चूक!

Submitted by पराग र. लोणकर on 11 November, 2020 - 01:32

चूक!

सहाचे सुमारास घरी पोचणारा मी आज चारलाच घरी पोहोचत होतो. आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर माझी गाडी दिसताच सिक्युरिटीचा माणूस गेट उघडायला धावत आला. माझी गाडी गेटमधून आत घेत असतानाच मला आमच्या दुसऱ्या रिझर्व पार्किंगमध्ये आशुचीही गाडी लागलेली दिसली. रोज सात नंतर येणारी आशुही आज लवकर आलीये की काय! मला प्रश्न पडला. मी सिक्युरिटीवाल्याला विचारलं,

``आशू madamही आल्यात का?``

``हो साहेब. आत्ताच! पाचच मिनिटं झाली असतील.``

आशू आल्याचं कळल्यावर माझी थोडी चलबिचल झाली. ज्या कामासाठी मी लवकर घरी आलो होतो ते मला गुप्तपणे करायचं होतं. आता तर आशू घरी आली होती. मी थोडासा विचार केला. मग लक्षात आलं, मी आमच्या गेस्टरूममध्ये माझं काम शांतपणे करू शकत होतो. मी ऑफिसचं काम करतोय सांगितल्यावर आशू मला तिथे disturb करायला आली नसती.

मी गाडी पार्क केली आणि लिफ्टनं वर येऊन माझ्या flatच्या दारात उभा राहिलो. बेल वाजवावी असं डोक्यात येऊनही मी माझ्याकडच्या किल्लीनं latch उघडलं. घरात शांतता होती. आमच्या बेडरूमचं दार घट्ट बंद होतं. मला बरंच वाटलं. मी ते दार उघडून, आशूला मी आल्याचं वगैरे काहीही न सांगता थेट गेस्टरूममध्ये गेलो आणि आतून दार lock केलं.

माझा laptop मी लावला. माझी bag उघडली. त्यातील ते लहानसे खाकी पाकीट बाहेर काढले. त्याच्या स्टेपलरपिना काढून मी त्यातील कागद आणि पेन drive बाहेर काढला. त्या पाच-सहा पानांवरून नजर टाकण्याचा मोह आवरून मी तो पेन drive laptopला लावला. तो access केला. आतील फोटो आणि video पाहून मी केवळ थक्कच नाही तर प्रचंड संतापलो.

काय झालं ते सांगतो. मी एका मेहता नावाच्या private detectiveला गेले महिनाभर आशूवर पाळत ठेवायला सांगितली होती. तिचं कुठेतरी affair असावं असा मला संशय होता. साधारण महिन्यापूर्वी या detectiveची एक जाहिरात माझ्याकडे येत असलेल्या एका मासिकात आली होती. जाहिरात म्हणजे खरं तर तो एक लेख होता. अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करणारा. मी त्याला संपर्क केला, माझं काम सोपवलं आणि आज त्यानं मला जे पाठवलं होतं त्यात माझ्याच महिनाभराच्या सगळ्या activities मला दिसत होत्या. महिनाभरात मी attend केलेल्या अनेक business meetingsपासून माझ्या personal assistant रोझीबरोबरच्या private meetingपर्यंत. त्यातील काही फोटो आणि video तर इतके हुशारीने घेतले होते, की हे कसे घेतले असतील याचं मला मोठं आश्चर्यच वाटलं. हा detective खरोखरच अतिशय professional आहे याबद्दल माझी खात्रीच झाली. एकाच गोष्टीचं मला नवल आणि प्रचंड चीडही आली, आणि ते म्हणजे आशूवर पाळत ठेवण्याऐवजी या मूर्खाने माझ्यावरच पाळत ठेवलेली दिसत होती.

या मेहताला चांगलं झापावं या विचारानं मी उठलो, पण आपला आवाज फार वाढणार हे लक्षात आल्यानं मी घराबाहेर जाऊन त्याच्याशी बोलावं या विचारानं गेस्टरूममधून बाहेर पडलो. आमच्या बेडरूमचं दार अजूनही बंदच होतं. आशूला मी आल्याचं अजून कळलेलं दिसत नव्हतं. माझी दररोजची यायची वेळ व्हायला अजून वेळ होता.

मी आमच्या बेडरूमच्या दाराच्या बाहेर जाऊन कानोसा घेतला. आशू कुणाशीतरी फोनवर बोलत होती. गम्मत म्हणजे तीही कोणावर तरी कमालीची संतापली होती. मी घरात आहे हे माहीत नसल्यानं तिचा आवाजही तसा चढलेलाच होता. मला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं.

``मी मेहता, मी तुम्हाला माझ्यावरच पाळत ठेवायला सांगितली नव्हती. माझा नवरा राजेशवर पाळत ठेवायची होती. त्याचं काही कुठे लफडं चालू आहे का, ते पाहायचं होतं मला. आणि तुम्ही मला माझ्याच महिनाभराच्या activities काय दाखवताय! माझं लफडं चालू नाहीये. अर्थात, ही सगळी पाळत ठेऊन तुमच्या ते लक्षात आलंच असेल! मासिकातल्या तुमच्यावरच्या लेखावरून मला तुम्ही highly professional वाटला होतात. पण हा काय मूर्खपणा केला आहे तुम्ही...``

आशू भयानक चिडली होती आणि बहुदा मेहता तिकडून काहीच बोलायच्या मन:स्थितीत नव्हता.

माझ्या सगळं साफ लक्षात आलं. मेहताला हे काम सोपवणारा मी एकटा नव्हतो. आशूनंही माझ्यावर पाळत ठेवायचं काम त्याच्यावर सोपवलं होतं. आणि मेहता पक्का professional असल्यानं त्यानं आम्हा दोघांनाही काहीही कळू न देता, दोघांचंही काम स्वीकारलं होतं. त्यानं फक्त एक चूक केली होती. त्याच्या कामाचा अंतिम report, महिनाभर पाळत ठेवल्यानंतरचा सगळा वृत्तांत लिहिलेले ते कागद आणि पेन drive, असलेली पाकीटं चुकून एकाची दुसऱ्याला गेली होती. बाकी काम बिचाऱ्या मेहतानं चोख पार पाडलं होतं.

आता, आशूचं कुठलंही affair चालू नाही हे मला कळलं होतं, आणि मेहताच्या या चुकीमुळे माझं लफडं आशूला कळलं नव्हतं.

मी दबक्या पावलानं घराबाहेर पडलो आणि मेहताला फोन लावला.

महिनाभर माझ्यावर पाळत ठेवल्यामुळे माझ्या संपर्कात कसल्या कसल्या प्रकारची माणसं असतात हे मेहताला कळलं होतं. या झालेल्या चुकीमुळे आणि त्यानं माझ्यावर पाळत ठेवल्याचं कळल्यामुळे मी भलताच चिडलो असणार असं वाटून मेहता कमालीचा घाबरला होता. माझा फोन न उचलण्याचंही धाडस त्याच्यात नव्हतं. त्यामुळे माझा फोन उचलताच मला त्याचा आवाज आला,

``र... र... राजेश साहेब, I am very s... s... sorry!``

``थांब मेहता, थांब. तू professional आहेस.. तू कामही चोख केले आहेस. फक्त एक चूक झाली एवढंच! तीही माझ्या पथ्यावर पडलेली चूक. तेव्हा cool down! हं! आता एक मात्र कर. माझ्यावर पाळत ठेऊन माझं केलेलं सगळं रेकॉर्डिंग delete कर. त्याचे मी वेगळे पैसे देईन. तुझ्या श्रमाचा मोबदला तुला मिळेल. आता आशूचा फोन उचलायचा नाही. आणि यात काही डबलगेम खेळायचा प्रयत्न केलास तर मी कसा माणूस आहे हे तुला गेल्या महिन्याभरात कळलेलंच आहे. त्यामुळे तसा काही प्रकार तू करणार नाहीस याची मला खात्रीच आहे. उद्या ऑफिसला येऊन तुझं payment घेऊन जा. ठेव फोन.``

काहीही न बोलता मेहतानं फोन ठेऊन दिला.

आशूचं बाहेर काहीही चाललेलं नाही हे मला कळलेलंच होतं. खरं तर माझं आणि रोझीचं जे चाललं होतं तेही आम्ही संपवलं होतं. काही दिवसांपूर्वी आमची जी भेट झाली होती ती अखेरचीच भेट होती. त्या भेटीतच आम्ही दोघांनीही परस्पर संमतीनं यातून बाहेर पडायचं ठरवलं होतं. ती आता तिच्या पतीशी प्रामाणिक राहणार होती आणि मी आशुशी. नेमकं चांगल्या मार्गावर येत असताना, मेहतानं केलेल्या कामगिरीमुळे मी अडचणीत येणार होतो.

पण याच मेहतानं केलेली एक लहानशी चूक माझ्या पथ्यावर पडली होती...

*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults