दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड

Submitted by हरचंद पालव on 22 December, 2020 - 02:53

मला ह्या हिंदी चित्रपटांतील हिरोंचं काही कळतच नाही. एरवी चारचौघांसारखं आयुष्य न जगता हिरोगिरी करत असतात (अमोल पालेकर प्रभृती काही सन्मान्य अपवाद वगळता), तेव्हा 'चार लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करणं ह्याला ते अजिबात म्हणजे अजिबात तुच्छ लेखतात. पण नंतर त्यांना ते चार लोक आठवतात. बरं, हिरोच्या वागण्यावर काहीतरी शेरेबाजी करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्या त्या लोकांना एक सामूहिक नाव आपल्या चित्रपटसृष्टीने दिले आहे, ते म्हणजे 'दुनियावाले'. काही वेळा त्यांना 'जगवाले' असंही म्हणतात. तर हे दुनियावाले किंवा जगवाले जे कुणी असतील, ते कायम आपल्याला जज करत असतात असं जजमेंट हिरो लोक पास करतात. म्हणजे एक प्रकारचं ते इन्सेप्शन जजमेंट आहे. ह्या हिरो लोकांच्या गाण्यांत दुनियावाले ही जमात बाकी काही उदीम-व्यवसाय न करता केवळ आणि केवळ जज करणे हा एकच उपक्रम नेटाने चालवताना आढळून येते. त्यामुळे त्यांना जगवाले म्हणायच्या ऐवजी सरळ 'जजवाले' का नाही म्हणत हा एक रास्त प्रश्न ठरावा.

ह्या जजवाल्या लोकांना 'दुनियावाले' म्हणायचं काय कारण आहे समजत नाही. ते 'दुनियावाले' असतील तर मग हिरो काय परग्रहावरून टपकला आहे का? निदान त्या कपडे धुवायच्या साबणाच्या जाहिरातीत असतं तसं 'साधारण टिकिया'सारखं 'साधारण वाले' किंवा 'साधारण लोग' म्हणायला काय हरकत आहे? शंकर महादेवनने स्व ची संकल्पना आणखी व्यापक करून जे हिंदुस्थानी नाहीत ते दुनियावाले अशी विल्हेवाट लावली आणि मग तो त्यांना 'सुनो गौर से दुनियावालों' असे खडे बोल सुनावतो. इथे दुनियावाल्यांच्या सेटमध्ये हिंदुस्थानी हा एक सबसेट म्हणून कल्पिला तरी चालतो, कारण 'सबसे आगे होंगे हिंदुस्थानी' हे स्वतः हिंदुस्थानी लोकांनी पण गौर से ऐकावं असंच आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळात आलेल्या किस्मत नावाच्या चित्रपटात कवी प्रदीप यांनी 'दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है' असा नारा दिलाच होताच.

ते असो. हे दुनियावाले एक-जात एक नंबरचे वाईट लोक असतात. त्रिमूर्ती चित्रपटात उघड उघड 'दुनिया रे दुनिया व्हेरि गुड व्हेरि गुड, दुनियावाले व्हेरि बॅड व्हेरि बॅड' असं वर्णन आहे. ह्या दुनियावाल्यांना हिरो-हिरॉइन काय काय करतात ह्यात कमालीचा रस असतो अशी हिरोची समजूत असते. त्यामुळे 'यह दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई, यह बात किसी से ना कहना' असं देवानंद आधीच आशा पारेखला सांगून ठेवतो. कोण विचारतो नंतर तिला हे प्रश्न? ह्या गाण्यात 'तुझे नैन का झुकलेले आहेत' किंवा 'तुझ्या स्वप्नात कोण येतो'? हे असले सिम्टम्प्स पाहून प्रश्न विचारणार्‍या लोकांना मराठीत गाणारी राधा उगीचच 'दुनियावाले' न म्हणता 'या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा' असं म्हणते. सी हौ स्पेसिफिक शी इझ! इथे हे वाक्य गीताच्या (म्हणजे गाण्याच्या, गीता नावाच्या मुलीच्या नाही) हिरोच्या नसून हिरॉइनच्या तोंडी आलं आहे, हे ही लक्षात घेण्यासारखं आहे युवर ऑनर.

चंदनासारखं शरीर लाभलेल्या नूतनचं चंचल हास्य बघून मनीष दिवाणा झाला तर दुनियावाल्यांना काय प्रॉब्लेम आहे? तरी पण तो 'मुझे दोष न देना जगवालों हो जाऊं अगर मैं दीवाना' अशी ताकीद आधीच देऊन ठेवतो. मुघले आझममध्ये हिरवीणची बहीणसुद्धा 'ऐ इश्क, ये सब दुनियावाले बेकार की बातें करते हैं' असं म्हणून दुनियावाल्यांना वेड्यात काढते. नौशादचं अप्रतिम संगीत आणि लताचा गोड गळा लाभल्यामुळे हा (बोरकरांच्या शब्दात) मधाचा जंबिया आपल्यासारखे दुनियावाले काळजात आनंदाने रुतवून घेतात. अनुपमा चित्रपटात धरमपाजी मनातलं दु:ख सगळ्यांना सांगू शकत नाहीत तेव्हा ते 'या दिल की सुनो दुनियावालो' असा एक सल्ला देऊन जातात. त्याउलट, हे दुनियावाले काय विचार करतील ह्याची आधीच पूर्वग्रहदुष्ट कल्पना करून बगावत चित्रपटात धरमपाजी आणि हेमा 'दुनिया से दुनियावालों से हम आज बगावत करते है' गात सुटतात. तत्पूर्वी ते काय म्हणतात, तुझ्या हुस्नाने मला मगरूर केलंय आणि तुझ्या इश्काने माझा आरसा फोडून टाकलाय. आता ह्यात दुनियावाल्यांची काय चूक आहे? तरी म्हणे बगावत करते हैं! करा बापडे, दुनियावाल्यांचं काही जात नाही.

अश्या प्रकारे दुनियावाले ही एकंदरीतच वाईट चीज आहे अशी कल्पना आतापर्यंत करून घेतल्यामुळे त्यांची दुनिया ही तांबं आणि झिंक ह्यांच्या मिश्रधातूने बनली आहे असं वक्तव्य ठामपणे करताना नव्या जमान्याची हिरवीण म्हणते 'ये दुनिया पित्तलदी'. मुळात दुनिया वाईट नसून दुनियावाले वाईट आहेत हा संदेश ती सोयीस्करपणे विसरलेली दिसते. दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड, दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

>>> एकटेच जंगलात वगैरे असतात तरीही "दुनियावालोंको दिखादेंगे, बतादेंगे, बगावत करेंगे"

If a tree falls in a forest… Proud

हो नं, जंगल में मोर नाचा किसने देखा Happy आपण निदान 'आंब्याच्या वनात' असं स्पेसिफिक तरी सांगतो. Proud

बरेचदा हिरोहिरविन एकटेच जंगलात वगैरे असतात तरीही "दुनियावालोंको दिखादेंगे, बतादेंगे, बगावत करेंगे" वगैरे घसा फाडून आवेशाने म्हणतात पण ऐकायला चिटपाखरूही नसते. >>> Lol

अस्मिता Lol

त्यांना दिलं असतात आणि त्यांनी दान दिलं तरी कुणी बघत नाही (नाचाप्रमाणे). मग त्यांनाच सांगायला लागतं - ऐ दिले ना दान!

स्वाती, त्या अनाडीमधल्या गाण्यात हिरो चक्क दुनियावाल्यांना शरण गेला आहे. Happy

Pages