कबंध घोडेस्वाराचे रहस्य : भाग ३

Submitted by पायस on 12 January, 2021 - 03:07

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77764

तिसरा दिवस

जेव्हा ख्रिस आणि अ‍ॅलेक्सी घड्याळाच्या खोलीत पोहोचले तेव्हा उजाडावयास जेमतेम सुरुवात झाली होती. पहाटेचा गारवा जाणवत होता. दोघांनी अंगावरची शाल घट्ट लपेटून घेतली होती. मनोर्‍यात बांधकाम असे फारसे नव्हतेच. मधोमध भला मोठा लंबक टांगलेला होता आणि त्याच्या सभोवताली यांत्रिक रचना होती. मध्ये एका कोनाड्यात एक छोटे घड्याळ होते. ते याचे सेटिंग क्लॉक. या घड्याळाचे काटे मोठ्या घड्याळाला जोडलेले होते. त्याच्या मदतीने वेळ बदलणे सुकर होते.
"पण जर वेळ बदलणे एवढे सोपे असेल तर त्या ग्रँटला बोलवायची काय गरज?"
"ग्रासहॉपर एस्केपमेंटमुळे, सर. आपण वेळ जरी रिसेट केली तरी एस्केपमेंटमधला मूलभूत बिघाड (गिअर/काटे/स्प्रिंगवर आलेला ताण) दुरुस्त होईपर्यंत घड्याळ पुन्हा पुन्हा पुढे सरकत राहील. त्यामुळे दररोज घड्याळ रिसेट करत राहावे लागेल. त्यासाठी ग्रँटला बोलावणे भाग होते, सर."
ख्रिसची मुद्रा मिनिटभर विचारमग्न होती. यानंतर काही क्षण उजवा हात हनुवटीवर ठेवून त्याने तर्जनीने डावा गाल खाजवला. जणू काही कोडे सुटल्यासारखे त्याच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरले. त्याने अ‍ॅलेक्सीला घड्याळाच्या मुख्य खोलीत नेण्यास सुचवले.
"इथे सर. तुम्ही बघू शकता आपल्या चारही बाजूंना घड्याळाची डायल्स आहेत. डायल्सच्या खिडक्या आतल्या बाजूने उघडतात. मग आपण काट्यांना हात लावू शकतो. आपल्या डोक्यावरती घुमटवजा मोकळी जागा आहे जिच्यात घंटा बसवली आहे. मी सोबत कापूस ठेवला आहे पण अजून पाऊण तास तरी टोले पडणार नाहीत."
"दॅट इज थॉटफुल ऑफ यू अ‍ॅलेक्सी!"
"थँक यू, सर."
"तू म्हणालास ते बरोबरच होते. ही जागा दमट, थंड आणि अंधारी आहे. तसेच इथे बरीच यांत्रिक रचना आहे. इथे तीन फुटी तलवारीने यंत्रांना धक्का न लागू देता लढणे जवळपास अशक्य आहे. तरीही मला एकदा ही डायल्स नीट पाहायची आहेत."
"व्हेरी वेल सर."
अपेक्षेप्रमाणेच सर्व डायल्स सहीसलामत होती. ख्रिसने सोबत एक मोजपट्टीही ठेवली होती. काही कारणास्तव त्याने घड्याळाची विविध मापे घेतली. डायलचा व्यास, काट्यांची लांबी-रुंदी, काट्यांचे लंबकापासूनचे अंतर, काट्यांमधील अंतर, गिअर्सची मापे असं बरंच काही त्याने मोजले. त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित अधिकच रुंद होत चालले होते. काम होताच त्याने शाल घट्ट लपेटली.
"रात्रीची इथे चांगलीच थंडी वाजत असणार."
"हो सर. ग्रँट म्हणाला की जवळपास सर्वच मनोर्‍याच्या घड्याळांमध्ये वातावरण दमट आणि थंड असते. त्याने एव्हॅपोरेटिव्ह कूलिंग हा शब्द वापरला. व्हेंटिलेशन बेतास बात असल्यामुळे वर्षभर या वातावरणात फारसा फरक पडत नाही. अर्थात इथे फारसे कोणी येत जात नसल्याने ही गोष्ट कोणाला जाणवत नाही."
"गुड! आता फक्त एकच गोष्ट..." ख्रिसची नजर जणू काही शोधत होती. "दॅट!"
तो बोट दाखवत असलेल्या ठिकाणी वाळलेले गवत पडले असावेसे वाटत होते. टॉवरमध्ये असा कचरा होत असणारच. कोणीतरी छान झाडून ते एका बाजूला रचले होते.
"त्याचे काय सर?"
ख्रिस मोजपट्टी घेऊन धावला. त्याने त्या गवताच्या कचर्‍यातून काही तुकडे वेगळे काढले. तो कडबा साचून साचून त्याचे ठोकळे तयार झाले होते. कदाचित मुद्दामून केलेही असतील. हे बेल्स बनवणे काही नवीन गोष्ट नव्हती. कदाचित या मोकळ्या जागेचा कडबा साठवण्यासाठीही उपयोग केला जात असेल. आल्बस किंवा बर्टीला विचारून हे सहज शोधता आले असते. अ‍ॅलेक्सीने आपला तर्क ख्रिसला बोलून दाखवला.
"त्याची काही जरुर नाही अ‍ॅलेक्सी. मुख्य मुद्दा असा की यातले काही ठोकळ्यांची एक बाजू तीन इंच आहे. आणि या घड्याळाच्या आत चांगलीच थंडी आहे. तसेच इथे आहे तशीच धूळ आणि असेच गवत त्या चॅपलमध्येही सापडू शकते. सर गॅविनच्या कपड्यांवरही धूळ व गवत वागवल्याच्या खुणा होत्या बरोबर?"
"हो."
"आणि आपण हे गवत वाळले असे म्हणत असलो तरी दमट हवेमुळे ते काहीसे ओलसर आहे बरोबर?"
"हो."
ख्रिसचे स्मित आता या कानापासून त्या कानापर्यंत गेले होते. त्याने तो कचरा जपून ठेवण्यासा सांगून मनोरा उतरण्यास सुरुवात केली.

**********

लंडनची गाडी सुटायला थोडा वेळ होता पण ख्रिस व अ‍ॅलेक्सी स्टेशनवर लवकर पोहोचले होते. अ‍ॅलेक्सीने तिथूनच परत गावात चक्कर मारायचे ठरवले होते. न राहवून त्याने प्रश्न विचारलाच
"ख्रिस, आता आपण दोघेच आहोत तर मोकळेपणाने बोलायला हरकत नाही. तुला रहस्याचा उलगडा झाला आहे, करेक्ट?"
"हो आणि नाही. मी म्हटलो ना की हा एक खेळ आहे. निव्वळ एक अंदाज बांधायचा झाला, जो बव्हंशी अचूक असेल, तर आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. पण अजूनही आपल्याला गुन्ह्यामागील कारण ठाऊक नाही. ज्युरींसमोर काहीही सिद्ध करायचे असेल तर आपल्याला या कारणाचा थोडा अंदाज तरी यायलाच हवा. त्या अंदाजाचा एक हिस्सा लंडनमध्ये गॅविन यांच्या व्यापारिक भानगडींच्या माहितीतून मिळवता येईल. दुसरा हिस्सा तू इथे राहून गोळा करू शकतोस."
"पण जर तू खूनी कोण हे सांगितलेस - म्हणजे तुझा अंदाज सांगितलास तर मला पुरावे गोळा करणे सोपे नाही जाणार?"
"बरोबर आहे. पण मग तू नि:पक्षपणे तपास करणार नाहीस."
"......"
"ओके. मला इंटरेस्टिंग वाटलेल्या बाबीकडे मी पुन्हा एकदा लक्ष वेधतो. सर गॅविन मृतावस्थेत चॅपलमध्ये सापडले बरोबर?"
"हो."
"आणखी काय वस्तु सापडल्या?"
"आणखी काय सापडणार? काहीच नाही. मर्डर वेपन गायब होते. त्यांचे बहुमूल्य घड्याळ गायब होते. प्रेतच काय तेवढे सापडले."
"येस्स. हे रहस्य सोडवायची किल्ली इथेच आहे."
अ‍ॅलेक्सीला विचारांच्या गर्दीत सोडून ख्रिस ट्रेनमध्ये चढला.

~*~*~*~*~*~

अ‍ॅलेक्सीने जॉनची भेट घेतली. त्याला अशा एखाद्या व्यक्तीची भेट घ्यायची होती जे गॅविन कॅनहॅम्प्टनमध्ये राहायला परत आले त्या काळापासून कॅनहॅम्प्टनमध्ये वास्तव्य करून आहेत. जॉनने थोडा वेळ विचार केला.
"अ‍ॅना!"
"अ‍ॅना?"
"हो. तिच्या नावाचा उच्चार खरेतर आना असा होतो. ती एक जर्मन ज्यू आहे. पूर्वी ती होस्बोर्ग मॅनोरमध्ये काम करायची. आता ती मुख्य वस्तीपासून थोड्या दूर असलेल्या एका छोट्या खेड्यात एकटीच राहते."
"ती बोलण्यास तयार होईल?"
"जरा अवघडच आहे पण दुसरं कोणी तुमच्या शंकाचे निरसन करू शकेल असे वाटत नाही."
"ठीक आहे. प्रयत्न तर करायलाच हवा."

जॉनने लगेच एका घोडागाडीची व्यवस्था केली. कॅनहॅम्प्टनच्या वायव्येस तीन तासांच्या अंतरावर एक छोटेसे गाव होते. गाव खाडीलगत होते. बहुतेक सर्व मच्छीमारांची वस्ती असावी. पोहोचेपर्यंत दुपार होत आली होती. अ‍ॅना दोन खोल्यांच्या बैठ्या टुमदार घरात एकटीच राहत होती. अ‍ॅलेक्सीने खंडभूमीवर होणारे ज्यूंचे हाल ऐकले होते. इंग्लंडात ज्यूंची परिस्थिती बरीच बरी होती. आणि अ‍ॅना एकटेपणा सोडला तर अगदीच आनंदात होती. एकटेपणाचीही सवय होते म्हणा. तिचे केस आता पिकले होते. वयाने आल्बसच्या आगेमागेच असावी. अंगात साधासाच आकाशी रंगाचा ड्रेस. केसांची छानशी वेणी. ताजा मासा शिजत असल्याचा वास दरवळत होता. हनी गार्लिक ग्लेझमध्ये शिजवलेल्या माशाचा फन्ना उडवल्यानंतर चहासोबत अ‍ॅलेक्सीने आपले प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

"माझी तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला काही हरकत नाही. पण त्या आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल?"
"विचारा."
"या भारतीय राजकुमाराने खून केला नसेलच हे कशावरून?"
अ‍ॅलेक्सीकडे या प्रश्नाचे ठाम उत्तर नव्हते. त्याची चलबिचल बघून अ‍ॅना मनापासून हसली.
"मला तुम्हाला अडचणीत टाकायचे नव्हते. उडत उडत बातम्या इथपर्यंत येतातच. राजकुमाराला वाचवण्यासाठी तुम्ही हा घाट घातला आहे हे मी समजू शकते. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की जर गॅविनसोबत या राजकुमाराने व्यवहार केला असेल तर त्याची चिडचिड होऊन त्याने खून केला नसेलच असे मी तरी खात्रीशीर म्हणणार नाही."
"तुम्ही गॅविन कोणी दुष्ट, दगाबाज व्यक्ती असल्याप्रमाणे त्यांचा उल्लेख करत आहात." सर गॅविनचा एकेरी उल्लेख अ‍ॅलेक्सीच्या ध्यानात आला होता.
"गॅविनला तुम्ही कितपत ओळखता?"
"मुळीच नाही असेच म्हणावे लागेल."
अ‍ॅनाने हातातला कप संपवला. खिडकीबाहेर बघत एक उसासा सोडला.
"मी गॅविनविषयी थोड्या तीव्र शब्दांतच बोलेन कारण लेडी अलीनाच्या दु:खद अंतास मी त्यास जबाबदार धरेन."
"पण आल्बस तर म्हणाला की ..."
"हूं, आल्बस!" अ‍ॅनाच्या बोलण्यात कडवटपणा होता. "ग्रेटा एक पत्नी म्हणून खरंच ग्रेट आहे. आल्बस आपल्या धन्याचे शंभर टक्के प्रतिरुप न बनण्याचे श्रेय ग्रेटालाच द्यावे लागेल. माझी चूक एवढीच की मी लेडी अलीनाची मदत करू शकले नाही."
"म्हणजे?"
" लेट मी बिगीन फ्रॉम द बिगीनिंग....."

********

ही साधारण पस्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी अगदी तरुण होते आणि लेडी अलीनाची पर्सनल मेड म्हणून कामास होते. आल्बसचेही मिसरुड फुटायचे वय असावे. कॅनहॅम्प्टन आजच्या मानाने खेडेच म्हणावे लागेल. होस्बोर्ग इथले लॉर्ड्स असले तरी त्यांची श्रीमंती ही वासरात लंगडी गाय छापाची होती. याचे कारण सर कॉलिन. कॉलिन होस्बोर्ग हे पूर्वापार चालत आलेली सुबत्ता टिकवण्यास समर्थ असले तरी ती वृद्धिंगत करण्यास आणि वाढत्या कारखानदारीचा व्यापारिक फायदा घेण्यास ते नालायक होते. पण त्यांच्या कामाची व्यक्ती कॅनहॅम्प्टनमध्ये अवतरली. एक आजचे सर गॅविन हॉवर्ड!

गॅविनमध्ये एका व्यापार्‍यात असावे ते व्यवहारचातुर्य भरपूर होते. महत्त्वाकांक्षाही तेवढीच होती. गॅविनच्या महत्त्वाकांक्षेची पुढची पायरी होती लॉर्डशिप! कॉलिननाही गॅविनला जावई बनवून घ्यायचे फायदे दिसत होते. यात एक छोटीशी अडचण होती. लेडी अलीनाला ग्रेगरी आवडला होता.

ग्रेग मोठा देखणा होता. स्वभावानेही उमदा होता. सहा फूट उंच, हिरवे डोळे, कुरळे केस. मी व आल्बस अनेकदा ग्रेग व अलीनासोबत भटकायला जायचो. नंतर नंतर गॅविनही आमच्यासोबत यायचा. गॅविन व आल्बस इस्टेटीविषयक गप्पा मारत बसायचे आणि आम्ही तिघे कंटाळायचो. पण विषय माझा नाही, विषय अलीनाचा आहे. अलीनाला ग्रेगरीसोबत लग्न करायचे होते. कॉलिननी मात्र या नात्यास साफ नकार दिला. ग्रेगरी सुस्वभावी असला तरी सामान्य कुवतीचा तरुण होता. तो एक प्रेमळ नवरा होऊ शकत असला तरी मॅनोरचा लॉर्ड बनण्याचे गुण त्याच्यात नव्हते. असा फायदा तोट्याचा विचार केला तर कॉलिनना दोष देण्यात अर्थ नाही. पण गॅविनने यावर एक बिनतोड उपाय काढला. ड्युएल! ग्रेगरी जुन्या वळणाचा होता. त्याने गॅविनसोबत ड्युएलसाठी मान्यता दिली. बारा गावचे पाणी पिलेला गॅविन निष्णात तलवारबाज होता. त्याने पहिल्या मिनिटाभरताच ग्रेगरीचा गळा चिरला आणि अलीनाच्या लग्नाचा प्रश्न निकालात लावला.

विसाव्या शतकात ड्युएलची संकल्पनाच सहन होणार नाही पण त्या काळात हे शिष्टसंमत होते. अलीनानेही हा निर्णय स्वीकारला. पुढे या नात्याचे फलस्वरुप आयरीनचा जन्मही झाला. पण अलीना खंगतच गेली. तिच्या डोळ्यातली असहायता मी पाहिली आहे. आयरीनमध्ये तिची आई मला दिसते. ती लग्न न करण्यामागे हे एक कारण असू शकेल की तिच्या आईप्रमाणेच तिलाही राजकीय/व्यापारिक लग्न करायचे नाही आहे. गॅविनचा स्वभाव बघता त्यांनी आणलेली सर्व स्थळे याच स्वरुपाची असू शकतात. फरक इतकाच आहे की आयरीन आपल्या निर्णयावर ठाम आहे.

********

अ‍ॅलेक्सीसाठी ही माहिती पूर्णपणे नवीन होती. ग्रेगरीचे हिरवे डोळे ऐकून त्याच्या डोळ्यासमोर ग्रीन नाईटच आला. तसे बघावे तर मग गॅविनने ग्रीन नाईटवर पन्नास वर्षांपूर्वीच वार केला होता. मग खून आयरीननेच तर नसेल केला? पण आयरीन गॅविनचा शिरच्छेद करू शकेल इतकी ताकदवान नाही. तसेच ग्रीन नाईट दिसला तेव्हा आणि गॅविन रपेटीस बाहेर पडले दोन्ही वेळेस आयरीन मॅनोरमध्येच होती. का आयरीनचा कोणी 'ग्रेगरी' आहे आणि या 'ग्रेगरीने' ग्रीन नाईट बनून परतफेड केली. प्रश्न प्रश्न प्रश्न!
"मला तुमची आल्बस-ग्रेटाची टिप्पणी नीट नाही समजली."
"तुम्ही आल्बस विषयी काय मत बनवलेत?"
"आल्बस मला स्वामीभक्त, आदर्श बटलर वाटला."
अ‍ॅना हसली. "तुमच्या आदर्श बटलरला जहाजाचा कप्तान व्हायचे होते."
"नो वे."
"त्याला कपडे, पोलाद इ. ची अमेरिकेत निर्यात करण्याचा धंदा सुरु करायचा होता. गॅविनने त्याच्या महत्त्वाकांक्षेचा पार चक्काचूर केला. हे कसे साध्य केले मला ठाऊक नाही पण आल्बसच्या आतला व्यवसायिकाचा आत्मा पार मेला. पूर्वीचा हसरा आल्बस, दगडी चेहर्‍याचा आदर्श बटलर बनला. पण अजूनही त्याच्या आत थोडा ओलावा शिल्लक आहे असे मला वाटते आणि याचे श्रेय माझ्या मते ग्रेटाला जाते."
"गॅरेथ आणि विल्यमविषयी काय सांगू शकता?"
"विल्यमविषयी फारसे काही नाही. तो किशोरवयीन असताना मी काम सोडले. गॅविनची दुसरी बायको, किराची पर्सनल मेड म्हणून मी काही वर्षे काम केले पण ती अलीनाप्रमाणे खुल्या स्वभावाची नव्हती. तिला साचेबद्ध जीवन मनापासून आवडे. गॅरेथ आपल्या आईवडलांचा अगदी अर्क आहे. पुन्हा पूर्णपणे तर्कसंगत विचार करता तो गॅविनचा आदर्श वारसदार आहे. त्याच्या बायकोला मी कधी भेटले नाही पण मी जेवढे ऐकले त्यानुसार ती किराची वारसदार असावी. त्या दृष्टीने गॅरेथ कॅनहॅम्प्टनचा लॉर्ड म्हणून चांगले काम करेल यात मला शंका नाही."
"पण मग त्यांच्याविषयी कोण सांगू शकेल?"
"लेट मी टेक यू टू रॉबर्ट! रॉबर्ट इथल्या शेतजमिनीचा आणि कारखान्यांचा सुपरव्हाईजर म्हणून काम पाहायचा. त्याने गॅरेथ व विल्यमला जवळून पाहिले आहे."
"थँक यू सो मच! अम्म, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही मला एवढे सगळे सांगितलेत. का? हे सर्व तुम्ही पोलिसांनाही सांगू शकला असतात. ख्रिस इथे होता, तेव्हा तुम्ही पुढे येऊ शकला असतात. पण .."
"यू गॉट टू अर्न द ट्रस्ट डिअर! वानगीदाखल सांगायचे तर, सॉस तयार करताना तू लसूण पाकळीतील मधोमध असलेला बारीक स्पाऊट काळजीपूर्वक बाजूला काढलास. याने लसूण बाधण्याची शक्यता कमी होते आणि सॉस पचायला हलका बनतो. तसेच याच कारणासाठी तू रोझमेरी वापरलीस. आय माईट बी क्वाईट ओल्ड, नॉट ब्लाईंड! काईंडनेस, रिस्पेक्ट अ‍ॅन्ड थॉटफुलनेस इज ऑलवेज अ‍ॅप्रिशिएटेड मिस्टर क्ल्मझी डिटेक्टिव्ह! चल रॉबर्टचे घर जवळच आहे. अंधार पडण्याच्या आत तुला मॅनोरला परतायचे असेल तर वेळ दवडून चालणार नाही."

'यू आर गुड अ‍ॅट कनेक्टिंग विथ कॉमन फोक्स' ख्रिसच्या शब्दांचा अर्थ आता त्याला लागला होता.

~*~*~*~*~*~

रॉबर्टचे घर म्हणजे छोटे गोकुळ होते. घरात नातवंडे होती, सुना होत्या. दोन्ही मुलगे कामास बाहेर गेला होते. रॉबर्ट आपल्या मित्रासोबत बुद्धिबळाचा डाव टाकून बसला होता. अ‍ॅलेक्सीचे कॉफीच्या कपांनी स्वागत करून रॉबर्टने घरामागील मोकळ्या पटांगणात दोन खुर्च्या मांडल्या. मित्राला पुन्हा आत्ताच्याच पोझिशनपासून उद्या सुरुवात करण्याचे वचन देऊन त्याने अ‍ॅलेक्सीची भेट घेतली. अ‍ॅलेक्सी थोडक्यात आपली ओळख करून दिली.
"पण मी तर केविनकडून ऐकले की खून त्या भारतीय राजकुमाराने केला?"
"असे फक्त केविनचे म्हणणे आहे. ठोस पुरावा काहीच सापडलेला नाही."
"हम्म. बहुतेक तरी त्या ग्रीन नाईटनेच हे सर्व केले असावे."
"तुमचा त्या दंतकथेवर विश्वास आहे?" अ‍ॅलेक्सीने भुवया उंचावल्या.
"दंतकथा कसली? ग्रीन नाईट अस्तित्वात आहे. मी पाहिलंय त्याला."
"कधी?" अ‍ॅलेक्सी आश्चर्य लपवण्याची पराकाष्ठा करत होता.
"असं नक्की नाही सांगू शकणार. कसं आहे, या मॅनोरच्या आसपासची जमीन गॅविनच्या मालकीची. गॅरेथला विचारलेत तर जवळच असलेल्या कारखान्यांमध्ये, शेतजमिनीवर तो फिरवूनही आणेल. आता एवढा पसारा चालवायचा तर कामगार हवेत. कॅनहॅम्प्टनमध्ये वस्ती असली तरी ती मुख्यत्वे निर्यातीस आवश्यक उद्योग करणार्‍यांची वस्ती आहे. कामगार मुख्यत्वे दक्षिणेच्या खेड्यांतून येतात. आता परत जाताना चॅपलच्या टेकडीजवळून जाणे होतेच. मीही कधी कधी तिकडून गेलो आहे. तिथे चिलखत घातलेला घोडेस्वार दिसल्याचे मी शपथेवर सांगू शकतो."
"मग तुम्ही त्याचा पाठपुरावा नाही केलात?"
"विषाची परीक्षा कोण घेईल? नशीब त्याचे डोके जागेवर होते. लिंडाला दिसला तसा तो कबंध स्वरुपात कोणाला नाही दिसला."
"त्याची उंची सांगू शकाल?"
"उम्म, साडेपाच फूट?! एक इंच इकडे तिकडे."
लिंडाला सहा फूट वाटलेला ग्रीन नाईट अर्धा फूट बुटका झाला ही नवलाईची गोष्ट होती. पण या पलीकडे फार काही विचारण्यात अर्थ नव्हता.
"गॅरेथ आणि विल्यमविषयी काय सांगू शकाल?"
"तुम्ही त्यांच्यावर संशय घेताय?"
"तपास पूर्ण होईपर्यंत सर्वच संशयित आहेत."
रॉबर्ट अ‍ॅनाप्रमाणे हॉवर्ड विरोधक नव्हते हे स्पष्ट होते. त्यांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे विणले गेले. अखेर महत्प्रयासाने त्यांनी उपयुक्त माहिती सांगण्यास सुरुवात केली.
"तुम्हाला गॅरेथ आणि विल्यमच्या वैयक्तिक आयुष्यात फारसा रस नसावा. तुम्ही गॅविनसोबत भांडण करण्यास काही कारण आहे का हेच शोधता आहात. बरोबर?"
अ‍ॅलेक्सीने मान डोलाविली.
"दोघांचे गॅविनसोबत वाद होत असत हे खरे आहे. पण तेवढ्यावरून गॅविनचा खून, तोही असा? छे, शक्य नाही."
"तरीदेखील, काय वाद होत असत?"
"गॅरेथला निर्यातीचा धंदा वाढवण्यात रस होता. यासाठी त्याला भारतात आपले पाय पसरायचे होते कारण बराचसा कच्चा माल, जसे की नीळ, भारतातून येतो. इतरही देशांत तो हातपाय पसरू लागला होता. आफ्रिकेतल्या खनिजसंपत्तीचाही व्यापार करण्याचा तो विचार करत होता. नाकापेक्षा मोती जड नको म्हणून गॅविन त्याला दाबत असत. तसेच गॅविन इतरही काही ठिकाणी पैसे गुंतवत असत. पण कुठे आणि हे पैसे कुठून येतात, याविषयी गॅरेथला ते माहिती देत नसत. मग गॅरेथ किरकोळ गोष्टींवरून वाद उकरत असे. जसे की ते चॅपल पाडणे."
"मग गॅरेथचा गॅविनवर खूपच राग असेल."
"त्याच्या उलट परिस्थिती म्हणेन मी. माझ्यामते गॅरेथला गॅविनकडून कौतुकाची अपेक्षा आहे. जोपर्यंत त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही तोवर गॅरेथ झटत राहील. पण गॅविनला आपल्या मुलाची मनःस्थिती फारशी समजत नाही किंवा जाणून बुजून खुल्या दिलाने कौतुक करणे टाळले जाते. मग चॅपल पाडण्याच्या मुद्द्यावरून भांडणं होतात. अर्थात तेवढ्या एका बाबतीत मास्टर गॅरेथ पूर्ण चूक आहेत. कशाला त्या ग्रीन नाईटच्या वाटेला जायचं?"
"हम्म! विल्यमविषयी काय सांगाल."
"विल? विल तर अजून बच्चा आहे. शेंडेफळ म्हणून असेल पण गॅविनचा सर्वाधिक जीव विल्यमवरच आहे. म्हणून तर भारतात पाय रोवण्याचा गॅरेथचा सल्ला ऐकला असला तरी तिथे प्रत्यक्षात नेमणूक विल्यमची झाली. हे छक्के पंजे विल्यमला फारसे कळत नाहीत. त्याची वडलांच्या सावलीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा आहे. पण गॅविननी त्याचे पंख इतक्या सहजा सहजी पसरू दिले नसते."
"म्हणजे?"
"विल्यमला लंडनला स्थायिक व्हायचे आहे. त्याला तिथे एखादी खानावळ किंवा तत्सम व्यवसाय सुरु करण्यात रस आहे. आता गॅरेथच्या मदतीने तो तसे काहीतरी उभारेलही. पण गॅविनना विल्यम आपल्या मुठीत हवा होता. विल्यमला हे जाचक वाटू शकते."
"एक शेवटचा प्रश्न! पीटर, त्या अभ्यासकाविषयी तुमचे काय मत आहे?"
"तो तोतरा? त्याचे काय आश्रिताचे जिणे! गॅरेथ त्याची महिन्याभरात हकालपट्टी करेल बघा. मी तर म्हणेन की गॅविन मेल्याचे सर्वात जास्त दु:ख त्यालाच झाले असेल."

अ‍ॅलेक्सीने रॉबर्टचे आभार मानले आणि रजा घेतली. मॅनोरला परत जात असताना त्याच्या मेंदुला पुरेसे खाद्य होते. घरातले बहुतांश सदस्यांकडे गॅविनवर नाराज असण्याचे काहीतरी कारण होते. पण त्यातील कोणत्या नाराजीची परिणती खुनात झाली होती? आयरीनला कोणी प्रियकर मिळाला असेल? आल्बसने जुन्या गोष्टींचा सूड उगवला असेल? गॅरेथचा कौतुकाच्या थापेच्या शोधाचे रुपांतर द्वेषात झाले असेल? का विल्यमने अखेर आपल्या जाचक बंधनांचा शेवट करण्याचा निर्धार केला असेल? ख्रिसच्या पद्धतीनुसार 'कारण' शोधण्यास सुरुवात तर केली होती. पण मानवी मनाचे व्यापार कोणाला उमगले आहेत? हे मानसशास्त्रीय डिटेक्टिव्ह्ज त्या क्षणी तरी अ‍ॅलेक्सीला होम्सपेक्षाही अधिक अवास्तव वाटले.

~*~*~*~*~*~

तिसरा दिवस (लंडन)

ख्रिसने निघण्यापूर्वीच हेन्रींना आपण निघत असल्याची तार केली होती. हेन्रींनी घोडागाडीचे भाडे चुकते करून ख्रिसच्या घरात प्रवेश केला. ख्रिस दिवाणखान्यातच सोफ्यावर झोपला होता. त्याचा कोट निष्काळजीपणे हुकला टांगला होता. डावा हात डोळ्यांवर घेतलेला तर उजवा हात जमिनीच्या दिशेने लोंबत होता. हवेतल्या हवेतच काही खुणा होत होत्या. जणू तो गुन्हा डोळ्यांसमोर आणत होता. गुन्हेगाराने सोडलेल्या फटीतून त्याला पकडता येते का बघत होता. हेन्रींनी घसा खाकरला तेव्हा तो भानावर आला. ख्रिस विचारात गढला असणार याचा अंधुक अंदाज हेन्रींना होता. त्यामुळे त्यांनी परस्परच अर्ल ग्रेची व्यवस्था केली.
"आपला पाहुणा राजपुत्र निर्दोष सुटेल?"
"सुटायला हरकत नाही. माझी पक्की खात्री आहे की त्याचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही. किंबहुना त्याच्या आगमनामुळे खर्‍या गुन्हेगाराची काहीशी गैरसोयच झाली आहे."
"म्हणजे?"
"म्हणजे विजय तिथे राहायला गेला नसता तरीदेखील गॅविनचा खून याच पद्धतीने याच दिवशी झाला असता आणि सर्व खापर ग्रीन नाईटच्या भाकडकथेवर फोडून एव्हाना केसचा निकालही लागला असता."
हेन्रींच्या चेहर्‍यावर कसलेही भाव उमटले नाहीत. त्यांना हे अपेक्षित होते का नाही हे सांगणे कठीण आहे.
"मग तुला खूनी कोण आहे हे माहिती आहे का?"
"एक अटकळ तर नक्कीच आहे."
"मग तू खुन्याला अटक का करत नाहीस?"

ख्रिसने सुस्कारा सोडला. त्याने आपला चेरीवुड पाईप बाहेर काढला. हेन्रींची काहीच हरकत नव्हती. त्यांनीही आपला आवडता ब्रायरवुड सिटर पाईप बाहेर काढला. ख्रिस सहसा धूम्रपान करत नसला तरी कधी कधी डोक्यातला गोंधळ शांत करायला उत्तम प्रतीच्या तंबाखूची मदत होते. दोन झुरके घेतल्यावर तो बोलू लागला
"सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की खून करण्याची पद्धत इतकी विचित्र आहे की मी अजूनही माझ्या डिडक्शनवर पुन्हा पुन्हा विचार करतो आहे. मला स्वतःला अजून पूर्ण खात्री नाही की माझी अटकळ बिनचूक आहे. पडताळणी करणारे पुरावे मिळवणे अशक्य नाही आहे पण केस संपूर्णपणे मिटवायची झाल्यास आपल्याला कोर्टासमोर सादर करायला एक मजबूत कहाणी हवी. त्याशिवाय ती केवळ एक अटकळ आहे, निष्कर्ष नाही."
"मान्य!"
"विजयला जर कोर्टापुढे येऊ द्यायचे नसेल तर विरोधी वकीलाला कसलीही संधी देता कामा नये. यासाठी विजयची अलिप्तता सिद्ध करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपली ज्युरी सिस्टिम एक मौजेचा प्रकार आहे. त्यांचा मटेरिअल एव्हिडन्सपेक्षाही हेतु/मोटिव्हवर चटकन विश्वास बसेल. त्यांना 'ओह्ह, म्हणून खून केला होय' असं काहीतरी ऐकायचं आहे. त्याशिवाय ते विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत."
"आणि तुला मोटिव्ह शोधता येत नाही आहे."
ख्रिसने मान डोलावली. "शोधता येत नाही आहे पेक्षा मला खात्रीलायक सांगता येत नाही आहे. मी आधी त्यांचे मृत्युपत्र बघण्याचा विचार करत होतो. पण एक वेगळाच विचार आता माझ्या मनात घोळतो आहे."
"त्यांचे मृत्युपत्र बघण्याची व्यवस्था होऊ शकते. माझ्या माहितीनुसार त्यांचा वकील इथेच लंडनमध्ये कुठेशी आहे. जेवढे मला ठाऊक आहे त्यानुसार गॅरेथ त्यांचा वारसदार असेल. त्यांनी कसलाही विवादास्पद क्लॉज घातल्याचे मला तरी ठाऊक नाही. तरीही आपण त्यांची आजच भेट घेऊ. आता तुझा वेगळाच विचार सांग."
"घरात नातेवाईक वगळता आल्बस, ग्रेटा, पीटर आणि बर्टी असे चौघे आहेत. अज्ञात शत्रूची कल्पना मी फेटाळली असली तरी या चौघांपैकी कोणाला तरी पैसे देऊन खून करवला असण्याची शक्यता आहेच."
"मग या चौघांचा बॅकग्राऊंड चेक करायचा म्हणतोस?"
"नाही. त्यात वेळ जाईल. आपल्याकडे एक दुसरा धागा आहे. तुम्ही कधी गशेल हे नाव ऐकले आहे?"
हेन्रींना हे नाव परिचित वाटले खरे पण काही केल्या ते नाव त्यांनी कुठे ऐकले आहे हे आठवेना. अचानक त्यांच्या वॅलेटला काहीतरी आठवले
"हा तर बोनचायना टी-सेट ब्रँड आहे. आपल्याकडे निळे-पांढरे डिझाईन असलेला टी-सेट गशेलचा तर आहे."
"करेक्ट!! मी घरी येण्याआधी दुकानात चौकशी करून आलो. हा ब्रॅंड तुम्ही लंडनमध्ये विकत घेऊ शकत नाही. तुम्हाला तो आयात करावा लागेल."
"कुठला आहे हा ब्रँड?"
"रशिया. गशेल हे रशियातील छोटेसे खेडे आहे. चिनीमातीपासून वस्तु बनवण्यासाठी प्रसिद्ध! तिथली विशिष्ट माती आणि परंपरागत चालत आलेली डिझाईन्स गशेलची खासियत आहे. त्यामुळे या सर्व वस्तु निळ्या-पांढर्‍या, फुलाफुलांची नक्षी असलेल्या असतात."

गॅविनचा रशियाशी काही ना काही संबंध होता. रशियाच्या व्यापारिक धोरणांच्या कटकटींशी हेन्रींचा चांगला परिचय होता. १८९२ पासून रशिया परकीय गुंतवणूकीचे स्वागत करत असला तरी या गुंतवणूकीतून फायदा नगण्य होता. तसेच मालकी हक्क, स्वायत्तता फक्त रशियन कंपन्यांनाच मिळत असे. त्यामुळे ब्रिटिश कंपन्या सहसा तिथे व्यापार करण्यास नाखूष असत. इतरही काही राजकीय कारणे होती. हेन्रींना हेही ठाऊक होते की रशियन आडमुठेपणावर उपाय म्हणून काही सुपीक डोक्याचे ब्रिटिश व्यापारी इतर मार्गांनी रशियन कंपन्यांमध्ये पैसा गुंतवत आणि तुफान पैसा कमवत. याकडे काही प्रमाणात कानाडोळा करायला ते शिकले होते. गॅविनच्या परकीय गुंतवणूकी रहस्यमय हेन्रींच्या डोळ्यावर आल्या असल्या तरी कागदावर सर्व काही स्वच्छ असल्याने ते चरफडण्याखेरीज काही करू शकत नसत. त्याच्या पैशांच्या उलाढालींचे रहस्य उलगडण्याची हेन्रींना कायमच इच्छा होती. अखेर ती पुरी होईल अशी चिन्हे होती.
"तुझ्या मते गॅविनचा पैसा रशियातही गुंतला आहे?"
"काही ना काही संबंध आहे हे नक्की."
"पण याचा तपासात काय फायदा होईल?"
"व्यापारिक कायद्यांशी तुम्ही अधिक परिचित आहात. तरीही मी असे ऐकले आहे की रशिया आता आडमुठेपणा कमी करून व्यापार्‍यांना सोयिस्कर अशा दुरुस्ती करत आहे."
"हो. सर्व बाबी मलाही माहिती नाहीत पण अशा दुरुस्ती होत आहेत हे बरोबर आहे. याने गॅविन सारखे भांडवलदार थेट गुंतवणूक करू शकतील, ऑलरेडी केलीही असेल."
ख्रिसने समाधानाने हात चोळले. "मला या कायद्यांच्या प्रती मिळू शकतील?"
"हो. पण ख्रिस याने तू काय साध्य करणार आहेस?"
"मॉर्गन ल फे ला पकडणार आहे." ख्रिस हसत हसत म्हणाला.

हेन्रींचा चेहरा बघून ख्रिसने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. "हा खून जर ग्रीन नाईटच्या दंतकथेचा फायदा घेत असेल तर ती दंतकथा आपण नीट अभ्यासली पाहिजे. किंग आर्थरच्या दरबारातील सर गवेन ग्रीन नाईटचा शिरच्छेद करतो. याची परतफेड म्हणून ग्रीन नाईट गवेनचा वर्षाभराने ग्रीन चॅपलमध्ये शिरच्छेद करणार असे ठरते. गवेन ग्रीन चॅपलमध्ये जातो. मुक्कामाला म्हणून तो जवळच्याच एका गढीत उतरतो. तिथे त्याला एक सरदार आणि त्याची बायको भेटतात. मध्ये इतर अनेक गोष्टी घडतात पण हे नंतर स्पष्ट होते की ही गवेनची परीक्षा होती. तो सरदारच ग्रीन नाईट होता आणि त्याने व त्याच्या बायकोने हे सर्व मॉर्गन ल फेच्या सांगण्यावरून केले."
"याचा काय संबंध आहे?"
"याचा खूप जवळचा संबंध आहे. आपण आत्ताच मोटिव्ह विषयी बोलत होतो. थोडक्यात आपण गुन्हेगाराच्या मनात काय असेल याविषयी विचार करत होतो. तसे असेल तर त्याने ग्रीन नाईटच का निवडला या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या प्रकरणाच्या उत्तराकडे घेऊन जाऊ शकते."
हेन्रींचा चेहरा अजूनही प्रश्नार्थकच होता पण ख्रिस बाहेर पडण्याची तयारी करू लागला.
"कुठे निघालास?"
"लायब्ररीत. रशियन शिकायला!"

~*~*~*~*~*~

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/77880

Group content visibility: 
Use group defaults

असे मोठे भाग टाकून वाचनाची मेजवानी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद _/\_ >>>>>+१

रोज थोड्या थोड्या वेळाने मायबोली पाहत होते नवीन भाग आला का ते पाहण्यासाठी. हा भाग वाचुन ती उत्सुकता वाढलेय. म्हणून नवीन भाग लवकर टाका प्लीज.

छान! सगळ्यांकडे काहीतरी मोटिव्ह होता म्हणजे एका व्यक्तीवर संशय घ्यायला सबळ कारण हवे. आधीचे भाग पुन्हा वाचावेत का?!
पुभाप्र!

रोचक ! शेरलॉक होम्स वाचल्याचा फिल येतोय.
पुढचा भाग लवकर टाका.

(Extra फीचर्समध्ये हनी ग्लेझमध्ये शिजवलेल्या माशाबद्दल अजून माहिती द्या)

पन्नास वर्षांपूर्वी ग्रेगवर वार म्हणजे मरतेवेळी सर हॉवर्ड होते किती वयाचे? 80 वगैरे? कारण पहिल्या काही भागांमध्ये त्यांची उमेदीची वर्षे ऑस्ट्रेलियात गेल्याचा उल्लेख येतो. शिवाय आयरीनचे वय 28 (विजयचे वय तिशीला दोन वर्षे कमी आणि आयरीनचे जवळपास तेवढेच) पाहता लेडी अलीना लग्नावेळी होती किती वयाची? आणि इतक्या उशिरा आयरीनचा जन्म म्हणजे नाजूक प्रकृती आणि मनाविरुद्ध गोष्टी घडलेल्या असूनही अलीनाने बराच तग धरलेला दिसतो.

वाचकांचे आभार.
साधना, धनवन्ती, शैलश्री, जिज्ञासा, जाई, हर्पेन, वाचिका, मामी, श्रद्धा >> प्रतिसादांकरता धन्यवाद Happy

श्रद्धा >> पन्नास वर्षांपूर्वी ग्रेगवर वार म्हणजे मरतेवेळी सर हॉवर्ड होते किती वयाचे? 80 वगैरे? >> माझी चूक झाली. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे १८५० च्या आसपास गॅविन ऑस्ट्रेलियात असायला हवा. याने अलीनाची झालेली फरफट अधिक ठसत असली तरी आपल्या कथानकाच्या दृष्टीने ते अतर्क्य ठरेल. जरुर तो बदल करत आहे.
रच्याकने, जर क्लूलेस खेळताना करतेस तसा विचार करत असशील तर ग्रेगरी किती वर्षांपूर्वी मेला याचा रहस्याशी संबंध नाही.

एक्स्ट्रा फीचर १

ग्लेझ्ड सामन

सामन ऐवजी कोणताही मध्यम ते मोठ्या आकाराचा मासा चालू शकेल. फक्त एवढं बघायचं की मासा ऑईली आहे का नाही. ऑईली मासे, जसे की सामन, बांगडा इ. असतील तर अधिक उत्तम. करायला अतिशय सोपा प्रकार. आधी ग्लेझ बनवून घ्यायची. ग्लेझ म्हणजे घट्ट, सिरपी असा सॉस. अ‍ॅना ग्लेझ बनवताना आधी एका भांड्यात मध, लिंबाचा रस, काळी मिरी, मीठ एकजीव करते. पाण्याचे प्रमाण अत्यल्प ठेवावे पण गरज वाटल्यास वाढवू शकता. दुसरीकडे लसूण तेलात हलकेच परतते. यात भांड्यातील मिश्रण घालून उकळी आणते. अ‍ॅलेक्सी या स्टेपला एक काडी रोझमेरीची वाढवेल. लेखक व्यक्तिशः लिंबाच्या रसाऐवजी एखादी सावर बीअर वापरेल. पाक दिसू लागला की गॅस बंद करावा.
आता माश्याला चमचा/ब्रश/हात/काय सोईचे असेल ते वापरून सर्व बाजूंनी ग्लेझचा थर चढवावा. पानात गुंडाळून अव्हन/निखार्‍यांत शिजवा. पंधरा मिनिटांत शिजेल. किंवा तव्यातच तुप/बटर वापरून दोन्ही बाजूंनी भाजू शकता.

एक्स्ट्रा फीचर २

गशेल (Gzhel)

zh चा रशियन उच्चार आपल्या 'श' सारखा होतो त्यामुळे देवनागरीत गशेल. पूर्वी चिनीमातीच्या (पॉर्सेलिन) वस्तु कशा बनवाव्यात यावर चिन्यांची मक्तेदारी होती. ब्रिटिशांनी चिनीमातीला पर्याय म्हणून बोनचायनापासून वस्तु बनवायला सुरुवात केली. आधीच्या भागांत उल्लेख झालेला वेजवुड हा लक्झरी बोनचायना ब्रँड आहे. पण यांना तो चमकदार रंग येत नाही. सहसा त्या क्रीम कलरच्या असतात. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस गशेल खेड्याच्या आसपासच्या भागात रशियनांनी एका नव्या प्रकारच्या पॉर्सेलिनचा शोध लावला. कथेत गशेलचा उल्लेख बोनचायना केला असला तरी तो बरोबर नव्हे, गशेल खर्‍या अर्थाने पॉर्सेलिन आहे. गशेलच्या कारागीरांचे नशीब फळफळले कारण आता युरोपीयांना चिनी व्यापारांना भरमसाठ किंमत न देताही चांगल्या प्रतीची भांडी मिळू शकत होती. १९५० पर्यंत गशेल टी सेट्सना चांगली किंमत येत असे.

रशियन सरकारने १८९२-१९१४ मध्ये व्यापार वाढवण्यासाठी जे बदल केले त्यामुळे गशेलची मागणी बरीच वाढली. कुझनेत्सोव कंपनी यात अग्रगण्य होती. नंतर सर्वच गोष्टींची मालकी सरकारकडे गेली. पण या वीस वर्षांत ब्रिटिशांनी रशियात प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली. यामागे आर्थिक कारणासोबतच रशिया पैशाची चणचण दूर करण्यासाठी इराण-अफगाणिस्तानमार्गे भारतापर्यंत पोहोचू नये हाही एक विचार असू शकतो.

मामी >> गशेल असे दिसते

Гжель

(चित्र विकिपीडियावरून साभार)

रच्याकने, जर क्लूलेस खेळताना करतेस तसा विचार करत असशील तर ग्रेगरी किती वर्षांपूर्वी मेला याचा रहस्याशी संबंध नाही.
<<<<<< हे आले लक्षात. मला तर ग्रेगरीचा मृत्यू हाही रेड हेरिंग वाटतो आहे. Proud
इथे ख्रिस मॉर्गन ल फे शोधण्यासाठी ग्रीन नाईटची दंतकथा वाचणार म्हटल्यावर मी पण वाचून पाहिली. त्यावरून एक गेस केलाय तो बघू बरोबर येतोय का?

खुन्याची विजय आल्यामुळे काहीशी गैरसोयच झाली आणि तो नसता तरी तशाच पद्धतीने त्याच दिवशी खून घडला असता, या ख्रिसच्या मुद्द्यावर विचार करते आहे.

बाकी एक्स्ट्रा तपशील नेहमीप्रमाणेच भारी. हनी ग्लेझ्ड फिश करून पाहिला पाहिजे. Happy

माझे एक्स्ट्रा तपशीलाचे दोन आणे: https://www.youtube.com/watch?v=7zo0hveLum4 ह्यातले घड्याळ ग्रासहॉपर एस्केपमेंट आहे. (फार फिल्मी वाटला प्रतिसाद तर काढून टाकू शकते.)

>>खुन्याची विजय आल्यामुळे काहीशी गैरसोयच झाली आणि तो नसता तरी तशाच पद्धतीने त्याच दिवशी खून घडला असता, या ख्रिसच्या मुद्द्यावर विचार करते आहे.

विजय नसता तर आपसूक खुनाचं बिल ग्रीन नाईटच्या नावे फाडलं गेलं असतं. त्यामुळे कदाचित जेव्हढा होतोय तेव्हढा तपास झाला नसता. विजय राजघराण्यातला असल्याने ह्याचा नीट तपास होतोय आणि त्यात खरा खुनी सापडण्याचे चान्सेस जास्त. किंवा असंही असेल ग्रीन नाईटने खून केला असल्याचं दाखवून कोणालातरी काहीतरी संदेश पोचवायचा असेल जे विजयवर संशय आल्याने झालं नाही. फक्त त्याच दिवशी खून करायचं काय प्रयोजन होतं हे कळायला मार्ग नाही. विजय गेल्यावरसुध्दा हे करता आलं असतं. कदाचित ह्याचा ते घड्याळ चुकीची वेळ दाखवत असण्याशी संबंध असावा किंवा राजाच्या राज्याभिषेकाशी. ह्या राज्याभिषेकाच्या वेळी काही लॉर्डशिप किंवा तत्सम याद्या जाहीर होतात ना?

चर्चा वाचून उलट सुलट शक्यता डोक्यात येताहेत त्यावरून कसे व कुठे ह्या प्रश्नांची कदाचित उत्तरे मिळतील पण तरी का व कोणी हे दोन्ही प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहेत माझ्यासाठी. ग्रीन नाईट वरून ग्रेगरीशी संबंधीत काही असावे असे समजायला वाव आहे पण इतक्या वर्षांनंतर कोणी का सूड घ्यावा? आयरिन 28 ची आहे म्हणजे ग्रेगरी 30-35 वर्षांपूर्वी मेला असे दाखवलेले चालु शकेल.

चोरीला गेलेल्या घड्याळाचा संदर्भही मला नीटसा लागत नाहीये.

तस्मात पुढच्या भागाची वाट पाहणे इतकेच हाती आहे. Happy

Happy भारतीय 'राजकुमाराला' इतकं महत्व कुणी इंग्लंडात, त्या काळी देईल असे नाही वाटत.... बाय द वे.....,!

आणि पायस...माझं सारखं सर गवेन आणि गॅविन यांत कंफ्युजन होतं आहे.... थोडी वेगळी नावं निवडली असती तर....? की त्यातही काही अंतःस्थ हेतू आहे? Happy

नवीन प्रतिसादांचे आभार

सीमंतिनी >> अर्रे परफेक्ट! हो तसला सेटअप टॉवरच्या लंबकाला जोडलेला असतो. छोट्या भिंतीवरच्या घड्याळांमध्ये अशी एस्केपमेंट जास्त कॉमन आहे कारण तिथे टॉवरमधल्या वातावरणाला तोंड द्यायचा प्रश्न येत नाही. आणि फिल्मी रेफरेन्सेस आर मोस्ट वेलकम!

सर गवेन आणि गॅविन यांत कंफ्युजन होतं आहे.... थोडी वेगळी नावं निवडली असती तर....? की त्यातही काही अंतःस्थ हेतू आहे? >> 'गॅविन' हे नाव 'गवेन' या मध्ययुगीन इंग्रजी नावाचे आधुनिक रुप आहे Happy ग्रीन नाईटचा वार भूतकाळात जर गवेनवर झाला असेल तर वर्तमानकाळात हा वार गॅविनवरच होईल नाही का?

पायस, इथे आपले अंदाज / तर्क लिहिलेले चालतील का? >> हो हो. कूद कूद के चलेगा Happy

धन्यवाद. Happy

हेन्रींना हेही ठाऊक होते की रशियन आडमुठेपणावर उपाय म्हणून काही सुपीक डोक्याचे ब्रिटिश व्यापारी इतर मार्गांनी रशियन कंपन्यांमध्ये पैसा गुंतवत आणि तुफान पैसा कमवत. <<<<<
आणि रशियाने आपल्या व्यापारी धोरणांत बदल करण्याचे ठरवले, या गोष्टींचा खुनाच्या मोटिव्हशी संबंध असावा. सर गॅविन ज्या पद्धतीने रशियात पैसा गुंतवत असणार, त्याचा बराच फायदा कुणा मध्यस्थालाही होत असणार आणि धोरणे बदलल्यामुळे त्याचा रोल रिडंडन्ट होणार, अशी शक्यता वाटते.

चोरीला गेलेल्या घड्याळाचा संदर्भही मला नीटसा लागत नाहीये.<<<<
ज्या वेळेला गॅविनचा मृत्यू झाला त्यावेळेच्या आघातामुळे पॉकेट वॉच बंद पडले असावे. ती खरी वेळ उघडकीला येऊ देणे गुन्हेगाराला परवडण्यासारखे नाही, म्हणून पॉकेट वॉच चोरीला गेले. लिंडा ज्यावेळी किंचाळली त्यावेळी बाकी लोक आले, बर्टी उशिरा आला पण सर गॅविन आलेच नाहीत, ही बाब लक्षणीय आहे.

मर्डर वेपन लक्षात आलं आहे. त्यावरून पुढे जाऊन 'बोचर्‍या थंडी' चा मुद्दा मिसळला की 'वेळेतली तफावत' कशी निर्माण केली गेली हे लक्षात येते. गविनच्या प्रेताचे कपडे घोट्याजवळ ओलसर हा होते हे लक्षात येतं.

पुढील भाग कधी येणार ???????? अभ्यासपूर्ण कथा लिहिताना वेळ जातो हे कळत असल तरीही वळत नाही. कारण तुमच्या कथा वाचून लागलेली उत्सुकता नवीन भाग आल्याशिवाय संपत नाही. प्लीज लवकर टाका नवीन भाग.