फ्लॅमिंगो

Submitted by आर्त on 23 December, 2020 - 16:20

अलीकडेच मी फ्लॅमिंगो पक्षी पाहिले. त्यांचा देह, त्यांचा प्रवास आणि खुल्या आभाळातलं उडणं पाहून, माझ्या मनात काही विशेष भाव तरळले आणि मला मनात कुठेतरी पटलं कि हे पक्षी ह्या लोकातील नाहीतच. त्यांना अनुभवायचा जो आंतरिक आनंद होता, त्यावर आधारित हि कविता. फ्लॅमिंगो पक्षी ला मराठी मध्ये रोहित किंवा अग्निपंखी म्हणतात.
-----
फ्लॅमिंगो

आतुर क्षितिजाशी पहाट भिडली
सूर्य लाली साठवून आला
रोजचेच ते उजाडणे होते
पण काही न्यारा अंश त्याला.

तेजाचे कण थव्या - थव्याने निखळले
रवी तरीही अखंड राहिला
सूर्यातुषारांनी आभाळ भरले
आकाशी पैठणीवर नक्षीदार रक्तिमा.

डोळे चोळत सारे प्रेक्षक
काही संभ्रमित, बहुतांश संमोहित
अलौकिकातून पुष्पक आले
तसे अवतरले धरतीवर रोहित.

संथ हिमवृष्टी सफेद तांबडी
उथळ तळावर अलगद पडता
वंदण्यास जुळले कर माझे
जाणिवेस मिळाली नवी सखोलता.

तपस्वीपरी अचल उभे राहणे
त्यांचे चालणे सावध आणि राजबिंडे
धरणीपासून एक पाय अलिप्त
चोच उंच प्रपंचा पलीकडे.

निशा आली पौर्णिमेस हाताशी खेचून
हा चर्चीत चमत्कार बघायला
दूध प्रकाशातल्या श्यामल जळात
गंगेच्या आरत्या उभ्या राहिल्या.

अगणित ज्योती तेजोमय उजळत
हवेच्या स्तब्धतेत मिसळत
गगन राहिले क्षणभर स्तिमित
हे कोणते तारे धरेवर चमकत?

काही मास पावन झाले
आली तशी अलगद उठली पालखी
पुन्हा येतो, सांगून गेले,
लोकात आपुल्या ते अग्निपंखी.

ना उपकरण कोणते, ना तंत्रज्ञान, तरी
म्हणे, वाट कधी ना हरवती ते खग
सर्व आणि सर्वथा असून सुध्दा
मी दिग्भ्रांत अधिकानधिक .

Group content visibility: 
Use group defaults