कृष्णसखा कदंब

Submitted by मंगलाताई on 14 September, 2020 - 08:20
कदंब

download_0.jpg

देशी फुलझाडांच्या मालीकेतील सातवे फुलं कदंब

हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मध्येमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल. डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. घनदाट छाया आणि तजेलदार मोठ्या मोठ्या पानांचा हिरवा रंग. सृष्टीत इतकी विविधता आहे प्रत्येक झाडाचा रंग हिरवाच आहे पण हिरव्या रंगाच्या किती छटा आहेत तर प्रत्येक झाडाची रंगछटा वेगळी आहे. कुणाला फुलोरा आहे कुणाला रंग कुणाला गंध पण भारतीय वृक्षांत औषधी गुणधर्म मात्र प्रत्येकात आहेच. मानवी उपयोगासाठी व जैवविविधतेतील साखळी सुखरूप टिकवण्यासाठी सर्व जीवजंतूंचा विचार करून वृक्षरचना झाली आहे असे अभ्यासावरून लक्षात येते. कदंबाचे नाव ऐकल्याबरोबर आठवतो तो श्रीकृष्ण. कदंब हा ऐतिहासिक व्रुक्ष आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यात कदंबाचे विशिष्ट स्थान आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कदंब वृक्षाखालीच कृष्णाने अध्ययन केले. वृंदावनात यमुना घाटावर गोपी आपल्या मैत्रिणींसोबत स्नानाला येत असे त्यावेळी कदंबा वर कृष्णाने गोपींचे वस्त्र लपवून ठेवले होते अशी आख्यायिका आहे. हा वृक्ष पाच हजार वर्षे जुना असून यमुनेकाठी ब्रज येथे आहे. कालिया नागाच्या फण्यावर उभे राहून कृष्णाने या कदंबा जवळच नृत्य केले असे ऐकिवात आहे. वृंदावनात कदंब वृक्ष जास्त प्रमाणात आढळतात, पण हा कृष्णाचा कदंब मात्र एक आगळावेगळाच आहे . कदंबातील उच्चतम रासायनिक गुणधर्मामुळे तो देवश्रेणीत येतो. वृंदावनाला कदंबांच्या वेगवेगळ्या जाती आहेत श्वेतकदंब, पिवळा कदंब आणि द्रोण कदंब. कुमूदवनाच्या कदंबखंडित लाल रंगाचे फूल असणारे कदंब आढळतात. द्रोण कदंब हे कदंबाची पाने द्रोणा सारखी दुमडल्याप्रमाणे असलेले वृक्ष आहेत. हे श्याम, ढाक इत्यादी भागात हे वृक्ष आढळतात. वृंदावनात राधा कृष्णाच्या लीला रचल्या गेल्या आहेत. लोकसंगीत, लोकवांङमय, लोकगीते यातून या लीला आज पर्यंत मौखिक आणि लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. काही रचना तर अमर आहेत. कदंबाचे आणि कृष्णाचे नाते अजरामर आहे. कृष्ण म्हटला की राधा आणि राधा म्हटली की कदंब. असे ऐकिवात आहे की कृष्ण सावळा होता आणि कृष्णाची आठवण म्हणून राधा काळ्या कदंबाला मिठी घालत असे. श्रीकृष्णाचा हा आवडता वृक्ष होता. कदंब हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. दक्षिण भारतात कदंब वृक्षात मुरुगदेवाचे वस्ती स्थान आहे असे मानतात. कदंब वृक्षास शततारका नक्षत्राचा उपासना व्रुक्ष ही मानतात. संस्कृत साहित्यात कदंबाचा उल्लेख निरनिराळ्या प्रकारे केलेला आढळतो. पवित्र स्मृतीस्थानांवर कदंबाची फुले अर्पण करतात. हिंदू व बौद्ध धर्मीय या वृक्षाला पवित्र मानतात म्हणून मंदिर परिसरात व विहार परिसरात वृक्ष लावतात. कदंबावर केलेले साहित्य आणि काव्य रचना यांची भरपूर उपलब्धता आहे. हिंदीत सुभद्राकुमारी चव्हाण यांनी अतिशय लोकप्रिय रचना केलेली आहे .

' यह कदंब का पेड अगर माँ होता यमुना तीरे, मै भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे
दे देती यदि मुझे बासुरी तुम दो पैसे वाली किसी तरह नीचे हो जाती है कदंब की डाली'

कदंब वृक्ष हा हिमालयाच्या खालच्या भागात जास्त प्रमाणात आढळतो. हा पानगळी वृक्ष आहे भारतात इतरत्र सर्वत्र आढळतो. आसाम, बंगाल, अंदमान म्यानमार, जावा, सुमात्रा श्रीलंका येथे या वृक्ष आढळतो. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. कदंबाचे शास्त्रीय नाव रुबिएसि कदंबा असे आहे. संस्कृतमध्ये कदंबाला हलीप्रिय कदंब, निप:, कर्णपूरक, नदीज:, वृत्तपुष्प, सुरभी असे संबोधतात. कदंबाच्या भारतात अनेक जाती आहेत त्यापैकी राजकदंब, धुलीकदंब, कदंबिका या मुख्य जाती आहेत. कदंब 20 ते 40 फूट उंचीपर्यंत वाढतो. खोडाचा व्यास 100 ते 160 किलोमीटर एवढा असतो. कदंबा ला भरपूर वाढ असते. आडदांड पणे वाढतो तो. त्याचा पसारा ही भरपूर असतो. काळ्या रंगाचे खोड, बहरलेल्या वाकलेल्या हिरव्याकंच फांद्या आणि त्यावर फुललेली पिवळी फुलं. पावसाळ्यात दृष्ट लागते कदंबाला. वर्षा ऋतूत ढगांच्या गडगडाटानं हिरव्याकंच कदंबावरचे फुल अचानक उमलतात, अचानक झाडावर पिवळी गोल गरगरीत एकसारखी फुलं दिसतात. काही दिवसांनी पिवळे पराग झडून जातात आणि फळ नारिंगी लालसर दिसू लागतात. या फुलांतून अत्तर काढतात. कदंबाची पाने थोडीफार मोहाच्या पानांसारखीं असतात. फांद्या जमिनीला समांतर पसरलेल्या असून पाने साधी, समोरासमोर, चिवट मोठी, लांब देठाची, टोकदार, वरून चकचकीत व खालून लवदार असतात. शेंड्यावर गोल फुलोरे, गुच्छे दार पिवळट नारंगी रंगाची नारंगी रंगाची सुगंधी असून फुलांचा मोसम उन्हाळा व पावसाळा आहे. त्यावरून त्याचे दोन प्रकार वनस्पती तज्ञ मानतात. उन्हाळ्यात फुलणाऱ्या कदंबाला धुलीकदंब व पावसाळ्यात फुलणाऱ्या कदंबाला धाराकदंब म्हणतात. याचे फळ पिवळे मांसळ, लिंबाएवढे गोल असते. ती फळे खातात पण चविष्ट रुचकर लागत नाहीत. फळांवर षटकोणी रेषा असतात. गुणधर्माने कदंब कडू, गोड , खारट, तूरट, जड, वांजीकर, स्तंभक शामक आहे. यात सिंकोटॅनिक आम्ल आहे. कदंबाचे साल, पाने, लाकूड, फळे कोंब सगळेच उपयोगी आहे. यापासून औषधे तयार करतात. याच्या लाकडापासून होड्या, तक्ते, खोकी, फळ्या, आगपेट्या, कागद, सजावटी सामान इत्यादी वस्तू बनवतात. पाला गुरांचा चारा म्हणून उपयोगी येतो. विष उतरविण्यासाठी कदंब उपयोगी आहे. पाने साल उकळून जुन्या घावांवर लावतात, घाव धुतात, पित्तावर खाजेवर पाने उपयोगी आहेत. शरीरावर कुठेही सूज आली तर पानांचा उकळून शेक द्यावा, शेकताना त्यात शेंदे मीठ घालतात. कदंबाच्या फांद्या नाजूक असतात. मुखदुर्गंधी घालवण्यासाठी पाने वापरतात. मूत्रविकार खोकला यावर रामबाण उपाय आहे. मधुमेहावर उपाय म्हणून पाने, साल ,फळ समान भाग घेऊन काढा तयार करतात. तर असा हा कदंब सुंदरता आणि आपल्या गुणधर्मांमुळे प्रिय आहे. सामाजिक वनीकरण विभाग कदंबाची रोपे मोफत देतात. वृक्षारोपणासाठी नागपूरला कदंब बऱ्याच ठिकाणी आहे. वेस्ट हायकोर्ट रोडवर रोपे लावली आहेत. बाणभट्ट यांचे प्रसिद्ध काव्य कादंबरीची नायिका कादंबरीचे नाव कदंबा वरुन ठेवले आहे. भारवी, माद्य आणि भवभूती यांनी सुद्धा आपल्या काव्यात कदंबाचे वर्णन केले आहे .
images.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान माहितीपुर्ण लेख. फोटोही सुरेख.

कोकणात याला नीव म्हणतात, माहेरच्या गावात आहेत. याची कच्ची फळे आंबट तुरट लागतात. कैरी कशी तिखटमीठ लाऊन खातो, तशीच तिखटमीठ लाऊन खायचो आम्ही लहानपणी कोकणात जायचो तेव्हा. जाम टेस्टी लागतात.

आईच्या सोसायटीसमोरच्या रानात हे झाड दिसायला लागलं नुकतेच. तो फुलला की बघायला जाईन.

मला निसर्गाच्या गप्पा वर खूप मागे समजलं की नीव म्हणजे कदंब. मी पिकलेली नीव फळे बघितली नाहीयेत. आम्ही कच्चीच फस्त करायचो.

छान लिहिलंय. कदंबाच्या फुलांचा मंद सुवास आवडतो!
खोडाचा व्यास 100 ते 160 किलोमीटर एवढा असतो. >> हे आकडे बरोबर आहेत का?

छान लेख ! खुप माहितीपूर्ण!
कलकत्याला शांतिनिकेतनला द्रोण कदंब पाहिलेला। पानांचा खरोखर द्रोणासारखा आकार। कृष्ण म्हणे यात लोणी ठेऊन खात असे Happy

खुप माहीतीपुर्ण लेख. याचा सुवास खुपच सुंदर , माझ्याकडे याच्या नैसर्गिक ईसेंशिअल तेलापिसुन बनवलेले मंद सुवासिक अत्तर देखिल आहे.

नवीन प्रतिसाद लिहा