बांद्रा वेस्ट-  २१

Submitted by मिलिंद महांगडे on 3 December, 2020 - 02:40

बांद्रा वेस्ट-  २१

 

“ इसमे  नही  है  वो नोट  … ”  पाचव्या  वेळेस  सगळ्या नोटा  उलट्या पालट्या करून बघितल्यावर  पार हताश होऊन  रॉड्रिक  म्हणाला .  मॉन्ट्यानेही  सगळ्या नोटा तपासून पहिल्या पण , त्यालाही त्यात ती नोट काही दिसेना . 

“ नही  है  मतलब …? इसीमे  रहेगी … कैसी  थी  वो नोट ? ”  नाझनीनलाही आश्चर्य वाटू लागलं  . रॉड्रिकने तिला त्या नोटेवरची  ती गांधीजींच्या लाल चष्म्याची खूण  सांगितली . तिनेही एकदा  त्या सगळ्या सुट्ट्या  नोटा पहिल्या  पण तसली खूण  असलेली नोट तिलाही  दिसली नाही .  

 “  तुमने कलसे कहीं  खर्चा  किया  क्या  ? ”  मॉन्ट्या मधेच  योग्य मुद्दा काढला . 

“ अरे   हां  …  कलसे  तो बहुत खर्चा  किया ।   मैं  कल  रात जल्दी निकाली बार से ,  taxi  पकडी  और नजदीक के मॉल  में  गयी .  वहा  थोडी शॉपिंग कि , और फिर taxi  पकडके घर आई । आज सुभे दुधवाले का पैसा दिया । और भी किधर किधर पैसा खर्च किया रहेगा ….।  ” ती आठवून आठवून सांगू लागली . ती जसजसा  हा सगळा पाढा वाचू लागली तसतसा  रॉड्रिक  आणखीनच हताश होत गेला .  एवढ्या सगळ्या पसाऱ्यातून ती नोट शोधणं  म्हणजे वाळवंटात टाचणी शोधण्यासारखं होतं  . रॉड्रिकच्या आता पुरतं लक्षात आलं कि ती नोट आता कायमची त्याच्या हातून गेली . कोणाकोणाच्या  हाती ती नोट फिरत असेल देव जाणे  . मुंबईच्या कोणत्या कोपऱ्यात  ती नोट  जाउन बसली असेल ह्याचा थांगपत्ताही लागणं आता केवळ अशक्य होतं . त्याच्या डोळ्यासमोर आता त्याचं  आयुष्य संपलेलं  दिसत  होतं  . दोन दिवसांनी  इन्स्पेक्टर जामसंडे त्याच्या समोर यमदुतासारखा उभा राहणार होता . त्याला हे सगळं कळलं  कि आपले काय हाल होतील याची कल्पनाही त्याला करवेना .   मॉन्ट्या नाझनीनला आणखी काहीतरी विचारात होता , तीही काहीतरी बोलत होती , त्याच्या कानांवर  शब्द पडत होते पण आता तो इतका सुन्न झाला होता कि त्याला काहीच ऐकु  येईना .   तो तसाच यांत्रिकपणे उभा राहिला . मॉन्ट्या आणि नाझनीन त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले . कुणालाही काहीही न बोलता तो दरवाज्याकडे वळाला . 

“ रॉडी  , काय झालं  …? रॉडी    ? ” मॉन्ट्या त्याला आवाज देत होता पण त्याचे पाय थांबले नाहीत . तो तसाच पुढे निघून गेला . 

“ रॉडी  … थांब ना  यार …  काय झाला तुला  ? ” मॉन्ट्या धावत खाली आला . 

“ लेट्स गो … वुई कान्ट  फाईंड  इट  नाऊ … इट्स बियॉन्ड  अवर  रिच  ” त्याने इतक्या  हताशपणे  हे वाक्य उच्चारले कि जणू काही त्याचे आयुष्याचं संपून गेले आहे . आणि बऱ्याच  अंशी ते खरंही  होतं . ते पाहून मॉन्ट्याला  काय बोलावं  ते कळेना . तो नुसता रॉड्रिक च्या चेहऱ्याकडे पाहत राहिला .  रॉड्रिक खाली मान घालून उभा होता . 

“ इट्स ऑल  ओवर नाऊ  … संपलं  आता सगळं .  ” तो नकारार्थी मान हलवत म्हणाला . 

“ सगळं  कसं  संपेल माझ्या हिरो …. ” हा आवाज थेट  रॉड्रिकच्या मागून आला . त्याने चमकून वळून पाहिलं  तर त्याच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं  त्याला वाटलं . मॉन्ट्याही  भय मिश्रित आश्चर्याने तिकडे पाहू लागला , साक्षात मृत्यू समोर उभा राहिल्यासारखा …!  समोर  उभ्या होत्या  वैनीसाहेब   !!!  त्यांच्या  बाजूला तो महाकाय सत्तू आणि बाकीचे गुंड .  तो सत्तू तर खाऊ कि गिळू अशा रागात पाहत होता . अचानक तो ह्या दोघांच्या समोर आला अन त्याने  रॉड्रिक  आणि मॉन्ट्याची कॉलर  पकडली . 

“ माझा बॉक्स  कुठे आहे भडव्यांनो  …?  ”  वैनीसाहेबांच्या डोळ्यात अंगार दिसत होता . 

“ वै …. वैनीसाहेब , तू … तुम्ही …. !! ” दोघांच्याही तोंडून शब्द फुटेना . त्यांना  कळेना हि ब्याद कुठून उपटली . 

“ हा … मीच . ओळख विसरला का काय ?? ”

“ न … नाही ”

“ साल्यांनो बऱ्या  बोलानं माझा बॉक्स कुठे आहे  ते सांगा .  नाईतर इथंच ठोकते  तुम्हाला . ”

“ तो बॉक्स  पोलिसांनी  पकडला हो काल , आणि आता तो त्यांच्या ताब्यात आहे . ”

रॉड्रिक  विनवणीच्या सुरात  म्हणाला . वैनीसाहेबांनी एकदा त्याच्याकडे थंड कटाक्ष टाकला . 

“ आमच्या चेहऱ्यावर लिहिलंय कि  आम्ही चूत्या  आहोत  ?? आणि तुम्ही काय पोलिसांचे जावई  आहात काय ?? तो माल जर पोलिसांनी  काल पकडला तर तुम्ही दोघे आता इथे काय मुंबई दर्शन करताय ?? ” वैनीसाहेब  भलत्याच उखडल्या . 

“ नाही  वैनीसाहेब , खरंच  ” रॉड्रिक असं  म्हणताच सत्तू ने एक खाडकन त्याच्या कानाखाली लावली. त्यासरशी  तो बाजूला  पडला . 

“ हरामखोरांनो , तुम्ही दिसतात  तितके  साधे नाहीत  … बॉक्स  कुठे लपवलाय  ते सांगा नीट , नायतर सत्तू तुमची  हाडं खिळखिळी करून टाकील .  ” सत्तू आता मॉन्ट्याच्या दिशेने  चाल करून जाऊ लागला . आता आपल्याला जोरदार पडणार  हे बघून मॉन्ट्याने  तेवढ्यात डोकं  चालवलं . , “ वैनीसाहेब ,  मी सांगतो पण  . प्लीज पण ह्याला आवरा  .  ”

“ सत्तू .…  थांब . ”   सत्तू यांत्रिकपणे  थांबला . रॉड्रिक मॉन्ट्याकडे आश्चर्याने पाहू लागला .  

“ त्याचं   काय आहे  ना वैनीसाहेब  की   ह्या सत्तू भाईला बघून भीती वाटते हो जरा .  ”  

“ मुद्द्याचं  बोल ”

“  हा … तेच सांगतो . काल आम्ही   खारला जात होतो त्यावेळी हा माझा मित्र म्हणाला कि लिंकिंग रोडवर  रात्री बरेच मामा लोक असतात . त्यामुळे आम्ही आतल्या पाली हिल रोडवर गाडी टाकली . आणि  जात होतो तेव्हा पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला म्हणून घाबरून मधेच आम्ही तो बॉक्स  माझ्या दुसऱ्या  एका  मित्राच्या गॅरेजच्या खिडकीतून आत टाकला .  ” मॉन्ट्याने मनात येईल  ते ठोकून दिलं .  रॉड्रिक  तर  त्याच्याकडे  बघतच राहिला .  त्याचं हे उत्तर ऐकून  वैनीसाहेब विचार करू लागल्या . मग मधेच त्यांनी आपल्या गँगमधल्या एकाला विचारलं  , “ काय रे ? हा बोलतोय ते बरोबर आहे काय ? ”

" हा वैनीसाब. काल आमी ह्यांच्या गाडीच्या मागे होतो. ह्याने गाडी पाली हिल रोडवर घेतली हे खराय.... आमी पण मग त्यांच्या मागे गेलो... " त्यांच्या गँगमधल्या त्या पंटरने ही गोष्ट मान्य केली.  तोच धागा लगेच मॉन्ट्याने पकडला,  " हां.... तेच तर सांगतोय मी. वैनीसाहेब आपण खोटा नाय बोलनार.  बाकी काय पण असु दे .... आपन खोटा नाय बोलणार.... " 

" बास....मग पुढे काय झालं? " वैनीसाहेबांनी त्यांच्या माणसालाच परत विचारलं. 

" मग जरा पुडं गेल्यावर ह्यांना पोलीसांनीच पकडला. बोल्लो आता लटकलेच हे  ! "

" तु स्वतः बघितलंस का ते  ? " 

" हां वैनीसाहेब... पोलिसांची गाडी बघुन तर आपण लांबुनच कलटी मारली . ते मामालोक ओळखतात ना आपल्याला ...  " तो म्हणाला.  

“ ह्यांना  बॉक्स टाकताना बघितलस का ? ” 

“ नाय वैनिसाब …  नाय बघितलं  ”

“  त्याचं  काय आहे  ना वैनीसाहेब , कि  आमच्या गाडीत आणि ह्यांच्या गाडीत बरंच  अंतर होतं .  आम्ही मधेच पाली  हिल रोडला गाडी घेतली . थोडा पुढे जातो न जातो तोच पोलिसांच्या सायरनचा आवाज आला , मग बोल्लो  उगाच लफडा नको म्हणून मित्राच्या  गॅरेजच्या खिडकीतून आत तो बॉक्स टाकला . तेव्हा मागची गाडी  बरीच लांब होती .  नायतर आम्ही बॉक्स फेकत असताना त्यांनी नीट  बघितलं  नसेल  ”  मॉन्ट्या त्यांच्याच लोकांवर घसरला . 

“  काय रे ,   तुम्हाला ह्यांच्यावर पाळत ठेवायला सांगितलं होत . काय दारू पिउन पाळत  ठेवत होतात  ? ”  वैनीसाहेब  खवळल्या . त्यांच्या पंटरला  काय बोलावं  ते कळेना . तो आपला गप्प उभा राहिला . 

“ पण वैनीसाहेब, आणखी एक प्रॉब्लेम झालाय... " आणखी थोडा पुढचा विचार करुन मॉन्ट्या म्हणाला. 

 " काय?  कसला प्रॉब्लेम ?  " 

" आम्ही ज्या मित्राच्या गॅरेजमधे तो बॉक्स टाकलाय तो मित्र दोन दिवस कुठेतरी बाहेर गेलाय ....गॅरेजला लॉक लावुन.   नायतर आम्ही तो बॉक्स तुम्हाला लगेच परत केला असता.   आम्हाला त्याची काय गरज ...?  तो मित्र उद्या नायतर परवा येईलच . तो  आला की लगेचच आम्ही तो बॉक्स तुम्हाला आणुन देऊ. तोपर्यंत प्लीज आम्हाला माफ करा... " मॉन्ट्याने बेधडक ठोकुन दिलं. वैनीसाहेब विचार करु लागल्या.  इतक्यात त्यांच्या गँगचा एक मेंबर त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या कानाशी लागला. हा तोच माणुस होता ज्याच्या सांगण्यावरुन काल वैनीसाहेबांनी ह्या दोघांना कोकेन सप्लायच्या कामाला जुंपलं होतं. तो  कदाचित त्याचा जुना विश्वासु माणुस असावा.    त्याला परत वैनीसाहेबांच्या कानात काहीतरी सांगताना बघुन मॉन्ट्याची चांगलीच तंतरली ... आता हा कोणतं संकट आपल्यापुढे उभं करणार ? ह्याचाच विचार ते दोघे करु लागले. त्यांचं बोलणं संपल्यावर वैनीसाहेबांनी त्या दोघांकडे पाहीलं... 

" तु हे बोलतोयस त्यावर मी विश्वास कसा ठेऊ....?  " 

" विश्वास..... बरं ठिक आहे ... आम्ही तो बॉक्स तुम्हाला आणुन देईपर्यंत तुम्ही पाहीजे तर ही माझी गोल्ड चेन ठेऊन घ्या ... हे ब्रेसलेट पण ठेवा.... आय नो,  त्याची व्हॅल्यु कमी आहे पण माझ्याकडे द्यायला एवढंच आहे... आणि आम्हाला त्या बॉक्सचं काही काम नाही,  वुई विल डेफिनेटली रिटर्न द बॉक्स टु यु " रॉड्रीक चेन आणि ब्रेसलेट काढत म्हणाला. 

" आण ईकडे " वैनीसाहेबांनी त्याची चैन  आणि ब्रेसलेट त्याच्याकडुन हिसकावुन घेतलं. तो तिच्याकडे बघतच राहीला.  खरं तर त्यांचा विश्वास बसावा म्हणुन रॉड्रीक हे बोलुन गेला.  पण ही बाई असं काही करेल असं त्याला वाटलही नव्हतं.  वैनीसाहेब  भलत्याच चिंधी निघाल्या . हे म्हणजे 

अंदाज अपना  अपना  मधल्या क्राईम मास्टर  गोगो सारखं  झालं ., ‘ आया हुं  तो कुछ तो लूट  के जाउंगा …! ‘ 

" बॉक्स घेऊन ये ,  मग हे घेऊन जा. " 

" ठिक आहे... आम्ही लवकरात लवकर  तुम्हाला तो बॉक्स देतो. "

“ कधी देणार   ? ”

“ परवा लगेच  !  तो मित्र उद्या आला तर उद्याच  !”

“ ठीक आहे  , चला रे …  ”  म्हणत वैनीसाहेब  आल्या तशा निघून गेल्या .   त्या निघून गेल्यावर रॉड्रिक डोक्याला हात लावून मटकन खालीच बसला . आता ते दोन्ही बाजूंनी संकटात सापडले , अडकित्त्यात सुपारी सापडते तशी !! सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले , सर्व दरवाजे बंद  !!! 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users