अभियांत्रिकीचे दिवस - भाग ६

Submitted by पाचपाटील on 16 September, 2020 - 16:31

''ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक
कायमची पोकळी निर्माण झालीय..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू मला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा आणून दे''.. अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.
होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच.. पिताना सगळ्या काल्पनिक समस्यांवर
रिकामटेकड्या चर्चा करणं, हेही काही विशेष नाही..
पण कधीतरी मैफिलीत नव्या-जुन्या असफल प्रेमप्रकरणांचा दुखरा विषय‌ निघाला की आवरणं मुश्कील व्हायचं.. मुख्य प्रॉब्लेम हा व्हायचा की ते विशिष्ट प्रेम किती विशुद्ध होतं, हे सिद्ध करण्याच्या नादात खंबे कमी पडायचे.. मग कुणीतरी स्वयंसेवक जाऊन सगळं घेऊन यायचा आणि
सप्लाय-लाईन पहाटेपर्यंत सुरळीत करायचा.
तर त्यावेळी त्या कॉलेजात मुलींच्या बाबतीत एकूणच
रखरखीत आणि जीवघेणा दुष्काळ..! त्यामुळं त्याबाबतीत आम्ही सगळेच बऱ्यापैकी अभावग्रस्त आणि कुपोषित..
त्यामुळं तडफड फारच.

म्हणजे समजा तुमचा रूममेट रोज रात्री फोनमध्ये घुसून, कुठल्यातरी 'बाबू' 'शोन्या' किंवा 'पिल्ला'बरोबर सुखाने
कानांना गुदगुल्या करून घेत असेल
किंवा होस्टेलच्या शांत कॉरीडॉर्समधून फोनवर रात्रभर बॅटिंग करणारे काही मजनू दिसत असतील..
आणि तुम्हाला मात्र भकासपणे जुनाट सिलींग फॅनची खरखर ऐकत झोपावं लागत असेल, तर तुम्हाला तीव्र जळजळ होणं साहजिकच होतं..

मग अशाच एखाद्या कातरवेळी 'आता कुणीतरी पाहिजेच राव' असा दृढ निश्चय व्यक्त केला जायचा.
अर्थातच ते दृढ निश्चय कृतीत उतरवण्याचे प्लॅन्स एवढे
फुसके असायचे, की एखादा नवखा शाळकरी पोरगाही ते
करण्याच्या भानगडीत पडणार नाही.
म्हणजे उगीच तिच्या टाइमटेबलचा अभ्यास करून ठराविक जागांवर घिरट्या घालत जीव झुरणीला लावणं.. फोन नंबर मिळवायचा अटोकाट प्रयत्न करणं.. ऑर्कुटवर एखादीतरी नौका आपल्या वाळवंटी किनाऱ्याला लागतेय का, हे चेक करत बसणं... कधी संधी मिळालीच तर तिला कुठंतरी
गाठून 'फ्रेंडशिप देतेस का?' असा तद्दन मूर्ख प्रश्न विचारणं... आणि परिणामी जबरदस्त अपमान आणि धमक्या घेऊन
रूमवर परत येणं आणि अतिफ अस्लम फुल व्हॉल्युमवर सोडून उसासे टाकत बसणं, हे ही कॉमनच.. अर्थात असले असंख्य अपमान स्वत:पुरतेच गुप्त ठेवून नवनवीन ठिकाणी टप्पे टाकत राहणारे काही निबर लोकही सगळीकडे असतातच. तिथंही होते. पण त्यांचा काई विषय नाही.. कारण ते वयच असं होतं की निसर्गच आतून तशा जबरदस्त धडका देत असायचा... पण ते एक असोच.. तो वेगळा विषय.

तर मूळ विषय असा होता की अशाच एका मध्यरात्रीनंतर
टेरेसवर रंगलेल्या मैफीलीत श्री. रेक्टर महोदय यांनी दोन
शिपाई यांचेसह दबक्या पावलांनी धाड टाकली..! अधूनमधून अशा शिकारीवर निघणं, हा श्री. रेक्टर यांच्या सेवा-शर्तींचा भाग..!
वाघाची नुसती चाहूल लागली की हरणं जशी वाऱ्यावर स्वार होतात, तसंच श्री. रेक्टर महोदय दिसले की फारसा विचार न करता, ताबडतोब पळ काढणं, ही आमची पहिली आणि तातडीची प्रतिक्रिया..! याचं मुख्य कारण म्हणजे आम्हापैकी काही जण 'पॅरासाईट' ह्या निर्वासित प्रवर्गात मोडणारे..! पूर्वी एकदा अशाच रेक्टर ह्यांच्या झडतीच्या वेळी, फक्त अंतर्वस्त्रे परीधान केलेल्या अवस्थेत, आम्ही दोन किलोमीटर धावत जाऊन सुरक्षित आश्रय शोधला होता, ह्याची साक्ष त्या
होस्टेलच्या दगडी भिंती अजून सुद्धा देतील..!

पण ह्यावेळी पळण्यास स्कोप नव्हता कारण आम्ही फारच तरल अवस्थेमध्ये पोहचलो होतो. दुष्मनाने अगदीच गाफील क्षणी दावा साधला होता.. सगळा माहौल पाहून श्री. रेक्टर यांनी आम्हास विचारले की 'तुमचे वय काय आणि तुम्ही
करताय काय? आणि तुम्हाला ह्याची थोडीशी तरी शरम
वाटते आहे काय ?'अशीही चौकशी केली.
बचाव व्यर्थ होता.. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाला दयेची भीक मागत राहणं, हाच एक पर्याय होता. आम्ही तो निवडला.
पण शेवटी शेवटी आमची कॅसेट 'सॉरी सरss असं पुन्हा नाय होणार सरss' ह्या एकाच वाक्यापाशी अडकून पडायला लागली.
खरं तर ते वाक्य आम्हाला एवढं आवडलं होतं की
आळीपाळीने आम्ही ते पुन्हा पुन्हा उच्चारत राहिलो,
असं म्हणणं जास्त योग्य ठरेल.

काही ठळक परिणाम:
१. उर्वरित मुद्देमाल श्री. शिपाई यांच्या ताब्यात गेला आणि त्यांस आनंदी आनंद जाहला.
२. सदर गुन्ह्याची पुढील सुनावणी, दुसरे दिवशी
श्री. विभागप्रमुख यांचे केबीनमध्ये करण्याचा निर्णय
श्री. रेक्टर ह्यांनी दिला.
३. हा सगळा दोष आमच्या जन्मदात्यांचा आहे, असं अंतिम आणि मूलभूत मत, श्री. विभागप्रमुख यांनी मांडले आणि लगेच आमच्या जन्मदात्यांना बोलावण्याबाबत आदेश दिले.
३. जन्मदाते म्हणून आम्ही ताबडतोब माफक मूल्य देऊन आणि अंगभूत अभिनयाबाबत ख्याती असलेले श्री. रिक्षावाले,
श्री. किराणावाले, श्री. गॅरेजवाले, श्री. हॉटेलवाले,
ह्यांस श्री. विभागप्रमुख ह्यांचे चरणी, उर्वरित शिव्या खाण्यासाठी, सादर केले.
४. आणि महत्त्वाचं म्हणजे, ह्यापुढे अधिक खबरदारी घेण्याची किंवा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर तयार करण्याची,
नितांत गरज आम्ही आपापसांत व्यक्त केली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol जबरी!

किस्सा मजेदार तर आहेच, पण मिनिट्स ऑफ मीटिंगची स्टाइलही मस्त.

हाहाहा भारीच..
आमच्यावर देखिल एका पाच दिवसांच्या इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वेळेस अशीच वेळ ओढवली होती.. पण मुली असल्यामुळे साॅफ्ट काॅर्नर मिळवून आम्ही आमची सुटका करून घेतली होती Happy

हा हा हा..तुमच्या एक एक लेखाबरोबर हसण्याचा पुढील वर्षाचा कोटा संपून जातोय. मागील कित्येक वर्षांचा बॅक लॉग संपवला ह्या लेखमालेने.

आईशप्पथ... रेक्टर हा प्राणी हॉस्टेलवाल्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो, मात्र त्याला इतकं घाबरायचं असतं हे माहितीच नाही. Happy

आमच्याकडे रेक्टरला त्रास द्यायच्या अनेकविध पद्धती शोधण्यात आल्या होत्या.
उदा. -
१. रात्री रेक्टरच्या रूम मध्ये फटाके सोडून त्याला एक उदबत्तीचा टाईमबॉम्ब जोडून पळून जाणे
२. तो अंघोळ करायला गेला की बाथरूमला बाहेरुन कडी लाऊन फटाके/काचा/मेलेली पाल, इ. आत टाकणे
३. अगदी ३ सेकंदांसाठी लाईट जायची, पण तेवढ्या वेळात आख्या खानदानाचा उद्धार करणे
४. रंगपंचमीला तो पाण्याचा सप्लाय बंद करत असे, मग त्यालाच रंग खेळण्याच्या नावाखाली शेण, गटारीचं पाणी,चिखलात वगैरे बुचकळून काढणे..

अरेरे.. आता फार वाईट वाटतंय, पण तेव्हां दुश्मनीच तशी होती.

भारी लिहिलंय, वाक्य न वाक्य सॉलिड आहे . हॉस्टेल ची मजा कधी अनुभवता नाही आली Sad
'सॉरी सरss असं पुन्हा नाय होणार सरss' >> हा पॅरा Lol .

सर्वांचे आभार _/\_
@फारएण्ड, @ मैत्रेयी @ च्रप्स @ म्हाळसा .. धन्यवाद Happy

आभारी आहे@ हीरा आणि @ए_श्रद्धा Happy

@ चिर्कुट.. Lol आमच्या तिथे एखादे सिनीअर फॅकल्टी मेंबर रेक्टर असायचे आणि त्यांच्या हाती ओरल्स टर्मवर्क वगैरे असल्यामुळं त्यांना थोडंफार घाबरून रहायची किंवा तसा आव आणण्याची पद्धत होती.. Lol

पण लाईट गेल्यावर अभूतपूर्व कल्ला करणं... मित्रांचे त्यांच्या त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत असणाऱ्या खाजगी संबंधांचा जाहीर आणि अर्वाच्च उल्लेख करणं, हे आमच्याकडंही होतं..
आणि होळीच्या धिंगाण्यानंतर तिथल्या झाडांवर फेकून दिलेल्या आमच्या अंतर्वस्त्रांच्या पताका वर्षानुवर्षे तशाच वाऱ्यावर फडकत असलेलं चित्र अजूनही आठवतं.. Lol

Lol
भारीच

हॉस्टेल ची मजा कधी अनुभवता नाही आली
+1