किन्वाची खिचडी (साबुदाण्यासारखी)

Submitted by अस्मिता. on 6 January, 2021 - 17:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन ते अडीच वाटी कच्चा किन्वा , हिरव्या मिरच्या , आलं , तूप /तेल किंवा दोन्ही , जिरे , उकडलेल्या( दोन) बटाट्यांच्या फोडी , दाण्याचा कूट(पाऊण वाटी) , शेंगदाणे, मीठ, साखर.
*आलं व हिरव्या मिरच्या भरपूर कारण किन्वाला स्वतःची अशी चव नाही.

क्रमवार पाककृती: 

**वि. सू. बऱ्याच माबोकर मैत्रिणींनी (तीन) ही पाककृती मागितली त्यापैकी दोघींना विपु सुद्धा केला. आता एकीसाठीच हा धागा काढतेयं असं होऊ देऊ नका. Proud

सकाळी भाज्यांचे सूप व रात्री फ्राइज खाणाऱ्या कधीकधी 'हेल्थ कॉन्शस' मित्रांनो घ्या. Wink

१. मी एका मोठ्या बोलमध्ये किन्वा घेतला.

२. त्याला दोन तीनदा पाणी बदलून व्यवस्थित धुतले.

३. वर थोडं पाणी घातलं.

४. मायक्रोवेव्हमध्ये झाकण न ठेवता दोन दोन मिनिटे असं करतं तीन चार वेळा मधून मधून 'आइस एज' बघत बघत मधून थोडं थोडं पाणी घालत शेवटी किंचित तूप टाकून फिरवले. सगळं लक्ष टिव्हीकडे होतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मायक्रो काय ते बघा. (कुकरमध्ये मी कधी केलं नाही.)

५.मगं अर्धा तास झाकून ठेवले. त्याने किन्वा फुलतो व मऊ आणि मोकळा होतो. ही पायरी आली की अर्धी लढाई जिंकलीच !

६. काट्याने मोकळा करून घ्या. थोडा थंड होऊद्या. हे पुष्कळ आधीही करता येईल.

७. सढळ हाताने तूप टाकून (थोडे तेल सुद्धा म्हणजे तूप करपत नाही) , तापल्यावर जिरे मगं तडतडं वगैरे झाले की आलं , हिरवी मिरची पेस्ट फार बारीक नको.

८. हे बहुतेक एखाद्या मिनिटात होईल , मगं उकडलेल्या बटाट्यांंच्या फोडी , हे सगळं तूप तेल गट्ट करतात. वाटलं तर इथे फोडणीत पुन्हा तेल &/तूप टाका .मगं शेंगदाणे टाकून व्यवस्थित परतून घ्या. (आच मध्यमपेक्षा कमी, नाही तर आलं करपतं. )

९. यात शिजवलेला किन्वा , दाण्याचा अर्धबोबडा कूट, मीठ , किंचीत साखर घालून व्यवस्थित मिसळून घेत , परतत रहा.
(आच वाढवून)

१०. परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा, परतत/हलवत रहा.

११. झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा काढा. (आच मध्यम)

१२. लिंबू पिळून &/ दह्याशी खायला घ्या.

बऱ्यापैकी 'हाय फायबर हाय प्रोटिन' पाककृती आहे. ही अगदी साबुदाण्यासारखी काही लागत नाही पण छानच लागते , त्यामुळे महागडा 'किन्वा' आणून निराशा झाली तर माझा राग राग करू नका. ही मला आधीच लिहायची होती पण कोरोनाकाळात महाग घटक पदार्थ असलेली पाककृती देणे प्रशस्त वाटत नव्हते. आता दिली , झालं. चुभुद्याघ्या.

'किन्वा' कसा दिसतो , त्यातील पोषणमूल्यं कुठली याची ढोबळ माहिती देणारा हा एक फोटो


हा मी केलेल्या किन्वा खिचडीचा फोटो

कुणी मागेल असे न वाटल्याने स्टेप बाय स्टेप फोटो नाहीत.
धन्यवाद. Happy

वाढणी/प्रमाण: 
शिजवलेला सहा सात वाटी झाला बहुतेक , नक्की लक्षात नाही . साधारण दुप्पट किंवा थोडा जास्त होईल.
अधिक टिपा: 

* महाग वाटत असेल तर आवर्जून आणून खावं असं किन्व्यामध्ये काहीही नाही. हे एक हेल्दी सबस्टिट्यूट आहे.
१.गरमगरम खावा.
२.साबुदाणा, साबुदाणा करत हळहळत राहू नये.
३. ही खिचडी आणि कोशिंबीर किंवा एखादे Salad बऱ्यापैकी समतोल आहार होईल असं वाटतं. मी तरी तसंच करते.
४.'आइस एज-1' धमाल आहे.

माहितीचा स्रोत: 
सकस खाण्यासाठी केलेली धडपड.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळं लक्ष टिव्हीकडे होतं. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मायक्रो काय ते बघा.>> हो चालेल.. मी पण त्या आइस एज च्या सीन प्रमाणे पि क बू करत करत मायक्रोमध् किन्वा शिजवून बघेन Proud

बाकी रेसिपि मस्त आहे.. नवरा गूळ खोबरं घालून गोड किन्वा बनवतो, तो काही घशाखाली उतरत नाही.. हा असा करायला सांगेन Happy

मी किन्वा ची खिचडी नेहमी कुकरमध्येच करते भाज्या , मुगडाळ घालून .. नेहमीपेक्षा दोन शिट्ट्या जास्त करायच्या .. छान होते .
मायक्रोवेव्हमध्ये कधी केलं नाही , छान पाककृती , करुन बघेन.

किन्वा ची साबुदाणा सारखी खिचड़ी होती आधी ही माबो वर...
आणि तेव्हा ही कोणीतरी म्हणालेले की चव तशी लागत नाही.
पण पौष्टिक असल्याने आणून बनवावे वाटते

पाकृ आवडली रादर ती लिहीण्याची शैली जास्त आवडली.
मागे एकदा दलिया खिचडी करून हात पोळून घेतले आहेत त्यामुळे माझा पास...

छान रेसिपी,

किन्वा प्रेशर कुकर ( १ का कपाला २ कप पाणि ) किंवा. ईलेक्रीक राईस कुकर मध्ये (१ का कपाला २.५ कप पाणि) पण छान शिजतो.

मस्त माहिती दिलीस गं
किन्वा भारतात महाग वाटतो त्यामुळे करणार नाही. पण असंच काहीतरी घेऊन त्यावर फ्री किन्वा सँपल मिळालं की नक्की करेन (काय हा कवडीचुंबकपणा.)

छान रेसिपी...
तू छान लिहिली आहेस!!

एका फ्रेंच मैत्रीणीने फ्रान्सला परत जाताना मला दिलेला किन्वा आहे. त्याचे काय करायचे हा प्रश्न अमेरिका स्थित अस्मिता यांनी सोडवून globalisation चे महत्त्व अधोरेखित केले आहे. . धन्यवाद _/\_
आता ice age मिळाला नेटवर की सर्व घटक मिळाले असे समजून हे नक्की करून बघणार

छान.

नवरा गूळ खोबरं घालून गोड किन्वा बनवतो >> मी दोन तीन वर्षांपूर्वी एकदा नारळी किन्वा केला होता, नारळी भातासारखा, गुळा ऐवजी खजूर पावडर घालून. छान झाला होता.

खमंग पाककृती आणि लिखाण!
किन्वा सॅलड मध्येच खाल्ला आहे बहुतेक वेळा. त्यात आवडतो.
किन्वाला पौष्टिकतेच्या दृष्टीने भारतीय पर्याय म्हणून राजगिऱ्याविषयी वाचलं आहे. तेव्हा माबोकर हौशी सुगरण मंडळींनी राजगिऱ्याची साखि स्टाईल खिचडी करून बघायला हरकत नाही!

छान रेसिपी, खुसखुशीत लिखाण, मस्त फोटो.

किन्वा वगैरे आणून करणार नाहीये (इथे मिळतो की नाही तेही माहिती नाहीये), वाचायला मस्त वाटलं.

छान. लिहिलंय पण मजेदार!
पुढच्या फिजिकलला नंबर गंडले आणि त्यानंतर येणार्‍या दोन आठवडे फेज मध्ये डोक फिरलं तर आणून करेन. Proud
किन्वा साबुदाण्यापेक्षा स्वस्त आणि सहज मिळतो. कॉस्कोतील पोतं आणलं तर आणखी स्वस्त च स्वस्त. पण तो आणून एकदोनदा खाल्ला की डोळ्यासमोर नको वाटतो त्याअर्थी तो नक्की सुपर फुड लेबल लावणेबल आहे. यापेक्षा मला ओट्स आवडतात आणि ते घशाखाली उतरतातही. त्यातही सिमिलर प्रोटिन असतात म्हणे.

आइस एज किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला कळले हे वाचून बरे वाटले. Happy
म्हाळसा, सामो, श्रेया, रूपाली, अन्जुताई, जाई, धनवन्ती, अनिष्का, अनु, साहिल शहा, मानवदादा, चिमु, जिज्ञासा, , माझेमन, mrunali, अंजली१२ , अमितव
सर्वांचे आभार.

युधिष्ठीराने 'किन् वा कुंजरोवा' म्हणले असा पाठभेद कुठल्याशा महाभारतात आहे... सबब सलाद-किन्वाला पूर्ण अनुमोदन.
छान रेसिपी...

कुणी जाईच्या प्रश्नाचे उत्तर देता का , प्लीज !
धनवन्ती , मस्तच प्रतिसाद Happy नक्की करा.
साहिल शहा व श्रेया 11 , किन्वा कुकरमध्ये कसा शिजवावा हे सांगितल्याबद्दल आभार Happy
अंजली , बहुतेक चालेल मधुमहासाठी पण विचारून घे. मला खात्री नाही.
जिज्ञासा , मलाही राजगिरा खिचडी शिकायला आवडेल. Thank you for the idea. Happy
सोनाली , फोटोची वाट बघते. Happy
म्हाळसा , गूळ घालून , अरे देवा Wink
मानवदादा, नारळी किन्वा रोचक वाटतोयं.
अमितव....
दोन आठवडे फेज  Lol .....ओट कुणाला चुकलयं , मीही धिरडे करते. वरचा किन्वा कॉस्कोच्या पोत्यातून काढूनच शिजवलायं.

किन् वा कुंजरोवा >>>> Happy
'किन् वा साबुदाणो वा' असं म्हणत दोन्ही खायचे. Wink
सीमंतिनी धन्यवाद.

जाई, पुण्याची असशील तर सगळ्या देशी-विदेशी पदार्थांसाठी दोराबाजी. आता पुण्यात 3 ब्रांचेस आहेत.
मी अजून कधी गेले नाही, पण फुड जंक्शन चेनमध्ये पण या सगळ्या गोष्टी मिळतात असं ऐकलं आहे. FC रोडला RP वैद्य कडे पण पॅकेट पाहिलं होतं. मुंबईत असशील तर मात्र मी कल्युलेस

किन्वा भारता त मुंबई मध्ये गोदरेज फूड हॉल आणि गोदरेज नेचर्स बास्केट इथे मिळतो. दोन ती न वर्शाखाली मी एक पाकीट अर्धा किलो साहाशे रुपयाचे आणले होते. माझा साखिवर मंथली खर्च पाव किलो दाणे व साबुदाणा इतका आहे त्यामुळे मला ते महाग वाटले होते. पण ते रेगुलर घेउन खाणारी मंडळी आहेत. नेच र्स बास्केट ऑनलाइन पण उपलब्ध आहे. फूड हॉल मध्ये व फूड हॉल स्टुडिओ बहुतेक लिंकिंग रोड इथे रेसीपीची वर्क शॉप पण घेतली जातात. नव्या रेसीपी तिथे मिळतील.

रेसीपी व लेखन शैली नेहमी प्रमाणेच सुरेख . अजून लिहीत जा ताई.

किन्वा ओ ट्स वगिअरे मंडळींशी आमचे काही जमत नाही फारसे. आईस एज फेवरिट पण तेच बघुन घेइन.

@ जाई: आमच्या कडे किन्वा सगळ्याच सुपरमार्केट्समध्ये मिळतो, तेही आम्ही आउटस्कर्टला रहातो, तर पुण्याततही मिळत असेलच. सुप्रमार्केटमध्ये विचारून बघा.

किन्वा डायबेटीक लोकं खाऊ शकतात का?
>>बिलकुल खाऊ शकता. Quinoa has low GI: 53

थँक्स मीरा, अमा.
थँक्स मानवदादा.
*तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारात समावेश करावा.
डायबेटीक लोकांसाठी हेही सापडले.
Quinoa 101

Quinoa (pronounced KEEN-wah) has recently become popular in the United States as a nutritional powerhouse. Compared to many other grains, quinoa has more:

proteinantioxidantsmineralsfiber

It’s also gluten-free. This makes it a healthy alternative for people who are sensitive to glutens found in wheat.

Evidence also suggests that eating more quinoa can help people with diabetes manage their blood sugar levels and possibly prevent other conditions.

You can eat quinoa by itself or substitute quinoa in recipes that call for other grains.

Pages