पानकोबी हेटर्स क्लब

Submitted by मानव पृथ्वीकर on 28 December, 2020 - 05:45

मी लहानपणा पासून जेवायला वाढलं ते मुकाट्यानं खाणारा. पण गोड कमी खाणारा.
सगळ्या भाज्या आवडो न आवडो खायचो. भेंंडी, बटाटे, वांगी, फुलकोबी, कारली, कार्टुलं, फणस, चवळी, वाटाणे, वाल, गवार, लाल भोपळा, सर्व पालेभाज्या या आवडत्या भाज्या.
तोंडली, ढब्बू मिर्ची, दोडके, कद्दु (दूधी), पडवळ, वगैरे चालून जाणार्‍या भाज्या.
तर पानकोबी ही नावडती भाजी.
पण घरी सगळ्यांना आवडणारी/चालणारी भाजी त्यामुळे नेहमी केली जायची. आणि सगळ्या भाज्या खाव्यात असे आई बाबा सांगत, स्वतःही खात ते मलाही पटे. पण कितीही प्रयत्न केला तरी पानकोबीची भाजी खाणे माझ्या प्रंचंड जीवावर यायचे. मग ती डाळ घालुन केलेली असो, पीठ लावून की बटाटे घालून की कच्ची. पानकोबी आणि माझं सूत कधीच जमलं नाही. पण केली, पानात वाढली की मुकाट्याने खायचो. कधी ती भाजी खाण्याच्या बदल्यात सोबत गूळ तूप मिळण्याचे आई सोबत डील व्हायचे. त्यामुळे पान कोबीची भाजी वरुन मस्त लिंबु पिळुनही आवडत नाही हे बघून "गाढवाला गुळाची चव काय?" असे घरी कोणी म्हणण्याची सोय नव्हती, म्हटले की मी लगेच गूळ तूप मागायचो.

लहानपणापासून मला आपलं आपण वाढुन घेउन जेवायला आवडतं. पण काहीजणांना वाढायची हौस असते. आई, काकू, मावशी, आत्या आपल्या, मित्रांच्या, शेजारांच्या यांना वाढायला आवडतं किंवा प्रथा म्हणुन तरी कोणी आलं गेलं तर वाढतात. आपण वाढलेल्या पानातील न आवडणारे पदार्थ आधी संपवून मग आवडीच्या पदार्थांवर ताव मारावा असा विचार करतो. पण वाढणार्‍यांना वाटतं याने / हिने हा पदार्थ आधी संपवला म्हणजे आवडलेला दिसतोय. आपण मात्र संपवला ब्वा तो एकदाचा असे म्हणत आवडीच्या पदार्थांवर ताव मारायला सुरवात करतो तेवढ्यात वाढणारे आपण बेसावध असताना भसकन मोठ्या पळीभर तो संपवलेला नावडता पदार्थ आपल्या पानात वाढतात.
या प्रकाराने मला खूप छळले आहे. नावडती पानकोबी आधी संपवून आवडत्या भरली वांगी / पालक पनीर वगैरेंवर ताव मारायला सुरवात देखील करत नाही तोच भसकन परत पानकोबी पानात. काय विरस होतो म्हणुन सांगू! त्यामुळे मोठेपणी आपल्या वाट्याला कधी वाढण्याचे काम आले तर लोक जो पदार्थ आधी संपवतात तो आपण होउन वाढण्याचा आगाउपणा अजिबात करायचा नाही हे माझ्या मनात बालपणापासूनच रुजले. पुढे तर मी वाढणे या प्रथेच्या विरोधात गेलो, अजूनही आहे. तसेच पानकोबी न आवडणार्‍या मुलीशीच लग्न करायचे हे सुद्धा मी लहानपणीच ठरवले होते.

इंजिनिअरींगला होस्टेलला राहीलो तिथे ही पानकोबीने माझा पिच्छा सोडला नाही, मेस मध्ये पानकोबी असायचीच.

पण नंतर मुंबईला नोकरी लागली आणि मुंबईला मेस नावाचे प्रकार कमी, हॉटेल मध्ये जाउन ऑर्डर करुन खायचे. हॉटेलच्या मेन्यु मध्ये गोबी म्हणजे फुलकोबी असायची पानकोबी नसायचीच कुठे! मला खूप आनंद झाला. पुढे पुणे मग हैद्राबादला फिरतीची नोकरी महिन्यातून पंधरा वीस दिवस टूर त्यामुळे मेस कधी लावली नाही. पानकोबी हॉटेलमध्ये कधी नावालाही दिसली नाही की मी घरी स्वयंपाक केला तर मी पानकोबी कधी आणणेही शक्यच नव्हते. अशा रितीने अनेक वर्षे मजेत गेली आणि मला पानकोबीचा पूर्णपणे विसर पडला.

इतका की लग्नासाठी मुलींना भेटायला लागलो तेव्हा बाकी गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी जाणुन घेताना मला कधी पानकोबीची आठवणही आली नाही. आणि साखरपुड्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी भावी बायकोच्या घरी गेलो तर नाश्त्याला पानकोबीचे पराठे! कितीतरी वर्षांनी पानकोबी माझ्या जिभेवर आली होती. माझ्या सासुरवाडीचे सगळे पानकोबी बर्‍यापैकी आवडणारे निघाले. पण मी आता पानकोबी न खाणार्‍या मुलीशीच लग्न करण्याचा बालहट्ट सोडला आणि भाजी आणण्याचे काम आपणच करायचे, पानकोबी आणायचीच नाही असा तत्क्षणी निर्धार करुन पानकोबी मुकाट्याने घशाखाली उतरवली. लग्नानंतर एकमेकांच्या आवडी-नावडी दीड दोन वर्षे काटेकोरपणे जपल्या गेल्या आणि पुढे हळुहळु पानकोबीने आमच्या सुखी संसारात प्रवेश मिळवलाच, तो आजतागायत आहेच. मागची दोन आठवडे मी पानकोबी आणणे टाळले, आज भाजी आणायची आहे आणि पानकोबी नक्की आणाण्याचे बायकोने फर्मान सोडले आहे.

असो, तर मला खात्री आहे की माझ्या सारखे पानकोबी न आवडणारे भरपूर नसले तरी निदान काही लोक असतीलच, अशा लोकांचा हा क्लब. आपल्या पानकोबीच्या कथा / व्यथा / टाळण्याच्या युक्त्या येथे मांडाव्यात.

तळटीपः
१. I hate getting up early वगैरेंमध्ये जसा hate चा अर्थ आहे तसाच इथे घ्यावा. लेखक कुणाचाही द्वेष करत नाही, द्वेष करण्याला प्रोत्साहन देत नाही, पृथ्वीवरील सर्व मानव जात गुण्यागोविंदाने नांदावी या विचाराचा आहे.
२. पानकोबी लव्हर्सचे सुद्धा इथे स्वागत असेल, त्यांना या धाग्याचे निमित्ताने लिहावेसे वाटले तर नि:संकोच लिहावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol अस्मिता

मीही नावडते पदार्थ आधी खाते, नंतर आवडते.

माझी कल्पनाशक्ती भराऱ्या मारतेयं ....
कोबीडे लोकं उद्यापासून कोबी बंद म्हणजे बंद म्हणून पुन्हा सकाळी पिशवी घेऊन दोन गड्डे घेऊन येतील. Biggrin

Biggrin
शिमगा मिरची तिचे भाव कधीही कडाडत नाहीत. १० वर्षापूर्वी ज्या भावात मिळायची त्याच आसपास भाव आजही असतो. ताटात शिमला मिरची वारंवार दिसल्यावरच इकॉनॉमिस्ट लोक इन्फ्लेशन इ चर्चा करायला घेत असावेत. Wink कुणी कुणी स्टफ्ड शिमगा करतात. मग ते जे काय स्टफ्ड असतं ते आधी ताटात ओतायचं किंवा चीझ-बीज सारखं चिपकू असेल तर चमच्याने ओरबाडायच. मग शिमगा मिरची आधी खायची ... आणि ढोबळी झाले तर झाले म्हणत आतलं स्टफ्ड जे काही असेल ते खायचं... असं नाही केलं तर आतलं चमचमीत बटाटा/नारळ्/भात-चीझ इ जे काही असेल ते खाऊन झाल्यावर ती वाफवलेली मिरची गळ्याखाली जात नाही... नुसतं "स्टफींग" का नाही करत/वाढत? Happy

एरवी शिमला मिरची आवडते. नारळ इ घालून छान होते भाजी.

नुसतं "स्टफींग" का नाही करत/वाढत?
त्याला चटणी/सॉस म्हणतात, शिमगा कसा साजरा होणार आणि Lol
आज माझ्याकडे शिमला मिरची -बटाटा होता.

नुसतं "स्टफींग" का नाही करत/वाढत? >> हा एक आदिम सवाल आहे. ज्ञानदेवांनी मुक्ताईला विचारल्यावर पाठी चांगलीच शेकून मिळालेली अशी एक कथा आहे म्हणे. माझा आईशप्पथ विश्वास आहे.

करेक्ट आहे नाहीतर पसायदान कशाला लिहीलं असतं... अख्खा अमृतानुभव लिहूनही स्टफींग वाढत नाही म्हणजे काय?!!!

मला जनरलच आग्रह करून करून वाढणाऱ्यांचा वैताग येतो. मला स्वतःला अग्रह करता येत नाही अजिबात.....+१.

लिंक मी बधीर मनाने पाहिली... Lol

>> शिमगा मिरची
Lol
नका हो. त्यापेक्षा ती एक जगातली सर्वात तिखटवाली मिरची आहे तिचे नाव शिमगा ठेवायला हरकत नाही. ती शिमला तर हि शिमगा. अध्येमध्ये आहेतच लवंगी, कोल्हापुरी, ब्याडगी इत्यादी.

बादवे, कीटकनाशकांच्या उल्लेखामुळे आता खरा पानकोबी हेटर्स क्लब सुरु झाला असे म्हणायला हरकत नसावी.

ऋन्मेषला कीटकनाशकांचा विथड्रॉल सिम्प्टम म्हणायचं असणार.
>>>>
हो मला तेच म्हणायचे होते. पण चार लोक हसताहेत तर कश्याला रंग मे भंग करावे Happy

ब्याळगी मिरची अजिबात तिखट नसते. पण ती पदार्थाला लाल रंग देते आणि त्यामुळे भूक चाळवली जाते. पूर्वी ब्याळगी रंगासाठी आणि संकेश्वरी तिखटपणासाठी असे मिश्रण करून मिरचीपूड करून ठेवीत.
जा. जा. : पूर्वी संकेश्वरी मिरची महाग असे. आणि ब्याळगी स्वस्त. आता उलट झाले आहे.

हीरा, आम्ही अजूनही संकेश्वरी अन ब्याडगी मिरची एकत्र दळतो अन त्यात कोल्हापुरी मसाला मिसळतो.
सुंदर रंग , ठसकेदार अन अत्युत्तम चवीचे तिखट बनते, वरून वेगळा मसाला न घालता जेवण रुचकर लागते.

कोबीचे चायनीज कॅबेज, बोक चोई हे भाऊबंद चिनी डिशेस मध्ये भारी लागतात. बाळ कोबी उर्फ Brussels sprouts एरवी बेचव असले तरी ग्रिल केल्यावर मस्तच लागतात. लो कॅलरी असल्याने कोबीचं जेवणात प्रमाण वाढवायचा प्रयत्न करत आहे.
हे सॉसेज अँड कॅबेज-
IMG_20240414_125707.jpg

आजच कोबी पराठे केले आणि हा लेख समोर आला..

आवडती भाजी कारण शिरायला आणि करायला अतिशय सोपी..

पिवळी, बटाटा, मटार, गजर जे मिळेल ते घालून ही भाजी करता येते. पटकन होते.
गाजर, कांदा, सिमला मिरची घालून चायनीज सारखी ही करता येते, ती मुलांना डब्यात रोल करू द्यायला सोपी पडते.
ग्रानिशिनग, सिझलर, सलाड, सगल्यातला कोबी आवडतो, फक्त कोबीची कोशिंबीर सोडून.
कोबीच्या vadyahi छान लागतात

Not anti- pankobi at all

कोबी साधी भाजी आवडत नाही.पण आलं, लसूण, कांदा टोमॅटो गाजर घालून थोडा चिंगस शेझवान चटणी मसाला घालून चायनीज भाजी आवडते.

पानकोबी हेटर नाही पण पानकोबी पाणी टाकून शिजत असतांना एक विचित्र घाण वास येतो, तो असह्य होतो.

उपाय - फक्त तेलावर परतून केलेला कोणताही पानकोबीयुक्त पदार्थ Happy

पानकोबीची भाजी चालवून घेते ( न घेऊन सांगते कुणाला? दररोज काय भाजी करायची या न संपणाऱ्या प्रश्नाचे एक उत्तर का कमी करू? भाजीत आले, कढीपत्ता, (सीझनला मटार) मस्ट.) एक एमपीची मैत्रीण डब्यात टोमॅटो, धणे-जिरे पावडर घातलेली भाजी आणायची ती आवडायची. पण तिच्या पद्धतीने करूनही माझ्या हाताला ती चव आली नाही. भानोले घरात आवडले होते. पण त्याचा खटाटोप फार आहे. (सीझनला सम प्रमाणात गाजर,) भरपूर ओले खोबरे वगैरे घातलेली पचडी फार आवडते. किमची आवडते. स्प्रिंग रोल्स आवडतात.

बाकी कोबीचा कलाकंद, खीर, लसणीची खीर ई. करणाऱ्यांच्या धाडसाला मी लाल सलाम करते आणि मी तेवढी धाडसी /हौशी नाही हे जाहीर करते.

कोबीचा विथड्रॉल सिम्प्टम >>>> Lol Lol

पूर्वी कोबी अजिबात आवडायची नाही. हल्ली डाळ घालून आवडते, थोडा कोल्हापुरी कांदालसुण मसाला घातला की उग्रपणापण जातो. नुसती कच्ची कोबी, कोशिंबीर, कोबीचं थालिपीठ इ. आवडतं.
हेटर्स क्लब मध्ये काय आवडतं लिहुन माबोपणा सिद्ध केला आहे. Wink

मला हिंग-मोहरी-मिरचीच्यांची फोडणी देवून नुसत्या वाफेवर शिजवलेली कोबीची भाजी आवडते. भाजी शिजत आली की हळद आणि मीठ.
कोबी, गाजर आणि सफरचंद सॅलड, कोबी-गाजर कोशिंबीर, कोबीच्या वड्या-थालीपीठ बरेचदा केले जाते. कोबीची भजी आणि कोलस्लॉ सगळ्यात जास्त आवडते प्रकार पण ते कधीतरीच खाता येतात. घरी केलेला सॉवरक्रॉट आवडतो. किमची आवडते पण आजकाल तिखट सोसत नाही.

Pages