द सोशल डिलेमा - नेटफ्लिक्स

Submitted by सई केसकर on 11 September, 2020 - 11:32

१९९९-२००० हे वर्ष माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या त्यावेळी टीनएजर असणाऱ्या मुलामुलींच्या आयुष्यात फार मोठ्या बदलाचं होतं. घरातल्या फोनमधून चिर्रर्र चिर्रर्र असा आवाज करत आमच्या कम्प्युटरमध्ये इंटरनेट यायचं. आणि मग आम्हाला एक मोठं पटांगण बागडायला मिळायचं. सुरुवातीचे दिवस हे हॉटमेल आणि याहूचे होते. शाळा कॉलेजमधली गोड गोड प्रेमपत्र आता पासवर्ड प्रोटेक्टेड इमेलमध्ये येत असल्यामुळे अनेक जणांची सोय झाली होती. बरेच कवी मनाचे लोक आता तासंतास फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जे वाटतंय ते पात्रात किंवा कवितेत लिहून पाठवू लागले. ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवणं जितकं सोपं झालं होतं तितकंच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधणं सुद्धा सोपं झालं होतं. यात अनेक चॅटरूम असायच्या. याहू चॅटरूम्समध्ये "पडीक" असणं त्याकाळची कूल गोष्ट होती. त्याबरोबर प्रत्येक शहराच्या अशा चॅटरूम्स सुद्धा असायच्या. त्यात माझी लाडकी पुनेसिटी नावाची चॅटरूम होती.

"इंटरनेट इज फुल ऑफ क्रिप्स" अशा अर्थाची अनेक वाक्य आई बाबांनी त्याकाळी ऐकवली होती. आम्हाला एकीकडे इंटरनेट बद्दल उत्साह, कुतूहल, थोडंफार व्यसन अशा भावना होत्या, तर दुसरीकडे आई बाबांना भीती, धास्ती, काळजी, संताप अशा असाव्यात. हे प्रकरण आपल्या मुलीला बिघडवणार तर नाही अशी चिंता माझ्या आणि मैत्रिणींच्या पालकांना नक्कीच होती. त्यामुळे इंटरनेटवरच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही हे सकाळ, दुपार, संध्याकाळ आमच्या डोक्यात भिनवलं जात होतं. आणि आम्ही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून अनेक लोकांना भेटत होतो. इंटरनेटवर ओळख झालेल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला भेटायचं म्हणजे फारच गुदगुल्या वगैरे होणारा प्रसंग असायचा. कारण त्याकाळी डिजिटल फोटोग्राफी आयुष्यात रुळली नव्हती, आणि आपला फोटो इंटरनेटवर लावला तर आपल्याला लोक पकडून वगैरे नेऊ शकतात असली भीती दाखवल्यामुळे कुणी फोटो बिटो लावायचे नाही. आपला मित्र किंवा मैत्रीण दिसायला कशी असेल हे कुतूहल, त्यांना ओळखायचं कसं हा प्रश्न, आपण त्यांना कसे वाटू वगैरे गोष्टींमुळे न बघितलेल्या मित्र मैत्रिणींना भेटणं फारच आवडायचं. अनेकांना मी त्याकाळी टेकडीवर भेटले होते. आणि यात फक्त क्रश, डेटिंग वगैरे साठी आटापिटा नसायचा. माझ्यासारखी पुस्तकं आवडणारे, शास्त्रीय संगीत आवडणारे, गेलाबाजार फ्रेंड्स आवडणारे असे अनेक लोक त्यावेळी इंटरनेटवर भेटले. आणि सुदैवाने माझ्या वाट्याला एकही क्रिप आला/आली नाही.

तीनेक वर्षांनी गूगल आलं, आणि ऑर्कुट. या दोन्हींनी आयुष्य अजून थोडं बदललं. ऑर्कुटचा काळ हा सोशलमीडियाचा सुवर्णकाळ होता. कारण ऑर्कुट त्यामानानं निरागस होतं. आमच्या ओळखीतली काही लग्नही ऑर्कुटवर जमली. तिथेही माझ्याशी मिळत्या जुळत्या विचारांचे अनेक लोक भेटले आणि मैत्री झाली. त्यातल्या काहींचं आता फेसबुकवरही स्थलांतर झालं आहे. ऑर्कुट आलं तेव्हा आमच्याकडे डिजिटल कॅमेरा आला होता. त्यामुळे अधून मधून फोटो बदलणे, नवे टाकणे वगैरे आता जमायला लागलं होतं. एकूणच आधीच्या दोन तीन वर्षातलं इंटरनेटवरचं "अनॉनिमस" असणं आता कमी कमी व्हायला लागलं होतं. त्यावेळी वाटलं होतं की हे चांगलं आहे. इंटरनेटवरची आपली ओळख आणि खऱ्या जगातली ओळख ही एक असणं महत्वाचं आहे. मग हळू हळू बाकीचे ईमेल सोडून देऊन सगळीकडे गूगलचे इमेल वापरायला सुरुवात झाली. कारण गूगलमध्ये मेल मधूनच आपण लोकांशी गप्पा मारू शकायचो. याची फार सवय लागली. डेस्कवर काहीही करत असताना, अभ्यास, वाचन, सर्फिंग, गूगलमध्ये लॉगिन केले असेल तर जगभरातले मित्र मैत्रिणी सोबतीला असायचे. आणि गूगलचॅट आल्यावर का कोण जाणे हळू हळू त्या अनोळखी लोकांच्या चॅटरूम्सचा नाद सुटला. एखादी नवीन ओळख ऑर्कुटवर व्हायची आणि मग आपण फोन नंबर देतो तसं त्या व्यक्तीला आपलं गूगल आयडी दिलं जायचं. मग गप्पा मारता मारता एखाद्या गाण्याची वगैरे आठवण झाली की पलीकडची व्यक्ती किंवा मी, ते गाणं मेलला चिकटवून पाठवून द्यायचो. अशा गूगलचॅट मधून अगदी पिंक फ्लॉइड ते कुमार गंधर्व अशी सगळी गाणी माझ्यापर्यंत आली होती.

गूगल चॅट "कूल" झालं तेव्हा मी नुकती परदेशी शिकायला गेले होते. ऑस्ट्रेलियात असल्यामुळे, सकाळपासून अगदी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत, भारत, यूरोप, अमेरिका, कॅनडामध्ये विखुरलेले अनेक मित्र मैत्रिणी येऊन जाऊन गूगलचॅटवर सोबत करायचे. हे वर्षं असेल २००८ किंवा २००९. तोपर्यंत आपण सध्या ज्या फोनला सदैव चिकटलेले असतो, ते फोनही अस्तित्वात नव्हते. यावर आता विश्वासही बसत नाही. टचस्क्रीन फोन आपण जन्माला आल्यापासून वापरतो आहे असं आता वाटतं इतकी त्याची सवय झाली आहे. त्याकाळी मी गरीब विद्यार्थिनी असल्याने फोन हा फक्त टेक्स्ट मेसेज आणि फोन करायसाठी वापरला जाणारा ठोकळा होता. तेव्हा व्हॅट्सऍप नव्हतं यावरही विश्वास बसत नाही. पण त्याकाळी लॅपटॉप हा माझा जीव की प्राण असायचा. लॅपटॉप शिवाय काहीही काम होऊ शकायचं नाही. यावरही आता विश्वास बसत नाही. त्याकाळी गूगलचा ड्रॉपबॉक्स आला होता. आणि आम्हाला त्याचा इतका आधार होता, कारण युनिव्हर्सिटीच्या कम्प्युटरमधून आमचे काम आम्हाला त्यावर टाकून घरी जाऊन पुन्हा सुरु करता यायचं. हे म्हणजे फारच रेव्होल्यूशनरी काहीतरी होतं. गूगलचं अजून एक अचंबित करणारं काम म्हणजे मी हा लेख अगदी माझ्या विचारांच्या गतीनं लिहू शकते आहे. गूगल ट्रान्सलिटरेशनमुळे माझ्यासारख्या अनेकांना मातृभाषेतून व्यक्त होता आले. हेही साधारण २००९-१०च्या आसपास झाले. माझा उन्हाळ्याची सुट्टी नावाचा ब्लॉग मी संपूर्ण गूगलची ही सेवा वापरून लिहिला होता. आणि त्यातही उत्तरोत्तर प्रगती झाली.

याच दरम्यान, ऑर्कुटला मागे टाकत फेसबुक हे सगळ्यांचं आवडतं सोशल नेटवर्क झालं. खरं सांगायचं तर सुरुवातीला मला फेसबुक अजिबात आवडलं नव्हतं. माझ्या फ्लॅटमेटनं आग्रह करून मला ते घ्यायला लावलं कारण तिथे तुम्ही एकमेकांना "टॅग" करू शकत होतात. मग अनेक वेळा "तू मला मुद्दाम मी ज्या फोटोत कुरूप/जाड दिसते त्यात टॅग करतेस" वगैरे भांडाभांडी व्हायची. पण एकाच फोटोवर त्यातल्या अनेकांची नावं टाकून, त्यांना आणि त्यांच्या मित्रायादीला तो दिसावा, जेणेकरून अनेकजण त्या फोटोवर कॉमेंट करतील, तो लाईक करतील आणि फेसबुकच्या फायद्याचं म्हणायचं तर, त्या फोटोच्या निमित्तानं त्या फोटोत असलेले सगळे लोक आणि त्यांचे मित्र अधिक काळ फेसबुकवर राहतील. हळू हळू लोकांच्या लक्षात आलं की आपल्या फोटोवर जितक्या जास्त लोकांना टॅग करू तितके त्यावर मिळणारे लाईक्स वाढतात. यातूनच मग अमुक अमुक विथ १०० अदर्स असे, त्यातल्या ९९ लोकांचा काहीही संबंध नसलेले फोटो फेसबुकवर येऊ लागले. आणि फेसबुकच्या अशा छोट्या छोट्या आपल्याला निरुपद्रवी वाटणाऱ्या या युक्त्यांनीच आज विखारी रूप धारण केले आहे.

ऍप्पलचा आयफोन आला आणि हे सगळं बदललं. आयफोन यायच्या आधी आमचे आवडते ऍप्पल उत्पादन म्हणजे आयपॉड. आत्ताच्या तरुणाईला सांगितलं की तेव्हा असा जाऊ तिथे भसाभस डेटा वापरून गाणी ऐकता यायची नाहीत. म्हणून आम्ही आमच्या कॉम्प्युटरवर (पायरेटेड) गाणी डाउनलोड करायचो आणि मग आयपॉड नावाच्या पिटुकल्या प्लेयरमध्ये ती टाकून बस, ट्रेन, फूटपाथ, लॅब सगळीकडे तुमच्यासारखेच कानात प्लग घालून वावरायचो, तर त्यांना ते किती मागास वाटेल याची कल्पनाही करवत नाही. माझ्या मुलाला आत्ताही अनेकवेळा मला असं सांगावंसं वाटतं की, "बाबा रे! आमच्या काळी असं हवं तिथे बसून यू ट्यूब बघता यायचं नाही! तू किती नशीबवान आहेस याची तुला कल्पना नाही!" पहिल्यांदा जेव्हा स्पॉटिफाय नावाचं गाण्यांचं ऍप्प वापरायला सुरुवात केली तेव्हा आपण काय ऐकतोय हे जगाला दाखवायला स्पॉटिफाय आणि फेसबुकचं लग्न लावल्याचं आठवतंय. आणि मग लोकांना आपण कूल वाटावं म्हणून स्पॉटिफायवर वेगळी प्लेलीस्ट केल्याचेही स्पष्ट आठवतं आहे.

हळूहळू आपल्या हातातील ही सगळी उपकरणे, एकाच फोनमध्ये गेली आणि आपण सगळीकडे फटाफट साइन इन करू लागलो. कुठल्याही सध्या ऍप्पवर जायला आधी गूगल किंवा फेसबुकचा पत्ता देऊ लागलो. आणि याच दरम्यान इंटरनेटवर वस्तू खरेदी करणेही सोपे झाले. आज, एकेकाळी इंटरनेटवर खरेदी करायला फक्त क्रेडिटकार्ड चालायचं हे सुद्धा आश्चर्यकारक वाटतं आणि ते दिवस फार पूर्वीचे नाहीत हेदेखील. वस्तू खरेदी करायचे देखील किती मार्ग आपण अवघ्या सात आठ वर्षात बघितले आहेत. क्रेडिट कार्ड, मग डेबिट कार्ड, पेपॅल, नेटबँकिंग ते आता गूगलपे, फोनपे, ऍमेझॉनपे. एकेकाळी इंटरनेटवर फक्त चोर, भामटे असतात असं ठासून सांगणारे आईबाबासुद्धा आता लीलया ऍमेझॉन, जीपे वगैरे वापरू लागले आहेत. पण एकदा मला आईनं अगदी निरागसपणे प्रश्न विचारला, "अगं सई, आज सकाळी मी गूगलवर हेडफोन्स शोधले आणि लगेच माझ्या फेसबुकवर ते कसे काय दिसायला लागले?" तेव्हा मग तिला हे सगळे आपल्यावर पाळत ठेऊन असतात हे सांगताना वाटलं की कुठल्यातरी चोर भामट्यांच्या स्टॉकिंगला घाबरता घाबरता आपण या सगळ्या कंपन्यांकडूनच स्टॉकिंग करून घेऊ लागलो आहोत.

हे सगळे विचार एकदम आले कारण काळ नेटफ्लिक्सवर "द सोशल डिलेमा" ही डॉक्युमेंट्री बघितली. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, गूगलमध्ये काम केलेल्या अनेक बुद्धिमान लोकांनी या कंपन्या आपल्याला त्यांच्या जाळ्यात कशा खेचून घेतात आणि आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिथे राहण्यास कशा उद्युक्त करतात याबद्दल सविस्तर सांगितले आहे. यात फेसबुक आणि गूगलकडून आपलं लक्ष सतत कसं वेधून घेतलं जातं याची अनेक उदाहरणं आहेत. यात व्यक्त होणाऱ्या अनेकांना, "आपण हे काय करतोय?" असा प्रश्न पडून त्यांनी त्यांची नोकरी सोडली होती. ती डॉक्युमेंटरी बघताना अनेकवेळा असं वाटलं की आपल्यावर मागची दहा एक वर्षं केलेले प्रयोग; ज्यामुळे आपण पुरते या सगळ्याच्या आहारी गेलो, एका बेसावध क्षणी आपल्याला आणि आपल्या विचार प्रक्रियेला कुणालातरी विकून टाकायला वापरले गेले. अर्थात यात व्हिक्टीम बनायचे काहीच कारण नाही. आपल्याला कधीही सोशल मीडियाला राम राम ठोकता येऊ शकतो. पण त्यापासून लांब जाण्यापेक्षा त्याचा विवेकानं वापरही करता येऊ शकतो.

जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यात सोशल मीडियानं स्थान पटकावलं तसंच सार्वजनिक आयुष्यातही अनेक वेळा सोशल मीडियामुळे क्रांती झाली. अरब स्प्रिंग्स पासून ते भारतात सीएएच्या विरोधात झालेलं आंदोलन, सगळ्यात सोशल मीडियाचा वाटा महत्वाचा होता. पण त्याचबरोबर, राजकारणी लोकांकडून आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियाचा वापर फेक न्यूज पसरवण्यासाठी होतो हेही आता सिद्ध झाले आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये अनेक विचार करायला लावणारी वाक्य आहे. जसं आपण सोन्याच्या "फ्युचर्स" मध्ये पैसे गुंतवतो, त्याचप्रमाणे सोशल मीडिया "ह्युमन फ्युचर्स" मध्ये गुंतवणूक आणि उलाढाल करतो आहे. आपले विचार ओळखून आपल्याला हवा तो कन्टेन्ट दाखवून ते समविचारांच्या माणसांची बेटं तयार करतायत आणि काय खरं आहे आणि काय खोटं आहे यातली रेषा इतकी धूसर झाली आहे की अशा एकसारख्या विचारांच्या माणसांचे जत्थे विरोधी विचारांच्या माणसांवर तुटून पडतात. एकेकाळी माणसांना जवळ आणणारी माध्यमं आता माणसामाणसांमध्ये फूट निर्माण करताहेत.

त्यातला एक इंजिनियर हे वाक्य म्हणतो, "यू थिंक दॅट द वर्ल्ड इज गोइंग क्रेझी". हे असं गेले अनेक महिने वाटतं आहे. अर्थात त्या वेडेपणात मीसुद्धा आहे. पण आपण हातात इतकी आयुधं असूनही इतके दिशाहीन कसे झालो, आणि तेही इतक्या कमी अवधीत, याचं आश्चर्य आणि खेद दोन्ही वाटतात. माझ्यासारखे आणि माझ्या आधी जन्माला आलेले लोक हळू हळू या मायावी दुनियेत आले आहेत. पण आज जे विशीपंचविशीत आहेत, त्यांनी या आधीचं, असं सारखी धांदल, कॉंट्रोव्हर्सी, सतत नोटिफिकेशन, सतत तुलना नसलेलं जगच पाहिलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे वाईट परिणाम अधिक तीव्र आहेत हेसुद्धा अनेक उदाहरणांवरून लक्षात येतं. आपण कसे दिसतो, आपण कसं दिसलं पाहिजे याबद्दलचे न्यूनगंड सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आधीक तीव्र स्वरूपात जाणवतात. आणि एखादी मैत्री किंवा नातं पूर्वी तोडताना आपल्याला जे संभाषण करून पुढे जावे लागायचे ते आता एखाद्या ब्लॉकमध्ये उरकते. लहान मुलांना फोनचे व्यसन लावू नका असं कळकळीने काही तज्ज्ञ या डॉक्युमेंटरीमध्ये सांगतात. अर्थात आज परिस्थितीच अशी आहे की मुलांना फोनशिवाय पर्याय नाही.

फिल्म बघून सुन्न वाटलं असलं तरी आपल्या आयुष्यात सोशल मीडियामुळे होणार उपद्रव आपण कमी करू शकतो हा आत्मविश्वास अजूनही आहे असं वाटतं. आपण फेसबुकवर नक्की काय करायला येतो, आणि कशाकशात वेळ घालवतो हे सतत बघत राहिलं तर हळू हळू वेळखाऊ, विखारी आणि कुठलाही अंत नसलेल्या पोस्ट्स आणि वादविवादातून आपोपाप दूर राहायला शिकतो. पण घरात, ऑफिसमध्ये सतत या वाहवत जाण्यापासून स्वतःला वाचवावं लागतं हे मात्र नक्की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कालच पाहिली ही डोक्यु....इथे वेबसिरीज धाग्यावर सजेस्ट पण केली आहे. आता लेख वाचते...
त्यातल हे वाक्य फार आवडलं
They make a voodoo doll out of your every information and manipulate your every move.
यावरून असं वाटलं सई की आपण(as a human race) एक भस्मासुर तयार केला आहे. We created a monster !!
आज मुलांसोबत बघणार आहे ....
Pizzagate पर्यंत आले आहे..
खूप वर्षांपूर्वी 'हनुमानजी को मानते हो तो जरूर लाइक और शेअर किजिये क्या पता बिगडा काम बन जायेगा ' पोस्ट बघून फेसबुक/whatsapp वानप्रस्थ स्विकारला आहे... सगळ्यात वाईट म्हणजे स्वतः चे मन इतर ठिकाणी गुंतवण्याची क्षमता पारच घालवून टाकतो आपण...मुलांच्या बाबतीत तर it messes with the hardwiring of the brain.
याच्यावरचे अवलंबीत्व म्हणजे .... वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा असं झालंय.

@अस्मिता,
मला अजूनही भस्मासुर म्हणवत नाही सोशल मिडीयाला. पण कधी कधी व्हॉटसअप आणि फेसबुकचा वीट येतो. त्यातही वैयक्तिक पातळीवर अनुभवायला मिळालेला मत्सर नकोसा वाटतो. सोशल मीडियामुळे असा मत्सर मी दोन्ही बाजूने अनुभवला आहे. लोकांबद्दल असूया वाटून घेतली आहे आणि माझ्याबद्दल लोकांना वाटलेली अनुभवली आहे. आणि दोन्ही नकोशा वाटल्या.
पण मी म्हंटले तसं, ठरवून वापर केला तर चांगला विरंगुळा आहे. गेले काही महिने माझ्या ऑफिसच्या फोनवर व्हॉटसअप फेसबुक दोन्ही नाही. त्यामुळे दिवसातले ७-८ तास आपोआप समोरच्या कामाकडे लक्ष देऊन मन लावून करण्यात जातात. याचा माझ्या मेंटल हेल्थ आणि एकूण चांगलं वाटण्यास फार उपयोग झाला.

छान लिहीले आहे! बराच काळ मी फोन वर फेबु इन्स्टॉल केले नव्हते, आणि व्हॉअ‍ॅ वरही नव्हतो (४-५ वर्षे झाली आता). पण बरेच पब्लिक माबो वगैरे वर कमी येउन तिकडे आहे असे लक्षात आले. तसेच कॉम्प्युटर वर फेबु खूप स्लो झाले. मग दोन्ही फोन वर जॉइन केले. त्यानंतर आता दर दहा मिनीटांनी आपोआप फोन उचलून दोन्ही बघितले जाते आणि कधीकधी त्यात गुंग होउन गेल्याचे अर्ध्या तासाने लक्षात येते. अनेकदा तर असे झाले आहे की बराच वेळ फेबु स्क्रोल केल्यावर पोस्ट्स रिपीट होतात आणि अरे आता काही नवीन राहिले नाही असे जाणवते. तेव्हा असा साक्षात्कार होतो की मुळात इतका वेळ सुद्धा फेबु बघण्याच्या उद्देशाने आपण ओपन केलेच नव्हते.

एक मात्र अजूनही पाळलेले आहे. फेबु अकाउण्ट इतर कोणत्याही अकाउण्ट, अ‍ॅप वगैरेंशी लिन्क केलेले नाही. कोणतेही क्विझ वगैरे घेत नाही.

नेफि, फेबु, यू ट्यूब, गूगल वगैरेंच्या "रेकमेण्डेशन्स" नी मात्र पार पकवून टाकले आहे.

हो ना सई,
मला अजूनही भस्मासुर म्हणवत नाही सोशल मिडीयाला. ....>>>>>
मलाही आशा आहेच गं पण माझे नियंत्रण माझ्या मुलांपुरतेच असू शकते. इतर मुलं ज्यांच्या पालकांना काही पर्याय नाही किंवा मगं या गोष्टीवर विश्वास नाही. त्याचा परिणाम एकूणच पुढील समाज काही अंशाने नैराश्याकडे जाणारा वा इंपल्सिव्ह बिहेवियर इश्यू वगैरे असलेला असा होऊ शकतो , त्यादृष्टीने हे काळजीकरण्यासारखंच आहे. एकूणच मानसिकदृष्ट्या evolve होण्यासाठी ही एक मोठीच बाधा आहे. मला समाज म्हणून आपण असुरक्षित व अस्थीर मनाचे होतो आहोत ही भीती आहे.
I wrote this because I was also excited about the documentary... दुसरं काही नाही हं Happy
धन्यवाद.

लेख फार व्यवस्थित, मुद्देसूद लिहिला आहे. सगळ्याची उजळणी झाल्यासारखे झाले. डॉक्यू लिस्टीत टांगून ठेवली आहे.
फेबू खरेतर कधीच आवडले नाही मात्र बरीच आवडीची जनता तिकडे असल्याने पर्याय नाही. आमी फेबु ब्रावजरवरूनच वापरतो. नव्या पोस्ट संपल्या की एंड पोस्ट, नो मोअर स्टोरी असे काहीतरी येते. मग विषय संपतो. खरा वाहवत गेल्यासारखा वेळ माबोशिवाय इतरत्र कुठेही जात नाही.

छान लेख, बघायला हवा हा माहितीपट.
याबद्दल इतरही ठिकाणी थोडं फार वाचलं आहे.

मला 'आपण manipulate केलं जातोय' अशी भावना गेल्या काही दिवसात झाली जेव्हा मी consciously बॉलिवूडच्या nepokids च्या न्यूज अनफॉलो करायचा प्रयत्न केला. It wasn't easy! कारण न्यूज साईट्स किंवा ट्विटर या न्यूज पद्धतशीरपणे समोर आणत आहेत याची आधी जाणीवच नव्हती पण आता ते लक्षात आलं. त्याच्यामागे पीआरचा पैसा असतो हा अवेअरनेस आला. आणि वरवर जाणवत नसलं तरी यातून आपलं डोकं, विचार यावर subliminal level वर परिणाम होतो हे जाणवून आता मीडियामधून consume केलं जाणारं content बदलायला सुरुवात केली आहे.
काही हलकेफुलके fashion ब्लॉग, bollywood gossip sites या बाय डिफॉल्ट ओपन केल्या जायच्या मग आता निग्रहाने त्या साईट्स उघडून न वाचता बंद करणे असं करत फायनली आता उघडल्याच जात नाहीत इथपर्यंत प्रगती आहे.

पुढची माहिती माझे निरिक्षण म्हणून देतेय.
इथे जर्मनीत बर्‍याच अमेरिकन कंपन्यांबद्दल आकस दिसून येतो, त्यातलं महत्वाचं नांव म्हणजे फेसबुक. माझ्या आजूबाजूला दिसणारे नॉर्मल जर्मन्स फेसबुक अजिबात वापरत नाहीत. इथली तरुण पिढी म्हणजे १५ ते २५ वर्षं असा वयोगट अजिबातच फेसबुक प्रेमी नाही. ५० वर्षांवरचे भारतीय जितके फेसबुकचा वापर करत असतील तितके इथले त्या वयोगटातले लोक फेसबुक बाबत उदासीन आहेत, इनफॅक्ट हल्लीच्या काळातही स्मार्ट फोन कसा वापरावा अशी चर्चा झोडताना दिसतात.

>>आपण सध्या ज्या फोनला सदैव चिकटलेले असतो, ते फोनही अस्तित्वात नव्हते. यावर आता विश्वासही बसत नाही.
अगदी खरं. फार मस्त लेख.

संपदा खूप आश्वर्य वाटलं जर्मन लोकांचं. पण मग तिथे फेबु टाईप दुसरं काही वापरलं जातं का? या मोहापासून जर्मन विशेषतः तरुण वर्ग कसा काय दूर राहिलाय नवल आहे.

> एकूणच मानसिकदृष्ट्या evolve होण्यासाठी ही एक मोठीच बाधा आहे. मला समाज म्हणून आपण असुरक्षित व अस्थीर मनाचे होतो आहोत ही भीती आहे.

हो. "लाईक" हे आपल्या मेंदूत डोपामिन तयार करतात. आणि सतत लाईक बघायची सवय ही बायोलोजिकली सिगरेट ओढणे किंवा स्ट्रेस इटींग सारखीच आहे. आपल्याला तो डोपमिन चां डोस मिळाला की छान वाटतं. पण ती "हाय" ओसरली की पुन्हा निराश, रिकामपण येतं.

>>म्हणजे १५ ते २५ वर्षं असा वयोगट अजिबातच फेसबुक प्रेमी नाही.
लहान वयोगट इंस्टा वर जास्त दिसतात. जर्मनीमध्ये माहिती नाही पण जगभरातच मिलेनियल नंतरची पिढी फेसबुक कमी वापरते. पण इन्स्टा फेसबुक पेक्षा जास्त उथळ आणि addictive आहे. त्यात हल्ली इतके फोटो एडिटिंग ऍप आहेत की तुम्ही पाहताय तो एखाद्या हॉट मुलीचा किंवा मुलाचा फोटो किती प्रोसेस केला आहे हे सांगणे कठीण आहे. आणि त्या फोटोंशी तुलना करून तरुण लोक निराश होतात.

आणि डेटिंग आणि एकूणच रोमँटिक रिलेशनशिप मध्ये या मध्यामांनी भयानक उच्छाद मांडला आहे असं माझ्यापेक्षा १० -१५ वर्षांनी लहान असलेल्या लोकांकडे बघून वाटतं.

राच्याकने, C U soon हा मल्याळम सिनेमा नक्की बघा. या थीमवर आहे.

>>>>विचार यावर subliminal level वर परिणाम होतो हे जाणवून आता मीडियामधून consume केलं जाणारं content बदलायला सुरुवात केली आहे.

Same same. मलाही हे जाणवलं. आणि व्हिडियो बघायला गेलं की त्यांचं ऑटो प्ले फीचर आहे त्यामुळे सुद्धा खूप वेळ वाया जातो. एक व्हिडियो पहिला की लगेच दुसरा सुरू होतो. माझं लग्न थोडं उशिरा झालं. आणि मी ३० वर्षांची झाले तेव्हा अचानक मला फेसबुकवर सतत infertility बद्दल जाहिराती दिसू लागल्या. मला उगाच वाटतं आहे का असं वाटून मी त्याकडे खास लक्ष देऊन कन्फर्म सुद्धा केलं. आणि जेव्हा माझे माझ्या मुलाबरोबर फोटो येऊ लागले तेव्हापासून या जाहिराती थांबल्या! असे अनेक instances आहेत. पण हे fertility बद्दल जरा अतीच होतं.

Happy सई, आता सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिराती येतील. आणि अगदी ठराविक वेळी येतील. म्हणजे दिवस नसतील तरी त्या त्या दिवशी येणार्‍या जाहिराती बघूनच मळमळतं बघं..... कॅश पेमेंट करून/दुकानातून विकत घ्यावे असे काही प्रॉडक्ट्स असतात त्यात सॅनिटरी नॅपकिन्स एक!

ते सोशल मिडीया जाहिरातीचे सेटींग्ज, ब्राऊजर कुकीज इ प्रकार तर अगदी भयंकर आहेत. लेख छान आहे. धन्यवाद!

मस्त लेख सई! डॉक्युमेंटरी बघेन नक्की.
फेसबुक सोडून दोन वर्षे झाली. Whatsapp आणि reddit वापरते बऱ्यापैकी. मायबोली आणि मैत्रीण हे दोन मराठी सोमि प्लॅटफॉर्म.
बाकी मोठा भाग गुगलं शरणं मम आहे. त्याचे काय करायचे? पण सध्या मी अशी समजूत घातली आहे मनाची की मला ज्या गोष्टीचा उपयोग होतो ती गोष्ट मी माझ्या माहितीच्या बदल्यात फुकट वापरते. आपण स्वतः ला पदोपदी विकतो आहोत आणि तेही आपल्यापेक्षा अनेक पटीने अधिक बुद्धी असलेल्या मशीन्सना ही कल्पना भीतीदायक आहे.
युवाल हरारीने होमो ड्युअस पुस्तकात यापुढे कॉलनीज या डिजिटल असतील असं म्हटलंय. भारत तर आधीच फेसबुकची कॉलनी बनला आहे. Whatsapp, insta, FB यावर स्वतः स्वतःला express करणाऱ्या तरूणाईला हे माहीत नाही की ते स्वतःचं free will या कंपनीला फुकट देत आहेत. Once someone is able to own your mind and predict your behavior better than you can, there is no need to physically own you. तुम्ही गुलाम होताच!

मस्त लेख. नवऱ्याने कालच ही डॉक्युमेंटरी बघितली. मी अधूनमधून बघितली.
आपल्यावर हे लोक पाळत ठेवून असतात हे लक्षात आल्यावर दचकायला होतं. एकदा पुण्याला गेलो असताना फोनमध्ये काही कारणाने लोकेशन ऑन केलेलं होतं, ते बंद करायचं राहिलं होतं. नंतर रात्री एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी 'श्रेयस' मध्ये गेले होते. घरी परत आल्यावर मला गूगलचा सवाल आला, 'हाऊ वॉज हॉटेल श्रेयस? रेट युअर एक्सपिरिअन्स'

हो. गुगल मॅप आपण कॅब किंवा इतर काही कारणाने ऑन ठेवतो. पण ते नंतर इतकं ट्रॅक करतं की भीती वाटते. चुकून पेड शौचालयात गेलो तरी नंतर 'हाऊ वॉज सुलभ?' विचारेल असं वाटतं.
कधीकधी याचा फयदा होतो आपल्याला घटना आठवत नसतात तेव्हा. कुठे कधी गेलो वगैरे. (किंवा चुकून पोलीसांनी २० मार्च की रात ८ बजे से ८.४० बजे आप कहां थे असा प्रश्न विचारल्यास Happy )
पण एरवी आपल्यावर कोणी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सतत पाळत ठेवून आहे असं वाटतं>

बघायला पाहिजे हि डॉक्युमेंटरी. लेख मस्तच आहे सई.
>>आज, एकेकाळी इंटरनेटवर खरेदी करायला फक्त क्रेडिटकार्ड चालायचं हे सुद्धा आश्चर्यकारक वाटतं >>> अजून नेटफ्लिक्सचं पेमेंट फक्त visa or Master cards नेच होतं ना? कारण माझं रूपे कार्ड accept नव्हतं झालं,

सई, धन्यवाद या रेको साठी! डॉक्युमेंटरी पाहिली. सध्या whatsapp सोडून बाकी सर्व सोमि ॲप्स मोबाईलवरून काढून टाकली आहेत. सर्व तंत्रज्ञ इंडस्ट्री सुधारण्याची अपेक्षा व्यक्त करतात फक्त लांब केसांच्या वेण्या आणि जाड भिंगाचा चष्मा असलेला जो माणूस आहे तो (नाव गुगल करण्याचा कंटाळा आला आहे म्हणून वर्णन केले आहे) एकटा ॲप्स डिलीट करा असा सल्ला देतो हे फार telling वाटते.

@जिज्ञासा
मला अँप्स डिलीट करण्याचा प्रचंड फायदा झाला आहे.
दुसरं म्हणजे या डॉक्युमेंटरीमध्ये यावर चर्चा नाही पण मी फार पूर्वी वाचलं होतं, की मायबोलीत ज्याला रोमात म्हणतात तसा सोशल मीडियाचा वापर हा सतत पोस्ट करत राहण्यापेक्षा मेंटल हेल्थ साठी जास्त घातक असतो.

>>;शौचालयात गेलो तरी नंतर 'हाऊ वॉज सुलभ?' विचारेल असं वाटतं.
हा हा

मला लोकेशन वापरून फेसबुक भोचकपणे "कुणीतरी इज नियर बाय" सांगायचं ते फार डोक्यात जायचं. इथे फोन वाजला तरी तो न घेता बंद होईपर्यंत त्याच्याकडे बघणारे आपण आणि फेसबुक असा आगाऊ पणा करणार!

बघायला सुरूवात केली आहे. इण्टरेस्टिंग आहे. यातल्या काही गोष्टी गेल्या काही वर्षांत "टेक" मीडिया मधे चर्चेत आहेत पण यात फार चांगल्या पद्धतीने समजावले आहे. उदा: "If you are not paying for the product, you ARE the product" हे गेल्या ५-६ वर्षांत लोकांना साधारण माहीत झाले आहे. पण यात त्यातले न्युआन्सेस उलगडून दाखवले आहेत.

फेबु मधून रेकमेण्ड केली जाणारी क्विझेस, अ‍ॅप्स कधीही न उघडणे याबरोबरच इतर कोणत्याही साइट वा अ‍ॅप वर आपले फेबु किंवा इतर कोणतेही लॉगिन वापरून न जाणे हे अजून एक मी नेहमी करतो. आणखी एक महत्त्वाचे ते म्हणजे कोणत्याही अ‍ॅप मधून सतत आदळाणारी ती नोटिफिकेशन्स ऑफ करून टाकली आहेत. कोणत्याही अ‍ॅप वर मला जायचे तेव्हाच मी जाउन ते बघतो. त्यांनी रिक्षा फिरवली म्हणून नाही.

इव्हन ब्राउजर वरून अ‍ॅक्सेस करताना अनेक साइट लोकेशन ट्रॅक केलेले चालेल का म्हणून विचारतात (होपफुली तुमच्या ब्राउजर चे सेटिंग तुम्ही बदललेले नाही). अगदी गरज असलेल्या एक दोन साइट सोडल्या तर इतर कोणत्याही साइट करता ते ओके करत नाही.

मी पण काल पाहिली डॉक्यूमेंट्री. आवडली अर्थातच. त्यात जितकं उलगडून सांगितलं आहे तितकं नाही तरी एका लेवलवर हे सर्व अर्थातच माहित होते.

माहितीपटाबद्दल बोलायचे झाल्यास पहिले १५-२० मिनिटं अजिबातच ग्रिपिंग नाहीत. फार म्हणजे फार विस्कळीत आहे सर्व.

जिज्ञासा ज्या लांब केसांच्या जाड भिंगाचा चश्मा लावलेल्या माणसाबद्दल बोलते आहे तोच माणू स मला त्या सर्वात जास्ती इफेक्टिव वाटला.

काल रात्री तातडीने पाहण्याचं कारण म्हणजे काल मला एक महत्वाचं काम होतं आणी त्यात माझं अजिबात लक्ष नव्हतं मी सतत फोनवर हे ते बघण्यात विचलित होत होते. आज फोन दुसर्‍या खोलीत ठेवला आहे खरा पण इथे माबोवर आले आहे त्याला पाउण तास होउन गेला.
एखाद्या गोष्टीत मन गुंतवण्याची क्षमता कमी झाल्याचा अनुभव मलाही आहे Sad

पूर्ण बघितली. प्रत्येकाने आवर्जून बघायलाच हवी. सगळ्या गोष्टी म्हणजे नवीन माहिती आहे असे नाही पण तरीही बघण्यासारखी आहे. मुख्य म्हणजे बॅलन्स्ड आहे. फेबु वगैरेंना व्हिलनचा ठप्पा लावणे सोपे आहे. पण त्यांचे त्यामागचे ड्राइव्ज वगैरेची चांगली माहिती आहे यात.

पूर्वीच्या मानाने गेल्या काही वर्षांत पोलरायझेशन प्रचंड वाढले आहे हे माहीत होते. पण त्याची अनेक कारणे यातून पुढे येतात. फेसबुक, यू ट्यूब वगैरे सारखे जाहिरातींचे व कंटेण्टचे टार्गेटिंग व एकूणच रेकमेण्डेशन्स वगैरेचा फार मोठा वाटा आहे या पोलरायझेशन मधे. एकाच बाजूच्या क्लिप्स व पोस्ट्स सतत वाचणे, दुसरी बाजू आपोआप समोर तर येत नाहीच पण आवर्जून समजून घेण्याचाही प्रयत्न न करणे यातून टोटल एककल्ली विचार करणारी जमात निर्माण झाली आहे. भारतातही दिसते व अमेरिकेतही. आपल्याशी सहमत नसलेले सगळे देशद्रोही, लोकशाहीविरोधी व एकूणच समाजाला घातक आहेत वगैरे वाटू लागले की समजावे आपल्याला इतर अनेक बाजू वाचायची गरज आहे. पॉलिटिकल सिस्टीम मधे असलेले प्रॉब्लेम एकाच पक्षात दिसू लागले, जनरल समाजातील पॅटर्न एकाच जातीत्/धर्मात दिसू लागले की समजावे कोणाच्यातरी अजेंड्यामधे आपण useful idiot आहोत.

वास्तविक "Give me all viewpoints so I can decide" सारखा पर्याय देणे या लोकांना जड नाही. पण त्यांच्या बिझिनेस ड्रायव्हर्स मधे ते बसत नसेल.

छान लिहलं आहेस सई.

डिजिटल प्रवास व तुमचं त्याबरोबरचं जोडलं जाणं दोन्ही आवडले. >>>+१

इथे आमचा सगळा ग्रूप टेक सेक्टर वाला आहे, त्यातही सगळे बिग ५ मधले (मी सोडून), त्यामुळे द सोशल डिलेमा बघायच्या आधीपण बर्याचवेळा त्यातल्या वेगवेगळ्या पॉईंट्स वर नेहमीच चर्च्या होत आली आहे इतकी वर्षे.
डॉक्युमेंट्री मध्ये दाखवल्या सारखे काही फ्रेंड्स आहेत ज्यांनी शेवटी बर्नाऊट होऊन फेसबूक सोडली आहे.

लोकं अजून ५ सेकंद जास्तवेळ फेसबूकवर कशी राहतील ह्यावर काम करणारी फेसबूकची एक मोठी टीम आहे ज्यात सगळे चांगल्या युनिव्हर्सिटी मधले पी. एच डी लोकं आहेत, आणि फक्त टेक सेक्टर नाही तर सायकॉलॉजि वगैरे विषयातली तज्ञ् मंडळी पण.

फेसबूक स्पेसिफिक बघायचं असेल तर २ वर्षांपूर्वी आलेली पी.बी एस फ्रंटलाईन ची THE FACEBOOK DILEMMA डॉक्युमेंट्री पण छान आहे. https://www.pbs.org/wgbh/frontline/film/facebook-dilemma/

बाकी आमच्या ग्रुप मध्ये कधीतरी फेसबूक वापरणारे, आज्जीबातच न वापरणारे आणि Doesn’t matter if we are the product म्हणत सोशल मीडियाच्या वाईट परिणामांसकट त्याला आपलंसं केलेले दिवसातून किमान १५-२० वेळा तरी फोनवर फेसबूक बघणारे लोकं पण आहेत.

>>>वास्तविक "Give me all viewpoints so I can decide" सारखा पर्याय देणे या लोकांना जड नाही.

फा,
हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ते व्ह्यू पॉईंट असतात. पण हल्ली फेक न्यूज मध्ये धादांत खोटं पसरवतात तेव्हा तो व्ह्यू पॉईंट कसा असू शकतो? तिथे शेवटी असं वाक्य आहे की "if truth isn't truth then how can we proceed?" हे हल्ली फार प्रकर्षाने जाणवतं. १० पर्याय असतील तर त्यातले खरे किती असाच हल्ली प्रश्न पडतो.

>>>लोकं अजून ५ सेकंद जास्तवेळ फेसबूकवर कशी राहतील ह्यावर काम करणारी फेसबूकची एक मोठी टीम आहे ज्यात सगळे चांगल्या युनिव्हर्सिटी मधले पी. एच डी लोकं आहेत,

आणि हे ई कॉमर्समध्ये सुद्धा वापरले जाणारे तत्व आहे. लोक जास्तीत जास्त आपल्या वेबसाईटवर राहून नको असलेल्या वस्तू कशा खरेदी करतील यासाठी प्रचंड रिसर्च आणि discounts दिले जातात. मध्यंतरी एक प्रोडक्ट अमेझॉन वर बघितलं आणि तेच त्या उत्पादकाच्या वेबसाईट वर बघितलं. अमेझॉन वर ते २०० रुपयांनी स्वस्त होतं. तेव्हा अमेझॉन कसं काय असं काम करू शकतं असा प्रश्न पडला. या कंपन्या भारतात तरी प्रॉफिट कमवत नाहीत. मग या अशा प्रकारे धंदा का आणि कशा करतात?

Pages