कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग ४

Submitted by पायस on 17 January, 2021 - 08:07

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77821

चौथा दिवस (कॅनहॅम्प्टन)

अ‍ॅलेक्सीने आज संग्रहालयाच्या खोल्या नजरेखालून घालायचे ठरवले. तिथले साहित्य फार बारकाईने तपासण्याची संधी जॉनला मिळाली नव्हती. तशी गॅरेथची यास हरकत दिसली नाही पण केविन यांनी ताकही फुंकून प्यावे धोरण स्वीकारले असण्याची शक्यता होती. कुठल्याही श्रीमंतांच्या घरी असतात तशा बिनकामाच्या अनेक वस्तु त्या दोन खोल्यांमध्ये होत्या. अ‍ॅलेक्सीने सुरुवात खोली क्र. १ पासून केली. या छापाची एक खोली काल्डवेलच्या डार्टमूरच्या घरी अ‍ॅलेक्सीने पाहिली होती. अर्थात ख्रिसचे वडील, लेट चार्ल्स काल्डवेल यांना मुख्यत्वे बंदुका व युद्धविषयक पुस्तके जमा करण्याचा शौक होता. गॅविन यांचा पिंड कलाकाराचा असावा. गशेलच्या टीसेटवरून त्यांची अभिरुची उत्तम असावी. पण मग अ‍ॅनाची हकीगत? असा माणूस तरल मनाचा असू शकेल?

"ज्यूस?"
ग्रेटाच्या हातातील ट्रेमध्ये सरबताचा ग्लास होता. स्थानिक वाईल्ड करंट्सना वाफवून त्यात मध, दह्याचे पाणी, दालचिनी आणि लवंग घालून सरबत बनवले होते. ख्रिस सोबत सतत चहा पीत असल्यामुळे अ‍ॅलेक्सी सरबतांची चव काहीशी विसरलाच होता. ब्लॅक करंटचे सरबत त्यानेही अनेकदा बनवले होते पण या सरबताची चव अधिक तजेलदार होती. ग्रेटाने मंद स्मित करून रेसिपी आपली असल्याचे सांगून नंतर ती देण्याचे मान्य केले.
"आल्बस आज थोडा कामात आहे. तरी तो तुमची मदत करू शकणार नाही. या खोल्यांत इतक्या वस्तु आहेत की कोणीही हरवेल. मला सर्व वस्तुंची माहिती नाही पण काही प्रश्न असतील तर मी उत्तरे द्यायचा प्रयत्न करीन."
हे सर्व ठीक असले तरी प्रश्न काय विचारावे हे अ‍ॅलेक्सीला ठाऊक नव्हते. त्याची नजर सहजगत्या खिडकीकडे गेली. खिडकी! त्या रात्री एखादी खिडकी उघडी तर राहिली नसेल?
"नाही. मी झोपायला जाण्यापूर्वी सर्व खिडक्या बंद केल्या होत्या. मी जेव्हा खिडक्या बंद केल्या तेव्हा सर्व वरच्या मजल्यावर होते. नंतर आल्बसने दारे बंद केली."
"ग्रेटा त्या रात्री तळमजल्यावर तू एकटीच होतीस. तुला काही खटकल्याचे आठवते का?"
"अर्थात! मला हा प्रश्न कोणीच का विचारत नाही हे मला समजत नाही. सर गॅविन एवढा गोंधळ होऊनही रात्रभर झोपून कसे होते?"
"पण आल्बसने तर सांगितले की गॅविन नेहमीच रात्रीचे गाढ झोपतात आणि त्यांना झोपेत व्यत्यय आणलेला अजिबात खपत नाही."
"हे खरे आहे. पण विचार करा लिंडाने एवढ्या जोरात किंकाळी फोडूनही ते जागे होऊ नयेत? तसेच इतर सर्व पुरुषमंडळी एवढ्या धडाधड पावले वाजवत ग्रेट हॉलमधून बाहेर पडले. ग्रेट हॉलमध्ये बाहेर पडताना आल्बसने मला हॉलमध्येच थांबवले, सूचना दिल्या, किल्ली वापरून अवजड दरवाजा उघडला पण लायब्ररीतून ढिम्म हालचाल नाही. कसे शक्य आहे? त्यांची झोप इतकीही गाढ नाही."
"म्हणजे तू ग्रेट हॉलमध्ये होतीस तो पूर्ण वेळ लायब्ररीतून काहीच हालचाल झाली नाही?"
"मी असताना तरी नाही."
"म्हणजे?"
"लेडी लिंडाला थोडी हुशारी यावी म्हणून लेडी आयरीननी मला चहा बनवायची विनंती केली. तेवढा वेळ त्या ग्रेट हॉलमध्ये थांबल्या होत्या. पण त्यांनाही काही हालचाल ऐकू आली नाही."
"किती वेळ लागला असेल याला?"
"जास्तीत जास्त पंधरा मिनिटे. मी चहा, दूध, साखर इ. तयार करून मग लेडी आयरीनना हाक मारली व परत आपली जागा घेतली."
"जेव्हा गॅरेथ व इतर परत आले तेव्हा त्यांनी सर गॅविनना उठवायचा प्रयत्न नाही केला?"
"मास्टर गॅरेथ म्हणाले की त्यांना घडल्या प्रकाराविषयी सकाळी सांगता येईल."
"त्या खोलीत जाण्याचा इतर काही मार्ग?"
"नाही. खोलीत तिजोरी आहे, जिथे पैसे, महत्त्वाची कागदपत्रे आणि मुख्य म्हणजे घराच्या किल्ल्या आहेत. तिचे कॉम्बिनेशन मास्टर गॅरेथ वगळता इतर कोणालाच ठाऊक नाही. त्यामुळे सर गॅविन खिडकी बंद करूनच झोपतात.

अ‍ॅलेक्सी थोडा वेळ विचारात पडला. या मधल्या काळात खुन्याने काही साध्य केले असेल का? गॅरेथने बर्टी किंवा गॅविनना उठवायची तसदी घ्यायला हवी होती. समजा खुन्याचा कोणी हस्तक असता आणि त्याने या मधल्या काळात हल्ला केला असता तर? आणि ख्रिसच्या त्या शब्दांचा अर्थ? याच दिवशी का? त्या घड्याळ्याच्या बिघडण्याचा तर या वेळेशी काही संबंध नसेल?
"घड्याळातील बिघाड? खरं सांगू तर मला त्या ग्रँटचा मुद्दाच समजलेला नाही. त्या घड्याळाने कधीही चुकीची वेळ दाखवलेली नाही."
"हे तू कसं सांगू शकतेस?"
"त्या घड्याळाचा वापर संपूर्ण कॅनहॅम्प्टन करतं. रोज रेल्वेप्रवास होतो. या घड्याळाने दाखवलेल्या वेळेवर विसंबून लोक स्टेशनची वाट पकडतात. स्टेशनवर घड्याळ असले तरी तिथली वेळ घरबसल्या तर समजत नाही. जर हे घड्याळ बिघडले असते तर लोकांच्या गाड्या चुकल्या असत्या, कामावर जायला उशीर झाला असता. तसे काहीही घडल्याचे माझ्या ऐकीवात नाही."
काहीतरी चुकतंय! अ‍ॅलेक्सीला प्रथमच आपल्या हातात या रहस्याची गुरुकिल्ली आल्याचा भास झाला. मनोर्‍यातले घड्याळ, त्यातील संभावित बिघाड, गॅविन यांचे हरवलेले घड्याळ, स्टेशनवरचे घड्याळ - यात काहीतरी सामायिक धागा होता. पण काय?
"मला काय वाटते की घड्याळात बिघाड असेलही पण तो अगदीच किरकोळ असावा. एखादे मिनिट इकडे तिकडे. पुढे जाऊन तो बिघाड वाढला असता आणि त्यामुळे ग्रँटने आधीच उपाययोजना करून त्याचा कायमचा बंदोबस्त केला असेल."
"पण ग्रेटा, ग्रँट म्हणाला की असाच बिघाड महिन्याभरापूर्वी झाला होता."
"हां तो बिघाड खरा होता. म्हणजे आधी घड्याळ जेमतेम पाच मिनिटे पुढे गेले असेल पण पुढच्याच दिवशी ते जवळ जवळ दहा मिनिटे पुढे होते. ग्रँट सांगत होता की त्या ग्रासहॉपर रचनेमुळे हा फरक वाढतच गेला असता. नाऊ दॅट यू मेन्शन इट..."
"तुला अजून काही आठवले?"
"मला नेमकं काय ते सांगता नाही येणार पण..... माझी उठण्याची वेळ तशी नियमित आहे. सहाच्या सुमारास मी उठलेली असते. आल्बसला उठवून मी कामाला लागते. मग आल्बस चहा घेऊन साडेसहापर्यंत लायब्ररीत हजर होतो. त्या दिवशी आमची झोप नीटशी झाली नाही. पण मला वाटते मी उठले तेव्हा मला सहापेक्षा जास्त टोले ऐकू आले होते."
"नक्की?"
"बहुतेक. कारण तसे असते तर सर गॅविन भडकले असते. पण आल्बस चहा घेऊन गेला तेव्हा ते खुर्चीत बसलेले, पाठमोरे विचारात गढले होते. मला माहित नाही आम्ही उशीर केला का नाही. पण सहा टोले होते का जास्त होते...."
"ग्रेटा. व्हाय डू यू सिंक सो? तुझी झोप इतकी नियमित आहे की तू सहाला उठतेचस उठतेस. आल्बस त्या दिवशीही साडेसहाच्या सुमारास चहा घेऊन लायब्ररीत गेला होता आणि ते नेहमीप्रमाणे सातच्या सुमारास बाहेर पडले आणि दुर्दैवाने त्यांच्यावर झडप घातली."
खोलीच्या दारातून पीटरने दोघांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.

********

"पीटर तू तर सर गॅविन यांचा निकटवर्ती होतास. तुला काय वाटते, कोणी केला असेल खून?"
पीटरने खांदे उडवले. "हू नोज? मी निकटवर्ती असलो तरी मुख्यत्वे माझा वावर त्या चॅपल संदर्भात होता. मला त्यांच्या परदेशी व्यापारिक बाबींची काही माहिती नाही आणि मी शक्यतो त्यांच्या परिवारासंबंधित बाबींमध्ये नाक खुपसत नाही. या संग्रहाविषयी मी बरेच काही सांगू शकतो. जसे की या खोलीत मुख्यत्वे परंपरागत चालत आलेल्या काही वस्तु आहेत. हे बायबल, तरी दीडशे वर्षे जुने आहे. हे पेंटिंग, निओक्लासिक शैलीचा नमुना. सोळाव्या लुईच्या काळात कोणा फ्रेंच कलाकाराची निर्मिती. याच प्रकारची पेंटिंग्ज, उत्तमोत्तम मिंग शैलीची भांडी, शिल्पे खोली क्र. २ मध्ये आहेत. आपण तिकडे जाऊयात का?"
"पण या खोलीत शस्त्रे आहेत. त्यामुळे ही जास्त महत्त्वाची नाही का?"
"आय सपोज. तपासाच्या दृष्टीनेच विचार केला पाहिजे नाही का? उदाहरणार्थ हे आर्मर. ग्रीन नाईटचे वाटते ना?"
ते केल्टिक पद्धतीचे जुने चिलखत व शिरस्त्राण होते. लेदर जर्किनवर लोखंडी जाळे होते. छातीपाशी एक ब्राँझ प्लेट होती. शिरस्त्राण लोखंडी होते. या सर्वांना निळसर हिरवा रंग होता.
"ते लोखंड, शुद्ध लोखंड नाही आहे. त्यावर तांब्याचा एक थर आहे. कॉपर प्लेटिंग यू नो? तांबे आणि ब्राँझ गंजले की असे निळसर हिरवे दिसते. त्यास पॅटिना म्हणतात."
"कोणी याचाच वापर करून तर ग्रीन नाईट जिवंत केला नसेल?"
"छे छे. त्यासाठी हा जामानिमा बाहेर काढला पाहिजे. कोणाच्याही दृष्टीस न पडता हा जामानिमा कसा बाहेर काढणार?"
पुन्हा एकदा अ‍ॅलेक्सीला समोर काहीतरी आहे जे गवसत नसल्याची जाणीव झाली. ख्रिस अनेकदा म्हणत असे तसे धागे जुळण्याची जाणीव होती ती! त्याला शांतपणे बसून विचार करण्याची गरज होती. त्याने पीटरची रजा घेतली व स्वयंपाकघराची वाट पकडली. एक ग्लास वाईनची मदत होऊ शकली असती.

*******

"हिअर यू गो, अ‍ॅलेक्सी. घरातल्यांना ही विशेष आवडत नाही पण माझ्यामते ही मॅनोरमधली सर्वोत्कृष्ट वाईन आहे."
"थँक्स बर्टी." वाईन काहीशी चवीला चहासारखी होती. कडवट पण चांगली कडवट. मधूनच व्हॅनिलाचीही चव जाणवत होती.
"ओकवुड!"
"यप! ओकवुड बॅरलमध्ये एज्ड आहे. ही चवीला फारशी डीप वगैरे नाही पण मला सरधोपट चवी अधिक आवडतात. उगाच अवडंबर नाही."
"आय कॅन रिलेट." अ‍ॅलेक्सीला ख्रिसच्या चहाच्या नखर्‍यांची आठवण आली.
"मग तपास कुठवर आला?"
अ‍ॅलेक्सीने त्याला जरुर तेवढी माहिती दिली. ख्रिसचे 'हे रहस्य जवळपास सुटले आहे' विधान मात्र त्याने टाळले. बर्टीही एक संशयित होता. त्याला तपासात एवढी प्रगती झाली आहे हे कळू देणे फायद्याचे नव्हते.
"मग ते चिलखत, लिंडाला तेच दिसले असेल का?"
"काय माहित? त्या शिरस्त्राणात काही पिंगट केस दिसले पण संपूर्ण मॅनोरमध्ये पिंगट केस फक्त सर गॅविनचे होते. पीटर म्हणतो की कधी तरी गॅविननी ते परिधान केले होते. तेव्हाचे हे केस असू शकतील. पण गॅविन असे का करतील?"
"श्रीमंतांच्या डोक्यात काय चालते ते समजणे अशक्य आहे अ‍ॅलेक्सी."
हे बोलणे चालू असताना बर्टीने सूपची तयारी सुरु केली. एका हाताने लीक धरला आणि दुसर्‍या हाताने सुरी सी-सॉसारखी वर खाली करत तो एका लयीत भराभर चिरला. पुन्हा एकदा अ‍ॅलेक्सीला तीच जाणीव झाली. त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यासारखे वाटत तर होते खरे पण अजूनही त्याच्यापुरते चित्र काहीसे धूसरच होते. आता ख्रिस येईपर्यंत करण्यासारखे एकच काम होते, चॅपलला भेट देणे.

~*~*~*~*~*~

चौथा दिवस (लंडन)

ख्रिसने आधी गॅविनच्या वकीलांची भेट घेतली. गॅविननी मृत्युपत्र केले होते. त्यांनी अपेक्षेप्रमाणेच गॅरेथला आपला वारसदार नेमले होते आणि मॅनोर व बहुतांश जमीनजुमला त्याच्या नावावर केले होता. त्याखेरीज बव्हंशी उद्योगधंद्यांचा मालक तोच दिसणार होता. विल्यम व आयरीनच्या वाट्यालाही बरीच संपत्ती ठेवली असली तरी ती पाऊंड व सोन्याच्या रुपात होती. तीन बाबी ख्रिसला खटकल्या.

१) गॅरेथने आल्बस व ग्रेटाला सहा महिन्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्यास विचारणे अनिवार्य होते. जर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली तर गॅरेथने त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी एक घर घेऊन देणे अनिवार्य होते. तसेच गॅरेथने बर्टीला महिन्याभरात नोकरीवरून काढून टाकणे अनिवार्य होते. यापैकी कशाचाही भंग झाल्यास गॅरेथचा हिस्सा लिंडाच्या नावे होईल.
२) विल्यमच्या नावे ग्रीन चॅपल केले होते. मृत्युपत्रानुसार ग्रीन चॅपलची देखभाल विल्यमने करणे अपेक्षित होते. यासाठी पीटर त्याला मदत करणार होता आणि त्याकरिता पीटरला मासिक वेतन देण्याची सोय होती. विल्यमने जर ही जबाबदारी नाकारली तर ग्रीन चॅपलची देखभाल पीटरने करणे अपेक्षित होते व ग्रीन चॅपलची मालकी पीटरला दिली जाणार होती. पीटर ग्रीन चॅपलचा मालक बनला तर त्याने गॅरेथ व विल्यमला प्रत्येकी हजार पौंड वर्षाभरात देणे अनिवार्य होते. हे पैसे टप्प्या टप्प्याने दिलेले चालणार होते. जर पीटर हे पैसे देऊ शकला नाही तर चॅपल जमीनदोस्त केले गेले पाहिजे.
३) आयरीनला वाटा मिळण्याकरता तिने लग्न करणे अनिवार्य होते. जर आयरीन अविवाहित असेल तर तिने मृत्युपत्र वाचल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्ये लग्न केलेच पाहिजे. मग तिच्या वाट्यातील अर्धा तिला व अर्धा तिच्या नवर्‍यास मिळेल. जर ती विवाहित असेल आणि हा विवाह गॅविनच्या संमतीने झाला असेल, तर तिने पुढचे सहा महिने ते लग्न टिकवले पाहिजे. मग तिला संपूर्ण वाटा मिळेल. जर ती विवाहित असेल आणि हा विवाह गॅविनचा विरोध डावलून झाला असेल, तर तिचा वाटा आल्बस व ग्रेटाला मिळेल.

हेन्रींची माहिती अपूर्ण होती. या अटी निश्चितच विचित्र होत्या. गॅरेथ व आयरीनवर हक्क गाजवण्याची गॅविनची भावना ख्रिसला लक्षात आली. पण ग्रीन चॅपलची अट अगदीच बुचकळ्यात टाकणारी होती. आणि बर्टीवर इतका राग का? वकीलांना अजून दोन दिवस मृत्युपत्र न जाहीर करण्याची ख्रिसने विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली. तसेही सर गॅविनचा दफनविधी दोन दिवसांनंतर होणार होता. त्यांचे शव पुन्हा शिवून झाले होते. यापेक्षा अधिक काळ शव टिकवणे फ्यूनरल होमला शक्य नव्हते. त्यानंतर मृत्युपत्र वाचण्याचा त्यांचा विचार होता. ख्रिसला ही योजना मान्य झाली.

******

रशियन कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने लॉर्ड्स लायब्ररी गाठली. त्या कायदेविषयक ग्रंथांमध्ये डोके खुपसून बसण्यात फारसा अर्थ नव्हता. त्याने तेथील मदतनीसाच्या मदतीने एक व्यापारी कायदेपंडित गाठला. गॅविन नक्की काय करत असतील हे सांगणे अशक्य असले तरी अंदाज बांधणे शक्य होते. चर्चेतून बांधलेला अंदाज असा
रशियाचे धोरण ढोबळ शब्दांत सांगायचे तर रशियन मालकीहक्कांना प्राधान्य देणे. यामुळे ब्रिटिश मालक असलेल्या कंपन्यांना ज्या जाचक बंधनांचा सामना करावा लागत असे ती बंधने रशियन कंपन्यांवर लादली जात नसत. रशियन कंपनीचा अर्थ इथे वरकरणी रशियन मालक असलेली संस्था असा घ्यायचा. अनेक ब्रिटिश गुंतवणूकी मग रशियन नागरिकांमार्फत केल्या जात. या नामधारी रशियन कंपन्यांनी कमावलेल्या नफ्यात त्यांचा वाटा असे. रशियाच्या कररचनेमुळे या मार्गाने तरीही ब्रिटिशांना अधिक नफा मिळे. गॅविन यांनीही कोणा रशियनामार्फत गुंतवणूक केली असावी.

हा रशियन कोण असू शकेल? नव्या कायद्यानुसार या रशियनाची गॅविनना गरज नव्हती. त्याने मॅनोरमधील कोणाशी संधान बांधले असेल? पण कोणाशी? त्या विचित्र मृत्युपत्रानुसार ते मेल्याचा कोणालाच विशेष फायदा नव्हता. कोणाच्याच डोक्यावर कसले कर्ज झाल्याचे ऐकिवात नव्हते. उलट बर्टीसाठी तर गॅविनचा मृत्यु अतिशयच वाईट बातमी होती. त्यांना मारण्याची इतकी घाई कोणाला का झाली असेल? ख्रिस मॅनोरमधल्या रहिवाश्यांच्या उंचीचा चार्ट बघत होता. गॅविन व पीटर साडेपाच फूट उंच होते. गॅरेथ व विल्यम पाच फूट आठ इंच. बर्टी व आल्बस पाच फूट दहा इंच. आयरीन पाच फूट चार इंच. ग्रेटा पाच फूट २ इंच तर लिंडा पाच फूट. विजय एकटाच सहा फूट उंच होता. या उंचीचे कोडे त्याला सुटले होते पण मग ती व्यक्ती रशियन आहे किंवा तिचा रशियाशी संबंध आहे हे कसे सिद्ध करावे?

ख्रिस चिकन सँडविच व कॉफी घेऊन रशियन भाषेचे पुस्तक उघडून बसला. या प्रश्नाचे उत्तर मिळण्याचा एक मार्ग रशियन भाषा शिकण्यात होते. मुळाक्षरांचा धडा वाचता वाचता अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने समाधानाने ते पुस्तक मिटले आणि सँडविच-कॉफी संपवून तो लायब्ररीतून बाहेर पडला.

~*~*~*~*~*~

चौथी रात्र (कॅनहॅम्प्टन)

अ‍ॅलेक्सीने जॉनसोबत रात्री ग्रीन चॅपलला भेट दिली. आता पडझड झाली असली तरी चॅपलचा आकार कळून येण्याइतपत भिंती शाबूत होत्या. दगडी टेबलांच्या दोन रांगा. समोर एक अर्धवर्तुळाकार चबुतरा. चबुतर्‍यावर एक टेबल. याच टेबलवर सर गॅविन सापडले होते. साधारण वीसजण मावू शकतील एवढाच आकार. छत बरेचसे शाबूत असले तरी मध्ये मध्ये भोकं पडली होती. या भोकांमधून वेलींचे जाळे तयार झाले होते. किंबहुना या वेलींनीच त्या जुन्या भिंतींचा भार तोलला होता. याला अपवाद म्हणजे गाभारा. गाभारा म्हणजे चबुतर्‍यामागची भिंतच काय ती शिल्लक होती. गाभारा मोकळा होता. तिथे कोणतेही दैवी चिन्ह नव्हते पण कधीकाळी तिथे क्रॉस असावा. भिंत अजूनही सुस्थितीत होती. तिथे वेलींचे अतिक्रमण झालेले दिसत नव्हते. अ‍ॅलेक्सीच्या नजरेतून ही बाब सुटणे शक्य नव्हते. हा गाभार्‍याच्या सुस्थितीचा चमत्कार नक्कीच मानवनिर्मित होता.

भिंत ठोठावून बघता ती पोकळ असल्याचा भास झाला. या गाभार्‍यात काहीतरी गुपित नक्की होते. भिंत फोडावी का? तेवढ्यात जॉनला एक कल्पना सुचली. पूर्वी जिथे क्रॉस असावा त्या ठिकाणच्या विटा काहीशा वेगळ्या रंगाच्या होत्या. कदाचित हे जाणूनबुजून केले असेल. त्या विटांचे बारकाईने निरीक्षण करताच त्या ढिल्या असल्याचे लक्षात आले. त्या हटवताच तिथे दोन व्यक्ती मावतील अशा अरुंद खोलीचे दर्शन घडले. खोली कसली तिजोरीच ती! बरीचशी कागदपत्रे, परदेशी चलने आणि इतरही काही मौल्यवान वस्तु तिथे होत्या. अ‍ॅलेक्सीने खुशीत शीळ वाजवली. आता ख्रिस परत येण्याची वाट बघायची.

~*~*~*~*~*~

पाचवा दिवस

"वेल डन अ‍ॅलेक्सी! वी हॅव ऑलमोस्ट गॉट इट!" ख्रिस, अ‍ॅलेक्सी, व जॉन स्टेशन जवळच्या खानावळीत होते. ख्रिस पहिल्या गाडीने परत आला होता.
"थँक यू, सर. पण ..."
"तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे उद्यापर्यंत मिळालेली असतील अ‍ॅलेक्सी. आता आपल्याला दोन कामे करायची आहेत. आणि त्यातील एका कामासाठी जॉन तुझी आवश्यकता आहे."
"सर्टनली, सर."
"मॅनोरची पुन्हा एकदा तपासणी करायची आहे. पण हा तपास रँडम नसेल...." ख्रिसने त्याला ठराविक सूचना दिल्या.
"अंडरस्टूड, सर."
"अ‍ॅलेक्सी आपल्याला केविन यांची गाठ घ्यायची आहे. आपल्याला आज रात्री त्यांची मदत लागेल."

*******

"काय?" मॅनोरमधल्या बहुतेकांचा आ वासला होता. ख्रिसने मात्र जराही विचलित न होता बोलणे सुरु ठेवले.
"हो. आमचा तपास पूर्ण झाला आहे. विजयची निर्दोष सुटका होऊ शकेल असे पुरावे आम्ही गोळा करू शकलेलो नाही. नाईलाजाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गॅरेथ पुढील कारवाईसाठी सर मॅक्सवेल यांच्या कार्यालयात संपर्क साधशील. विजयच्या वतीने सर्व न्यायालयीन औपचारिक बाबी ते पूर्ण करतील."
आपल्या मित्राविषयी वाईट बातमी ऐकून विल्यमचा चेहरा उतरला होता. पण गॅरेथच्या विरोधात उघड उघड बोलणे त्याला परवडण्याजोगे नव्हते. कालच त्याचे व गॅरेथचे बोलणे झाले होते. लंडनमध्ये व्यवसाय उभारण्यास व स्थिर-स्थावर होईपर्यंत गॅरेथ त्याला सर्वतोपरी मदत करणार होता. त्या बदल्यात भारतातील सर्व सूत्रे त्याने गॅरेथच्या हाती द्यायची होती. गॅरेथच्या चेहर्‍यावरून त्याला काय वाटले हे सांगणे कठीण होते. पण आपल्या वडलांच्या खुन्याला शिक्षा व्हावी यासाठी तो आकाशपाताळ एक करेल यात ख्रिसला शंका नव्हती. बाकी सर्व शॉकमध्ये होते.

"बाय द वे, मी तपासाच्या संदर्भात वकीलांना भेटून आलो."
"का?" गॅरेथचा सूर बदलला.
"अर्थातच मृत्युपत्र पाहायला. गुन्ह्यामागील हेतु कळायला त्याची मदत झाली असती."
"मग? काय आहे त्या मृत्युपत्रात?" आयरीनच्या सुरात काहीशी अधीरता होती.
"आयरीन!" गॅरेथने आवाज उंचावला. "उद्या तसेही अधिकृत वाचन होणारच आहे. उद्यापर्यंत थांबूयात नाही का?"
"ओह आय डोन्ट माईंड!" ख्रिसने खांदे झटकले.
"प्लीज, सर. कम ऑन गॅरेथ, जे काही ख्रिस सांगेल त्यावर उद्या शिक्कामोर्तब होईलच. नुसतं ऐकून घ्यायला काय हरकत आहे."
गॅरेथला हा प्रकार बिलकुल नापसंत होता. "सर काल्डवेल, तुम्ही तपासात कुचराई केलेली मला आढळलेली नाही. त्यामुळे तुमचे ऋण स्मरुन मी हे खपवून घेणार आहे. पण तुम्ही जे काही सांगाल, त्यावर मी विश्वास ठेवणार नाही. माझा विश्वास केवळ वकिलांवरच आहे."
"ऑफ कोर्स, मी असे म्हणतही नाही की माझ्यावर विश्वास ठेवा. पण मृत्युपत्रानुसार तुमच्यापैकी कोणाला जर गॅविनच्या मृत्युचा फायदा होणार असेल तर ते केवळ तुम्ही आहात गॅरेथ."
"सर काल्डवेल! तुम्ही काय सुचवता आहात तुम्हाला कळतंय का?" गॅरेथ शक्य तितक्या सौम्य स्वरात बोलला.
"अर्थात. आणि म्हणून तर मी विजय हा एकमेव संशयित पक्का केला. तुमच्या हातात तशीही सर्व सूत्रे आहेतच, त्यामुळे गॅविनना मारून तुम्हाला काही फारसा लाभ होणार नाही."
"हँग ऑन!" पीटर संभाषणात उतरत म्हणाला.
"व्हॉट डू यू मीन की गॅविनच्या मृत्युचा फायदा केवळ गॅरेथला होणार आहे?"
"आता कायदेशीर भाषेत तुम्ही उद्या सर्वकाही ऐकालच. पण साध्या शब्दांत सांगायचे तर सगळी संपत्ती व इस्टेट गॅरेथच्या नावे आहे. विल्यमला अर्थातच भारतात सरकारी पद मिळेल पण इंग्लंडात त्याच्यासाठी काही नाही. पीटर तुझा आश्रय थांबवला जाणार आहे. त्यामुळे तुला या गुन्ह्यामुळे तोटाच झाला आहे."
"एक सेकंद, सर्व काही गॅरेथला?" आयरीनच्या चेहर्‍यावर अविश्वास स्पष्ट होता.
"हो. सॉरी लेडी आयरीन. पण तुमचा वाटा मिळण्याची अट अशी होती की मृत्युपत्राचे अधिकृत वाचन होते समयी तुमचे लग्न झालेले असले पाहिजे. आता उद्यापर्यंत तुमचे लग्न झाले तर तुम्हाला काही हिस्सा मिळेल पण रातोरात तुम्ही कोणाशी लग्न करणार?"
"ओह, आय सी." आयरीन पुटपुटली.
"उर्वरितांना तसाही काही फायदा नाही. भावी सर गॅरेथ तुमच्या नोकर्‍या काढून घेणार नसतीलच (गॅरेथने होकारार्थी मान डोलावली). तस्मात् विजयनेच काहीतरी वादाचे फलस्वरुप खून केला असावा. त्याचे डिटेल्स काढून घेणे फारसे कठीण काम नाही. ओह, आणखी एक! मृत्युपत्रानुसार ग्रीन चॅपल जमीनदोस्त करण्याचे सर्वाधिकार गॅरेथला दिले आहेत."
"फायनली!" गॅरेथ उत्स्फूर्तपणे उद्गारला. त्याचा चेहरा आता उजळला होता. अखेर त्याला अपेक्षित असलेला विश्वास गॅविनने दाखवला होता.
"तरी आम्हा दोघांना तुम्ही रजा द्यावी. उद्या दुपारी बहुधा वकील येतील. दुपारच्या दफनविधीनंतर संध्याकाळी वाचन होईल तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईलच."

*******

जॉनने सूर्य मावळण्याआधी ख्रिसची भेट घेतली. त्याचा अहवाल ऐकून ख्रिसने समाधानाने मान डोलावली. ख्रिस व अ‍ॅलेक्सीने संध्याकाळी मॅनोर सोडला. केविन व विजयची भेट झाली. विजय त्याच दिवशी लंडनला रवाना झाला. केविनच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ख्रिसने दिली होती. त्यांनी संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले. सापळा तयार होता. आता रात्रीची वाट पाहायची.

~*~*~*~*~*~

(पुढील भागात समाप्त)

---------------------------

वाचकांकरिता

या भागात एक्स्ट्रा फीचर नसेल. ख्रिस वाचत असलेले रशियन पुस्तक तर मी दाखवू शकत नाही पण कुतुहल शमवण्याकरता पुढील दुव्यावर टिचकी मारा.

http://esl.fis.edu/grammar/langdiff/russian.htm

पुढील भागात ख्रिस या रहस्याची उकल करेल. पुढील भाग आणखी तीन-चार दिवसांत यावा, कदाचित आधीही येईल. मी रहस्याची उकल करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपलब्ध माहितीच्या मदतीने चांगला अंदाज बांधणे अशक्यप्राय खचितच नाही. जर अंदाज चांगला असेल तर त्यास आवश्यक तो पुरावा जॉन गोळा करेलच. एक मात्र नक्की की ख्रिसने तर्क व अनुमान वगळता इतर कशाचा वापर केलेला नाही आणि त्याला उपलब्ध असलेली सर्व माहिती तुम्हालाही उपलब्ध आहे.

---------------------------

अंतिम भाग - https://www.maayboli.com/node/77905

Group content visibility: 
Use group defaults

गॅविनना घरात ठार मारून मग मनोर्यात त्यांचा शिरच्छेद केला गेला होता का हा प्रश्न डोक्यात आलाय. मनोर्‍याच्या घड्याळाबद्दल ग्रेटाने सांगितलेलं ऐकून आता वाटतंय की घडयाळ चुकीची वेळ दाखवत होतं असा आभास निर्माण करायला गॅविनचं घड्याळ गायब केलंय. पण मग सहापेक्षा जास्त टोले पडण्यामागचा काय अर्थ? पीटर शस्त्रास्त्रांच्या खोलीतून अ‍ॅलेक्सीला बाहेर काढायला का बघतोय? तो जामानिमा ग्रीन नाईट दिसल्यावर जी बोंबाबोंब झाली त्या काळात हलवला असावा असं दिसतंय. मग लिंडाला खरंच तो दिसला? का तिने उगाच ओरडाआरडा केला? चॅपेलमधलं सामान बघता फ्रॉम रशिया विथ लव्ह कोणीतरी आलंय हे नक्की. पीटर असावा काय कारण त्याचेच उच्चार फॉरेन आहेत. पण तो थिंक ऐवजी सिंक म्हणतोय सो फ्रेंच असावा. सिमियन हे जुन्या मातबर फ्रेंच घराण्याचं नाव आहे असं गुगलवरून कळतंय.

रशियन मुळाक्षरांची टोटल लागली नाही. पण मी ती लिंक पूर्ण पाहिली नाहिये. आय होप त्यात काही क्लू नाही. Happy मृत्यूपत्राबद्दल आधी सांगणं म्हणजे गॅविनचा खून करून आपल्याला मृत्यूपत्रातून काही मिळेल अशी आशा असलेल्या खुन्याला उचकावणं आहे. आयरीनने गुपचूप लग्न केलं असावं असा मला लंडनच्या पी-सूप धुक्याइतकाच दाट संशय येतोय. चॅपेल जमीनदोस्त करण्याचा सर्वाधिकार गॅरेथला conditionally आहे सो ख्रिसने अर्धसत्य सांगितलंय. बहुतेक ते सामान घ्ययला कोण येतंय ते लपून पहाणार असतील.

शेवटच्या भागात सरबताची रेसिपी मिळेल अशी आशा आहे. Happy भाग नेहमीप्रमाणेच झक्कास. पुढचा भाग शेवटचा Sad

पीटर असावा काय कारण त्याचेच उच्चार फॉरेन आहेत. पण तो थिंक ऐवजी सिंक म्हणतोय सो फ्रेंच असावा. सिमियन हे जुन्या मातबर फ्रेंच घराण्याचं नाव आहे असं गुगलवरून कळतंय.<<<<
सेम सेम! असाच विचार मीही केला. कारण तो आधीही पंझराव्या शतकात, सँक यू.. म्हणतो. आता उच्चार फार बदलणं शक्य नसल्याने त्याने जिव्हाजडपणाचे कारण पुढे केलेय.

लिंडाने 'ग्रीन नाईट पाहून किंचाळी फोडली' हाही भाग शंकास्पद वाटतो. रात्री कुणीतरी उठले तर?, खिडकीतून पाहिले तर? असा विचार करून अगदी इलॅबोरेट गेटअप करून खुनी त्या अवजड चिलखतात वावरेल हे जरा शंकास्पद वाटते. मग लिंडाचे किंचाळणे हे decoy असावे का?

मूळ ग्रीन नाईटच्या कथेत गवेन आणि तो सरदार दिवसभरात जे मिळेल ते एकमेकांना देण्याचा करार करतात, पण गवेन तो ग्रीन स्कार्फ देत नाही परिणामस्वरूप ग्रीन नाईट त्याच्या मानेवर तिसऱ्या वाराला बारीक जखम करतो. तद्वतच, गॅविनने कुणाशीतरी केलेल्या व्यवहारात प्रामाणिकपणा राखला नसावा म्हणून त्याला ग्रीन नाईटच्या दंतकथेनुसार 'शिक्षा' दिली गेली असावी.

<< पण तो थिंक ऐवजी सिंक म्हणतोय सो फ्रेंच असावा.

खरंतर जर्मन्स असा उच्चार करतात. फ्रेंचांबद्दल कल्पना नाही.

अरेच्चा एवढ्या लवकर संपणार कथा?? : अओ:

पीटर आणि आयरीनचं गुपचूप लग्न झालेलं असेल आणि त्या दोघांनी मिळूनच गॅविनला मारले असणार. Happy

मलाही आयरिन व पीटरवर संशय आहे. ती 15 मिनिटे एकटी ग्रेट हॉलमध्ये होती. त्या वेळेत हातपाय बांधलेल्या सर गॅविनना बाहेर नेऊन घड्याळघरात ठेवणे व नंतर चॅपेलमध्ये ठेवणे शक्य आहे. पण या सगळ्यात खूप रिस्क आहे.

चॅपेलमध्ये जर गुप्त खोली असेल तर प्रेत असे तिथे ठेवणे रिस्की आहे. अतिउत्साही पोलीसाने क्रॉसमागे जाऊन बघितले तर भांडे फुटू शकते. पीटर चॅपेलमध्ये नेहमी जात असेल तर त्याला हे माहीत असणार. तो अशी रिस्क का घेईल. ज्या प्रकारे बर्टीला 6 महिन्यात घालवून द्यायचे लिहिले त्यावरून तो रशियन धंद्याशी संबंधित असावा असे वाटते.

स्वतःच्या मृत्युनंतर सगळ्याच नोकरांची हकालपट्टी करून सर गविन गॅरेथ व इतरांची चांगलीच गोची करणार Happy Happy

मग लिंडाचे किंचाळणे हे decoy असावे का?>>

असू शकते. घरातील मंडळी दूर जावीत व गविनना मनोरबाहेर काढता यावे यासाठी हे केले असावे. तिला कोणी ग्रीन नाईट दिसलाच नसावा.

पण मग रोबर्टला जो ग्रीन नाईट कधीतरी दिसलेला तो कोण? की सर गविन ग्रीन नाईट बनून भटकत असायचे?

इंग्लंडातली संपत्ती बव्हंशी गॅरेथला दिली तरी आधी विल्यम जास्त लाडका मुलगा असल्याचा उल्लेख आला आहे, त्यामुळे गविनना भरपूर जास्त संपत्ती रशियन व्यवहारातून मिळत असणार. विल्यमला चॅपेलची देखभाल देण्याचे कारण हेच असावे. त्याकामी त्याला पीटर मदत करेल, हाही मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे. रशियन धोरण बदलाची बातमी गविनपर्यंत पोचलीच नव्हती त्यामुळे विल्यमला अशा प्रकारे जास्त संपत्ती मिळेल हा त्यांचा विचार असणे सयुक्तिक वाटते. पीटरचा ह्या व्यवहारात सहभाग नक्कीच आहे. कारण घराण्याचा आणि चॅपेलचा इतिहास शोधण्याच्या कामावर नेमले, ही फारच लंगडी सबब आहे. घराणे होसबोर्गांचे आणि गविन काही होसबोर्ग नव्हते, त्यांना कशाला घराण्याचा इतिहास शोधायच्या उठाठेवी करण्यात रस असणार?

ग्रेटाला ऐकू आलेले सहापेक्षा जास्त टोले खरे असावेत. आदल्या दिवशीच्या क्लॉक टॉवरमधल्या घडामोडींमुळे घड्याळ जवळपास तासभर पुढे गेले असावे. त्यामुळे ती उठली सहाच्या आसपासच पण टोले मात्र तिने सात वगैरे ऐकले असावेत. दुसऱ्या दिवशी ग्रँटची नियोजित फेरी असणार घड्याळ तपासणीसाठी. त्यामुळे खून त्याच दिवशी का झाला याची संगती लागते. कुणाच्याही लक्षात न येता घड्याळ पूर्ववत करता येईल. पहिल्यांदा जेव्हा घड्याळ खरोखर बिघडले होते असे ग्रेटा म्हणते तेव्हा ट्रायल घेतली गेली असावी. शिवाय घड्याळ पुढे गेल्याने तितकासा प्रॉब्लेम होत नाही कारण माणूस घड्याळाला अनुसरून नियोजित ठिकाणी आधीच पोहोचतो. शिवाय ज्यादिवशी घड्याळ पुढे गेले तो सुटीचा वार असू शकतो, ज्यामुळे लोकांना 'कामावर जायला.... उशीर झायला..' Proud वगैरे चिंता न करता घड्याळाकडे थोडे दुर्लक्ष करणे शक्य असावे.

या सगळ्या प्रकरणात आल्बस आणि ग्रेटा यापैकी एक वा दोघांचा निश्चित सहभाग आहे. आयरीनने लपूनछपून लग्न केले असावे आणि त्या प्रकरणी तिला या जोडगोळीची साथ असावी, असे वाटते. आल्बसच्या दगडी चेहऱ्याच्या बटलरच्या अंतरंगात थोडा ओलावा ग्रेटामुळे शिल्लक आहे, हे आधी येऊन गेले आहे. आयरीनने निवडलेल्या जोडीदारामुळे गविनची खप्पामर्जी होईल आणि तिच्या आईच्या वाट्याला आलेले दुःख तिच्याही वाट्याला येईल, ह्या जाणिवेने आल्बस / ग्रेटा वा दोघेही तिच्या मदतिला सज्ज झाले असतील.

नाही, बायकांपैकी कुणी खुनी नसावे कारण हत्याराच्या एकाच वारात शिरच्छेद करणे त्यांना शक्य होईल असे वाटत नाही.

अधिक विचार करता लिंडाला कुणीतरी नक्की दिसलं. कुणीतरी जागं होऊन बघितल्यास ग्रीन नाईट दिसावा यासाठी ही तयारी केलेली असावी. ख्रिसप्रमाणेच रशियन अल्फाबेट मी पण पाहिले, त्यात एक क्लु मिळाल्यासारखे वाटतेय.

गॅविन यांचा पिंड कलाकाराचा असावा. गशेलच्या टीसेटवरून त्यांची अभिरुची उत्तम असावी. पण मग अ‍ॅनाची हकीगत? असा माणूस तरल मनाचा असू शकेल?<<<<<
तिथे असलेला कलात्मक गोष्टींचा संग्रह मुळात लेडी अलीना व होसबोर्गांचा असावा. नंतर त्याचा सांभाळ वा त्यात भर घालणे हे आयरीनने केले असावे/वेळोवेळी करत असावी. आयरीनला काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टीत करियर करण्यात रस होता, हे आधी येऊन गेले आहे. गॅविन हे निव्वळ व्यापारी स्किल असलेले गृहस्थ असावेत. पीटर + आयरीन गुपचूप लग्न झालेले असणे हेही मला शक्य वाटतेय. तो गशेल टीसेट ही पीटरची आयरीनला भेट असावी. पीटर गॅविनसोबत रशियन व्यवहारात काम करताना, पीटर व आयरीनला ही रिलेशनशिप यथावकाश गॅविनपुढे उघड करायची असावी. पीटरवर रशियन व्यापारासाठी सर गविनचे अवलंबित्व लक्षात घेता त्यांना लग्नाची परवानगी मिळुही शकली असती, परंतु रशियाची धोरणे बदलणार असल्याने सर गविनला पीटरला हाकलून देणे सहज शक्य झाले असते. म्हणून त्यांचा काटा काढणे गरजेचे झाले.

पायस, फारच रंजक कथा व तपशील! उपलब्ध माहितीवरून वेगवेगळे अंदाज बांधायला मजा येते आहे. अशा रंजक कोड्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. Happy

मूळ ग्रीन नाईटच्या कथेत गवेन आणि तो सरदार दिवसभरात जे मिळेल ते एकमेकांना देण्याचा करार करतात, पण गवेन तो ग्रीन स्कार्फ देत नाही परिणामस्वरूप ग्रीन नाईट त्याच्या मानेवर तिसऱ्या वाराला बारीक जखम करतो. ... ही कथा कुठे वाचली श्रद्धा?
पीटर हे नावही रशियन आहे ना?
Happy रशियाची बदलती धोरणे फारच महत्वपूर्ण रोल निभावताहेत असं दिसतं......

माझ्या अंदाजा नुसार - बर्टी आणि पीटर ने मिळून खून केला. बर्टी उंच होता. त्याने कबंध घोडेस्वाराचे रुप घेतले (चिलखत डोक्यावरुन ओढून घेतले व शिरस्त्राण हातात धरले...डोकं दिसायला), आणि लिंडा व इतरांचे लक्ष विचलीत केले.....सगळे बाहेर धावल्यावर बर्टी आत आला व त्याने गवेन यांचा शिरच्छेद केला... व आत्ताच उठल्याचे या सगळ्यांना भासविले. पीटर दुसर्‍या दिवशी सकाळी खुर्चीत गवेन यांचे सोंग घेऊन मान खाली घालून बसला होता... जेव्हा की मृतदेह ऑलरेडी मनोर्‍यात हलविला होता.............

पीटर चा खुनात सहभाग सिद्ध करण्यास आणखी एक मुद्दा आहे. पीटर आणि सर गॅविन यांची उंची सारखी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी जो भास निर्माण केला तेव्हा ती व्यक्ती पीटर असू शकते. तसेच चॅपेल ची माहिती पीटर ला जास्त असल्याने त्या गुप्त तिजोरी आणि त्यातील कागदपत्रे याची माहिती पीटर ला असणारच. त्या संदर्भात काही मतभेद असल्यास हा खून केला जाऊ शकतो.

तसेच बर्टीचा यामध्ये सहभाग असण्याचीही शक्यता आहे. कारण आदल्या रात्री जेव्हा ग्रीन नाईट दिसला तेव्हा सर्व बाहेर पडल्या नंतर बर्टी बाहेर आला होता. बर्टीची उंची पाच फूट दहा इंच असल्याने आणि त्याची खोली बाहेर च्या बाजूला असल्याने तो ग्रीन नाईट चा भास निर्माण करणे त्याला शक्य आहे. त्याच्याकडे पागेच्या किल्ल्याही असतात. त्यामुळे घोडा वापरणे त्याला सोपे जाईल. सर गॅविन च्या मृत्युपत्रात त्याला महिनाभरात कामावरून काढून टाकण्याची सूचना आहे. याचा काहीतरी संबंध असावा. आदल्या दिवशी जेव्हा सर्व जेवण करत असताना सर गॅविन तिथे नसतात. आणि बर्टी सांगतो कि ते लायब्ररीत कामात असून त्यांनी जेवणही तेथेच मागवले आहे. एक शक्यता आहे कि जेवणा पूर्वीच गॅविन यांना बांधून ठेवले असावे आणि त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला असावा जो काढण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दातात धागे अडकले. हा प्रयत्न खूप जोरदार असावा कारण त्यांचे दात हालत होते. तसेच बर्टीचे नाईफ स्किल दुलर्क्षित करता येणार नाही.

रशियाची बदलती धोरणे फारच महत्वपूर्ण रोल निभावताहेत असं दिसतं......<<<<<
'आंबट गोड, आता रशयेची मजा बगा फुडल्या एपिसोडात. आता याफुडं विजयला सोडवन्याचा एकच उपाय -'
'कोणता?'
'तीच तर मज्जा हाय. हां, तुमी विकिपीडियावर ग्रीन नाईटची गोष्ट वाचा. बाकी ह्या ग्रेटाचा न् माजा मत्त बराब्बर जमता...'
- दत्तोबा कदम, बेनसन जानसन कंपनी Proud

>>दत्तोबा कदम, बेनसन जानसन कंपनी

Proud श्रध्दा अचूक ग

कोणीतरी जागे होईल म्हणून ग्रीन नाईटच्या वेषात उभे रहाणे मला तरी संयुक्तिक वाटत नाही. कोणी जागं झालं नाही तर पोपट होणार की. लिंडाला काही दिसलंच नसावं असा माझा तर्क आहे. रशियन कनेक्शन लिंडाच्या माहेराहूनही असू शकतं. गॅविनच्या मृत्यूपत्रातून आपल्याला घबाड मिळणार असं ज्याला/ जिला वाटतंय तो / ती खुनी. मी ती म्हणतेय कारण बायका काहीही करू शकतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे Proud कोणीतरी छुपा होस्बोर्गसुध्दा असू शकतो ज्यामुळे आयरिन ही शेवटची होस्बोर्ग ठरणार नाही. आयरिन-पीटर जोडी असू शकते. पण आयरिन-बर्टीसुध्दा अशक्य नाही. बर्टी एकटा जीव नसेलही Proud

बाकी जो खुनी नाही असं आपल्याला ठाम वाटत असतं तोच खुनी निघतो ह्या प्राचीन फॉर्म्युलाला स्मरून गॅरेथ खुनी असू शकतो.

गॅविनला घरात बांधले अथवा मारले गेलेले नाही. नाहीतर कुठेतरी तसा धागादोरा सापडला असता. माझ्या मते गॅविन स्वतःहून रात्री सामसूम झाल्यावर बाहेर पडले.
बर्टी ते लायब्ररीत आहेत असे सांगतो आणि नंतर त्यांच्यासाठी जेवण लायब्ररीत घेऊन जातो यावेळेस त्याने एकट्याने गॅविन यांचे हातपाय बांधलेले असणे कठीण आहे कारण सर गविन त्या वयातही उत्तम प्रकृती राखून होते हा उल्लेख पहिल्याच प्रकरणात आला आहे.(विजय त्यांच्याशी हस्तांदोलन करतो तो प्रसंग!) शिवाय घरात लोक जागेच होते. झटापटीचा आवाज बाहेर गेलाच असता. घरात नक्कीच अजून एखादा चोरदरवाजा असावा, असे मला वाटतेय. बहुधा लायब्ररीतून. 'कुणाच्याही लक्षात न येता तो ग्रीन नाईटचा जामानिमा बाहेर गेला कसा?' ही अलेक्सीची शंका! ख्रिसने विलसंदर्भातला बॉम्ब फोडल्यावर चॅपेलमध्ये जाऊ इच्छिणारी व्यक्ती मॅनोरमधून बाहेर पडायला त्या वाटेचाच वापर करणार.

आल्बस आणि ग्रेटाचा यात काहीच सहभाग नाही हे मला अशक्य वाटते कारण घर लॉक करणारे/उघडणारे, सगळ्यांत आधी उठणारे, किल्ल्या बाळगणारे तेच दोघे आहेत. बर्टी हा पीटरचा मित्र होता व ते एकत्र बरेचदा ड्रिंक करत. शिवाय त्या रशियन बिझनेसच्या संदर्भाने काही छोटीमोठी कामे तो करत असावा. नंतर त्याच्याकडून त्या बिझनेसचे रहस्य चुकून उघड व्हायला नको म्हणून त्याला महिन्याभरात कामावरून कमी करण्याची तरतूद गविन यांनी केली असावी.

बाकी बर्टीची लीक चिरायची पद्धत हा मला रेड हेरिंग वाटतोय.

बाकी जो खुनी नाही असं आपल्याला ठाम वाटत असतं तोच खुनी निघतो ह्या प्राचीन फॉर्म्युलाला स्मरून गॅरेथ खुनी असू शकतो.<<<<< Lol असं बरेचदा असतं खरं. पण तरीही ठामपणे असं वाटत नाही.

लिंडा माहेरची रशियन वगैरे देखील शक्यता कमी वाटतेय कारण आपल्यासमोरच्या सगळ्या डेटामध्ये तिच्या माहेरच्या फॅमिलिबद्दल काही तपशील नाहीत.

ज्याला मृत्युपत्रातून आपल्याला सगळ्यांत जास्त फायदा होईल असे वाटते तो खुनी असा तर्क बरोबर आहे पण कुणावर काही कर्ज वगैरे दिसत नसताना, कुणी आर्थिक अडचणीत नसताना विलमध्ये नक्की काय तपशील आहे ते माहीत नसताना घाईघाईने सर गविन यांना संपवण्याचे काय कारण?

ग्रँटची त्यादिवशी व्हिजिट होती घड्याळ मेंटेनन्स साठी याबद्दलचा उल्लेख.
<<<<<<<<
"होय सर. इतर घड्याळांप्रमाणेच या घड्याळालाही नियमित तेलपाणी करावे लागते. त्याची वेळ मागे-पुढे झाली नाही ना हे बघावे लागते. यासाठी एक घड्याळजी महिन्या-दोन महिन्यातून एकदा चक्कर मारतोच. आमच्या घड्याळजीचे नाव आहे ग्रँट मॉरिसन. आज ग्रँटची नियोजित भेट होती. तरी तो काही दुरुस्ती करत आहे."

पायस, फारच रंजक कथा व तपशील! उपलब्ध माहितीवरून वेगवेगळे अंदाज बांधायला मजा येते आहे. अशा रंजक कोड्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. >>>

अनुमोदन
मला तर बांधलेले अंदाज वाचायलाही मजा येत्ये आहे.

पायस, फारच रंजक कथा व तपशील! उपलब्ध माहितीवरून वेगवेगळे अंदाज बांधायला मजा येते आहे. अशा रंजक कोड्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. >>> अनुमोदन ^ २

घड्याळाच्या आतल्या जागेचे वर्णन बघता, खून तिथेच झाला असावा असं वाटतंय, घड्याळाच्या पार्टस चा आकार बघता मर्डर वेपन ही तेच असावं. तिथली यंत्रणा आणि एका झटक्यात शिरच्छेद हे पण जमू शकेल असं दिसतंय. आल्बस कडे यासाठी लागणारे तकनीकी ज्ञान असू शकते (कारण - जहाजाचे कप्तान व्हायचं होतं असा उल्लेख).
पण त्या ठिकाणी गॅविन स्वतः हुन का जातील हे कोडं आहे. त्याशिवाय घरातल्या रात्रीच्या घडामोडी आणि याचा संबंध जुळत नाहीये.

आल्बस कडे यासाठी लागणारे तकनीकी ज्ञान असू शकते (कारण - जहाजाचे कप्तान व्हायचं होतं असा उल्लेख).>>>>

जहाजाचे कप्तान याचा अर्थ होसबोर्ग प्रॉपर्टी त्याला सांभाळायची होती किंवा गविन आल्यानंतरही आपल्या हातात सूत्रे असावीत असे त्याला वाटत होते असा मला अर्थ लागला. तो, आना, ग्रेगरी हे सगळे स्थानिक व एकमेकांशी पूर्वीपासून परिचित होते. सगळे एकत्र फिरायला जात असा उल्लेख आहे. लेडी अलिना फ्रेंडली होती यांच्यासोबत त्यामुळे आल्बसच्या मनात काही महत्वाकांक्षा निर्माण झाली असावी.

चॅपल, घड्यालघर - खून कुठेही झाला तरी डोके पूर्ण उडवल्यामुळे रक्तपात होणार. पण याचा उल्लेख कुठे नाही.

पण त्या ठिकाणी गॅविन स्वतः हुन का जातील हे कोडं आहे. >> गॅविन यांना आधी बांधून मग तिथे नेले असावे.
चॅपल, घड्यालघर - खून कुठेही झाला तरी डोके पूर्ण उडवल्यामुळे रक्तपात होणार. पण याचा उल्लेख कुठे नाही. >> हे मलाही खटकले. तलवारी वरील रक्त पुसले असण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. परंतू जमिनीवरील रक्ताचा उल्लेख कुठेही नाही.

चॅपल, घड्यालघर - खून कुठेही झाला तरी डोके पूर्ण उडवल्यामुळे रक्तपात होणार. पण याचा उल्लेख कुठे नाही.<<<<
हो ह्यावर मी पण विचार करतेय. एक म्हणजे त्या गवताच्या पेंढ्यावर निजवून डोके उडवले आणि रक्ताने माखलेले गवत नष्ट केले (जाळून टाकले वगैरे) आणि ती जागा अंधारी असल्याने तिथे आसपास काही रक्त उडालेही असेल तर सहजी दिसणार नाही.

दुसरे म्हणजे आधी दुसऱ्या पद्धतिने खून करून मग डोके उडवले तर रक्तपात होणार नाही.
------ माझी नाही हो विचार करण्याची क्रूर पद्धत. Uhoh सिमीलर प्रकारचे रिझनिंग कुठल्याशा सिरीज मध्ये होते. बहुधा मेंटलिस्ट.------

तो कडबा साचून साचून त्याचे ठोकळे तयार झाले होते. कदाचित मुद्दामून केलेही असतील. ....... ह्या वरुन वाटतं की रक्त उडले पण साफ केले गेले..... म्हणजे खून मनोर्‍यात झाला का?

आणि श्रद्धा.. Biggrin दुसरे म्हणजे आधी दुसऱ्या पद्धतिने खून करून मग डोके उडवले तर रक्तपात होणार नाही.
किती क्रूर ती विचार करण्याची पद्धत!!!

घड्यालघरात गवताचा वापर करून रक्ताचे डाग लपवणे शक्य आहे. लिंडा ज्या आवाजाने उठली तो आवाज देखील पूर्वेकडून आलाय. घड्याळघर, मनोर पासून पूर्वेलाच आहे. आणि नंतर ग्रीन नाईट देखील घड्याळघरापाशीच दिसला आहे.

>>दुसरे म्हणजे आधी दुसऱ्या पद्धतिने खून करून मग डोके उडवले तर रक्तपात होणार नाही.

हो मलाही तसंच वाटतंय. लिंडाला दिसलेल्या ग्रीन नाईटच्या हातात त्याचं नसून गॅविनचं डोकं असेल का?

>>जहाजाचे कप्तान याचा अर्थ होसबोर्ग प्रॉपर्टी त्याला सांभाळायची होती किंवा गविन आल्यानंतरही आपल्या हातात सूत्रे असावीत असे त्याला वाटत होते असा मला अर्थ लागला.

ओह....मी ती ओळ शब्दशः घेतली. कारण त्यात पुढे त्याला निर्यात करायचा व्यवसाय सुरू करायचा होता असा उल्लेख आहे.
रॉबर्टने पीटरचा उल्लेख 'तोतरा' असा का केला? तो तर थोडं अस्पष्ट बोलतो, नाही का? रॉबर्टने त्याला चिलखत घातलेला घोडेस्वार दिसल्याचा उल्लेख केलाय. अर्थात डोक्यासकट. तो केसचा तपास भलतीकडे न्यायचा प्रयत्न करत नसेल तर खरं बोलतोय. मग हा घोडेस्वार कोण? हा चॅपेलमध्ये रहाणारा कोणी छुपा रशियन असावा, कदाचित आयरिनचा नवरा असू शकेल.

लिंडाला दिसलेल्या ग्रीन नाईटच्या हातात त्याचं नसून गॅविनचं डोकं असेल का?<<<<
स्वप्ना, सेम विचार माझ्याही डोक्यात आला होता. कारण जो कोणी , ग्रीन नाईटच्या वेशात वावरत होता त्याचे ते डोके असणे शक्यच नाही. एकतर ते नुसते शिरस्त्राण असावे, अथवा शिरस्त्राण घातलेले गविनचे डोके!

बहुधा घड्याळाची संरचना अशी असावी की त्याच्या खिडकीतून काट्याच्या मार्गात गविनचे डोके येईल, असे त्याला बांधून ठेवता येईल. मग लिंडाला ऐकू आलेल्या कडाड आणि धप्प आवाजाची संगती लागते.

ग्रँटशी तपशीलात बोलायला हवे आहे कुणीतरी! Proud

पायस मनात म्हणत असेल की आता वाचकांचे गेस 'तुम्हीसुद्धा बनू शकता घरच्याघरी ख्रिस'च्या धर्तीवर चालले आहेत, त्याआधी कथा पूर्ण करावी. Lol

पायस मनात म्हणत असेल की आता वाचकांचे गेस 'तुम्हीसुद्धा बनू शकता घरच्याघरी ख्रिस'च्या धर्तीवर चालले आहेत, त्याआधी कथा पूर्ण करावी. Lol>>>>>>त्यासाठी का होईना पण कथा पूर्ण करा लवकर.

चला माझ्यातर्फे एक कयास. मी आधी लिहिलेल्या पोस्टमधल्याच गाळलेल्या जागा भरते,

गविनना रात्रीच घड्याळाच्या मनोर्‍यात बांधून ठेवले - कदाचित ओल्या गवताच्या ठोकळ्यात - ज्यामुळे ते रात्री थंडीनं बधीर झाले. मग त्यांचे डोके तिथेच कापले. त्यामुळे रक्त जास्त उडालं नाही. शस्त्र म्हणून घड्याळाच्या तासकाट्याचा अथवा मिनिट काट्याचा वापर केला गेला. हे काटे ऑलमोस्ट खंडा तलवारीसारखेच असतात. मग त्यांना घोड्यावर बसवून ग्रीन चॅपेलमध्ये नेले. गविनचे शीरविरहीत धड घोड्यावर बसवले असताना नेमके लिंडानं पाहिले.

Pages