अब्जाधीशांचे वर्तन तर्काच्या कसोटीवर

Submitted by केअशु on 7 November, 2020 - 01:21
टाटा अंबानी

मित्रहो! गेले काही दिवस एका प्रश्नाने मनात घर केले आहे.मी हा प्रश्न बर्‍याच जणांना विचारला पण पटेलसे उत्तर कुठेच मिळाले नाही.

वरच्या फोटोत दिसणार्‍या व्यक्ती श्री रतन टाटा आणि श्री मुकेश अंबानी हे भारतातील अब्जाधीश उद्योगपती आहेत.फोटोत ते तिरुपतीच्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी आल्याचे दिसत आहे.निदान ते मंदिर प्रांगणात आहेत इतके तरी नक्कीच.

तर प्रश्न असा आहे की हे दोघे अब्जाधीश पदरचे ३-४ तास खर्च करुन तिरुपतीच्या बालाजीला का गेले असावेत? (मंदिर कोणत्या देवाचं आहे हा प्रश्न इथे महत्वाचा नाहीये.ते कोणत्याही देवाच्या मांदिरात गेले तरी फरक पडत नाही.)

आता तर्काच्या/विज्ञानाच्या कसोटीवर हा प्रश्न थोडा घासून पाहू.

१) या दोघांचा बालाजीवर विश्वास आहे.बालाजीला गेल्यास बालाजी आपल्याला आशिर्वाद देईल.नवीन कंत्राट मिळेल किंवा चालू असलेली बोलणी यशस्वी होऊन आपला उद्योग अजून फायद्यात येईल.

तर्क: श्री रतन टाटा हे हार्वर्डचे पदवीधर आहेत.मुकेश अंबानी हे युडिसिटीचे केमिकल इंजिनिअरिंगची पदवीधर आहे.म्हणजे दोघांचं शिक्षण चांगलं दणदणीत आहे.नामांकीत संस्थेतून चांगल्या गुणवत्तेतून उत्तीर्ण आहेत.इतकच काय पण दोघे जो उद्योगसमूह चालवतात तो चालवणं यासाठी प्रचंड बुद्धीमत्ता लागते.गल्लीतल्या सोम्यागोम्याचे ते काम नक्कीच नव्हे. लोकांच्या स्वभावाचा , अर्थव्यवस्थेचा आणि अशा बर्‍याच गोष्टींचा प्रचंड अभ्यास असावा लागतो.शक्य तितका योग्य निर्णय पटकन घेणं अपेक्षित असतं.

सोप्या शब्दात या दोघांचं तार्किक ज्ञान किंवा जगाचा अभ्यास हा सामान्य बुद्धीच्या लोकांच्या तुलनेत खूप खूप वरच्या दर्जाचा आहे.

मग इतकं चांगलं तार्किक ज्ञान असणार्‍या या दोघांना एका तांब्या-पितळेच्या किंवा दगडाच्या मुर्तीचे दर्शन आपल्या उद्योगाला बहरण्यास,वाढण्यास मदत कशी करु शकेल असे का वाटले असावे? असा विश्वास या दोघांना का वाटत असावा?

२) या मंदिरांमधे बांधकामाचं काहीतरी कंत्राट मिळालं असावं.त्याची पाहणी करण्यासाठी आले असतील.किंवा नवीन काही सोयीसुविधा या मंदिरात करता येईल का याची पाहणी करायला आले असतील.

तर्क: हे काम करण्यासाठी या दोघांच्या हाताखाली त्या त्या क्षेत्रातले बरेचसे तज्ञ लोक नक्कीच असावेत.त्यासाठी या दोघांना पदरचे ३-४ तास खर्चायची काहीच गरज नसावी ना?

३) दोघेही उद्योगपती आहेत.व्यवसाय म्हटला की आर्थिक चढउतार आले,अस्थिरता आली. त्यामुळे थोडा मानसिक ताण येणं शक्य आहे.कदाचित भगवंताच्या मुर्तीदर्शनाने त्यांचा मानसिक ताण कमी होऊन मनोबल वाढेल म्हणून आले असावेत.

तर्क: मानसिक ताण आलाच असेल तर यावर मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन हाच सर्वात खात्रीचा उपाय आहे.मानसोपचारतज्ज्ञ हे मानसिक ताण कसा हाताळावा,कमी करावा यातले तज्ञ असतात.निर्जीव मुर्तीपेक्षा अभ्यासु मानसोपचारतज्ज्ञ नक्कीच अधिक चांगलं मार्गदर्शन करु शकेल.शिवाय हे दोघे जागतिक स्तरावरचे प्रसिद्ध अब्जाधीश उद्योजक असल्याने जगातल्या कोणत्याही मानसोपचारतज्ज्ञाची अपॉइंटमेंट यांना सहज मिळू शकते.

मला तरी हीच ३ कारणे दिसत आहेत.अजून काही कारणे असू शकतात का?

आता या अब्जाधीशांचं मंदिरात जाण्याची घटना इतकी महत्वाची आहे का?
तर नक्कीच आहे.का ते सांगतो.
बर्‍याचदा निरीश्वरवादी/विज्ञानवादी/पुरोगामी लोक प्रचार करत असतात की देवाचं अस्तित्व शून्य आहे.मंदिरांमधे आहेत त्या निव्वळ निर्जीव मुर्ती आहेत.देवाच्या मुर्तीच्या दर्शनाने तुमच्या जीवनातील समस्या सुटू शकत नाहीत, परमेश्वर ही माणसाने आपल्या भितीतून निर्माण केलेली संकल्पना आहे.तर्काच्या कसोटीवर त्याला अर्थ नाही.विज्ञान हे वारंवार घेतलेल्या कसोट्यांतून सिद्ध झालेलं असतं.त्याला तर्काचं,प्रयोगाचं अधिष्ठान असतं.परमेश्वर या संकल्पनेला तसं काहीच अधिष्ठान नाही.देवाच्या मुर्तीचे दर्शन घेतले नाही तरी काहीही नुकसान होत नाही.साधारण हे असे विचार सदर लोक मांडत असतात.

समाजात जसा काही लोकांना निरीश्वरवादाचा,देव न मानण्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे तसाच देवाच्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा अधिकारदेखील काही लोकांना आहे.आता या देवदर्शन करणार्‍यांमधलेच वर उल्लेखलेले दोन अब्जाधीश आहेत.
आता खरी गंमत पुढे आहे.या दोघांना आदर्श मानणारे कोट्यावधी लोक जगात असणारेत.या दोघांसारखे अब्जाधीश व्हावे,यांच्यासारखे मोठे उद्योजक व्हावे असे बर्‍याच जणांना वाटत असणार.साहजिकच हे दोघे जे काही कृती करतात त्या कृतींचं अनुकरण नक्कीच केलं जात असणार.रतन टाटा , अंबानी यांच्यासारखे अब्जाधीश जर बालाजीच्या मंदिरात जात असतील तर नक्कीच या मंदिरांमधे , बालाजीच्या मुर्तीत काहीतरी अदभुत शक्ती असणार; त्याशिवाय का दोघे येत असतील? असा विचार करुन या दोघांचे अनुकरण सामान्य लोकांनी केले तर त्यांचं मतपरिवर्तन निरीश्वरवादी लोक कसे करतील? कारण मजा अशी आहे की कलियुगात पैसा हा जग चालवणारा सर्वात मोठा घटक आहे.उपरोल्लिखित दोघे पैसा मिळवण्यात प्रचंड यशस्वी आहेत.कदाचित निरीश्वरवादीही इतके धनवान नसतील.मग ज्यांना श्रीमंत व्हायचं आहे ते लोक कोणावर अधिक विश्वास ठेवतील? मंदिरात जाणार्‍या अब्जाधीशांवर की जेमतेम खाऊनपिऊन सुखी असणार्‍या निरीश्वरवादी लोकांवर? साधं लॉजिक आहे.बहुतांश लोक हे या धनिकांच्या कृतीवर विश्वास ठेवतील आणि त्यांच्या कृतींचं अनुकरण करतील.
मग याचाच दुसरा अर्थ असा की देव न मानणारं विज्ञान हे अफाट धनसंपत्ती मिळवून देण्याबाबत परमेश्वराहून कमी ताकदीचं आहे.ते जर देवापेक्षा जास्त ताकदीचं आणि हमखास रिझल्ट देणारं असतं तर मग हे दोघे मंदिरात गेलेच नसते.

काय वाटतं तुम्हाला? असे अत्यंत बिझी अब्जाधीश मंदिरात का जात असावेत? का वेळ देत असावेत मंदिरात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हे म्हणजे शाहरूख सुपर्रस्टार आहे, शाहरूख रपारप सिगारेट पितो, म्हणजे सिगारेट फुंकणे हि स्टारडमची व्याख्या आहे, चला आपणही सिगारेट ओढूया…. असा तर्क झाला.
पण येस्स, असा तर्क करणारे बरेच असतात. आणि त्याला प्रमाण मानून अनुकरन करणारेही असतात, अश्यांना तुम्ही रोखू शकत नाही.

ईतरांचे माहीत नाही पण आजच्या तारखेला माझयमते जगातला सर्वात सुखी माणूस मी स्वतःला समजतो, आणि मी नास्तिक आहे.
पण पुन्हा तेच, माझ्या नास्तिक असण्याच्या आणि माझ्या सुखी असण्याचा आपसात काही संबंध नाही Happy

काय वाटतं तुम्हाला? असे अत्यंत बिझी अब्जाधीश मंदिरात का जात असावेत? का वेळ देत असावेत मंदिरात? >> निव्वळ भक्ती खातरही जात असतील. स्वार्थ असेलच कशावरून.

कैच्या काही.
मंदिरात फक्त भक्तीसाठी किंवा देवदर्शनासाठी जात नाहीत.
१) पीआर साठी.
२) टाईमपास, करमणूक, भ्रमंती साठी.

किंवा असतील हि हि लोकं भक्त. त्यांच्या विश्वासाने स्वतःच्या विश्वासाला व्हॅलीडेशन देणे म्हणजे मूर्खपणा आहे.
स्वतः विचार करून उत्तर मिळवावे.

>>>आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारा न्युटनही आस्तिक होता,तिथे हे दोघे कोण आहेत?

न्यूटन एकाठिकाणी "मी गरुडाच्या पाठीवर अवकाशात जाऊन आलो " असेही म्हणतो. ह्याच्यावर काळं कुत्रही विश्वास ठेवत नाही, कारण हे काही न्यूटनने वैज्ञानिक शोधपद्धतीत केलेले विधान नाही.

पुरावा आणि तर्क यांच्या आधाराशिवाय न्यूटनजरी बोलला तरी ऐकू नये. त्यामुळे न्यूटनची ती बाजू हि त्याची वैयक्तिक मते आहेत.

मोरारजी देसाई रोज स्वतःची शू प्यायचे. तेही एक "यशस्वी" आणि "आदरणीय" व्यक्तिमत्व आहे, केवळ ह्याच कारणामुळे आपणपण सुरु करावे का ?
का आपण सर्व बाबी तपासून मग निर्णय घ्यावा ?

मोरारजी देसाई रोज स्वतःची शू प्यायचे.
--

तरीच, या रानटी माणसाने संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील, १०५ आंदोलकांना गोळ्या घालून ठार केले.

आपण बऱ्याच अतर्क्य गोष्टींवर विश्वास ठेवत असतो. देव ही त्यातलीच एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी तुम्ही नक्कीच मानत असाल ती म्हणजे पैसा.. देवानंतर जवळपास सर्व मनुष्यजातीने जिच्यावर विश्वास ठेवला आहे ती गोष्ट म्हणजे पैसा. आपण सगळे एकदम एकत्र विश्वास ठेवतो म्हणून एका कागदाच्या आयताकृती तुकड्याला एक किंमत प्राप्त होते. तिच्यावर विश्वास ठेवता ना मग काही लोक एका दगडातून कोरलेल्या मूर्तीवर विश्वास ठेवतात ते इतकं अजब वाटणार नाही. माणसांचे बहुतेक व्यवहार अतर्क्य असतात. सगळे पटवून घेतात म्हणून चालून जातंय!

पैसे हि एक संकल्पना आहे आणि तदानुषंगाने नैसर्गिक सत्य नव्हे हे ११वि च्या इकॉनॉमिक्स च्या पहिल्या १० पानांत लिहिले असते.

देव संकल्पना आहेच, पण नैसर्गिक सत्य नाही हेच तर वादाचे कारण आहे ना.

त्याही पुढे, पैसा हा store of value असतो. Value म्हणजे इथे, वस्तू आणि सेवा. म्हणजे वस्तू आणि सेवा या पूर्णपणे खऱ्या गोष्टींची रूपकात्मक कल्पना म्हणजे पैसा असते, आणि हि अत्यंत उपयोगी असते. तसेच, हे नैसर्गिक सत्य नाही हे सर्वजण जाणून आहेत.

आपण सगळे एकदम एकत्र विश्वास ठेवतो म्हणून एका कागदाच्या आयताकृती तुकड्याला एक किंमत प्राप्त होते.
>>>>

विश्वास ठेवणे वेगळे आणि त्याला कायद्याने मान्यता असणे वेगळे
मी माझी वेगळे पैसे काढले तर तो कायद्याने गुन्हा होत मला तुरुंगात टाकतील.
मी माझा वेगळा देव मात्र मानू शकतो.

अर्थात काही कट्टर लोकं सर्वांनी हाच देव मानावा असा विचार करतात त्यामुळे जगात वाद आहेत हे देखील खरे.

काही काळापूर्वी धर्म बुडवला तर फाशीची शिक्षा होत असे. आता होत नाही. कायदा पण फिक्शनलच गोष्ट आहे. म्हणून बदलत असते.
मानव, हे माझे विचार नाहीत. युवाल नोहा हरारी या इतिहास संशोधकाने आपल्या सेपिअन्स या पुस्तकात मांडलेली संकल्पना आहे. मला ती पटली आहे इतकंच.

पैसा (म्हणजे फक्त नोटा / बँक बॅलन्स नव्हे) हे एक देवाण घेवाण करण्याचे सर्वमान्य माध्यम आहे. इथे विश्वास / श्रद्धेचा प्रश्न नाही. हा पैसा पूर्णतः मानव निर्मित आहे आणि त्याच्या मर्यादा आहेत आणि त्या काय आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. नोटा, सोने, चांदी, हिरे, जमीन, पेंटिंग्ज, पुरातन वस्तू (antic) इत्यादि पैसा म्हणुन वापरता येतात. या बदल्यात लोक इतर वस्तूंंची / सेवेची देवाण घेवाण करू शकतात. उद्या यातील काहीना आज जे मूल्य आहे ते रहाणार नाही अथवा काहीच मूल्य रहाणार नाही याची आपल्याला कल्पना असते. युद्ध / नैसर्गिक आपत्ती यामुळे असे होऊ शकते उद्या आपण अशा प्रकारे साठवलेला सर्व प्रकारचा पैसा निकामी होऊ शकतो जगायचे असेल तर खायला अन्न प्यायला पाणी लागेल याची आपल्याला जाणीव असते. पैसा ही एक मानव निर्मित व्यवस्था आहे, श्रद्धा नव्हे.

देवावर श्रद्धा असणारे सर्वप्रथम ते मानव निर्मित आहेत असे मानत नाहीत. ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे, दोन्हींची तुलना नाही होऊ शकत.

पर्फेक्ट पॉईंट जिज्ञासा.
हरारे देव, देश, सामर्थ्य, पैसा ह्या कलेक्टिव ईमॅजिनेशनने मान्य केलेल्या गोष्टींबद्दल बोलतो.
अमेरिका, भारत देश आहेत सगळ्यांनी मिळून मानले तर आहेत नाही तर वसुधैव कुटुंबकम.
पैसा अनेक ठिकाणी कुचकामी ठरतो ऊदा. तारूण्य पैशाने विकत घेत येत नाही
सामर्थ्य अनेक ठिकाणी कुचकामी ठरते ऊदा. कॅन्सर सामर्थ्याने बरा करता येत नाही पैशाने येतो.

तर अ‍ॅज लाँग अ‍ॅज मी पैसा दिल्याने माझे काम होते, माझ्याकडे सामर्थ्य असल्याने मी अवघड कामे करू शकतो, मी भारतीय नागरिक असल्याने मला भारतात घटनादत्त हक्क मिळतात पैसा, सामर्थ्य, ह्या सगळ्या संकल्प्नना सगळ्यांनी मानल्या आहेत आणि त्यांना समाजकारण/अर्थकारणाच्या नियमात बांधून त्याचे अवलंबन केल्याने जीवन सुसह्य झाल्याचे लगोलग सिद्धही झाले आहे. असे सिद्ध झाल्याने त्या संकल्पना ऊचलून धरण्यात त्यांचा व्यक्तिगत फायदा आहे.

देव ही संकल्पना मानल्याने 'ज्याला श्रद्धा म्हणतात' जीवन सुसह्य होते... हे जुने मिथक आहे, ते बहुतांशी लादलेले होते त्यामुळे मागे पडत गेले. हजारो लोक पंढरपूरच्या वारीला गेल्याने, जगन्नाथाची रथयात्रा केल्याने, मक्केला गेल्याने, वॅटिकन किंवा अमृतसरला गेल्याने त्यांचे जीवन सुसह्य झाले का? 'हो त्यांच्यासाठी झालेच' असे ते मानतात.
पण पैसा(आर्थिक पत), सामर्थ्य( चांगली तब्येत, धाडस, खेळ ह्यातील यश), देश (सुरक्षितता, सरासरी जीवनमान) ह्या संकल्पना मोजण्यासाठी 'समाजमान्य' परिमाणं तयार आहेत. तर देव मानल्याने होणारा फायदा किंवा जीवनात वाढलेली सुसह्यता, समृद्धी मोजण्याचे कुठलेही 'समाजमान्य' परिमाण ऊपलब्ध नाही. त्यामुळे ती संकल्पना फक्त वैयक्तिक पातळीवर मोजता येते, मानता येते, अध्यात्मिक, पारमार्थिक प्रगती, कर्मा, मनःशांती ई. ई.

पैसा, सामर्थ्य, देश ह्यातल्या सगळ्या किंवा एखादी संकल्पना न मानता सुसह्य जीवन जगणे अशक्य आहे...देव न मानता ते जगणे तुलनेने अतिशय सोपे आहे. जे पहिल्या तीन संकल्पना न मानता केवळ चौथी मानून जगू शकतात त्यांना संतपद, वैराग्य लाभले असे म्हणतात. पण तीनबरोबर चौथीही नाही मानली तर त्यांना वेडा, भणंग किंवा मेला-मुडदा असे काहीही म्हणता येते Proud

देव मानला तर संकल्पना म्हणून नक्कीच आहे... मुकूटधारी, धनुष्यबाण धारी, आशिर्वाद देणारा, दॄष्टांत देणारा, पाण्यावर चालणारा, प्रेषित, कोपणारा, क्रुसावरून अदृष्य होणारा, महाभारत घडवणारा वगैरे सगळ्या कवी कल्पना. ज्याला ही कविता भावली ती तो आपल्या जगण्यात सामावून घेतो, ज्याला भावली नाही त्याचे काहीच बिघडत नाही. तो दुसर्‍या संकल्पना वापरून आपले जीवन सुसह्य व समृद्ध करण्याचे प्रयत्न करतो.

पण हरारे नास्तिक आहे. >> to not believe in something is also a belief you choose to believe in Happy
हाब, येस! देव ही संकल्पना बरीचशी dispensable झाली आहे पण पैसा, देश, कायदा वगैरे गोष्टी न टाळता येणाऱ्या आहेत सध्याच्या काळात तरी. They are still concepts than realities.
मला सामर्थ्य या गोष्टीला संकल्पना म्हणता येईल का हे माहीत नाही. म्हणजे दगड उचलता येणे हे work आहे. It's real and quantifiable. In that case power is ability to do work and it can be quantified. पण देशाची आर्थिक शक्ती या अर्थाने असले तर मग ती संकल्पना आहे.

Hmm. Then I have infinite amounts of beliefs cause I don't believe in dragons, tooth fairy, santa clause, Gandalf, Dumbledore (...). Happy

मला वाटतं की इतर कल्पना आणि arrangements मध्ये फरक होऊ शकतो.
पैसा, फॉर एग, हा वस्तू आणि सेवा ह्या अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा एक काल्पनिक समूह आहे. समूह काल्पनिक असला तरी कल्पनेमागच्या वस्तू आणि सेवा खऱ्या आहेत.

तसेच देशाच्या बाबत, भेदलेली जमीन खरी आहे, भेद जरी काल्पनिक असला तरी.
ह्या गोष्टी aggregation/classification आहेत. आहेत कल्पनाच, पण ह्यांच्यामागची, सो टू से, खरी गोष्ट, हि उघड आहे.

सामर्थ्य म्हणजे शारिरिक बळच असे नाही.
शारिरिक, बौद्धिक, मानसिक असे काहीही असू शकते.
शारिरिक :- मार्शल आर्ट, कुस्ती, वेटलिफ्टिंग, क्रिकेट, टेनिस
बौद्धिक :- शैक्षणिक, पॉलिटिक्स, कॉर्पोरेटमधले
मानसिक :- सैनिक, संशोधक, समाजसेवक, धाडसी पत्रकार

आणि ह्या सगळ्या सामर्थ्यांना मिळालेली 'समाजमान्यता' ही माझ्या मते 'सामर्थ्य' संकल्पना मोजण्याचे परिमाण आहे. जी बर्‍यापैकी कालानुरूप बदलते. पुर्वी दंड बैठका मारून शरीर कमावलेला, तलवारबाज, धनुर्धर, गदाधर सामर्थ्यवान समजत आता ह्या सामर्थ्याला ' तुला माहितीये का माझा बाप कोण आहे' असे म्हणतात. Proud

उत्तम पोस्ट हाब
बाकीच्याच्या पोस्ट पण छान आणि विचार करायला लावणाऱ्या
मस्त चर्चा सुरू आहे

ISRO Che scientists सुद्धा प्रत्येक उड्डाण आधी पुजा करतात. त्यामुळे कोणाचेही शिक्षण, संपत्ती किंवा सामाजिक स्तर आस्तिक किंवा नास्तिक ठरवण्याचा पाया असत नाही. देव ही प्रत्येकाची वेगळी मानसिक गरज आहे. ते देवाच्या पाया पडतात म्हणुन स्वताच्या कर्माला कमी मानतात किंवा नशीबाच्या आणी देवाच्या भरोश्यावर राहतात असे वाटत नाही.

गरीबी सिर्फ एक मानसिक अवस्था है :
राहुल गांधी

दुर्दैवाने हे वाक्य सामान्यांना न समजल्याने गदारोळ उठला होता

ते देवाच्या पाया पडतात म्हणुन स्वताच्या कर्माला कमी मानतात किंवा नशीबाच्या आणी देवाच्या भरोश्यावर राहतात असे वाटत नाही +१

त्यामुळे कोणाचेही शिक्षण, संपत्ती किंवा सामाजिक स्तर आस्तिक किंवा नास्तिक ठरवण्याचा पाया असत नाही. >> सहमत.

देव ही प्रत्येकाची वेगळी मानसिक गरज आहे. >> काहींची मानसीक गरज आहे, काही असा फारसा खोल विचार न करता देव मानतात, काही लोक मानत नाहीत. पण जे मानतात त्यांच्या देवाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळी मते, जीवनात त्याचे वेगवेगळे स्थान असु शकते.

ते देवाच्या पाया पडतात म्हणुन स्वताच्या कर्माला कमी मानतात किंवा नशीबाच्या आणी देवाच्या भरोश्यावर राहतात असे वाटत नाही.>> सहमत. सगळेच आस्तिक देवाची पूजा केल्याने तो माझे काम करतो (इथे कंत्राट मिळणे, भरभराट होणे यासाठी पूजा करायला गेले असा तर्क मांडला आहे) असे मानतात आणि तशी मागणी करण्यास देवळात जातात असे नाही. सगळ्या अस्तिकांना एकाच पारड्यात तोलता येणार नाही.
देवावर श्रद्धा आहे, भक्ती आहे त्यासाठी देवळात जातो बस, बाकी जिवनात जे काही करायचे आहे, जे काय चढ उतार येतील, संकटे येतील त्याला आपल्यालाच तोंड द्यायचे आहे, आपण जे काही मिळवू ते आपल्या मेहतीनेच असे मानणारेही लोक असतात.
त्यामुळे थोर शास्त्रज्ञ, उद्योजक, डॉक्टर्स इत्यादि आस्तिक असल्यास आश्चर्य वाटण्या सारखे काही नाही, किंवा (मागे मायबोलीवर एक धागा आला होता त्यात म्हटल्याप्रमाणे आस्तिक असल्याने) ते आपल्या कार्यात कमी पडतात असेही काही नाही.

मानवदादा प्रतिसाद आवडला , सहमत !
जिज्ञासा, हायझेनबर्ग तुमचे व इतरही प्रतिसाद वाचले , छान चर्चा सुरू आहे.

प्रत्येक आस्तिक अंधश्रद्ध असेलच असेही नाही आणि प्रत्येक नास्तिक अंधश्रद्ध नसेलच असेही नाही. (बरेच चायनीज पाहिलेत , जे त्यांच्या मते गुडलक आणणाऱ्या वस्तू घरात आणतात, ब्रेसलेट घालतात , लाफिंग बुद्ध दुकानात विशिष्ट दिशेला ठेवतात. पर्समध्ये लक कार्ड ठेवतात. फार अंधश्रद्ध आणि नास्तिक असे पाहिलेत. )

शिवाय कधी कधी लहान मुलं सुद्धा असे असामान्य धैर्य व प्रसंगावधान दाखवतात की मनाच्या सामर्थ्याबाबत अंदाज बांधता येत नाही.

पण आस्तिक असल्याने तुम्ही अंधश्रद्धेला काकणभर जास्त बळी पडू शकता का , याशक्यते बाबत मला मत बनवता येत नाहीये.

कधी कधी आपल्या आस्तिक असण्याचं कारण आपल्याला आयुष्याविषयी काही अनुत्तरित प्रश्न आहेत व आस्तिक राहिल्याने कदाचित त्यातल्या त्यात सेन्स करणारी उत्तरे मिळतील ही आशा Happy .

ज्याचा रोजच्या भौतिक आयुष्याशी काही संबंध नसेल. ( मी कोण, आयुष्याचे ध्येय काय, अल्पम्रुत्यु , विचित्र संकटे, घोर अन्याय , निरागस लोकांच्या आयुष्यात झालेल्या दुर्दैवी घटना, बऱ्याच अघटित घटना , Wrong time , wrong place अपघाती मृत्यू तसेच त्याच्या उलटं थोडक्यात जीव वाचणे, सर्व प्रयत्न करून ही काही बाबतीत मिळणारे अपयश )
माझ्या आस्तिक असण्याचा तर देवाच्या अस्तित्वाशी संबंधही नाही , माझ्या अस्तित्वाशी(त्यामुळे पडलेल्या प्रश्नांशी) आहे.

पिंडे पिंडे मतिर्भिन्ना यावर मात्र विश्वास आहे !!

Pages