एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

Submitted by अमर विश्वास on 22 October, 2020 - 04:59

गालिब - गुलज़ार - जगजितसिंग
या आधीचे भाग
एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना
एक तरी गज़ल अनुभवावी # ०१

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने
शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है

एका गझलेत गालिब ने स्वतः विषयी लिहून ठेवलं आहे
"गालिब" ला ओळखत नाही असे कोणी आहे का? तो चांगला शायर आहेच पण फार बदनाम आहे ...

गालिब कितीही बदनाम असला तरी त्याच्या शायरीचे चाहते प्रत्येक पिढीत आहेतच ... असेच दोन चाहते गुलज़ार आणि जगजितसिंग.

एकदा गालिबच्या शायरीबद्दल बोलताना गुलजारसाहेब म्हणाले होते कि हे आपले गेल्या जन्मीचे देणे आहे. साधेसुधे नाही .. नक्षत्रांचे देणे.

यातूनच जन्माला आली मिर्झा गालिब च्या जीवनावरची मालिका. १९८८ साली दूरदर्शनवरून प्रसारीत झाली होती. लेखन-दिग्दर्शन होते गुलझार साहेबांचे आणि गझला गायल्या होत्या जगजीतसिंगने. संगीत ही त्यांचेच होते.

हे सिरीयल आजही तूनळी (YouTube) वर उपलब्ध आहे.
(https://www.youtube.com/watch?v=NfNOXyPVjxk&ab_channel=SurendraGuptaTheB...)

या मालिकेत जगजीतच्या धीरगंभीर आवाजात अनेक गझला आहेत. मोजकी वाद्ये आणि सोपी चाल यामुळे गालिबचे शब्द उठून दिसतात.

अशीच एक गझल ... गालिबच्या सर्वोत्तम गझलांपैकी एक ... तुम्ही ऐकू शकता तुनळीवर ...
(https://www.youtube.com/watch?v=YaMW_InHntE&ab_channel=SaregamaGhazal)

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

हजारो इच्छा आहेत ... पण प्रत्येक इच्छा अशी कि त्याच्या पूर्ततेसाठी प्राण पणाला लावावेत
माझ्या बऱ्याच इच्छा पूर्ण झाल्या आहेत ... पण तरीही थोड्याच इच्छा पूर्ण झाल्यात असे वाटत रहाते

प्रत्येक माणसाला वाटणारी अपूर्णता आणि जास्तीची अपेक्षा... थोडक्यात जीवनाचे सार दोन ओळीत व्यक्त केले आहे

डरे क्यूँ मेरा क़ातिल.. क्या रहेगा उस की गर्दन पर
वो ख़ूँ जो चश्म-ए-तर से उम्र भर यूँ दम-ब-दम निकले

चश्म-ए-तर म्हणजे पाणावलेले डोळे...

जे रक्त अश्रू बनून माझ्या डोळ्यातून निरंतर वहात राहिले .. ते रक्त माझ्या मारेकऱ्याच्या मानेवर चिकटून रहाणार आहे का ? (मीजे दुःख भोगले ते माझ्या मारेकऱ्यांना थोडेच भोगावे लागणार आहे? )
मग त्यांनी (मारेकऱ्यांनी) का घाबरावं ?

निकलना ख़ुल्द से आदम का सुनते आए हैं लेकिन
बहुत बे-आबरू हो कर तेरे कूचे से हम निकले

ख़ुल्द म्हणजे स्वर्ग. आदम हा पहिला मानव. (Adam & Eve ही कथा माहिती असेलच ) तर हा आदम .. ईश्वराने त्याची निर्माती केली. पण सैतानाने केलेल्या फसवणुकीमुळे त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला अपमानित होऊन पृथ्वीवर यावे लागले (स्वर्गातून हकालपट्टी झाली )

आदमच्या स्वर्गातून झालेल्या हकालपट्टीबद्दल ऐकत आलो होती. परंतु आम्ही देखील अपमानित होऊन तुझ्या गल्लीतून बाहेर पडलो आहोत
(आदम पृथ्वीवर आल्यावर मानव वंशाची निर्मिती झाली होती... मी अपमानित होऊन बाहेर पडल्यावर माझ्याकडूनही असच भरीव कार्य होईल)

मगर लिखवाए कोई उस को ख़त तो हम से लिखवाए
हुई सुबह और घर से कान पर रख कर क़लम निकले

जर कोणी तिला पत्र लिहिणारच असेल तर आमच्याकडून लिहून घ्यावे. आम्ही सकाळपासून लेखणी सरसावून बसलो आहोत ..
(तिला भेटण्यासाठी आम्ही इतके आतुर झालो आहोत कि दुसऱ्याचे पत्र लिहायच्या निमित्ताने का होईना तिच्यापर्यंत पोचता येईल)

हुई इस दौर में मंसूब मुझ से बाद: आशामी
फिर आया वो ज़माना जो जहाँ में जाम-ए-जम निकले

बाद: आशामी - मदिरापान , मंसूब - संबंधित , जाम-ए-जम म्हणजे जमशेदचे मदिरापात्र

जाम-ए-जम चा अर्थ समजण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. पर्शियन साम्राज्याच्या काळात जमशेद (जम) कडे एक दैवी पात्र (भांड) होते. यात डोकावून पहिले कि ज्ञानप्राप्ती होत असे तसेच त्यातून पेय प्यायलं कि चिरतारुण्य प्राप्त होत असे.

इथे गालिब म्हणतो ,
या काळात मदिरापान माझ्याशीच संबंधित झाले आहे (दारू प्यावी तर गालिबनेच प्यावी असा लौकिक आहे) त्यामुळे लोकांना जमशेदचे पात्र आठवायला लागेल
(गालिब खुबीने आपल्या हातातल्या पेल्याची जाम-ए-जम शी तुलना करून आपल्यालाही तसेच ज्ञान आणि चिरतारुण्य प्राप्त झालंय असे सुचवतो)

मोहब्बत में नहीं है फ़र्क़ जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले

प्रेमात जगणे आणि मरणे यात काहीच फरक नसतो .. (प्रेमात पडलेल्याला प्रेमापलीकडे काहीच दिसत नाही )
तिच्याकडे पाहूनच आम्ही जगतो .... जिच्यासाठी आमचा जीव चालला आहे

ख़ुदा के वास्ते पर्दा न काबे का उठा वाइज
कहीं ऐसा न हो याँ भी वही काफ़िर-सनम निकले

ह्या शेरबद्दल थोडा प्रवाद आहे ..... अनेकजण हा बहादुरशहा जफ़र याच्या गझलेतील मानतात. पण जगजीतने हा शेर गायला आहे त्यामुळे या गजलेतच त्याचा अर्थ देतो

काबा म्हणजे मक्केमधली पवित्र जागा , वाइज म्हणजे धर्मोपदेशक
हे धर्मोपदेशक , ईश्वरासाठी तरी काब्याचा पडदा दूर करू नकोस. असं होऊ नये कि तिथूनही निर्दयी प्रेमिकाच (धोका देणारी - निर्दयी) बाहेर येईल
याचा अर्थ आम्ही आमच्या प्रेमिकेला देवाच्या स्थानीच मानलं (जरी तिने धोका दिला तरी) .. आणि काब्यासारख्या पवित्र जागी (देवाशिवाय) दुसरं कोण असणार?

कहाँ मय-ख़ाने का दरवाज़ा 'ग़ालिब' और कहाँ वाइ'ज़
पर इतना जानते हैं कल वो जाता था कि हम निकले

हा मक्ता आहे ... तुका म्हणे तस गालिब म्हणे ....

मय-ख़ाने / मैखाना : मदिरालय

कुठे मंदिरालयाचा दरवाजा आणि कुठे धर्मोपदेशक?
पण आम्हाला एवढेच माहिती आहे कि काल आम्ही (मदिरालयातून) बाहेर निघत असताना तो तेथेच आला होता

गालिब ने मक्ता असा जबरदस्त लिहिला आहे.... ढोंगी धर्मव्यवस्थेवर तिरकस टोमणा मारला आहे..

भाऊसाहेब म्हणतात तसेच ...
सारेच हे सन्मित्र माझे येथेच आले शेवटी .. तस वरवर धर्माचरणाचा आव आणणारा धर्मोपदेशक शेवटी मंदिरालयाच्या दाराशीच दिसला ..

तर ही गालिब ची एक गझल .. तरी मी दोन अशार (कडवी) वगळली ...

आणि हो ... गुलज़ार - जगजीतचे गालिब प्रेम फक्त मालिकेपुरतं मर्यादित नाही.

त्यांचा एक कार्यक्रम जरूर बघा : तेरा बयाँ ग़ालिब... गुलज़ार साहेबांनी गालिबच्या पत्रांचे वाचन केलंय आणि जगजीतने गझल गायल्या आहेत
(https://www.youtube.com/watch?v=fD0_FSsa8Go&ab_channel=SaregamaGhazal)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच! जाम ए जम विषयी माहिती नव्हती. असे बारकावे लक्षात आले की गजल अधिक छान कळून येते.
रेख्ताची पण लिंक देता येईल का?
पुभाप्र!

अतिशय सुंदर लेख. अनेक नवीन गोष्टी समजल्या. विशेषतः अनेक रूपक जी उर्दूत असल्यामुळे माहित नव्हती. ही मालिका पुढे वाचत राहायला आवडेल.