तुझ्या शहरात असणे हा सुगंधी सोहळा असतो

Submitted by सुप्रिया जाधव. on 17 September, 2020 - 22:53

खडे जे संभ्रमांचे क्रूर नियती टाकते आहे
तुझ्या डोळ्यातले प्रतिबिंब माझे हालते आहे

तुझ्या शहरात असणे हा सुगंधी सोहळा असतो
तुझ्या श्वासांमुळे जिथली हवा गंधाळते आहे

हवेने ऐन रणरणत्या दुपारी रोख बदलावा
तसे भाग्यात आले सौख्य लहरी वागते आहे

तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे

परत धाडायचे होतेच तर का मारल्या हाका ?
किनाऱ्याला धडकली लाट उत्तर मागते आहे

जरी अंधारले आहे, पुन्हा उगवेल नेमाने
भरवश्यावर जिवाची म्लान पणती तेवते आहे

सुप्रिया मिलिंद जाधव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

वाह!!
>>>>>>>>>हवेने ऐन रणरणत्या दुपारी रोख बदलावा
तसे भाग्यात आले सौख्य लहरी वागते आहे

तुझ्या एका कटाक्षाने मनाचे फूल दरवळते
तुझे दुर्लक्षणे आयुष्य अवघे जाळते आहे

परत धाडायचे होतेच तर का मारल्या हाका ?
किनाऱ्याला धडकली लाट उत्तर मागते आहे>>>>>>>>>>>>>

ही तीन कडवी फार आवडली.