पानकोबी हेटर्स क्लब

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 December, 2020 - 05:45

मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्‍या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.

लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्‍यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्‍या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.

इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.

पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.

इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्‍यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्‍या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.

असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.

तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कोणी सिझलरच्या खाली जे थोडे किंवा जास्त करप लेले कोबीचे पत्ते असतात ते खात नाही का? मंजे ते खायचे नसतात पण मला आव्डतात. इथे पॉप टेट्स चा एक चिकन गार्लिक पेपर सॉस वाला जबरी सिझलर मिळतो. तो चाटून पुसून एकट्या ने खाउन वर एखादे जळके कोबी पानही खाल्लेले आहे मी. नॉर्म ल इज बोरिन्ग.

बाकी साधी भाजी व कोशिंबीर, चायनीज मध्ये वगिअरे चालतोच मी हिरवे पत्ते कच्चे पन खाते. कचा कचा. फॉस्परस की मॅग्नेशिअम की प्लुटोनिअम मिळतो म्हणे.

इथे काकडीच्या भाजीचा उल्लेख आलाय तर या पँडामिकमधे तेही केले. बागेत काकडीचे भरपूर पीक आले. गावच्या दुकानात १० पौंड बटाटे मिळत होते आणि आधीच्या सिझनचे बटर नट स्क्वाश होते. त्यामुळे अडई अवियल, भात अवियल, काकडी घालून कढी आणि भात असे करत ते चणचणीचे दिवसही पार पडले. Happy

मस्त लेख.
कोबी प्रचंड आवडणारं कुणी असेल अशी शंकाच आहे.> सस्मित, मी आहे यात. आधी हा धागा हेटर्स बद्दल असल्याने प्रतिसाद दिला नव्हता. सायो च्या पद्धतीने कोबीची भाजी, पोहे इ. आवडतात. रश्मी ने सांगितल्याप्रमाणे भजीही आवडतात. पण हे पदार्थ विशिष्ट व्यक्तींच्याच हातचे आवडतात.
पोह्यांमध्ये कांद्याऐवजी कोबी नरसोबाच्या वाडीला पहिल्यांदा खाल्ले होते. आवडले. अर्थात घरात इतरांना ते खाऊन झाल्यावर कळले. तोपर्यंत कुणाला खटकला नाही कोबी. मग मात्र नाकं मुरडली गेली. Wink ;-

सर्वणा भवनमध्ये खिचडी असं नाव असलेला उपमा मिळतो >> अरे अरे!! सर्वणा भवनच्या चुकीच्या शब्दप्रयोगांना उपमा नाही.

रीया, हो मी फ्रँकी नाही पण क्रिस्पी रोल करते पोळीचा, कोबीची भाजी बेस्ट लागते त्यात. घरातल्या चटण्या किंवा शेजवान चटणी आणि उरलेली भाजी असा" हे ते ढकल" रोल आहे तो. पण मला को च्या भाजी बरोबर आवडतो.
सायो म्हणाली तसा कोबी घातलेला उपमा मी ही खाल्ल्याय. माझ्या सासरी चातुर्मास पाळतात (साबा आणि मोठी जाउ) त्यामुळे त्या चार महिन्यात मोठ्या जावे कडे कांद्या ऐवजी कोबी असतो. पण मी असा उपमा फक्त तिच्याच हातचा खाउ शकते. ती अल्टिमेट करते उपमा. कितीही मोठ्या प्रमाणात असो.

>>... फोडणी... दिलेली काकडीची भाजी....

हे भगवान! खरंच, फक्त हेच बघायचं बाकी होतं ते सुद्धा बघायला मिळाले इथे. थंडगार काकडी तळली जात असताना. असो. कधी 'आपत्कालीन परिस्थितीत' तर कधी 'रोजच्या खाण्यात बदल म्हणून' तर कधी 'काय करायचे इतक्या काकड्यांचे' म्हणून अशी भाजी केली जात असावी कदाचित.

कोबीचा धागा निघालाच आहे तर एक मुद्दा सांगावा वाटतोय. नीट साफ नाही केली गेली तर कोबी ही माझ्या पाहण्यातील सर्वांत विषारी भाजी असेल आपल्या खाण्यातील. ह्या पिकाला कीड आणि रोगाचा फार प्रादुर्भाव असतो आणि सतत कीटकनाशक आणि कवकनाशकांचा मारा करावा लागतो. इतपर्यंतही ठीक आहे कारण बऱ्याच पिकांना असतो हा प्रॉब्लेम. पण कोबीची वाढ प्रक्रिया अशी असते की तिचा आधी छोटा गुच्छा असतो आणि हळूहळू एकावर एक अशे थर बनत मग मोठी कोबी तयार होते. तर या प्रत्येक स्टेजला मारलेली रसायने तशीच साठत जातात त्या थरांमध्ये सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला भाजीबरोबर भरपुर कीटकनाशके मिळतात फ्रीमध्ये. आम्ही स्वतःसाठी बहुतेक भाज्या ऑरगॅनिक पिकवतो शेतात पण कोबी आणि अजून काही भाज्या किडीने लै गँडतात त्यामुळे त्या नाही घेत आता. तर सांगायचा मुद्दा हाच की घरी तुम्ही भाज्या स्वच्छ करतच असाल पण बाहेर हाटेलात-चायनीज ठेल्यावर खाताना मी सांगितलेले लक्षात ठेवा. कच्च्या भाज्या खायच्या शौकीन लोकांनी तर जादा सजग रहात जावा.
अल्सो आय हेट कोबी टु Happy

थायरॉईड असेल तर कोबी खाऊ नये असे नानबा यांच्या मायबोलीवरील धाग्यात वाचलेले आठवते.

कोबी आवडणे / नावडणे प्रश्न येत नाही माझ्या बाबतीत. माझ्या एका मैत्रिणीने मॅगी मसाला वापरून कोबीची भाजी केलेली. चांगली चव होती.

सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला भाजीबरोबर भरपुर कीटकनाशके मिळतात फ्रीमध्ये.>> बापरे! कोबी म्हणजे फारच डेंजर प्रकरण दिसतं. आजपासुन कोबी बंद.

जिद्दु माहिती छान, तसेच अजून एक कोबी नावडता सापडला.
कोबी चिरल्यावर पाण्यात चांगला धुवून घ्यायला हवा तर.

कोबी हा हायपो-थायरॉडिझममध्ये टाळावा की हायपर-थायरॉडिझध्ये?

कोबीचा अजुन एक औषधीगुण मानतात, तो म्हणजे अल्सरवर कोबीचा रस पिणे. मला अल्सरची शक्यता दर्शवली होती कॉलेजमध्ये असताना डॉक ने तेव्हा हा घरगुती उपाय करून झालाय माझ्यावर. १५ दिवस आईने कोबीचा रस दिला होता. औषध म्हणुन घ्यायचे तर कसली आलीय आवड निवड, घेतला. तसा मी एकदा कारल्याचा रस सुद्धा घेतला आहे तीन चार महिने दुसऱ्या कसल्या कारणासाठी, आता आठवत नाही का ते.

https://www.maayboli.com/node/12685

हा नानबा यांचा धागा

कारल्याच्या रस मधुमेह असेल तर घेतात. म्हणजे लोकं घेताना बघितले आहे. कृपया डॉक्टरांना विचारून घ्या

लहानपणी कोबीची भाजी आवडायची. नंतर नंतर भाजी प्रकार नको वाटू लागला. कोकणी पद्धतीने नारळ घालून करतात ती भाजी आवडते. माझा एक सहकारी चण्याचे पीठ घालून केलेली भाजी आणतो ती पण आवडते. बाकी बहुतेक पदार्थ - पराठे, स्प्रिन्गरोल, कोशिंबिर, किंवा नुकताच कच्चा बारीक चिरलेला कोबी आवडतो.

आणि हो, लेखातला कोबीचा फोटो एकदम भारी आहे. लगेच चिरून खाण्याची इच्छा झाली. Happy

नवीन पृथ्थकरणीय मशीन ( आयसीपी-एमएस) लाँचसाठी ओइएमने ठेवलेल्या सेमिनारमधे अ‍ॅप्लिकेशन सायंटिस्ट्ने दिलेल्या माहितीनुसार, कोबी, शिमला मिरची, बीट आणी पालक यांच्यात भारतीय मानकानुसार ठरवलेल्या लिमीटपेक्षा पटीने ( १०/१५/२५ असे) जास्त पेस्टिसाईड असते.
साधारण घरात जेव्हा पालक बीट वगैरे (कुकरमधे) शिजवला जातो तेव्हा पेस्टिसाईडचा वास दरवळत असतो. यापुढे ऑब्झर्व्ह करा.

पण कोबीची वाढ प्रक्रिया अशी असते की तिचा आधी छोटा गुच्छा असतो आणि हळूहळू एकावर एक अशे थर बनत मग मोठी कोबी तयार होते. तर या प्रत्येक स्टेजला मारलेली रसायने तशीच साठत जातात त्या थरांमध्ये सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला भाजीबरोबर भरपुर कीटकनाशके मिळतात>>> हे काही कळले नाही. असे एकावर नवीन थर कसा तयार होणार? तसे असेल तर त्यावर पडलेली माती, किटक तयार होणाऱ्या नवीन थराखाली दबून जातील आणि तो कोबी कापल्यावर ते दिसायला हवे.
नवीन थर वाढताना त्या आत/खाली दुसरा नवीन थर तयार होत असेलना

माझी एक पूर्वीची शेजारीण, कोबीची पाने काढून चिरत असे.का तर म्हणे आत अळी असेल तर तसाच कोबी चिरला जाऊ नये.

एकावर नवीन थर बनतात पण आधी बाहेरची मोठी पाने बनून मग हळू हळू आतली पाने बनत कालांतराने (तीन-चार महिने?) गड्डा तयार होतो. बाहेरच्या मोठ्या पानांमुळे माती किंवा कचऱ्यापासून आतला गड्डा सुरक्षित राहतो. पण तरीही किडीचा शिरकाव त्यात होऊ शकतो. म्हणून अधूमधून औषध फवारणी करतात.

कोबीत पेस्टिसाइडचं प्रमाण अधिक आहे हे ऐकलयं. पांढरा न घेता पिवळसर असलेला घ्यावा म्हणे ( इति फुड फुड) , पण तो डोळ्यांना स्वच्छ वाटत नाही. अमेरिकेत भाज्या अतिशय सुंदर वाटतात पण चव नसते तितकी असा अनुभव आहे. शिजवताना फार पाणी सुद्धा सुटते. (चोरट्या) काय काय रसायणं आहेत काय माहिती. ज्या फळांची साल काढता येते त्यात पेस्टिसाइड कमी प्रमाणात असतात असं वाचलयं. बाकी सगळंच Organic घेणे महाग वाटते.
भाज्यांच्या बाबतीत... मिट्टीसे डर नही लगता केमिकल से लगता है , असं होतं. जे धुता येते ते बरंच आहे घाण परवडली.
मोठा गड्डा म्हणून हायब्रिड वाटतो. एकुणच आजकाल आपण प्लॅस्टिक खातोयं का अशीच शंका येते अधुनमधून !!

बापरे. हे माहीत नव्हतं.
मला कोबी तुलनेने सुरक्षित भाजी वाटायची. वरची पाने काढून टाकायची असल्याने.

अमेरिकेत एन्व्हायर्मेंटल वर्क ग्रूप (EWG) दरवर्षी डर्टी डझन व क्लिन फिफ्टीन (किंवा आकडा बदलत असतील अधून मधून) अशी यादी जाहीर करतात. डर्टी डझन म्हणजे खूप किटकनाशके तर क्लिन फिफ्टीन म्हणजे कमी किटकनाशके असलेल्या भाज्या/फळे याची यादी. कोबी क्लिन फिफ्टीन मध्ये ३ वर्षे तरी स्थान मिळवून आहे. त्यापूर्वी ह्या संस्थेविषयी मला माहिती नसल्याने आकडेवारी माहिती नाही.
https://www.ewg.org/foodnews/clean-fifteen.php

अमेरिकेची गोष्ट वेगळी असते ही आपल्या भारताची लिंक
“Farmers use up to 25 rounds of pesticide spray to safeguard these vegetables. These toxic chemicals remain in the vegetable even after 35 to 45 days of harvest, thus jeopardising lives of the general public who consume them.”
Read more at: https://www.deccanherald.com/city/it-s-here-pesticide-free-cauliflower-c...
जिद्दुने कोबी बंद केली बऱ्याच जणांची आजपासून Lol

अमेरिकेची गोष्ट वेगळी असते >>> हे मात्र खरे आहे. आपल्याकडे किटकनाशक पचवायची क्षमताही जास्त असावी. किंबहुना आता शरीराला त्याची सवयही झाली असेल. त्यामुळे उगाच घाईघाईत कोबी खायचा बंद करू नका. अचानक दारू बंद केलेल्या बेवड्याप्रमाणे उलटे परीणाम नको व्हायला.

अचानक दारू बंद केलेल्या बेवड्याप्रमाणे उलटे परीणाम नको व्हायला. >> Rofl कोबीचा विथड्रॉल येत असेल तर काय सॅड लाईफ असेल...

<<<कोबीची वाढ प्रक्रिया अशी असते की तिचा आधी छोटा गुच्छा असतो आणि हळूहळू एकावर एक अशे थर बनत मग मोठी कोबी तयार होते. तर या प्रत्येक स्टेजला मारलेली रसायने तशीच साठत जातात त्या थरांमध्ये सो फायनल प्रोडक्ट मध्ये आपल्याला भाजीबरोबर भरपुर कीटकनाशके मिळतात>>> +१११

माझी मम्मी पण हेच सांगते, की कोबीच्या प्रत्येक थराला कीटकनाशके लागतात. म्हणून मम्मा मीठ घालून कोमट पाण्यात धुते कोबी.

आमच्याघरी कुणालाच कोबी आवडत नाही, त्यामुळे जास्त बनत नाही, पण केला तर कांदा लसणाची फोडणी अन भरपूर अख्खे मसूर घालून करतो.

रच्याकने, मानवकाका, मीही नावडता पदार्थ पहिले खाते ☺️

मी सुद्धा ना आवडता पदार्थ पहिला खाते आणि वाढणाऱ्याला स्पष्ट सांगते की मला हा पदार्थ फारसा आवडत नाही, तुम्ही चांगला केलाय म्हणून ताटात वाढलेला मी संपवला पण मला परत वाढू नका. दुसरी आवडलेली गोष्ट सांगून सांगते हे हे मला आवडतं, ते मी नक्की मागून घेईन. आवडलेली गोष्ट मी एकदा मागून घेते मग म्हणते आता बास, पोट भरलं. अजून खाल्लं असतं मी खरं तर पण पोटात अजिबात जागा नाहीये. तरी मी हे हे मागून खाल्लं की नाही.

मला जनरलच आग्रह करून करून वाढणाऱ्यांचा वैताग येतो. मला स्वतःला अग्रह करता येत नाही अजिबात.

कोबीचा विथड्रॉल
Rofl

मला दोन्ही कोबी आणि शिमगा मिर्ची यांचा इतका कंटाळा आलायं ना की ज्याचं नाव ते, ती लिंक मी बधीर मनाने पाहिली
Happy

Pages