
मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.
लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.
इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.
पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.
इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.
असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.
तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.
होय स्वाती ती तर क्लासिक
होय स्वाती ती तर क्लासिक रेसिपी आहे.
ही एक रेसिपी पण बघा, बिना
ही एक रेसिपी पण बघा, बिना पिठाचे कोबी मोमो(अर्थात ताजी खावी लागेल)
अजून बनवून पाहिली नाहीये
https://youtube.com/shorts/hTdilJK7U00?feature=shared
आम्ही कोबी म्हणतो त्यामुळे
आम्ही कोबी म्हणतो त्यामुळे आधी मी पानकोबी न वाचता default mode मध्ये जाऊन पानकोंबडी वाचलं म्हणलं असं का लिहिलंय, पाणकोंबडी असत ते आणि पाणकोंबडी ने काय कुणाचं घोड मारलं असेल की तिच्या नावाने Hater's club काढावा वाटतोय कुणाला. मग नीट वाचलं
About कोबी ओल खोबरं,मिरची घालून वाफेवर शिजवलेली भाजी आवडते. आणि पराठे पण आवडतात.
चवीचं फार देणेघेणे न ठेवता
चवीचं फार देणेघेणे न ठेवता कीमची अध्येमध्ये खाणे आरोग्यास फार उपयुक्त ठरलेले आहे.
अरे हो, गेल्या वर्षी मी किमची
अरे हो, गेल्या वर्षी मी किमची पहिल्यांदा ट्राय केले, ठीक वाटले. भाजी एवढे खावे लागत नाही टेबल स्पूनभर खायला ओक्के आहे. आणत असतो अधुन मधून.
कीमची साठी वेगळा, नापा कोबी
कीमची साठी वेगळा, नापा कोबी वापरतात बहुतेक.
कोबी आवडणारा, न आवडणारा नाही
कोबी आवडणारा, न आवडणारा नाही.भाजीसाठी एक पर्याय म्हणून चालसे गटातला आहे.हिंग,मोहोरी हि. मि.घालून केले कोबीची भाजी आवडते.हो त्यात भिजवलेली चणा डाळ हवीच.
कोबीच्या वड्या एकेकाळी आवडीच्या होत्या.आता कोणी करून दिल्या तर खाईन.
जाई, कोबीच्या वड्या मी ओवनमधे
जाई, कोबीच्या वड्या मी ओवनमधे करते.
साधारण ३ कप जाडसर कोबी किसाला, १ कप बारीक चिरलेला कांदा आणि एक ते सव्वा कप डाळीचे पीठ. मावे सेफ झाकण वाल्या काचेच्या भांड्यात कांदा, कोबी, धणे-जिरे पावडर, हळद, तिखट, मीठ, मालवणी/कायस्थी मसाला असे एकत्र करते फोर्कने एकत्र करुन घेते. त्यावर जरा सढळ हाताने तेल घेवून केलेली फोडणी घालते आणि मावेत २ मिनीटे वाफ काढते. बाहेर काढून त्यात डाळीचे पीठ, १ टे. स्पून तीळ, २ मोठे चमचे दही, १/४ टी स्पून सोडा घालून कालवते. गरज वाटल्यास एक -एक चमचा पाणी घालत भांड्यात मिश्रण थापता येइल असे करुन घेते. चव घेवून मीठ-मसाले अॅडजस्ट करते. ओवन ३५० फॅ. ला प्रीहीट करते. काचेच्या चौकोनी भांड्याला तेल लावून त्यात वड्यांचे मिश्रण घालून ओवनमधे बेक करते.
स्टार्टर म्हणून केला जाणारा अजून एक प्रकार म्हणजे कोबीच्या मुठीया. ओवन आणि जोडीला किचन तापवायचे नसते तेव्हा मी कोबीच्या वड्यां ऐवजी मुठीया करते.
>>कीमची साठी वेगळा, नापा कोबी
>>कीमची साठी वेगळा, नापा कोबी वापरतात बहुतेक.>> हो. रुम टेंपला ठेवून फरमेंट करतात त्या किमचीसाठी नापा वापरतात. फ्रीजमधे ठेवून लगेच खायची किमची असते ती कोबीची करतात.
कोबीची भाजी खूपच आवडते. पण ती
कोबीची भाजी खूपच आवडते. पण ती सुद्धा हिंग, हळद, मोहरी, हि. मिरच्या आणि चणाडाळ, कढिपत्ता फोडणीत घालून आणि मग गूळ आणि कोथिंबीर. बाकी काही मसाला आवडत नाही.
मध्यंतरी एका मैत्रिणीने कोबीच्या वड्या अशा केल्या होत्या. सोप्प्या वाटल्या.
कोबी बारीक चिरुन्/किसून घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, मिरच्या+आलं+लसूण असा ठेचा, धणे जिरं पूड, कोथिंबिर, मीठ वगैरे घालून मिक्स करुन त्यात डाळीचं पीठ आणि पाणी घालून भज्यांच्यान्पीठासारखं मिक्स करुन तव्यावर शॅलो फ्राय करायचं.
>>>गूळ आणि कोथिंबीर.
>>>गूळ आणि कोथिंबीर.
मी आतापर्यंत साखरच घातलेली आहे कोबीत. गूळ घालून बघेन.
>>>गूळ आणि कोथिंबीर.
दुकाटाआ
थँक्स स्वातीताई
थँक्स स्वातीताई
मी मुलं कोबीची भाजी खात नसत
मी मुलं कोबीची भाजी खात नसत म्हणून चक्क वरुन अंड फेटून घालून भुर्जी सारखी बनवायचे... मग पटापट संपते... प्रयोग करून पहा.
थँक्स स्वातीताई +१ करून बघेन.
थँक्स स्वातीताई +१
करून बघेन.
अंड फेटून घालून भुर्जी मी पण
अंड फेटून घालून भुर्जी मी पण सारखी बनवते. तेल जरा जास्त व झणझणीत करते, छान लागतं.
माझ्या(म्हणजे मी फक्त
माझ्या(म्हणजे मी फक्त पाठवलेल्या) ग्लुटेनलेस मोमो रेसिपी ला(ज्यात कोबीचे उकडलेले पान मोमो चे आवरण म्हणून वापरले आहे) त्याला सर्वांनी अनुल्लेखाने मारले आहे.का बरं?
कारण इथे कोणी ग्लुटेन हेटर्स
कारण इथे कोणी ग्लुटेन हेटर्स नाहीयेत
कोबीची सायोने लिहिली आहे तशी
कोबीची सायोने लिहिली आहे तशी भाजी आवडते, पीठ पेरून परतलेली भाजी आवडते, कच्च्या कोबीत मीठ+मिरची+साखर+कूट/खोबरं+लिंबूरस+फोडणी अशी पचडी तर भारीच आवडते.
फ्राइड राइस, नूडल्स, लेमन कोरिॲन्डरसारखी सूप्स वगैरेतही कोबी आवडतो.
न आवडण्यासारखं आहेच काय त्यात म्हणते मी!
न आवडण्यासारखं आहेच काय त्यात
न आवडण्यासारखं आहेच काय त्यात म्हणते मी!>>शिजत असताना येणारा भयंकर वास
मेसमधे तर दर शुक्रवारी पाणीदार पचपचीत भाजी असायची म्हणून मी शुक्रवार उपास करायला सुरुवात केली होती
ती कोबीबद्दलची चीड घालवायला मला 5 वर्षं लागली!!
आता पुन्हा खाते आवडीने.
स्वाती..
स्वाती..

कोबी अजिबात आवडत नाही.
अगदी उग्र, कसातरी वास असतो .
कुठलेतरी व्यंजन पाहिजे कोबी सोबत.. बटाटा - मटार, डाळी चे पीठ अथवा नारळ.
भाजी डब्यात नेली आणि डबा उघडला की सगळ्या ऑफिसला कळते...!!!!
अगदी पहिल्या वाफेची, ताजी, गरम फुलक्यांबरोबर कधीतरी छान वाटते..पण तशी खायचा योग येत नाही!!!!
चायनीज मध्ये छान वाटते मात्र...अर्धिकच्ची, क्रिस्प!
आणि श्रावणात कांद्याची रीप्लेसमेंट म्हणून भज्यांत !
किमची कशी करतात? Probiotic
किमची कशी करतात? Probiotic म्हणून चांगली असते असे ऐकले आहे.
एकदाच केली होती ती भयानक चव व वासाची झाली. चक्क फेकून दिली होती.
हा धागा अचानक वर आला आणि कोबी
हा धागा अचानक वर आला आणि कोबी हेटर्स ऐवजी कोबी आवडेश कमेंट यायला लागल्यात!!
लगे हाथ मी पण हात धुऊन ..आपलं .. भजी तळून घेते.
२ मोठे कांदे उभे उभे व पातळ चिरून घ्यायचे, कांद्याहून जास्त होईल इतका कोबी चिरून घ्यायचा .. कांद्याच्या चिरलेल्या सारखाच असाच लांब लांब
मग नेहेमीप्रमाणे मीठ , मिरची , हळद (अजून काय तुम्ही घालत असाल मसाला तर तो ) घालून
कांदाभजीला जसे पीठ भिजवतो तसेच पाण्याचा एकही थेम्ब न घालता पीठ भिजवायचे, व कांदाभजी तळतो तसेच तळायचे!
same to same कांदा भजी सारखी लागते.. सांगितल्याशिवाय कळत नाही कि कोबी घातला आहे!!
कुठलेतरी व्यंजन पाहिजे कोबी सोबत.. बटाटा - मटार, डाळी चे पीठ अथवा नारळ.>> yes खरंय, माझ्या सासूबाई कांदा उभा उभा चिरून फोडणीत घालतात व त्यावर कोबी .. वेगळीच लागते भाजी तशी.
खरेतर किती गुणी आहे बिचारा कोबी..मला वाटतंय सगळ्या देशात available असावा! इथे तरी १२-१५ दिवसातून एकदा ही भाजी हमखास करावीच लागते!!
फ्राईड राईस, व्हेज मोमो,
फ्राईड राईस, व्हेज मोमो, नूडल्स अशा इंडो चायनिज प्रकारांपासून कोबी आवडतो.
गोभी मंचुरियन पासून फुलकोबी चा तोंपासू आयटम बनतो, हे कळाले.
निवडक १०.
निवडक १०.
निवडक १०. >>>
निवडक १०. >>>
मानव पृथ्वी सोडायचा विचार करू लागले असतील.
माधव
माधव

नाम नामेति नामेति धाग्या
नाम नामेति नामेति धाग्या सारखे झालंय ह्या धाग्याचेही. सोचा कूछ हुआ कूछ
सगळा मोहोल कोबी फॅन क्लब झालाय.
--------
किमची कशी करतात? Probiotic म्हणून चांगली असते असे ऐकले आहे. >> हो..अगदी खरेच आहे हे. आणि त्यासाठी योगर्ट केफिर पेक्षा खूप सोप्पा स्वस्त उपाय आहे सर्व सामान्यांसाठी.
एकदाच केली होती ती भयानक चव व वासाची झाली. चक्क फेकून दिली होती. >>चवीची अगदीच कुर्बानी देण्यापेक्षा थोडी मिरपूड टाकून जुगाड करतो आम्ही.
चवीची अगदीच कुर्बानी
चवीची अगदीच कुर्बानी देण्यापेक्षा थोडी मिरपूड टाकून जुगाड करतो आम्ही.>>> शक्य असेल तर रेसिपी द्या ना.
फोटोच ईतका मस्त लावला आहे की
फोटोच ईतका मस्त लावला आहे की हेटर पण लवर्स झालेत
Pages