आहेत. शिडीकेट करून पिळून काढतात!" त्याने जमेल तसे हातवारे करून त्याचे म्हणणे माझ्या पर्यंत पोहंचवले.

"मग काय करू?"

"तुम्ही आयुर्वेदिक ट्राय मारा! उशीर लागतो, पण इलाज पर्मनंट!"

"आहे कोणी चांगला वैद्य माहितीतला? पण नगरमधलाच पहा. फलोअपला बर पडत."

"हो, तर! आयुर्वेदाचार्य आहेत. त्यातले चांगले यम.डी. आहेत!"

"पत्ता. लिहून द्या!"

म्हणून या भल्या गृहस्थाचा सल्ला मानून मी त्या आयुर्वेनाचार्या कडे जाण्याचा निर्णय घेतला. इतके पैसे गेलेत तेथे आजून थोडे.

ते डॉक्टर मोठे मस्त होते. दवाखान्यात त्यांनी पीसी ठेवला होता. त्या मुळे तो 'कॉप्युटराइझ्ड' दवाखाना होता. त्यांनी माझी संपूर्ण तपासणी केली. रक्त घेतले. हाताने पोट पाठीच्या माणक्या पर्यंत दाबून तपासले. माझी बायपासची हिस्ट्री विचारून घेतली. फॅमिली मेडिकल हिस्ट्री विचारली, मी काय करतो हे विचारून घेतले. थडक्यात गोत्र आणि नाडी सोडून सगळे विचारून घेतले. हाताची नाडी मात्र तपासण्याचे सोंगच केले.

"तुमचे पोट खूप कडक झालंय! जेवणात तूप नसत का?"

"गेली सोळा वर्ष झाली, तेल तूप बंद झालाय! हार्टचा प्रॉब्लेम आहे!"

"चांगल्या तुपाला काही होत नाही!" येथे पहिला विरोध ऍलोपॅथीला सुरु झाला.

"तुमच्या कानाचे न ऐकू येणे याचे मूळ तुमच्या पोटात आहे! तुम्ही रोज दोन चमचे खोबरेल तेल जेवण्याच्या आधी पीत जा!" हा सल्ला जर माझ्या कार्डिओलॉजिस्टने ऐकलं असतात तर, त्यांनी या आचार्यावर कोर्ट केस केली असती, पण हे त्यांनी नाही, मी ऐकलं, त्यामुळे त्यांनी माझी ब्रँड न्यू स्टेण्ट घालून अँजिओप्लास्टी केली! म्हणजे करावीच लागली!

मला आजवर ईएनटी वाल्यानी सांगितले होते कि, तुमच्या कानातील हाडे झिजली असावीत आणि शिरा(नर्व्ह) पण डॅमेज झाल्यात! तेव्हा कधीच ऐकू येणार नाही! आणि हा म्हणतोय कि मूळ कानात नाही तर पोटात आहे!

पंधरा दिवसाच्या पुड्या घेऊन त्यांना बाराशे रुपये देऊन आलो. पोट साफ होऊ लागले. त्यामुळे उलट्याचाही त्रास कमी होऊ लागला. ऐकू येण्यात फारसा फरक नव्हता पण एकंदर बरे वाटू लागले. महिना अडीच हजार सुरु झाला. हळू हळू तो वाढू लागला. तीन हजार, पाच हजार! मग त्यांनी 'बस्ती करावी लागेल!' म्हणून जाहीर केले. बस्ती -बस्तीचा खेळ दोन महिने सुरु होता. मग म्हणू लागले, ती कोलेस्ट्रॉलची आणि ऍस्प्रिनची गोळी बंद करा. माझ्या औषधाचे परिणाम हवे तसे होत नाही. मी हे मात्र ऐकले नाही. मग ते एकदा म्हणाले कि 'आपण पंच कर्म! करू!' मी नकार दिला! स्पष्ट नकार दिला!! कारण या पंचकर्माचा खर्च, माझ्या घराबाराच्या वर्षाच्या अन्न धान्य पेक्षा ज्यात होता! याना माझ्या व्याधीत फारसा रस दिसेना, ते फक्त 'जैसे थे ' मेंटेन करून, एक्सप्लॉईट करत होते! याची मला खात्री वाटू लागली होती! मी त्या 'आचार्यांना' कायमचा सोडले.

आयुर्वेद काय? आणि ऍलोपॅथी काय? यांच्या ज्ञान गंगेच्या पावित्र्यबद्दल शंका नाही. पारदर्शकतेची कमतरता आणि त्याचा फायदा घेण्याची प्रवृत्ती, वाईट आहे. तुम्ही पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी काय करयताय हे डॉक्टरांनी सांगितले पाहजे, आणि पेशंटला, हा डॉक्टर आपल्या शरीरावर काय उपचार करणार आहे, हे जाणून घेण्याचा हक्क, रोग्यास आहे. तुमची जी काय शंका असेल, ती डॉक्टरांना जरूर विचारा. आयुर्वेदिक डॉक्टरनानी, ऍलोपॅथी साठी जसे प्रिस्क्रिप्शन देतात, तसे दिले तर बरे होईल. मी ते आचार्य सोडले कारण ते मला नव्वद रुपयाच्या नित्यमवर, एरंडेल तेलाचे दोन थेम्ब टाकून पुड्या देत होते! याचे मिश्रण करताना मी प्रत्यक्ष त्यांच्या कम्पाउंडरला पहिले होते! हा विश्वासघात होता! अशा लोकांनी हे पवित्र क्षेत्र बाटवलय! असो.

मला या त्रासापायी नौकरी सोडावी लागली! मोटरसायकल चालवता येईना! परावलंबन वाढले! मी शेवटी एक दिवस बेंगलोरला आलो. येथे एक एमडी मेडिसिनच्या डॉक्टर आहेत. डॉ. गात्री म्हणून.(नाव बदलले आहे.) त्यांच्याकडे माझी डायबेटिज आणि अस्तमाची ट्रीटमेंट चालू होती. त्या मला 'सकाळी तासभर फिरत जा' म्हणाल्या. मी त्यांना चकरा येतात, सोबत कोणी सापडत नाही म्हणून सांगितले. त्यांनी क्षणभर माझ्याकडे पहिले. BPPV गुगल करून त्या प्रमाणे मानेचा व्यायाम करा म्हणून सल्ला दिला. एक व्हर्टिगोची गोळी, चार दिवस घ्यायला सांगितली. परफेक्ट डायग्नोसिस काय असते याची प्रचिती तिसऱ्या दिवशीच आली! गेली पाच वर्ष झाली चकरा त्रास अजिबात नाही! तो व्यायाम मी फार तर एखादा आठवडा केला असेल. मी इतके तज्ञांना दाखवले, त्यातील एकालाही हे माहित नव्हते? यावर माझ्यातरी विश्वास नाही! मग असे का? याचे उत्तर माझ्या कडे नाही. न सांगणारे डॉक्टरच होते, माझी त्या नरकातून सुटका करणारीही एक डॉक्टरच होती!

आपल्या कानात शरीराच्या संतुलनाची व्यवस्था असते. कानात काही खडे असतात. ते इतर वस्तू प्रमाणे गुरुत्वाकर्षणाला बांधील असतात. कानाच्या पोकळीतील संवेदनाशील पेशींचे बारीक सेन्सर्स, त्या खड्यांच्या हालचालींची माहिती मेंदू पर्यंत पोहचावतात. त्यामुळे देह जमिनीशी किती अंशांनी झुकला आहे मेंदूला कळते, व तो इतर अवयवाला सूचना देऊन तोल सांभाळतो! हि यंत्रणा बिघडली कि चकरा सुरु होतात. चुकीच्या माहितीवर मेंदू इतर अवयव नाचवतो! हि माझी ढोबळ माहिती आहे.

हे झालं व्हर्टिगोच. कानासाठी त्याच डॉक्टरीण बाईंनी मला मार्ग दर्शन केले. सायनस आणि कान यांचा जवळचा संबंध असतो म्हणे. सर्दीसाठी त्यांनी एक नोसल स्प्रे दिला, पावसाळा हिवाळा वापरायचा. सर्दी असो नसो! सर्दीत कान कोरडा आणि हलका रहावा यासाठी झोपताना एक गोळी गरजे प्रमाणे घायची! झाली ट्रीटमेंट! महिन्याभरात कान कोरडा झाला. पडद्यावरची सूज बहुदा कमी झाली असावी किंवा माझ्या इच्छा शक्तीने डॅमेज्ड नर्व्हचे न्यूरॉन नव्याने तयार झाले असतील, मला आता म्हणजे गेल्या तीन चार वर्षांपासून कामा पुरते ऐकू येतंय! एक काळा कालखंड भोग भोगून संपवले!

मी आयुर्वेदाचा निंदक नाही. मला, नसेल ते शास्त्र सूट झाले. पण कुठेतरी चुकतंय हे मात्र नक्की. येथे एक किस्सा सांगतो. एक चांगले ऍलोपॅथीचे डॉक्टर आहेत. काय अवदसा सुचली कोणास ठाऊक?, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या नादी लागले. ऍलोपॅथीचे दुष्परिणाम मोठ्या हिरीरीने सांगत. त्यांना स्वतःला हार्ट प्रॉब्लेम होता. बी.पी. होता. सुशिक्षित माणूस. गोळ्या टाकल्या बंद करून. फेसबुकवर हृदयरोग आणि त्याच्यावरील आयुर्वेदिक उपचार या साठी सल्लाकेंद्र सुरु केले. कोलॅस्ट्रालची औषधे बंद करा, त्याची गरज नसते, ते ऍस्प्रीन पित्तवर्धक असते, अशे सल्ले देत. एका शुभसकाळी, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. छाताड हातभार फाडून ओपन हार्ट सर्जरी करावी लागली! त्यातून आता ते सावरत आहेत. फेसबुक ग्रुप बंद केलाय! तेव्हा तारतम्याने वागावे हीच विनंती. जगात असे एकही शास्त्र नाही, ज्यात साईड इफेक्ट नाहीत! इफेक्ट असेल तर साईड इफेक्ट असणंच! कसलाही साईडइफेक्ट उपचार पद्धती मला नाही वाटत अस्तित्वात असेल.

हि सगळी माझी मते आहेत. लगेचच भांडायला येऊ नका. तुमचे निर्णय तुम्हीच घ्या, मी माझा अनुभव येथे तुमच्याशी शेयर केलाय.

एकूण काय तर? आपली काळजी आपणच घ्यायची. आजारी न पडणे यासाठी सजग राहायचे. आणि वेळ पडली तर डॉक्टरांकडे जायचे.

सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान शब्दात अनुभव मांडलाय. "एक काळा कालखंड भोग भोगून संपवले!" - हे ही जवळून अनुभवलय. काही वाईट लोकांमुळे डॉक्टरी पेशेवरचा विश्वास उडतो. असो, तुम्हाला आता बरं वाटतंय हे वाचून छान वाटला.

छान लिहिलं आहे आणि आयुर्वेदिक सगळयांना चालत नाही, मी सुद्धा गुढगेदुखी वर औषध चालू केले होते, पण एकच डोस गेला आणि २ तासात मला चक्कर, ऍसिडिटी उलट्या चालू झाल्या त्यामुळे मी यापासून पूर्ण दूर आहे
तुम्हाला बरं वाटलं हे ऐकून आनंद झाला शुभचिंतन तुमच्या साठी