द सोशल डिलेमा - नेटफ्लिक्स

Submitted by सई केसकर on 11 September, 2020 - 11:32

१९९९-२००० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या त्यावेळी टीनएजर असणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात फार मोठ्या बदलाचं होतं. घरातल्या फोनमधून चिर्रर्र चिर्रर्र असा आवाज करत आमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट यायचं. आणि मग आम्हाला एक मोठं पटांगण बागडायला मिळायचं. सुरुवातीचे दिवस हे हॉटमेल आणि याहूचे होते. शाळा कॉलेजमधली गोड गोड प्रेमपत्र आता पासवर्ड प्रोटेक्टेड इमेलमध्ये येत असल्यामुळे अनेक जणांची सोय झाली होती. बरेच कवी मनाचे लोक आता तासंतास फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जे वाटतंय ते पात्रात किंवा कवितेत लिहून पाठवू लागले. ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवणं जितकं सोपं झालं होतं तितकंच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणं सुद्धा सोपं झालं होतं. यात अनेक चॅटरूम असायच्या. याहू चॅटरूम्समध्ये "पडीक" असणं त्याकाळची कूल गोष्ट होती. त्याबरोबर प्रत्येक शहराच्या अशा चॅटरूम्स सुद्धा असायच्या. त्यात माझी लाडकी पुनेसिटी नावाची चॅटरूम होती.

"इंटरनेट इज फुल ऑफ क्रिप्स" अशा अर्थाची अनेक वाक्य आई बाबांनी त्याकाळी ऐकवली होती. आम्हाला एकीकडे इंटरनेट बद्दल उत्साह, कुतूहल, थोडंफार व्यसन अशा भावना होत्या, तर दुसरीकडे आई बाबांना भीती, धास्ती, काळजी, संताप अशा असाव्यात. हे प्रकरण आपल्या मुलीला बिघडवणार तर नाही अशी चिंता माझ्या आणि मैत्रिणींच्या पालकांना नक्कीच होती. त्यामुळे इंटरनेटवरच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही हे सकाळ, दुपार, संध्याकाळ आमच्या डोक्यात भिनवलं जात होतं. आणि आम्ही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून अनेक लोकांना भेटत होतो. इंटरनेटवर ओळख झालेल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला भेटायचं म्हणजे फारच गुदगुल्या वगैरे होणारा प्रसंग असायचा. कारण त्याकाळी डिजिटल फोटोग्राफी आयुष्यात रुळली नव्हती, आणि आपला फोटो इंटरनेटवर लावला तर आपल्याला लोक पकडून वगैरे नेऊ शकतात असली भीती दाखवल्यामुळे कुणी फोटो बिटो लावायचे नाही. आपला मित्र किंवा मैत्रीण दिसायला कशी असेल हे कुतूहल, त्यांना ओळखायचं कसं हा प्रश्न, आपण त्यांना कसे वाटू वगैरे गोष्टींमुळे न बघितलेल्या मित्र मैत्रिणींना भेटणं फारच आवडायचं. अनेकांना मी त्याकाळी टेकडीवर भेटले होते. आणि यात फक्त क्रश, डेटिंग वगैरे साठी आटापिटा नसायचा. माझ्यासारखी पुस्तकं आवडणारे, शास्त्रीय संगीत आवडणारे, गेलाबाजार फ्रेंड्स आवडणारे असे अनेक लोक त्यावेळी इंटरनेटवर भेटले. आणि सुदैवाने माझ्या वाट्याला एकही क्रिप आला/आली नाही.

तीनेक वर्षांनी गूगल आलं, आणि ऑर्कुट. या दोन्हींनी आयुष्य अजून थोडं बदललं. ऑर्कुटचा काळ हा सोशलमीडियाचा सुवर्णकाळ होता. कारण ऑर्कुट त्यामानानं निरागस होतं. आमच्या ओळखीतली काही लग्नही ऑर्कुटवर जमली. तिथेही माझ्याशी मिळत्या जुळत्या विचारांचे अनेक लोक भेटले आणि मैत्री झाली. त्यातल्या काहींचं आता फेसबुकवरही स्थलांतर झालं आहे. ऑर्कुट आलं तेव्हा आमच्याकडे डिजिटल कॅमेरा आला होता. त्यामुळे अधून मधून फोटो बदलणे, नवे टाकणे वगैरे आता जमायला लागलं होतं. एकूणच आधीच्या दोन तीन वर्षातलं इंटरनेटवरचं "अनॉनिमस" असणं आता कमी कमी व्हायला लागलं होतं. त्यावेळी वाटलं होतं की हे चांगलं आहे. इंटरनेटवरची आपली ओळख आणि खऱ्या जगातली ओळख ही एक असणं महत्वाचं आहे. मग हळू हळू बाकीचे ईमेल सोडून देऊन सगळीकडे गूगलचे इमेल वापरायला सुरुवात झाली. कारण गूगलमध्ये मेल मधूनच आपण लोकांशी गप्पा मारू शकायचो. याची फार सवय लागली. डेस्कवर काहीही करत असताना, अभ्यास, वाचन, सर्फिंग, गूगलमध्ये लॉगिन केले असेल तर जगभरातले मित्र मैत्रिणी सोबतीला असायचे. आणि गूगलचॅट आल्यावर का कोण जाणे हळू हळू त्या अनोळखी लोकांच्या चॅटरूम्सचा नाद सुटला. एखादी नवीन ओळख ऑर्कुटवर व्हायची आणि मग आपण फोन नंबर देतो तसं त्या व्यक्तीला आपलं गूगल आयडी दिलं जायचं. मग गप्पा मारता मारता एखाद्या गाण्याची वगैरे आठवण झाली की पलीकडची व्यक्ती किंवा मी, ते गाणं मेलला चिकटवून पाठवून द्यायचो. अशा गूगलचॅट मधून अगदी पिंक फ्लॉइड ते कुमार गंधर्व अशी सगळी गाणी माझ्यापर्यंत आली होती.

गूगल चॅट "कूल" झालं तेव्हा मी नुकती परदेशी शिकायला गेले होते. ऑस्ट्रेलियात असल्यामुळे, सकाळपासून अगदी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत, भारत, यूरोप, अमेरिका, कॅनडामध्ये विखुरलेले अनेक मित्र मैत्रिणी येऊन जाऊन गूगलचॅटवर सोबत करायचे. हे वर्षं असेल २००८ किंवा २००९. तोपर्यंत आपण सध्या ज्या फोनला सदैव चिकटलेले असतो, ते फोनही अस्तित्वात नव्हते. यावर आता विश्वासही बसत नाही. टचस्क्रीन फोन आपण जन्माला आल्यापासून वापरतो आहे असं आता वाटतं इतकी त्याची सवय झाली आहे. त्याकाळी मी गरीब विद्यार्थिनी असल्याने फोन हा फक्त टेक्स्ट मेसेज आणि फोन करायसाठी वापरला जाणारा ठोकळा होता. तेव्हा व्हॅट्सऍप नव्हतं यावरही विश्वास बसत नाही. पण त्याकाळी लॅपटॉप हा माझा जीव की प्राण असायचा. लॅपटॉप शिवाय काहीही काम होऊ शकायचं नाही. यावरही आता विश्वास बसत नाही. त्याकाळी गूगलचा ड्रॉपबॉक्स आला होता. आणि आम्हाला त्याचा इतका आधार होता, कारण युनिव्हर्सिटीच्या कम्प्युटरमधून आमचे काम आम्हाला त्यावर टाकून घरी जाऊन पुन्हा सुरु करता यायचं. हे म्हणजे फारच रेव्होल्यूशनरी काहीतरी होतं. गूगलचं अजून एक अचंबित करणारं काम म्हणजे मी हा लेख अगदी माझ्या विचारांच्या गतीनं लिहू शकते आहे. गूगल ट्रान्सलिटरेशनमुळे माझ्यासारख्या अनेकांना मातृभाषेतून व्यक्त होता आले. हेही साधारण २००९-१०च्या आसपास झाले. माझा उन्हाळ्याची सुट्टी नावाचा ब्लॉग मी संपूर्ण गूगलची ही सेवा वापरून लिहिला होता. आणि त्यातही उत्तरोत्तर प्रगती झाली.

याच दरम्यान, ऑर्कुटला मागे टाकत फेसबुक हे सगळ्यांचं आवडतं सोशल नेटवर्क झालं. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला फेसबुक अजिबात आवडलं नव्हतं. माझ्या फ्लॅटमेटनं आग्रह करून मला ते घ्यायला लावलं कारण तिथे तुम्ही एकमेकांना "टॅग" करू शकत होतात. मग अनेक वेळा "तू मला मुद्दाम मी ज्या फोटोत कुरूप/जाड दिसते त्यात टॅग करतेस" वगैरे भांडाभांडी व्हायची. पण एकाच फोटोवर त्यातल्या अनेकांची नावं टाकून, त्यांना आणि त्यांच्या मित्रायादीला तो दिसावा, जेणेकरून अनेकजण त्या फोटोवर कॉमेंट करतील, तो लाईक करतील आणि फेसबुकच्या फायद्याचं म्हणायचं तर, त्या फोटोच्या निमित्तानं त्या फोटोत असलेले सगळे लोक आणि त्यांचे मित्र अधिक काळ फेसबुकवर राहतील. हळू हळू लोकांच्या लक्षात आलं की आपल्या फोटोवर जितक्या जास्त लोकांना टॅग करू तितके त्यावर मिळणारे लाईक्स वाढतात. यातूनच मग अमुक अमुक विथ १०० अदर्स असे, त्यातल्या ९९ लोकांचा काहीही संबंध नसलेले फोटो फेसबुकवर येऊ लागले. आणि फेसबुकच्या अशा छोट्या छोट्या आपल्याला निरुपद्रवी वाटणाऱ्या या युक्त्यांनीच आज विखारी रूप धारण केले आहे.

ऍप्पलचा आयफोन आला आणि हे सगळं बदललं. आयफोन यायच्या आधी आमचे आवडते ऍप्पल उत्पादन म्हणजे आयपॉड. आत्ताच्या तरुणाईला सांगितलं की तेव्हा असा जाऊ तिथे भसाभस डेटा वापरून गाणी ऐकता यायची नाहीत. म्हणून आम्ही आमच्या कॉम्प्युटरवर (पायरेटेड) गाणी डाउनलोड करायचो आणि मग आयपॉड नावाच्या पिटुकल्या प्लेयरमध्ये ती टाकून बस, ट्रेन, फूटपाथ, लॅब सगळीकडे तुमच्यासारखेच कानात प्लग घालून वावरायचो, तर त्यांना ते किती मागास वाटेल याची कल्पनाही करवत नाही. माझ्या मुलाला आत्ताही अनेकवेळा मला असं सांगावंसं वाटतं की, "बाबा रे! आमच्या काळी असं हवं तिथे बसून यू ट्यूब बघता यायचं नाही! तू किती नशीबवान आहेस याची तुला कल्पना नाही!" पहिल्यांदा जेव्हा स्पॉटिफाय नावाचं गाण्यांचं ऍप्प वापरायला सुरुवात केली तेव्हा आपण काय ऐकतोय हे जगाला दाखवायला स्पॉटिफाय आणि फेसबुकचं लग्न लावल्याचं आठवतंय. आणि मग लोकांना आपण कूल वाटावं म्हणून स्पॉटिफायवर वेगळी प्लेलीस्ट केल्याचेही स्पष्ट आठवतं आहे.

हळूहळू आपल्या हातातील ही सगळी उपकरणे, एकाच फोनमध्ये गेली आणि आपण सगळीकडे फटाफट साइन इन करू लागलो. कुठल्याही सध्या ऍप्पवर जायला आधी गूगल किंवा फेसबुकचा पत्ता देऊ लागलो. आणि याच दरम्यान इंटरनेटवर वस्तू खरेदी करणेही सोपे झाले. आज, एकेकाळी इंटरनेटवर खरेदी करायला फक्त क्रेडिटकार्ड चालायचं हे सुद्धा आश्चर्यकारक वाटतं आणि ते दिवस फार पूर्वीचे नाहीत हेदेखील. वस्तू खरेदी करायचे देखील किती मार्ग आपण अवघ्या सात आठ वर्षात बघितले आहेत. क्रेडिट कार्ड, मग डेबिट कार्ड, पेपॅल, नेटबँकिंग ते आता गूगलपे, फोनपे, ऍमेझॉनपे. एकेकाळी इंटरनेटवर फक्त चोर, भामटे असतात असं ठासून सांगणारे आईबाबासुद्धा आता लीलया ऍमेझॉन, जीपे वगैरे वापरू लागले आहेत. पण एकदा मला आईनं अगदी निरागसपणे प्रश्न विचारला, "अगं सई, आज सकाळी मी गूगलवर हेडफोन्स शोधले आणि लगेच माझ्या फेसबुकवर ते कसे काय दिसायला लागले?" तेव्हा मग तिला हे सगळे आपल्यावर पाळत ठेऊन असतात हे सांगताना वाटलं की कुठल्यातरी चोर भामट्यांच्या स्टॉकिंगला घाबरता घाबरता आपण या सगळ्या कंपन्यांकडूनच स्टॉकिंग करून घेऊ लागलो आहोत.

हे सगळे विचार एकदम आले कारण काळ नेटफ्लिक्सवर "द सोशल डिलेमा" ही डॉक्युमेंट्री बघितली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गूगलमध्ये काम केलेल्या अनेक बुद्धिमान लोकांनी या कंपन्या आपल्याला त्यांच्या जाळ्यात कशा खेचून घेतात आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिथे राहण्यास कशा उद्युक्त करतात याबद्दल सविस्तर सांगितले आहे. यात फेसबुक आणि गूगलकडून आपलं लक्ष सतत कसं वेधून घेतलं जातं याची अनेक उदाहरणं आहेत. यात व्यक्त होणाऱ्या अनेकांना, "आपण हे काय करतोय?" असा प्रश्न पडून त्यांनी त्यांची नोकरी सोडली होती. ती डॉक्युमेंटरी बघताना अनेकवेळा असं वाटलं की आपल्यावर मागची दहा एक वर्षं केलेले प्रयोग; ज्यामुळे आपण पुरते या सगळ्याच्या आहारी गेलो, एका बेसावध क्षणी आपल्याला आणि आपल्या विचार प्रक्रियेला कुणालातरी विकून टाकायला वापरले गेले. अर्थात यात व्हिक्टीम बनायचे काहीच कारण नाही. आपल्याला कधीही सोशल मीडियाला राम राम ठोकता येऊ शकतो. पण त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याचा विवेकानं वापरही करता येऊ शकतो.

जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यात सोशल मीडियानं स्थान पटकावलं तसंच सार्वजनिक आयुष्यातही अनेक वेळा सोशल मीडियामुळे क्रांती झाली. अरब स्प्रिंग्स पासून ते भारतात सीएएच्या विरोधात झालेलं आंदोलन, सगळ्यात सोशल मीडियाचा वाटा महत्वाचा होता. पण त्याचबरोबर, राजकारणी लोकांकडून आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा वापर फेक न्यूज पसरवण्यासाठी होतो हेही आता सिद्ध झाले आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये अनेक विचार करायला लावणारी वाक्य आहे. जसं आपण सोन्याच्या "फ्युचर्स" मध्ये पैसे गुंतवतो, त्याचप्रमाणे सोशल मीडिया "ह्युमन फ्युचर्स" मध्ये गुंतवणूक आणि उलाढाल करतो आहे. आपले विचार ओळखून आपल्याला हवा तो कन्टेन्ट दाखवून ते समविचारांच्या माणसांची बेटं तयार करतायत आणि काय खरं आहे आणि काय खोटं आहे यातली रेषा इतकी धूसर झाली आहे की अशा एकसारख्या विचारांच्या माणसांचे जत्थे विरोधी विचारांच्या माणसांवर तुटून पडतात. एकेकाळी माणसांना जवळ आणणारी माध्यमं आता माणसामाणसांमध्ये फूट निर्माण करताहेत.

त्यातला एक इंजिनियर हे वाक्य म्हणतो, "यू थिंक दॅट द वर्ल्ड इज गोइंग क्रेझी". हे असं गेले अनेक महिने वाटतं आहे. अर्थात त्या वेडेपणात मीसुद्धा आहे. पण आपण हातात इतकी आयुधं असूनही इतके दिशाहीन कसे झालो, आणि तेही इतक्या कमी अवधीत, याचं आश्चर्य आणि खेद दोन्ही वाटतात. माझ्यासारखे आणि माझ्या आधी जन्माला आलेले लोक हळू हळू या मायावी दुनियेत आले आहेत. पण आज जे विशीपंचविशीत आहेत, त्यांनी या आधीचं, असं सारखी धांदल, कॉंट्रोव्हर्सी, सतत नोटिफिकेशन, सतत तुलना नसलेलं जगच पाहिलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे वाईट परिणाम अधिक तीव्र आहेत हेसुद्धा अनेक उदाहरणांवरून लक्षात येतं. आपण कसे दिसतो, आपण कसं दिसलं पाहिजे याबद्दलचे न्यूनगंड सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आधीक तीव्र स्वरूपात जाणवतात. आणि एखादी मैत्री किंवा नातं पूर्वी तोडताना आपल्याला जे संभाषण करून पुढे जावे लागायचे ते आता एखाद्या ब्लॉकमध्ये उरकते. लहान मुलांना फोनचे व्यसन लावू नका असं कळकळीने काही तज्ज्ञ या डॉक्युमेंटरीमध्ये सांगतात. अर्थात आज परिस्थितीच अशी आहे की मुलांना फोनशिवाय पर्याय नाही.

फिल्म बघून सुन्न वाटलं असलं तरी आपल्या आयुष्यात सोशल मीडियामुळे होणार उपद्रव आपण कमी करू शकतो हा आत्मविश्वास अजूनही आहे असं वाटतं. आपण फेसबुकवर नक्की काय करायला येतो, आणि कशाकशात वेळ घालवतो हे सतत बघत राहिलं तर हळू हळू वेळखाऊ, विखारी आणि कुठलाही अंत नसलेल्या पोस्ट्स आणि वादविवादातून आपोपाप दूर राहायला शिकतो. पण घरात, ऑफिसमध्ये सतत या वाहवत जाण्यापासून स्वतःला वाचवावं लागतं हे मात्र नक्की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. आवडला.
डॉक्युमेंट्रीबद्दल खूप ऐकलंय. नेटफ्लिक्स नाही, त्यामुळे कधी बघायला मिळेल माहिती नाही.

चर्चाही आवडली.

माझ्या वयोगटातल्या लोकांना, म्हणजे जे तिशीनंतर इंटरनेट वापरायला लागले असे, त्यांना या भोचकपणाला तोंड देणे तुलनेनं सोपं जात असावं असा माझा अंदाज (आणि निरिक्षण) आहे.

मी फोनवर फेसबूक डाऊनलोड केलं आणि दोन दिवसांत काढून टाकलं होतं. फोनवर मी गूगलचं सर्च-टर्मचं ऑटो सजेशन सुद्धा डिसेबल करून ठेवलं आहे. लोकेशन हिस्ट्री, यूट्यूब हिस्ट्री सुद्धा डिसेबल केलं आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिप्कार्ट वगैरे सगळं पीसीच्या ब्राऊझरमधून करते.
दिवसा बरेचदा व्हॉट्सअ‍ॅप वेब सुरू ठेवते. म्हणजे आपोआप तिथे ५०% कमी टाइमपास होतो असा माझा अनुभव आहे.
एकदोन मैत्रिणी इन्स्टावर जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात, म्हणून तिथे ब्राऊजरमधून साइन-अप केलं. तर त्या साइटवर लॉग-आऊटचा ऑप्शनच नाही असं दिसलं. तेव्हा फार राग आला. त्यानंतर इन्स्टावर गेले नाही.

अर्थात या गोष्टी फुलप्रूफ आहेत असं नाही, पण त्याच्या आहारी जाण्यापासून नक्की वाचवू शकतात, असं मला वाटतं. पुन्हा तो वयाचा फॅक्टर असण्याची शक्यता आहेच.

म्हणजे जे तिशीनंतर इंटरनेट वापरायला लागले असे, त्यांना या भोचकपणाला तोंड देणे तुलनेनं सोपं जात असावं असा माझा अंदाज (आणि निरिक्षण) आहे. >>> नक्कीच असेल Happy पण मधलीच रेंज फक्त. अगदी तरूण आहेत ते ही टोटल त्यात आहेत आणि नुकतेच रिटायर झालेले सुद्धा. आपल्या पिढीची अवस्था बहुधा 'कल आज और कल' मधल्या राज कपूरसारखी आहे Happy

पण हल्ली फेक न्यूज मध्ये धादांत खोटं पसरवतात तेव्हा तो व्ह्यू पॉईंट कसा असू शकतो? >>> हो ते सगळेच म्हणायचे आहे मला. Facts/Views/Propaganda/Lies सगळेच द्या. एखादा विषय जर सोशल नेट वर काहीतरी रोखठोक टाइप मत देण्याइतका किंवा आपल्याला काडीची माहिती नसताना कोणावरही काहीही आरोप करण्याइतका, एखाद्याला डायरेक्ट देशद्रोही वगैरे म्हणण्याइतका महत्त्वाचा वाटला तर किमान अर्धा तास त्यावर अगदी नुसता नेटवर रिसर्च केला तरी अनेक बाजू कळतात. आणि ९०% केसेस मधे किमान तितके केल्याशिवाय तुम्हाला सत्य आणि पर्स्पेक्टिव्ह दोन्हीही समजत नाही.

भारतातील गेल्या ३-४ वर्षांतील उदाहरणे
- नॅशनल हेरॉल्ड
- कन्हैय्या कुमारवरचे आरोप
- ओम पुरीचे सैनिकांबद्दलचे वक्तव्य
- कोरेगाव-भीमा
- महाराष्ट्रातील दलित अत्याचार
- विचार स्वातंत्र्यासंबंधित उदाहरणे
- कंगना

इथे अमेरिकेत
- सध्याच्या दंगली
- लुईझियाना मधल्या अ‍ॅबॉर्शन क्लिनिक संबंधी कोर्टाने दिलेला निकाल
- फेसबुक व फेक न्यूज
- मध्यंतरी चर्चेत आलेली व नंतर मागे घेतली गेलेली व्हिसा रिस्ट्रिक्शन्स
- कॅन्सल कल्चर
- कोरोना चा "चायनीज व्हायरस" म्हणून आवर्जून केलेला उल्लेख
- ट्रम्पचे तथाकथित "शांततेचे नोबेल" नॉमिनेशन

यातील कोणत्याही विषयावर किमान काही वेळ वेगवेगळ्या बाजू न वाचता जर कोणी मत ठरवले असेल तर ते अर्धवट माहितीवर आधारित असेल हीच शक्यता जास्त.

आता या सगळ्याचा इथे काय संबंध? तर लोक स्वतःच्याच एको चेंबर्स मधल्या बातम्या व मते ऐकत राहतात आणि त्यामुळे एकदम ठाम व बहुतांश चुकीच्या मताचे कोपरे पकडून बसतात. विशेषतः जर बदनाम होणार्‍यांत त्यांची जात, त्यांचा धर्म, त्यांचा पक्ष किंवा त्यांचे फेवरिट थोर व्यक्तिमत्त्व जर नसेल, तर त्यांच्या माहितीपेक्षा वेगळे काही तथ्य असू शकेल हे शोधण्यात त्यांना काहीही इण्टरेस्ट नसतो. सोशल नेटवर्क्स अशा लोकांना त्यांना आवडतील असे व त्याच मताचे समर्थन करणारे व्हिडीओज, पोस्ट्स वारंवार दाखवून तीच खुंटी बळकट करायाला आणखी मदत करतात.

हा लेख prescient का कायसं म्हणतात तसा झालाय.
अलिकडेच यामध्ये लिहिल्यासारखे काही अनुभव आले ते लिहायला धागा वर काढला.

1. मी किचनमध्ये काम करताना देवदासमधील डोला रे डोला गाणं गुणगुणत होते. आता हे काही माझं फेवरीट गाणं नाही किंवा अलीकडे ऐकलेलं पण नाही. मग एकदम कुठे आठवलं? नंतर लक्षात आलं की त्याच दिवशी फेसबुकवर एका फ्रेंडने या गाण्यावरचा मीम टाकला होता. मी स्क्रोल करताना 5-10 सेकंद बघितलं असेल पण गाणं डोक्यात राहीलं. Subliminal programming इतकं प्रभावी असतं.
2. आम्ही एका फास्ट फूड चेनमधून पार्सल घेऊन घरी आलो. अनेक वर्षांनी या चेनमध्ये गेलो असू. घरी आल्यावर टीव्हीवर युट्यूब लावलं तर त्या ब्रँडची जाहिरात लागली. त्याआधी किंवा त्यानंतर कधी ती जाहिरात लागली नाही.
3. फेसबुक वापरायला सुरुवात केली तेव्हा जस्ट नॉर्मल नेटवर्किंग, लोकांशी संपर्क ठेवणं हे डोक्यात होतं. नातेवाईक, रियल लाईफ फ्रेंड्स हेच सर्कल तिथेही आहे. काही ग्रुप्स इंटरेस्टनुसार जॉईन केले. इंस्टावर फ्रेंड्सनी अकाउंट उघडले तेव्हा मीही जॉईन केलं. पण आता या सर्व ठिकाणी मार्केटप्लेस चा प्रभाव खूप जास्त वाटतो. अनेक जण/जणी स्वतःचे छोटे मोठे बिझनेस/सर्व्हिस मार्केट करत असतात. यातून मग आपल्याला हवं ते कंटेंट शोधणं अवघड जातं. त्यापेक्षा व्हॉट्सअप बरं वाटतं. युट्यूब वापरही म्हणूनच कमी केलाय. Mediocre content च्या गर्दीतून दर्जेदार व्हिडियो शोधणं हे काम होऊन बसतं- मग रेसिपी असो किंवा इतर काही. राजकीय टॉपिकमध्ये रस असल्याने माझ्यापेक्षा वेगळ्या/विरोधी विचारसरणीच्या लोकानाही फेसबुक/ट्विटरवर फॉलो करायला सुरुवात केलेली. अलीकडे कळलं की हे लोक रीतसर पैसे घेऊन राजकीय campaigning ची कामं करतात. (त्यांच्यातून फुटलेल्या एका व्यक्तीनेच पोलखोल केली.) बाकी न्यूजपोर्टल्सबद्दल तर लिहू नये हेच उत्तम. क्लिकबेट्स, पेडपीआर न्यूज disguised as रियल न्यूज, वगैरे.
या सगळ्यामुळे माझा कल पुन्हा एकदा वाचनाकडे वाढत चालला आहे ही त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट घडलीय.

मायबोली पण सोशल मीडिया असलं तरी मोडरेटेड असल्यामुळे असेल कदाचित पण इथे वावरायला अजूनही आवडतं. In fact इथल्या सईच्या या लेखामुळे व प्रतिसादांमुळे मला हे connecting the dots करायला मदत झाली.

WhatsApp च्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. जर बदल स्विकारले नाहीत तर WhatsApp वापरता येणार नाही. यावर तुमचं काय मत आहे?

Facebook dilema and Social dilema
या दोन्ही documentary लहान मुलांनबरोबर बघण्या सारख्या आहेत ना वय 5 आणि पुढे? 5 ला आकलनाचा थोडा त्रास होईल पण violence किंवा nudity नाही ना.. सध्या तरी एवढाच criteria आहे

WhatsApp च्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. जर बदल स्विकारले नाहीत तर WhatsApp वापरता येणार नाही. यावर तुमचं काय मत आहे? >> माझ्या मनात सुद्धा हाच विचार सुरू आहे. खरंच इच्छा नाहीये ती पोलिसी स्वीकारण्याची. फेसबुक अकाउंट खूप वर्षाअगोदर बंद केले आणि WhatsApp ला पर्याय शोधतो आहे. WhatsApp जेव्हा आले तेव्हा पर्याय नव्हते पण आता ती परिस्थिती नाही. इतरांचे विचार जाणून घ्यायला आवडतील

व्हॉट्सअ‍ॅप ची पॉलिसी, त्यात होणारे बदल, आपला डेटा फेसबूक, गूगल, अ‍ॅपल वगैरे कंपन्यांनी वापरणं आणी त्याच्या विरोधात सोशल मिडीया न वापरणं ह्या विषयावर चर्चा सुरू झाली की मला 'माझ्यासारख्या धोंडो भिकाजी जोशी नावाच्या माणसाला चार लाठ्या मारल्याचा पश्चात्ताप होऊन इंग्रज हा देश सोडून जाईल ह्यावर माझा तरी विश्वास नव्हता' हे आठवतं. Happy Happy

फेरफटका, फेसबुक, गुगल किंवा इतर कंपनीज बंद पडाव्यात अशी इच्छा नाही. माझ्या आयुष्यात त्यांना मर्यादित स्थान असावं एवढीच इच्छा आहे. Also, I know that my data will be used but if I have any discretionary power over who can use it, Facebook will not be on that list. So I want to have a choice that's it. Signal आणि Telegram असे दोन पर्याय सध्या दिसत आहेत.

फेफ Happy

जिज्ञासा पण त्यात fundamental conflict आहे. असे सोशल नेटवर्क चालवायला जो महाप्रचंड खर्च येतो तो करून मग त्यापेक्षा प्रचंड उत्पन्न मिळवल्याशिवाय त्यातून एक कमर्शियल कंपनी कशी चालणार? म्हणजे मग लोकांच्या डेटामधून इतर कंपन्यांना मार्केटिंग व सेल च्या संधी उपलब्ध करून द्यायच्या व त्यातून उत्पन्न मिळवायचे, किंवा प्राथमिक उत्पन्न हे लोकांच्या सबस्क्रिप्शन मधून मिळवायचे असे एकदोनच पर्याय सध्या तरी आहेत. फेबु किंवा व्हॉअ‍ॅ चा आता जितका वापर होत आहे तो जर पैसे देउन करावा लागला तर खूप कमी होईल. आणि निव्वळ सबस्क्रिप्शन मधून चालवायचे म्हंटले तर वापरणार्‍यांना ती वार्षिक फी बहुधा इतकी प्रचंड असेल की लोक ती द्यायला तयार होणार नाहीत. पूर्वीचे वर्तमानपत्रांचे मॉडेल जाहिराती न घेता केवळ वाचकांच्या वर्गणीवर चालवण्यासारखे आहे ते.

म्हणजे डेटा व अ‍ॅड्स शिवाय पर्याय नाही. मग त्याबद्दलच्या पॉलिसीज अगदी स्पष्ट असाव्यात हे बरोबर आहे. युरोप व कॅलिफोर्निया मधे "ऑप्ट-इन" या तत्त्वानुसार डेटा शेअरिंग असण्याबद्दल कायदे आलेले आहेत. ते सोशल नेटवर्क्सवर किती परिणाम करणारे आहेत माहीत नाही. या तत्त्वानुसार एखाद्या व्यक्तीची बरीचशी माहिती ही त्याने/तिने आवर्जून परवानगी दिल्याशिवाय कंपन्या इतरांबरोबर शेअर करू शकत नाहीत. इतकी वर्षे अशा प्रकारच्या कंपन्या ऑप्ट-आउट तत्त्त्वावर चालत होत्या. म्हणजे आपण साइन अप करताना ते प्रचंड लायसन्स अ‍ॅग्रीमेण्ट झपकन स्क्रोल करून अ‍ॅक्सेप्ट करतो त्यात थोडीफार माहिती असते पण बहुतांश जोपर्यंत आपण रोखत नाही तोपर्यंत बरीच माहिती शेअर होत राहते. या नवीन कायद्यांमुळे हे किती बदलेल मला अजूनही माहीत नाही.

पण हा सगळा "ग्रे एरिया" असणे या कंपन्याच्या पथ्यावर होते. जोपर्यंत हे लोक आम्ही करतोय हे बेकायदेशीर नाही हे दाखवू शकतात तोपर्यंत ते ते करत राहणार. आणि मुख्य म्हणजे कायदे एन्फोर्स करू पाहणार्‍या सरकारी लोकांपेक्षा या कंपन्यांमधल्या तज्ञांची याबाबतीत तांत्रिक माहिती ही अनेक दशके पुढे असते. काँग्रेशनल हिअरिंग मधल्या फेसबुक किंवा गूगल च्या लोकांच्या क्लिप्स यू ट्यूब वर आहेत. त्या पाहिल्यात तर हे कायदे राबवणे किती अवघड आहे हे लक्षात येइल.

या बाफच्या दृष्टीने बघितले तर फेसबुकने लोकांना प्लेन बातम्या देण्याचा पर्याय देणे हा एक चांगला ऑप्शन आहे. म्हणजे मी जे सर्च करतोय किंवा जे ग्रूप्स बघतोय तेच तेच मला पुन्हा दाखवत राहण्यापेक्षा एक प्लेन फीड द्यायचा - जो माझ्या आधीच्या अ‍ॅक्टिविटीवर अवलंबून नसेल. मी जे स्वतःहून प्रोफाइल मधे शेअर केले आहे त्याप्रमाणे असला तरी चालेल. माझा जो अ‍ॅक्टिविटी किंवा स्वतःहून शेअर केलेला डेटा आहे तो इतर कंपन्यांना अ‍ॅड्स करता शेअर केला तरी चालेल - म्हणजे त्यांच्या बिझिनेस मॉडेलच्या आड हे येणार नाही.

युरोपातील GDPR कायदा. हा पाळल्याशिवाय कंपन्या तेथे बिझिनेस करू शकत नाहीत

कॅलिफोर्नियातील नवीन प्रायव्हसी लॉ

काँग्रेशनल टेस्टिमनीज
सुंदर पिचाई
https://www.youtube.com/watch?v=Iq_hw3eSIT0

काही लोकांनी चांगले ग्रिलिंग केले आहे पण हे ही पाहा Happy

https://www.youtube.com/watch?v=t-lMIGV-dUI

मार्क झुकरबर्ग
https://www.youtube.com/watch?v=stXgn2iZAAY

Pages