आय हेट अमुकतमुक खाद्यपदार्थ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2020 - 18:59

ईथे आपल्या नावडत्या खाद्यपदार्थांची लिस्ट बिलकुल लिहायची नाहीये. त्यासाठी तुम्ही आय हेट टिंब टिंब खाद्यपदार्थ म्हणून एक वेगळा धागा काढू शकता.

या धाग्यात मी माझ्या परीने लोकांना अमुकतमुक खाद्यपदार्थांचा तिटकारा का वाटतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आपली मते मांडू शकता.

म्हणजे बघा एखादा पदार्थ नावडता असणे वेगळे. पण त्याचा तिटकारा असणे वेगळे. नावडते पदार्थ कैक असतात. पण तिटकारा असा एखाद्या पदार्थाचाच वाटतो. काय कारणे असावीत...

सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपले कडक संस्कार - खरे तर कडक शिस्त म्हणायला हवे. पण अन्नपदार्थांना आपल्या संस्कृतीत भावनिक स्थान असल्याने त्यासंबंधित शिस्त ही थेट संस्कारगटात मोडली जाते.
म्हणजे ताटातले सारे अन्नपदार्थ संपवावे, पानात काही टाकू नये, अन्न वाया घालवू नये... अगदी योग्य संस्कार.
पण पानात जे पडेल ते मुकाट्याने खावे हि त्याला अ‍ॅडीशनल जोड कश्याला?

आठदहा वर्षांचा एखादा कोवळा जीव. त्याच्या ताटात बुळबुळीत भेंड्याची भाजी टाकायची आणि किमान चमचाभर तरी खा अशी अपेक्षा करायची. सगळे खातात ना, मग तुला खायला काय झाले? तो बघ दादा खातो ना, मग तू सुद्धा खायला हवेच.,

अर्थात काही घरात अश्या नावडीच्या एक दोन भाज्यांना सूट मिळते. पण भेंडी, गवार, वांगी, तोंडली, शेपू, पडवळ, फ्लॉवर ईत्यादी अतरंगी पण पौष्टिक समजले जाणार्‍या भाज्यांपैकी तुम्हाला काही म्हणजे काहीच आवडत नसेल आणि तुम्ही कांदे-बटाटे, कडधान्ये आणि काही मोजक्या पालेभाज्यांवर जगत असाल तर मात्र तुमचे खाता पिता जिणे हराम होऊन जाते. तेच फळांबाबतही तुम्हाला केळे, चिक्कू, संत्री मोसंबी वगैरे आवडत नसेल आणि आंब्या फणसावरच तुटून पडत असाल तर तेच जिणे आणखी अवघड होऊन जाते.

आता फळे खात नाही म्हणून फक्त टोमणेच ऐकावे लागतात, पण भाज्या खात नाही म्हटले की त्या मारूनमुटकून भरवल्याच जातात.

जगात कित्येक ठिकाणी फारशी शेती होऊ शकत नाही तिथे लोकं प्रामुख्याने मांसाहारच करतात, तर याऊलट कित्येक लोकं धार्मिक वा भावनिक कारणांतर्गत मांसाहारच करत नाहीत. म्हणजे अशी लोकं खाद्यपदार्थांच्या एका मोठ्या गटाला थेट फुल्लीच मारतात. पण तरीही धडधाकट आयुष्य मजेत जगतात. कारण निसर्ग आपले काम करतोच. तो मनुष्याची वाढ करतोच.

पण आता कसे होणार आपल्या पोराच्या तब्येतीचे यापेक्षा जास्त टेंशन आपल्याकडे हे असते की आता लोकं काय बोलतील, किती ते चवीचे नखरे, ताटात पडेल ते पोटात गेलेच पाहिजे हे शिकवता आले नाही का याच्या आईबापांना? किती लाडाऊन ठेवलेय पोराला....

आता आपल्या पोराला लाडाऊन ठेवायचे कि शिस्तीच्या गोडाऊनमध्ये ठेवायचे, हा जोपर्यंत ईतरांना त्रास होत नाही तोपर्यंत त्या पोराचा आणि आईबापांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण हे सामाजिक दडपण आपले काम कसे करते बघा,

मुलगा आईबाबांसोबत नातेवाईकांकडे पंगतीला बसला आहे. वाढायला घरच्याच काकू आहेत. भेंडीच्या भाजीचे टोप घेऊन येतात आणि टोप आडवा करून चमच्यानेच ढकलायला सुरुवात करतात. मुलाला मात्र भेंडीची भाजी शून्य आवडीची. तो कसेबसे आईवडिलांना ऐकू जाणार नाही या आवाजात पुटपुटतो, थोडीच द्या काकू. . एखाद्या चांगल्या मनाच्या काकू थोडीच देतातही, पण ती सुद्धा नावडती असल्याने डोंगराएवढी भासते. मुलगा बाबांकडे बघतो. बाबा तिथूनच नजरेने दम भरतात, पुर्ण खायची हं. मुलगा आईकडे बघतो. तिचे काळीज थोडे विरघळते. अर्धा डोंगर ती आपल्या ताटात घेते. कारण पुर्ण घ्यायला बाबांची परवानगी नसते. पण मुलाला तेवढाच दिलासा मिळतो.

त्याच खुशीत मग तो चला संपवून टाकूया एकदाचा ताटातला नावडता पदार्थ, पुन्हा उगाच पुर्ण जेवणभर तो शेवटी खायचा आहे याचे टेंशन नको असा विचार करतो आणि एकाच घासात गटक मटक स्वाहा ! आणि ईथेच चुकतो. चुकीचा सिग्नल जातो. पुढच्यावेळी मामी येतात आणि ताटातली रिक्त जागा भरतात.
आता जो पामर पहिल्यांदा नकार देऊ शकला नाही तो दुसर्‍यांदा तरी काय देणार. चरफडतो आणि पुन्हा खातो. परीणामी एक नावडता पदार्थ मनाविरुद्ध खावा लागला म्हणून त्याचा तिटकाराही करू लागतो.

-----------------------

मुलांना आपण टिळकांच्या बाणेदारपणाच्या कथा सांगतो ज्यात ते शिक्षकांनाही बिनधास्तपणे सुनावतात. पण त्याच बाणेदारपणे त्यांना आपल्याच नातेवाईकांना "मला भेंडीची भाजी आवडत नाही, मी ती ताटात घेणार नाही!" हे सांगायला शिकवू शकत नाही का? कि टिळक जन्मावेत, पण ते शेजारच्याच घरात??

माझ्या सुदैवाने मी हा बाणेदारपणा वेळोवेळी दाखवला. ताटात नावडता पदार्थ घ्यायला थेट नकार दिला. त्यामुळे कधीच ते खावे लागले नाहीत. पण दुर्दैवाने आईला सल्लेरुपी टोमणे मात्र खावे लागले. जसे की,
"आमच्याकडे पाठवा याला महिनाभर, बघा सगळे कसे खायला लागतो..:
"पोरांना किनई नावडीच्या भाज्या पराठा बनवून त्यातून गपचूप खाऊ घालायच्या, काहीs कळत नाही त्यांना.."
"त्याला ती प्रोटीन विटामिनची पावडर चालू करा.. जरा महाग असते.. पण पोरगा काही खात नाही म्हटल्यावर काय करणार.."
"त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा... "

ईथे मग स्फोट घडायचा!
एखादी भेंडीची, वांग्याची, गवारीची भाजी मी खात नाही म्हणून ईतके बोलून दाखवायचे. आता नाहीच खाणार मी कधी त्या म्हणून नावडीचे रुपांतर तिरस्कारात व्हायला वेळ लागायचा नाही.

-----------------------

आणखी एक कारण म्हणजे नावडत्या पदार्थांचा अतिआग्रह!
"नाही काकू मला वांग्याची भाजी खरेच आवडत नाही"

"अरे आमच्या पद्धतीची खाऊन तर बघ, पुन्हा मागशील..."
मी मनात - अहो पण मला मुळात वांगेच आवडत नाही तर तुमच्या हाताची आणि मसाल्यांची चव घ्यायला मी ते का पोटात ढकलू?

"तू खाऊन तर बघ, खाल्याशिवाय कशी चव कळणार"
मी मनात - अहो कधीतरी आयुष्यात वांगे खाल्ले आहे, चव समजली आहे, तो पदार्थ बघताच ती चव तोंडावर येते आणि नकोशी वाटते म्हणूनच तर नाही बोलत आहे ना..

"बघ छान काजू बदाम टाकलेत त्यात..'
मी मनात - सत्यानाश! अहो कश्याला वाया घालवले? Sad कबूतरांनाच टाकले असते..

-----------------------

पॉप्युलर खाद्यपदार्थ आपल्या आवडीचे नसणे हे कधी ना कधी आपल्याला कट्टरतेकडे झुकवतेच.
जसे की लहानपणी माझ्या आंबा फार आवडीचा.. कोणाचा नसतो.. त्यात मी कोकणी
पण वयात आलो तसे ती आवड कमी होऊ लागली. नावडता बिल्कुल झाला नव्हता पण कोणी आंबा ऑफर केला की मी हो बोलायच्या आधी विचार करू लागलो. समोरच्याला मात्र तितकेच पुरेसे ठरायचे. अगदी धक्का बसल्यासारख्या आविर्भावात मी याला आंबा विचारतोय आणि हा विचार करतोय. कोकणच्या किनारपट्टीला कलंक आहेस तू मेल्या.. बस्स, अशी प्रतिक्रिया आली की माझी विचारप्रक्रिया तिथेच यांबायची आणि मी निकाल द्यायचो. आई मीन सरळ नकार द्यायचो.
आता तर कोणी मला आंबा खातो का विचारले तर विचारही न करता माझ्या तोंडून अगदी चिडून बाहेर पडते, "नाही आवडत मला आंबा, ऐकलेस तू! बिलकुल नाही आवडत मला आंबा. आई हेट आंबा !!!

-----------------------

असाच एक पॉप्युलर पदार्थांचा त्रास म्हणजे ते सर्वांनाच आवडतात वा किमान खातात तरी हे गृहीतच धरले जाते.

उदाहरणार्थ पावभाजी.
एखाद्या घरगुती बर्थडे पार्टीत आपण जातो. जिथे मेनू म्हणून फक्त आणि फक्त पावभाजीच ठेवलेली असते. आणि मग आपली ती आवडती नसल्यास आपल्यालाच गिल्ट फील येईल अशी स्थिती आपसूक निर्माण होते. आपल्या एका नावडीमुळे आपण यजमानांना शरमिंदे केले असते. बाकीची जनता मग मुक्ताफळे उधळू लागते. खाऊन तर बघ थोडीशी, सुका पाव तरी खा, दुसरे काय मागवूया का, याला वेफर जरा जास्त दे रे, पावभाजी पण खाल्ली नाही याने, उपाशी असेल, वगैरे वगैरे.....
चूक ना आपली असते, ना यजमानांची असते, ना ईतर मित्रांची असते, कदाचित परीस्थितीचीही नसते.
पण मग राग कोणावर काढायचा... तर पावभाजीवर ! येस्स, आई हेट पावभाजी !!!!

-----------------------

काही मिश्कील म्हणवीत अशी miscellaneous कारणे सुद्धा असतात.

जसे की पाणीपुरी ...
पाणीपुरी हा माझ्या एका मित्राचा या एकाच कारणासाठी नावडता पदार्थ होता की त्याच्यामते तो मुलींच्या जास्त आवडीचा पदार्थ असतो.
असेलही.
पण तो खाल्याने त्याच्या पौरुषत्वाला काय धक्का पोहोचणार होता याची कल्पना नव्हती. यावरून आमच्या चिडवण्याने मात्र तो पाणीपुरीचा आणखी द्वेष करू लागला. (मुलींवर मात्र तो आजही प्रेमच करतो)

दुसरी ती एक दारू...
मी दोनचार वेळा ट्राय केली, मला कधीच आवडली नाही. कॉलेजातल्या मित्रांना कशी आवडायची हे कोडे कधीच उलगडले नाही. जेव्हा कुठल्याही पार्टीला ते दारूवर तुटून पडलेले असायचे, चेकाळलेले असायचे, तेव्हा ईतरवेळी सर्वात जास्त बडबड करणारा मी शांतपणे एक कोपरा पकडून पेसीच्या बाटलीत बुडबुडे काढत बसलेलो असायचो. बस्स! तिटकारा वाटू लागला त्या दारूचा तो आजतागायत तसाच आहे.

असो, एकूण मला सुचली ती कारणे लिहायला घेतली आणि जोशमध्ये जरा जास्तच लिहून लेख तयार झाला.
काही तुम्हाला पटतील, तर बरीच पटणारही नाहीत.

तरी चूक भूल देऊ घेऊ नये, कर्रेक्ट करावी.. येणारी पिढी आपली आभारी राहील.

धन्यवाद, Happy
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी बटर पावभाजी मागवली तर ती १२० ला येत असेल तिथेच बायकोने मागवलेल्या चीज पावभाजीचे दिडशे होतात .. तिचे बिल माझ्यापेक्षा जास्त होते. स्त्री-पुरुष, नवरा-बायको समानता गंडते ना Sad
आता हे जर पावभाजी सारखे डोसा उत्तप्पा मिसळ ऊसळ सगळीकडेच व्हायला लागले तर चीज बघताच चीड येणे स्वाभाविक आहे..
बाकीची जगदुनिया खुशाल चीजपंचमी खेळू द्या. फरक नाही पडत..

चीज मला आवडते. नुसतेही खायला. डेक्कन क्वीन, इंद्रायणी मध्ये ही तो चीज टोस्ट सुद्धा हमखास खायचो.
स्वित्झर्लंडमध्ये चीज फोंडू तर अप्रतिम. तसा घरीही केला होता एकदा पण तेव्हा आपल्याकडे तसं चीज मिळणं कठीण होतं, शोधून शोधून आणलं पण ती मजा आली नाही.

पण पोहे, पावभाजी मध्ये वगैरे चीज नाही आवडत विशेष.

Pages