पाचशे मैल

Submitted by मोहना on 10 December, 2020 - 13:13

$1,00,000! आकडा ऐकून, पाहूनही गोर्डनचा विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आयुष्यात कधी दिसतील अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. आपल्यामुळे असं काही घडू शकतं हा तर फार दूरचा विचार. चालून चालून पायाला आलेल्या फोडांकडे तो बघत राहिला. आपणही कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतो हे त्याला पहिल्यांदाच कळत होतं. एक वर्ष! या एका वर्षात हे घडलं त्यावर गोर्डनचा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता. या एका वर्षाने त्याला बदललं होतं आणि आता तो कितीतरीजणांना बदलणार होता.

"मला माझं शिक्षण पटापट पूर्ण करायचं आहे." सुमंत त्याच्यासमोर बसलेल्या गोर्डनकडे कुतूहलाने पाहत होता.
"खरंच सांगतोय मी." सुमंतच्या चेहर्‍यावरचा अविश्वास गोर्डनला अस्वस्थ करत होता.
"विश्वास आहे माझा तुझ्यावर पण तू म्हणालास तू नोकरी करतोस. कसं जमवशील सगळं?"
"जमवेन. मला एक संधी तर द्या." गोर्डन काकुळतीलाच आला आणि सुमंत विरघळला. सुमंतला नेहमीच अशा दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या मुलांचं कौतुक वाटायचं. गोर्डनचा तो सल्लागार होता. दर चार महिन्यांनी कोणकोणते विषय त्याने घ्यावेत याबद्दल मार्गदर्शन करता करता आपोआपच विद्यार्थ्यांच्या घरच्या परिस्थितीबद्दल त्याला कळायचं. गोर्डनला आई - वडील नाहीत, तो कुठेतरी काम करतो हे ठाऊक होतं. गोर्डनच्या काकांचा पत्ता त्याच्या नावासमोर लिहिलेला असला तरी गोर्डन नक्की राहतो कुठे हे मात्र सुमंतला ठाऊक नव्हतं. अधूनमधून त्याच्या काकांचा गोर्डनची प्रगती विचारायला फोन येई पण त्यांनाही गोर्डन नक्की कुठे राहतो ते ठाऊक नव्हतं. गोर्डन त्याबद्दल पत्ताच लागू देत नव्हता. आजही पुन्हा सुमंतने त्याला तेच विचारलं.
"तू तुझ्या काकाकडे राहत नाही म्हणालास ना."
"बरोबर, नाही राहत मी काकाकडे."
"मग कुठे राहतोस?"
"झाली आहे माझी व्यवस्था."
"कुठे?"
"जिथे काम करतो तिथे."
"रात्री तिथेच राहतोस?"
"हो." एका शब्दात उत्तर देऊन गोर्डन सुमंतकडे पाहत राहिला. सुमंतच्या ओठावर हसू पसरलं.
"ठीक आहे. तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस. तुझ्या काळजीपोटीच विचारत होतो."
"मला जास्त विषय घेऊ द्याल? खरंच, मी नक्की पास होईन. नुसता पास नाही, उत्तम गुण मिळवेन." गोर्डनने विषय बदलला. सुमंतने त्याला जास्त विषय घेऊ देण्याची परवानगी दिली. गोर्डन बाहेर पडला तो उड्या मारतच.

रात्री दहाच्या सुमाराला मोडक्यातोडक्या गाडीत त्याने पाठ टेकवली. डोळे मिटले तरी त्याला झोप मात्र येईना. दिवसभर सुमंतचा प्रश्न त्याला सतावत होता. सांगायला हवं होतं का गावाबाहेर गंजलेल्या, सांगाड्या उरलेल्या गाडीत मी झोपतो, गाड्यांच्या कचर्‍यातली एक गाडी. ती गाडी म्हणजे माझं घर आहे. काय केलं असतं सुमंतनी? कुठेतरी व्यवस्था लावून दिली असती? एखाद्या संस्थेत पाठवलं असतं का काकाकडे परत पाठवलं असतं? काकाकडे परत जायच्या विचारानेच त्याला नकोसं होऊन गेलं. त्याला काकाकडे जायचं नव्हतं, संस्थेत तर नाहीच नाही हे त्याने काकाचं घर सोडतानाच ठरवलं होतं. तसं काकाकडे वाईट काहीच नव्हतं. काका एकटाच होता, प्रेमळ होता पण हे आपलं घर नाही याची बोचरी जाणीव त्याच्याच मनाने घेतली होती. एकदोनदा काकाकडे तो बोललाही होता. काकानेही समजून घेतलं होतं त्याला. अचानक आई - वडील अपघातात गेल्यावर पोरक्या झालेल्या गोर्डनला त्याने घरी आणलं होतं. त्याच्या भावना त्याला समजत होत्या.
"एखाद्या संस्थेत बघू या का तुझी व्यवस्था? तुझ्या वयाची मुलं असतील तिथे. नाही म्हटलं तरी इथे एकटा पडतोस तू." त्याने आपुलकीने म्हटलं.
"नाही, अठरा वर्षांचा होईन मी लवकरच. राहता येणार नाही तिथे त्यानंतर आणि तिथे फुकट गेलेली, घरातलं वातावरण चांगली नसलेली मुलं असतात."
"असं नसतं. गैरसमज आहेत तुझे पण तो वेगळा विषय आहे. काय करूया? तुझी वेगळी व्यवस्था करण्याइतकी माझी परिस्थितीच नाही." हताश स्वरात काका म्हणाला. गोर्डनने त्याला समजावून सांगितलं,
"तसं नाही काका. माझं मला जगायचं आहे. माझ्या हिमतीवर. तू वेगळी व्यवस्था लावायची तर मग मी इथे आहेच की सुखात." काकाला या मनस्वी मुलापुढे काय बोलायचं ते समजेना. तरी त्याने आपलं म्हणणं मांडलंच,
"तू राहा इथेच. पाहिजे तर सगळा खर्च लिहून ठेव. मोठा झालास, कमवायला लागलास की दे मला पैसे." गोर्डननेच पुन्हा त्याला समजावलं.
"माझं मला जगू दे. तू नको काळजी करूस. तूच तर आहेस मला मनातलं बोलायला म्हणून मी सांगितलं." काकानेही लहान मुलासारखी मान डोलवली आणि काकाच्या कानावर घातलं या समाधानात गोर्डन एक साधी चिठ्ठी सोडून तिथून दोन दिवसांनी निघालाही. कुठे जाणार माहीत नाही, काय करणार माहीत नव्हतं पण निरोप घेऊन तो निघाला असता तर काकाही त्याच्याबरोबर निघाला असता हे त्याला ठाऊक होतं.
आत्ताही त्याला हसायला आलं. काकाच्या आठवणीने, प्रेमाने गहिवरायला झालं. त्याने घर सोडलं तरी फार दूर गेला नव्हताच तो. फक्त त्याला स्वत:चं घर हवं होतं. थोड्याच दिवसांनी अधूनमधून तो काकाला भेटायलाही लागला. काकाला वाटत होतं कामाच्या ठिकाणीच त्याची रात्रीची व्यवस्था झाली आहे. गोर्डनने त्याची समजूत तशीच राहू दिली होती. मोडकीतोडकी, गंजलेली, पोचं पडलेली गाडी त्याला स्वत:चं घर वाटत होती, त्याचा स्वाभिमान ती जपत होती. मिटलेल्या डोळ्यांनीच पडल्यापडल्या गंजलेल्या खिडकीवर त्याने हात फिरवला आणि तोच हात डोक्यावर आडवा ठेवून तो पडून राहिला. मन थोडसं शांत झालं, सगळे विचार बाजूला झाले. सुमंतसरांनी त्याला जास्त विषय घ्यायची परवानगी दिली होती हेच डोक्यात घेऊन तो दिवसभर वावरत होता, त्यांच्या, ' कुठे राहतोस?' या प्रश्नाने काकाची आठवण झाली. आता आठवणी काढत बसायलाही वेळ नव्हता. जास्त विषय घेण्याची परवानगी म्हणजे सगळ्या रात्री जागून रस्त्यावरच्या दिव्यांचा जो काही अंधुक प्रकाश येतो त्यातच अभ्यास करणं भाग होतं. तो एकदम उठून बसला. पुस्तक उघडून अभ्यास करायला लागला. लवकरात लवकर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, चिकाटीने अभ्यास करायचा. प्रयत्न करायला हवेत, प्रयत्न करायला हवेत...

तारवटलेल्या डोळ्यांनी उद्यानातला पालापाचोळा गोर्डन गोळा करत होता. सकाळी उठल्या - उठल्या धावत - पळत तो उद्यानात पोचला. तिथलं काम आटपून दमून भागून तो बाहेर पडणार तेवढ्यात टी. व्ही. वरच्या बातम्यांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. डोळे विस्फारून तो बातमी ऐकत राहिला. त्याच्याचएवढ्या मुलीच्या बदललेल्या आयुष्याची कहाणी ऐकताना त्याच्या मनात एक कल्पना विजेसारखी चमकून गेली. अधीर मनाने गोर्डन सुमंतपुढे येऊन उभा राहिला.
"मी गाडीत राहतो."
"कायऽऽ? काय बोलतोयस तू? हे बघ. तू बस आधी. थोडा दम घे आणि मग बोल." धापा टाकत त्याच्यासमोर उभ्या असलेल्या गोर्डनला बसायची खूण करत सुमंतने त्याला थांबवलं. पडत्या फळाची आज्ञा मानल्यासारखं गोर्डन बसला.
"मी गाडीत राहतो. मी सांगितलं नव्हतं कारण तुम्ही माझ्या काकाला कळवाल. मला माहीत आहे काका तुमच्याकडे माझ्या चौकशीसाठी येतो."
"फोन करतो. भेटत नाही. इतके दिवस तू खोटं सांगितलंस जिथे काम करतो तिथे राहतो म्हणून?" सुमंतला त्याने असं खोटं बोलावं हे पटत नव्हतं.
"नाईलाजाने. गाडीत राहतो असं सांगितलं असतं तर राहू दिलं असतं तुम्ही?" त्याने सुमंतलाच पेचात पाडल्यासारखा प्रश्न विचारला. सुमंतने नकारार्थी मान हलवली.
"म्हणूनच सांगितलं नव्हतं. ते महत्त्वाचं नाही. मी जे तुमच्याकडून मागणार आहे ते महत्वाचं आहे." सुमंत काहीच बोलला नाही.
"मागू ना? द्याल तुम्ही?" गोर्डनने पुन्हा विचारलं.
"माझ्या हातून जे जमेल ते नक्की करेन. तू हुशार आहेस, मेहनती आहेस. खूप मोठा होशील तू. तुझा स्वाभिमान चकीत करणारा आहे गोर्डन. सांग, काय हवं आहे तुला?" सुमंतला गोर्डनचं मनापासून कौतुक वाटत होतं. इथल्या मुलांची धडपड, त्यातून आकार घेत जाणारी त्यांची ठाम मतं याचं त्याला अप्रूप वाटायचं. इथे येईपर्यंत त्याचं जीवन सुखासीन होतं. आई - वडील आणि तो. सगळं त्याच्या मनाप्रमाणे व्हायचं आणि खूप लाड, कोडकौतुक. त्याच्या आचार - विचारावर अमेरिकेचा प्रचंड प्रभाव होता. इथे आल्यावर त्याच्या लक्षात आलं की या मुलांनी आचार - विचाराचं स्वातंत्र्य कमावलेलं आहे. त्यांच्या विचारांना किंमत आहे, निर्णय स्वातंत्र्य आहे कारण या मुलांनी टक्केटोणपे खाल्ले आहेत. आई - बाबांच्या पंखाखाली बसून त्यांनी आपल्याला वाटेल तसं वागण्याची मुभा मिळवलेली नाही. गोर्डनच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास बघताना त्याला याची प्रकर्षाने झाली.
"सर, ऐकलंत का मी काय म्हणतोय ते?" गोर्डनने त्याला भानावर आणलं.
"ऐकलं पण पुन्हा नीट समजावून सांग." सारवासारख करत सुमंत म्हणाला.
"मी आज एका मुलीबद्दल ऐकलं. व्यसनाधीन आई - वडील असूनही तिला प्रख्यात कॉलेजची शिष्यवृत्ती मिळाली आणि आता ती वकील आहे. त्यातून..."
"आलं लक्षात. तिच्यासारखं व्हायचं आहे. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचाय ना तुला?"
"त्यात काही नवीन नाही. ते तर मी आधीच ठरवलं होतं." उत्तेजित स्वरात गोर्डन म्हणाला आणि त्याने घाईघाईत विचारलं,
"माझ्यासाठी तुम्ही मी एकटाच कमावणारा आहे असं लिहून द्याल का आणि गाडीत राहतो याबद्दलही काहीतरी लिहाल का? पाहिजे तर काकाशी बोला माझ्या पण लिहा."
"तू शांत हो बघू आधी. " पुन्हा एकदा सुमंतने त्याला थांबवलं,
"लिहेन हे नक्की पण कशासाठी ते लक्षात नाही आलं."
"त्यामुळे मला ’येल, बर्कले’ सारख्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल." सुमंतला काय बोलावं कळेना. गोर्डनला निराश करणं त्याच्या अगदी जीवावर आलं.
"प्रवेश नक्की मिळेल पण इतकं सोपं नाही बाळा ते. शिक्षणाचा खर्च कोण करणार? राहण्याचा, खाण्यापिण्याचा प्रश्न येईल."
’शिष्यवृत्ती मिळवेनच मी. त्यात कॉलेजचा खर्च भागेल. बाकी पुढचं पुढे बघू. तुम्ही लिहाल का सांगा आधी. ज्या, ज्या कॉलेजसाठी मी प्रयत्न करेन तिथे पाठवायचं."
"लिहितो. लिहायलाच हवं. तुझी इतकी झेप घ्यायची तयारी आहे तर जी काही मदत करू शकतो ती करेन. एक विचारू?" उगाच परवानगी घेतल्यासारखं करत सुमंतने गोर्डनला सरळच विचारलं,
"माझ्याघरी येतोस राहायला? मी एकटाच असतो." गोर्डनने उत्तर दिलंच नाही. त्यातूनच त्याचं उत्तर समजल्यासारखं सुमंत म्हणाला,
"ठिक आहे, ठिक आहे. तसं असतं तर तू काकाकडेच राहिला असतास. समजलं. जा आता, पळ."

"बॉस्टन कॉलेज." आनंदाने उड्या मारत गोर्डन त्याच्या काकाच्या आणि सुमंतच्या मिठीत शिरला. कितीतरी वेळ गदगदून रडत राहिला.
"तुमच्यामुळे झालं हे सर." शर्टाच्या बाहीने पुन्हा पुन्हा डोळे पुसत गोर्डनचे काका सुमंतचे आभार मानत होते.
"माझ्यामुळे नाही. गोर्डनच्या हुशारी, चिकाटी आणि प्रयत्नांनी. आता खरी परीक्षा आहे आपली." गहिवरलेला सुमंत स्वत:बरोबर त्या दोघांनाही भानावर आणायचा प्रयत्न करत होता.
"काळजी करू नका सर. गेले कितीतरी दिवस मी पुढचा बेत नीट ठरवलाय. तुमची मदत लागेल पुन्हा." आर्जवी स्वरात गोर्डन म्हणाला.
"सांग की." उत्साहाने सुमंतने विचारलं.
"गो फंड मी." सुरू करा.
"गो फंड मी? तुझ्या कॉलेजच्या खर्चासाठी? अरे, तुझ्या स्वाभिमानाचं काय? स्वत:च्या हिमतीवर करायचं आहे ना तुला सगळं?" गोर्डनच्या मनात नक्की काय आहे तेच सुमंतला समजत नव्हतं.
"माझ्यासाठी नाही."
"मग?"
"इतरांसाठी."
"म्हणजे?"
"मी जसा राहिलो तसं राहण्याचं कुणाच्या वाट्याला येऊ नये."
"गोर्डन..." गोर्डनच्या काकांच्या तोंडून शब्द फुटेना. गोर्डनने आपला हात त्याच्या खांद्याभोवती घालत काकांना जवळ ओढलं.
"काका, तू चांगला माणूस आहेस. माझं उदाहरण द्यायचं ते मी फक्त असं राहून पाहिलं म्हणून. माझ्यावर ही वेळ तुझ्यामुळे नाही आली पण आहेत ना अशी कितीतरी मुलं की ज्यांना तुझ्यासारखा काका नाही, सुमंतसरांसारखे गुरु नाहीत. तू चुकीचा अर्थ काढू नकोस ना. मी जे म्हणतोय ते झालं ना तर कितीतरीजणांची आयुष्य मार्गी लागतील रे. हे होणं शक्य आहे तुमची दोघांची मदत झाली तरच."
"सांग काय करायचं ते."
" ’गो फंड मी’ सुरू करायचं. त्यातून जो पैसा उभा राहील तो घर नसलेल्या मुलांसाठी वापरायचा. सर तुम्ही सुरू करा. काका सगळा हिशोब ठेवेल."
"तूच कर ना. त्यासाठी आम्ही कशाला?"
"मी इथून पायी चालत जाणार आहे बॉस्टनपर्यंत. मला ही मदतही फुकट नको."
"तुला वेड लागलंय का रे बाळा? अरे, तुझ्या आई - बाबांनंतर तू माझी जबाबदारी आहेस. बॉस्टन इथून ५०० मैल आहे. इतकं चालणार तू? कशाला हे? तुला कौतुकाने देतील रे लोक पैसे. त्यासाठी इतकं नको करूस."
"काका, अरे वाटेत ज्या ज्या संस्था आहेत तिथे थांबणार आहे मी. तिथल्या मुलांशी बोलेन; त्यांना प्रयत्न, चिकाटीचं फळ कळेल माझ्या बोलण्यातून. करू दे ना मला."
"मी येतो तुझ्याबरोबर." गोर्डनचे काका हट्टच धरून बसले. त्यांना कसं आवरावं ते गोर्डनला कळेना. शेवटी सुमंतने त्यांची समजूत काढली.
"एवढं चालणं झेपणार नाही आपल्याला. मी नसतो का आलो तुमच्याबरोबर. आपल्यासारख्यांचं काम नाही हे. आपण गोर्डन सांगेल ते करू मुकाट्याने. तिच आपली मदत त्याला." सुमंतच्या बोलण्याला गोर्डनच्या काकांनी मान हलवली खरी पण तेवढ्यात त्यांनी गोर्डनला विनवलंच,
"आम्ही गाडी घेऊन येतो प्रवासाला. तू तुझं सामान गाडीत ठेव. रात्री राहा आमच्याबरोबर. याला नाही म्हणू नकोस. आता कॉलेजला गेलास की नाही भेटता येणार तुला. एवढं ऐक तुझ्या काकाचं." काकुळतीला येऊन केलेली विनंती अखेर गोर्डनने मान्य केली.

५०० मैलाचा प्रवास सुरू झाला तसा ’गो फंड’ चाही. गोर्डन हे नाव लवकरच देशाच्या कानाकोपर्‍यात पोचलं. माध्यमांनी आवर्जून दखल घेतली. गोर्डन आपला मार्ग, आपला या धडपडीमागचा हेतू सारं काही समाज माध्यमांवर प्रसिद्ध करत होता. पैशाचा ओघ वाढला, गोर्डनला भेटू इच्छिणारे त्याच्या मार्गावर वाट बघत राहिले. कॉलेजकडून शिष्यवृत्ती मिळाली होतीच पण पुस्तक लिहिण्याचा प्रस्ताव त्याच्याकडे आला तेव्हा गाडीतल्या गाडीत सुमंत आणि गोर्डनच्या काकांनीच आनंदोत्सव साजरा केला.
"पुस्तकामुळे गोर्डनच्या बॉस्टनच्या चार वर्षांच्या सगळ्या खर्चाची सोय झाली."
"गोर्डनला विचारायला हवं. रात्री विचारू त्याला तो थांबला की. त्याची तयारी असणं महत्त्वाचं." सुमंतने गोर्डनच्या काकांना भानावर आणलं.
"माझ्या भावासारखाच आहे तो. जिद्दी. मीपण त्याच्यासारखाच आहे हे विसरतोय तो." तावातावाने आपणही गोर्डन इतकेच जिद्दी आहोत हे सुमंतवर ठसवायचा प्रयत्न केला गोर्डनच्या काकांनी.
"काय करायचा विचार आहे या जिद्दी माणसाचा?" सुमंतने हसून विचारलं.
"गोर्डनने लिहिलं नाही तर मी लिहेन अशी धमकी देईन त्याला. आपणही घेतोय ना त्याच्याबरोबर हा अनुभव." काका हसत म्हणाले पण सुमंतने दुजोराच दिला.
"मला गोर्डनचा आणखी एक मुद्दा अगदी मनापासून पटला. घर, पैसा नसलेल्या मुलांची काम करायची तयारी नसते हा गैरसमज. प्रत्येक ठिकाणी तो हे पटवून देतोय आणि ते अगदी खरंही आहे. परिस्थितीच अशी असते की अशा मुलांना सहज काम मिळणंही अशक्य झालेलं असतं. ती आळशी नसतात. त्यांना मार्ग ठाऊक नसतो. हा मार्ग गोर्डनमुळे काहीजणांना दिसेल, सगळ्यांच्याच नाही तरी निदान काहींच्या आयुष्यात आशेचा किरण डोकावेल अशी अपेक्षा करू या."
"नक्कीच होईल तुम्ही म्हणताय तसं. दोन आठवडे झाले ना हा चालतोय त्याला?" काकांच्या आवाजात काळजी डोकावत होती.
"हो, लोकांचं प्रेम त्याला इतकं मिळतंय की आयुष्यभर चालत राहायचीही तयारी असेल त्याची." सुमतंच्या आवाजात कौतुक होतं.
"किती पैसे जमले?" अचानक आलेल्या प्रश्नाने सुमतंला आश्चर्य वाटलं.
"सगळे पैसे संस्थेला जाणार आहेत हे माहीत आहे ना?" साशंक नजरेने सुमंतने काकांकडे नजर टाकली.
"हो, हो. मला नकोय काही. गोर्डनमुळे किती मदत होईल त्याची उत्सुकता वाटतेय."
दोघंही ’गो फंड’ दोघांनीही तिथे किती रक्कम जमली आहे ते पाहिलं आणि दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कधी एकदा गोर्डन हे पाहील असं होऊन गेलं त्यांना.

$1,00,000! आकडा ऐकून, पाहूनही गोर्डनचा विश्वास बसत नव्हता. इतके पैसे आपल्याला आयुष्यात कधी दिसतील अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. आपल्यामुळे असं काही घडू शकतं हा तर फार दूरचा विचार. चालून चालून पायाला आलेल्या फोडांकडे बघत राहिला. त्याच्या पावलांवर हळुवार हात फिरवायला पुढे झालेल्या काकाला हात धरून त्याने थांबवलं. सुमंत आणि काका त्याच्याकडे बघत राहिले. गोर्डनला अविरत चालण्याचं मिळालेलं फळ अनमोल होतं. आपण इतक्याजणांच्या विश्वासाला पात्र आहोत याचाच आनंद होत होता गोर्डनला. कुणाच्यातरी आयुष्यात आशेचा दिवा आपल्यामुळे लागेल या जाणीवेने भरुन येत होतं. वर्षभराच्या अनुभवाची सांगता उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने नेणारी ठरली होती. त्यालाच नाही; त्याच्यामुळे अनेकांना. टाचणी पडली तरी आवाज होईल अशा शांततेने तिघांना लपेटून टाकलं होतं. त्या शांततेचा भंग केला सुमंतने.
"थांबून नाही चालणार."
"म्हणजे?" गोर्डनला समजेना.
"पोचलो आपण बॉस्टनला, मिळाले लाखभर डॉलर्स. आता कुठे जायचंय?"
"तुझ्या अनुभवावर तू पुस्तक लिहावंस असा प्रस्ताव आलाय. एक नाही. बरेच आहेत. तुला ठरवायचं आहे प्रकाशक कोण पाहिजे ते."
"खरंच?" आनंदाने गोर्डनचे डोळे चमकले.
"अगदी." सुमंतचाही आवाज भरुन आला.
"यातून इतका पैसा मिळेल तुला गोर्डन की चार वर्ष बॉस्टनमध्ये राहण्याचा तुझ्या खर्चाची आता चिंताच नको." काकांच्या शब्दांत माया ओंसडून वाहत होती.
"आज आई - बाबा असायला हवे होते." गोर्डन इतक्या अनपेक्षितपणे म्हणाला की दोघांनाही क्षणभर काय बोलावं ते सुचेना. सुमंतने स्वत:ला पटकन सावरलं,
"ते तुझ्यामध्येच आहेत सदैव. त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून हे झालंय गोर्डन. तुझा काका बाबांच्याजागी नाही का तुला? ज्याक्षणी तू एकटा पडलास, पोरका झालास त्या वेळेला क्षणाचाही विचार न करता तुझा काका घेऊन गेला तुला त्याच्याकडे." गोर्डनचे काका एकटक सुमंतकडेच पाहत होते. गोर्डनने त्यांचा हात घट्ट धरला आणि सुमंतकडे बघत तो म्हणाला,
"फक्त काका नाही. तुम्हीदेखील. तुम्ही मला मार्ग दाखवला."
"चुकतोयस तू. तुझा मार्ग तूच शोधलास."
"पण त्या मार्गावर चालण्याचं बळ तुम्ही दिलंत. काकाचा आधार होताच, राहीलही. तुम्हीही असेच माझ्या आयुष्यात राहा सर. कायमचे."
"तेच म्हणणार होतो मी. मोठा लेखक होशील तेव्हा आमची आठवण राहू दे. चार पैसे आमच्या हातावर ठेवलेस तरी चालेल. काय काका, बरोबर आहे ना माझं?" खो - खो हसत सुमंतने म्हटलं आणि गोर्डनच्या जीवनात आलेलं चांदणं त्या तिघांच्या आजूबाजूला पसरलं. कायमचं वास्तव्याला आलं.

गोर्डन वेन (Gorden Wayne) या मुलाच्या आयुष्यावर आधारित.

(प्रसाद दिवाळी २०२० अंकात प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

फार छान...

अशीच एक गोष्ट सध्या घडतेय... इतिहास परत घडतोय.

मस्त कथा..
आपली लिखाणशैली तर अफाटच आहे..
या कथेला काही संदर्भ आहेत का प्रत्यक्षातले असा विचार कथा वाचतानाच मनात आलेला.. उत्तर अखेरीस मिळाले. आता पुढचे गूगल करावे लागेल Happy

किती छान लिहिता मोहना तुम्ही.. गोर्डन, त्याचे काका अन सुमंत अगदी डोळ्यापुढे उभे राहिले. अत्यंत प्रेरणादायी आणि मनाचा ठाव घेणारी कथा.
बर्‍याच दिवसांनी तुमचे लेखन वाचायला मिळाले. अशाच लिहित रहा Bw

सर्वांना धन्यवाद.
ऋन्मेष - नक्की करा गुगल. काका आणि सुमंत अर्थातच काल्पनिक आहेत पण गोर्डनचा जो विचार आणि कृती आहे ती खरंच प्रेरणादायी आहे.

DJ - अधूनमधून ’टपकते’ इथे. नुकतीच ’काटशह’ कथा टाकली आहे ती वाचा नक्की. माझी स्वत:ची आवडती कथा आहे ती Happy

वर्णिता - ’प्रसाद’ च्या संपादकांना काही कारणास्तव आयत्यावेळी कथा पाहिजे होती म्हणजे अक्षरश: एका रात्रीत. मी नेमकं बातम्यांमध्ये गोर्डनबद्दल ऐकलं होतं त्याचदिवशी सकाळी आणि कौतुक वाटत होतं त्याचं. ’प्रसाद’ मुळे रात्रीत कथा लिहून झाली खरं तर. पहिल्यांदाच असं केलं मी. सर्वांना ती आवडतेय हे वाचून छान वाटतंय.

सुंदर कथा...
तुम्ही छान लिहिली आहे.