दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड

Submitted by हरचंद पालव on 22 December, 2020 - 02:53

मला ह्या हिंदी चित्रपटांतील हिरोंचं काही कळतच नाही. एरवी चारचौघांसारखं आयुष्य न जगता हिरोगिरी करत असतात (अमोल पालेकर प्रभृती काही सन्मान्य अपवाद वगळता), तेव्हा 'चार लोक काय म्हणतील' ह्याचा विचार करणं ह्याला ते अजिबात म्हणजे अजिबात तुच्छ लेखतात. पण नंतर त्यांना ते चार लोक आठवतात. बरं, हिरोच्या वागण्यावर काहीतरी शेरेबाजी करण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्या त्या लोकांना एक सामूहिक नाव आपल्या चित्रपटसृष्टीने दिले आहे, ते म्हणजे 'दुनियावाले'. काही वेळा त्यांना 'जगवाले' असंही म्हणतात. तर हे दुनियावाले किंवा जगवाले जे कुणी असतील, ते कायम आपल्याला जज करत असतात असं जजमेंट हिरो लोक पास करतात. म्हणजे एक प्रकारचं ते इन्सेप्शन जजमेंट आहे. ह्या हिरो लोकांच्या गाण्यांत दुनियावाले ही जमात बाकी काही उदीम-व्यवसाय न करता केवळ आणि केवळ जज करणे हा एकच उपक्रम नेटाने चालवताना आढळून येते. त्यामुळे त्यांना जगवाले म्हणायच्या ऐवजी सरळ 'जजवाले' का नाही म्हणत हा एक रास्त प्रश्न ठरावा.

ह्या जजवाल्या लोकांना 'दुनियावाले' म्हणायचं काय कारण आहे समजत नाही. ते 'दुनियावाले' असतील तर मग हिरो काय परग्रहावरून टपकला आहे का? निदान त्या कपडे धुवायच्या साबणाच्या जाहिरातीत असतं तसं 'साधारण टिकिया'सारखं 'साधारण वाले' किंवा 'साधारण लोग' म्हणायला काय हरकत आहे? शंकर महादेवनने स्व ची संकल्पना आणखी व्यापक करून जे हिंदुस्थानी नाहीत ते दुनियावाले अशी विल्हेवाट लावली आणि मग तो त्यांना 'सुनो गौर से दुनियावालों' असे खडे बोल सुनावतो. इथे दुनियावाल्यांच्या सेटमध्ये हिंदुस्थानी हा एक सबसेट म्हणून कल्पिला तरी चालतो, कारण 'सबसे आगे होंगे हिंदुस्थानी' हे स्वतः हिंदुस्थानी लोकांनी पण गौर से ऐकावं असंच आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्वकाळात आलेल्या किस्मत नावाच्या चित्रपटात कवी प्रदीप यांनी 'दूर हटो ऐ दुनियावालों हिंदुस्तान हमारा है' असा नारा दिलाच होताच.

ते असो. हे दुनियावाले एक-जात एक नंबरचे वाईट लोक असतात. त्रिमूर्ती चित्रपटात उघड उघड 'दुनिया रे दुनिया व्हेरि गुड व्हेरि गुड, दुनियावाले व्हेरि बॅड व्हेरि बॅड' असं वर्णन आहे. ह्या दुनियावाल्यांना हिरो-हिरॉइन काय काय करतात ह्यात कमालीचा रस असतो अशी हिरोची समजूत असते. त्यामुळे 'यह दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई, यह बात किसी से ना कहना' असं देवानंद आधीच आशा पारेखला सांगून ठेवतो. कोण विचारतो नंतर तिला हे प्रश्न? ह्या गाण्यात 'तुझे नैन का झुकलेले आहेत' किंवा 'तुझ्या स्वप्नात कोण येतो'? हे असले सिम्टम्प्स पाहून प्रश्न विचारणार्‍या लोकांना मराठीत गाणारी राधा उगीचच 'दुनियावाले' न म्हणता 'या सार्‍याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा' असं म्हणते. सी हौ स्पेसिफिक शी इझ! इथे हे वाक्य गीताच्या (म्हणजे गाण्याच्या, गीता नावाच्या मुलीच्या नाही) हिरोच्या नसून हिरॉइनच्या तोंडी आलं आहे, हे ही लक्षात घेण्यासारखं आहे युवर ऑनर.

चंदनासारखं शरीर लाभलेल्या नूतनचं चंचल हास्य बघून मनीष दिवाणा झाला तर दुनियावाल्यांना काय प्रॉब्लेम आहे? तरी पण तो 'मुझे दोष न देना जगवालों हो जाऊं अगर मैं दीवाना' अशी ताकीद आधीच देऊन ठेवतो. मुघले आझममध्ये हिरवीणची बहीणसुद्धा 'ऐ इश्क, ये सब दुनियावाले बेकार की बातें करते हैं' असं म्हणून दुनियावाल्यांना वेड्यात काढते. नौशादचं अप्रतिम संगीत आणि लताचा गोड गळा लाभल्यामुळे हा (बोरकरांच्या शब्दात) मधाचा जंबिया आपल्यासारखे दुनियावाले काळजात आनंदाने रुतवून घेतात. अनुपमा चित्रपटात धरमपाजी मनातलं दु:ख सगळ्यांना सांगू शकत नाहीत तेव्हा ते 'या दिल की सुनो दुनियावालो' असा एक सल्ला देऊन जातात. त्याउलट, हे दुनियावाले काय विचार करतील ह्याची आधीच पूर्वग्रहदुष्ट कल्पना करून बगावत चित्रपटात धरमपाजी आणि हेमा 'दुनिया से दुनियावालों से हम आज बगावत करते है' गात सुटतात. तत्पूर्वी ते काय म्हणतात, तुझ्या हुस्नाने मला मगरूर केलंय आणि तुझ्या इश्काने माझा आरसा फोडून टाकलाय. आता ह्यात दुनियावाल्यांची काय चूक आहे? तरी म्हणे बगावत करते हैं! करा बापडे, दुनियावाल्यांचं काही जात नाही.

अश्या प्रकारे दुनियावाले ही एकंदरीतच वाईट चीज आहे अशी कल्पना आतापर्यंत करून घेतल्यामुळे त्यांची दुनिया ही तांबं आणि झिंक ह्यांच्या मिश्रधातूने बनली आहे असं वक्तव्य ठामपणे करताना नव्या जमान्याची हिरवीण म्हणते 'ये दुनिया पित्तलदी'. मुळात दुनिया वाईट नसून दुनियावाले वाईट आहेत हा संदेश ती सोयीस्करपणे विसरलेली दिसते. दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड, दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लेख आणि शब्दखुणा Lol

मुझे दुनियावालो शराबी न समझो , मे पिता नही हू

दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई , काहे को दुनिया बनाई -- राज कपूर

दुनिया में हम आये है तो जीना ही पडेगा, जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा --नर्गिस

दुनियावाले ही जमात बाकी काही उदीम-व्यवसाय न करता केवळ आणि केवळ जज करणे हा एकच उपक्रम नेटाने चालवताना आढळून येते. त्यामुळे त्यांना जगवाले म्हणायच्या ऐवजी सरळ 'जजवाले' का नाही म्हणत हा एक रास्त प्रश्न ठरावा.>>>>> Proud

ये दुनिया ये महेफील मेरे काम की नही ! हे दुनियावाले बहोतही बेरहम होते है. दो दिलोंकी दास्तां इनसे सेह नही जाती. बीच बीच में आके दिवार खडी कर देते है. प्यार करनेवाले तो खैर बेशरम होते है. सो दुनियांकी कतई परवाह नही करते.

मुझे दुनियांवालो शराबी न समझो

दुनियावाले म्हणजे गाणारी व्यक्ती ज्यांना आपले समजते ते सोडुन जगातील उर्वरीत लोक.
दुनियाचा अर्थ माणुसविरहित सृष्टी आणि दुनियवाले असे दोन्हीही होतात.

दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी मध्ये पहिला अर्थ आहे
ये दुनिया पित्तल दी मध्ये दुसरा
तर
ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही मध्ये दोन्ही.

लेख भारिए Happy

तेरी दुनिया से हो के मजबूर चला मै बहुत दूर बहुत दुर चला
- पुन्हा एक उद्विग्न हिरो !

दुनिया शब्द आलेली अगणित गाणी आहेत. माझा भर विशेषतः दुनियावाल्या लोकांवर आहे, शेवटचा पित्तलदि अपवाद वगळता. काही गाण्यांमध्ये देवाला दुनियावाला म्हटलं गेलं आहे, पण ते ही इथे मी घेतलेलं नाही. पण तरी तुम्ही सुचवलेली गाणी अवली आहेत Happy प्रतिक्रियांबद्दल आभार!

मानव, तुम्ही लावलेला अर्थ पटला.

Lol छान आहे!
नको असलेले मित्र भेटले की "दुनियावालोंसे दूर, जलनेवालोंसे दूर" वाजवा...

मुळात दुनिया वाईट नसून दुनियावाले वाईट आहेत हा संदेश ती सोयीस्करपणे विसरलेली दिसते. दुनिया रे दुनिया व्हेरी गुड व्हेरी गुड, दुनियावाले व्हेरी बॅड व्हेरी बॅड.
>>>>>

हा संदेश शाहरूख खानने पसरवला आहे हे मात्र विसरू नका Happy
https://www.youtube.com/watch?v=PZyQ2gLMA10

लेख बाकी मस्त ! Proud

लेख आवडला. मस्त लिहिलाय.
दुनिया वालों से दूर, जलने वालों से दूर
आजा आजा चलें, कहीं दूर, कहीं दूर, कहीं दूर..... यात हि सगळे दुनियावाले जळणारेच आहेत Happy

ऋन्मेऽऽष, अरे हो, शाहरुखचा अजिबात उल्लेख न केल्याबद्दल तुझी माफी मागतो _/\_

सीमंतिनी आणि सामी - बरोबर, हे ही आहेच!
रुपाली, धन्यवाद.

>>> यह दुनियावाले पूछेंगे, मोहोब्बत हुई क्या बात हुई, यह बात किसी से ना कहना' >>> यह दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई क्या बात हुई, यह बात किसी से ना कहना'

यह दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई >> ओ हां!!! चुकलो मी. बदल करतो आता. सुधारणा सुचवल्याबद्दल आभार.

जगवाले - हा शब्द दुनियावाले (आम आदमी) आणि देव/अल्ला ह्या दोन्ही अर्थांनी वापरलेला बघताना विचित्र वाटतं. 'तुझे देख कर जग वाले पर यकीन नहीं क्यूँ ...' या गाण्यात जगवाला म्हणजे ऊपरवाला. तर दुसर्‍या गाण्यात 'जगवाले है कठपुतली, नचानेवाला है भगवान' - असं म्हणून 'तो (जगवाले) मी नव्हेच' असं देवाला म्हणायला सोय करून ठेवली आहे.

मस्तं लिहीता तुम्ही.
माझं वाचन शून्य झालंय. काहीच वाचावंसं वाटत नाही. पण या लेखाने ओढून घेतलं आणि शेवटपर्यंत जबरदस्तीने बसवलं. Lol
अस्सं पाहीजे.

देवदासला चक्क विसरलात की तुम्ही यात. अजून वाढवता येईल.

मस्तं लिहीता तुम्ही.
माझं वाचन शून्य झालंय. काहीच वाचावंसं वाटत नाही. पण या लेखाने ओढून घेतलं आणि शेवटपर्यंत जबरदस्तीने बसवलं. Lol
अस्सं पाहीजे.

देवदासला चक्क विसरलात की तुम्ही यात. अजून वाढवता येईल.

यह दुनियावाले पूछेंगे, मुलाकात हुई >> ओ हां!!! चुकलो मी. बदल करतो आता. सुधारणा सुचवल्याबद्दल आभार. >>> तुम्हीच "दुनियावाले" झालात इथे एक मिनीट ("माझाच गणपुले" स्टाइलने) Happy ते फक्त मुलाकात करत होते. तुम्ही मोहब्बत करून टाकलेत (म्हणजे वाक्यात)

बाय द वे, मस्त लिहीले आहे. लेख बरेच दिवस राहिला होता वाचायचा. बरे झाले आज वर आला. लेख हिंदी गाण्यांवर असला तरी मराठी गाण्यांचा संदर्भ चपखल आहे.

या दुनियावाल्यांकडे एक objective love measuring system आहे व ती वापरून, व स्वतःचे कामधंदे सोडून, ते प्रणयी जोड्यांचे प्रेम मोजत असतात असा गीतकारांचा एक प्राचीन समज आहे. क्रिकेट चे स्टॅट्स ठेवणार्‍यांप्रमाणे ही रेकॉर्ड्स लोक ठेवत असावेत. इतर कोणी केले नाही इतके प्रेम आपण करू व लोकांना दाखवून देउ - छाप गाण्यामधून हे दिसते.

दुनिया ही तांबं आणि झिंक ह्यांच्या मिश्रधातूने बनली आहे असं वक्तव्य ठामपणे करताना नव्या जमान्याची हिरवीण म्हणते 'ये दुनिया पित्तलदी' >>> Happy म्हणूच असली गाणी गाउन दुनियेच्या डोक्याला कल्हई करत असेल ती.

माझाच गणपुले Lol Lol

या दुनियावाल्यांकडे एक objective love measuring system आहे >> परफेक्ट

काहीच वाचावंसं वाटत नाही. पण या लेखाने ओढून घेतलं >> धन्यवाद रानभूली! सॉरी, आधी प्रतिसाद द्यायचा राहून गेला.

देवदासला चक्क विसरलात की तुम्ही यात >> कुठलं गाणं नक्की?

Lol छान लिहिले आहे. वाचायचे राहून गेले होते. बरेचदा हिरोहिरविन एकटेच जंगलात वगैरे असतात तरीही "दुनियावालोंको दिखादेंगे, बतादेंगे, बगावत करेंगे" वगैरे घसा फाडून आवेशाने म्हणतात पण ऐकायला चिटपाखरूही नसते. ऐकायला फक्त प्रेक्षक असतात, जे बिचारे त्यांच्याकडूनच असतात.

माझा दिलखेचक चिंतन लेख आठवला. दुनियावाल्यांना 'दिलं' नसतात, दिलं फक्त हिरो हिरविनीला. म्हणून ते 'दिलके दुष्मन' होतात व व्हेरी बॅड वागतात.

Pages