आय हेट अमुकतमुक खाद्यपदार्थ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 December, 2020 - 18:59

ईथे आपल्या नावडत्या खाद्यपदार्थांची लिस्ट बिलकुल लिहायची नाहीये. त्यासाठी तुम्ही आय हेट टिंब टिंब खाद्यपदार्थ म्हणून एक वेगळा धागा काढू शकता.

या धाग्यात मी माझ्या परीने लोकांना अमुकतमुक खाद्यपदार्थांचा तिटकारा का वाटतो हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आपली मते मांडू शकता.

म्हणजे बघा एखादा पदार्थ नावडता असणे वेगळे. पण त्याचा तिटकारा असणे वेगळे. नावडते पदार्थ कैक असतात. पण तिटकारा असा एखाद्या पदार्थाचाच वाटतो. काय कारणे असावीत...

सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपले कडक संस्कार - खरे तर कडक शिस्त म्हणायला हवे. पण अन्नपदार्थांना आपल्या संस्कृतीत भावनिक स्थान असल्याने त्यासंबंधित शिस्त ही थेट संस्कारगटात मोडली जाते.
म्हणजे ताटातले सारे अन्नपदार्थ संपवावे, पानात काही टाकू नये, अन्न वाया घालवू नये... अगदी योग्य संस्कार.
पण पानात जे पडेल ते मुकाट्याने खावे हि त्याला अ‍ॅडीशनल जोड कश्याला?

आठदहा वर्षांचा एखादा कोवळा जीव. त्याच्या ताटात बुळबुळीत भेंड्याची भाजी टाकायची आणि किमान चमचाभर तरी खा अशी अपेक्षा करायची. सगळे खातात ना, मग तुला खायला काय झाले? तो बघ दादा खातो ना, मग तू सुद्धा खायला हवेच.,

अर्थात काही घरात अश्या नावडीच्या एक दोन भाज्यांना सूट मिळते. पण भेंडी, गवार, वांगी, तोंडली, शेपू, पडवळ, फ्लॉवर ईत्यादी अतरंगी पण पौष्टिक समजले जाणार्‍या भाज्यांपैकी तुम्हाला काही म्हणजे काहीच आवडत नसेल आणि तुम्ही कांदे-बटाटे, कडधान्ये आणि काही मोजक्या पालेभाज्यांवर जगत असाल तर मात्र तुमचे खाता पिता जिणे हराम होऊन जाते. तेच फळांबाबतही तुम्हाला केळे, चिक्कू, संत्री मोसंबी वगैरे आवडत नसेल आणि आंब्या फणसावरच तुटून पडत असाल तर तेच जिणे आणखी अवघड होऊन जाते.

आता फळे खात नाही म्हणून फक्त टोमणेच ऐकावे लागतात, पण भाज्या खात नाही म्हटले की त्या मारूनमुटकून भरवल्याच जातात.

जगात कित्येक ठिकाणी फारशी शेती होऊ शकत नाही तिथे लोकं प्रामुख्याने मांसाहारच करतात, तर याऊलट कित्येक लोकं धार्मिक वा भावनिक कारणांतर्गत मांसाहारच करत नाहीत. म्हणजे अशी लोकं खाद्यपदार्थांच्या एका मोठ्या गटाला थेट फुल्लीच मारतात. पण तरीही धडधाकट आयुष्य मजेत जगतात. कारण निसर्ग आपले काम करतोच. तो मनुष्याची वाढ करतोच.

पण आता कसे होणार आपल्या पोराच्या तब्येतीचे यापेक्षा जास्त टेंशन आपल्याकडे हे असते की आता लोकं काय बोलतील, किती ते चवीचे नखरे, ताटात पडेल ते पोटात गेलेच पाहिजे हे शिकवता आले नाही का याच्या आईबापांना? किती लाडाऊन ठेवलेय पोराला....

आता आपल्या पोराला लाडाऊन ठेवायचे कि शिस्तीच्या गोडाऊनमध्ये ठेवायचे, हा जोपर्यंत ईतरांना त्रास होत नाही तोपर्यंत त्या पोराचा आणि आईबापांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण हे सामाजिक दडपण आपले काम कसे करते बघा,

मुलगा आईबाबांसोबत नातेवाईकांकडे पंगतीला बसला आहे. वाढायला घरच्याच काकू आहेत. भेंडीच्या भाजीचे टोप घेऊन येतात आणि टोप आडवा करून चमच्यानेच ढकलायला सुरुवात करतात. मुलाला मात्र भेंडीची भाजी शून्य आवडीची. तो कसेबसे आईवडिलांना ऐकू जाणार नाही या आवाजात पुटपुटतो, थोडीच द्या काकू. . एखाद्या चांगल्या मनाच्या काकू थोडीच देतातही, पण ती सुद्धा नावडती असल्याने डोंगराएवढी भासते. मुलगा बाबांकडे बघतो. बाबा तिथूनच नजरेने दम भरतात, पुर्ण खायची हं. मुलगा आईकडे बघतो. तिचे काळीज थोडे विरघळते. अर्धा डोंगर ती आपल्या ताटात घेते. कारण पुर्ण घ्यायला बाबांची परवानगी नसते. पण मुलाला तेवढाच दिलासा मिळतो.

त्याच खुशीत मग तो चला संपवून टाकूया एकदाचा ताटातला नावडता पदार्थ, पुन्हा उगाच पुर्ण जेवणभर तो शेवटी खायचा आहे याचे टेंशन नको असा विचार करतो आणि एकाच घासात गटक मटक स्वाहा ! आणि ईथेच चुकतो. चुकीचा सिग्नल जातो. पुढच्यावेळी मामी येतात आणि ताटातली रिक्त जागा भरतात.
आता जो पामर पहिल्यांदा नकार देऊ शकला नाही तो दुसर्‍यांदा तरी काय देणार. चरफडतो आणि पुन्हा खातो. परीणामी एक नावडता पदार्थ मनाविरुद्ध खावा लागला म्हणून त्याचा तिटकाराही करू लागतो.

-----------------------

मुलांना आपण टिळकांच्या बाणेदारपणाच्या कथा सांगतो ज्यात ते शिक्षकांनाही बिनधास्तपणे सुनावतात. पण त्याच बाणेदारपणे त्यांना आपल्याच नातेवाईकांना "मला भेंडीची भाजी आवडत नाही, मी ती ताटात घेणार नाही!" हे सांगायला शिकवू शकत नाही का? कि टिळक जन्मावेत, पण ते शेजारच्याच घरात??

माझ्या सुदैवाने मी हा बाणेदारपणा वेळोवेळी दाखवला. ताटात नावडता पदार्थ घ्यायला थेट नकार दिला. त्यामुळे कधीच ते खावे लागले नाहीत. पण दुर्दैवाने आईला सल्लेरुपी टोमणे मात्र खावे लागले. जसे की,
"आमच्याकडे पाठवा याला महिनाभर, बघा सगळे कसे खायला लागतो..:
"पोरांना किनई नावडीच्या भाज्या पराठा बनवून त्यातून गपचूप खाऊ घालायच्या, काहीs कळत नाही त्यांना.."
"त्याला ती प्रोटीन विटामिनची पावडर चालू करा.. जरा महाग असते.. पण पोरगा काही खात नाही म्हटल्यावर काय करणार.."
"त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा... "

ईथे मग स्फोट घडायचा!
एखादी भेंडीची, वांग्याची, गवारीची भाजी मी खात नाही म्हणून ईतके बोलून दाखवायचे. आता नाहीच खाणार मी कधी त्या म्हणून नावडीचे रुपांतर तिरस्कारात व्हायला वेळ लागायचा नाही.

-----------------------

आणखी एक कारण म्हणजे नावडत्या पदार्थांचा अतिआग्रह!
"नाही काकू मला वांग्याची भाजी खरेच आवडत नाही"

"अरे आमच्या पद्धतीची खाऊन तर बघ, पुन्हा मागशील..."
मी मनात - अहो पण मला मुळात वांगेच आवडत नाही तर तुमच्या हाताची आणि मसाल्यांची चव घ्यायला मी ते का पोटात ढकलू?

"तू खाऊन तर बघ, खाल्याशिवाय कशी चव कळणार"
मी मनात - अहो कधीतरी आयुष्यात वांगे खाल्ले आहे, चव समजली आहे, तो पदार्थ बघताच ती चव तोंडावर येते आणि नकोशी वाटते म्हणूनच तर नाही बोलत आहे ना..

"बघ छान काजू बदाम टाकलेत त्यात..'
मी मनात - सत्यानाश! अहो कश्याला वाया घालवले? Sad कबूतरांनाच टाकले असते..

-----------------------

पॉप्युलर खाद्यपदार्थ आपल्या आवडीचे नसणे हे कधी ना कधी आपल्याला कट्टरतेकडे झुकवतेच.
जसे की लहानपणी माझ्या आंबा फार आवडीचा.. कोणाचा नसतो.. त्यात मी कोकणी
पण वयात आलो तसे ती आवड कमी होऊ लागली. नावडता बिल्कुल झाला नव्हता पण कोणी आंबा ऑफर केला की मी हो बोलायच्या आधी विचार करू लागलो. समोरच्याला मात्र तितकेच पुरेसे ठरायचे. अगदी धक्का बसल्यासारख्या आविर्भावात मी याला आंबा विचारतोय आणि हा विचार करतोय. कोकणच्या किनारपट्टीला कलंक आहेस तू मेल्या.. बस्स, अशी प्रतिक्रिया आली की माझी विचारप्रक्रिया तिथेच यांबायची आणि मी निकाल द्यायचो. आई मीन सरळ नकार द्यायचो.
आता तर कोणी मला आंबा खातो का विचारले तर विचारही न करता माझ्या तोंडून अगदी चिडून बाहेर पडते, "नाही आवडत मला आंबा, ऐकलेस तू! बिलकुल नाही आवडत मला आंबा. आई हेट आंबा !!!

-----------------------

असाच एक पॉप्युलर पदार्थांचा त्रास म्हणजे ते सर्वांनाच आवडतात वा किमान खातात तरी हे गृहीतच धरले जाते.

उदाहरणार्थ पावभाजी.
एखाद्या घरगुती बर्थडे पार्टीत आपण जातो. जिथे मेनू म्हणून फक्त आणि फक्त पावभाजीच ठेवलेली असते. आणि मग आपली ती आवडती नसल्यास आपल्यालाच गिल्ट फील येईल अशी स्थिती आपसूक निर्माण होते. आपल्या एका नावडीमुळे आपण यजमानांना शरमिंदे केले असते. बाकीची जनता मग मुक्ताफळे उधळू लागते. खाऊन तर बघ थोडीशी, सुका पाव तरी खा, दुसरे काय मागवूया का, याला वेफर जरा जास्त दे रे, पावभाजी पण खाल्ली नाही याने, उपाशी असेल, वगैरे वगैरे.....
चूक ना आपली असते, ना यजमानांची असते, ना ईतर मित्रांची असते, कदाचित परीस्थितीचीही नसते.
पण मग राग कोणावर काढायचा... तर पावभाजीवर ! येस्स, आई हेट पावभाजी !!!!

-----------------------

काही मिश्कील म्हणवीत अशी miscellaneous कारणे सुद्धा असतात.

जसे की पाणीपुरी ...
पाणीपुरी हा माझ्या एका मित्राचा या एकाच कारणासाठी नावडता पदार्थ होता की त्याच्यामते तो मुलींच्या जास्त आवडीचा पदार्थ असतो.
असेलही.
पण तो खाल्याने त्याच्या पौरुषत्वाला काय धक्का पोहोचणार होता याची कल्पना नव्हती. यावरून आमच्या चिडवण्याने मात्र तो पाणीपुरीचा आणखी द्वेष करू लागला. (मुलींवर मात्र तो आजही प्रेमच करतो)

दुसरी ती एक दारू...
मी दोनचार वेळा ट्राय केली, मला कधीच आवडली नाही. कॉलेजातल्या मित्रांना कशी आवडायची हे कोडे कधीच उलगडले नाही. जेव्हा कुठल्याही पार्टीला ते दारूवर तुटून पडलेले असायचे, चेकाळलेले असायचे, तेव्हा ईतरवेळी सर्वात जास्त बडबड करणारा मी शांतपणे एक कोपरा पकडून पेसीच्या बाटलीत बुडबुडे काढत बसलेलो असायचो. बस्स! तिटकारा वाटू लागला त्या दारूचा तो आजतागायत तसाच आहे.

असो, एकूण मला सुचली ती कारणे लिहायला घेतली आणि जोशमध्ये जरा जास्तच लिहून लेख तयार झाला.
काही तुम्हाला पटतील, तर बरीच पटणारही नाहीत.

तरी चूक भूल देऊ घेऊ नये, कर्रेक्ट करावी.. येणारी पिढी आपली आभारी राहील.

धन्यवाद, Happy
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग आपली ती आवडती नसल्यास आपल्यालाच गिल्ट फील येईल अशी स्थिती आपसूक निर्माण होते. आपल्या एका नावडीमुळे आपण यजमानांना शरमिंदे केले असते. बाकीची जनता मग मुक्ताफळे उधळू लागते. खाऊन तर बघ थोडीशी, सुका पाव तरी खा, दुसरे काय मागवूया का, याला वेफर जरा जास्त दे रे, पावभाजी पण खाल्ली नाही याने, उपाशी असेल, वगैरे वगैरे..... >>>>

मग काय करणे अपेक्षित आहे लोकांनी? हा खाणार नाही म्हणजे आपल्याला जास्त पावभाजी म्हणून ढिंकचिका ढिंकचिका डान्स करायचा? की 'अतिथी देवो भव' इ झूठ म्हणून पुढच्या माणसाला पाव वाढायला निघून जायचं त्या माऊलीने....

लेख मजेदार आहे. Happy

लेख खूप आवडला आणि रिलेट ही झाला. आपल्या लहानपणी हा शिस्तीचा बडगा फारच असायचा. अर्थात पानात टाकू नये, सगळं सम्पवायच . ह्यात काही चुकीचे नव्हते. पण आपला नावडता पदार्थ मला नको हे ठामपणे आपण सांगू शकत नव्हतो. आताची मुलं जास्तच बाणेदारपणे सांगतात.
पूर्वी पदार्थ विविधता आतासारखी भरपूर नव्हती. त्यामुळे घरात, कार्यक्रमात आपला नावडता पदार्थ सारखा समोर आला की तिरस्कार निर्माण व्हायचा.
आता विविधता भरपूर आहे त्यामुळं एकदा चाखून नाही आवडला की पुन्हा वेगळ्या पद्धतीची टेस्ट सुद्धा न करता नावडता शिक्का मारून मोकळं होतात.

मलाही अमुकतमुक अजिबात आवडत नाही
कितीही सजवून दिला तरी, कितीही आग्रह केला तरी
मी शक्य तितकया सभ्यपणे नकारच देतो
त्यावर खरे तर बॅन च आणायला हवा किंवा चितळेना करायला द्यावा म्हणजे मग ते पाटी लावतील की अमुकतमुक संपला

आम्ही व्हेज आहे(यात अभिमान किंवा लाज दोन्हीची गोष्ट नाही, हे एक स्टेटमेंट आहे)
मी लहानपणी अगदी मोजक्या भाज्या खायचे.मग स्वतः भाज्या करायला लागल्यावर कळलं की 7 दिवस, 2 मिल्स यात आपण इतक्याच भाज्या खाऊन अगदी वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पण प्रचंड रिपीट होतील. मेस मध्ये वांगे, ढेमसे या भाज्या अतिशय भयंकर प्रकारे बनलेल्या असायच्या.त्या मेमरी काढायला बराच वेळ लागला.
सध्या मुलांना भाज्यांचा सबसेट त्यांच्याच चांगल्या साठी वाढवण्याचा प्रयत्न असतो. एखादी भाजी आवडली नाही ,आवडत नसली तरी फक्त 1 घास खावी असा कटाक्ष असतो.you never know, some day the potato eating stomach will develop good memories of snake goiurd ir bitter gourd just because it was not eaten for long

जेनेटिक मेमरी नावाचा प्रकार असेल तर मला 6 भाज्या आवडणार, त्या मी करणार, त्यातल्या 2 पुढच्या पिढीला न आवडणार, त्या पण केल्या जाणार नाही.असं करून शाकाहारी माणसाची जेवणातली व्हरायटी प्रचंड कमी होईल.

त्यामुळे अगदी छोट्या प्रमाणात का होईना, भाजी ची वेगवेगळ्या प्रकारे चव देत राहावी असे वाटते.एखादा फॉर्म आवडू शकतो.(तुम्हाला कितीही दया आली तरी माझ्या घरातले लोक पावभाजीत 1 छोटा लाल भोपळा, 2च तुरे ब्रोकोली, अगदी छोटा तुकडा गाजर हे उघड्या डोळ्याने आणि स्वखुषीने(*कोणतेही नशापाणी न करता खातात))
शेपू तोंडले सुरण गेल्या अनेक वर्षात खाल्ले नाहीय.तेही कधीतरी औषध प्रमाणात नीट रेसिपी ने भाजी करून सर्वांनी 1 घास खाऊन बघण्यात येईल.प्रश्न माझ्या इगो चा नसून मोजक्याच व्हेज खाण्यात चॉईस अजून व्यापक करणे आणि शिक्षण किंवा इतर कारणाने लोक बाहेर राहिल्यास आयुष्य सुसह्य करणे हा आहे.

मला नेहमी वाटायचे की एखादी गोष्ट खाण्यापिण्यासाठी आवडत नाही ही "acquired" गोष्ट असावी . जन्मतः मनुष्याच्या बाळाला सगळे खाण्याचे पदार्थ दिले तर अगदी लहानपणी तरी ते आवडण्याची/नावडण्याची शक्यता सारखीच ५०%-५०% असावी असे मला वाटत असे , पण ते काही पदार्थांबाबत चुकीचे आहे असे कळाले.
माझा एक मित्र म्हणायचा की त्याला कशातच कोथिंबीर आवडत नाही कारण त्याला ती साबणासारखी लागते. त्यावर एकदा थोडा शोध घेतला तर असे कळाले की काही जणांना जन्मतः काही गोष्टींची चव इतरांपेक्षा वेगळी लागते. थोडक्यात तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नाही याचे कारण तुमच्या लहानपणीच्या आठवणीत नसून, तुमच्या जनूकांमधेच (Genes) असते.
https://www.britannica.com/story/why-does-cilantro-taste-like-soap-to-so...

व्हाईट ट्रफल्स हा एक असाच पदार्थ. तो अतिशय आवडणारे आणि त्याच्या वासाने उलटी येणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ज्याना तो आवडतो तो इतका आवडतो की वजनाने व्हाईट ट्रफल्स सोन्यापेक्षाही महाग असतात. नुसती चिमूटभर भुकटी पसरली तरी एकदम भूक खवळते. पण त्याच व्हाईट ट्रफल्सचा वास काही जणांना लघवीसारखा येतो. त्यामुळे जगातला एक अत्यंत दुर्मीळ पदार्थ ते खाऊच शकत नाहीत.
https://www.bbc.com/future/article/20151125-why-do-truffles-taste-so-weird
मला स्वतःला व्हाईट ट्रफल्स चा वास आवडला. त्याने भूक खवळते हे अनुभवले आहे . पण मला तो बराचसा चाट मसाल्याच्या जवळ जाणारा वाटला.

छान लिहिलंयस अभ्या.
खरं तर मीच असा लेख काढण्याच्या विचारात होतो.
आता एक अक्कल दाढ उपटून घ्यायला जायचंय, नंतर भर घालेन इथे.

माझं मुळात जेवणच कमी आहे त्यामुळे कोणी सारखं खा खा केलं की ताप होतो मग उपदेश सुरू होतात किती कमी खाते.

मला पदार्थ नावडण्यापेक्षा तो खाऊ घालण्यासाठी उपदेश करणारी मंडळी आवडत नाहित.

तिखटजाळ जेवण बनवणार्या लोकांच्या घरी मी चुकूनही जात नाही. ते लोक जेवायला बोलवातत की कोणीच जेवण संपवू नये म्हणून एवढे तिखट टाकतात देव जाणे.

चांगलं लिहिलंय , न आवडणार्या गोष्टी बद्दलही किती अभ्यासपूर्ण वाटणारा लेख लिहू शकतोस तू!

लेख आवडला, अनूची प्रतिक्रिया पटली.

आज न आवडणारी भाजी काही वर्षांनी आपसूक खाल्ली जाइल किंवा खावी लागेल. आवड व परिस्थिति बदलत असते, आपण flexible राहावं.

माझे लहानपण सर्व लोकली मिलणार्या भाज्या खायलाच असतात (कशीही चव असली तरी) या समजूतीतच गेले. बहीण कोबीला बिनचवीची बिनडोक भाजी बोले तरिही आम्ही खायचो. पण अन्न पिकवायलाव शिजवायला खूप कष्ट लागतात व अन्नास नावे ठेवू नये हे कटाक्ष ााने बिंबवण्यात आले होत. पुढे vitamins , minerals, carbs, proteins , lipid, diseases and their association with diet, malnutrition etc शी संपर्क झाल्यावर समजले की काही न आवडणार्या भाज्या न खाणे यात अयोग्य असं काही च नाही (जोवर आपल्या nutritional requirements आहारातून पूर्ण होत आहेत). सर्व भाज्या मर्यादेत खाणे हे कुठेही adjust व्हायला बरे पडते

परंतु

आपल्याला न आवडणार्या आहाराचा/ आहारशैलीचा तिटकारा करणे किंवा त्यामुळे दुसर्या व्यक्ति स बोलणे सर्वथा अयोग्यच

मीही (DNA व जन्माने मालवणी असूनही), घरात नारळ शहाळे, घुडघुडी आंबे असतानाही जेवणात खोबरं न वापरणे, आंबा न खाणे (वैयक्तिक कारणामुले), मांसाहार न करणे इ. वरून बरेच ऐकून घेतल आहे. (बहुतेकदा जेव्हा ते आश्चर्य युक्त असे तेव्हा मी काही त्रास करून घेतला नाही व इतर वेळेस स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत ही पडले नाही). मला पोसणार्या माझ्या पालकांनी व कुटुंबाने माझे शाकाहारी असणे (पचत नाही, वास सोसत नाही किंवा अन्य कुठल्याही कारणाने असेल)व इतर गोष्टी कुठलेही judgement किंवा सक्ती न करता ,मान्य केले व सहनही केले पण दुनिया बडी जालीम है हेच खरे

तस्मात आपल्याला पचेल, रुचेल तेच खावे इतर वेळेस आहारातून सर्व अन्न घटक मिलंत असतील तर एखादी भाजी फल न खाल्याने काही आकाश कोसलत नाही हे न समजणारे गेले उडत

जेनेटिक मेमरी नावाचा प्रकार असेल तर मला 6 भाज्या आवडणार, त्या मी करणार, त्यातल्या 2 पुढच्या पिढीला न आवडणार, त्या पण केल्या जाणार नाही.असं करून शाकाहारी माणसाची जेवणातली व्हरायटी प्रचंड कमी होईल.>>> हे लॉजिक नाही पटलं. तुम्ही केलेल्या भाज्यातील २ भाज्या तुमच्या मुलांना आवडल्या नाही तरी, तुम्ही न केलेल्या भाज्या त्या कुठे तरी खातीलच त्यातील त्यांना आवडतील आणि ते त्या भाज्या करतील.
आम्ही आमच्या पालकांना कितीतरी नवीन पदार्थांची ओळख करून दिली आणि त्यांच्या खाण्याचा पदार्थांचा डोमेन वाढला.

सुरवातीला टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मुलांना आधी नाही आवडली तरी विविध भाज्या थोड्याशाच खायला देऊन पहाणे, हे मात्र बरोबर वाटते.

*याचे कारण तुमच्या लहानपणीच्या आठवणीत नसून, तुमच्या जनूकांमधेच (Genes) असते.* - मग कांहीं आवडी/ नावडी कालांतराने अमुलाग्र कशा बदलतात ? स्वानुभवावरून मला वाटतं, जनुकांमुळे आवडीचा कल ठरूं शकतो पण पदार्थाशी निगडीत लहानपणीच्या आठवणी हा आवडीबाबत निर्णायक म्हणण्या इतपत महतवाचा घटक असावा.

दुसरं एक माझं बाळबोध निरीक्षण- एखादा आवडीचा पदार्थ भरपूर खाऊन तुम्ही तृप्त झाला असाल, तर तो पदार्थ नावडता झाला नाहीं तरी ' आवडी' च्या यादीत खूपच खालीं ढकलला जातो.

सुरवातीला टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो. त्यामुळे मुलांना आधी नाही आवडली तरी विविध भाज्या थोड्याशाच खायला देऊन पहाणे, हे मात्र बरोबर वाटते.
>>>>>

हे मलाही पटते. मुलांना विविध चवी दाखवल्याशिवाय त्यांना त्या कळणार कश्या.
फक्त बळजबरी नको तर त्यांच्या कलाने घ्यायला हवे. त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवे. मला लहानपणी पालेभाजी बिलकुल आवडत नव्हती. पण एकदा सातवीत असताना गणपतीला मामाच्या गावाला कोकणात गेलो असताना तिथे गौरीचा नैवेद्य म्हणून पालेभाजी भाकरी खाल्ली. ते मंगलदायी वातावरण आणि गावच्या पाण्याची चव यांनी असा चमत्कार केला की मी मुंबईला परत येऊन घरच्यांकडे पालेभाजी भाकरी मागून त्यांना शॉक दिला.
यात एक चांगले झाले की लहानपणी पालेभाजी घेऊन ते खा खा म्हणत माझ्या फार मागे लागले नव्हते जे की मी ईरीटेट होईल आणि तिचा तिरस्कार करू लागेल. अन्यथा गावालाही तिची चव घेण्यासच नकार दिला असता.

एखादा आवडीचा पदार्थ भरपूर खाऊन तुम्ही तृप्त झाला असाल, तर तो पदार्थ नावडता झाला नाहीं तरी ' आवडी' च्या यादीत खूपच खालीं ढकलला जातो.
>>>>>

याची काळजी आपणच घ्यायची असते. म्हणजे आमच्या घरी शेव फरसाण वेफर अश्या पदार्थांचा खूप खप असतो. वेगवेगळ्या चवीसाठी विविध ब्राण्ड आणि फरसाणची दुकाने ट्राय करतो. पण एखादी चव अफाट आवडली तरी सलग तेच ते आणने मुद्दामून टाळतो. हेच कारण. उगाच अति करून आपणच त्या पदार्थाची मजा घालवायचो.

यात आणखी एक म्हणजे आपल्या आवडीचा पदार्थ आपण वारंवार आणला तर त्याच घरात राहणारया ईतरांच्या तो आवडीचा असेलच असे नाही. त्यांना सतत तोच घरात बघून लवकरच वीट यायला लागतो आणि नावडीची जागा तिरस्काराने घेतली जाते.

@ स्वरूप, मला भेंडी नाही आवडत. पण मुळातच मला कुठलाही बुळबुळीत असलेला खाद्यप्रकार आवडत नाही. भेंडी, वांगे, पडवळ, दुधी, भोपळा वगैरे.. तसेच मत्स्यप्रेमी असूनही बुळबुळीत बोंबील आवडत नाही. फणसातही कापा आवडतो बरका अमृताहून गोड वाटला तरी बुळबुळीतपणा नकोसा वाटतो.
पण यातल्या काही भाज्यांचे कुरकुरीत फॉर्म मात्र आवडतात वा खातो. जसे कुरकुरीत तळलेली कडक भेंडी पापड किंवा सांडग्यासारखी तोंडाला लाऊ शकतो.

मला कॉली फ्लॉवर अजिबात नाही आवडायचा.
भाजी सोडाच पण एखाद्या मिक्स वेज किंवा सांबार मध्ये आलेला फ्लॉवर पण बाजूला काढायचो इतका तिटकारा होता.

सध्या डाएट सुरू आहे आणि वेज मध्ये जास्त choice नसल्याने फ्लॉवर विविध रूपात खातोय आणि आवडतोय देखील.

25-30 वर्षात जीतका फ्लॉवर नाही खाल्ला तितका गेल्या महिन्याभरात खाल्लाय (आवडीने).

तात्पर्य एवढचं की नावड किंवा तिटकारा चॉईस असल्यावरच चालतो.
मन परिस्थितीनुसार वळतं.

आता, बरेच लोक पदार्थ आवडत नाही या पासून अजिबात नकोच कडे वळतात याचे कारण काही लोकांना एखाद्या व्यक्तीला त्यांना आवडणारा पदार्थ आवडत नाही, हे झेपतच नाही. मग हात धुवून त्याच्या मागे लागतात. त्यांचे आक्षेप/टोमणे आणि आपण त्यावर शांतपणे द्यायची उत्तरे:

"एवढा छान पदार्थ आवडत नाही? सिरीयसली? असा कसा नाही आवडत?"
अहो तो पदार्थ तुम्हाला आवडतो, मला नाही. म्हणुन तुमच्यासाठी एवढा छान आहे तो, माझ्यासाठी नाही. तुम्हाला जे आवडतं ते सगळ्यांना आवडलंच पाहिजे का?

"अरेरे, xyz आवडत नाही? हे पचायलाच जड जातंय. जीवनातील एवढ्या मोठ्या सुखाला मुकत आहेस तू."
अहो, तो पदार्थ तुम्हाला खूप आवडतो, तुम्हाला तो खाणे म्हणजे जीवनातील मोठं सुख वाटतं. तेव्हा तुम्हाला तो खाऊ नका म्हटलं तर तुम्ही त्या सुखाला मुकाल. मला नाही आवडत तो पदार्थ. तर जे खाण्यात मला सुखच मिळत नाही त्याला मी कसा/कशी काय मुकणार बरे?

"काय माणुस आहे, चक्क हा पदार्थ अजिबात आवडत नाही म्हणतो/म्हणते. दुसऱ्यांंच्या आवडीचा आदर करावा"
अहो, मी मला काय आवडत नाहीय हे सांगतो/सांगते आहे. तुम्हाला असा कसा आवडतो, असे कसे खाता तुम्ही, बंद करा तुम्ही खाणे असे म्हणत नाहीय. तेव्हा मी कुठे तुमच्या आवडीचा अनादर करतोय/करतेय? उलट तुम्ही माझ्या नावडीचा आदर करत नाही आहात असे वाटत आहे.

"जीवन व्यर्थ आहे तुझं."
असेल बुवा. एव्हरेस्ट शिखर सर न करणे, उंच विमानातून पॅराशूट घेऊन उडी न मारणे, किर्रर्र जंगलात रात्र मचाणावर बसून न घालवणे, दारू + तंबाखूची एकत्र किक घेऊन ब्रम्हानंदी टाळी न लावणे वगैरे वगैरे असंख्य गोष्टी आहेत ज्याने आपलं जीवन व्यर्थ आहेच, त्यात अजून एका गोष्टीची भर समजा.

अजून कुणाला नावडीवर घेतले जाणारे आक्षेप/टोमणे आठवत असतील तर लिहा, त्यावर काय उत्तर देता येईल बघु.

त्या नावडत्या पदार्थांपेक्षा आग्रह करुन खाऊ घालणारे वात आणतात.
लग्नानंतर तर सासरची मंडळी आपल्याकडे हे चालत नाही ते चालत नाही असे सांगून जेवणाचा मूड घालवतात.
वरुन अपेक्षा की आमच्या पध्दतीने बनलेले सगळे आवडलेच पाहिजे. त्यांच्या लेकाला मात्र सुट.

"एवढा छान पदार्थ आवडत नाही? सिरीयसली? असा कसा नाही आवडत?" ---- तोंडाने खायला नाही आवडत आणि पायाने खाऊ नाही शकत

"अरेरे, xyz आवडत नाही? हे पचायलाच जड जातंय. जीवनातील एवढ्या मोठ्या सुखाला मुकत आहेस तू." -- बरं मग????

"काय माणुस आहे, चक्क हा पदार्थ अजिबात आवडत नाही म्हणतो/म्हणते. दुसऱ्यांंच्या आवडीचा आदर करावा" ----- मला तो पदार्थ सिझन नसताना खायला आवडतो...

"जीवन व्यर्थ आहे तुझं." --- बरं मग???

हो, आग्रहामुळे मी लग्नाचे जेवण, अजून कुठल्या फंक्शनचे जेवण वगैरेंना जायचे टाळायचो. कारण पोट भरले आणि वरून थोडे जरी जास्त खाल्ले गेले की मला खूप त्रास व्हायचा. लग्न लागले पहिली पंगत उठून लोक बाहेर जाऊ लागले की मी ही सटकायचो, कुणी विचारले जेवण! झालं ना, तर हो अगदी मस्त होत जेवण असं सांगून.
मग सगळीकडे बुफेची फॅशन आली त्यामुळे माझे चांगलेच फावले.

अनिष्का , भारी आहे हे Proud , कापुसकोंड्याच्या गोष्टीसारखं आपण बरं मग, बरं मग म्हणायचं.

मानव
विश्लेषण चांगले, पण का इतके स्पष्टीकरण द्या. त्यापेक्षा मी खात नाही, आग्रह केला तरी खाणार नाही हे सांगायचे किंवा दुर्लक्ष करणे उत्तम.

सियोना , माझ्या सासरी मला ही लग्न ाापूर्वीपासून व लग्मनानंतरही आमच्या कडे (please note आपल्या कडे नाही हं) असं बनवतात व असं खातात ,आमच्यात ही पद्धत आहे हेच पालुपद असायंच, (बाकी कुलाचार रितीरिवाज इ बाबतीत पण काही माहित नसतांना हिच पद्धत आहे असंही चालू असे, पण खाण्यावर विशेष प्रेम व दुसरं काही व्यग्र ठेवणारं काम नसलेने जेवणाविषयीचे प्रोटोकॉल भन्नाट !)

आणि आम्ही बाहेर जेवायचा प्लान केला की फौज हाजीर वेगवेगळे पदार्थ मागवून यथेच्छ नांवं ठेवायला ! पूर्ण वेळ मला हे आवडतं मला हे नाही आवडंत हीच चर्चा! आमच्यापहिल्या वहिल्या marriage anniversary ला रेस्टोरेंट मध्ये सासरच्या बायकांना कुठले cuisines आवडतात , बिर्यानी मध्ये कुठले मसाले आवडतात हे 3तास ऐकल्यानंतर ही मला बिर्यानी विषयी तिरस्कार नाही याबद्दल माझा सत्कार करावा अशी बिलकुल अपेक्षा नाही :p पण अशा लोकांबरोबर रेस्टोरेंट मध्ये जाणे जिवावर येते व ते टालंणं उत्तम

चांगले व मुद्देसूद लिहिले आहे. प्रतिक्रया सुद्धा महित्तीपूर्ण आहेत. खाण्याची आवड/नावड परिस्थितीनुरूप निर्माण झालेली असते याशी सहमत. प्रत्येक देशात आणि प्रांतात खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अमुलाग्र वेगवेगळ्या आहेत हे आपण सगळे जाणतोच. यामध्ये जनुकीय संबंध असतो हि माहिती मात्र पहिल्यांदाच कळली. रोचक माहिती आहे पण तो बीबीसीचा लेख मात्र अजून वाचला नाही. कोणास काय खायला आवडते वा आवडत नाही यावरून त्यांना जज करणे कदापि योग्य होणार नाही या मताशी तंतोतंत सहमत.

माझे मत असे आहे कि ingredients काय आहे त्यापेक्षा त्यापासून पदार्थ कसा बनवले जातो त्यावर सुद्धा बरेच अवलंबून असते. मुले जेंव्हा एखादा पदार्थ आवडत नाही म्हणतात तेंव्हा त्यामागे "ज्या प्रकारे तो बनवलाय ते आवडत नाही" हे कारण सुद्धा असू शकते. पण ते आपण अनेकदा विचारात घेत नाही. त्याऐवजी "नेहमीसारखेच (म्हणजे पारंपारिक पद्धतीने) बनवलंय, बाकीचे खातात, तुला काय हरकत आहे?" असा सूर असतो.

लहानपणी लसूण अत्यंत नावडती गोष्ट होती. लसूण पाकळ्या फोडणी मध्ये असायच्या. उग्र वासानेच उलटी यायची. असे वाटायचे कि लोक हे खातात तरी कसे? पण पुढे कधीतरी जेंव्हा गार्लिक ब्रेड खाल्ला तेंव्हा लसून इतका चविष्ट लागू शकतो यावर विश्वासच बसला नाही. ज्या पद्धतीने लसूणापासून तो बनवला त्यामुळे ते झाले. तीच गोष्ट वांगे, भेंडी, कोबी यांची. वांग्याची आमटी (उर्फ कालवण), भेंडीचे बारीक तुकडे करून बनवलेली भाजी, कोबीची भाजी हे ज्यांना आवडत नाहीत त्यांना भरले वांगे, मसाला भेंडी, कोबीची कोशिंबीर हे कदाचित आवडू शकते. तसेच पनीर हा अजून एक ingredient. त्यापासून केलेले अनेक पदार्थ आवडतात. पण त्यात तिखटमीठ घालून भाजी बनवली तर ती मात्र खायचे मन होत नाही. अर्थात अशी भाजी काहीना खूप आवडीची आहे. पण मला मात्र पनीर मध्ये तिखटमीठ म्हणजे दुधात तिखटमीठ घातल्यासारखे वाटते.

वर एका प्रतिसादात तिखटजाळ जेवणाचा उल्लेख आला आहे. हे मला सुद्धा न आवडणारा प्रकार आहे. तिखट ठीक आहे. पण तोंड पोळेल इतके तिखट? No wayyy! केवळ यासाठीच लहानपणी खेडेगावात कुणाच्या लग्नाच्या पंगतीत बसणे हि शिक्षा वाटायची. नॉनव्हेज मध्ये सुद्धा अनेक हॉटेलांत 'कोल्हापुरी' च्या नावाखाली नुसते भरपूर तिखट मसाला घातलेले नॉनव्हेज देतात. ते अजिबात आवडत नाही. मटण/मासे/चिकन यांची मुळची चव जर तिखटजाळ मसाल्यामुळे गायब होत असेल तर ते नॉनव्हेज खाण्याला अर्थ वाटत नाही. (खरेतर 'कोल्हापुरी' म्हणजे नुसते भरपूर तिखट नव्हे. तर तो शब्द मसाला, चव आणि करण्याची पद्धत यासाठी आहे. पण आजकाल हॉटेलात 'कोल्हापुरी' नावाखाली फक्त तोंड भाजणारे तिखट जेवण देतात)

मर्यादित प्रमाणात आवड नावड इथवर ठीक आहे पण कोणत्या अन्नाचा तिरस्कार असा वाटत नाही इतके खरे. तशा सवयी जाणीवपूर्वक बाळगल्या नाहीत. कारण मी अनेकजण पाहिलेत केवळ जेवण मानवत नाही म्हणून परदेशातून प्रोजेक्ट सोडून परत आलेत. जिथे जे मिळते तिथे ते खायची मानसिकता असायला हवी असे मला वाटते.

लसूण आणि गार्लिक ब्रेड बद्दल अगदी अगदी.
एखाद्याला पदार्थ अजिबात आवडत नसेल तर तो आवडावा ही जबरदस्ती नाही.
पण लहान मुलांच्या बाबतीत कधीकधी चुकीची मेमरी असल्याने भाजी नावडती होते(उदाहरणार्थ मी समजा भेंडी चांगली बनवते आणि एखाद्या लहान मुलाने मी बनवलेली भाजी पहिल्यांदा खाल्ली आणि ती नेमकी तिखट झाली होती, तर 'भेंडीची भाजी अत्यंत बोअर आहे' असा समज ते मूल आयुष्यभर करून घेईल.ही मेमरी त्याने चांगली कुरकुरीत भेंडी भाजी एकदा चव घेऊन बघून पुसायची तयारी ठेवली पाहिजे, बरेच जण असं घराबाहेर पडल्यावर आपोआप करतात.)
ही मेमरी पुसायला अतिशय कमी वारंवारितेने या भाजीचा वेगळा फॉर्म करुन चव घेऊन मनाचा आवाज परत एकदा ओळखावा इतकेच म्हणणे.
मी घोसावळे खायचे नाही.कारण भाजी पाणीदार गिळगीळीत केलेली असायची.पण स्वतः दाण्याचा कूट घालून तव्यावर परतून करायला लागले तेव्हा परत आवडायला लागली.
नवरा लाल भोपळा अजिबात खायचा नाही.मग चीन मध्ये व्हेज सँडविच मध्ये लाल भोपळा भुकेच्या वेळी खाल्ला तो आवडला.
It's all about association of memory to food.
माझी श्रीखंड मेमरी वाईट आहे.अशीच कधीतरी सुधारेल.

बाकी वरचे सर्वांचेच प्रतिसाद आणि मूळ लेखातीलही अनेक मुद्दे पटले. पोट भरल्यावरही अति आग्रह केलेला मला अजिबात आवडत नाही, मग तो पदार्थ कितीही आवडीचा असो. तिथे नो मिन्स नो हे ह्या आग्रहकर्मी मंडळींना कुणीतरी सांगितलं पाहिजे. पण त्यांना आग्रह केला नाही तर लोकांना खाऊ घातल्याचं समाधानच मिळत नाही. एकदा आग्रह करायची सवय लागली की ती काढणं फारच अवघड असतं.

Pages