बांद्रा वेस्ट १३

Submitted by मिलिंद महांगडे on 15 November, 2020 - 07:52

बांद्रा वेस्ट १३

 ' कोकेन  ' हा  शब्द कानावर पडला  आणि दोघे उडालेच. " काय  ?  " दोघांच्याही तोंडुन हाच शब्द बाहेर पडला. कदाचीत आपण चुकुन हे काहीतरी ऐकलं असावं असं वाटुन दोघेही भांबाऊन समोर पहात राहीले. हे कोकेन ,  चरस  असले प्रकार केवळ फिल्म मधे पाहीले आणि ऐकले होते. त्यांचा प्रत्यक्ष संबंध कधी येईल असं त्यांना  स्वप्नात सुद्धा  वाटलं नव्हतं.  दोघांचीही डोकी सुन्न झाली.  

" एवढं घाबरायला काय झालं  ?  तुम्हाला घ्यायला सांगत नाही.  तुम्ही फक्त हे एका ठिकाणी पोहोचवायचंय . " वैनीसाहेब इतक्या सहज म्हणाल्या. की बाजारातुन किराणामाल आणुन एखाद्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. 

" अहो... पण आम्हाला कशाला अडकवताय ह्यात. ?  आमचा काय संबंध....? " मॉन्ट्याच्या  हातापायाला मुंग्या यायला लागल्या.  

" हां वैनीसाहेब प्लीज... आम्ही नाही करु शकत हे काम... " रॉड्रीकनेही मॉन्ट्याला दुजोरा दिला. तोही घाबरला होता.  हे भलतंच लफडं मागे लागलं. एकतर काहीही कारण नसताना त्यांना त्या रिक्षावाल्यासोबत उचललं होतं. आणि आता हे झंझटवालं काम त्यांच्या मागे लागलं होतं. 

 " हे काम तुम्ही करनार का  नाही हे मी विचारलं नाहीये. मी तुम्हाला हे काम करायला सांगितलंय.  समजलं. ..! " वैनीसाहेब त्या दोघांकडे रोखुन पहात म्हणाल्या. 

" पण तुम्ही आम्हालाच का सांगताय हे काम.  आम्हाला काही माहीती नाही ह्याची. तुमच्याकडे तुमची बाकीची माणसं आहेत ना. "  मॉन्ट्या त्यांच्याशी भांडणाच्या उद्देशाने म्हणाला . तो आणखीनही काहीबाही बोलणार होता,  तेवढ्यात पिस्तुलाची थंडगार नळी त्याच्या कपाळावर टेकली. 

" बोल... आता काय म्हनायचंय अजुन ... " वैनीसाहेब त्या नळीइतक्याच थंड चेहऱ्याने म्हणाल्या. आता काय बोलणार ?  दोघेही गप्प बसले.   मधे थोडा वेळ गेला. रॉड्रीक म्हणाला,  " वैनीसाहेब, कॅन आय आस्क यु ए क्वेश्चन  ?  " वैनीसाहेबांच्या मख्ख चेहऱ्याकडे पाहुन लगेच त्याने मघाच्या वाक्याचं  मराठीत रुपांतर करुन सांगितलं.  "  एक विचारु का ?  " 

" हम्म.... " 

" ऍक्च्युली मला काय म्हणायचं आहे की ते कोकेन पोचवताना आम्हाला पोलीसांनी पकडलं तर ?  "

"  अरे ,  म्हणुन तर तुम्हाला पाठवतेय " वैनीसाहेब म्हणाल्या.  त्यांच्या ह्या बोलण्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा हे दोघांनाही कळेना. दोघेही एकमेकांकडे पाहु लागले.  त्यांची एवढी  माणसं  असतानाही काही ओळख पाळख नसलेल्यांना त्या समोरच्या बाईने हे काम दिलं  होत.  म्हणजे ह्या  कामात भरपूर धोका असण्याची शक्यता होती . 

" आणि समजा आम्ही ते घेउन पळुन गेलो तर  ?  " मॉन्ट्याने मधेच विचारलं. 

त्याच्या ह्या बाळबोध प्रश्नावर वैनीसाहेब जोरजोरात हसत सुटल्या.  काही केल्या त्या थांबेनात. रॉड्रीकला शोलेमधल्या गब्बरसिंगच्या त्या प्रसिद्ध हास्याची आठवण झाली.  " तु.... तुम्ही .... आनि  कोकेन  घेऊन पळुन जानार....? " त्या हसत हसत म्हणाल्या. ह्यावर दोघांना काय बोलावं ते कळेना.  " आनि  काय करनार त्या कोकेनचं ...?  पावडर म्हणुन तोंडाला लावनार ...?  " वैनीसाहेब हसु आवरत म्हणाल्या. खरंच , काय करणार होते ते दोघे त्या कोकेन चं  ?  दोघांनीही विचार केला.  

" तुम्ही काहीही उलटसुलट करन्याचा प्रयत्न केलात तर  तुम्हाला तर माहीतीच आहे की माझी मानसं पिस्तुल चालवायला बिलकुल मागेपुढे पहानार नाहीत. माझी दोन मानसं नेहमीच तुमच्या पाळतीवर असतील ,  समजलं...! " हसता हसता वैनीसाहेब एकदम गंभीर झाल्या. ' आता आपण पुरते अडकलो. ' याची चिंता दोघांच्याही चेहऱ्यावर साफ दिसत होती. आता निर्णय त्यांच्या हातात राहिला नव्हता  पण,  त्याचवेळी ह्या गुंडांच्या तावडीतुन सुटण्याचा मार्गही त्यांना दिसत होता. म्हणजे, जर सर्व काही व्यवस्थीत पार पडलं तर....!  

 " ऑल राईट,   आम्ही करतो तुमचं काम.  पण त्यानंतर आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही.  तुम्ही आम्हाला सोडुन द्यायचं .  " काहीसा विचार करुन रॉड्रीक म्हणाला.  परंतु मॉन्ट्याला हे पटलं नव्हतं.  ह्या कामात खुपच धोका होता.  पोलिसांच्या तावडीत सापडले  तर त्यांचे हाल कुत्राही खाणार नव्हता .  परंतु रॉड्रीकने कबुल केल्याने त्याच्याकडेही काही पर्याय उरला नाही. 

" तुम्ही माझं हे काम केल्यावर मला तुमची काय गरज...!  तुम्ही मोकळे ... ! " वैनीसाहेब खांदे उडवत म्हणाल्या. 

" ठिक आहे कुठे पोहोचवायचं आहे. द्या लवकर.  "मॉन्ट्या म्हणाला  . त्याला लवकरात लवकर ह्या झंझटीतुन सुटायचं होतं. 

 " अरे,  थांबा.  एवढी घाई काय ?  आधी सामान तर येऊद्या. " वैनीसैहेब म्हणाल्या. आणि त्यांनी पुन्हा एकदा फोन  लावला. फोन झाल्यावर त्या पुन्हा ह्या दोघाकडे पाहुन म्हणाल्या. ,  " दहा मिन्टात सामान येईल,  ते खारला एका बंगल्यात पोहोचवायचं.  हा त्याचा पत्ता. " वैनीसाहेबांनी पत्ता लिहीलेला एक कागदाचा चिटोरा रॉड्रीकच्या हातात दिला.  

" आम्ही तिकडे कसं जायचं ...?  म्हणजे लांब आहे हा ऍड्रेस.  " रॉड्रीक त्या कागदाच्या चिटोऱ्याकडे पहात म्हणाला.  

" त्याची काळजी तुम्ही करु नका. सगळी व्यवस्था हाय  आपल्याकडे. " वैनीसाहेब म्हणाल्या.  

" ते सामान कुणाला द्यायचं?  " मॉन्ट्या 

"  ही घे बॅटरी... " वैनीसाहेबांनी त्याच्याकडे बॅटरी फेकली. 

" हे कशासाठी ?  " मॉन्ट्या ती बॅटरी निरखत म्हणाला.  

" ह्या पत्त्यावर गेलात की,  तीन वेळा ही बॅटरी चालु बंद करायची.  समोरुन तशीच तीन वेळा बॅटरी चमकली तरच पुढे जायचं.   तिथं एक माणुस आसल .  त्याच्याकडे ते सामान द्यायचं. तो तिथेच भेटंल तुम्हाला. पण लक्षात ठेवा,  समोरच्या माणसाकडची बॅटरी तीन वेळा पेटली तर आनि  तरच त्याच्याकडे हे सामान द्यायचं. " वैनीसाहेब लहान मुलाला समजावतात तसं समजावुन सांगत होत्या.  ही बाई लेडीडॉन झाली नसती तर प्राथमिक शाळेची शिक्षीका  शोभली असती असा एक विचार रॉड्रीकच्या डोक्यात चमकुन गेला. 

" पण वैनीसाहेब,  तुम्ही म्हणता तसा बॅटरीवाला माणुस समोर आलाच नाही ,  म्हणजे त्याची आणि आमची भेटच झाली नाही तर ...?  " मॉन्ट्याने वेगळाच प्रश्न विचारला. ही सुद्धा एक शक्यता होतीच,  ज्याचा कोणीच विचार केला नव्हता. वैनीसाहेबही काही वेळ विचारात पडल्या. अशीच वेळ आली तर काय करायचं?  बराच वेळ विचार करुनही त्यांना काही सुचेना " हॅट,  तसला कायपन  होनार नाय .... तो माणूस तिथं आधीपासूनच उभा आहे .  " म्हणुन त्यांनी विषय त्यांनी तिथल्या तिथे बंद केला.  

अशीच बरीच प्रश्नोत्तरे झाल्यावर आता आणखी काय विचारायचं ?  दोघेही विचार करु लागले. काय शोधायला निघाले होते आणि आता काय करावं लागतंय ...!  रॉड्रीकला पुन्हा ती कालची रात्र आठवली.  त्याच्या मुर्खपणामुळे ती नोट त्याच्याकडुन गेली होती. तो मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या देऊ लागला.  मॉन्ट्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होता.  तोही कदाचित तसाच विचार करीत असेल.  पण आता खेळ सुरु झाला होता. ज्याचे नियम काहीही नव्हते. कसा खेळायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं होतं. त्याच्या नकळत ते ह्या भयानक खेळाचे भाग झाले होते. कितीही मनात असलं तरी आता हा खेळ त्यांना मधुनच सोडता येणार नव्हता.  तेवढ्यात एकजण मोटरसायकलवर त्याठिकाणी आला.  तो गाडीवरुन उतरुन थेट वैनीसाहेबांकडे गेला. तो माणुस त्यांच्याच गँगचा वाटत होता.  

"काय रे भाड्या ? किती वेळ ? " आल्या आल्या वैनीसाहेबांनी त्याच्यावर तोंड टाकलं.  

" माफी करा.  माल द्यायलाच समोरच्या पार्टीनं उशीर केला त्याला मी तरी काय करनार... "

" नीट आनलास का सगलं?  " 

" हा  वैनीसाहेब... हे घ्या.  " असं म्हणुन त्याने एक पेपरमधे गुंडाळलेला लहानसा चौकोनी बॉक्स   त्यांच्या हातात दिला.  त्यांनी तो हातात घेऊन एकदा वास घेऊन पहिला . त्यांची खात्री  असावी . 

“ ए  हिरो ,  इकडं ये . हे घे . हे तिकडे पोचवायचं . “ रॉड्रिक ने थरथरत्या हातांनी तो बॉक्स घेतला . त्याच्या कानाच्या मागुन घामाचा एक थेंब मानेवरुन खाली सरकत गेला. 

क्रमशः

https://kathakadambari.com

माझी अर्धदशक  नावाची कादंबरी वाचण्यासाठी खाली लिंक दिली आहे

https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ARDHADASHAK/3048.aspx

Amazon link

https://www.amazon.in/Ardhadashak-Milind-Mahangade/dp/9353174163/ref=sr_...

Flipkart Link

https://www.flipkart.com/ardhadashak/p/itm7149b4896e81d?pid=978935317416...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users