काटशह

Submitted by मोहना on 2 December, 2020 - 07:58

"बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव हे सारे एकाच माळेचे मणी. मला जे सांगायचं आहे ते या प्रत्येकाच्या कहाणीत दडलेलं आहे." शेफालीची नजर फोटोंवर स्थिर होती तर समोर बसलेल्या प्राध्यापकांची तिच्यावर. तिच्यावर असंख्य प्राध्यापकांचे डोळे रोखलेले होते पण तिचं लक्ष्य साठेसर होते. साठ्यांना पटलं, आवडलं की काम फत्ते. एकेक करून तिला चित्रातली माणसं जिवंत करायची होती. त्यांची निवड तिने का केली, ही माणसं तिला कुठे भेटली, त्यांच्याशी तिचं काय बोलणं झालं हे सांगत त्यांचं आयुष्य जिवंत करायचं होतं. ही सगळी माणसं भेटली तर त्यांची आपली ओळख आहे असंच प्रत्येकाला वाटायला हवं याची तिने मनाशी खूणगाठ बांधली.
"गेल्या वर्षभरात काही ना काही कारण काढून मी या तिघांशी बोलले, त्यांना कसलीही कल्पना न देता. इथे मी काळाचे, प्रसंगांचे तुकडे जोडणार आहे. खेड्यातला बंड्या, अमेरिकेतला अनुपम आणि मुंबईतला सुदेश जाधव...अतिशय वेगवेगळ्या वातावरणात वाढणारी आणि तरीही एकाच नावेत बसलेली ही माणसं आहेत. त्यांच्या नावेचा माग आपण इथे घेणार आहोत." शेफालीने सुरुवात केली बंड्या खोतपासून. देवगडजवळच्या वाडा गावातला बंड्या खोत.

"काय बंड्या? काय चाललंय? झाला का आराम सुरू?" गडग्यापलिकडून शेजारच्या वाडीतल्या दिनकरने घराकडे जाताना बंड्याला टोकलं. बंड्या पायरीवर आकाशाकडे नजर लावून बसला होता. काडी चावून चावून नाहीशी होत आली होती. दिनकरकडे बघत बंड्या नुसताच हसला आणि पुन्हा काडी चावायला लागला. स्वयंपाकघराच्या खिडकीतून येणारे आवाज टिपत राहिला. मागच्या विहिरीवर जमलेल्या बायकांच्या कलकलाटाचा आवाजही कानावर पडत होता. काडी चावण्याचा त्याचा वेग वाढला. शून्यात नजर लावून बसलेल्या बंड्याचे कान आईच्या हाकेकडे लागले होते. कधी एकदा आई हाक मारतेय आणि उठून आत जातो असं झालं होतं त्याला.
"बंड्याऽऽ ये रे." चुलीवरच्या पेजेचं रटरटतं पातेलं उतरवित प्रमिलावहिनींनी जोरात बंड्याला हाक मारली. हाकेसरशी पायरीवरून उठून तो येईल याची कल्पना त्यांना होतीच. सैल झालेल्या लेंग्याची नाडी बांधत बंड्या स्वयंपाकघरात आला. भिंतीपाशी लावलेला पाट घेऊन आशाळभूतासारखा बसला. वहिनींनी त्याच्यासमोर पेजेचा वाडगा ठेवला. पुढ्यात आलेल्या वाडग्यातली पेज बंड्याने हावरटासारखी संपवली.
"हळू खावं. ओरपतोस नुसता. बरं दिसतं का? बघणारा नावं ठेवतो." वहिनीनी नेहमीच्याच सूचना केल्या. इतकी वर्ष झाली, तेच खाणं, त्याच सूचना आणि बंड्याचं तसंच वागणं. बंड्या तंद्रीत होता. पोट भरलं होतं. ढेकर देत त्याने ओठांवरुन आडवा हात फिरवला.
"त्याला नानूला मदत करायला सांगा. आंबे उतरवायचे आहेत आज." मागच्या दारात खोत उभे होते. वहिनीनी मान डोलवली. खोतांना काहीतरी सांगायला लगबगीने त्या पुढे झाल्या. खोत आपल्याच नादात होते. वहिनी त्यांच्या खुललेल्या चेहर्‍याकडे पाहत राहिल्या. ’खूश दिसतायत, सुटला बंड्या आजतरी तावडीतून’ असा विचार वहिनींच्या मनात येतोय तोच खोतांनी अपेक्षाभंग केला.
"काय राजे, झालं का ओरपून? ऐष आहे. बसल्याबसल्या मिळतंय." बंड्याचं लक्ष नव्हतंच. वहिनींनी मात्र रागाने ओठ मुडपले. आळशी, निरूद्योगी, नाकर्ता... रोजच्यारोज बंड्याला खोतांकडून एखादं नविन विशेषण मिळायचंच. वहिनी त्यांच्यापरिने खोतांना विरोध करायच्या आणि दिवसभर मनातून शिव्यांची लाखोलीही वाहायच्या. बंड्या सगळे मान, अपमान गिळून एकटक कुठेतरी बघत राहायचा. खोतांचा राग त्याला समजायचा तशी वाडीतल्या लोकांची चेष्टाही कळायची पण त्याने कधी विरोध केला नाही. तशी इच्छाच त्याला झाली नाही. हसता खेळता मुलगा असा कधी झाला तेही कुणाला आठवत नव्हतं इतकी वर्ष लोटली होती. बंड्या आता त्या पलिकडे पोचला होता आणि त्याच्या आजूबाजूचेही. त्याच्या अंगात कंटाळा भरून राहिला होता. कितीतरी वर्षांपूर्वी सातवीत तो नापास झाला आणि नंतर प्रत्येक वर्गात दोन दोन वर्ष काढायला लागला त्यालाही काळ उलटून गेला होता. बंड्याच्या कंटाळ्याची सुरुवात मात्र सातवीत नापास झाल्यानंतर झाली असं वहिनीना वाटायचं.
"दहावीची परीक्षा पास हो तू फक्त. तेवढं एक सर्टिफिकेट हातात आलं की बर्‍याच वाटा सापडतात." प्रत्येकवेळी बंड्या नापास झाला की खोत त्याला म्हणायचे. तो मान डोलवायचा. परीक्षेला जाताना बंड्याच्या पोटात गोळाच यायचा. आपण नापास होणार या विचारानेच तो पेपर कोरा टाकून यायचा. पाच वेळा दहावीला नापास झाल्यावर त्याने सगळं सोडूनच दिलं.
"आमच्याबरोबर बसायला लागा. परदेशात चांगला भाव आहे आपल्या मालाला." तो नुसताच बसून राहिलेला दिसला की येताजाता खोत म्हणायचे. बंड्याच्या तोंडून सवयीने हुंकार निघायचा. प्रत्यक्षात बंड्याने कधीही खोतांना मदत केली नाही. खोतांचीही तशी अपेक्षा नसावीच. बंड्या कधी त्यांच्या हाताशी आलाच नाही. खोतांनी त्याचा नाद सोडून दिला. इतक्या वर्षात बंड्या सर्वसामान्य माणसासारखा होण्यासाठी काय करायला हवं हे कुणालाही कळलेलं नव्हतं. तो बिनकामाचा असला तरी निरुपद्रवी होता हा त्याचा मोठा गुण. वहिनी सोडून सर्वांसाठी त्याच्या अस्तित्वाची किंमत शून्य होती. त्या अजूनही आशेवर होत्या. अंगारे, धुपारे, उपासतपास चालूच होतं. अधूनमधून बदल म्हणून वैद्यांकडेही त्या त्याला घेऊन जायच्या. आज मात्र विहिरीवर आलेल्या चाकरमान्यांपैंकी कुणीतरी त्यांना मार्ग दाखवला होता. तोच खोतांच्या कानावर घालायचा होता. त्या बोलायला म्हणून उठल्या पण बंड्याला लावलेली विशेषणं ऐकत गप्पच उभ्या राहिल्या. सवयीने खोतांनी बंड्याला टोकलं तरी त्या स्वरात धार नव्हती. खोत खुशीत होते. आपल्याच नादात होते.
"आज अमेरिकेतल्या माणसाबरोबर बोलायचंय. मोठं डिल होईल बहुतेक. तसं झालं तर मी तुम्हाला अमेरिकेला नेऊन आणतोच. फॉरेन रिटर्नड...व्हाल. काय? जायचं ना अमेरिकेला?" बोलत बोलत ते फोन लावायला स्वत:च्या खोलीच्या दिशेने वळले.

साठे शेफाली सांगत होती ती बंड्या खोतची गोष्ट कान देऊन ऐकत होते. त्यांनी शेफालीला थांबवलं,
"मला अंदाज येतोय या गोष्टीचा, काय घडलं असेल याचा. मी तुम्हालाच बोलू देईन. थांबवलं अशासाठी की एक प्रश्न मनात आलाय. विसरण्याआधी विचारतो. चालेल? नाही म्हणजे, मध्येच बोलतोय म्हणून..." शेफालीने साठ्यांकडे पाहिलं. तिच्या पाठीचा बाक आणखीनच वाकला. ती उत्तर देणार तेवढ्यात साठे हसून म्हणाले,
"कॅरी ऑन."
"नाही, नाही. विचारा ना सर तुम्ही." निरुत्साही स्वरात शेफाली म्हणाली. साठेंनी शेफालीला मुद्दाम अडवलं होतं. मनात प्रश्न होता पण तो फारसा महत्वाचा नव्हता. ज्यासाठी त्यांनी शेफालीला थांबवलं ते त्यांचं काम झालं होतं. तरी त्यांनी विचारलं.
"बंड्याच्या वागण्याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर झाला?"
"त्याच्या आईवर. प्रमिलावहिनींवर." शेफालीला हा प्रश्न त्यांनी का विचारला ते समजलं नव्हतं.
"सुरूवातीला तुम्ही जी नावं सांगितलीत त्यात त्यांचा उल्लेख नाही."
"कारण तो माझ्या विषयाचा भाग नाही."
"तरीही मला त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल." शेफाली काहीक्षण तशीच उभी राहिली. तिचा प्रेझेंन्टेशनमधला रस संपला. साठे तिची निवड करणार नाहीत हे तिला तिथेच कळलं. साठेनी निवड केली नाही तर काय करायचं याचा विचार तिने केला नव्हता. तिला सर्वांना बंड्या कसा आहे ते दाखवायचं होतं. त्यासाठी तिने खोतांच्या घरात जवळजवळ रोजच घडणारा प्रसंग सर्वांसमोर उभा केला होता. तो ऐकून साठे सरांनी प्रमिलावहिनींबद्दल का प्रश्न विचारावा? वर्षभरात बंड्या सोडल्यास तिने त्या घरातल्या इतर कुणाचा विचारच केला नव्हता. गेलं वर्षभर बंड्या खोत, अनुपम पटेल आणि सुदेश जाधवचा तिने ध्यास घेतला होता. तिघं तिच्या विषयासाठी उत्तम आहेत याची तिला खात्री वाटत होती आणि अचानक प्रमिलावहिनी मध्ये आल्या होत्या. शेफालीने पॉवर पॉईंटवर नजर टाकली. प्रमिलावहिनींचा फोटो तिच्यासमोर नव्हता पण बंड्याच्या निमित्ताने तिला कळलेल्या प्रमिलावहिनी साठ्यांसमोर उभं करणं भाग होतं. तिने इतरांकडे पाहिलं. सगळेच तिच्या तोंडून प्रमिलावहिनींबद्दल ऐकायला उत्सुक दिसत होते.
"बंड्याच्या संदर्भात, प्रमिलावहिनी मला विशेष महत्वाच्या वाटत नाहीत कारण त्या अंगार्‍या, धुपार्‍यावर विश्वास ठेवणार्‍या आहेत."
"मी बंड्याच्या संदर्भात विचारत नाही. एकूणच त्या व्यक्ती म्हणून कशा होत्या?" साठेंनी वहीत काहीतरी लिहित विचारलं.
"व्यग्र, बिझी. त्यांच्याइतकं सतत काही ना काही करणारं माणूस दुसरं नसेल." शेफालीने नाईलाजाने थोडीशी माहिती दिली. तिच्यादृष्टीने त्यांचं व्यग्र असणं वेळ फुकट घालवणं होतं. इथे तिचं हे मत सांगण्यात काही अर्थ नव्हता याची तिला जाणीव होती.
"वाडीत कुणाच्या तरी घरी बाळ झालंय म्हणून दुपटी कर, शेजारच्या आजी आजारी म्हणून गप्पा मारायला जा, कुणाला शिवण शिकव सतत काहीतरी चालू असतं. एकदा मी त्यांना विचारलंही होतं."
"बंड्याकडे वहिनींचं लक्ष नाही असं वाटलं का तुम्हाला?" साठ्यांच्या बाजूला बसलेल्या प्राध्यापक भंडारीनी विचारलं. आपलं मन ओळखणारे प्राध्यापक भंडारी तिला त्याक्षणी जवळचे वाटले. उगाच आपण साठे, साठे करतोय असंही वाटून गेलं. ती त्यांच्याकडे बघून म्हणाली,
"बरोबर ओळखलंत सर. हाच प्रश्न मीही विचारला होता. ’बंड्याचं काय? तुम्हाला या सार्‍यातून वेळ मिळत नाही म्हणून तर तो एकटा पडत चाललाय, असं तर नाही ना?’ हा प्रश्न विचारला होता मी."
"उत्तर काय मिळालं?" साठ्यांनी विचारलं,
"’माझा वेळ त्याला मिळणं न मिळणं याचा काही संबंध नाही बंड्याच्या कंटाळ्याशी, काही न करण्याशी. उलट मी बंड्याचाच सतत विचार करत असते त्यातून थोडी मोकळी होते. जीव रमतो, मनावरुन बंड्याचं ओझं उतरतं, चार क्षण आनंदात जातात.’ असं म्हणाल्या. जीव रमवतात त्या स्वत:चा."
"त्यांना नाही कधी वैताग आला? उदास वाटलं बंड्यामुळे?" साठयांचे प्रश्न संपत नव्हते.
"वाटलं असेलच. मी नाही विचारलं. एकदा त्या चार महिने आजारी होत्या." नाईलाजाने शेफाली उत्तरं देत होती.
"कशामुळे? काय झालं होतं?" साठे थांबतच नव्हते.
"नाही ठाऊक. ’यातून मलाच उठणं भाग आहे, घराकडे कोण बघेल, बंड्याला मीच आहे हे समजून चुकले आणि उठले.’ असं काहीतरी सांगितलं."
"थोड्याशा हाताला लागतायत तुमच्या प्रमिलावहिनी." साठे हसत म्हणाले. शेफालीला प्रमिलावहिनींमध्ये रस नव्हता. तिला अनुपम पटेल आणि सुदेश जाधव खुणावत होते. बंड्या खोतबद्दल सांगून झालं होतं पण अनुपम आणि सुदेश बाकी होते.
"सर, मी प्रेझेंन्टेंशनकडे वळू का?" तिने नम्र सुरात विचारलं. साठे काहीच बोलले नाहीत. पॉवर पॉईंटवर अनुपम पटेलचा फोटो आणत शेफाली म्हणाली.
"सरांना प्रश्न होता म्हणून प्रमिलावहिनींबद्दल बोलले मी. पण माझ्या अभ्यासाचा विषय बंड्या खोत, सुदेश जाधव आणि अनुपम पटेल आहेत. अनुपम पटेल हा अमेरिकेतला माणूस पण त्याचा थेट संपर्क होता तो देवगडच्या खोतांशी." प्रसंगाचा एक तुकडा तिने सर्वासमोर जिवंत केला.

अनुपम पटेल फोनची वाटच पाहत होता. देवगडहून आंब्याच्या संदर्भात खोतांचा फोन यायचा होता. पळतपळत तो गॅरेजमध्ये गेला. अस्वस्थ येरझार्‍या घालत त्याने खोतांवर तोफ डागली.
"कदी येनार तुजा आंबा? सगल्या स्टेटमदी जोरदार मागणी आहे. आंब्यांचा पत्ताच नाई. आसा नाई चालनार खोतानू. " खोतांना हे अपेक्षित नव्हतं. आनंदावर विरजण पडल्यासारखं वाटलं त्यांना. त्यांनी गडबडीने आपली बाजू मांडली. खुलासा केला,
"पन्नास पेट्या पाठवल्या आहेत त्या पोचायला हव्यात एकदोन दिवसात. आणखी पाहिजे होत्या ना?"
"खोतानू, मला खड्ड्यात घालू नका. तुम्हाला पैसे देऊन मोकळा झालोय मी." खोतांना पटेलांचे पैसे का बुडतील ते समजेना.
"कॉम्पिटिसन आहे. मेक्सिकोचा आंबा घेतात लोक. ब्रीड जातीचा आंबा आनलाय त्येंनी बाजारात. डिट्टो हापूस. टेस्टमदी थोडाफार फरक असतो म्हना, पन तो कलत बी नाय लोकांना."
"असं आहे होय. पोचतील, पोचतील पेट्या." खोतांनी आश्वासन दिलं खरं पण त्यांनाही तसा काही अंदाज नव्हता. वैतागत पटेलांनी फोन ठेवला. काहीतरी विचारायला आलेल्या बायकोबर ते डाफरले,
"काम मे छे, दिखानू नथी क्या? "
"दिसतंय. चिडला होतात म्हणूनच आले विचारायला."
"तुमी मराटी मानसं ना..."
"माझं मराठीपण काढू नका. काय झालं ते सांगा."
"आत्ता नाही." बायकोला पुढे बोलायला न देता पायात चपला सरकवत ते बाहेर पडले. भकाभका सिगरेटचा धूर सोडत तासभर चालल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. परत आले तेव्हा त्यांचा जीव शांत झाला होता पण बायकोच्या थंड नजरेने पुन्हा त्यांचं डोकं फिरलं.
"तुला सगलं कललं पायजेल का? आलो फिरून."
"मी कुठे काय म्हणतेय. एक शब्द तरी बोललेय का?"
"मग बघत कसाला होतीस?"
"कमाल आहे. मी काहीही विचारलेलं नाही आणि कुठे बघायचं तो माझा प्रश्न आहे."
"ठीकए. डोस्कं फिरलंय माजं. आता काहीही विचारायचं नाही. समजलं?" अनुपम पटेलांचा आवाज चढला पण तेवढ्याच चढ्या आवाजात त्यांच्या बायकोने तिचं निदान ऐकवलं.
"डोकं नाही फिरलेलं. अतीकामाचा ताण आहे हा."
"हा असेल. येनार प्रेसर. येनार. कललं? नाही आला प्रेसर तर वाटोलं होनार धंद्याचं. प्रेसर नको घ्यायला? आ? प्रेसर नको घ्यायला?"
"प्लीज, डोंट येल ॲट मॉम." तिथेच अभ्यास करत बसलेली श्रिना वैतागली. अंगठ्याएवढी मुलगी शिकवायला निघालेली पाहून ते किंचाळले.
"मम्मीनी चमची. यू वोंट अंडस्टॅड प्रेसर. मागितलं की मिळलंय सगलं हातात." आता त्यांना एकटेपणा हवा होता. खोलीत शिरत त्यांनी दार धाडकन लावून घेतलं.
"समथिंग इज रॉग विथ डॅड. आस्क हिम टु सी अ डॉक्टर." १७ वर्षांच्या मुलीकडे अनुपम पटेलांची बायको आश्चर्याने पाहत राहिली.
"काहीतरी बोलू नकोस."
"सारखे चिडलेले असतात. काम, काम, काम. ही इज ऑलवेज बिझी. आपल्याबरोबर नावालाच असतात. विचार कामाचा." श्रिना फणकारली.
"म्हणून समथिंग इज रॉग?"
"कमॉन ममा, थिंक. ९ वीत असल्यापासून बघतेय. सिगरेट, सिगरेट, सिगरेट... आनंद झाला तरी सिगरेट ओढणार, चिडले तरी तेच. आणि पेगवर पेग रिचवतात. कारण काहीही चालतं. घराला सिगरेट आणि ड्रिंकचा वास येतो आपल्या."
"सिगरेट सोडवायला डॉक्टर कशाला हवा. सुटेल. तू कशाला चिडत असतेस त्यांच्यावर?"
"कर तू तुला काय करायचं ते. आय ॲम टेलिंग यू द फॅक्ट." केसाच्या बटेशी श्रिना चाळा करत म्हणाली. तिच्या बोलण्याने अनुपमची काळजी वाटायला लागली तरी फार विचार न करता ती स्वत:च्या कामाकडे वळली.
"तुम्ही पुढे सांगायच्या आधी एक प्रश्न आहे परत." साठ्यांनी शेफालीला थांबवलं. शेफालीने टेबलाच्या कडा घट्ट धरल्या आणि खाली मान घालून ती काहीतरी पुटपुटली.
"शेफाली..." साठेंनी तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
" अं? सॉरी सर, काय म्हणालात?" तिने त्यांच्याकडे न बघताच विचारलं. साठ्यांचा शेफालीला अगदी कंटाळा आला होता. किती मध्येमध्ये करायचं ते. नाईलाज झाल्यासारखं तिने साठ्यांकडे पाहिलं.
"नाही, मी म्हणत होतो. तुम्ही छान चित्र उभं करताय आमच्यासमोर. बंड्या खोत, अनुपम पटेल... सुदेश जाधवांकडे तुम्ही वळायच्या आधी..."
"विचारा." तिची नाराजी अगदी जाणवत होती. साठ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं.
"तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या व्यक्तींचा अभ्यास केलाय ते कळतंच आहे पण व्हाय ऑल इंडीयन्स?"
"मी सांगतो." पुन्हा साठ्यांच्या बाजूला बसलेले भंडारी म्हणाले. शेफालीला हायसं वाटलं. साठ्यांनी तिला निवडलं नाही तरी कदाचित भंडारींकडे आपली वर्णी लागेल या जाणिवेने तिला बरं वाटलं.
"मला वाटतं त्यातूनच त्या काहीतरी सिद्ध करू पाहतायत. ॲम आय राईट शेफाली?"
"यस." शेफालीच्या आवाजात किंचित उत्साह आला.
"काय सिद्ध करू पाहताय?" साठ्यांच्या प्रश्नावर कृत्रिम हसत शेफाली म्हणाली,
"सर, ते शेवटी सांगते. सुदेश जाधवकडे वळू या का आपण प्लीज?" बोलता बोलता तिने पॉवर पॉईंटवर सुदेशचा फोटो, त्याच्या ऑफीसचे फोटो आणले. आता ती सुदेशबद्दल बोलणार होती. शब्दांनी सुदेश सर्वांच्या समोर उभा करायला शेफालीने सुरुवत केली.

सुदेश त्याच्या मॅनेजरच्या खोलीत बसला होता. बेकरने पुढे केलेल्या कागदावर सुदेशने नजर टाकली आणि त्याचा चेहरा पडला.
"हे काय? इतकं कमी रेटींग? का?" हाताला फुटलेली सुक्ष्म थरथर लपवित त्याने बेकरकडे पाहिलं.
"यू आर नॉट ॲप्रोचेबल."
"कुणी ठरवलं हे?" अचानक काहीतरी नविनच उद्भवलं होतं.
"असं वाटतं काहीजणांना." बेकरचं बोलणं सूचक होतं.
"काहीजण म्हणजे कोण?" सुदेशला नावं पाहिजे होती.
"असं नाही सांगता येणार." बेकरकडून नावं समजण्याची शक्यता नाही हे सुदेशला दिसत होतं.
"धीस इज नॉट फेअर." शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता सुदेश. बसल्याबसल्या टेबलाला लाथ मारून त्या खोलीतून बाहेर पडावं असं वाटायला लागलं. त्याचे कान अपमानाने लाल झाले. रागाने धुमसत तो म्हणाला,
"सात वर्षात कुणी असं काही म्हटलं नाही. बेकर, यू नो मी. काहीतरी गैरसमज होतोय."
"लेखी आहे."
"कुणाकडून?"
"आय टोल्ड यू. सांगू नाही शकत."
"यू..." कसेबसे शब्द गिळले सुदेशने.
"हाऊ धिस विल अफेक्ट मी?" सुदेशचे डोळे आग ओकत होते.
"नो बोनस, नो प्रमोशन. आपण परत रिव्ह्यू करू. फरक पडेल त्याने."
"नकोत मला तुझे उपकार. लेट मी आस्क यू डिरेक्टली."
"विचार." बेकर पेपरवेटशी चाळा करत म्हणाला.
"कंपनी तोट्यात चाललीये?" सुदेशच्या प्रश्नाला बेकरने स्मितहास्याने उत्तर दिलं.
"हे बघ बेकर, हा ट्रेंड मला ठाऊक आहे. कुणाला काढायचं असेल की अशीच सुरूवात होते. काढा ना सरळ. हा असला फालतूपणा कशाला. ॲप्रोचेबल नाही म्हणे. बुलशीट."
"काम डाऊन." शांतपणे बेकर म्हणाला. सुदेश वैतागून उठला. बेकरच्या केबिनपासून त्याच्या टेबलापाशी जाईपर्यंत वाटेतली प्रत्येक गोष्ट त्याला लाथेने उडवून द्यावीशी वाटत होती. आपण सोडून ऑफीसमधल्या सर्वांना बेकरचा रिव्ह्यू ठाऊक आहे आणि इथे बसलेल्यापैंकीच कुणीतरी हे उद्योग केले आहेत हे त्याच्या लक्षात आलं होतं, नव्हे ठाम विश्वास होता त्याचा यावर. सही करायची नाही, चौकशी करायला लावायची, एच. आर. पर्यंत जायचं. स्वत:च्या खुर्चीशी पोचेपर्यंत त्याचा विचार पक्का झाला होता. कॉर्पोरेट जगात कुणी मित्र नाही हे पुन्हा एकदा त्याला जाणवलं. त्याच्याबरोबर काम करणार्‍या प्रत्येकाचा त्याला राग यायला लागला, संशय यायला लागला.
"सगळे साले एकजात हरामखोर आहेत. स्वार्थी. प्रोसीजर प्रमाणे कुणाला नकोत कामं करायला. लगेच दुसर्‍यांकडे जातात. डिपार्टमेटचे नियम असतात, पद्धत असते. फिकिर नाही. यांनी शब्द टाकला की झेलायचा आम्ही. वा रे वा. शिस्त, नियम असलं काही माहितच नाही पण यांची कामं होतात. आय गो बाय रुल्स इज माय फॉल्ट. माझ्याच डिपार्टमधलं कुणीतरी नियमांना बसवतं धाब्यावर आणि देतात यांची कामं करून. मोठेपणा मिळतो. प्रस्थ वाढतं. नंतर होणारा गोंधळ निस्तारायला यांच्या बापाने आम्हाला नेमलंय का? मल्टीनॅशनल कंपनी आहे. चार देशांतल्या लोकांबरोबर काम करायचं तर प्रोसीजर पाळायला नको? काही प्रॉब्लेम आला की शिव्या खायच्या मी. एखाद्या कामाला नाही म्हटलं की ॲप्रोचेबल नाही? विसरा आता प्रमोशन. " ऑफीसच्या बाथरूममध्ये बसून त्याने बायकोला फोन लावला. मनातली खदखद बाहेर काढली.
"शांतपणे विचार कर सुदेश. स्वत:च ठरवतोयस तू सगळं. तुझं काही चुकतंय का तेही बघायला हवं ना. तू कुणाचं ऐकून घेतोस का कधी?" त्याने फोन बंदच केला. बाजूच्या भिंतीवर तो आपटून तुकडे तुकडे करावेत असं वाटत होतं त्याला.
’च्यायला, या बयेला कशाला लावला फोन. आयुष्यात तिने काही चांगलं बघितलंय का माझ्यात. येऊन जाऊन मीच कसा चुकतो सांगणार.’ सुदेश बाथरूममधून बाहेर आला. आता त्याला काम करावसं वाटत नव्हतं. खुर्चीत येऊन तो नुसताच बसून राहिला. एकटक कुठेतरी नजर लावून. मेंदू मात्र काम करतच होता. जड झालेल्या डोक्यात एक लांबलचक यादी तयार होत होती. त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने प्रत्येकाच्या वागण्याचं विश्लेषण केलं. त्याचं कुणाशी कधी वाजलं, मतभेद झाले याची नोंद केली आणि तो एच. आर कडे पोचला. एच. आर. च्या मेननने त्याला लेखी तक्रार द्यायला सांगितली. त्याने ती दिलीही पण शेवट काय आणि कधी ते त्यालाही माहित नव्हतं. वर्ष अखेरीचा ’बोनस’ गेला, प्रमोशन गेलं. बोनसचं दु:ख नव्हतं. प्रमोशनही मिळेल पुढच्यावर्षी. सुदेशला विषाद वाटत होता ते कुणीतरी त्याला पद्धतशीर गोवतंय याचा. हे काम कोणाचं असेल? कुणाचा डाव असेल हा? तीन- चार नावं झटकन त्याच्या मनात येऊन गेली पण ते काम एच. आर. चं होतं. उगाच कोणाला जाऊन विचारलं तर काहीतरी वेगळंच होईल हे त्याला माहित होतं. एच. आर. मधल्या मेननच्या हालचाली संथ चालू होत्या. सुदेशचा धीर सुटत चालला, त्याचं वागणं बदललं, कामात सावधपणा आला. चुकाही व्हायला लागल्या. समोरच्याला हजार प्रश्न विचारून तो हैराण करायला लागला. कधी विश्वासात घेऊन, कधी अंगावर खेकसत. एका न संपणार्‍या गोष्टीची सुरूवात झाली होती.

शेफालीने तिच्या अभ्यासाचा विषय असलेले बंड्या खोत, अनुपम पटेल आणि सुदेश जाधव समोर बसलेल्या सर्व प्राध्यांपकासमोर उभे केले. तिघांच्या गोष्टी तिने सांगून संपवल्या. काहीक्षण साठे काहीतरी विचारतील म्हणून वाट पाहिली. पॉवर पॉईट बंद करत तिने समोर पाहिलं. १०० नजरा तिच्यावर रोखलेल्या होत्या. तिचं ध्येय होतं साठे. साठेंनी तिला निवडलं तर पुढचा अध्याय सोपा होता पण साठ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी तिची ती अपेक्षा मावळली होती.
"शेफाली." साठ्यांच्या बाजूला बसलेल्या भंडारीनी तिचं नाव घेतलं आणि ती विचारांतून भानावर आली.
"बंड्या खोत मला भेटला फेसबुकवर." प्राध्यांपकांमध्ये खिसखीस पिकली.
"म्हणजे त्याच्या पुतणीच्या पोस्टने मला उत्सुकता वाटली बंड्याबद्दल." सगळे का हसले ते शेफालीच्या लक्षात आलं नाही पण त्यामुळे ती अस्वस्थ मात्र झाली. नजरा टाळत तिने आपलं बोलणं रेटलं.
"बंड्या गावातला, नुसतं बसून खाणारा, काडी चघळत वेळ घालवणारा, काहीही न करणारा माणूस. ऐतखाऊ, आळशी, मूर्ख किती विशेषणं होती त्याला. त्यावरच्या प्रतिक्रियाही लक्षवेधी होत्या. कुणीतरी लिहिलं होतं.
’पूर्वीच्या काळात घरटी प्रत्येकी चार - पाच मुलं असायचीच. त्यातला एक ’बंड्या’ निघायचाच. आठवा, प्रत्येकाने. कुणाचा ना कुणाचा काका, मामा या बंड्यासारख असेलच.’ ही प्रतिक्रिया वाचली आणि वाटलं, या बंड्यालाच नक्की काय झालं आहे हे कळलं तर? मी त्या मुलीशी आधी बोलले आणि हळूहळू बंड्याच्या घरातल्या सर्वांशी."
"त्यावरून निष्कर्ष काढलेत?" साठेंनी खोचकपणे विचारलं पण शेफालीने ते ऐकलं नव्हतं. त्यांनी पुन्हा तेच जोरात विचारलं. तेवढं विचारून ते थांबले नाहीत.
"नाही, त्यावरून नाही काही निष्कर्ष काढला. तुमचा गैरसमज होतोय. मी बंड्याशी बोलले. त्याला रस नव्हता माझ्याशी बोलण्यात तरी बोलले."
"काय बोललात?" इतक्या वेळात कुणीतरी तिसर्‍यानेही प्रश्न विचारला हे बघून शेफालीला जरा बरं वाटलं.
"बंड्याला बोलतं करायचा प्रयत्न केला मी. त्याच्याकडे फार बोलण्यासारखं नव्हतंच. सारखा खोतांबद्दल बोलायचा."
"खोतांबद्दल? आश्चर्य आहे. खरंतर त्याची आईच त्याला पाठीशी घालणारी. ती त्याला जास्त जवळची असायला हवी."
"कदाचित..." दुसर्‍या प्राध्यापकांनी साठ्यांना अडवलं.
"कदाचित काय?" शेफालीनेही उत्सुकतेने विचारलं.
"वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बंड्या धडपडत असेल."
"सगळं संपल्यावर?" साठ्यांना हसायलाच आलं.
"म्हणजे?" शेफालीला साठ्यांचा अंदाज येत नव्हता.
"बंड्याचं शिक्षण संपूनही खूप वर्ष झाली म्हणालात ना?"
"त्याचा काय संबंध सर?" शेफालीला राहवलं नाही.
"तुमचा विषय आहे तरी काय नक्की? तुम्ही काय सिद्ध करणार आहात तेच मला कळलेलं नाही."
"मला कळलाय. " भंडारी म्हणाले आणि आपण भंडारींच्या प्रेमात पडलोय की काय असंच शेफालीला वाटायला लागलं. ती हसली,
"मी सांगतेच आहे आता. सर, खोतांबद्दल तो बोलायचा कारण त्याला खोतांच्या अपेक्षा अजूनही पूर्ण कराव्या असं वाटतंय. ’एकदा दहावी झालो की बाबांबरोबर काम करेन असं मला कितीतरी वेळा सांगितलं त्याने.’ प्रत्यक्षात ते शक्य नाही हे माहित असेलच त्याला, कळत असणारच. दहावी नापास हीच ओळख आहे त्याची. परीक्षा द्यायचं वयही गेलं आहे. तरीही त्याला दहावी पास व्हायचं आहे. तुम्हीच सांगा, असे किती ’बंड्या’ असतील की ज्यांना, त्यांना काय झालं आहे हे कधी कळलंच नसेल? ना त्यांना, ना त्यांच्या आजूबाजूच्यांना.
समथिंग इज रॉग विथ डॅड... श्रिना तिच्या आईला ओरडून सांगतेय. जे सतरा वर्षाच्या मुलीला समजतंय ते अनुपम पटेलना समजू नये? त्यांच्या बायकोला समजू नये? दुर्लक्ष करतात की खरंच समजत नाही हाही भाग आलाच.
सुदेशला जे भोगावं लागतंय आणि त्यावर तो जसा ’रिॲक्ट’ होतोय त्यावरून त्याच्या बायकोला वाटतंय की त्याचा तो स्वभावच आहे. त्यामुळे प्रत्येकजण दूर असतो त्याच्या, भानगडीतच पडत नाहीत. जिथे कामाशी संबधित असतं तिथे कधीतरी असा स्फोट होतो आणि कुणीतरी ’नॉट ॲप्रोचेबल’ असा शेरा मारतं.

"बंड्या खोत, अनुपम पटेल, सुदेश जाधव. तीन पिढ्याचं प्रतिनिधित्व करणारी ही तीन नावं. बंड्या आता जवळपास पन्नाशीला आलेला आहे, अनुपम पटेलनी चाळीशी नुकतीच ओलांडली आहे. सुदेश आहे तीशीच्या आसपासचा. या तिघांना एकाच रोगाने ग्रासलेलं आहे. ना ते त्यांना कळलंय ना इतरांना. बंड्यावर जे उपचार झाले ते सगळे गंडे दोर्‍यांचे. वहिनी एकट्याच सतत कुठला ना कुठला उपाय शोधत राहिल्या, अजूनही शोधतायत. अनुपम पटेलांच्या घरात त्यांच्या तरुण मुलीला समथिंग इज रॉग याची जाणीव झाली आहे हे ही खूप असं म्हणायची वेळ या रोगाने आणली आहे." शेफाली तिच्याकडे लागलेल्या नजरांना तिने काढलेले निष्कर्ष सांगत होती. जवळजवळ १०० हून अधिक स्टडी केसेस तिने हाताळल्या होत्या, त्यांचा अभ्यास केला होता, त्या त्या व्यक्तिशी बोलली होती. आणि त्यातून एकच निष्कर्ष निघत होता. तो ती तिच्या गुरूंसमोर मांडत होती. या नजरा होत्या प्राध्यापकांच्या. प्रत्येक प्राध्यापक आपले विद्यार्थी निवडणार हे नक्की झालं होतं. कॉलेजला हा वेगळा प्रयोग करून पाहायचा होता. शेफालीचं लक्ष्य प्रा. साठे होतं. साठ्यांचा दबदबा, हुशारी ती जाणून होती. तिला त्यांच्या हाताखाली काम करायचं होतं, शिकायचं होतं. ती तावातावाने निष्कर्ष मांडत होती. टेबलाच्या कडा घट्ट धरून ती बोलत होती. काहीशा ’स्टिफ’ वाटणार्‍या तिच्या हालचाली साठे निरखीत होते.
"या सर्वांना नैराश्याने ग्रासलं आहे. डिप्रेशन." इतक्या संथपणे शेफाली म्हणाली की, ’अगं बोल ना पटकन’ असं कुणीतरी सांगेल. पुढे बोलायला सुरूवात करण्याआधी तिने प्राध्यापक साठ्यांकडे पाहिलं. साठे एकटक तिच्याकडे पाहत होते.
"माझ्या प्रश्नाचं उत्तर?" साठ्यांनी पुन्हा एकदा तिला थांबवलं.
"काय प्रश्न होता सर तुमचा?" बुचकळ्यात पडल्यासारखं शेफालीने विचारलं.
"विसरलात? मगाशी तर म्हणाला होतात शेवटी सांगते." शेफालीने मान खाली घातली.
"वेगवेगळ्या देशातल्या व्यकी घेतल्यात अभ्यासासाठी तर सगळे भारतीयच का? असा प्रश्न विचारला होता मी."
"हो. आपला समज असा आहे की भारतीयांमध्ये हे प्रमाण फार कमी आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी आपण सहज बोलू शकतो. आजूबाजूला भयाण शांतता नसते. माणसांमध्ये वावरतो आपण. सगळं खरं असलं तरी खरंच मनमोकळं करतो आपण? एकमेकांशीच इतकी स्पर्धाही असते की निखळ मैत्री कितीजणांची असते? जो तो कशाच्यातरी मागे धावतोय. सुखाच्या, समाधानाच्या मागेही आपण ते नक्की काय आहे हे समजून न घेताच लागलोय. गर्दीतही माणूस एकाकी असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. तीव्र स्पर्धेमुळे माणसाला नैराश्य येऊ शकतं हे आपल्याला समजत नाही. खेडेगावातल्या बंड्या तर खोतांचा मुलगा. हातपाय न हलवता सगळं मिळतंय तरी सुख बोचतं असं म्हणतायत त्याला सगळी. त्याला नैराश्य आलं आहे हे इतरांना कळलेलं नाही. त्याला ते कळण्याची त्याची कुवतच नाही. खोतांच्या सतत टोचून बोलण्याने बंड्यावर नक्कीच परिणाम झाला. ना हे खोतांना कळलं, ना इतरांना. आपल्याकडे याचा पद्धतशीर अभ्यास नाही, लोक तज्ञांची मदत घ्यायला पटकन तयारच होत नाहीत कारण मानसिक आजाराला आपण आजार मानतच नाही. वेडेपणाचा शिक्का लावतो, दृष्टीच बदलते त्या व्यक्तींकडे बघण्याची.
आकडेवारी उपलब्ध नाही म्हणजेच नैराश्यग्रस्त, डिप्रेस्ड माणसांच्या संख्येचा डेटाबेस नाही म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या भारतीयांमध्ये नैराश्याचं प्रमाण कमी आहे. हा गेलं वर्षभर मी पाहिलेल्या १०० हून अधिक माणसांचा अभ्यास करून काढलेला प्राथमिक निष्कर्ष आहे. मला पुढच्यावर्षी यावर अधिक रिसर्च करायचाय."
"तुम्हाला खरंच वाटतंय झेपेल हे तुम्हाला? नीट विचार करा. प्रमिलावहिनी आठवतायत का? बंड्याची आई. मी तुम्हाला बंड्याच्या आईबद्दलही विचारलं होतं." साठे इतकंच म्हणून थांबले नाहीत. ते उठले आणि हॉलच्या बाहेर पडले. शेफालीने टेबलाची कडा घट्ट पकडली. प्रमिलावहिनींना का धरून ठेवलंय साठ्यांनी ते तिला समजत नव्हतं. ती तशीच उभी राहिली. पुढच्यावर्षी साठ्यांच्या हाताखाली काम करायचं स्वप्न भंग पावताना तिला दिसत होतं. तिला साठ्यांच्या मागून बाहेर धावत जावं, त्यांना अडवून जाब विचारावा नाहीतर तिची निवड करण्याची गळच घालावी असं वाटत होतं. पाय मात्र तिथून हलायला तयार नव्हते. काहीवेळाने संथ पावलं टाकत ती स्वत:च्या जागेवर जाऊन बसली. निर्णयाचा क्षण जवळ येत चालला होता. शेफालीसारखी अनेकजणांची प्रतिक्षा सुरू झाली होती. शेफालीच्या मनात मात्र साठेसरांचं तिथून निघून जाणं ठाण मांडून बसलं होतं. का निघून गेले ते?

उठून आलेले साठे दाराबाहेरच्या बाकड्यावर टेकले. कितीतरी दिवसांनी त्यांना किंचित उत्साह आल्यासारखं वाटलं. त्यांना त्यांचा पुढचा विषय सापडला होता. शेफाली आजगावकर. नैराश्यांच्या वाटेवर पाऊल टाकलेली शेफाली आजगावकर! शेफालीचं नैराश्य आणि त्याला कारणीभूत असलेल्या तिच्या १०० हून अधिक स्ट्डी केसेस हा विषय त्यांच्या मनात घोळायला लागला. तासाभरात त्यांनी शेफालीची अनेकप्रकारे परीक्षा घेतली होती. तिच्या हालचालीतला संथपणा, बोलताना काढलेलं पोक, नजरेला नजर न देणं... कितीतरी गोष्टी. एका वर्षात तिच्यातला हा बदल तिला जाणवलेलाही नाही. वर्गातली हसरी, खेळकर शेफाली नकळत बदलत चालली आहे हे तिच्यासह कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं. कामाचा ताण असंच प्रत्येकाने गृहीत धरलं होतं. ते तितकंच नव्हतं हे साठ्यांच्याही आज अचानक लक्षात आलं आणि साठ्यांना तिचं नैराश्य खुणावायला लागलं.

शेफालीने तिच्या केसेसच्या बाबतीत जे केलं तेच आता ते करणार होते. शेफालीला कल्पना न देता तिच्या नैराश्याचा, डिप्रेशनचा ते अभ्यास करणार होते. प्रत्येक प्राध्यापकाला एक विद्यार्थी असा खेळ होता हा. या खेळात योग्य विद्यार्थ्याची निवड करुन जो जिंकेल तो कदाचित प्राचार्यपदाच्या रांगेत आणखी पुढे जाईल. साठ्यांना एकदम घाम आला. ते अस्वस्थ झाले. त्यांच्या छातीत धडधडायला लागलं. रांग मोठी होती, स्पर्धा प्रचंड होती. त्यात पुढे पुढे सरकणंच कठीण होतं. हुकमाचा एक्का हातात आल्याचा आनंद त्यांना झाला.

"मी शेफाली आजगावकरची निवड करतोय." त्यांनी म्हटलं आणि शेफालीला विलक्षण आनंद झाला. मनातल्या मनात. चेहर्‍यावर तो दिसत नव्हता. साठ्यांना त्याची कल्पना होती. त्याचवेळी भंडारींच्या चेहर्‍यावर स्मितहास्य होतं. साठ्यांचा विषय त्यांच्या लक्षात आला होता आणि त्यातूनच त्यांना जी कल्पना सुचली होती त्यामुळे साठ्यांना शह देता येईल याची त्यांना खात्री पटली होती. त्यांनी मनातल्या मनात स्वत:ची पाठ थोपटली. गेली दोन वर्ष साठ्यांच्या हाताखाली काम करता करता त्यांना कळूही न देता केलेला अभ्यास आणि अचानक हाती आलेल्या प्रमिलावहिनी. शेफालीकडून प्रमिलावहिनींची माहिती मिळवून ते प्रमिलावहिनींशी बोलणार होते. प्रमिलावहिनींचा अभ्यास केला की अतिशय दोन वेगळ्या गोष्टींचा समावेश करून त्यांना त्यांची खुर्ची बळकट करता येणार होती. प्राध्यापक भंडारींचा विषय नक्की झाला होता.

विषण्णतेकडून नैराश्याकडे चाललेले साठे आणि प्रमिलावहिनींनी स्वत:च्या नकळत त्यांना ठाऊकच नसलेल्या नैराश्यावर आपसूक केलेली मात!

(अनुराधा दिवाळी अंक २०२० मध्ये प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

Mast

जबरी

झक्कास ! एकंदर मांडणी आवडली.

वॉव!

झकास

प्रत्येक व्यक्तिरेखेशी relate होईपर्यंत दुसरी व्यक्तिरेखा येत होती त्यामुळे शेवटपर्यंत खिळवून ठेवले कथेने. फक्त शेवटचं नाही तर संपूर्ण कथा जमलीये