मायबोली वरील वाचकांना पाश्चात्य संगीताचे वावडे आहे काय? छे..! अजिबात नाही!

Submitted by बिथोवन on 19 September, 2020 - 08:04

मी मायबोली वर लिहायला सुरुवात केली त्या अगोदर जवळ जवळ दोन तीन महिने इथले लेख वाचत होतो आणि त्यानंतरच सदस्य झालो, त्याचे कारण म्हणजे इथले अभ्यासपूर्ण लेख आणि ती लिहिणारी जगभर पसरलेली समस्त मंडळी जी उच्च विद्या विभूषित असून त्यांची मते आणि एखाद्या विषयाचे विश्लेषण करण्याची त्यांची हातोटी ही खरोखर वाखणण्याजोगी आहे म्हणून.

मी लिहायला सुरुवात केली ती अभिजात पाश्चात्य संगीत आणि त्यातले ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणून ओळखले जाणारे बाख, बिथोवन आणि मोझार्ट यांची ओळख आणि त्यांच्या रचना याबद्दल.

परंतु माझ्या लेखमालेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.(जसा मिळेल असा वाटला होता सदस्य होण्यापूर्वी तसा). अगदी चार पाच मंडळींनाच ही लेखमाला आवडली आणि बऱ्याच मंडळीनी त्याकडे पाठ फिरविली. जगभर पसरलेली मंडळी म्हणजे ती नक्कीच बहुश्रुत असणार या बद्दल शंका घेण्याचे कारण नाही. आपले ते (भारतीय संगीत) चांगले आणि इतरांचे ते वाईट असा आप्पलपोटा विचार करणारी मंडळीही इथे नक्कीच नसतील. मग या पाश्चात्य संगीताचे इथल्या मंडळींना एवढे वावडे का असावे याचा प्रश्न पडतो.

पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं, हा प्रश्न मी तुम्हाला केला तर काय असतील तुमची उत्तरं तर (१) काय कळत नाही बुवा..(२) नुसता धांगडधिंगा आहे..(३) चर्च मध्ये गातात ते. (४) म्हणजे मायकेल जॅक्सन आणि मॅडोना किंवा तत्सम मंडळी गातात तेच ना..? इथपर्यंत असतील किंवा नसतीलही.

भारतीयांना असं वाटतं की आपलं शास्त्रीय संगीत म्हणजे सर्वात प्राचीन, अतिशय समृद्ध आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीतापेक्षा खूप श्रेष्ठ अशी असणारी श्रद्धा. भारतीय अभिजन वर्गाची पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताबद्दल उदासीनता आणि तिरस्कार दर्शवण्यात होणारी एकजूट अशी दोन कारणं पाश्चात्य संगीताचे अज्ञान असण्याचे कारण असू शकतील. आपल्या समृद्ध संगीत परंपरे बद्दल अभिमान बाळगणे आवश्यक आहेच पण कसलाही विचार न करता पाश्चात्य संगीताबद्दल पूर्वग्रह बाळगणे हे ही अयोग्यच.

परंतु या पाश्चात्य संगीताचा प्रभाव आपल्यावर कळत नकळत खूप पडलेला आहे आणि आपल्याला त्याची जाणीव नाही असं जर मी तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्हीही सहमत व्हाल की, अरे व्वा, हे इतकं सुंदर आहे!?..

(१)तुम्ही सगळ्यांनी ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार ही नर्सरी ऱ्हाईम ऐकलीय ना..? ह्या रचनेचा जनक आहे मोझार्ट!

(२)"इतना ना मुझ से तू प्यार बढा’ हे सलील चौधरी यांनी रचलेलं १९६१ सालच्या ‘छाया’ या चित्रपटातलं गाणं मोझार्टच्या सर्वोत्तम ‘जी मायनर सिम्फनी क्र. ४०’ या सिम्फनीमधल्या ‘अलेग्रो मोल्टो' मूव्हमेंटवर आधारलेलं आहे.

(३) बिथोवनच्या fur Elise च्याच हजारो आवृत्त्या निघालेल्या असतील यात दुमत नाही.

(४) बंगाली दिग्दर्शक सत्यजीत रे यांनी एकूण ३६ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यातील ३० चित्रपटांचे संगीतकार ते स्वतः होते आणि संगीतात बिथोवन आणि मोझार्ट यांच्या रचनेचा सढळ हस्ताने त्यानी वापर केला.

(५) सलील चौधरी यांच्या माया या देव आनंद अभिनित चित्रपटात "जिंदगी है क्या सुन मेरी जां" हे चार्ली चॅप्लिनच्या लाईम लाईट वरती आधारलेले आहे.

(६) राज कपूरच्या छलिया मधील बाजे पायल छुम छुम या गाण्याला रोन गुडविन चे संगीत वापरलेले आहे.

(७) जब प्यार किसिसे होता है यातले देव आनंदच्या तोंडी असलेले "बिन देखे और बिन पहचाने" या गाण्याला रोन गुडविन चे संगीत वापरलेले आहे.

(८) झुक गया आसमान मधील "कौन है जो सपनोमे आया" हे एल्विस प्रिस्ले चे मार्गारिटा यावरून घेतलेले आहे.

(९) बीटल्स चे I wanna hold your hands ऐकले आहे का? मग शम्मी कपूर च्याच जानवर मधील "देखो अब तो किसको नही है खबर" ऐका.

(१०)इलायराजा यांनी मोझार्टच्या ‘लिटिल जी मायनर सिम्फनी क्र. २५’ वापरून ‘अदा विटूक्कू विटूक्कू’ या लोकगीतसदृश गाण्याच्या मुखडा तयार केला.

(११)टायटन कंपनीच्या जाहिरातीचा म्युझिक ट्रॅक मोझार्टच्या ‘लिटिल जी मायनर क्र. २५’ या सिम्फनीच्या सुरुवातीच्या मूव्हमेंटवर आधारलेला आहे.

(१२)रेमंड सूटिंगची ‘द कम्प्लीट मॅन’ या जाहिरातीतल्या म्युझिक ट्रॅकची धून एक्दम haunting… आहे. रॉबर्ट शुमान यांच्या Kinderscenen (किंडर्सझिनेन किंवा लहानपणीची दृश्यं) या पियानोसाठी लिहिलेल्या रचनेवरून बांधल्या आहेत.

आपल्या सर्वांना आवडणारे भारतीय सिनेसंगीत. तिमिर बरन आणि पंकज मलिक यांनी गाणी आणि पार्श्वसंगीत या दोन्हींना पाश्चात्त्य वाद्यवृंदाची ओळख करून देतानाच या प्रक्रियेची सुरुवात केली आणि नंतर अनिल बिस्वास, नौशाद, शंकर-जयकिशन, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजी, एस डी बर्मन आणि सलील चौधरी यांच्यासारख्या प्रसिद्ध संगीतकारांनी ही प्रक्रिया खूपच समृद्ध केली. त्यानंतरच्या काळात आर. डी. बर्मन, इलायराजा आणि ए. आर. रेहमान यांनी ती एका वेगळ्याच उंचीवर नेली. ही नावे तर आपल्या घरातीलच असावीत इतकी ओळखीची आहेत.

पाश्चात्त्य आणि भारतीय स्वरसप्तकातील मूलभूत फरक हा आहे की पाश्चात्त्य संगीतपद्धतीत १२ स्वरांचं सप्तक असतं. हे सगळे सूर एकमेकांपासून सारख्याच अंतरावर असतात. सप्तकामधील प्रत्येक स्वर एकमेकांपासून अध्र्या पायरीवर असून याला ‘इक्वि टेम्पर्ड स्केल’ असं यथोचित नाव आहे. तर भारतीय शास्त्रीय संगीतात हे सप्तक २२ श्रृतींमध्ये विभागलेलं असतं. आपल्या सिनेसंगीतकारांनी पाश्चात्त्य ऑर्केस्ट्रेशन वरती इतका भर का दिला याचं उत्तर म्हणजे पाश्चात्य संगीतात असणारी हार्मनी, जी भारतीय संगीतात नाही. त्रिमिती चित्राला जशी एक डेप्थ मिळते, तशी संगीतात खोली निर्माण करायला हार्मनी लागतेच. हार्मनीमध्ये कानाला सुखद वाटतील अशा सुसंवादी सुरांचा संयोग असतो. हार्मनीचे दोन घटक म्हणजे कॉर्ड्स आणि काउन्टरपॉइंट. कॉर्ड्स म्हणजे कमीत कमी तीन वेगवेगळे सुसंवादी आणि आनंददायी सूर एकाच वेळी वाजवणं. काउन्टरपॉइंट म्हणजे दोन धुना एकमेकांवर अशा ठेवल्या जातात, की त्या दोन्ही एकाच वेळी ऐकू येतील. गेल्या ८० वर्षांत रचलेल्या बहुतेक भारतीय सिनेसंगीतात याचा वापर केलेला आहे. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे राज कपूरच्या अनाडी चित्रपटातील 'किसिकी मुस्कराहटोपे हो निसार " या गाण्याचा मोठा इंट्रो पीस. किंवा "हंसते जख्म" या चित्रपटातील "तुम जो मील गए हो" या गाण्याचे कडव्यातले ऑर्केस्ट्रेशन. अशी बरीच उदाहरणं देता येतील.

तुम्हाला हिंदी सिनेसंगीताचा सुवर्ण काळ जर आवडत असेल तर तुम्हाला पाश्चात्य संगीताचे वावडे नाही असे म्हणावे लागेल. तसं असेल तर तुम्ही, बाख, बिथोवन आणि मोझार्ट यांच्या रचना ऐका. ऐकल्या नाहीत तर you are missing something good which has a potential to enrich your life.

.....

Group content visibility: 
Use group defaults

तुम्हाला हिंदी सिनेसंगीताचा सुवर्ण काळ जर आवडत असेल तर तुम्हाला पाश्चात्य संगीताचे वावडे नाही असे म्हणावे लागेल. तसं असेल तर तुम्ही, बाख, बिथोवन आणि मोझार्ट यांच्या रचना ऐका. ऐकल्या नाहीत तर you are missing something good which has a potential to enrich your life>>>>

तूमचे लेख वाचून ऐकायला सुरवात केली. आणि आवडतंय.

मॅजिक फ्लूट मधील क्वीनचे ते प्रसिद्ध गाणे/उतारा कित्येक वेळा ऐकला गेला. Happy

लेखातील कळकळ जाणवली. पाश्चात्यच नव्हे तर भारतीय शास्त्रीय संगीताचेही विशेष ज्ञान नसणारे, तेवढी रूची नसणारे लोकही जास्त असतील.
तुमचे लेख वाचूनच पाश्चात्य शास्त्रीय संगीत ऐकायला पाहिजे अशी खूणगाठ बांधली आहे. सुरवातही केली, जरी अद्याप विशेष ऐकले नाही.

आणि तुमचे ते लेखही वाचण्याच्या यादीत आहेत.

चांगला लेख.

इथले काही लेख चांगले असतात - https://serenademagazine.com/

पुण्यात व मुंबईत अनेक उत्तम काँसर्ट्स असतात. पुण्यात माझदा हॉलला असणारे कार्यक्रम फुकट असतात. मुंबईत एनसीपीए आणि पृथ्वी थिएटर इथेही काँसर्ट्स असतात.

लेख आवडला.
हा लेख थोडा बदल करून बिथोवन सिरिज चा उपोद्घात म्हणून शुन्य क्रमांकावर ठेवा.

लोक प्रतिसाद देत नाहीत म्हणजे वाचत नाहीत असे नाही. तुम्ही लिहीत राहा. +१

शिवाय हा लेख नवीन लेखनाच्या पहिल्या पानावर असतानाच तमाम मायबोलीकरांच्या दृष्टीस हा लेख पडेलच असे नाही. मागे पडल्यामुळे तो उशीरा वाचनात येऊ शकतो. पण नंतर का होईना विषयात रुची असणारे लेख वाचतातच त्यामुळे लिहित रहा. शोध सुविधेचा वापर करणार्‍या भविष्यातल्या वाचकांकरताही हा लेख उपलब्ध असेल.

हिंदी सिनेसंगीताचा सुवर्ण काळातील अनेक संगीतकारांनी आपल्या अनेक गाण्यांत मूळ पाश्चात्य/अरब आदी संगीताचा वापर केलेला आहे याबाबत पूर्वी वाचनात आले होते. आपल्या आजच्या लेखाने ते कुतूहल पुन्हा चाळवले. अर्थात, आधी जे वाचले होते ते plagiarism in hindi film music या संदर्भांनेच अधिक वाचले होते.

पण आपण इथे पाश्चात्त्य वाद्यवृंदाचा आणि हार्मनीचा त्यांनी केलेला वापर अशा वेगळ्या व सकारात्मक दृष्टीकोनातून लिहित आहात त्यामुळे ते अधिक वाचनीय होत आहे. मला सप्तक, श्रृती, स्केल वगैरे मधले काहीच ज्ञान नसल्याने मी फार भर घालू शकणार नाही. पण माझ्या याबाबतीतल्या अल्पज्ञानात मात्र नक्कीच भर पडत आहे. त्यामुळे मी वाचनमात्र राहीन हे जरूर.

मागच्या वेळचा आपला लेख वाचायला घेतला पण मध्येच बीथोवेन ह्या संगीतकारा विषयी विकिपीडिया व इकडे तिकडे वाचत भरकटत गेलो. त्या नादात मूळ लेख राहून गेला. पण साधनाजींनी लिहिल्यानुसार, लोक प्रतिसाद देत नाहीत म्हणजे वाचत नाहीत असे नाहीत असे कृपया मानू नका. माझ्या दृष्टीने प्रचंड कुतुहलाचा विषय आहे. पण यातली गती यायला थोडा वेळ लागेल. आपण कृपया लिहित रहा.

झुक गया आसमान मधील "कौन है जो सपनोमे आया" हे एल्विस प्रिस्ले चे मार्गारिटा यावरून घेतलेले आहे.>>>>
मार्गारिटा मस्त आहे ऐकायला
https://youtu.be/ApjA9OfAUk4

लोक प्रतिसाद देत नाहीत म्हणजे वाचत नाहीत असे नाही. तुम्ही लिहीत राहा.>>>++११ मी ही वाचला आहे लेख. प्रतिसाद दिला नाही तरी. वेळ झाला की निवांत पुन्हा वाचून बिथोवन ऐकायचं ठरवलंय. तुमच्या लेखामुळेच कळले या रचनांविषयी. धन्यवाद.

हजार प्रतिसाद होण्याचे पोटेनशीयल आहे या धाग्यात...
आर डी बर्मन यांनी उचललेली गाणी टाकतोय लिस्ट मध्ये...

मेहबूबा ओ मेहबूबा..
तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके...
चुरा लिया है तुमने जो दिलको..
तेरा मुझसे है पहले का नाता कोई..

आर डी बर्मन यांनी उचललेली गाणी टाकतोय लिस्ट मध्ये...>>>

हा वेगळा विषय आहे. कृपया कोणी कुठले गाणे ढापले ही चर्चा वेगळ्या धाग्यावर होउदे. इथे नको. इथे पाश्चात्य संगीतावर चर्चा होउदे.

पण तुम्ही लिहिले ते वाचून एका गाजलेल्या संगीतकाराची मुलाखत आठवली. त्याने गप्पांच्या ओघात सांगितले होते की काही निर्माते परदेशातून गाण्यांच्या एलपी/कॅसेट्स घेऊन यायचे आणि असेच गाणे आपल्या चित्रपटात हवे हा आग्रह धरायचे. अर्थात चित्रपटात पैसे घालणारा निर्माताच असल्यामुळे त्याला नाही म्हणणे सगळ्यांनाच शक्य नसायचे.
मग शक्य तितके इंडियानैज करून निर्मात्याचे आवडते गाणे चित्रपटात घ्यावे लागायचे. संगीतकार चोरी करतात हा आरोप करताना हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा.

लोक प्रतिसाद देत नाहीत म्हणजे वाचत नाहीत असे नाही. तुम्ही लिहीत राहा.>>>>+१

तुमचे लेख वाचले. सुंदर आहेत.

तुमचे लेख वाचून काही लिंक ओपन करून ऐकल्या पण काही कळलं नाही. बारकावे माहीत नाहीत. Sad

>> हा वेगळा विषय आहे. कृपया कोणी कुठले गाणे ढापले ही चर्चा वेगळ्या धाग्यावर होउदे. इथे नको. इथे पाश्चात्य संगीतावर चर्चा होउदे.

सहमत. ढापणे म्हणणे पण योग्य कि नाही ते सुद्धा त्या वेगळ्या धाग्यावर चर्चा होऊ शकेल. इथे बिथोवन हे पाश्चात्त्य वाद्यवृंदाचा भारतीय संगीतकारांनी केलेला वापर अशा दृष्टीकोनातून लिहित आहेत ते वाचायला अधिक आवडेल.

वेगळा नाही एकच विषय आहे... पाश्चात्य संगीतावरून ढापलेले असेल तर पाश्चात्य संगीताचे वावडे आहे असे म्हणू शकत नाही...
आणि मुळात लेखकाने लेखात अशी उदाहरणे दिली आहेत हिंदी गाणी जी ओरिजिनली पाश्चात्य संगीतकारांची आहेत..

मी तुमचे सगळे लेख वाचत आहे. अजिबात थांबू नका. लिहीत रहा.
व्यक्त होणे गरजेचे आहे.
दाद जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. दाद नाही दिली ह्याचा अर्थ कोणी वाचत नाही असे नाही.
हिंदी सिनेमात खूप ढापा ढापी झाली आहे. तरीही अभिजात ते अभिजात.
तुमचे लेख समजून घेत आहे. आज काल रोज एखादी तरी सिंफनी ऐकायचे आणि तुम्ही लिहिलेले अनुभव करायचे .
धन्यवाद तुमच्या लेखा मुळे नवीन समजत आहे.

https://www.youtube.com/watch?v=fzQbI58BzBo
हि बऱ्याच जागी ऐकली असेल. टर्किश मार्च

https://www.youtube.com/watch?v=pk5VntYEuNs
ओड टू जॉय

क्लासिकल ऐकत असाल तर फक्त भारतीय किंवा वेस्टर्न वर थांबू नका. अरब देखील ऐका. अरब क्लासिकल देखील तितकेच उच्च दर्जाचे आहे. त्यातही ज्यू आणि अरब अश्या दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे.
https://www.youtube.com/watch?v=IwS8LfGlCTk

छान लेख!
मोझार्ट यांच्या रचना ऐकल्या आहेत.
बाख, बिथोवेन मात्र ऐकले नाहीत.
तुमचे बाकी लिखाणही वाचायचे आहे. लिहीत रहा. शुभेच्छा!

खूप दिवसांपासून पाश्च्यात्य म्युझिक वाजवायला शिकावं करत होतो पण जसे भारतीय शिकवतात की अलंकार इ. तसे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून सुरुवात केली की फार काळ तो उत्साह टिकत नसे.
तुमचे लेख वाचून फर एलिस शिकायची ऊर्मी आली आणि आता पाहिला भाग बऱ्यापैकी जमातोय पुढची ट्यून शिकतोय. त्या निमित्ताने पियानो शिकवणारे आणि माझा उत्साह टिकेल असे चांगले युट्यूब चॅनल सापडले.
लेखावर प्रतिसाद दिला पाहिजे पण द्यायचं रहातं. लिहित रहा जमेल तसं. वाचतोय.

असं काही नाही हो
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर निवांत वाचावी म्हणून ठेवून दिलीये मी ही लेखमाला
सवडीने वाचून प्रतिसाद देईन
तुम्ही लिहीत राहा

तुमचा 1st character मधून गोष्ट सांगायची शैली छान आहे... मायबोलीवर बऱ्याचवेळा फक्त बेथोविन चा नवीन भाग आलाय का बघून जातो... आला असेल तर वाचतो

पल पल पल कैसे कटेगा पल (मुन्नाभाई) थीम फॉर ड्रीम वरून घेतले आहे Uhoh खून भरी मांग मधलं मैं तेरी हूं जानम चॅरिएटस ऑफ फायर वरून घेतले आहे. भारतीय ते पण बॉलीवूड संगीत जास्त ऐकले जाते आणि असेल इतर संगीत चांगले तर ढापून आणतीलच हिंदीत. मग आपण कशाला इतर जागी वेळ घालवा Wink असा विक्षिप्त विचार मनात येतो व त्यावर अंमल केला जातो.

लोकांनी लेखमाला वाचली नाही तर जास्त विचार करू नका. हळू हळू समविचारी लोक सापडतील. लिहीत रहा असेही म्हणणार नाही कारण तुमचा वेळ सत्कारणी जावा अशीच इच्छा आहे. आधी आपल्या लेखनाचे मापदंड स्वतः ठरवा नि मग लिहा. उदा: काही विषय असे असतात की तिथे एकही प्रतिक्रिया आली नाही तरी विषय मला जिव्हाळ्याचा म्हणून मी लेखाद्वारे मांडेन.

Pages